Friday, November 7, 2008

राहुल राजवर पोलिसांनी जवळून गोळ्या झाडल्या?

जे.जे.च्या अधिष्ठात्यांचा नकार : फॉरेन्सिक लॅबमध्ये होणार तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः बैलबाजार येथे बेस्ट बसमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला उत्तर भारतीय तरुण राहुल राज आणि पोलिसांमध्ये गोळ्या झाडताना असलेले अंतर तपासण्यासाठी त्याच्या त्वचेचा गोळ्या लागलेला भाग अभ्यासाकरिता कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज दिली. राहुल राजचे शवविच्छेदन करणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्याच्यावर पोलिसांनी अतिशय जवळून गोळ्या झाडल्याची शक्‍यता वर्तविल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र असे कोणतेही वक्तव्य शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांनी केले नसल्याचे सायंकाळी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी जाहीर केले.

अंधेरी ते कुर्लादरम्यान धावणाऱ्या 332 क्रमांकाच्या बेस्टमध्ये 27 ऑक्‍टोबर रोजी बैलबाजार पोलिस बीट चौकीजवळ ही चकमक झाली. त्यात पाटण्याच्या कदमकोन येथून नोकरीच्या निमित्ताने आलेल्या राहुल राज कुंदप्रसाद सिंग या तेवीस वर्षीय तरुणाच्या झालेल्या मृत्यूचा उत्तर भारतीय राजकारण्यांनी तीव्र निषेध केला होता. या प्रकरणी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन चकमकीची चौकशी करण्याची मागणी केली. केंद्राच्या निर्देशानंतर या प्रकरणाची राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे या चकमकीचा तपास सोपविण्यात आला.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच राहुल राजचे शवविच्छेदन करणारे डॉ. बी. जी. चिखलीकर यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्याची शक्‍यता वर्तविली. डॉ. चिखलीकर यांच्या या वक्तव्याने प्रसिद्धिमाध्यमांत खळबळ उडाल्यानंतर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. बी. एम. सबनीस यांनी डॉ. चिखलीकर यांनी शवविच्छेदनाबाबत असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी या संदर्भात बोलताना राहुल राजवर झाडलेल्या तेरा गोळ्यांपैकी पाच गोळ्यांनी त्याच्या शरीराचा वेध घेतल्याचे सांगितले. पाचपैकी दोन गोळ्या डोक्‍यात, एक कानात, एक छातीत आणि एक पोटात शिरली. जवळून झाडलेल्या गोळ्यांनी शरीरावर झालेल्या जखमेभोवतीची त्वचा काळी पडते. मात्र जे.जे. रुग्णालयाकडून आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार त्यात असा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती मारिया यांनी दिली. चकमकीच्या वेळी राहुल राज आणि पोलिस यांच्यातील अंतराचा अभ्यास करण्यासाठी गोळ्या लागलेल्या ठिकाणच्या शरीराची त्वचा फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविली असून तेथील तज्ज्ञांच्या अहवालानंतरच ही बाब स्पष्ट होऊ शकेल, असेही मारिया यावेळी म्हणाले. हा अहवाल लवकरच पोलिसांकडे येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 17 नागरिकांचे जबाब नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले.

Thursday, November 6, 2008

लेफ्टनंट कर्नल पुरोहितला 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

मालेगाव स्फोट : आरोपींशी सातत्याने संपर्क

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 5 ः मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या श्रीकांत प्रसाद पुरोहित याला आज दहशतवादविरोधी पथकाने अटक केली.
मालेगाव स्फोटांपूर्वी मुख्य सूत्रधार साध्वी प्रज्ञासिंग हिने नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये घेतलेल्या बैठकीसाठी उपस्थित असलेला पुरोहित स्फोटाशी संबंधित आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. नाशिक न्यायालयाने त्याला 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मालेगाव येथे मशिदीबाहेर 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात पाच जणांचे बळी गेले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने "जय वंदे मातरम' व "अभिनव भारत' या संघटनांशी संबंधित असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह आठ जणांना यापूर्वी अटक केली आहे. या आरोपींमध्ये लष्करातील निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, शिवनारायण कलासांगरा यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या या आरोपींच्या चौकशीत स्फोट घडविण्यासाठी त्यांना लष्करातील अधिकाऱ्यांची मदत मिळाल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडून मिळालेल्या खळबळजनक माहितीनंतर पोलिसांनी सैन्यातील पंचमढी येथे नेमणुकीवर असलेल्या लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित याला ताब्यात घेतले. त्यासाठी पोलिसांना दिल्लीत भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागली.

नार्को चाचणीतून धागेदोरे
मालेगाव स्फोटांत पुरोहित याचा सहभाग स्पष्ट करण्याकरिता पोलिसांनी साध्वी प्रज्ञासिंग, सैन्यातील निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी या तिघांच्या ब्रेन मॅपिंग व पॉलिग्राफी चाचण्या केल्या. मंगळवारी सायंकाळी नागपाड्याच्या पोलिस रुग्णालयात तिघांच्या झालेल्या नार्को चाचण्यांत पुरोहित याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पुरोहित याने मालेगाव स्फोटासाठी स्फोटके पुरविल्याचा, तसेच पुण्यातून अटक केलेल्या राकेश धावडेला हत्यार पुरविल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. अभिनव भारत संघटनेचा सदस्य असलेल्या लेफ्टनंट पुरोहित याने साध्वी प्रज्ञासिंग हिच्या अटकेनंतर आरोपी समीर कुलकर्णी याला एसएमएस पाठविले. आपला मोबाईल दहशतवादविरोधी पथकाच्या रडारवर असल्याने पुरोहित याने समीरला मोबाईलचे सीम कार्ड बदलण्याचा सल्ला या एसएमएसद्वारे दिल्याचेदेखील तपासात उघडकीस आल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
...................


पुरोहित मूळचा पुण्याचा
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेला लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित मूळचा पुण्याचा राहणारा आहे. 1994 ला त्याची पहिली नेमणूक आसाम येथे झाली. त्यानंतर सैन्यातील विविध पदांवर मणिपूर, नागालॅंड, राजस्थान ,पुणे, जम्मू-काश्‍मीर, देवळाली आणि नंतर मध्य प्रदेशातील पंचमढी येथे काम केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश अग्रवाल यांनी आज रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बेरोजगाराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

अनर्थ टळला : सहाव्या मजल्यावरून उडी मारणार होता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः "कुठे नोकरी देता का नोकरी' असे म्हणत वयाच्या चाळीशीपर्यंत सेवा योजन कार्यालयात जोडे झिजविणाऱ्या बेरोजगार व्यक्तीने आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी त्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा सेवा योजन कार्यालयात सरकारी नोकरीकरिता पंधरा वर्षांपूर्वी नाव नोंदविल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
राजू गोदा अडांगळे (40) हा घाटकोपरच्या रमाबाईनगरात राहणारा तरुण वयाच्या चाळीशीपर्यंत सरकारी नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्हा सेवा योजन कार्यालयाच्या चकरा मारत होता. पंधरा वर्षांपूर्वी या कार्यालयात नाव नोंदविल्यानंतर इतरांसारखाच कधी ना कधी सरकारी नोकरीसाठीचा "कॉल' आपल्यालाही येईल या अपेक्षेत तो होता. वृत्तपत्रांत येणाऱ्या सरकारी नोकरीच्या जाहिराती पाहिल्यानंतर तो कित्येकदा त्या जागांकरिता आपल्याला कॉल निघतोय का हे पाहण्यासाठी सेवा योजन कार्यालयात जायचा. मात्र तेथे असलेले अधिकारी त्याला फक्त कॉल काढण्यासाठी दोन हजार रुपये; तर काही वेळा थेट नोकरीकरिता पन्नास हजार रुपये मागायचे.

बारावी उत्तीर्ण झालेल्या राजूची सरकारदप्तरी वारंवार उपेक्षा होत होती. लग्न झाल्यानंतर त्याला नोकरीची फारच गरज भासू लागली. त्यातच सरकारी नोकरी मिळण्यासाठीचे वय संपत असल्याने त्याची चिंता वाढत होती. अखेर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी मनोरमा (36) हिला सोबत घेऊन तो नोकरी मिळण्यासाठीचे निवेदन घेऊन मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांच्या दालनात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करीत होते. या वेळी त्यांच्या दालनाबाहेरही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रचंड समुदाय होता. मुख्यमंत्री "बिझी' असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी त्याला मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली. कार्यालयातील अभ्यागतांच्या भेटी संपवून मुख्यमंत्री दालनातून निघताच राजूने त्यांच्या मागे जात त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळीही त्याला मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. त्यावर "मला नाही तर किमान माझ्या पत्नीला तरी नोकरी द्या' असे म्हणत त्याने थेट मुख्यमंत्री दालनासमोर असलेल्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी तेथे असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला अडविल्याने पुढील अनर्थ टळला. राजूला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याची चौकशी करीत होते. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीतही शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्याकरिता त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
उपमुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्‍वासन
दरम्यान, राजू अडांगळे याला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हलगर्जीमुळे मृत्यूप्रकरणी डॉक्‍टर दाम्पत्यावर गुन्हा

उपनिरीक्षकावरील शस्त्रक्रिया : फोरेन्सिक अहवालानंतर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ः खार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजेश साळवी यांचा दोन वर्षांपूर्वी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना झालेला मृत्यू संबंधित डॉक्‍टरांची हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच झाल्याचा अहवाल राज्य सरकारच्या फोरेन्सिक मेडिसिन विभागाने दिला आहे. या अहवालावरून उपनिरीक्षक साळवी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रश्‍मी शहा व डॉ. हेमेंद्र शहा या दाम्पत्याविरुद्ध खार पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे; मात्र त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

खार पोलिस ठाण्यात तीन वर्षे सेवेत असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेश प्रभाकर साळवी (37) यांच्यावर 26 मार्च 2007 पासून खारच्या आर. जी. स्टोन रुग्णालयात पित्ताशयाच्या आजारावर उपचार करण्यात येत होते. तपासणीत पित्ताशयात खडे झाल्याचे तसेच पिशवीजवळ संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने उपनिरीक्षक साळवी या रुग्णालयात दाखल झाले. पित्ताशयातील खडे काढण्यासाठी त्यांच्यावर लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्‍टर रश्‍मी शहा यांनी घेतला. त्यानुसार साळवी यांच्यावर 30 मार्च रोजी शस्त्रक्रिया झाली. या वेळी साळवी यांच्या नातेवाइकांना डॉक्‍टरांनी अवघ्या तीन तासांची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले होते; मात्र या शस्त्रक्रियेला सात तासांहून अधिक वेळ लागला. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच उपनिरीक्षक साळवी यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेले राजेश साळवी यांचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर साळवी (76) आणि लहान भाऊ पोलिस शिपाई विकास (34) यांनी हा मृत्यू डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला. मुलाच्या झालेल्या अकाली मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही प्रभाकर साळवी यांनी केली होती. याबाबत खार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राज्य सरकारच्या फोरेन्सिक मेडिसिन विभागाच्या समितीमार्फत तपास करण्यात येत होता. या समितीचे अध्यक्ष डॉ. एस. डी. नणंदकर यांनी याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला. या अहवालानुसार 30 ऑक्‍टोबरला खार पोलिसांनी मृत उपनिरीक्षक साळवी यांच्यावर उपचार करणारे डॉ. रश्‍मी शहा व हेमेंद्र शहा यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक ए. एन. साठे यांनी दिली. या डॉक्‍टर दाम्पत्याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतल्याने त्यांना अटक झाली नसल्याचेही साठे यांनी या वेळी सांगितले.

इन्फोबॉक्‍स.....
कुटुंब उघड्यावर
उपनिरीक्षक राजेश साळवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा संसार पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यांची पत्नी रोहिणी, लहान मुलगी आदिती हिला घेऊन वृद्ध सासू-सासऱ्यांसोबत गेल्या दोन वर्षांपासून राहते. पतीचा अकाली मृत्यू आणि मुलीच्या भविष्याचा विचार करता अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याची विनंती त्यांनी पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे केली; मात्र त्यांची ही मागणी पोलिस नियमांत बसत नसल्याने फेटाळून लावली.
.........................................

साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह तिघांची नार्को चाचणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह तिघा जणांची आज नागपाडा येथील पोलिस रुग्णालयात नार्को चाचणी करण्यात आली. दोन टप्प्यांत झालेल्या या चाचणीनंतर त्यांना काळाचौकी येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आल्याचे या पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास अतिशय महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपला असताना आरोपींच्या चौकशीत त्यांना मदत करणारी आणखी काही नावे समोर येत आहेत. त्यानुसार संशयितांची चौकशी करण्यात येत असून काहींना ताब्यातही घेण्यात आले आहे. या स्फोटांची खरी सूत्रधार समजली जाणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लष्कराचे निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि मध्य प्रदेश येथील अभिनव भारत संस्थेचे पदाधिकारी समीर कुलकर्णी यांच्याकडून पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे.

कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पॉलिग्राफी व ब्रेन मॅपिंग चाचण्या झाल्यानंतर या तिघांच्या नार्को चाचण्या करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार आज सकाळी या तिघा आरोपींना नार्को तपासणीपूर्वी करावयाच्या वैद्यकीय चाचणीकरिता नागपाड्याच्या पोलिस रुग्णालयात नेण्यात आले. शारिरिक क्षमता तपासणाऱ्या या चाचणीनंतर या तिघांची नागपाडा रुग्णालयात सायंकाळी उशिरा नार्को चाचणी पूर्ण झाल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याने दिली.
----------

"मालेगाव'प्रकरणी डोंबिवलीच्या एकासह पुण्याच्या दोघांना अटक

शस्त्रास्त्रे जप्त : अर्थपुरवठ्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 3 ः मालेगाव येथील बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथका (एटीएस)ने स्फोट घडविणाऱ्या संघटनेचा आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्यासह तीन जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी सहा परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि 190 काडतुसे जप्त केली आहेत. आरोपींपैकी दोघे पुण्याचे; तर एक डोंबिवलीचा राहणारा असून त्यांना नाशिक येथील न्यायालयाने 10 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी दिली.

अजय एकनाथ राहिलकर (39), राकेश दत्तात्रय धावडे (42, रा. पुणे) व जगदीश चिंतामण म्हात्रे (40) अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मालेगाव येथे 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी राहिलकर, धावडे आणि म्हात्रे यांना अटक केली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार अजय या संघटनेला अर्थपुरवठा करायचा. त्याने यापूर्वी अटक झालेल्या समीर कुलकर्णी व रमेश उपाध्याय यांना शस्त्र खरेदीकरिता पैसे दिल्याचे स्पष्ट झाल्याचे करकरे यांनी या वेळी सांगितले. या स्फोटांप्रकरणी ताब्यात घेतलेले भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याबाबत सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ज्या अभिनव भारत संघटनेचा समीर कुलकर्णी पदाधिकारी आहे, त्या नावाच्या दोन संघटना असल्याचे करकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
.......................................

साध्वी प्रज्ञासिंगची ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफी चाचणी

मालेगाव बॉम्बस्फोट : आणखी धागेदारे हाती येण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.31 ः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि तिच्या दोघा साथीदारांची आज सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. दरम्यान, गुजरातच्या मोडासा येथे झालेल्या स्फोटांच्या तपासासाठी गुजरात पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले असून हे पथक साध्वी प्रज्ञासिंग व तिच्या साथीदारांची चौकशी करणार आहे.

पाच जणांचे बळी घेणाऱ्या 29 सप्टेंबरच्या मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने मध्य प्रदेश येथून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व तिच्या दोघा साथीदारांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत भारतीय सैन्याचा निवृत्त मेजर रमेश उपाध्याय व मध्य प्रदेशमधील अभिनव भारत संघटनेचा पदाधिकारी समीर कुलकर्णी यांचाही या स्फोटांतील कथित सहभाग आढळल्याने त्यांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आणखी महत्त्वाचे धागेदारे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला साध्वी प्रज्ञासिंग व तिच्या साथीदारांची ब्रेनमॅपिंग, पॉलिग्राफी व नार्को चाचणी करण्याची परवानगी नाशिक न्यायालयाने दिली होती. त्यानुसार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रज्ञासिंग हिला या चाचण्यांसाठी सांताक्रूझ कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये नेण्यात आले. यानंतर दुपारी तिच्या अन्य दोन साथीदारांनाही तेथे आणण्यात आले.

फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये दिवसभर झालेल्या तपासणीनंतर सायंकाळी या तिघांना काळाचौकीच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आले. या चाचण्यांद्वारे आरोपींकडून स्फोटांसंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, गुजरातच्या मोडासा येथे 29 सप्टेंबरला झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक आर. बी. ब्रह्मभट यांच्या नेतृत्वाखाली गुजरात पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक प्रज्ञासिंग व तिच्या साथीदारांची चौकशी करणार आहे. मध्य प्रदेश पोलिसांचे पथकदेखील या ठिकाणी आल्याचे सूत्रांनी सांगितले.

इन्फोबॉक्‍स.....
अहवाल लवकरच
साध्वी प्रज्ञासिंग आणि तिच्या दोन साथीदारांच्या सायकोलॉजिकल चाचण्यांना आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आरोपींच्या प्रतिसादानुसार या चाचण्या घेण्यात येतात. त्यामुळे या तपासण्यांना बराच वेळ लागतो. या तपासण्यांचा अहवाल लवकरच पोलिसांना देण्यात येणार असल्याची माहिती कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या संचालिका रुक्‍मिणी कृष्णमूर्ती यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.
...................................