Tuesday, October 28, 2008

मी राज ठाकरेला मारायला आलोय..!

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 ः बस कुर्ल्याच्या बैलबाजारात आली आणि वरच्या डेकमध्ये बसलेले प्रवासी उतरायला उठले. एवढा वेळ मागच्या सीटवर बसलेला "तो' विनातिकीट प्रवास करणारादेखील उठला. इतर प्रवाशांसारखाच तो खाली उतरतोय असे वाटले; मात्र काही कळायच्या आतच त्याने लोखंडी साखळी माझ्या गळ्यावर जोरकसपणे आवळली. गळ्याभोवती अचानक बसलेल्या फासाने घाबरून मी सुटकेचा प्रयत्न केला. त्याने सोबत आणलेले रिव्हॉल्व्हर माझ्या डोक्‍याला लावले, तशी माझी धडपड थांबली. "गडबड करू नको, मी तुला नाही, राज ठाकरेला मारायला आलोय.!' असे म्हणत त्याने माझे हात बांधले. यानंतर वरच्या डेकमध्ये असलेल्या मोजक्‍या प्रवाशांकडे रिव्हॉल्व्हर रोखून त्यांच्याकडून मोबाईल मागायला सुरुवात केली. दहा मिनिटे हे नाट्य सुरू असतानाच कोणीतरी पोलिसांना बोलावले. ते आले तशी त्याने दरवाजाच्या दिशेने एक गोळी झाडली. त्याच्या तावडीतून सुटून जीव वाचविण्याकरिता इतर प्रवाशांसोबत मी सुद्धा खाली पळालो. नंतर काही मिनिटांतच गोळीबार झाल्याचा आवाज आला. पोलिसांच्या गोळीबारात "तो' गंभीर जखमी झाल्याचं कळलं. अंधेरीहून कुर्ल्याला जाणाऱ्या 332 क्रमांकाच्या बेस्ट बसमध्ये झालेला थरार प्रत्यक्ष अनुभवणारे आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी स्वतःवर गुदरलेल्या प्राणघातक प्रसंगातून सहीसलामत सुटलेले वाहक महेंद्र घुळे "सकाळ'शी बोलत होते.

पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे स्वतःचा आणि अन्य प्रवाशांचा जीव वाचल्याची भावना त्यांच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत होती. अंधेरी येथून सहवाहक शिवाजी बोऱ्हाडे आणि चालक ऐनुलहसन खान यांच्यासोबत घुळे डेकवरील वाहकाचे काम करीत होते.

पोलिस चकमकीत मारला गेलेला राहुल राज कुंदप्रसाद सिंग साकीनाका येथे बसमध्ये चढला. डेकवर दरवाजाला लागून असलेल्या लेडीज सीटवर तो बसला. त्याच्या पुढच्याच सीटवर आपण बसलो होतो. राहुलकडे तिकीट मागितल्यानंतर त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही. त्याच्याकडे पास असावा असे वाटल्याने पुन्हा त्याच्याकडे तिकिटाबाबत विचारणा केली नाही. दिवाळीची सुट्टी असल्याने बसमध्ये त्या मानाने आज प्रवाशांची तशी गर्दी नव्हती. बैलबाजारात बस आली तेव्हा वर बसलेल्या अवघ्या बारा प्रवाशांपैकी बरेचसे प्रवासी उतरले; मात्र त्यानंतर झालेला थरार कधीही विसरता येणार नाही, असे धुळे यांनी सांगितले. डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावल्यानंतर त्याने आपल्याला मारहाणही केली. "मला अन्य कोणालाच मारायचे नाही, मी फक्त राज ठाकरेला मारायला आलो आहे,' असे तो ओरडून सांगत होता. त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर पाहून बसमधील प्रवासी आणि आपल्याही अंगाचा थरकाप उडाल्याचे घुळे यांनी सांगितले.

--------------

"अंधेरीहून निघालेली बस कुर्ला बैलबाजार परिसरात आली, तशी डेकवर आरडाओरड सुरू झाली. क्षणभर काय घडतंय तेच कळेना. नेहमीसारखी तिकिटावरून भानगड झाली असावी, असे वाटल्याने थोडे दुर्लक्ष केले. कुर्ला बसस्थानकाकडे धावणाऱ्या या डबलडेकर बसमध्ये खाली बसलेल्या प्रवाशांच्या तिकिटांचे बुकिंग करीत असताना वरचा आवाज आणखीनच वाढला. वर काय चाललंय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तोच एक रिव्हॉल्व्हरधारी तरुण नजरेस पडला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा प्रकार लगेचच बसचालकाच्या कानावर घातला. बैलबाजारात वळणावरच विनोबा भावेनगर पोलिस ठाण्याची पोलिस बीट चौकी असल्याने तेथेच गाडी थांबवून थेट पोलिसांकडे धाव घ्यायची, असा निर्णय झाला. डेकवर आरडाओरड सुरूच होती. डेकवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अशी प्रार्थना मनोमन देवाला करीत होतो. महापालिकेच्या बाजार वॉर्ड या रुग्णालयाजवळ बसचालकाने बस थांबविली, तसे दोघेही रस्ता ओलांडून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर असलेल्या पोलिस चौकीकडे धावत गेलो आणि रिव्हॉल्व्हरने सहवाहक आणि प्रवाशांना धमकावणाऱ्या "त्या' माथेफिरू तरुणाची माहिती पोलिसांना दिली.'

-शिवाजी बोऱ्हाडे (बेस्ट बसवाहक)

-----------
चकमकीची चौकशी

कुर्ला येथे झालेली पोलिस चकमक त्या वेळच्या परिस्थितीनुसार योग्यच होती, मात्र या चकमकीची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलिस चकमकीत ठार झालेल्या राहुलकडून पोलिसांनी देशी कट्टा हस्तगत केला आहे. पोलिसांवर राहुलने चार; तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्यावर तेरा गोळ्या झाडल्या. काल सकाळी अंधेरीच्या इम्पिरिअल हॉटेलमध्ये उतरलेल्या राहुलकडे सापडलेल्या देशी कट्ट्याचादेखील तपास केला जाणार आहे. तो थांबलेल्या हॉटेलमध्ये काही शैक्षणिक कागदपत्रे सापडल्याचेही दाते या वेळी म्हणाले.

-------------


बेस्टवाहकांना बक्षीस

बैलबाजार येथे झालेल्या चकमकीपूर्वी प्रसंगावधान राखून काम करणाऱ्या बेस्टच्या शिवाजी बोऱ्हाडे व महेंद्र धुळे या दोघा बसवाहकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती "बेस्ट'चे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी दिली. याशिवाय चकमकीत जखमी झालेल्या मनोज भगत या प्रवाशालाही बेस्टच्या विमा नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे खोब्रागडे यांनी या वेळी सांगितले. बसचालक ए. एच. खान यांना बेस्टकडून शौर्य पुरस्कार देण्याची मागणी बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण छेडा यांनी केली आहे.

माथेफिरू ठार , बेस्टमध्ये थरारनाट्य : राज ठाकरे टार्गेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 : रिव्हॉल्व्हरच्या धाकाने कंडक्‍टरला धमकावून बेस्टमधील प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या एका उत्तर भारतीय माथेफिरू तरुणाचा पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाईत आज सकाळी कुर्ला बैलबाजार येथे मृत्यू झाला. या माथेफिरू तरुणाने केलेल्या गोळीबारात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा तरुण पाटण्याहून मुंबईत आला होता आणि आपण राज ठाकरे यांची हत्या करण्यासाठी आल्याचे ओरडून सांगत होता, असे पोलिसांनी सांगितले. राहुल राज कुंदप्रसाद सिंग (23) असे त्याचे नाव आहे. एखाद्या चित्रपटात शोभावे असे हे थरारनाट्य अंधेरी ते कुर्ला दरम्यान धावणाऱ्या बेस्टच्या 332 क्रमांकाच्या डबलडेकर बसमध्ये आज सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी घडले.

पाटण्याच्या करमकोन येथील अरविंद लेडीज कॉलेज परिसरात राहणारा राहुल दोनच दिवसांपूर्वी पाटणा येथून मुंबईत आला होता. आज सकाळी 332 क्रमांकाच्या बसच्या वरच्या डेकमध्ये साकीनाका येथे तो बसला. सकाळची वेळ असली तरी या बसच्या वरील डेकमध्ये अवघे बारा प्रवासी होते. यानंतर अचानक राहुलने बसमधील कंडक्‍टरच्या डोक्‍याला त्याच्याकडे असलेले रिव्हॉल्व्हर लावून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावलेल्या कंडक्‍टरला बसच्या वरील भागात फिरवून प्रवाशांकडून त्याने मोबाईलची मागणी करायला सुरुवात केली. डेकवर अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे खाली असलेल्या कंडक्‍टरने बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार आणला. चालकाने महापालिकेच्या रुग्णालयाजवळ बस थांबवून जवळच असलेल्या विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या बैलबाजार बीट पोलिस चौकीत धाव घेतली. या विभागाचे सहायक पोलिस आयुक्त महम्मद जावेद यांनी तातडीने हवालदार संपत साठे यांना घडलेला प्रकार पाहण्यासाठी बेस्ट बसकडे पाठविले. तोच राहुलने साठे यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने साठे बचावले. तत्पूर्वी वरच्या डेकमध्ये बसलेला प्रवासी व कंडक्‍टर यांनी बसमधून खाली पळ काढला. तोपर्यंत या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहम्मद जावेद व त्यांच्या पथकाने रुग्णालयाच्या बाजूने बसमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी त्याला शस्त्र खाली टाकून पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितले, मात्र त्याने पोलिसांवरच गोळीबार करायला सुरुवात केली. त्याने झाडलेली एक गोळी मनोज महेंद्र भगत (25, रा. मोहिली गाव, साकीनाका) या प्रवाशाच्या मांडीत घुसली. यानंतर पोलिसांनी राहुलवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गोळीबारात जखमी झालेल्या मनो
ज या प्रवाशावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सहायक पोलिस आयुक्त मोहम्मद जावेद यांनी सांगितले.

Sunday, October 26, 2008

फटाके महागले; तरीही खरेदीसाठी झुंबड

शोभेच्या फटाक्‍यांना सर्वाधिक मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 23 ः अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच "चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' दाखविणाऱ्या फटाक्‍यांच्या बाजारपेठेतील उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीपेक्षा फटाक्‍यांच्या दरांत यंदा वीस टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असली, तरी फटाक्‍यांच्या दुकानांवर खरेदीदारांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र सध्या बाजारात आहे. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांपेक्षा शोभेचे फटाके घेण्याकडे ग्राहकांचा विशेष कल असल्याचे फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दीपोत्सवाचे कुतूहल आबालवृद्धांपासून साऱ्यांनाच आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभरापूर्वीपासूनच मुंबापुरीतील बाजारांत जय्यत तयारी सुरू झाली. फुले, मिठाई, सुका मेवा, कंदील, पणत्या, सोने-चांदी व हिरे मोत्यांच्या बाजारपेठांपासून कपड्यांच्या बाजारापर्यंत सगळ्याच बाजारपेठांनी ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक मोडला आहे. दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असलेला फटाक्‍यांचा बाजारदेखील या गर्दीपासून तसूभरही मागे नाही. प्रकाशाचा सण असा गौरव होणाऱ्या या सणानिमित्त गेल्या काही दिवसांत फटाक्‍यांच्या खरेदीला चांगलेच उधाण आले आहे. मुंबईत फटाके विक्रीचा अधिकृत परवाना असलेली पाचशेहून अधिक दुकाने आहेत. मुंबईत येणाऱ्या फटाक्‍यांत 90 टक्के फटाके शिवकाशी, तर 10 टक्के फटाके जळगाव, सोलापूर व कोल्हापूर येथून येतात. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या फटाक्‍यांमध्ये फुलबाज्या, भुईनळे, पाऊस, रॉकेट, फटाक्‍यांच्या माळा, लवंगी फटाके, तडतडी, विविध रंगांची उधळ करणाऱ्या शोभेच्या फटाक्‍यांचा समावेश आहे. लक्ष्मी बॉम्ब, डबलबार, कलर शॉट्‌ससारख्या दमदार व चांगल्या दर्जाच्या फटाक्‍यांकरिता ग्राहक दक्षिणेतील शिवकाशीच्या फटाक्‍यांना पसंती दाखवीत असल्याचे चित्र आहे. दिवाळीला अवघे तीन दिवस उरले असताना भेंडीबाजारातील मोहम्मद अली रोड, दादर, कुर्ला, अंधेरी, वांद्रे, बोरिवली या ठिकाणी असलेल्या फटाक्‍यांच्या बाजारांत ग्राहकांची तुफान गर्दी होत आहे. मुंबईतील सर्वाधिक मोठी फटाक्‍यांची बाजारपेठ असलेल्या महम्मद अली रोड येथे खरेदीला येणाऱ्या महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता काही फटाके विक्रेत्यांनी त्यांच्याकरिता विशेष काऊंटर उघडले आहेत. यंदा बाजारात नवे फटाके आले नसले, तरी परंपरागत फटाके घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. विशेषतः लहान मुलांना आनंद होईल, अशा प्रकारच
े फटाके घेण्यात ग्राहक आघाडीवर असल्याचे "इसाभाई फायर वर्क्‍स' या कंपनीचे मालक अब्दुल्ला घिया यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना अटक

मालेगाव बॉम्बस्फोट ः अन्य आरोपींचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 24 ः मालेगाव येथे 29 सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पाच जणांचे बळी घेणाऱ्या या बॉम्बस्फोटांसाठी आरडीएक्‍सचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू असून, मालेगावमध्येच 2006 मध्ये झालेल्या स्फोटांत त्यांचा कोणताही संबंध अद्याप उघडकीस आला नसल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे सह आयुक्त हेमंत करकरे यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना दिली.
रमझानच्या पवित्र महिन्यात मालेगाव आणि गुजरातच्या मोडासा येथे मशिदींबाहेर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये सहा मुस्लिम तरुणांचा बळी गेला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून प्रज्ञासिंग चंदपालसिंग ठाकूर ऊर्फ पूर्णचेतनानंद गिरी (वय 38) या साध्वीसह शिवनारायण गोपाल सिंग कलासांगरा (36) आणि श्‍याम भवरलाल साहू (42) यांना अटक केली. मालेगाव स्फोटांत वापरण्यात आलेली एलएमएल फ्रिडम ही मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंग हिच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील लहेर गावची राहणारी प्रज्ञासिंग 2001 मध्ये सुरतला कुटुंबासह स्थालांतरित झाली. 2002 मध्ये तिने जय वंदेमातरम जन कल्याण समिती नावाची संस्था सुरू केली. यानंतर जानेवारी- 2007 मध्ये संन्यास घेऊन ती भारत भ्रमण करीत असतानाच शिवनारायण कलासांगरा व श्‍याम साहू यांच्यासोबतीने तिने मालेगाव स्फोटांचा कट रचला. शिवनारायण इलेक्‍ट्रीक कॉन्ट्रॅक्‍टरचा व्यवसाय करतो; तर श्‍याम साहू याचे मोबाईलचे दुकान आहे. या तिघांचा संबंध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी असल्याची कबुली त्यांनी जबाबात दिली आहे. मात्र पोलिस ही बाब तपासून पाहत असल्याची माहिती करकरे यांनी दिली. या स्फोटांसंबंधी फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आला असून, बॉम्बमध्ये बॉलबेअरिंग, खिळे, अमोनिअम नायट्रेट यांच्यासह आरडीएक्‍सचा वापर झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. या तिघांचा संबंध इंदूर येथील राष्ट्रीय जागरण मंच या हिंदुत्ववादी संघटनेशीदेखील आहे. आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल फोन, हॅन्डबिल्स तसेच साहित्य जप्त केले असून, त्यांना आज नाशिक येथील न्यायालयाने 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याचे करकरे यांनी या वेळी सांगितले.

मालेगाव बॉम्बस्फोटांमागे हिंदू संघटना?

खुलासा लवकरच : पोलिस अधिकाऱ्यांचा दुजोरा नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 23 ः सहा निष्पाप मुस्लिम तरुणांचे बळी घेणाऱ्या मालेगाव व गुजरातच्या मोडासा येथील बॉम्बस्फोटांमागे हिंदू संघटनांचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यासंबंधी काहीही बोलण्यास नकार दिला. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून सगळ्या शक्‍यतांचा अभ्यास करण्यात येत असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.
रमझानच्या पवित्र महिन्यात 29 सप्टेंबर रोजी मालेगाव व गुजरातच्या मोडासा येथे मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाले. मालेगाव येथील स्फोटांत पाच; तर मोडासा येथे एकाचा मृत्यू झाला. मालेगाव येथील स्फोटांचा तपास नाशिक पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे. तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून या दोन्ही स्फोटांमागे इंदूर येथील हिंदू जनजागरण मंच व भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हात असल्याचा दावा करण्यात आला. मालेगाव येथे मशिदीबाहेर एलएमएल फ्रीडम मोटारसायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. जवळच सिमीचे कार्यालयदेखील असल्याने या स्फोटांमागे सिमी अथवा इंडियन मुजाहिदीनचा हात असण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत होती; मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना या स्फोटांमागे हिंदू संघटनाच असल्याचे धागेदोरे सापडल्याचा दावा केला जात आहे. स्फोटांत हिंदू संघटनांचा हात असल्याचे पहिल्यांदाच स्पष्ट झाल्यामुळे संसदेतही प्रचंड गदारोळ झाला.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने मात्र याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. याबाबत प्रसिद्धिमाध्यमांना योग्य वेळी माहिती देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुखविंदर सिंग यांनी दिली. मालेगाव व मोडासा येथील अतिरेकी कारवायांत हिंदू संघटनांच्या असलेल्या सहभागाबाबत राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट नाकारली; मात्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी याबाबत तपास सुरू असून लगेचच काहीही वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे म्हटले. तपासात सर्वच शक्‍यता गृहीत धरण्यात आल्याचेही ते या वेळी म्हणाले. याबाबत लवकरच योग्य तो खुलासा होण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

चौकट

स्फोटांमागे हिंदू संघटना
-------------------------------
मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांसोबत केलेल्या कारवाईत तिघा संशयितांना अटक केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. श्‍याम दयाल, दिलीप नाहर आणि धर्मेंद्र बैरागी अशी या आरोपींची नावे आहेत. 19 ऑक्‍टोबरला या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून आज त्यांना मुंबईत आणण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

राज्यभरात एसटीच्या 305 बसेसची तोडफोड

मनसेचा उद्रेक : 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 22 ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनात संतप्त जमावाने राज्य परिवहन उपक्रमाच्या 305 बसेसची तोडफोड केली; तर चार बसेस जाळल्या. हिंसाचाराच्या या घटनांत परिवहन उपक्रमाचे 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चेतना महाविद्यालयात परप्रांतीयांना झालेल्या मारहाणप्रकरणी मुंबई पोलिसांनी 21 ऑक्‍टोबरला पहाटे अटक केली. या अटकेचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ झाली. यात सर्वप्रथम "लक्ष्य' नेहमीप्रमाणेच राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेसना करण्यात आले. समाजकंटकांनी राज्यात सर्वत्र केलेल्या या तोडफोडीत तब्बल 305 बसेसची तोडफोड झाली. याशिवाय कल्याण, बार्शी, जालना व औरंगाबाद या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवाशांना खाली उतरवून संतप्त जमावाने त्या पेटवून दिल्या. तोडफोडीच्या घटनांत आंदोलकांनी बसेसच्या पुढच्या, मागच्या; तसेच खिडक्‍यांच्या काचा फोडण्याच्या घटना सर्वाधिक आहेत. हिंसाचाराच्या या घटनांत राज्य परिवहन उपक्रमाचे तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जाळपोळ आणि तोडफोडीच्या या प्रकारांत सामान्य प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झालेली नसल्याचेही राज्य परिवहन उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
-----------------------
राजकीय पक्षांना आवाहन
राज्यभरात उसळणाऱ्या दंगली; तसेच अनुचित प्रकारांचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन उपक्रमाला बसतो. सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या परिवहन उपक्रमाला पुरेशी सेवा देता येत नाही. उपक्रमाला होणारे हे नुकसान टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांच्या आंदोलनांत बसेसची तोडफोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचे पत्र उपक्रमाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी सर्व पक्षांना काही दिवसांपूर्वी दिल्याची माहितीही जनसंपर्क अधिकारी धस यांनी या वेळी दिली.

असेल मुंबई प्यारी तर हाकला बिहारी...

तरुणाईची प्रतिक्रिया : राज्यभर एसएमएसचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 22 ः "वाजली तुतारी, करा तयारी... असेल मुंबई प्यारी तर हाकला बिहारी... मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र मराठ्यांचा... जागे व्हा आता तरी खूप झाली दादागिरी... पाठवा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला... मराठी माणसाला...!' मराठी मनामनात चैतन्य निर्माण करणारे असे कितीतरी एसएमएस मराठी तरुण-तरुणींच्या मोबाईलवर धडकत होते. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील मराठी तरुणाईत उसळलेल्या नाराजीचे. थोरामोठ्यांत मराठी अस्मितेची जाणीव करून देणाऱ्या या एसएमएसमुळे मोबाईल कंपन्यांच्या एसएमएस सेवेचाही गेले दोन दिवस पुरता बोजवारा उडाला.
रत्नागिरी दौऱ्यावर असताना 21 तारखेला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाली. मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या अटकेनंतर साहजिकच सर्वसामान्य मनसे कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळून, त्याचे पर्यवसान ठिकठिकाणी तोडफोडीत झाले. राज यांच्यावरील कारवाईचे तीव्र पडसाद संसदेसह सर्वत्र उमटत असतानाच मराठी तरुणाईनेही या सगळ्या प्रक्रियेचा ठाव घेतला. मराठी माणसाच्या हितासाठीच हे "राज'कारण असल्याचे सांगणारे असंख्य एसएमएस मराठी तरुणांच्या मोबाईलवर गेले दोन दिवस सातत्याने येत होते. "ना शाप आहे, ना पाप आहे, महाराष्ट्राला यूपी-बिहारींचा ताप आहे. काळजी करू नको मराठी माणसा, राज ठाकरे त्यांचा बाप आहे.', "इंडिया मे एक ताज है, महाराष्ट्र में आये भय्या को बहुत माज है, मराठों के लिए एक राज है, जिसपर हम मराठीओंको बडा नाज है, जय महाराष्ट्र..!' असे एक ना अनेक एसएमएस मोबाईलवरून ओळखीच्या लोकांना तसेच मित्रांना "फॉरवर्ड' करण्यात मराठी तरुणाई आघाडीवर होती. सरकारी कचेऱ्यांत काम करणाऱ्या मराठमोळ्या कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या एसएमएसची चांगलीच चलती होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर राज्यभर विविध ठिकाणी रस्त्यांवर उतरलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी भले ट्रॅफिक जॅम केले; मात्र मराठी माणसाला त्याच्या न्यायिक हक्कांकरिता पेटून उठण्याचा संदेश देणाऱ्या अशा एसएमएसनी राज्यभरात मोबाईल कंपन्यांच्या एसएमएस सुविधांचे ट्रॅफिकही गेले दोन दिवस जॅम केल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.