Friday, January 30, 2009

विमान अपहरणाद्वारे दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

विमान अपहरणाद्वारे दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

केंद्राचा इशारा ः विमानतळांवर कडेकोट सुरक्षा, सर्व यंत्रणा सतर्क

विमान किंवा हेलिकॉप्टरचे अपहरण करून दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केल्याने मुंबईसह राज्यातील सर्व विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. केंद्राने राज्य सरकारला याबाबत सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यानुसार कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत असतानाच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. शहरातील महत्त्वाच्या, तसेच संवेदनशील ठिकाणांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राज्य सरकारला विमानतळांबद्दलचा इशारा देण्यात आला. अतिरेकी विमान किंवा हेलिकॉप्टरचे अपहरण करून घातपात करण्याची शक्‍यता असल्याने विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईसह राज्यातील सर्व विमानतळांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
दहशतवादी लहान विमाने आणि हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करण्याची शक्‍यता आहे. गुप्तचर यंत्रणेकडून आलेल्या सावधानतेच्या इशाऱ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच आंतरदेशीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडन्ट संजय प्रकाश यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. गुप्तचर यंत्रणेकडून या हल्ल्याबाबत नेमका तपशील मिळाला नसला तरी पुरेशी खबरदारी घेत आहोत, असेही प्रकाश यांनी या वेळी सांगितले.

मनसे, शिवसेनेला दंड
इंटरकॉंटिनेंटल हॉटेल आणि मुंबई विद्यापीठात केलेल्या तोडफोडप्रकरणी संबंधित राजकीय पक्षांकडून दंडवसुली केली जाईल, तसा कायदाच सरकारने केला असल्याचेही पाटील यांनी या वेळी नमूद केले. मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने; तर हॉटेल इंटरकॉंटिनेंटलमध्ये शिवसेनेने तोडफोड केली. त्यांच्याकडून राज्य सरकार कायद्यानुसार नुकसानभरपाई वसूल करील, असे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले.
भाषेला दुर्लक्षित करीत असल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठात केलेल्या आंदोलनात विद्यापीठाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते; तर अंधेरी येथील हॉटेल इंटरकॉंटिनेंटलमध्ये शिवसैनिकांनी मराठी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते.

(sakal,29 jan)

शाजी मोहनच्या रॅकेटमधील आणखी दोन पोलिसांना अटक

संयुक्त चौकशी ः मोहनचे ड्रग माफियांशी संबंध

अमली पदार्थांच्या रॅकेटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पोलिसांनी अटक केलेला आयपीएस अधिकारी शाजी मोहन याच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी त्याच्यासोबत काम करणाऱ्या आणखी दोन पोलिस शिपायांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना उद्या मुंबईत आणण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक आणि एटीएस संयुक्तरीत्या करीत असून, मोहन याचे ड्रग माफियांशी संबंध होते, ही बाब चौकशीत उघड झाल्याची माहिती "एटीएस'चे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी दिली.
जम्मू-कश्‍मीर येथे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकात संचालक पदावर कार्यरत असताना आयपीएस अधिकारी शाजी मोहन याने मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला. या ठिकाणी एक वर्ष 11 महिन्यांच्या कालावधीत कार्यरत असलेल्या शाजीने जप्त साठ्यातील बराचसा भाग स्वतःकडे काढून घेतला. याच काळात काही ड्रग माफियांशी त्याचे संबंध आले. त्यांच्याच माध्यमातून पुढे शाजीने आपले रॅकेट चालविल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीच्या कचाट्यात सापडू नये याकरिता शाजीने त्याच्याकडील अमली पदार्थांचा मोठा साठा उत्तर भारतात जाळल्याची बाबही उघडकीस आली आहे; मात्र त्याने किती साठा जाळला, याचा तपास अद्याप सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्‍यता रघुवंशी यांनी फेटाळून लावली असली तरी शाजीसोबत असणारे अधिकारी एटीएसच्या "रडार'वर असल्याची कबुली त्यांनी दिली. सध्या कोची येथे डायरेक्‍टोरेट ऑफ एन्फोर्समेंटमध्ये उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या शाजीच्या अमली पदार्थांच्या नेटवर्कचा शोध घेण्यात येत असून, प्रथमदर्शनी हे नेटवर्क म्हणावे तेवढे मोठे वाटत नसल्याचेही रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.
आयपीएस अधिकारी शाजी मोहन याच्या अमली पदार्थांच्या रॅकेटला मदत केल्याच्या आरोपावरून देवेंद्र पाल व नवीनकुमार या जम्मू-काश्‍मीर येथील दोन पोलिस शिपायांना "एटीएस'ने ताब्यात घेतले असून, त्यांना उद्या मुंबईत आणणार असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी या वेळी दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएसचे एक पथक अतिरिक्त पोलिस आयुक्त सुखविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली चंडीगड येथे रवाना झाले आहे.
(sakal,29 jan)

मुतालिकच्या चौकशीसाठी एटीएस मंगळूरला जाणार

कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला श्रीराम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक याचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी असलेल्या कथित संबंधाची चौकशी करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची एक तुकडी मंगळूर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी दिली. चौकशीत त्याचा मालेगाव स्फोटाशी संबंध उघडकीस आल्यास त्याला मुंबईत आणले जाईल, असेही रघुवंशी यांनी सांगितले.
कर्नाटक येथे एका पबवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी श्रीराम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक याला पोलिसांनी अटक केली आहे. मुतालिक याने केलेल्या एका भाषणात मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग आणि लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांच्या नावांचा उल्लेख "एटीएस'च्या पोलिसांना आढळला आहे. याशिवाय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतही श्रीराम सेनेचा उल्लेख आढळत असल्याने प्रमोद मुतालिक चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. सध्या मंगळूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुतालिकची तेथेच चौकशी केली जाईल. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसला प्रवीण मुतालिक या आरोपीची आवश्‍यकता आहे. मालेगाव स्फोटात महत्त्वाची भूमिका बजावलेला प्रवीण फरारी असल्याचेही रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.

(sakal,29 jan)

सीमा सुरक्षा दलालाच शाजी मोहनकडून "चुना'

अमली पदार्थ रॅकेट ः अनेक अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्‍यता

जम्मू-काश्‍मीरच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाने जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपविण्यात आल्यानंतर आयपीएस अधिकारी व केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचा तत्कालीन प्रमुख शाजी मोहन त्यातील काही भाग स्वतःजवळ ठेवून, त्यात चुना मिसळत असे, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी जम्मू-कश्‍मीर येथील पोलिस अधीक्षकाला दहशतवादविरोधी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्‍यता "एटीएस'चे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज वर्तविली.
मुंबईत अमली पदार्थांचे रॅकेट चालविल्याप्रकरणी "एटीएस'ने अटक केलेला कोची येथील एन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेटचा उपसंचालक शाजी मोहन याच्या चौकशीत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या स्रोताविषयी महत्त्वपूर्ण माहिती उघडकीस येत आहे. तपासाबाबत दिशाभूल करण्यासाठी मोहन "एटीएस'ला वेळोवेळी चुकीची माहिती देत आहे. मोहनकडून मिळणाऱ्या माहितीची पोलिस फेरतपासणी करीत आहेत. हा साठा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केलेल्या साठ्यापैकीच असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून हस्तगत करण्यात आलेल्या या साठ्यातील काही हिस्सा शाजी मोहन त्याच्या चंडीगड येथील घरी काढून ठेवत असे. "एटीएस'च्या पोलिसांनी हस्तगत केलेला सुमारे 39 किलोचा अमली पदार्थाचा साठा पाकिस्तानमधूनच आणण्यात आला. त्याच्या पाकिटांवर तो पाकिस्तानात बनविल्याची चिन्हे आढळल्याचेही परमबीर सिंग यांनी सांगितले.

मदत करणाऱ्यांचीही चौकशी
अमली पदार्थांच्या रॅकेट प्रकरणाच्या सखोल तपासासाठी "एटीएस'ने आज जम्मू-काश्‍मीर येथून बलविंदर सिंग या पोलिस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून या संपूर्ण रॅकेटसंबंधी उपयुक्त माहिती मिळू शकेल. मोहन जम्मू-काश्‍मीरमध्ये नेमणुकीवर असताना त्याला कनिष्ठ असलेल्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनाही आवश्‍यकता भासल्यास चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती "एटीएस'चे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

(sakal,28 jan)

शाजी मोहनकडून आणखी 25 किलो हेरॉईन जप्त

वसईत छापा ः मत्स्य व्यावसायिकाचाही सहभाग

मुंबईत अमली पदार्थांचे रॅकेट चालविल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला एन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेटचा उपसंचालक आणि आयपीएस अधिकारी शाजी मोहन याच्याकडून दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पोलिसांनी आणखी 25 किलो हेरॉईनचा साठा हस्तगत केला. वसईतील एका घरातून काल सायंकाळी हा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती या पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.
अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे रॅकेट चालविल्याप्रकरणी जम्मू-कश्‍मीर केडरचा आयपीएस अधिकारी शाजी मोहन, हरियाना पोलिस दलातील निलंबित कॉन्स्टेबल राजेश कुमार आणि मुंबईतील मत्स्य व्यावसायिक विकी ओबेरॉय या तिघांना एटीएसच्या पोलिसांनी अटक केली. या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिस शाजी मोहन याची कसून चौकशी करीत आहेत. चौकशीत त्याने मत्स्य व्यावसायिक विकी ओबेरॉय याच्या वसईतील नायगाव येथे असलेल्या नालंदा अपार्टमेंटमधील घरात हेरॉईनचा साठा ठेवल्याची कबुली दिली. या माहितीवरून काल सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या घरावर छापा घातला. छाप्याच्या वेळी नालंदा अपार्टमेंटमधील घरात ओबेरॉय याचा मुलगा गौरव उपस्थित होता. या वेळी घराच्या मागील बाजूला असलेल्या जागेत 25 किलो हेरॉईन असलेली बॅग पोलिसांना सापडली. पोलिसांनी हा साठा ताब्यात घेतला असून, तो फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी विकी ओबेरॉय याच्या मुलाची चौकशी करण्याची शक्‍यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वी ओशिवरा परिसरात 17 आणि 25 जानेवारीला केलेल्या या कारवाईत एटीएसच्या पोलिसांनी शाजी मोहन आणि त्याच्या दोघा साथीदारांकडून 13 किलो 850 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. चंडीगड येथे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाच्या संचालकपदावर कार्यरत असताना मोहन याने जप्त केलेल्या अमली पदार्थांतून सुमारे 35 किलो हेरॉईनचा साठा काढून ठेवला होता. त्याच साठ्यामधील हे हेरॉईन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(sakal, 27 jan)

संजय राऊत यांना अटक आणि सुटका

जामीन मंजूर ः हॉटेल तोडफोडप्रकरणी कारवाई

मराठी कामगारांना कामावरून काढल्याच्या निषेधार्थ सहार येथील "इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल'मध्ये भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज सकाळी सहार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची अंधेरी येथील न्यायालयाने पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केल्याची माहिती सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.
"इंटरकॉन्टिनेन्टल' या पंचतारांकित हॉटेलमध्ये कामावर असलेल्या 25 मराठी कामगारांना व्यवस्थापनाने काढून टाकल्याच्या निषेधार्थ 21 जानेवारी रोजी भारतीय कामगार सेनेने खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. या प्रकरणी सहार पोलिसांनी आमदार अनिल परब आणि माजी आमदार सीताराम दळवी यांच्यासह 53 आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. या आंदोलनाचे नेतृत्व केल्याप्रकरणी खासदार राऊत यांना आज सकाळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. यानंतर खासदार राऊत यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने राऊत यांना पाच हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले. या प्रकरणात अटक झालेल्या अन्य आंदोलनकर्त्यांनाही या वेळी जामिनावर मुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(sakal,27 jan)

आयपीएस अधिकाऱ्याचे ड्रग्ज रॅकेट उद्‌ध्वस्त

तिघांना अटक ः साडेबारा कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

कोची येथे केंद्र सरकारच्या डायरेक्‍टोरेट ऑफ एन्फोर्समेंट विभागात उपसंचालक असलेला आयपीएस अधिकारी शाजी मोहन मुंबईत चालवत असलेले अमली पदार्थांचे मोठे रॅकेट आज दहशतवादविरोधी पथकाने उद्‌ध्वस्त करून त्याच्यासह तिघांना ओशिवरा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून बारा किलो हेरॉईन हस्तगत करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत साडेबारा कोटी रुपये आहे, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे अटक केलेल्या या अधिकाऱ्याला केंद्र सरकारने शौर्यपदकाने गौरविले होते, अशी माहितीही रघुवंशी यांनी दिली.

ओशिवरा येथे दोघे जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांना 17 जानेवारीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सायंकाळी सापळा रचून मारुती कारमधून आलेल्या विकी ओबेरॉय आणि राजेश कुमार या दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्याकडे एक किलो 850 ग्रॅम हेरॉईनचा साठा सापडला. पोलिसांना या दोघांना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली असता अमली पदार्थांच्या वितरणाचे हे रॅकेट कोची येथे केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर असलेला शाजी मोहन नावाचा आयपीएस अधिकारी चालवीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ही माहिती केंद्र सरकारच्या अमली पदार्थविरोधी पथकाला दिली. चौकशीत शाजी मोहन केंद्राच्या अमली पदार्थविरोधी पथकात चंडीगड येथे दोन वर्षे संचालक म्हणून कार्यरत होता अशी माहिती उघडकीस आली. या काळात त्याने ठिकठिकाणी जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या साठ्यापैकी 35 किलोंचे अमली पदार्थ स्वतःसाठी काढून घेतले होते. या अमली पदार्थांचीच तो मुंबईत विक्री करीत होता, असे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यातच त्याची कोची येथे डायरेक्‍टोरेट ऑफ एन्फोर्समेंट विभागात बदली झाली होती.

विकी ओबेरॉय आणि राजेशकुमार या दोघांना विक्रीसाठी दिलेल्या हेरॉईनचे पैसे घेण्यासाठी शाजी मोहन काल सायंकाळी ओशिवराच्या क्‍लासिक क्‍लब येथे आला होता. या वेळी मागावर असलेल्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून बारा किलो हेरॉइन, एक लॅपटॉप, सीडी, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हा सगळा ऐवज तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहितीही रघुवंशी यांनी दिली.
या रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेला राजेशकुमार हरियाना पोलिस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. गुरगाव येथे कार्यरत असताना एका प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले आहे; तर विकी ओबेरॉयचा मत्स्यव्यवसाय आहे. या रॅकेटचे नेटवर्क शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांच्याकडून अमली पदार्थांची खरेदी करणाऱ्यांची माहितीही घेण्यात येत असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले

(sakal,25 jan)