Friday, February 27, 2009

साडेचार लाखांची लाच घेताना आयकर अधिकाऱ्याला अटक

आयकर विभागात प्रलंबित असलेले प्रकरण मिटविण्यासाठी एका रिअल इस्टेट एजन्टकडून साडेबारा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला साडेचार लाख रुपये घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी अटक केली. या अधिकाऱ्याने ही लाच आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसाठी मागितल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टी. व्ही. मोहन असे या लाचखोर आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका रिअल इस्टेट एजन्टचे गेल्या वर्षीचे थकलेले आयकराचे प्रकरण मिटविण्यासाठी मोहन यांनी ही लाच मागितली. या विभागाच्या अतिरिक्त आयुक्ताकडे काम करणाऱ्या मोहन यांनी ही लाच त्यांच्यासाठी मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. साडेबारा लाख रुपयांपैकी आठ लाख रुपये मोहन यांनी यापूर्वीच घेतले होते. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्याच्या वेळी रिअल इस्टेट एजन्टने लाचेची रक्कम घेऊन या अतिरिक्त आयुक्ताची भेट घेतली. यानंतर या अतिरिक्त आयुक्‍ताच्या निर्देशावरून त्याने ही रक्‍कम मोहन यांच्याकडे दिली. या प्रकरणात बोरिवली येथील एका चार्टर्ड अकाउंटंटने मध्यस्थी केली. या प्रकरणात गुंतलेल्या अन्य अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 ः आयकर विभागात प्रलंबित असलेले प्रकरण मिटविण्यासाठी एका रिअल इस्टेट एजन्टकडून साडेबारा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला साडेचार लाख रुपये घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी अटक केली. या अधिकाऱ्याने ही लाच आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसाठी मागितल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टी. व्ही. मोहन असे या लाचखोर आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका रिअल इस्टेट एजन्टचे गेल्या वर्षीचे थकलेले आयकराचे प्रकरण मिटविण्यासाठी मोहन यांनी ही लाच मागितली. या विभागाच्या अतिरिक्त आयुक्ताकडे काम करणाऱ्या मोहन यांनी ही लाच त्यांच्यासाठी मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. साडेबारा लाख रुपयांपैकी आठ लाख रुपये मोहन यांनी यापूर्वीच घेतले होते. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्याच्या वेळी रिअल इस्टेट एजन्टने लाचेची रक्कम घेऊन या अतिरिक्त आयुक्ताची भेट घेतली. यानंतर या अतिरिक्त आयुक्‍ताच्या निर्देशावरून त्याने ही रक्‍कम मोहन यांच्याकडे दिली. या प्रकरणात बोरिवली येथील एका चार्टर्ड अकाउंटंटने मध्यस्थी केली. या प्रकरणात गुंतलेल्या अन्य अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(sakal,28 feb)

असे आहे अतिरेकी कसाबविरुद्धचे आरोपपत्र..!

- 35 पाकिस्तानी अतिरेकी फरारी
- मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या नऊ अतिरेक्‍यांसह एकूण 47 अतिरेक्‍यांचा कटात सहभाग
- 11280 पानां आयुक्त आरोपपत्र
- 2202 साक्षीदार तपासले
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव नाही
- लष्कर ए तैयबाच्या मरीन विंगचा मुंबई हल्ल्याशी थेट संबंध
- अतिरेक्‍यांच्या मृतदेहांची ओळख परेड घेण्याचा जगातील पहिलाच प्रकार
- अतिरेक्‍यांनी कोणत्याही मागण्या केल्या नाहीत
- अतिरेकी अजमल कसाबला दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते.


---------------


फरारी आरोपी
लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईद
झाकी उर रहमान लक्वी जरार शहा, अबू काफा
अबू हमजा, लष्करी प्रशिक्षक अब्दुल रहमान
सादिक तसेच दोन सैन्य अधिकाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश

--------------

कसाबवर दाखल 12 गुन्हे

1) मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे गोळीबार करून पोलिस निरीक्षक शशांक शिंदे यांच्यासह सुमारे साठ प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत.
2) कामा रुग्णालय आणि आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या आवारात गोळीबार. या गोळीबारात सात जण ठार; तर सहा जखमी.
3) सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांचा खून, पोलिसांच्या गाडीची चोरी.
5) स्कोडा गाडीची चोरी.
6) सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची हत्या व पोलिसांवर गोळीबार.
7) नरिमन हाऊस येथे गोळीबार
8) हॉटेल ताजमध्ये गोळीबार
9) हॉटेल ट्रायडन्ट ओबेरॉयमध्ये गोळीबार
10) विलेपार्ले येथे टॅक्‍सीत बॉम्बस्फोट
11) माझगाव येथे टॅक्‍सीत बॉम्बस्फोट
12) कुबेर बोटीच्या खलाशांची हत्या.


-----------------------------


न्यायालयापुढील पुरावे

- फॉरेन्सिक सायन्स एक्‍सपर्टकडून मिळालेले निष्कर्ष
- एफबीआयकडून सॅटफोन, व्हीओआयपी फोन, जीपीएससंबंधीच्या तांत्रिक बाबी
- ठसेतज्ज्ञांचा अहवाल
- प्रत्यक्षदर्शी, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे कबुलीजबाब

-------------------------------


अतिरेक्‍यांविरुद्धची कलमे

- खून, खुनाचा प्रयत्न
- भारतीय स्फोटके कायदा
- हत्यार आणि स्फोटके कायदे
- एक्‍सप्लोसिव्ह सबस्टन्सेस ऍक्‍ट
- सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
- हत्यार प्रतिबंधक कायदा
- भारतात अवैध घुसखोरीचा कायदा
- सागरी हद्दीत घुसखोरीचा कायदा
- रेल्वे कायद्यासह दंड विधानातील कलमे

50 रुपयांत करा मनमुराद वायुप्रदूषण!

पीयूसी प्रमाणपत्र : "सकाळ'ने केलेल्या पाहणीचा धक्कादायक निष्कर्ष

वाहनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी राज्य परिवहन विभागाचे सक्तीचे असलेले "पीयूसी' प्रमाणपत्र अवघ्या काही रुपयांसाठी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता सर्रास दिली जात आहेत. हा धक्कादायक प्रकार "सकाळ'ने केलेल्या एका पाहणीत उघडकीस आला. 15 वर्षांहून अधिक काळ झालेल्या आणि मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण करणाऱ्या जुनाट वाहनांनाही हे प्रमाणपत्र सहज मिळत असल्याने हा प्रकार पर्यावरणाच्या हानीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. याबाबत राज्य परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसाला दीड लाखांहून अधिक वाहने धावतात. वाहनांच्या धुरातून निघणाऱ्या कार्बन मोनोक्‍साईड, नायट्रोजन ऑक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड यांसारख्या घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. पर्यावरणात असमतोल निर्माण करणारे हे घटक मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण करीत असतात. वाहनांच्या धुरातून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार, तसेच राज्य परिवहन विभागानेही कठोर नियम केले आहेत. रस्त्यावरून धावणारे वाहन "प्रदूषण नियंत्रित' असल्याचे प्रमाणपत्र (पीयूसी) वाहनचालकाने सोबत बाळगणे कायद्याने बंधनकारक आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांत पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पीयूसी वितरित करणारी फिरती केंद्रे उभी करण्यात आली आहेत. वाहनांना देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांसाठी दुचाकी वाहनांना प्रत्येकी 30 रुपये; तर चारचाकी वाहनांना 50 रुपये आकारले जातात. पीयूसी नसल्यास वाहनचालकाला राज्य परिवहन विभागाकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या धुरातील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे प्रमाण नीट तपासून वाहनचालकाला त्यासंबंधीचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे, मात्र "सकाळ'ने केलेल्या पाहणीत वाहनांच्या धुराची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता केवळ अंदाजे ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. पीयूसी केंद्रांवर सुरू असलेला हा अनागोंदी कारभार उघडकीस आणण्यासाठी एका जुनाट बजाज स्कूटीची एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या ठिकाणी पीयूसी प्रमाणपत्रे काढण्यात आली. पाचही ठिकाणी या स्कूटीला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर धुरातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण वेगवेगळे नमूद करण्यात आले. तीन ठिकाणी तर स्कूटीच्या धुरातील प्रदूषकांची कोणत्याही प्रकारची तपासणी झाली नाही. पीयूसी केंद्रांवर सुरू असलेल्या या प्रकाराने वाहनचालकांना अवघ्या 50 रुपयांत सहा महिने मनमुराद वायुप्रदूषण करण्याचा जणू परवानाच उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकदा वाहतूक पोलिसांना या वाहनचालकांवर कोणतीच कारवाई करता येत नाही.
याबाबत राज्य परिवहन खात्याचे आयुक्त दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधला असता, कलकत्ता येथे सरकारी कामानिमित्त आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त अरुण भालचंद्र यांच्याशी कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते बैठकीत व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.
...............


अशी झाली पीयूसी केंद्रांविरुद्धची मोहीम

आम्ही रस्त्यावर चालविण्यास अयोग्य आणि धुरावाटे प्रचंड प्रदूषण करणारी 15 वर्षांपूर्वीची एक जुनाट कायनेटिक स्कूटी घेतली. या स्कूटीची गावदेवी येथील केंद्रात पीयूसी काढायला गेलो. त्या वेळी तेथील कर्मचाऱ्याने ही गाडी चालविण्यायोग्य नसल्याने सांगून त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत असल्याचे सांगितले, मात्र जराशी घासाघीस केल्यानंतर त्याने या गाडीची खरी पीयूसी दिली. त्यानुसार ही गाडी पर्यावरणाच्या दृष्टीने रस्त्यावर चालविण्यास अयोग्य असल्याचे प्रमाणपत्रच आम्हाला मिळाले.
यानंतर आमची पीयूसी केंद्रांवर सुरू असलेला अनागोंदी कारभार उघडकीस आणणारी मोहीम सुरू झाली. आम्ही ही प्रदूषणकारी गाडी घेऊन परळ येथे गेलो. तेथील फिरत्या पीयूसी केंद्रावर या गाडीची पीयूसी काढली. त्या वेळी आम्हाला ही गाडी प्रदूषण नियंत्रित असल्याची पीयूसी देण्यात आली. या पीयूसीवर कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 0.03 असे दाखविण्यात आले.
यापुढे आम्ही शीव येथे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर गेलो. तेथील पीयूसी केंद्रावर कोणत्याही प्रकारची तपासणी न करता पीयूसी देण्यात आली. त्यात कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 1.08 असे नमूद करण्यात आले. पुढे आम्ही आमचा मोर्चा वांद्रे येथील पीयूसी केंद्रावर वळविला. तेथील कर्मचारी गाडीची तपासणी न करताच पीयूसी देत होता, मात्र या कर्मचाऱ्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने गाडीची तपासणी करून पीयूसी दिली. यात कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 1.07 आढळले. पुढे आम्ही माहीम रेल्वेस्थानकालगत असलेल्या पीयूसी केंद्रात गेलो. तेथील कर्मचाऱ्याने कोणतीही तपासणी न करता पीयूसी दिली. त्यात कार्बनचे प्रमाण 1.04 असे आढळले. एकंदरीतच पाच ठिकाणी आम्ही केलेल्या पाहणीत प्रत्यक्ष तपासणीपेक्षा अंदाजे प्रमाण ठरवून पीयूसी देण्यावरच भर देण्यात आल्याचे दिसले.


(sakal, 24 feb)

मुंबईवरील हल्ल्यात पाकमधील माजी लष्करी अधिकाऱ्याचा सहभाग

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानमधील एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. अतिरेक्‍यांच्या चौकशीत या अधिकाऱ्याचे नाव पुढे आले असून, अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्यावर उद्या (ता. 25) दाखल होणाऱ्या आरोपपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. कर्नल कियानी अहमद नावाने असणारा हा अधिकारी म्हणजे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल अश्‍फाक परवेज कियानी आहेत का, हे सांगण्यास गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला.
देशाला हादरवून टाकणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचा दावा पाकिस्तानने वेळोवेळी केला; मात्र अतिरेक्‍यांचा कबुलीजबाब, तसेच त्यांचे पाकिस्तानमधील "लष्कर'च्या कमांडरशी सॅटफोन,

व्हीओआयपी

फोनवरून झालेले संभाषण, तसेच जीपीएस यामुळे पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट होत आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या "एफबीआय'नेदेखील या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत. अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्यासोबत अटकेत असलेले फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्या चौकशीत त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांत कर्नल कियानी यांचे नाव पुढे आले.
अतिरेकी हल्ल्याच्या वेळीसुद्धा "लष्कर'चे कमांडर या अधिकाऱ्याच्या संपर्कात होते, असेही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. वॉशिंग्टन येथे "एफबीआय'च्या मुख्यालयात गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना हे पुरावे उपलब्ध झाल्याचे समजते. अतिरेक्‍यांना लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या कर्नल कियानी याने मुंबई हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला अतिरेकी सबाउद्दीन अहमद याला "आयएसआय'मध्ये दाखल होण्यास सांगितले होते. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल अशफाक कियानी पाकिस्तानी गुप्तचर संघटना "आयएसआय'चे माजी प्रमुख आहेत. त्यामुळे मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांना माहिती असलेला कर्नल कियानी हा पाकिस्तानचा माजी लष्करप्रमुख तर नाही ना, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


(sakal, 24 feb)

Monday, February 23, 2009

कसाबवर उद्या आरोपपत्र

काम अंतिम टप्प्यात : मजकूर मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दूतही

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी महम्मद अजमल कसाबवर बुधवारी (ता. 25) दुपारपर्यंत किल्ला न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आरोपपत्रातील मजकूर अतिरेकी कसाब याला समजावा यासाठी हे आरोपपत्र मराठी, इंग्रजी, हिन्दीसह उर्दू भाषेतही तयार करण्यात येत आहे. उर्दूतील आरोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई हल्ल्यातील अतिरेकी कसाब सध्या 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबई हल्ला प्रकरणात कसाबवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची 90 दिवसांची मुदत बुधवारी संपत आहे. या मुदतीपूर्वी गुन्हे शाखेचे पोलिस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या आरोपपत्रात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोपपत्र बनविण्याचे काम सुरू आहे. आरोपपत्र तयार करण्याचे काम उद्या पूर्ण होईल. त्यानंतर केव्हाही ते किल्ला न्यायालयात सादर करता येईल. मात्र, ते येत्या बुधवारीच दाखल करण्यावर पोलिसांचा कल राहणार आहे. यासंबंधी गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज भेट घेतली.
या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटक केलेले लष्कर-ए तैयबाचे अतिरेकी फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन यांचादेखील या कसाबच्या आरोपपत्रात सहआरोपी म्हणून समावेश असेल. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कसाबचा कलम 164 अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबुली जबाब पूर्ण झाला आहे. त्यासाठी त्याला किल्ला न्यायालयात नेण्यात आले होते. याशिवाय कसाबला ओळखणाऱ्यांची ओळख परेडही घेण्यात आली. सध्या फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीनचा कबुली जबाब घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. या आरोपपत्रात पाकिस्तानमध्ये असलेल्या फरारी अतिरेक्‍यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई हल्ल्याच्या कटात लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानच्या कटातील सहभागासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती कसाबच्या कबुलीजबाबात उघडकीस आली आहे. कसाबच्या जिवाला धोका असल्याने त्याच्यासंबंधीचे आरोपपत्र दाखल करताना त्याला न्यायालयात हजर करणार अथवा नाही याबाबत काहीही सांगण्यास गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी नकार दिला. सध्या गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कसाबवर मुदत पूर्ण होण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले जाईल. मुंबई हल्ला प्रकरणात अटक केलेले फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन या दोघांवर बारा गुन्हे दाखल करणार असल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.

(sakal,23 feb)

Saturday, February 21, 2009

कसाब, पाकिस्तानविरुद्ध एफबीआयकडून सबळ पुरावे

देवेन भारती ः पुरावे आरोपपत्रात समाविष्ट करणार

मुंबई हल्ल्याच्या तपासाकरिता एफबीआयची मदत घेण्यासाठी गेलेले गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक आज पहाटे मुंबईत परतले. अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब आणि पाकिस्तानविरुद्ध सबळ पुरावे एफबीआयकडून मिळाले असून हे पुरावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.
26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे पुरावे हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये असलेल्या लष्कर ए तैयबाच्या कमांडरसोबत अतिरेक्‍यांनी केलेल्या संभाषणाने सिद्ध होणार आहे. अतिरेक्‍यांनी वॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (वॉईप) फोन आणि सॅटेलाईट फोनद्वारे केलेले मिनिटागणिक संभाषण एफबीआयने गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहे. हल्ल्यानंतर 1 डिसेंबरपासून एफबीआयचे पथक मुंबईत हल्ल्यासंबंधी स्वतंत्र तपास करीत होते. एफबीआयच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे असणारे पुरावेही तेथील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिले. अतिरेकी मोहम्मद कसाबविरुद्धही हेच पुरावे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या तीन सदस्यीय पथकाने वॉशिंग्टन येथील एफबीआय मुख्यालयात तेथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती तसेच पुराव्यांची देवाणघेवाण केली. हे सर्व आरोपपत्रात समाविष्ट करून अजमल कसाबविरुद्ध न्यायालयात सादर केले जातील, असेही भारती या वेळी म्हणाले. अतिरेक्‍यांनी वापरलेल्या गोळ्यांचा एफबीआयच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबकडून अहवाल येण्यासाठी काही काळ लागणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


----------


न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर कसाबचा कबुलीजबाब

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याचा कबुलीजबाब न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्याकरिता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांशी बोलताना येथे दिली. या कबुलीजबाबानंतर कसाबची पुन्हा नव्याने ओळख परेड होणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले.
अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला पोलिस कोठडीतून 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या कोठडीत त्याच्याकडून न्याय दंडाधिकारी कलम 164 अन्वये कबुली जबाब नोंदवून घेतील. हल्ल्यात असलेला कसाबचा सहभाग सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर त्याची ओळख परेड घेण्यात येणार आहे. त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, न्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर त्याला गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. कसाबची रवानगी आर्थर रोड कारागृहात झाल्याबाबत विचारणा केली असता, मारिया यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

(sakal,20 feb)

इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांचा ताबा एटीएस घेणार

रेल्वे बॉम्बस्फोट : संभाव्य सहभागाची चौकशी करणार

मुंबईच्या उपनगरी रेल्वेत जुलै 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत असलेल्या संभाव्य सहभागाची चौकशी करण्याकरिता इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांचा ताबा दहशतवादविरोधी पथक घेणार आहे. यासंबंधीचा अर्ज लवकरच मोक्का न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी दिली.
जयपूर, अहमदाबाद, सुरत, बंगळूर आणि दिल्लीसह देशभरात 2005 पासून झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांत असलेल्या सहभागाप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या एकवीस अतिरेक्‍यांना अटक केली. या प्रकरणाचे आरोपपत्र काल मोक्का न्यायालयात गुन्हे शाखेने दाखल केले. या अतिरेक्‍यांविरुद्ध खटला सुरू होत असतानाच त्यांचा जुलै- 2005 मध्ये झालेल्या उपनगरी गाड्यांतील बॉम्बस्फोट मालिकांशी संबंध आहे का, ही बाब दहशतवादविरोधी पथक तपासणार आहे. 187 निष्पापांचे बळी घेणाऱ्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेसंबंधी इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य सादिक शेख याच्यासह काही अतिरेक्‍यांचा ताबा दहशतवादविरोधी पथक न्यायालयाकडे मागणार आहे. यासाठी लवकरच एक अर्ज मोक्का न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत आजच आपल्याकडे आली आहे. या अतिरेक्‍यांचा 2005 पासून देशात झालेल्या स्फोटांत काही ना काही सहभाग मिळाल्याचे गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात म्हटले आहे. तसे पुरावे गुन्हे शाखेकडे उपलब्ध आहेत. लवकरच या आरोपपत्राचा अभ्यास करून कायदेशीर सल्ला घेतला जाईल . तसेच गुन्हे शाखेकडे असलेल्या पुराव्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतरच इंडियन मुजाहिदीनच्या या अतिरेक्‍यांची चौकशी केली जाईल, असेही रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.

इंडियन मुजाहिदीनमध्येही होता फिदायिन गट

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या 21 अतिरेक्‍यांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. इंडियन मुजाहिदीनमध्येही फिदायीन गट कार्यरत होता. हा गट देशात आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी जुलै आणि ऑगस्टमध्ये शस्त्रसाठाही पाठविण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती दिल्लीच्या बाटला हाऊस येथे झालेल्या ऑपरेशनमध्ये अटक झालेला आरोपी मोहम्मद सैद याच्या चौकशीत स्पष्ट झाले असून त्याने दिलेल्या कबुलीचा उल्लेख या आरोपपत्रात असल्याचे गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


(sakal,19 feb)