Monday, July 14, 2014

आता आपण जन्नतमध्येच भेटू ...

कल्याणमधील सुन्नी तरुण दहशतवादी कारवायांसाठी गेले इराकला इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेने सुरू केलेल्या युद्धात सामील होण्यासाठी ठाण्यातील चार तरुणांना चिथावणी देऊन एका व्यापाऱ्याने इराकला नेल्याचे तपासात उघड झाले आहे. तपास यंत्रणा या व्यापाऱ्याला शोधत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातून काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अनेक तरुणांना स्वतंत्र राष्ट्रस्थापनेच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करण्यासाठी इराकला नेल्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. "आता आपण जन्नतमध्येच भेटू', असे एका तरुणाने कुटुंबीयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ठाण्यातून 24 मे रोजी अरीब एजाज मजीद, सहीम फारूख तानकी, फहद तनवीर शेख व अमन नईम तांडेल हे तरुण बेपत्ता झाले होते. त्यांच्या पालकांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. सहीम वगळता उर्वरित तिन्ही तरुण उच्च शिक्षित आहेत. दुर्गाडीच्या उर्दू हायस्कूलमधील बारावी अनुत्तीर्ण झालेला सहीम कॉम्प्युटर एक्‍स्पर्ट आहे. या चौघांकडील मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डनुसार ते मुंबई आणि ठाणे परिसरात ज्यांच्या संपर्कात होते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न सुरू आहे. एका व्यापाऱ्याने या चार तरुणांना मुंबईहून इराकमध्ये नेण्याचा सगळा खर्च केला, असे समजले आहे. त्यांना अफगाणिस्तानच्या सीमेवर प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात येते. घरात काहीही न सांगता निघून गेलेल्या या तरुणांपैकी अरीब याने वडील डॉक्‍टर एजाज माजिद यांना पत्र लिहून आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. कुटुंबीयांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात "आता आपण जन्नतमध्येच भेटू', असे त्याने म्हटले आहे. चांगल्या घरातील सुशिक्षित तरुणांना चिथावणी देऊन, त्यांना "जिहाद'च्या नावाखाली घातपाती कारवायांत सामील करून घेतले जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे. हे चारही तरुण सुन्नी राष्ट्रनिर्मितीच्या नावाखाली दहशतवादी कारवायांत सामील झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुन्नी पंथातील बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध पोलिस, दहशतवादविरोधी पथक, राज्य गुप्तचर विभाग व केंद्रीय गुप्तचर विभागाने सुरू केला आहे, असे उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हे तरुण 24 मे रोजी बेपत्ता झाल्याचे पोलिस ठाण्यातील तक्रारीत म्हटले असले तरी ते आधीपासूनच "इसीस'च्या संपर्कात होते, असे समजते. पालक म्हणतात, दहशतवाद्यांशी संबंध नाही या तरुणांपैकी फहाद याचे काका इफ्तेकार खान माजी नगरसेवक आहेत. आपल्या पुतण्याची कोणीतरी दिशाभूल केली असून, त्याला मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे, असे त्यांनी सांगितले. या तरुणांचा दहशतवादी संघटनांशी काहीही संबंध नाही. त्यांना नाहक या संघटनांशी जोडले जात आहे, असे त्यांच्या पालकांनी सांगितले. ---------




 कोण आहेत हे तरुण? - अरीब एजाज माजिद (वय 22) ः कल्याण-पश्‍चिमेला "सर्वोदय रेसिडेन्सी'तील सी विंगमध्ये राहणारा अरीब नवीन हा पनवेल येथील काळसेकर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्यापूर्वी त्याने वाशीच्या फादर ऍग्नेल पॉलिटेक्‍निकमधून डिप्लोमा केला आहे. तो फुटबॉलपटू आहे. कल्याण-पश्‍चिमेला अन्सार चौकात या कुटुंबाचे आणखी एक घर आहे. आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासोबत तो राहत होता. 24 मे रोजी घरातून नमाजाला जात असल्याचे सांगून तो निघून गेला.


 - सहीम फारूख तानकी (वय 26) ः कल्याण-पश्‍चिमेला दुर्गाडी येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमधून बारावी अनुत्तीर्ण झालेल्या सहीम याला हिंदी, इंग्रजी, उर्दू व मराठी लिहिता-वाचता येते. नवी मुंबईत कोपरखैरणे येथे रिलायन्स फर्स्ट सोर्स कॉल सेंटरमध्ये तो नोकरीला होता. गफूर डॉन चौकातील एक चायनीज पदार्थांची गाडी, तसेच दुर्गाडी येथील चायनीज गाडीवर तो नेहमी मित्रांसोबत दिसत असे. बंदर रोड येथील दूध नाक्‍यावरील घरात दोन भावांसोबत तो राहत होता. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. 24 मे रोजी कुणाला काहीही न सांगता तो घरातून निघून गेला.



 - फहद तनवीर शेख (वय 24) ः कल्याण-पश्‍चिमेला गोविंदवाडी येथे राहणाऱ्या फहदचे वडील डॉ. तन्वीर मकबूल शेख भिवंडी परिसरात नावाजलेले डॉक्‍टर आहेत. मूळचा आझमगढ येथील फहद पनवेलमधील काळसेकर महाविद्यालयातून बी.ई. मेकॅनिकलचा डिप्लोमा करीत होता. त्यापूर्वी तो आसनगावच्या शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात शिकत होता. सहीमप्रमाणेच गफूर डॉन चौकात तो दिसत असे. आई-वडील, चार बहिणी आणि भाऊ अशा कुटुंबात राहणारा फहद घरातून न सांगता 24 मे रोजी निघून गेला.



 - अमन नईम तांडेल (वय 20) ः कल्याण-पश्‍चिमेला गोविंदवाडीत आई-वडिलांसोबत राहणारा अमन कोपरखैरणे येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात बी.ई.च्या दुसऱ्या वर्षाला होता. उत्तम क्रिकेटपटू असलेल्या अमनचे वडील परळ येथे "युरेका फोर्ब्स'मध्ये नोकरीला आहेत. तोसुद्धा गफूर डॉन चौक, कोटबार मशीद येथे मित्रांसोबत दिसत असे. अमन आणि अरीब यांची शाळेत शिकत असल्यापासून मैत्री होती. ------------

Sunday, September 15, 2013

डॉन को पकडना मुश्‍किल नही...!

"डॉन को पकडना मुश्‍किलही नही, नामुमकिन है' हा डायलॉग कोणे एके काळी प्रचंड गाजला... परंतु "समय बडा बलवान' असतो, हेही लक्षात ठेवायला हवं. भारतानं प्रयत्नांची शिकस्त केल्यास, दांडगी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीनं पावलं उचलल्यास दाऊद इब्राहिम भारतातल्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं दिसलं तर आश्‍चर्य वाटायला नको. "दाऊदला खेचून आणू,' असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गेल्या आठवड्यात म्हटलंच आहे!
संघटित गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांमुळे जगभरातल्या "मोस्ट वॉंटेड' दहशतवाद्यांच्या यादीत अग्रक्रमावर असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरला अटक करून भारतात आणण्याचे जोरदार प्रयत्न केंद्रीय तपासयंत्रणांनी सुरू केले आहेत. मुंबईच्या अंडरवर्ल्डवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या दाऊदला अटक करण्यासाठी "एफबीआय' या अमेरिकी गुप्तचर संघटनेशी बोलणी सुरू आहेत. दाऊदच्या मुसक्‍या आवळायला मदत करण्यासंबंधी अमेरिकेचे ऍटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी सहमती दर्शवल्याचं वक्तव्यसुद्धा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आठवडाभरापूर्वीच केलं. प्रत्यक्षात गेली 20 वर्षं देशाबाहेर राहून मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आजही अबाधित वर्चस्व ठेवणारा दाऊद भारतीय सुरक्षायंत्रणांच्या हाती इतक्‍या सहजासहजी लागेल का, हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांचा मास्टरमाइंड असलेला दाऊद "आयएसआय' या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या संरक्षणात पाकिस्तानात ऐषारामात जगत आहे. इंटरपोलशी संबंधित असलेल्या जगभरातल्या प्रत्येक राष्ट्राच्या सुरक्षायंत्रणांना दाऊद पाकिस्तानात वास्तव्याला असल्याचं माहीत आहे; पण भारतीय सुरक्षायंत्रणांचा हा दावा पाकिस्तान सरकारनं दरवेळी फेटाळून लावला. "रॉ' आणि "आयबी' या भारतीय गुप्तहेर संघटनांनी पाकिस्तानातल्या दाऊदच्या वास्तव्याचे घराच्या क्रमांकासह ठोस पुरावे पाकिस्तानला कळवले. मात्र, दाऊद इब्राहिम नावाची अशी कोणतीही व्यक्ती आपल्याकडे राहत नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारत, पाकिस्तान, येमेन आणि दुबईतून मिळवलेले 11 पासपोर्ट; तसंच 16 नावं असलेला दाऊद हा पाकिस्तानातल्या बड्या उद्योजकांपैकी एक आहे. ज्याच्या गुंतवणुकीवर कराची स्टॉक एक्‍स्चेंज आजही उभं आहे, त्या दाऊदला संरक्षित ठेवण्यासाठी अल्‌ कायदा, लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर सदैव सज्ज असतं. गेली अनेक वर्षं दाऊद इब्राहिमच्या मागावर असलेल्या "रॉ'नं त्याच्या कराचीतल्या दोन आणि इस्लामाबाद इथल्या घरांचे पत्ते मिळवले. पाकिस्तानी नौदल, लष्कर व आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी; तसेच बडे उद्योजक व व्यावसायिक राहत असलेल्या कराचीतल्या "क्‍लिफ्टन' या पॉश वसाहतीत दाऊद, त्याची पत्नी मेहजबीन, विश्‍वासू साथीदार छोटा शकील, टायगर मेमन, आफताब बटकी, येडा याकूब, फहीम मचमच यांच्यासह अनेक वर्षं वास्तव्याला आहे; पण पाकिस्ताननं त्याचं अस्तित्वच नाकारल्यामुळे भारतीय सुरक्षायंत्रणांपुढे असलेला पेच अनेक वर्षं कायम होता. पाकिस्तानच्याच अबोटाबाद इथल्या एका घरात लपून बसलेला अल्‌ कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला 2 मे 2011 रोजी अमेरिकेच्या "नेव्ही सील'च्या कमांडोंनी एका कारवाईत ठार केलं. यावरून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तान आश्रय देत असल्याची वस्तुस्थिती जगापुढे आली. एरवी, "आम्हीच तालिबानी आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी हैराण झालो आहोत,' असा बनाव करून कानाला हात लावणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा लादेनच्या हत्येनंतर समोर आला. पाकिस्तानच्या लष्करानंच लादेनसाठी अबोटाबाद इथल्या घराला सुरक्षा मिळेल, अशी व्यवस्था करून दिली होती. या घराला तारेचं मोठं कुंपण घालण्याचं कामही पाकिस्तानी लष्करानंच केल्याचंही स्पष्ट झालं होतं. अल्‌ कायदाच्या या प्रमुखाला आश्रय देणारा पाकिस्तान दाऊदसारख्या संघटित गुन्हेगारीकडून दहशतवादी कारवायांकडे वळलेल्या अंडरवर्ल्ड डॉनला सहज आश्रय देऊ शकतो, हे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे स्पष्ट झालं. असं असलं तरी पाकिस्तानवरचा दबाव वाढवून दाऊदला आपल्या ताब्यात घेण्यात त्या वेळीसुद्धा भारत कमी पडला. लादेनच्या हत्येनंतर बिंग फुटण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं दबावाखाली येऊन दाऊदला त्याचा पुतण्या मोईन याच्या नैरोबीत होणाऱ्या लग्नालासुद्धा उपस्थित राहण्यास मनाई केली होती. एवढंच नव्हे, तर केवळ वास्तव्याचं ठिकाणी उघड होऊ शकेल, या भीतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नवदांपत्याला आशीर्वाद देणंही त्यानं टाळलं होतं. यानंतरच्या काळात स्वतःला लपण्यासाठी "सेफ हेवन'च्या शोधात दाऊदनं सोमालिया, झिंबाब्वे, कांगो आणि सुदानसारख्या ठिकाणांचा पर्यायदेखील नेहमी खुला ठेवला. मात्र, परिस्थिती निवळल्यानंतर दाऊदनं कराचीत क्‍लिफ्टन परिसरात राहायला पसंती दिली. या वेळी त्यानं फक्त घराचा पत्ता बदलला. त्यापूर्वी दाऊदसोबत दुबई आणि कराची इथं राहिलेल्या करीमुल्ला खान याला ऑगस्ट 2008 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती. त्याच्या चौकशीत दाऊद कराचीच्या क्‍लिफ्टन इथं आयएसआयच्या संरक्षणात राहत असल्याचं स्पष्ट झालं होतं. 1993 च्या साखळी बॉंबस्फोटांच्या वेळी शेखाडी बंदरात आरडीएक्‍स आणि शस्त्रांचा साठा उतरवण्यात करीमुल्लाचा महत्त्वाचा वाटा होता. स्फोटांनंतर तोसुद्धा दाऊदसोबत दुबईत आणि नंतर पाकिस्तानात वास्तव्याला होता. त्याच्या चौकशीतसुद्धा दाऊद पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी असल्याचं स्पष्ट झालं होतं. दाऊद पाकिस्तानात असल्याचं सगळ्या जगाला माहीत असलं, तरी "तो आपल्याकडे नाही', असा दावा पाकिस्तानकडून वारंवार केला जात आहे. यामागची कारणमीमांसा पूर्णतः वेगळी आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच दाऊदच्या पैशावर आजही अवलंबून आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. काही वर्षांपूर्वी डबघाईला आलेल्या पाकिस्तानी रेल्वेला सावरण्यासाठी सरकारनं दाऊदची मदत घेतल्याचंही सांगण्यात येतं. विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या भारतात घातपाती कारवाया घडवून इथल्या विकासाला खीळ बसवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. भारतात बनावट चलनी नोटा, अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांचे साठे वितरित करण्यासाठी आयएसआयच्या माध्यमातून अल्‌ कायदानंसुद्धा दाऊदचं संघटित गुन्हेगारी टोळीचं मोठे नेटवर्क वापरलं. भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशासह पश्‍चिम आशियाई देश; तसंच आखाती देशांत दाऊदची हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. नेपाळ स्टॉक एक्‍स्चेंज; तसंच तिथल्या काही बॅंकांतही त्याचे पैसे आहेत. नेपाळमधले कॅसिनो आणि डान्सबारमध्येही दाऊदचा पैसा आहे. भारताविरोधी कारवाया करण्यासाठी दाऊदनं नेपाळमधील माओवाद्यांशी संधान साधून त्यांच्या मदतीनं शस्त्रास्त्र, बनावट चलनी नोटांचं वितरण करायला सुरवात केली. त्यामुळं दाऊद हा पाकिस्तानसाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. दुबई पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केलेला दाऊद टोळीचा कुख्यात गॅंगस्टर मुन्ना झिंगाडा याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा प्रयत्न करत आहे. मात्र, मुन्ना पाकिस्तानी नागरिक असल्याचे पुरावे पाकिस्तानी प्रशासनानं सादर करून त्याचा ताबा मिळण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात केली आहे. यावरूनच दाऊदची पाकिस्तानी प्रशासनावर असलेली हुकमत सिद्ध होते. वयाच्या साठीकडे झुकलेला दाऊद आता पूर्वीसारखा कार्यरत नाही. हृदयाच्या आजारामुळे आशिया खंडात पसरलेल्या आपल्या अवैध धंद्यांची सर्व सूत्रं त्याचे भाऊ; तसंच अतिशय विश्‍वासू समजला जाणारा छोटा शकील यांच्याकडे सोपवली आहेत. दक्षिण मुंबईत असलेल्या रिअल इस्टेटच्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्यानं लहान भाऊ इक्‍बाल कासकरला भारतात धाडलं होतं. दुबईच्या "इंडियाना पब'मध्ये गोंधळ घातल्यानंतर तिथल्या सुरक्षायंत्रणांनी इक्‍बालला अटक केली. मग, इक्‍बाल कासकरसंबंधीची माहिती भारतीय यंत्रणांना कळवून त्याचं अधिकृतरीत्या प्रत्यार्पण घडवून आणण्यात आलं. नागपाड्याच्या पाकमोडिया स्ट्रीट इथं असलेल्या दाऊदच्या कुटुंबाच्या घरात इक्‍बालचं वास्तव्य आहे. दाऊदचा मुंबईतला रिअल इस्टेटचा व्यवसाय तो सांभाळत असल्याचं सांगण्यात येतं. गेल्या 20 वर्षांत परदेशात राहून आपली टोळी चालवणाऱ्या दाऊदच्या भारतातल्या नेटवर्कचा वापर आता आयएसआयनंसुद्धा घेणं बंद केलं आहे आणि आमिर रझा, रियाज आणि इक्‍बाल भटकळसारखे दहशतवादी तयार करायला सुरवात केली. या घडामोडींकडे डोळसपणे पाहिल्यास गेल्या काही वर्षांत आयएसआयनं दाऊदचं भारतातलं नेटवर्क वापरणं बंदच केल्याचं स्पष्ट जाणवतं. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला (26-11) लष्करे तैयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे हल्ला केला. त्या वेळीसुद्धा आयएसआय अथवा लष्करे तैयबानं दाऊदची मदत घेतली नाही, असं तपासात स्पष्ट झालं. भारतात वाढत असलेल्या इंडियन मुजाहिदीन, बांगलादेशमधील हरकत उल जिहाद इस्लामी (हुजी) व पाकिस्तानातली लष्करे तैयबासारख्या दहशतवादी संघटनांनी आपले स्लिपर सेल वाढवायला सुरवात केली आहे. 2005 नंतर झालेल्या घातपाती कारवाया इंडियन मुजाहिदीनच्या म्होरक्‍यांनी घडवल्या. त्यासाठी या दहशवाद्यांनी "सिमी'च्या जुन्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. यावरूनच आयएसआयला असलेली दाऊदची गरज आता संपुष्टात आली आहे, असं म्हणता येऊ शकेल. मात्र, सध्याच्या घडीला त्याचं पाकिस्तानातलं स्थान आणि महत्त्व यांचा विचार करता ते अनन्यसाधारण आहे, असं म्हणता येईल. त्यामुळे अमेरिकेच्या मदतीनं त्याचा ताबा भारताकडं सहजासहजी मिळेल, अशी सुतरामही शक्‍यता नाही. सध्या पाकिस्तान सीमेवर असलेल्या अफगाणिस्तानात अमेरिकेचं सैन्य आहे. 2013 अखेरपर्यंत हे सैन्य टप्प्याटप्प्यानं काढून घेतलं जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला थांबलेली तिथली तालिबानी चळवळ पुन्हा एकदा कार्यरत होऊ शकेल. परिणामी पाकिस्तानाला मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवायांना सामोरं जावं लागण्याची भीती आहे. पाकिस्तानला काही पातळ्यांवर अमेरिका आणि विशेषतः भारताकडून ठोस आश्‍वासनं आणि प्रत्यक्ष मदत मिळाल्यास दाऊद भारतीय सुरक्षायंत्रणांच्या ताब्यात यायला कसलीही हरकत नसावी.

Sunday, June 12, 2011

जे डे - ‍अंडरवर्ल्डचा एन्सायक्‍लोपिडीया


" यार, भूक लगी है, मुझे कुछ खाना है. यहॉं कॅन्टीन तो होगा ना. कुछ साधा होगा तो भी चलेगा,' जे डे म्हणत होते. रेल्वे पो लिसांनी ऑ फि शियल सिक्रेट ऍक्‍टखाली अटक केलेला पत्रकार ताराकांत द्वीवेदी ऊर्फ अकेला याची सुटका व्हावी यासाठी गुन्हे पत्रकारांची फौज घेऊन मंत्रालयात गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या कार्यालयावर धडक देणारे जेडे यांच्यासोबत माझे झालेले ते शेवटचे संभाषण. मुंबईच्या अंडरवर्ल्डचा चालता बोलता एन्साक्‍लोपिडीया असलेल्या जेडे सारखा माणूस "साधा' ही चलेगा असं म्हणेल असे वाटलं नव्हते. त्यांच्या या सादगीतच त्यांचे मोठेपण दडलेले होते. पुढच्याच क्षणात एका मित्रासोबत मोबाईल फोनवर बोलत निघुन गेलेले जेडे आज प्रकर्षाने आठवले ते पवई येथे मोटारसायकलवरून आलेल्या काही शार्प शुटरने बेछुट गोळीबारात मरण पावल्याचे कळाल्यावर. मुंबईच्या गुन्हे पत्रकारीतेत पंचवीस वर्षांपेक्षा जास्त दांडगा अनुभव असेलले जेडे अतिशय मितभाषी आणि सुस्वभावी. तीनच दिवसांपूर्वी कुरार येथे झालेल्या चार तरूणांच्या हत्येच्या प्रकरणात गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली. त्याच्या पत्रकार परीषदेला देखील जेडे त्यांच्या नेहमीच्या खूर्चीवर येऊन बसले होते. अनेक जुने जाणते पत्रकार एखाद्या प्रकरणातली स्वाभाविक माहिती सुद्धा परीषदेत मोठमोठ्याने आवाज करून प्रश्‍न विचारतात.अशा वेळी पत्रकार कक्षाच्या कोपऱ्यात असलेल्या सीटवर जेडे उपस्थित आहेत का हे देखील शोधावे लागायचे. अतिशय शांत चित्ताने समोरचा अधिकारी काय बोलतोय याकडे, त्यांचे बारकाईने लक्ष असायचे. परीषद संपल्यावर काही तरी वेगळे , विशेष मिळविण्यासाठी बरेच पत्रकार संबंधित अधिकाऱ्याच्या मागावर जाताना दिसायचे.मात्र, जेडें त्यांच्या मोबाईल फोनवर जुंपायचे. दुसऱ्या दिवशी कोणत्याही वृत्तपत्रात नसेल अशी बातमी ते द्यायचे. हीच
बातमी मग दिवसभर काही प्रमुख वृत्तवा हिन्या चालवायच्या. तर, आमच्यासारखे मुंबईच्या गुन्हे पत्रकारीतेत अवघी काही वर्षे झालेले पत्रकार तिचा फॉलोअप घ्यायला बघायचो.मात्र, आज झालेल्या घटनेनंतर उद्यापासून गुन्हे पत्रकारीतेचा हा कोष कोणालाच दिसणार नाही या जाणीवेने सुद्धा मनावर प्रचंड दडपण आहे. डे यांच्यासोबत अशी खूपच घनिष्ठ संबंध नसले तरी एकमेकांना चांगले ओळखू एवढा परीचय नक्कीच होता. ज्या सकाळ या वृत्तपत्रात मी गुन्हे पत्रकार म्हणून काम करतो त्या माझ्या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक व मालकांशी थेट बोलावे लागण्याचा योग देखील डे यांनी दिलेल्या बातमीला फॉलोअप करताना आल्याचा अनुभव गाठीशी आहे. त्यावेळी डे यांनी केलेली मदत, दिलेला आधार महत्वाचा होता. जेडी पाटील तेव्हा होते. ते आणि मी पो लिस आयुक्तालयात जेडे ला भेटल्याचे आजही स्पष्ट आठवते. त्यापूर्वी डे यांचे फक्त नाव आणि बातम्याच वाचत होतो. यानंतर केव्हाही, कुठेही भेटल्यावर त्यांचे ते आवर्जून ओळख दाखवित. चालता चालताच त्यांचं हात दाखविणं, स्मितहास्य करणं आज प्रकर्षाने आठवते. ज्येष्ठ पत्रकार असल्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सगळ्यापेक्षा वेगळ्या बातम्यांचा त्यांना कधी गर्वही नव्हता. त्यामुळेच त्यांच्या मानाने माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला देखील ते त्यांच्याकडे असलेले अनुभवाचे दोन शब्द सांगत. सट्टेबाजीच्या बातम्या करताना सट्टेबाजाचे पूर्ण नाव दिल्याने काय अडचणी येऊ शकतात. तसेच त्यांची टोपण नावेच का द्यावीत याचे चांगले उदाहरण शोभन कालाचौकीचे नाव घेऊन त्यांनीच समजावून सांगितले होते. उद्योन्मुख पत्रकारांना प्रोत्साहन द्यायला आपली कशी मदत होईल याकडे लक्ष देत असतानाच फुकाचा आव त्यांनी कधीच आणला नाही.त्यामुळेच पो लिस आयुक्तालयात पत्रकार कक्षाजवळ असलेल्या झाडाखाली ग्री
लला टेकून उभे असलेले डे दिसल्यावर मराठी, हिन्दी आ णि इंग्रजी वृत्तपत्रांतील अथवा वा हिन्यांचे पत्रकार त्यांच्यासोबत एखाद्या गुन्ह्याची चर्चा करायला उभी राहताना काल परवापर्यंत सगळ्यानीच पाहिली. डे यांच्या अशाच स्वभावामुळे साध्या पो लिस शिपायापासून पो लिस दलातील उच्चपदस्थ अधिकारी त्यांच्या अगदी जवळचे. कितीही मोठा अधिकारी असू द्या, सर्व पत्रकारांपेक्षा काहीशी चांगली ट्रीटमेंट डे यांना हमखास मिळायची.

मुंबईच्या अंडरवर्ल्डसोबत थेट भिडण्याचा जेडेंच्या स्वभावानेच त्यांचा बळी घेतला हेच यावेळी म्हणावे लागेल. वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गुन्हे पत्रकारीतेत असलेल्या डे यांनी आजवर अनेक ब्रेकींग स्टोरीज दिल्या. बातमी मागची बातमी शोधत असताना हे का घडले याचा शोध घेण्यात विशेष रस असलेले डे त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांना पडलेल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधत असल्याचे त्यांच्या बातम्यांतूनच दिसत होते. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या डिझेल चोरीच्या अवैध धंद्याचे रॅकेट दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत असल्याचे त्यांनी उघडकीस आणले होते. एकीकडे पेट्रोल आ णि डिझेलचे दर वाढत असताना मिड डेत प्रसिद्ध झालेली ही बातमी अ तिशय वाचनीय ठरली. परीणामी अनेक वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधणाऱ्या पोलिसांनी सुद्धा कारवाया करायला सुरवात केली. त्यांच्या याच बातमीने तर त्यांचा बळी घेतला नाही ना अशी दाट शक्‍यता आज दिवसभर वाटत होती. अंडरवर्ल्डसोबत कनेक्‍शन असलेल्या काही पोलिस अधिकाऱ्यांचे बुरखे फाडायला देखील त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरवात केली होती.
आफ्टरनुनसारख्या सायंदैनिकातून आपल्या करीअरची सुरवात करणारे डे आजच्या घडीला इंग्रजी वर्तमानपत्रसृष्टीतील सर्वात ज्येष्ठ गुन्हे पत्रकार. वाचकाची गरज भागवित असताना स्वतःचे वैयक्तिक आयुष्य शुन्य करून घेणाऱ्या गुन्हे पत्रकारांसाठी प्रत्येक बातमी किती तोलून मोलून लिहावी लागते हे त्यांनाच माहित. वाचकांसाठी फक्त एक बातमी असलेली ती माहिती मिळविताना त्या बातमीदाराने केलेले प्रयत्न कधीच त्यात दिसत नाहीत. डे यांच्या बाबतीत ही तसेच होते. त्यांच्या बातम्या सगळ्यांनाच दिसत, मात्र, त्यापाठी त्यानी केलेली मेहनत, धडपड, प्रयत्न त्यांनाच ठाऊक. अशाच काही बातम्यांची किंमत डे यांना आज स्वतःचे प्राण गमावून चुकती करावी लागली.
डे यांच्या रूपाने मुंबईच्या गुन्हेगारीचा चालता बोलता एन्सायक्‍लोपिडीया गेला. एका अर्थाने डे यांचा मृत्यू देखील एका हार्ड कोअर क्राईम रिपोर्टरला शोभावा असाच आहे. सैनिकाचे मरण शत्रुसोबत रणांगणावर लढताना यावे असे म्हटले जाते. तरच त्या मरणाला काही अर्थ असतो. तसेच डे यांचे मरण देखील एका निधड्या छातीच्या क्राईम रिपोर्टरला शोभेल असेच होते. त्यांच्या मृत्युमुळे गुन्हे पत्रकारीतेचे झालेले नुकसान कधीही भरून न येणारे असेच आहे.

Wednesday, March 31, 2010

बेस्टच्या धडकेने तरुणाचा मृत्यू


देवनारमध्ये संतप्त जमावाकडून चार बसची तोडफोड



घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बेस्ट बसने वीस वर्षीय तरुणाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी देवनार येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने अपघातग्रस्त बेस्टच्या चालकाला बेदम मारहाण करून चार बेस्ट बसची तोडफोड केली. अपघाताच्या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने याठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अपघात घडविणाऱ्या बेस्टचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
देवनार कत्तलखान्याजवळ टाटा कॉलनी झोपडपट्टीत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. याठिकाणी एका चप्पलच्या दुकानात काम करणारा बिलाल जुल्फीकार खान (20) हा तरुण डोक्‍यावर चप्पलच्या बॉक्‍सने भरलेली गोणी घेऊन जात होता. या वेळी मागून आलेल्या बेस्टच्या 380 क्रमांकाच्या भरधाव बसने त्याला जोरदार धडक दिली. बसच्या मागील बाजूला असलेल्या चाकाखाली आल्याने बिलाल जागीच मरण पावला. या घटनेला बेस्ट बसचालक जबाबदार असल्याचे पाहून या परिसरातील काही रहिवाशांनी चालक भरत जानू नराळे (45) यांना खाली उतरवून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या प्रकाराची माहिती काही वेळेत बिलालच्या नातेवाईक व मित्रमंडळींसह सर्वच रहिवाशांना झाली. बिलालच्या मृत्यूचा राग अनावर झाल्यामुळे या नागरिकांनी या परिसरात येणाऱ्या बेस्टच्या गाड्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. अर्ध्या तासाच्या काळात या मार्गाने जाणाऱ्या चार बेस्ट बसमधील नागरिकांना खाली उतरवून येथील संतप्त जमावाने त्यांची तोडफोड केली. तोडफोड झालेल्या बेस्ट बसमध्ये माहीमला जाणाऱ्या दोन, तर मुंबई सेंट्रल व घाटकोपरच्या अमृतनगरला जाणाऱ्या प्रत्येकी एका बसचा समावेश आहे. गाड्यांची तोडफोड करीत असतानाच तरुणांच्या एका जमावाने गोवंडी
रेल्वेस्थानकापासून टाटानगर व देवनार कत्तलखान्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडविला. त्यामुळे या परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती. स्थानिक पोलिसांना तोडफोड करणाऱ्या जमावावर नियंत्रण आणणे अवघड झाल्याने या भागात राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची तुकडी पाठविण्यात आली. पोलिस आल्याचे पाहून गाड्यांची तोडफोड करणारा जमाव तेथून काही क्षणातच पळून गेला. पोलिसांनी अपघातात मरण पावलेल्या बिलाल खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला, तर रहिवाशांच्या मारहाणीत जबर जखमी झालेला बसचालक भरत नराळे याला उपचारासाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बसचालक नराळे याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. एस. भालेराव यांनी सांगितले. बेस्ट बसच्या नुकसानीप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले.


(sakal,17 th january)

चौदा वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्याला अटक

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली


चौदा वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी तिच्या इमारतीतच राहणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हत्येपूर्वी या मुलीवर बलात्कार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या गोणीवरून मारेकऱ्याचा सुगावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाशीनाक्‍याच्या म्हाडा वसाहतीत असलेल्या पंचरत्न सोसायटीत 8 जानेवारीला हा प्रकार उघडकीस आला. आरसीएफ पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. ज्या गोणीत या मुलीचा मृतदेह बांधून टाकला, ती गोणी याच परिसरात राहणाऱ्या एका भाजीविक्रेत्या महिलेची असल्याचे स्पष्ट झाले. या भाजीविक्रेत्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता पंचरत्न सोसायटीत तळमजल्यावर राहणाऱ्या नागेश घोलप (24) या तरुणाच्या आईने एक गोणी नेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या हत्येमागे नागेश घोलप असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी नागेशच्या हालचालीवर लक्ष ठेवले. नागेशविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून पोलिसांनी त्याला अटक केली.

7 जानेवारीला शॅम्पू आणण्यासाठी जात असलेल्या या मुलीला त्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. शुद्धीवर आल्यानंतर ही मुलगी झालेल्या प्रकाराची बाहेर वाच्यता करेल, या भीतीने त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर घराला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला. त्याच रात्री उशिरापर्यंत या मुलीचा तिच्या नातेवाईकांकडून शोध सुरू होता. अखेर तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली. दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने या मुलीचा मृतदेह गोणीत कोंबून शेजारीच असलेल्या एका रिकाम्या घरात ठेवून दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिस निरीक्षक शैलेश पासलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बापकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.


(sakal,15 th january)

शीव येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

पाचव्या मजल्यावरून मारली उडी

शीव येथील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात एफ.वाय. बी.कॉम.ला असलेल्या अठरा वर्षांच्या मुलीने आज सायंकाळी ती राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नसले, तरी अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार घडला असावा काय, याचा पोलिस शोध घेत आहेत.
या घटनेची माटुंगा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ब्राह्मणवाडी येथील के. सुब्रमण्यम मार्गावर असलेल्या "अमर व्हिला' इमारतीमध्ये हा प्रकार घडला. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या शिबानी आशीष सेठ या विद्यार्थिनीने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खाली उडी मारली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शिबानीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील देशमुख यांनी दिली. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या या घटनेनंतर माटुंगा परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.


बेरोजगार तरुणाची आत्महत्या

बेरोजगारीने ग्रासलेल्या एका 30 वर्षीय मद्यपी तरुणाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज दुपारी ना. म. जोशी मार्ग परिसरात घडला.
किशोर कालिदास सोळंकी असे या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ना. म. जोशी मार्ग येथील मरिअम्मा चाळीत राहणाऱ्या किशोरला दारूचे व्यसन होते. 10 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या किशोरची पत्नी त्याच्या व्यसनामुळे त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरात एकटाच असलेल्या किशोरने नायलॉनच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


(sakal,15 th january)

मुंबई पोलिसांवर राजस्थानात गावकऱ्यांकडून हल्ला

एक ठार; दोन पोलिस जखमी


एका गंभीर गुन्ह्यात हव्या असलेल्या दोघा गुन्हेगारांना पकडण्यासाठी राजस्थानला गेलेल्या जुहू
पोलिसांच्या पथकावर स्थानिक गावकऱ्यांनी आज हल्ला केला. या वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गावकऱ्यांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात एक ग्रामस्थ ठार झाला. गावकऱ्यांच्या हल्ल्यात एक अधिकारी आणि एक शिपाई जबर जखमी झाले आहेत. राजस्थान पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने याबाबत माहिती देण्यास अतिरिक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नकार दिला. जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जुहू येथील एका महिला डॉक्‍टरच्या घरात झालेल्या 40 लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी जुहू पोलिसांचे पथक राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक पोलिसांना आपल्या कारवाईची कोणतीही कल्पना न देता जुहू पोलिसांनी जयंतीलाल या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिस डुंगरपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंबारा गावात गेले. याठिकाणी जयंतीलालचा साथीदार असलेल्या दिनेश नावाच्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिस गेले. या वेळी दिनेशच्या नातेवाईकांनी आरडाओरड करायला सुरुवात केल्याने त्याचे अपहरण केले जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना वाटले. त्यामुळे मुंबईतून आलेल्या या पथकावर ग्रामस्थ धावून गेले. गावातील तरुण आणि वृद्ध अंगावर धावून आल्याचे पाहून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गावकऱ्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. यात मगन हा ग्रामस्थ ठार झाला. या वेळी ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने पोलिसांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत एक पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस शिपाई जबर जखमी झाले आहेत. जखमींवर उदयपूर येथे उपचार सुरू आहेत. एका गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जुहू पोलिसांचे पथक राजस्थानला गेले होते. याबाबत राजस्थान पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नसल्याने कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.


(sakal,15 th january)