Wednesday, February 20, 2008

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 20 ः अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या महिला वकिलाने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न आज केला. या घटनेची घाटकोपर पोलिस ठाण्यात आज रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. अबू सालेमचे वकील अशोक सरावगी यांच्यामार्फत पसरविण्यात येणाऱ्या बदनामीला कंटाळून आपण हे कृत्य करीत असल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे
ऍड. पल्लवी आशर (41) असे या वकिलाचे नाव आहे. पोर्तुगाल येथून भारत सरकारकडे हस्तांतरित करण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार अबू सालेम याचे वकील अशोक सरावगी यांच्याकडे आशर सहायक वकील म्हणून काम पाहत होत्या. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पल्लवी त्यांच्या घाटकोपर चिरागनगर येथील महिंद्रा पार्क इमारतीतील घरात त्या बेशुद्धावस्थेत सापडल्या. यावेळी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचाराअंती शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी अबू सालेमचे वकील अशोक सरावगी यांनी आपले सालेमसोबत प्रेम प्रकरण असल्याचे खोटे वृत्त पसरविले आहे. सरावगी आपली बदनामी करीत आहेत. हा प्रकार सहन न झाल्याने आपण झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी .टी. पडवळ यांना दिली. याबाबत अधिक तपास सुरू असून चौकशीअंती तक्रारीत तथ्य आढळल्यास वकील अशोक सरावगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली