Friday, January 30, 2009

विमान अपहरणाद्वारे दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

विमान अपहरणाद्वारे दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता

केंद्राचा इशारा ः विमानतळांवर कडेकोट सुरक्षा, सर्व यंत्रणा सतर्क

विमान किंवा हेलिकॉप्टरचे अपहरण करून दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केल्याने मुंबईसह राज्यातील सर्व विमानतळ आणि महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. केंद्राने राज्य सरकारला याबाबत सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यानुसार कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येत असतानाच केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सावध झाली आहे. शहरातील महत्त्वाच्या, तसेच संवेदनशील ठिकाणांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून राज्य सरकारला विमानतळांबद्दलचा इशारा देण्यात आला. अतिरेकी विमान किंवा हेलिकॉप्टरचे अपहरण करून घातपात करण्याची शक्‍यता असल्याने विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मुंबईसह राज्यातील सर्व विमानतळांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
दहशतवादी लहान विमाने आणि हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करण्याची शक्‍यता आहे. गुप्तचर यंत्रणेकडून आलेल्या सावधानतेच्या इशाऱ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच आंतरदेशीय विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कमांडन्ट संजय प्रकाश यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. गुप्तचर यंत्रणेकडून या हल्ल्याबाबत नेमका तपशील मिळाला नसला तरी पुरेशी खबरदारी घेत आहोत, असेही प्रकाश यांनी या वेळी सांगितले.

मनसे, शिवसेनेला दंड
इंटरकॉंटिनेंटल हॉटेल आणि मुंबई विद्यापीठात केलेल्या तोडफोडप्रकरणी संबंधित राजकीय पक्षांकडून दंडवसुली केली जाईल, तसा कायदाच सरकारने केला असल्याचेही पाटील यांनी या वेळी नमूद केले. मुंबई विद्यापीठात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने; तर हॉटेल इंटरकॉंटिनेंटलमध्ये शिवसेनेने तोडफोड केली. त्यांच्याकडून राज्य सरकार कायद्यानुसार नुकसानभरपाई वसूल करील, असे गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले.
भाषेला दुर्लक्षित करीत असल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठात केलेल्या आंदोलनात विद्यापीठाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते; तर अंधेरी येथील हॉटेल इंटरकॉंटिनेंटलमध्ये शिवसैनिकांनी मराठी कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते.

(sakal,29 jan)

शाजी मोहनच्या रॅकेटमधील आणखी दोन पोलिसांना अटक

संयुक्त चौकशी ः मोहनचे ड्रग माफियांशी संबंध

अमली पदार्थांच्या रॅकेटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पोलिसांनी अटक केलेला आयपीएस अधिकारी शाजी मोहन याच्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठी त्याच्यासोबत काम करणाऱ्या आणखी दोन पोलिस शिपायांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना उद्या मुंबईत आणण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक आणि एटीएस संयुक्तरीत्या करीत असून, मोहन याचे ड्रग माफियांशी संबंध होते, ही बाब चौकशीत उघड झाल्याची माहिती "एटीएस'चे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी दिली.
जम्मू-कश्‍मीर येथे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकात संचालक पदावर कार्यरत असताना आयपीएस अधिकारी शाजी मोहन याने मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला. या ठिकाणी एक वर्ष 11 महिन्यांच्या कालावधीत कार्यरत असलेल्या शाजीने जप्त साठ्यातील बराचसा भाग स्वतःकडे काढून घेतला. याच काळात काही ड्रग माफियांशी त्याचे संबंध आले. त्यांच्याच माध्यमातून पुढे शाजीने आपले रॅकेट चालविल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीच्या कचाट्यात सापडू नये याकरिता शाजीने त्याच्याकडील अमली पदार्थांचा मोठा साठा उत्तर भारतात जाळल्याची बाबही उघडकीस आली आहे; मात्र त्याने किती साठा जाळला, याचा तपास अद्याप सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्‍यता रघुवंशी यांनी फेटाळून लावली असली तरी शाजीसोबत असणारे अधिकारी एटीएसच्या "रडार'वर असल्याची कबुली त्यांनी दिली. सध्या कोची येथे डायरेक्‍टोरेट ऑफ एन्फोर्समेंटमध्ये उपसंचालक पदावर कार्यरत असलेल्या शाजीच्या अमली पदार्थांच्या नेटवर्कचा शोध घेण्यात येत असून, प्रथमदर्शनी हे नेटवर्क म्हणावे तेवढे मोठे वाटत नसल्याचेही रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.
आयपीएस अधिकारी शाजी मोहन याच्या अमली पदार्थांच्या रॅकेटला मदत केल्याच्या आरोपावरून देवेंद्र पाल व नवीनकुमार या जम्मू-काश्‍मीर येथील दोन पोलिस शिपायांना "एटीएस'ने ताब्यात घेतले असून, त्यांना उद्या मुंबईत आणणार असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी या वेळी दिली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएसचे एक पथक अतिरिक्त पोलिस आयुक्त सुखविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली चंडीगड येथे रवाना झाले आहे.
(sakal,29 jan)

मुतालिकच्या चौकशीसाठी एटीएस मंगळूरला जाणार

कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला श्रीराम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक याचा मालेगाव बॉम्बस्फोटाशी असलेल्या कथित संबंधाची चौकशी करण्यासाठी दहशतवादविरोधी पथकाची एक तुकडी मंगळूर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती या पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी दिली. चौकशीत त्याचा मालेगाव स्फोटाशी संबंध उघडकीस आल्यास त्याला मुंबईत आणले जाईल, असेही रघुवंशी यांनी सांगितले.
कर्नाटक येथे एका पबवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी श्रीराम सेनेचा अध्यक्ष प्रमोद मुतालिक याला पोलिसांनी अटक केली आहे. मुतालिक याने केलेल्या एका भाषणात मालेगाव स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग आणि लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांच्या नावांचा उल्लेख "एटीएस'च्या पोलिसांना आढळला आहे. याशिवाय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतही श्रीराम सेनेचा उल्लेख आढळत असल्याने प्रमोद मुतालिक चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. सध्या मंगळूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मुतालिकची तेथेच चौकशी केली जाईल. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एटीएसला प्रवीण मुतालिक या आरोपीची आवश्‍यकता आहे. मालेगाव स्फोटात महत्त्वाची भूमिका बजावलेला प्रवीण फरारी असल्याचेही रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.

(sakal,29 jan)

सीमा सुरक्षा दलालाच शाजी मोहनकडून "चुना'

अमली पदार्थ रॅकेट ः अनेक अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्‍यता

जम्मू-काश्‍मीरच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाने जप्त केलेला अमली पदार्थांचा साठा केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाकडे सोपविण्यात आल्यानंतर आयपीएस अधिकारी व केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचा तत्कालीन प्रमुख शाजी मोहन त्यातील काही भाग स्वतःजवळ ठेवून, त्यात चुना मिसळत असे, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी जम्मू-कश्‍मीर येथील पोलिस अधीक्षकाला दहशतवादविरोधी पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, आणखी काही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्‍यता "एटीएस'चे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज वर्तविली.
मुंबईत अमली पदार्थांचे रॅकेट चालविल्याप्रकरणी "एटीएस'ने अटक केलेला कोची येथील एन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेटचा उपसंचालक शाजी मोहन याच्या चौकशीत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांच्या स्रोताविषयी महत्त्वपूर्ण माहिती उघडकीस येत आहे. तपासाबाबत दिशाभूल करण्यासाठी मोहन "एटीएस'ला वेळोवेळी चुकीची माहिती देत आहे. मोहनकडून मिळणाऱ्या माहितीची पोलिस फेरतपासणी करीत आहेत. हा साठा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केलेल्या साठ्यापैकीच असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस आले आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून हस्तगत करण्यात आलेल्या या साठ्यातील काही हिस्सा शाजी मोहन त्याच्या चंडीगड येथील घरी काढून ठेवत असे. "एटीएस'च्या पोलिसांनी हस्तगत केलेला सुमारे 39 किलोचा अमली पदार्थाचा साठा पाकिस्तानमधूनच आणण्यात आला. त्याच्या पाकिटांवर तो पाकिस्तानात बनविल्याची चिन्हे आढळल्याचेही परमबीर सिंग यांनी सांगितले.

मदत करणाऱ्यांचीही चौकशी
अमली पदार्थांच्या रॅकेट प्रकरणाच्या सखोल तपासासाठी "एटीएस'ने आज जम्मू-काश्‍मीर येथून बलविंदर सिंग या पोलिस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून या संपूर्ण रॅकेटसंबंधी उपयुक्त माहिती मिळू शकेल. मोहन जम्मू-काश्‍मीरमध्ये नेमणुकीवर असताना त्याला कनिष्ठ असलेल्या केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकातील अधिकाऱ्यांनाही आवश्‍यकता भासल्यास चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती "एटीएस'चे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

(sakal,28 jan)

शाजी मोहनकडून आणखी 25 किलो हेरॉईन जप्त

वसईत छापा ः मत्स्य व्यावसायिकाचाही सहभाग

मुंबईत अमली पदार्थांचे रॅकेट चालविल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला एन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेटचा उपसंचालक आणि आयपीएस अधिकारी शाजी मोहन याच्याकडून दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) पोलिसांनी आणखी 25 किलो हेरॉईनचा साठा हस्तगत केला. वसईतील एका घरातून काल सायंकाळी हा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती या पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.
अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे रॅकेट चालविल्याप्रकरणी जम्मू-कश्‍मीर केडरचा आयपीएस अधिकारी शाजी मोहन, हरियाना पोलिस दलातील निलंबित कॉन्स्टेबल राजेश कुमार आणि मुंबईतील मत्स्य व्यावसायिक विकी ओबेरॉय या तिघांना एटीएसच्या पोलिसांनी अटक केली. या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिस शाजी मोहन याची कसून चौकशी करीत आहेत. चौकशीत त्याने मत्स्य व्यावसायिक विकी ओबेरॉय याच्या वसईतील नायगाव येथे असलेल्या नालंदा अपार्टमेंटमधील घरात हेरॉईनचा साठा ठेवल्याची कबुली दिली. या माहितीवरून काल सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या घरावर छापा घातला. छाप्याच्या वेळी नालंदा अपार्टमेंटमधील घरात ओबेरॉय याचा मुलगा गौरव उपस्थित होता. या वेळी घराच्या मागील बाजूला असलेल्या जागेत 25 किलो हेरॉईन असलेली बॅग पोलिसांना सापडली. पोलिसांनी हा साठा ताब्यात घेतला असून, तो फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी विकी ओबेरॉय याच्या मुलाची चौकशी करण्याची शक्‍यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वी ओशिवरा परिसरात 17 आणि 25 जानेवारीला केलेल्या या कारवाईत एटीएसच्या पोलिसांनी शाजी मोहन आणि त्याच्या दोघा साथीदारांकडून 13 किलो 850 ग्रॅम हेरॉईन जप्त केले होते. चंडीगड येथे केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाच्या संचालकपदावर कार्यरत असताना मोहन याने जप्त केलेल्या अमली पदार्थांतून सुमारे 35 किलो हेरॉईनचा साठा काढून ठेवला होता. त्याच साठ्यामधील हे हेरॉईन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(sakal, 27 jan)

संजय राऊत यांना अटक आणि सुटका

जामीन मंजूर ः हॉटेल तोडफोडप्रकरणी कारवाई

मराठी कामगारांना कामावरून काढल्याच्या निषेधार्थ सहार येथील "इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल'मध्ये भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज सकाळी सहार पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांची अंधेरी येथील न्यायालयाने पाच हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केल्याची माहिती सहार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.
"इंटरकॉन्टिनेन्टल' या पंचतारांकित हॉटेलमध्ये कामावर असलेल्या 25 मराठी कामगारांना व्यवस्थापनाने काढून टाकल्याच्या निषेधार्थ 21 जानेवारी रोजी भारतीय कामगार सेनेने खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. या वेळी आंदोलनकर्त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली होती. या प्रकरणी सहार पोलिसांनी आमदार अनिल परब आणि माजी आमदार सीताराम दळवी यांच्यासह 53 आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. या आंदोलनाचे नेतृत्व केल्याप्रकरणी खासदार राऊत यांना आज सकाळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 5 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. यानंतर खासदार राऊत यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने राऊत यांना पाच हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले. या प्रकरणात अटक झालेल्या अन्य आंदोलनकर्त्यांनाही या वेळी जामिनावर मुक्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(sakal,27 jan)

आयपीएस अधिकाऱ्याचे ड्रग्ज रॅकेट उद्‌ध्वस्त

तिघांना अटक ः साडेबारा कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

कोची येथे केंद्र सरकारच्या डायरेक्‍टोरेट ऑफ एन्फोर्समेंट विभागात उपसंचालक असलेला आयपीएस अधिकारी शाजी मोहन मुंबईत चालवत असलेले अमली पदार्थांचे मोठे रॅकेट आज दहशतवादविरोधी पथकाने उद्‌ध्वस्त करून त्याच्यासह तिघांना ओशिवरा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून बारा किलो हेरॉईन हस्तगत करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत साडेबारा कोटी रुपये आहे, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे अटक केलेल्या या अधिकाऱ्याला केंद्र सरकारने शौर्यपदकाने गौरविले होते, अशी माहितीही रघुवंशी यांनी दिली.

ओशिवरा येथे दोघे जण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांना 17 जानेवारीला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सायंकाळी सापळा रचून मारुती कारमधून आलेल्या विकी ओबेरॉय आणि राजेश कुमार या दोघांना ताब्यात घेतले. अंगझडतीत त्यांच्याकडे एक किलो 850 ग्रॅम हेरॉईनचा साठा सापडला. पोलिसांना या दोघांना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली असता अमली पदार्थांच्या वितरणाचे हे रॅकेट कोची येथे केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर असलेला शाजी मोहन नावाचा आयपीएस अधिकारी चालवीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ही माहिती केंद्र सरकारच्या अमली पदार्थविरोधी पथकाला दिली. चौकशीत शाजी मोहन केंद्राच्या अमली पदार्थविरोधी पथकात चंडीगड येथे दोन वर्षे संचालक म्हणून कार्यरत होता अशी माहिती उघडकीस आली. या काळात त्याने ठिकठिकाणी जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या साठ्यापैकी 35 किलोंचे अमली पदार्थ स्वतःसाठी काढून घेतले होते. या अमली पदार्थांचीच तो मुंबईत विक्री करीत होता, असे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यातच त्याची कोची येथे डायरेक्‍टोरेट ऑफ एन्फोर्समेंट विभागात बदली झाली होती.

विकी ओबेरॉय आणि राजेशकुमार या दोघांना विक्रीसाठी दिलेल्या हेरॉईनचे पैसे घेण्यासाठी शाजी मोहन काल सायंकाळी ओशिवराच्या क्‍लासिक क्‍लब येथे आला होता. या वेळी मागावर असलेल्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून बारा किलो हेरॉइन, एक लॅपटॉप, सीडी, मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हा सगळा ऐवज तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहितीही रघुवंशी यांनी दिली.
या रॅकेटमध्ये अटक करण्यात आलेला राजेशकुमार हरियाना पोलिस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. गुरगाव येथे कार्यरत असताना एका प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले आहे; तर विकी ओबेरॉयचा मत्स्यव्यवसाय आहे. या रॅकेटचे नेटवर्क शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यांच्याकडून अमली पदार्थांची खरेदी करणाऱ्यांची माहितीही घेण्यात येत असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले

(sakal,25 jan)

प्रजासत्ताक दिनासाठी कडेकोट सुरक्षा

जयंत पाटील ः एनएसजीच्या मुंबईतील केंद्रासाठी तीन वर्षे लागणार

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर काही असामाजिक तत्त्वांकडून प्रमुख शहरांत घातपात घडविण्याची शक्‍यता गुप्तचर खात्याने वर्तविल्याने राज्यात ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चे मुंबईतील केंद्र सुरू होण्यासाठी आणखी अडीच ते तीन वर्षांचा काळ लागण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

पोलिस महासंचालक कार्यालयात राष्ट्रपती पदकांच्या वितरणप्रसंगी गृहमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाला अवघा एक दिवस बाकी असताना दिल्ली येथे दोघा दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातल्याच्या घटनेनंतर गुप्तचर खात्याने दहशतवादी संघटनांकडून घातपात घडविण्याची शक्‍यता वर्तविली आहे. तशा प्रकारच्या सूचना राज्य पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या मुंबईसह राज्याच्या प्रमुख शहरांत कमालीची सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
अतिरेकी हल्ल्याच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुंबईत एनएसजीचे एक पथक ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे पथक फक्त महाराष्ट्राकरिता मर्यादित नसून सबंध पश्‍चिम विभागासाठी ठेवण्यात येणार आहे. या पथकाच्या तळाकरिता कल्याण येथील जागा देण्याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत या पथकाचा तळ निर्माण करण्यासाठी अडीच-तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे; मात्र राज्य सरकारचे "फोर्स-1' कमांडो पथक येत्या अडीच महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याचे पाटील या वेळी म्हणाले.

मुंबई हल्ल्यातील शहिदांना शौर्यचक्र देण्यासंबंधी केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. पुरस्कार देण्यासंबंधीचा अंतिम निर्णय केंद्राचा आहे. मर्यादित संख्येमुळे यंदा मोजक्‍यांनाच "अशोकचक्र' देण्यात आले असले, तरी उर्वरितांकरिता पुढच्या वर्षी प्रयत्न केले जातील, असेही एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

चोख सुरक्षाव्यवस्था ः रॉय
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली असून ऐतिहासिक स्थळे, मोठमोठी हॉटेल्स, विमानतळ यांसारख्या महत्त्वाच्या वास्तूंसह संवेदनशील ठिकाणांची सुरक्षाव्यवस्था वाढविली आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम होणार आहेत. या ठिकाणीसुद्धा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांनी दिली.

(sakal,25 jan)

जरा याद करो कुर्बानी...

राज्य पोलिस मुख्यालयाचा ऐतिहासिक असेंब्ली हॉल. पोलिस खात्यातील सेवाकाळात दाखविलेले अतुलनीय शौर्य, तसेच बजावलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेची दखल म्हणून दर वर्षी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पोलिस पदकांच्या वितरण सोहळ्याला राज्यभरातून पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते दिल्या जाणाऱ्या या पदकांच्या नामावलीत असलेल्या "त्या' दोन नावांनी उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा काही क्षण ओलावल्या. राष्ट्रपती पोलिस पदकांसाठी त्या दोन शूर वीरांची नावे जाहीर होताच ही पदके घेण्यासाठी जाणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून मानवंदना दिली. "ती' दोन नावे होती 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेले सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे व अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे. ही पदके घेण्यासाठी गेले होते करकरे यांचे चिरंजीव आकाश आणि कामटे यांचे वडील निवृत्त कर्नल मारुती कामटे. गेल्या वर्षी उल्लेखनीय व गुणवत्तापूर्वक सेवेबाबत दिल्या जाणाऱ्या पोलिस पदकांसाठी या दोन्ही अधिकाऱ्यांची निवड झाली; मात्र यंदा ही पदके घेण्यासाठी त्यांची जाणवलेली अनुपस्थिती उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारी होती.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यावर 26-11 च्या अतिरेकी हल्ल्याच्या आठवणींची छाया होती. अतिशय चोख सुरक्षा व्यवस्थेत सकाळी 11 वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी पोलिस पदक मिळविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. 2007-08 या वर्षात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदा 111 पोलिसांना राष्ट्रपती पदके देऊन गौरविण्यात आले. यात राजेंद्र शंकर काळे या दहिसर येथील पोलिस शिपायाला जीवाची पर्वा न करता कुप्रसिद्ध गुन्हेगाराला पकडल्याचे धाडस दाखविल्याबद्दल; तर 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरात सामान्य नागरिकांना वाचवीत असताना प्राण गमवावा लागलेल्या पोलिस शिपाई प्रदीप निंबाळकर यांना देण्यात आलेल्या शौर्य पदकाचाही समावेश होता.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी पदकांसाठी त्यांच्या नावाची घोषणा होताच संचलन करीत राज्यपालांसमोर येत होते. त्यांना सॅल्युट करून पदक लावण्याकरिता आपली छाती पुढे करीत होते. हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नातेवाईक धडपडत होते. हुतात्मा झालेल्या अथवा अकाली निधन झालेल्या पोलिस अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पदक स्वीकारण्यासाठी राज्यपालांपर्यंत नेताना पोलिस त्यांची सोबत करीत होते. कार्यक्रम संपल्यानंतर महासंचालक कार्यालयाबाहेर असलेल्या प्रशस्त लॉनमध्ये अधिकारी व कर्मचारी आपल्या वरिष्ठांसोबत मंत्री महोदयांसोबत छायाचित्र काढताना दिसत होते; मात्र या सोहळ्यात 26-11 च्या हुतात्म्यांच्याच आठवणी उपस्थितांच्या तोंडून सर्वाधिक निघताना दिसत होत्या.

(sakal, 25 jan)

करकरे, कामटेंसह 111 जणांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक

राज्यपालांच्या हस्ते गौरव : ढेरे, माथुर, मारिया, दातेंचाही समावेश

महाराष्ट्र पोलिस दलातील 111 अधिकारी, कर्मचाऱ्यांना 2007-08 सालातील कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस पदक बहाल करून गौरविण्यात आले आहे. यात दहशतवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख शहीद हेमंत करकरे (उल्लेखनीय सेवा), अतिरिक्त पोलिस आयुक्त शहीद अशोक कामटे (गुणवत्तापूर्ण सेवा) यांसह ठाण्याचे पोलिस आयुक्त अनिल ढेरे, एअर इंडियाचे सुरक्षा संचालक सतीश माथुर, मुंबईतील गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त सदानंद दाते आदींचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील राजेंद्र शंकर काळे आणि दिवंगत प्रदीप राजाराम निंबाळकर (मरणोत्तर) या पोलिस शिपायांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक देण्यात आले.

राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पोलिस महासंचालक कार्यालयात झालेल्या या पदक वितरण सोहळ्याला राज्यभरातील निवडक पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राज्यात बहाल झालेल्या या 111 पदकांत दोन शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेबद्दलची आठ पदके तसेच गुणवत्तापूर्वक सेवेबद्दलच्या 101 पदकांचा समावेश आहे.

काळे, निंबाळकरांना शौर्य पदक
मुंबई पोलिस दलातील राजेंद्र शंकर काळे आणि दिवंगत प्रदीप राजाराम निंबाळकर (मरणोत्तर) या पोलिस शिपायांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक देण्यात आले. दहिसर पोलिस ठाण्यात नेमणुकीवर असलेल्या राजेंद्र काळे यांनी 3 सप्टेंबर 2006 रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान धावतच दिवाकर ऊर्फ रॉकी भैरवनाथ यादव या सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून त्याला अटक केली होती. प्रदीप निंबाळकर यांना 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीत कुर्ला-नेहरूनगर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांचे प्राण वाचविताना मृत्यूला सामोरे जावे लागले.

उल्लेखनीय सेवेसाठी देण्यात आलेल्या राष्ट्रपती पदकांत वाहतूक शाखा ठाणे येथील पोलिस उपायुक्त सुधीर दाभाडे, पुण्याचे सहायक पोलिस आयुक्त विनोद सातव, ठाणे येथील राखीव पोलिस बलाचे निरीक्षक पितांबर पाडवी, दिवंगत पोलिस अधिकारी रफीउद्दीन मोहिनुद्दीन सय्यद यांचा समावेश आहे.

गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राज्य मानवी हक्क आयोगाचे महानिरीक्षक डी. कनकरत्नम, ठाण्याचे अप्पर पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त शहीद अशोक कामटे, अतिरिक्त पोलिस आयुक्त सदानंद दाते, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपमहानिनिरीक्षक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, पुण्याच्या अप्पर पोलिस आयुक्त शोभा ओहटकर, नागपूर येथील पोलिस प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य सुनील पारसकर, नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब शेखर, गावदेवी येथील सहायक पोलिस आयुक्त सदाशिव पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक अनिलकुमार जगताप, सेवानिवृत्त सहायक समादेशक दिनकर हिरेमणी यांच्यासह 101 जणांना राष्ट्रपती पदके देण्यात आली.

गुणवत्तापूर्वक सेवेबाबत पोलिस पदके देण्यात आलेल्या अन्य अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : पोलिस अधीक्षक पांडुरंग कोहीनकर (लाचलुचपत प्रतिबंधक खाते), पोलिस निरीक्षक दिनेश अहिर, मिलिंद खेतले (गुन्हे शाखा, मुंबई), शशिकांत सुर्वे, भीमदेव राठोड (दहशतवादविरोधी पथक, मुंबई), अशोक जगताप (ठाणे), सहायक पोलिस निरीक्षक राजन चव्हाण (मुंबई), पोलिस उपनिरीक्षक भगवान सूर्यवंशी (सेवानिवृत्त), बाळासाहेब गाडेकर (मुंबई), पोलिस निरीक्षक दशरथ खुले (राज्य राखीव पोलिस बल गट- 8, मुंबई), सहायक पोलिस उपनिरीक्षक मधुकर जाधव (मुंबई), भागवत इंगळे (राज्य राखीव पोलिस गट क्रमांक- 11, नवी मुंबई), पोलिस हवालदार ज्ञानेश्‍वर थोरात (मुंबई), संभाजी जाधव (ठाणे), सूर्यकांत तटकरे (मुंबई), अण्णा गोरे (रेल्वे, मुंबई), प्रदीप जाधव, आनंदराव पाटील, शिवाजी कदम (ठाणे), विलास गणेशकर (मुंबई), पोलिस नाईक अभय दुदवडकर (मुंबई), अथरखान तडवी (ठाणे) आणि पोलिस हवालदार सुनील सावंत (गुन्हे शाखा, नवी मुंबई).

(sakal, 25jan)

बॅंकेतून पळणाऱ्या दोघा परदेशी नागरिकांना अटक

गिरगावची घटना ः संमोहन शास्त्राद्वारे पैसे लुटण्याचा प्रयत्न

पन्नास रुपये सुट्टे करून घेण्याच्या बहाण्याने बॅंकेच्या कॅशियरच्या काऊंटरजवळ जाऊन त्याच्यावर संमोहन शास्त्राने मोहिनी घालून दहा हजार रुपये हिसकावून घेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पळणाऱ्या दोघा परदेशी नागरिकांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे. या चोरट्यांना मलबार हिल परिसरात एका वाहतूक पोलिसाने अडविण्याचा प्रयत्न करताच त्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही या दोघांनी केला. या घटनेत हा पोलिस जखमी झाला आहे.
गिरगाव चौपाटीजवळ श्रीपत भवन येथे असलेल्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड बॅंकेत गुरुवारी दुपारी सव्वाच्या सुमारास हा प्रकार घडला. कुरम महमद खूर लालखान (38) आणि पालेरखान वली अब्बास वली (21) हे दोघे परदेशी नागरिक दुपारी बॅंकेत शिरले. पन्नास रुपयाचे सुट्टे घेण्याच्या बहाण्याने कॅनेडाचा रहिवासी असलेल्या पालेरखान बॅंकेच्या कॅशियरकडे गेला. या वेळी त्याने हातचलाखीने कॅशियरकडील दहा हजार रुपये हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार बॅंकेतील इतर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच पालेर खान आणि कुरम खान यांनी तेथून पळ काढला. बाहेर उभ्या असलेल्या मारुती गाडीतून दोघेही पळून जाऊ लागले. या घटनेची माहिती बॅंक व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. डी. बी. मार्ग पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. पोलिस नियंत्रण कक्षातून जवळील पोलिस ठाण्यांनाही याची माहिती देण्यात आली. त्यानुसार मलबार हिल पोलिसही या दोघा चोरट्यांच्या मागावर निघाले. ताडदेव येथे असलेला वाहतूक पोलिस शिपाई राजेश सावंत याने ही गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांनी सावंत यांच्या अंगावर गाडी चढविण्याचा प्रयत्न केला, त्यात ते जखमी झाले. पोलिस शिपाई सावंत यांच्या हातून निसटलेल्या चोरट्यांना मलबार हिल पोलिस ठाण्याच्या पथकाने पाठलाग करून पकडल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. आर. माळी यांनी दिली. या चोरट्यांनी बॅंकेच्या कॅशियरवर संमोहन शास्त्राने मोहिनी घालून त्याच्याकडून पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचेही माळी यांनी या वेळी सांगितले.

(sakal,23 jan)

Friday, January 23, 2009

"नवाकाळ'च्या कार्यालयावर हल्ला

काचांची तोडफोड ः राणेसमर्थकांवर संशय

दैनिक "नवाकाळ'च्या गिरगाव येथील कार्यालयावर अनोळखी तरुणांनी दगडफेक करून कार्यालयाच्या काचांची तोडफोड केल्याची घटना आज दुपारी घडली. हा हल्ला नवाकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या "शुभ बोल रे नाऱ्या' या अग्रलेखामुळे संतापलेल्या माजी महसूलमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांनी केल्याचा संशय आहे.
या हल्ल्यामागे असलेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत व्ही. पी. रोड पोलिस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. के. चिखले यांनी दिली. दरम्यान, हा हल्ला नारायण राणे यांच्या गुंडांनी केल्याचा आरोप नवाकाळचे संपादक निळकंठ खाडिलकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला.

गिरगावच्या शेणवीवाडी येथे दैनिक नवाकाळचे कार्यालय आहे. आज दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास या कार्यालयाखाली दहा ते बारा तरुणांचा घोळका जमा झाला. त्यातील एक जण कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या जाहिरात विभागात गेला. यावेळी तेथे असलेल्या कर्मचाऱ्यांना "राणेसाहेबांविरुद्ध अग्रलेख लिहिता काय? अशा शब्दात धमकावत तेथील काचा फोडून तो पळून गेला. त्यानंतर खाली असलेल्या काही तरुणांनी सोबत आणलेले पेव्हर ब्लॉक आणि दगड या कार्यालयावर भिरकावले. त्यामुळे कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नवाकाळच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती तातडीने व्ही. पी. रोड पोलिसांना कळविली. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पोचेपर्यंत कार्यालयावर दगडफेक करणारे तरुण पळून गेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी नवाकाळच्या कार्यालयावर चोख बंदोबस्त ठेवला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नवाकाळच्या कार्यालयाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. हा हल्ला राणेसमर्थकांनी केल्याचा संशय असला, तरी या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू असल्याने कोणालाच अटक केली नसल्याचेही वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिखले यांनी सांगितले.
---------------

फसवणूकप्रकरणी भरत शहाला अटक

सिल्व्हासा न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटवरून मलबार हिल पोलिसांनी प्रसिद्ध हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माता भरत शहा याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली आज दुपारी अटक केली. अटकेनंतर शहा याला गिरगाव न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मलबार हिल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय एच. शेख यांनी दिली.
सिल्व्हासा येथे एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी तेथील न्यायालयाने भरत शहाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मलबार हिल पोलिसांना हे वॉरंट आज मिळाले. त्यानुसार पोलिसांनी आज शहा याला अटक केली. अटकेनंतर शहा याला गिरगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे प्रकरण सिल्व्हासा येथील असल्याने या प्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला

(sakal,22jan)

घरगडीच घरफोड्यांचा म्होरक्‍या

ऍन्टॉप हिल : खरेदीदारासह सात जणांची टोळी गजाआड

तुम्ही काम करीत असलेल्या घराचा मालक काय करतो, त्याच्या घरातील कपाटात किती रक्कम असते, दागिने किती असतात हे सगळे पाहून ठेवा. संधी मिळताच ती चोरी करून माझ्याजवळ आणून द्या. त्याच्या विक्रीतून येणारे पैसे आपण सगळे वाटून घेत जाऊ, असे सांगत मलबार हिल येथील इमारतींत घरकाम करणाऱ्या पाच नोकरांना झटपट श्रीमंतीचा मार्ग दाखविणाऱ्या घरगड्याला चोरी केलेल्या मालाच्या खरेदीदारासह अटक करण्यात आली आहे. सात जणांच्या या टोळीने आजवर मलबार हिल परिसरात अनेक चोऱ्या केल्याचे उघडकीस येत आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत साडेतीन लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
येथील एव्हरेस्ट इमारतीत राहणारे पुपू गोदवानी (वय 56) या चामड्याच्या व्यापाऱ्याच्या घरात झालेल्या चोरीनंतर घरगड्यांच्या या टोळीचा सुगावा पोलिसांना लागला. गोदवानी यांच्या घरात बबलू चौधरी (27), रोहितकुमार केवट (21) व सुभाष चौहान (20) हे तिघे घरगड्याचे काम करीत होते. त्यापैकी बबलूने मालकाच्या तिजोरीतून चार लाख 60 हजार रुपयांचे हिरेजडित दागिने 6 जानेवारीला चोरले. या प्रकरणी गोदवानी यांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. चोरी झाल्यानंतर बबलू त्याच्या गावी पाटणा येथे पळून गेला होता. पोलिसांनी संशयावरून त्याच्या साथीदार घरगड्यांकडे चौकशी केली असता, त्यांना बबलूच्या गावचा पत्ता मिळाला. पोलिसांनी बबलूला पाटणा येथे जाऊन अटक केली. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरून या चोरीत घरातील अन्य दोन नोकर रोहितकुमार व सुभाष हेदेखील सामील असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशीअंती त्यांनी ही चोरी शेजारच्याच एका इमारतीत घरगडी असलेल्या काशिनाथ जाधव (40) याच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले.
काशिनाथ या परिसरातील आणखी दोन घरगड्यांना सोबत घेऊन त्यांना चोरीचे धडे द्यायचा. सुटीच्या दिवशी तर हॅंगिंग गार्डनमध्ये बैठका घेऊन या घरगड्यांना तो चोरी करण्याबाबत माहिती द्यायचा. चोरी केलेला माल चिराबाजार येथे असलेल्या शशी वैद्य (27) या व्यापाऱ्याला तो विकायचा. चोरीच्या मालाच्या विक्रीतून आलेले लाखो रुपये अनेकदा तो चोरी केलेला ऐवज खोटा असल्याचे सांगून स्वतः हडप करीत होता. तो देईल तेवढे पैसे न घेतल्यास पोलिसांना कळविण्याची धमकीही ते देत होता हेदेखील चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंदनकुमार मंडल (20) व नवीनकुमार राय (24) या आणखी दोन घरगड्यांना अटक केली आहे. आरोपींना आज न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.

(sakal,21 jan)

Tuesday, January 20, 2009

हिंदूराष्ट्राच्या निर्मितीसाठीच मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट

के. पी. रघुवंशी ः आरोपींचा नेपाळमधील माओवाद्यांशी संपर्क


भारतीय संविधानाप्रमाणे चालायचे नाही. "अभिनव भारत'च्या छत्राखाली एकत्र येऊन स्वतंत्र हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची, त्यासाठी वेळ पडल्यास इस्राईलचीही मदत घ्यायची, असे मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आरोपींचे मनसुबे होते, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणातील आरोपींचा इस्राईलशी कोणताही थेट संबंध उघडकीस आला नसला, तरी काही आरोपी नेपाळमधील माओवाद्यांच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहितीही तपासात उघडकीस आल्याचे रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.
मालेगाव येथील भिक्‍खू चौकात गेल्यावर्षी 29 सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने आज 11 आरोपींविरुद्ध मोक्‍का न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रघुवंशी यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या दहशतवाद्यांच्या मनसुब्यांवर प्रकाशझोत टाकला. भारतात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांत "सिमी'सारख्या मुस्लिम संघटनांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने "अभिनव भारत'ची स्थापना केली. याच संघटनेच्या नावाखाली एकत्र आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कथित धर्मगुरू दयानंद पांडे आणि त्यांच्या साथीदारांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचला. जास्तीत जास्त मुस्लिमांचे बळी जावेत यासाठी रमझानच्या महिन्यात मालेगावमधील मशिदीचा परिसर आरोपींनी निवडला. याशिवाय 2006 मध्ये मालेगावमध्येच झालेल्या स्फोटात "सिमी' संघटनेचा सहभाग स्पष्ट झाल्यामुळे 29 सप्टेंबरच्या स्फोटाबाबत तपासयंत्रणांना संशय येणार नाही, असेही आरोपींना वाटले. यानंतरच त्यांनी हा कट आखल्याचे रघुवंशी म्हणाले.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींनी अभिनव भारत संघटनेच्या नावाने काही देणगीदारांकडून पैसे गोळा केले. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने काही देणगीदारांची चौकशी केली असून, त्यांना या संघटनेच्या उद्देशांबाबत माहिती नव्हती, असेही उघडकीस आले आहे. या प्रकरणात रामजी कलासांगरा, संदीप डांगे आणि प्रवीण मुतालिक हे तिघे आरोपी फरारी असून, त्यांचा शोध सुरू असल्याचेही रघुवंशी यांनी सांगितले.

(sakal,21 jan)

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आज आरोपपत्र

हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग उघडकीस आल्याने वादग्रस्त ठरलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट मालिकेचे आरोपपत्र उद्या (ता. 20) दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलिस महासंचालक कार्यालयात आजपासून दोन दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरवात झाली. या वेळी पत्रकारांशी बोलताना गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास अंतिम टप्प्यात असून त्याचे आरोपपत्र मंगळवारी मोक्का न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री पाटील म्हणाले. मालेगाव स्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, कथित हिंदुत्ववादी धर्मगुरू दयानंद पांडे याच्यासह अकरा जणांना अटक केली. सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या अतिरेकी हल्ल्यातील मृत्यूनंतर या पथकाची धुरा खांद्यावर घेणारे रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास पूर्णत्वास नेला. या प्रकरणाचे आरोपपत्र विशेष मोक्का न्यायालयासमोर दाखल होणार आहे.
मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे. त्याला ऑर्थर रोड तुरुंगात अंडा सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्याच्यावर ऑर्थर रोड तुरुंगात विशेष न्यायालय स्थापन करून खटला चालविण्याबाबत उच्च न्यायालयात विनंती करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
या वेळी झालेल्या बैठकीत राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधताना गृहमंत्री पाटील यांनी पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्याच्या नक्षलवादी भागात हेलिकॉप्टर देण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील डान्सबार आणि मटका व्यवसाय पुन्हा सुरू होणार नाही, याकडे पोलिसांनी कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

--------------------
चौकट
जिल्हा अधीक्षक कार्यालये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जोडणार ः मुख्यमंत्री
राज्यातील सर्व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालये व्हिडीओ कॉन्फरसिंगने जोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दिली. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर स्थापण्यात आलेल्या "फोर्स वन' पथकाचे काम येत्या 60 दिवसांत सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

(sakal,20 jan)

करकरे, ओंबळे यांना "अशोकचक्र'

केंद्राचा निर्णय ः मेजर उन्नीकृष्णन, गजेंद्र सिंग यांचाही समावेश

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांना "अशोकचक्र' हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारचे शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्र सिंग यांच्याही शौर्याला "अशोकचक्र' देऊन गौरविण्यात येणार असल्याचे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले.
लष्कर ए तय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस दलातील सोळा अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय सुरक्षा दलाचे दोन जवान अशा अठरा जणांना अशोकचक्र हा सन्मान मिळण्यासाठी त्यांची नावे केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली होती. महाराष्ट्रातून आलेल्या या अठरा नावांपैकी दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे, राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चे जवान मेजर संदीप उन्नीकृष्णन व हवालदार गजेंद्र सिंग या चार जणांना अशोकचक्र देण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.
या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी अतिरेक्‍यांच्या मागावर असलेल्या सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, पोलिस निरीक्षक विजय साळसकर हे तिघे अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी असे सहा जण रंग भवनजवळ अतिरेक्‍यांच्या गोळीबारात धारातीर्थी पडले. गिरगाव चौपाटीजवळ स्कोडा गाडीतून आलेले अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब आणि इस्माईल खान या दोघांशी निःशस्त्रपणे मुकाबला करीत असताना सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे शहीद झाले. पोटात गोळ्या झाडल्या जात असतानाही ओंबळेंनी अतिरेकी कसाबला पकडून ठेवले. ओंबळे यांच्यामुळेच कसाबला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. कसाबने दिलेल्या माहितीवरूनच या संपूर्ण कटाचा तपास लागला. त्यामुळे भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणता आला. हॉटेल ताजमध्ये जवान संदीप उन्नीकृष्णन आणि नरिमन हाऊस येथे हवालदार गजेंद्र सिंग या राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण आले. या दोन्ही जवानांच्या अनन्यसाधारण बलिदानाला सलाम करीत त्यांनाही अशोकचक्राने सन्मानित करण्यात येणार असले, तरी या हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येकाचेच योगदान देशाच्या रक्षणासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सूत्रांनी या वेळी सांगितले.

(sakal,20 jan )

Monday, January 19, 2009

मुंबईवरील हल्ल्यामागील सत्य पाकने जगापुढे मांडावे

मनमोहन सिंग ः तैयबावर विनाविलंब कारवाई आवश्‍यक

पाकिस्तानने मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पारदर्शक तपास करून सत्य जगासमोर तातडीने मांडावे, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज येथे केले. पाकिस्तानने सुरू केलेल्या तपासाचा निष्कर्ष काही दिवसांतच जनतेसमोर मांडण्याचे पाकिस्तान सरकारने जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुंबईवर आणि काबूल येथे भारतीय दूतावासावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत याची खात्री द्यावी. पाकिस्तानने स्वतःच्या हितासाठी पाकिस्तानात सुरू असलेले अतिरेक्‍यांचे प्रशिक्षण तळ तातडीने बंद करून लष्कर ए तैय्यबासारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध विनाविलंब कारवाई करावी, अशी अपेक्षाही सिंग यांनी व्यक्त केली.

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग हॉटेल ट्रायडण्ट- ओबेरॉय येथे झालेल्या एका खासगी कार्यक्रमात बोलत होते. मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला अतिशय वेदनादायक आणि भयंकर होता. पाकिस्तानला या हल्ल्यासंबंधी आवश्‍यक ते सगळे पुरावे दिल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब पाकिस्तानी असल्याचे याआधीच पाकिस्तानने कबूल केले आहे. आता त्यांनी हे अघोरी कृत्य करणारे, त्याचा कट रचणारे आणि त्याला मदत करणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी. या प्रश्‍नावर आंतरराष्ट्रीय समुदायाची मदत घेत असताना पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी प्रशिक्षण तळ पूर्णतः बंद झाले आहेत का याचीही खातरजमा करावी. पाकिस्तान दिलेल्या शब्दाला जागणार असेल, तर अतिरेकी संघटनांवर कारवाई करावी असे पंतप्रधान या वेळी म्हणाले.

दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी भारत प्रयत्नशील असून त्यासाठी गुप्तचर खाते तसेच सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्यात येत आहेत. सागरी सुरक्षेसंबंधी अधिक काळजी घेण्यात येत आहे. दहशतवादी कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच त्यांच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) सारख्या यंत्रणा तयार करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

सत्यम कॉम्प्युटर्समध्ये झालेला गैरव्यवहार भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रावरील मोठा डाग असल्याचे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. बड्या कंपन्यांनी त्यांचे व्यवहार अधिक सक्षमपणे चालतील याकडे लक्ष द्यावे. जागतिक मंदीबरोबरच भारत सध्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. आगामी दोन वर्षांत या परिस्थितीत बदल होण्याची शक्‍यता नाही. केंद्र सरकारच्या वतीने यावर मात करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही सिंग या वेळी म्हणाले.

----------

पंतप्रधानांना ट्रॅफिक जॅमची झळ..!

मुंबईच्या रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफिक जॅमचा फटका सामान्य नागरिकांसह व्हीआयपींना न बसला तरच नवल; मात्र देशाच्या पंतप्रधानांना याचा फटका बसला तर? हो. हा प्रकार घडलाय आपल्या मुंबापुरी हाजीअली येथे.
हॉटेल ट्रायडण्ट-ओबेरॉय येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग आज मुंबईच्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेच.
अतिरेकी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आलेले पंतप्रधान मनमोहन सिंग सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विशेष विमानाने मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. विशेष म्हणजे शहरातील रस्तेवाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी ते आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर खास हेलिकॉप्टरमध्ये बसून कुलाबा येथे असलेल्या नौदलाच्या आयएनएस कुंजली या तळावर उतरण्याचे तसेच तेथून विशेष गाड्यांच्या ताफ्यातून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचण्याचे त्यांचे नियोजन होते.
कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा विमानतळाकडे जाताना मात्र पंतप्रधान रस्ते मार्गानेच आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह निघाले. सायंकाळी 5.50 वाजता गाड्यांचा हा ताफा हाजीअली येथे येताच त्यांचा वेग पूर्णतः मंदावला. हा वेग या परिसरात असलेल्या ट्रॅफिक जॅममुळे मंदावल्याचे पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जात असताना त्या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्याचा शिरस्ता आहे; मात्र हा शिरस्ता आज पंतप्रधानांना ट्रॅफिक जॅमचा अनुभव आल्याने मोडला गेल्याचे बोलले जाते.

(sakal, 17 jan)

Friday, January 16, 2009

पंतप्रधान मनमोहन सिंग मुंबई दौऱ्यावर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग उद्या (ता.17) पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येत असून अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ट्रायडन्ट- ओबेरॉय ला ते भेट देणार आहेत.याशिवाय ऐतिहासिक हॉटेल ताज, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि नरिमन हाउस या अतिरेकी हल्ला झालेल्या ठिकाणांना देखील ते भेट देण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
पंतप्रधान सिंग एका पारितोषिक वितरण कार्यक्रमानिमित्त मुंबईत येत आहेत. पारितोषिक वितरणाचा हा कार्यक्रम यापूर्वी हॉटेल ट्रायडन्टमध्येच 28 नोव्हेंबरला होणार होता. मात्र मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. उद्या पंतप्रधान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर हेलिकॉप्टरने दक्षिण मुंबईत असलेल्या नौदलाच्या आयएनएस कुंजली या तळावर उतरतील.त्यानंतर त्यांचा दौरा सुरू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा

अतिरेकी हल्ला ः चौकशीसाठी न्यायालयात अर्ज करणार


मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांना कुलाब्याच्या बधवार पार्क येथे उतरताना पाहणारी महिला अनिता उद्दैया हिच्याविरुद्ध पोलिसांची दिशाभूल केल्याच्या आरोपाखाली कफ परेड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अधिक चौकशीसाठी या महिलेला ताब्यात घेण्याकरिता न्यायालयात लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
26 नोव्हेंबरला सागरी मार्गाने मुंबईत आलेल्या दहापैकी सहा अतिरेक्‍यांना पाहिल्याचा दावा करणारी अनिता उद्दैया (49) रविवारी सकाळी अचानक बेपत्ता झाली. अतिरेकी हल्ल्यातील महत्त्वाची साक्षीदार असे तिचे चित्र प्रसिद्धिमाध्यमांत रंगविण्यात आले. 14 जानेवारीला पुन्हा घरी परतलेल्या अनिताने नंतर पोलिसांना ती सातारा येथे गेल्याचे सांगितले होते; मात्र यानंतर तिने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना आपल्याला काही तपासयंत्रणांच्या प्रतिनिधींनी अमेरिकेला नेल्याचा दावा केला. या संपूर्ण घटनाक्रमात अनिताने पोलिसांना खोटी माहिती दिल्याने पोलिसांत संभ्रम निर्माण झाला. ती आपल्या गुन्ह्यात साक्षीदारच नसल्याचा दावा मारिया यांनी केला. बधवार पार्क येथे राहणाऱ्या कित्येक नागरिकांनी अतिरेक्‍यांना उतरताना पाहिले आहे. अनिता उद्दैयाला आपण ओळख परेडलादेखील बोलावले नाही. अनिताच्या अमेरिकावारीचा दावा खोटा ठरवत तिच्याकडे पासपोर्ट नाही. खासगी विमानाने गेल्याचे ती सांगत असली, तरी विमानतळावर इमिग्रेशन विभागाचे अधिकारी तिला पासपोर्ट व व्हिसाशिवाय कसे काय पाठवू शकतील, असेही ते या वेळी म्हणाले. या सगळ्या प्रकरणात तिची चौकशी करण्यासाठी कलम 182 नुसार तिच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यानंतर न्यायालयाच्या परवानगीने तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले.
मुंबई हल्ल्याचे आरोपपत्र या महिन्याच्या अखेरपर्यंत दाखल करण्यात येणार असून त्यासाठी विधीतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावरील खटला ऑर्थर रोड येथे विशेष न्यायालय स्थापन करून चालवावा, अशी विनंती करणारे पत्र पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्‍यांविरुद्धही लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले.

(sakal,16jan)

अमेरिकेला गेल्याचा अनिता उद्दैयाचा दावा

मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहापैकी सहा अतिरेक्‍यांना पाहणारी साक्षीदार महिला अनिता उद्दैया हिने आता आपण अमेरिकेला गेलो होतो, असा दावा प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे. यापूर्वी तिने आपण साताऱ्याला गेल्याचे कफ परेड पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले होते. या प्रकरणावर आपल्याला काहीच बोलायचे नसल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सागरी मार्गाने कुलाब्याच्या बधवार पार्क येथे उतरलेल्या सहा अतिरेक्‍यांना अनिता उद्दैय्या हिने सर्वांत प्रथम पाहिले होते. हल्ल्यानंतर ती या प्रकरणातील महत्त्वाची साक्षीदार ठरली होती. यानंतर 11 जानेवारी रोजी सकाळी ती अचानक बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिची मुलगी सीमा हिने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. अनिताचा शोध सुरू असतानाच काल सकाळी ती आपल्या घरी परतली. या वेळी तिने पोलिसांना आपण सातारा येथे गेल्याचे सांगितले होते. मात्र आज तिने आपल्याला काही जणांनी अमेरिकेला नेले होते, असा दावा केला. त्या दिवशी जे काही पाहिले तेच तेथील अधिकाऱ्यांना सांगितल्याचे अनिताने काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले. आपल्याला अंधेरीच्या दिशेने नेण्यात आल्यानंतर विमानात बसविण्यात आले. दहा तासांनंतर आपण अमेरिकेत पोचल्याचे तिचे म्हणणे आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर अनिता नक्की कुठे गेली होती, याबाबत पोलिसांत अद्याप संभ्रम आहे. तिने कफ परेड पोलिसांना दिलेल्या जबाबात सातारा येथे नातेवाइकांकडे गेल्याचे म्हटल्याची माहिती मारिया यांनी दिली. याबाबत आपल्याला आणखी काही बोलायचे नसल्याचेही ते म्हणाले.


(sakal,15jan)
-----------------------

बेपत्ता महिला साक्षीदार परतली

मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांना ओळखणारी महिला साक्षीदार अनिता उदैया (वय 47) आज सकाळी तिच्या घरी परतली. रविवारी सकाळपासून ती बेपत्ता झाली होती. तिच्या घरी परतण्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.
बधवार पार्क येथे उतरलेल्या अतिरेक्‍यांना पहिल्यांदा पाहणारी अनिता अचानक बेपत्ता झाली होती. यामुळे अनेक तर्क लढविले जात होते. याप्रकरणी तिची मुलगी सीमा हिने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली; मात्र ती पोलिसांना सापडली नव्हती. प्रसिद्धिमाध्यमांत ती बेपत्ता असल्याचे वृत्त पसरताच आज सकाळी ती तिच्या घरी परतली. कोणालाही न सांगता ती रहमतपुरा येथे आपल्या नातेवाइकांकडे गेली होती, असे सांगण्यात येते.

(sakal,14 jan)

-------------------


अतिरेक्‍यांना ओळखणारी साक्षीदार महिला बेपत्ता

मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी कुलाबा येथील बधवार पार्कवर उतरलेल्या अतिरेक्‍यांना ओळखणारी साक्षीदार महिला बेपत्ता झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी या महिलेच्या मुलीने कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील दहापैकी सहा अतिरेक्‍यांना ओळखणारी अनिता राजेंद्र उदैया (वय 47) ही महिला रविवार सकाळी बेपत्ता झाली. या प्रकरणी तिची मुलगी सीमा हिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हल्ल्यानंतर पोलिस आणि एनएसजी कमांडोंच्या कारवाईत मरण पावलेल्या सहा अतिरेक्‍यांना तिने ओळखले होते. रविवारी सकाळी अचानक ही महिला बेपत्ता झाली. हल्ल्यातील महत्त्वाच्या साक्षीदार असलेल्या या महिलेचा शोध घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


(sakal,13 jan)

पोलिसांची "बोलेरो' मरोळमध्ये सापडली

राज्याचे अतिरिक्त पोलिस संचालक अहमद जावेद यांच्या ताफ्यातील चोरट्यांनी चोरलेली बोलेरो गाडी आज सकाळी मरोळ परिसरात बेवारस अवस्थेत सापडली. एमआयडीसी पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली आहे.
चर्चगेट येथील दिनशॉ वाच्छा मार्गावर असलेल्या यशोधन इमारतीसमोरून ही गाडी अनोळखी चोरट्यांनी चोरून नेली होती. मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या यशोधन इमारतीखालून पोलिसांचीच गाडी चोरीला गेल्याच्या घटनेने पोलिसांना चांगलाच धक्का बसला होता. या प्रकरणी वाहनचालक सचिन आडकेने मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी करून या गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. वायरलेसवरून सर्व पोलिस ठाण्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना अंधेरी एमआयडीसी येथील मरोळ पूर्वेला असलेल्या सातबाग परिसरात ही गाडी बेवारस अवस्थेत सापडली. पोलिसांनी तातडीने ही गाडी ताब्यात घेतली. पोलिस कारचोरांचा शोध घेत आहेत.


(sakal,15 jan)

पोलिस दल आधुनिकीकरणासाठी 90 कोटींचा निधी मंजूर

मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत 89 कोटी 59 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.
उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली. या समितीने सुचविलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने सागरी गस्तीकरिता 12 वेगवान बोटी खरेदी करण्यात येणार आहेत. प्रत्येक बोटीकरिता चार कोटी याप्रमाणे 48 कोटी रुपये आणि त्यांच्या साधनसामग्रीसाठी एक कोटी 49 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. फक्त मुंबई पोलिस दलाकरिता साधनसामग्री व सुरक्षाविषयक उपकरणांची खरेदी करण्याकरिता 36 कोटी 63 लाख 30 हजार रुपयांच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली. यात 12 डिजिटल व्हिडीओ कॅमेरे, 24 सर्चलाइट, 12 जीपीएस सिस्टीम, 19 सॅटेलाइट फोन, 12 सिग्नल पिस्तूल, 120 लाइफ जॅकेट्‌स, 60 रिंगगार्ड, 100 हेल्मेट्‌स विथ टॉर्च, 80 डंगरी आणि वाहने यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे.


(sakal,14 jan)

हुतात्मा पोलिसांचे शौर्य सदैव स्मरणात राहील!

जयंत पाटील ः वारसांना सारस्वत बॅंकेत नोकरी


मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्‍यांच्या "एके-47'चा सामना करून स्वतःच्या प्राणाचे बलिदान करीत मोहम्मद अजमल कसाबला पकडणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचे शौर्य देश सदैव स्मरणात ठेवेल. ओंबळेंमुळेच अतिरेकी कसाब जिवंत हाती लागला आणि देशाला या कटाबाबत पाकिस्तानकडे बोट दाखविता आले. मुंबई हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढताना हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या शौर्याची तुलना कशाशीच करता येणार नाही, अशा शब्दांत गृहमंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य पोलिस मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात पाटील बोलत होते.
26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात स्वतःचा जीव गमावून देशवासीयांना सुरक्षित ठेवणाऱ्या पाच पोलिसांच्या वारसांना सारस्वत बॅंकेने नोकरीत सामावून घेतले. हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला देण्यात आलेल्या नोकरीच्या नियुक्तीपत्रांचे वाटप जयंत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या वेळी सारस्वत बॅंकेचे अध्यक्ष माजी खासदार उल्हास ठाकूर यांच्यासह पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी आपल्या मनोगतात बोलताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांनी अपूर्ण साधनांसोबत अतिरेक्‍यांशी लढा दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. प्रत्येक हुतात्म्याचे धाडस, शौर्य अनन्यसाधारण आहे. पोलिस शिपाई अंबादास पवार यांनी तर ड्युटीवर नसतानाही केवळ देशावर अतिरेकी हल्ला झाल्याचे समजताच छत्रपती शिवाजी रेल्वेस्थानकात रेल्वे पोलिसांची रायफल घेऊन अतिरेक्‍यांशी मुकाबला केल्याची आठवणही त्यांनी यानिमित्त सांगितली. सारस्वत बॅंकेने हुतात्म्यांच्या वारसांना नोकरी देऊन दिलेल्या स्थैर्याबद्दल पाटील यांनी बॅंकेचे आभार मानले.
हुतात्मा सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची विवाहित मुलगी पवित्रा चिकणे, बाळासाहेब भोसले यांचा मुलगा सचिन, पोलिस शिपाई अरुण चित्ते यांची पत्नी मनीषा व पोलिस शिपाई अंबादास पवार यांची पत्नी कल्पना या चौघांना कार्यालयीन सहायक म्हणून; तर रेल्वे पोलिस शिपाई मुरलीधर चौधरी यांची मुलगी प्रियांका हिला लिपीक म्हणून नोकरीत सामावून घेण्यात आले.


चौकट
---------

आरोपांची चौकशी सुरू
मुंबई हल्ल्यातील हुतात्मा अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांची पत्नी विनिता यांनी पोलिस यंत्रणेवर केलेल्या आरोपांची चौकशी निवृत्त सनदी अधिकारी राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत सुरू आहे. दोन महिन्यांत हा अहवाल येणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. गुप्तचर खात्यात सुधारणा करण्यासाठी 85 अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांना गोळीबाराच्या सरावासाठी फायरिंग रेंज कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिसांना वर्षभर पुरेल एवढा शस्त्रसाठा देण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या फायरिंग रेंजवर पोलिसांचा सरावच सुरू नसल्याचे ते म्हणाले.


(sakal,14 jan)

Thursday, January 15, 2009

रागाच्या भरात चढविली पोलिसासह नागरिकांवर गाडी

एक पोलिस ठार ः कारचालकास अटक


दीड वर्षापूर्वी झालेल्या अपघातानंतर आलेल्या विम्याच्या रकमेची देवघेव करण्यावरून उद्‌भवलेल्या वादातून एका कारचालकाने रागाच्या भरात दोन पोलिस आणि चार नागरिकांच्या अंगावर गाडी चढविल्याचा प्रकार गोरेगाव येथे काल मध्यरात्री घडला. या घटनेत जितेंद्र पवार हा पोलिस शिपाई ठार झाला, तर पोलिसासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आज कारचालकाला अटक केली.
गोरेगाव पश्‍चिमेला असलेल्या उन्नतनगर रोड येथे काल मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला. या ठिकाणी राहणारा कमलेश मौर्या (वय 23) याचा दीड वर्षापूर्वी सांताक्रूझ येथे अपघात झाला होता. खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करणाऱ्या कमलेशच्या उपचाराचा खर्च त्याच्या मालकाने केला होता. काही दिवसांपूर्वी या अपघाताच्या विम्याचे एक लाख 20 हजार रुपये कमलेशकडे आले होते. या वेळी गाडीमालकाने त्याच्याकडून उपचारासाठी खर्च झालेल्या पैशांची मागणी केली. मात्र कमलेश ही रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होता. गाडीमालकाच्या वतीने कमलेशचा ओळखीचाच असलेला लालजी यादव (वय 32) त्याच्याकडून पैसे मागत होता. काल रात्री कमलेश दारू पिऊन आल्यानंतर जवळच वेणाताई सोसायटीत राहणाऱ्या लालजीच्या घरी गेला. या वेळी त्याने लालजीच्या घरावर लाथा मारून अंगावर गाडी चढविण्याची धमकी दिली. या वेळी घाबरलेल्या यादव याने गोरेगाव पोलिसांना या घटनेची माहिती देताच जितेंद्र पवार (28) आणि संजय सोनवणे (29) हे दोघे घटनास्थळी निघाले. मध्यरात्री झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील रहिवासी तेथे गोळा झाले. हे पाहून कमलेश तवेरा गाडी घेऊन तेथून निघून गेला. मात्र जितेंद्र पवार व संजय सोनवणे काही नागरिकांसह जवळच असलेल्या ओम्‌शांती सुपर मार्केटजवळ उभे राहिले. काही क्षणातच कमलेशने भरधाव तवेरा गाडी पवार यांच्यासह तेथे उभ्या असलेल्यांच्या अंगावर चढविली. या अपघातात दोघे पोलिस शिपाई; तसेच रणजित यादव, बिरबल यादव, संतोष यादव आणि सिकंदर यादव जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच असलेल्या ब्रह्मकुमारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र जितेंद्र पवार यांचा गाडीची जोरदार धडक बसल्याने मृत्यू झाला. जखमींपैकी तिघांना अधिक उपचारासाठी कूपर रुग्णालयात हलविण्यात आले असून, दोघांना उपचारानंतर सोडून देण्यात आल
े.
पोलिसांनी कमलेश मौर्या याला आज सकाळी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा; तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एल. पी. गोरे यांनी दिली.
-----------------

(sakal,14 jan)

राज्य सुरक्षा दलासाठी सोळा कोटींचा निधी

गस्तही वाढविणार ः साधनसामग्रीच्या खरेदीस मंजुरी


दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य सुरक्षा दलाकरिता अद्ययावत शस्त्रे, संदेशवहन यंत्रणा व साधनसामग्री खरेदी करण्यासाठी 16 कोटी सात लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. याशिवाय सागरी गस्तीकरिता तातडीची उपाययोजना म्हणून 18 ट्रॉलर्स घेण्यात येणार आहेत. अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थापन झालेल्या पथकाला आवश्‍यक साधनसामग्रीच्या खरेदीकरिता लागणाऱ्या निधीला राज्य सरकारने आज मंजुरी दिली.
मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर राज्य पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यास सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी)च्या धर्तीवर राज्य सुरक्षा दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार साधनसामग्रीच्या खरेदीकरिता लागणाऱ्या निधीला राज्य सरकारने आज मंजुरी दिली. या निधीतून 500 मॅगझिन्स, 250 ग्लॉक पिस्तूल, 125 साईटस्‌, 125 वॉकीटॉकी, 250 व्हाइस ड्युसर व 10 ऑपरेशन वाहने घेण्यात येणार आहेत.
राज्य गुप्त वार्ता विभागात सायबर मॉनिटरिंग सेल व सायबर कनेक्‍टिव्हिटी सेल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या सेलकरिता आवश्‍यक साधनसामग्रीच्या खरेदीसाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सायबर कनेक्‍टिव्हिटी व मॉनिटरिंगसाठी प्रत्येकी दीड कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. बॉम्बशोधक व विनाशक पथकांची उपयुक्तता लक्षात घेता, राज्यात 20 ठिकाणी नव्याने बॉम्बशोधक व विनाशक पथके स्थापन केली जाणार आहेत. या पथकासाठी 16 कोटी सात लाख रुपये खर्च करण्यात येतील. या पथकासाठी डीप सर्च मेटल डिटेक्‍टर, एक्‍स्प्लोझिव्ह डिटेक्‍टर, पोर्टेबल एक्‍स-रे, इन्डोस्कोप, बीडीडीएस व्हॅन आणि डॉग व्हॅन खरेदी करण्यात येणार आहेत.

गस्तीसाठी 18 ट्रॉलर्स
विस्तीर्ण सागरी किनारपट्टी लाभलेल्या महाराष्ट्राची सागरी गस्त अधिक सक्षम करण्यासाठी येत्या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत 18 ट्रॉलर्स खरेदी करण्यात येणार आहेत. या ट्रॉलर्ससाठी 99 लाख 66 हजार रुपयांचा खर्च सरकारने आज मंजूर केला.


(sakal,13 jan)

Tuesday, January 13, 2009

मुंबई हल्ल्याच्या खटल्यासाठी तहिलियानी यांची निवड

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यासाठी ज्येष्ठ न्यायाधीश एम. एल. तहिलियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी ही माहिती "सकाळ'ला दिली. 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात मोहम्मद अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी पोलिसांच्या हाती लागला आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केलेला फहीम अन्सारी व सबाउद्दीन अहमद यांचाही मुंबई हल्ल्यातील सहभाग स्पष्ट झाला आहे. या प्रकरणी 24 जानेवारीपर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर "लष्कर-ए-तैयबा'च्या या दहशतवाद्यांवर विशेष न्यायालयात खटला चालणार आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी राज्य सरकारने आज विशेष न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ न्यायमूर्ती एम. एल. तहिलियानी यांची निवड केल्याची माहिती पोलिस आयुक्त गफूर यांनी दिली. तहिलियानी सध्या मुंबई उच्च न्यायालयात रजिस्ट्रार (इन्स्पेक्‍शन) पदावर कार्यरत आहेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. यापूर्वी ते मुख्य महानगर दंडाधिकारी म्हणूनही कार्यरत होते.

( sakal,12 jan)

मुलगा होत नसल्याने तीन महिन्यांचे बाळ पळविले.

महिलेला अटक : समाजसेविकेची भामटेगिरी उघडकीस

सहा मुलींना जन्म दिल्यानंतरही घराचा कुलदीपक समजला जाणारा मुलगा होत नसल्याने समाजसेविका म्हणून रुग्णालयात मिरविणाऱ्या महिलेने बोरिवली रेल्वेस्थानकातून एका महिलेचे तीन महिन्यांचे आजारी बाळ पळविल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी बाळाचे अपहरण करणाऱ्या या महिलेला रात्री उशिरा अटक केली. यानंतर पोलिसांनी बाळाला त्याच्या मातेच्या ताब्यात दिले असून, त्याच्यावर परळच्या वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दहिसर येथे राहणाऱ्या निर्मला खरे (25) हिने तीन महिन्यांपूर्वी शताब्दी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. या बाळाचे नाव प्रेम ठेवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून प्रेमची प्रकृती ठीक नसल्याने 8 जानेवारीला सासू कमळाबाई (65) सोबत ती शताब्दी रुग्णालयात त्याच्या उपचारासाठी आली. रुग्णालयात बाळाच्या उपचाराकरिता आवश्‍यक उपकरणे उपलब्ध नसल्याने डॉक्‍टरांनी त्याला बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. भगवती रुग्णालयात प्रेमवर उपचार सुरू असताना रेशम जाना (27) नावाच्या कथित समाजसेविकेने चांगल्या उपचारासाठी त्याला विरारच्या संजीवनी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या वेळी निर्मलासोबत जाण्याची तयारीही तिने दर्शविली. स्वतःला समाजसेविका म्हणून मिरविणाऱ्या रेशमसोबत निर्मला व तिची सासू कमळाबाई बाळाला विरारच्या संजीवनी रुग्णालयात घेऊन गेले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्‍टरांनी 9 जानेवारीला बाळाला पुन्हा घेऊन येण्यास सांगितले. या वेळी रेशमने निर्मलाला तिचा मोबाईल क्रमांक दिला.
दुसऱ्या दिवशी बोरिवली रेल्वेस्थानकात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 वर रेशम उभी राहिली. निर्मला तिचे आजारी बाळ प्रेम, तीन वर्षांची मुलगी पूजा आणि सासू कमळाबाई यांच्यासोबत रेल्वेस्थानकात आली. लहान मुलीला तहान लागल्याने निर्मलाने प्रेमला सासूकडे सोपविले. यानंतर मुलीला घेऊन ती पाणी पिण्यासाठी गेली. थोड्याच वेळात विरारला जाणारी लोकल आल्याचे सांगून रेशमने कमळाबाईंच्या हातातील बाळ स्वतःकडे घेत त्यांना निर्मलाला शोधायला पाठविले. कमळाबाईदेखील सुनेला शोधायला रेल्वेस्थानकात फिरू लागल्या. याचा गैरफायदा घेत रेशमने निर्मलाच्या तीन महिन्यांच्या आजारी प्रेमला घेऊन पोबारा केला. पूजाला पाणी पाजल्यानंतर पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आधी उभ्या असलेल्या ठिकाणी निर्मला आणि सासू आल्या, तेव्हा रेशम तेथून निघून गेल्याचे आढळले. यानंतर त्यांनी बोरिवली रेल्वेस्थानकात रेशमविरुद्ध तक्रार दाखल केली. स्थानकावर असलेल्या क्‍लोजसर्किट कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांनी रेशमचे छायाचित्र मिळविले. बाळ आजारी असल्याने रेशम त्याला एखाद्या रुग्णालयात दाखल करेल याची शक्‍यता असल्याने पोलिस तिचा व प्रेमचा शोध रुग्णालयांत घेत होते. काल सायंकाळी परळच्या वाडिया बाल रुग्णालयात प्रेमला उपचारासाठी दाखल केलेल्या रेशमला निर्मलाने ओळखले. पोलिसांनी तेथेच तिला अटक केली. पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले बाळ ताब्यात घेऊन ते निर्मलाकडे सुखरूप पोहोचविले. सध्या प्रेमवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहा मुलींनंतरही मुलगा होत नसल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली रेशमने पोलिसांना दिली. तिला 14 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. आर. गायकवाड यांनी दिली.

बारबालांवर 65 लाख नव्हे; पावणेदोन कोटी उधळले..!

पोलिसांची माहिती ः गुन्हा दाखल झाल्यावर नावे उघड करणार

सांताक्रूझ येथील "स्टारनाईट' डान्स बारमध्ये 65 लाख रुपये उधळणाऱ्या दोघांपैकी एक जण प्रथितयश कंत्राटदाराचा भाऊ; तर दुसरा मुंबईतल्या एका ख्यातनाम शिक्षण संस्थेच्या चालकाचा जवळचा नातेवाईक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे, तर या दोघांनी डान्स बारमध्ये 65 लाख नव्हे, तब्बल एक कोटी 74 लाख रुपये उधळल्याचे पोलिस तपासातून उघड झाले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज येथे दिली.

यापूर्वी या दोघांनी 65 लाख रुपये उधळल्याचे आणि त्यापैकी एक जण पुण्यातील शिक्षणसम्राटाशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले होते; मात्र या दोघांची नावे पोलिसांकडे असली, तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरच ती प्रसिद्धिमाध्यमांना सांगितली जातील, असेही मारिया यांनी आज स्पष्ट केले.

पोलिसांच्या गुन्हे शाखेचाच एक भाग असलेल्या समाजसेवा शाखेने सांताक्रूझ येथील "स्टारनाईट' डान्स बारवर 26 डिसेंबर रोजी छापा घातला. छाप्याच्या दोन ते तीन दिवस आधी या बारमध्ये मौजमजेसाठी आलेल्या "त्या' दोघांनी 65 लाख रुपये उधळल्याचे वृत्त आज "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले; मात्र पोलिस तपासानंतर त्यांनी 65 लाख नव्हे, तर तब्बल एक कोटी 74 लाख रुपये उधळल्याची माहिती उघड झाली.
परदेशी बनावटीच्या गाडीतून आलेल्या त्या दोघा धनाढ्यांनी येतानाच बॅगांमधून ही रक्‍कम आणली होती. बारमध्ये सोबत घेतलेली रक्कम बारबालांवर उधळून संपल्यानंतर बाहेर असलेल्या आपल्या अंगरक्षकांना ते गाडीत ठेवलेली रक्कम वेळोवेळी घेऊन येण्यास सांगत होते, अशीही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. चार बारबालांवर ही पैशांची खैरात करण्यात आली असली, तरी पोलिसांच्या हाती मात्र त्यापैकी केवळ 11 लाख रुपयांची रोकडच लागली आहे.

यासंदर्भात गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बारमध्ये दोघा बड्या धनिकांनी एक कोटी 74 लाख रुपये उधळल्याची माहिती दिली; मात्र याप्रकरणी कोणाचीच तक्रार नसल्याने आपल्याला कोणतीही कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच्या तक्रारीशिवाय आयकर विभागालाही या प्रकाराची माहिती देता येत नाही; मात्र गुन्हे शाखेचे पोलिस त्यांच्या खबऱ्यांमार्फत या संपूर्ण घटनेची माहिती घेत असल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले. दरम्यान, छापा घातल्यानंतर पोलिसांनी हा बार बंद केल्याची माहिती समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव जोशी यांनी दिली.

(sakal,7 jan)

इंडियन मुजाहिदीनला मदत करणाऱ्या डॉक्‍टरला अटक

देशभरातील बॉम्बस्फोट ः आरोपींची संख्या 21; कोठडीत रवानगी

देशभरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातील एका डॉक्‍टरला हैदराबाद येथून अटक केली. त्याला मोक्का न्यायालयाने 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. डॉक्‍टरच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या एकवीस झाली आहे.

डॉ. अन्वरअली बागवान (26) असे या आरोपी डॉक्‍टरचे नाव आहे. नगरच्या राहुरी येथील देवळाली-प्रवरा गावचा असलेल्या डॉ. अन्वर अलीने पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. जयपूर, बंगळूरु, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, दिल्लीसह देशभरात बॉम्बस्फोट मालिका घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील अशोका म्यूज व कमलदीप पार्क येथे घर भाड्याने घेऊन देण्यास त्याने मदत केली. अशोका म्यूजमधील घरासाठी तो 31 हजार रुपये डिपॉझिट; तर नऊ हजार रुपये मासिक भाडे देत होता; तर कमलादीप पार्कमधील घरासाठी तो मासिक दोन हजार 800 रुपये भाडे देत होता. अशोका म्यूजमधील घरातच इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांनी देशभरातील आपला नियंत्रण कक्ष सुरू केला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याच इमारतीतून इंडियन मुजाहिदीनची मीडिया विंग सांभाळणारा संगणकतज्ज्ञ मोहम्मद मन्सूर असगर पिरबॉय आणि त्याच्या पाच साथीदारांना अटक केली. पुण्यातील बडे बिल्डर आणि सराफांचे अपहरण करून त्यांना गुंगीचे इंजेक्‍शन देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी डॉक्‍टर अन्वरअलीने या अतिरेक्‍यांपैकी मोहम्मद अकबर आणि आतिक शेख यांना इंजेक्‍शन देण्याचे प्रशिक्षण दिले होते. पुण्यातील एका अरबी क्‍लासमध्ये अतिरेकी आसिफ बद्रुद्दीन शेख याची ओळख डॉक्‍टर अन्वरअली सोबत झाली. यानंतर त्याने अन्वरअलीला इंडियन मुजाहिदीन संघटनेत सामील करून घेतले. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक असलेल्या रियाज भटकळची त्याने भेट घेतली होती.
देशभरात 2005 पासून झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना उत्तर प्रदेशच्या आझमगड, पुणे व कर्नाटक येथून अटक झाल्यानंतर तो हैदराबाद येथे निघून गेला होता. तेथे तो प्रॅक्‍टिस करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला मुंबईत चौकशीसाठी बोलावले. यानंतर त्याला अटक करून आज मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 16 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.


(sakal,6 jan)

डान्सबारमध्ये उधळले 65 लाख!

सांताक्रूझमधील घटना : शिक्षणसम्राटाच्या सुशिक्षित सुपुत्राचा पराक्रम

डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्धार राज्य सरकारने केला असला, तरी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पोलिसांच्या डोळ्यांदेखत मुंबई शहरातील अनेक डान्सबारमध्ये बारबालांचा मुक्त संचार सुरू आहे. समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या "स्टारनाईट' डान्सबारवर टाकलेल्या छाप्यात नऊ बारबालांना अटक करण्यात आली. पुण्यातील एका शिक्षण संस्था चालकाचा मुलगा आणि एका प्रथितयश विकसकाच्या भावाने या बारबालांवर एका रात्रीत 65 लाख रुपये उधळल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांच्या छाप्यानंतर या दोघांनाही अतिशय पद्धतशीरपणे बारमधून बाहेर निघण्याचा रस्ता दाखविण्यात आला, असे बोलले जाते. बारमध्ये असलेल्या ग्राहकांच्या "चाळ्यां'शी आपल्याला काहीच देणेघेणे नसते, मात्र तेथील बारबालांवर आपण कारवाई केली आहे, असे समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
सांताक्रूझच्या "स्टारनाईट' बारमध्ये समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी 26 डिसेंबरला रात्री उशिरा छापा घातला होता. या वेळी ग्राहकांसमोर अश्‍लील हावभाव करणाऱ्या नऊ बारबालांना पोलिसांनी अटक केली. या वेळी बारबालांवर उधळलेले 11 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले होते. प्रत्यक्षात या बारमध्ये त्या वेळी पुण्यातील एका ख्यातनाम शिक्षण संस्था चालकाचा मुलगा आणि बड्या विकसकाचा भाऊ होता. या विकसकाची पुण्यातील सरकारी बांधकाम प्रकल्पांत कामे सुरू आहेत. या दोघांनी तेथे असलेल्या बारबालांवर तब्बल 65 लाख रुपये उडविले. बारमध्येच असलेल्या एका ऍण्टी चेंबरमध्ये या बड्या हस्ती बारबालांसोबत बराच वेळ होत्या. समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी या बारमध्ये छापा घातल्यानंतर मात्र या दोघांना तेथून अतिशय सावधपणे बाहेर काढण्यात आले. आता या बारबालांवर उडविण्यासाठी या दोघांनी एवढी रोख रक्कम कुठून आणली, याचा शोध पोलिस घेत आहेत.
बारबालांच्या नादी लागून अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारवर बंदी घातली. त्यामुळे मध्यरात्री उशिरापर्यंत डान्सबारमध्ये थांबून आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्‍लील हावभाव करणाऱ्या अथवा त्यांच्याशी लगट करणाऱ्या बारबालांचा धंदा बंद झाला होता. काही बारमध्ये तर वेश्‍याव्यवसायच चालविण्यात येत असल्याने बारबंदीच्या निर्णयाचे स्वागतच झाले होते. डान्सबार बंदीनंतर "लेडीज सर्व्हिस बार'च्या नावाखाली महिलांना रात्री साडेनऊ वाजेपर्यंत थांबण्याची परवानगी देण्यात आल्याने या बारना पुन्हा नवी झळाळी आली. रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच परवानगी असताना हे बार अनेकदा स्थानिक पोलिसांच्या वरदहस्ताने पहाटे उशिरापर्यंत चालतात. समाजसेवा शाखेचे पोलिस मात्र अनेकदा या बारवर छापे घालून तेथील बारबालांवर कारवाई करतात. आर. आर. पाटील यांनी 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी राजीनामा दिल्यानंतर शहरातील डान्सबारचालकांचे चांगलेच फावले आहे. या बारचालकांनी त्यांच्या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत बारबालांना ठेवायला सुरुवात केली आहे. याकडे बऱ्याचदा पोलिसही डोळेझाक करीत असल्याने समाजसेवा शाखेच्या पोलिसांचे काम वाढल्याचे सांगितले जाते. सांताक्रूझ येथील बारवर टाकलेल्या छाप्याबाबत समाजसेवा शाखेच्या पोलिसांकडे विचारणा केली असता बारमध्ये असलेल्या बारबालांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर उधळण्यासाठी आणलेली रक्कमही जप्त केल्याचे सांगितले. या प्रकरणी मात्र आपल्याला काहीच माहीत नसल्याचे या विभागाचे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी कबूल केले.

(sakal,6 jan)

कसाबची पाकिस्तानकडे पुन्हा मदतीची मागणी

अतिरेकी हल्ला ः खटल्याची सुनावणी इम कॅमेरा


मुंबई हल्ल्यातील आरोपी अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आज पुन्हा एकदा पाकिस्तानकडे कायदेविषयक मदत मागितली. आपल्याला कायदेविषयक मदतीकरिता पाकिस्तानी वकील मिळावा, अशी मागणी त्याने अतिरिक्त न्याय दंडाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर खटल्याची सुनावणी "इन कॅमेरा' करण्याचे सूतोवाचही या अधिकाऱ्याने या वेळी केले.

कसाबचे वकीलपत्र घेण्याची तयारी ऍडव्होकेट लाम यांनी दर्शविली असली, तरी पाकिस्तान सरकारकडून मिळणाऱ्या कायदेशीर मदतीला त्याचे प्रथम प्राधान्य असल्याचे हा अधिकारी म्हणाला. कसाबवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी तीन गुन्ह्यांत त्याला पोलिस कोठडी मिळाली होती. यानंतर आज त्याला कामा रुग्णालयातील नव्या गुन्ह्यात अटक झाली.

मुंबई हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत फहीम अन्सारी व सबाउद्दीन अहमद यांची चौकशी झाली आहे. त्यांच्याकडून या हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात लखनौ पोलिसांनी अटक केलेल्या इमरान शहजाद याचीही कस्टडी लवकरच घेण्यात येणार आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी पोलिस लखनौ येथे गेले आहेत. "लष्कर'चा कमांडर फहीम अन्सारीच्या चौकशीत इमरान शमशादचे नाव पुढे आले आहे. फहीम 12 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपींची चौकशी अंतिम टप्प्यात असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
(sakal ,6 jan)

मुंबई पोलिसांकडूनच एफबीआयला माहिती

दहशतवादी हल्ला ः तपासासाठी दिवसरात्र मेहनत


मुंबई हल्ल्याप्रकरणी एफबीआयने पाकिस्तानला पुरावे दिल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारेच एफबीआयला आवश्‍यक ती माहिती उपलब्ध झाली आहे. मुंबई पोलिस दिवसरात्र मेहनत करून या हल्ल्याचा तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या बातम्यांनी मुंबई पोलिसांच्या मनोबलाचे खच्चीकरण होऊ शकते, असे मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांनी पकडलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या चौकशीत पाकिस्तानविरोधी महत्त्वाचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. मुंबई हल्ल्यानंतर तब्बल एका महिन्यापेक्षा जास्त दिवस पोलिसांची बारा पथके या प्रकरणातील लहान-सहान पैलूंचा तपास करीत आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांसह विविध शाखांचे 25 अधिकारी तपासाचे काम करीत आहेत. मोहम्मद अजमलच्या चौकशीत पाकिस्तान आणि लष्कर-ए-तैयबाच्या विरोधात गुन्हे शाखेने ठोस पुरावे गोळा केले आहेत. हल्ल्यानंतर मुंबईत आलेल्या इतर देशांनादेखील मुंबई पोलिसांनीच हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे सांगितले आहे. अशातच एफबीआयने या हल्ल्यासंबंधीचे पुरावे पाकिस्तानला दिल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात हे सर्व पुरावे मुंबई पोलिसांच्या माहितीच्याच आधारावर आहेत. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करीत असताना मुंबई पोलिसांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठेच येताना दिसत नाही. अशा प्रकारामुळे मुंबई पोलिसांचे मनोबल खचू शकते. मुळातच एफबीआयच्या पथकाला मुंबई पोलिसांनी फक्त नऊ तासच चौकशीची परवानगी दिली होती, असेही हा अधिकारी म्हणाला. या प्रकरणी लवकरच चार्जशीट दाखल केली जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

( sakal,5 jan )

जुहूच्या रेव्ह पार्टीतील सर्वांकडूनच "ड्रग्ज'चे सेवन

अंतिम अहवाल : झिंगणारे 17 ते 25 वयोगटातील

अमली पदार्थ विरोधी पथकाने जुहूच्या "बॉम्बे-72 डिग्री' रेस्टॉरंटमधील रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या 231 बड्या घरांतील तरुण-तरुणींच्या रक्त व लघवीच्या नमुन्यांचा अंतिम अहवाल प्रसिद्ध केला आहे. रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या सर्वच तरुणींनी एमडीएमए, चरस व गांजा यांसारख्या अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसही सुन्न झाले आहेत. अनेक निष्पापांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होण्याची शक्‍यता व्यक्त करीत रेव्ह पार्ट्यांचे चित्रीकरण करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय विधानसभा अधिवेशनात नुकताच झाला असताना जुहूच्या रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या 92 टक्के तरुण-तरुणींनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे.

अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये 17 ते 25 वयोगटातील तरुण-तरुणींचा समावेश आहे. या सर्व दोषींना तांत्रिकदृष्ट्या अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

अमली पदार्थ विरोधी पथकाने 5 ऑक्‍टोबरला जुहूच्या बॉम्बे-72 डिग्री रेस्टॉरंटवर छापा टाकून, तेथे सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळून लावली होती. पोलिसांनी या पार्टीत सहभागी झालेल्या 231 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. या पार्टीत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या आठ जणांसह एकूण पंधरा दोषींना पोलिसांनी अटक केली. या वेळी पोलिसांनी एक्‍सटीसी, एलएसडी, चरस अशा महागड्या अमली पदार्थांचा साडेनऊ लाख रुपयांचा साठाही हस्तगत केला होता. उद्योजक, व्यावसायिक, राजकारणी व चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रेटींच्या "लाडक्‍यांचा' या पार्टीत सहभाग होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुण-तरुणींच्या रक्त व लघवीचे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल पोलिसांना तीन टप्प्यांत प्राप्त झाला. त्यातील अंतिम अहवाल अमली पदार्थ विरोधी पथकाला आज मिळाला. या अहवालानुसार पार्टीत सहभागी झालेल्या सर्व 36 तरुणी त्या वेळी अमली पदार्थांच्या नशेने झिंगल्या होत्या; तर 195 पैकी 176 तरुणांनी मादक पदार्थ घेतल्याचेही स्पष्ट झाले. रेव्ह पार्टी ठरविणाऱ्यांत एका महिलेचाही समावेश होता. तिची चाचणीदेखील पॉझिटीव्ह आली आहे. या महिलेने एमडीएमए या अमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघडकीस आले आहे

( sakal, 4 jan)

गावदेवीत बिल्डरची गोळी झाडून हत्या

कारण अज्ञात : पूर्ववैमनस्य अथवा खंडणीचा वाद?

गावदेवी येथील बिल्डरची तो राहत असलेल्या इमारतीच्या लिफ्टबाहेर अनोळखी मारेकऱ्याने रिव्हॉल्व्हरने डोक्‍यात गोळी झाडून हत्या केल्याची घटना रात्री उशिरा घडली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंडिता रमाबाई मार्ग येथे असलेल्या कस्तुरबा भवन इमारतीत रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगम छबीनाथ मिश्रा (45) असे या हत्या झालेल्या बिल्डरचे नाव आहे. अष्टभुजा कन्स्ट्रक्‍शन या आपल्या कंपनीमार्फत मिश्रा सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे घेत असत. रायगड जिल्ह्यातील पेण परिसरात छोटे बंधारे बांधण्याचे काम त्यांनी घेतले होते. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते स्वतःच्या कार्यालयातून पाचव्या मजल्यावरील आपल्या घरी निघाले होते. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या मारेकऱ्याने इमारतीच्या लिफ्टबाहेरच त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी झाडून पलायन केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मिश्रा तेथेच मरण पावले. त्यांच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत असलेली दोन लाख रुपयांची रोख त्यांच्या मृतदेहाशेजारी पडलेली होती; तर उजव्या हातात असलेला मोबाईल फोन मृत्यूनंतरही त्यांच्या हातात तसाच होता. या इमारतीत राहणाऱ्या नातेवाईकांकडे जेवणासाठी आलेल्या उमेल शहा नावाच्या व्यक्तीने रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास लिफ्टजवळ मिश्रा यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह पाहून त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. यानंतर तातडीने गावदेवी पोलिसांना कळविण्यात आले.

कस्तुरबा भवन इमारतीत सुरक्षारक्षक; तसेच लिफ्टमन नसल्याने हा प्रकार समजण्यास बराच उशीर लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी मिश्रा यांच्या हत्येबाबत त्यांची मुलगी व भागीदार यांची विचारपूस केली. मात्र अद्याप कोणताच धागादोरा हाती आला नसल्याची माहिती परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली.
अधिक तपासासाठी पोलिसांचे एक पथक रायगड जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. ही हत्या पूर्ववैमनस्य, व्यवसायातील शत्रुत्व अथवा खंडणीच्या वादातून झाली असावी का, याची चाचपणी करण्यात येत असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.

( sakal,4 jan )

विधी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीला अखेर मुहूर्त!

मुंबई पोलिस ः 68 पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखतीचे काम सुरू

न्यायालयीन कामकाजात पोलिसांना मदत करण्यासाठी विधी अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या नेमणुकीला अखेर मुहूर्त लाभला. मुंबई पोलिस दलात 68 पदांसाठी 387 उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरू झाले असून, येत्या पंधरवड्यात हे विधी अधिकारी पोलिसांना विविध प्रकरणांत कायदेशीर सल्ला देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. पोलिस दलात विधी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची ही प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होती.
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांत पोलिसांना कायद्यातील बारकाव्यांचा पुरेसा अभ्यास नसल्याने अनेक प्रकरणात गुन्हेगार निर्दोष सुटण्याचे प्रकार घडतात. गुन्हेगारांच्या पथ्यावर पडणारे हे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने 2006 मध्ये पोलिसांच्या मदतीला विधी अधिकारी आणि विधी सल्लागारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात 471 विधी अधिकारी आणि विधी सल्लागार नेमण्याची ही योजना मुंबईत तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दोन वर्षे प्रलंबित होती. राज्यातील अन्य पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांना विधी अधिकारी आणि विधी सल्लागार देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबईत असलेल्या 68 पदांसाठी सबंध राज्यातून सुमारे तीन हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी सर्व बाबींची पूर्तता करणाऱ्या 387 उमेदवारांना गुन्हे शाखेने मुलाखतीसाठी पाचारण केले आहे. मुंबईत प्रत्येक सहायक पोलिस आयुक्तांना एक विधी अधिकारी, उपायुक्ताला विधी सल्लागार, अतिरिक्त आयुक्त आणि सहपोलिस आयुक्तांना "अ' श्रेणीतील विधी सल्लागार; तर पोलिस आयुक्तांसाठी मुख्य विधी सल्लागार, अशी पदे भरण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे 15 ते 28 हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जाणार आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या मुलाखती येत्या 10 जानेवारीपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर लगेचच या अधिकाऱ्यांची 11 महिन्यांसाठी नेमणूक केली जाणार आहे. पोलिस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त या अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेणार आहेत. असमाधानकारक काम असलेल्या विधी अधिकाऱ्याचे कंत्राट वाढविले जाणार नाही. अशा प्रकारे एखाद्या विधी अधिकाऱ्याची मुदत फक्त तीनदाच वाढविण्यात येणार आहे. मुंबई पोलिस दलात पहिल्यांदा नेमण्यात येणारे हे विधी अधिकारी एखाद्या प्रक
रणात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यापासून आरोपीविरुद्ध चार्जशिट दाखल करीपर्यंत पोलिसांना मदत करतील. याशिवाय न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी सरकारी वकिलांकडे पाठपुरावा करण्याचे कामही या अधिकाऱ्यांकडे असेल. "मॅट' आणि "कॅट'मध्ये प्रलंबित प्रकरणांतही ते पोलिसांना मदत करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

(sakal-2 jan)

कसाबच्या कोठडीत नेमक्‍या अधिकाऱ्यांनाच प्रवेश

14 दिवसांची कोठडी : पोलिसांना मोबाईल नेण्यास बंदी

मुंबई हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या कोठडीत फक्त गुन्हे शाखेच्या ठरावीक पोलिस आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्याच्या कोठडीत पोलिसांना मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, यामागे कसाबचे छायाचित्र कोणालाही काढता येऊ नये, असा हेतू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
सध्या गुन्हे शाखेच्या युनीट-3 च्या पोलिस कोठडीत असलेल्या कसाबला पोलिस आयुक्तालयातच असलेल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. 12 गुन्हे दाखल असलेल्या कसाबला आतापर्यंत तीन गुन्ह्यांत 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याच्या स्कोडा गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याला 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कोठडी संपताच त्याला अन्य गुन्ह्यांत अटक करून नव्या गुन्ह्यात अटक केली जाण्याची शक्‍यता आहे.
कसाबला ठेवलेल्या कोठडीत पहिल्या दिवसापासूनच अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कसाब असलेल्या कोठडीत यापूर्वी नीरज ग्रोवर हत्याप्रकरणातील आरोपी दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज हिला ठेवण्यात आले होते. कोठडीत असलेल्या मारिया सुसायराजचे छायाचित्र त्या वेळी काहींनी काढले. मारियाचे हे छायाचित्र आठ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्नही झाल्याचे समजते. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कसाब असलेल्या कोठडीत चौकशीसाठी जाणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुळातच मर्यादित लोकांना प्रवेश असलेल्या या कोठडीत जाणाऱ्या प्रत्येक पोलिस व अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्याची नोंदणी करण्यात येत असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

कसाबच्या कोठडीत नेमक्‍या अधिकाऱ्यांनाच प्रवेश

14 दिवसांची कोठडी : पोलिसांना मोबाईल नेण्यास बंदी

मुंबई हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या कोठडीत फक्त गुन्हे शाखेच्या ठरावीक पोलिस आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्याच्या कोठडीत पोलिसांना मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, यामागे कसाबचे छायाचित्र कोणालाही काढता येऊ नये, असा हेतू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
सध्या गुन्हे शाखेच्या युनीट-3 च्या पोलिस कोठडीत असलेल्या कसाबला पोलिस आयुक्तालयातच असलेल्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. 12 गुन्हे दाखल असलेल्या कसाबला आतापर्यंत तीन गुन्ह्यांत 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याच्या स्कोडा गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याला 6 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कोठडी संपताच त्याला अन्य गुन्ह्यांत अटक करून नव्या गुन्ह्यात अटक केली जाण्याची शक्‍यता आहे.
कसाबला ठेवलेल्या कोठडीत पहिल्या दिवसापासूनच अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कसाब असलेल्या कोठडीत यापूर्वी नीरज ग्रोवर हत्याप्रकरणातील आरोपी दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज हिला ठेवण्यात आले होते. कोठडीत असलेल्या मारिया सुसायराजचे छायाचित्र त्या वेळी काहींनी काढले. मारियाचे हे छायाचित्र आठ हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्नही झाल्याचे समजते. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कसाब असलेल्या कोठडीत चौकशीसाठी जाणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुळातच मर्यादित लोकांना प्रवेश असलेल्या या कोठडीत जाणाऱ्या प्रत्येक पोलिस व अधिकाऱ्याच्या येण्या-जाण्याची नोंदणी करण्यात येत असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

Friday, January 2, 2009

पाकिस्तानातील डझनभर अतिरेकी मुंबई पोलिसांच्या हिटलिस्टवर

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची योजना आखणारे पाकिस्तानातील एक डझनहून अधिक अतिरेकी मुंबई गुन्हे शाखेच्या हिटलिस्टवर आहेत. यात अतिरेक्‍यांना प्रशिक्षण देण्यापासून प्रत्यक्ष कट आखणारे तसेच त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्या चौकशीत या अतिरेक्‍यांची तसेच त्यांना मदत करणाऱ्यांची नावे पुढे आल्याचे हा अधिकारी म्हणाला.
26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताज, नरिमन हाऊस व हॉटेल ट्रायडंट येथे घातपात घडविणाऱ्या अतिरेक्‍यांचे पाकिस्तानमध्ये विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या काही कमांडरसोबत संभाषण सुरू होते. हे संभाषण भारतातून परदेशात झाले असल्याने त्यासंबंधीचे ठोस पुरावे हाती येण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. या संभाषणाबाबत भारतीय कंपन्यांकडून आवश्‍यक ती माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र पाकिस्तानकडून यासंबंधी माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत. या प्रकरणातील अतिरेक्‍यांना लष्करी प्रशिक्षण देणारे त्यांचे ट्रेनर, त्यांना अर्थपुरवठा करणारे, कट रचणारे तसेच हल्ल्याच्या वेळी प्रत्यक्ष संवाद साधणाऱ्यांची नावे पोलिसांना अतिरेकी कसाबच्या चौकशीतून मिळाली आहेत. हे सगळे पाकिस्तानमध्ये राहणारे असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. मुंबई हल्ला प्रकरणाचे आरोपपत्र या महिन्यात न्यायालयात दाखल होईल. अतिरेकी कसाब याचे वकीलपत्र घेण्यासाठी मुंबईतील ऍडव्होकेट लाम यांच्याव्यतिरिक्त बंगाल येथील तिघा वकिलांची फर्मही पुढे आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आरोपी फहीम अन्सारी व साबाउद्दीन अहमद यांच्या चौकशीत हल्ल्यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळाली असून आणखी एक संशयित आरोपी इमरान शहजाद याची कस्टडी 3 जानेवारीला घेण्यात येणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला. अतिरेक्‍यांनी पाकिस्तानच्या सागरी हद्दीतून मुंबईकडे येण्यासाठी वापरलेल्या कुबेर बोटीचा मालक विनोद मसाणी याची पोरबंदर येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अद्याप चौकशी सुरू आहे.


(sakaal,1stjanuary 2009)

नोकर, सुरक्षा रक्षकही चोरट्यांचे खबरे?

मोठे जाळे उघडकीस ः पोलिसांकडून खबऱ्यांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 ः अनेक वर्षे तुमच्याकडे काम केले असल्याने तुमचा ज्यांच्यावर गाढ विश्‍वास आहे असा तुमच्या घरातील नोकर, मोलकरीण अथवा इमारतीचा सुरक्षारक्षक एखाद्या चोरट्यांच्या टोळीचा खबरी असण्याची दाट शक्‍यता आहे. दचकलात ना? तुमची ही शंका कदाचित खरीदेखील ठरू शकेल. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे, खार आणि सांताक्रू झ परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक केली. या घरफोड्यांनी वर्षभराच्या काळात वीसहून अधिक घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुबाडल्याचे उघडकीस आले. चोरी करण्यासाठी श्रीमंतांची घरे शोधण्याकरिता त्यांनी खबरे ठेवल्याचे तपासात स्पष्ट झाले असून चोरीच्या ऐवजातील ठराविक रक्कम या खबऱ्यांना दिली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह-पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
वांद्य्राच्या बुलक रोड परिसरात सी ब्रीझ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या साहिदा मुश्‍ताक काथावाला (41) यांच्या घरात 2 नोव्हेंबरला पहाटे दोघा घरफोड्यांनी चोरी केली होती. घरात एकट्याच राहणाऱ्या साहिदा यांचे हातपाय बांधून चोरट्यांनी घरातील सहा लाख रुपयांचा ऐवज चोरी केला होता.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट- 10 च्या पोलिसांनी 25 डिसेंबरला तेजबहाद्दूर छेडीलाल मौर्या ऊर्फ विजय (23, रा. जुहू गल्ली) व शरीफ रमझान शेख (22, रा. जुहू) यांना अटक केली. या दोघांच्या चौकशीत त्यांनी मे - 2007 पासून आतापर्यंत वीसहून अधिक घरफोड्या केल्याचे कबूल केले.

घरफोडीत निष्णात असलेल्या या दोघा चोरट्यांचे वांद्रे, खार, सांताक्रूझ परिसरात खबऱ्यांचे मोठे नेटवर्क असल्याचे उघडकीस आले आहे. एखाद्या घरातील जुना नोकर, इमारतीचा सुरक्षारक्षक, मोलकरीण या चोरट्यांना एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती तसेच त्याच्या घरातील सदस्यांची अचूक संख्या सांगत असत. त्यामुळे दोन्ही घरफोड्यांना एखाद्या घरात चोरी करायला सोपे जात होते. पोलिस या चोरट्यांच्या खबऱ्यांचा शोध घेत असून काहींची चौकशी सुरू असल्याचेही गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त मारिया यांनी सांगितले. तेजबहाद्दूर मौर्या बहुमजली इमारतीत ड्रेनेजच्या पाईपवरून चढण्यात आणि क्षणात उतरण्यात निष्णात आहे. काथावाला यांच्या घरातून चोरलेल्या सहा लाखांच्या ऐवजापैकी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. रात्री घरफोड्या केल्यानंतर दिवसा हे दोघेही चोरटे मोटारसायकलवरून वाटसरूंच्या बॅगा चोरण्याचेही काम करीत. त्यांच्यावर बॅगचोरीचे सात गुन्हे दाखल असल्याचेही मारिया यांनी सांगितले.

राज्यातील पोलिस ठाणे इंटरनेट कनेक्‍टीवीटीने जोडणार

राज्यातील 994 पोलिस ठाण्यांना इंटरनेट कनेक्‍टीवीटीने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नव्या वर्षात कार्यान्वित केला जाणार आहे. ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंटच्या क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम ( सीसीटीएनएस) या प्रकल्पांतर्गत पोलिस खात्यात "ई गव्हर्नन्स' योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांनी केंद्र सरकारकडे यंदा तीनशे कोटी रुपयांची मागणी केली आहे.
सरकारी कार्यालयांतील कामकाज संगणकीकरणाद्वारे करण्यासाठी ई गव्हर्नन्स योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेनुसार पोलिस दलातही टप्प्याटप्प्याने आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. पोलिस खात्यातील कामकाजाचे संगणकीकरण करण्यासाठी राज्य पोलिस दल "नाईन- एएस' हा प्रकल्प "पायलट प्रोजेक्‍ट ' म्हणून राबविणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारी संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरवातीच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, नाशिक सारख्या पाच पोलिस आयुक्तालये आणि विशेष शाखांत या प्रकल्प राबविला जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात तो राज्यभर राबविला जाईल. या प्रकल्पाद्वारे राज्यातील दोन लाख पोलिसांच्या कामकाजाचे नियोजन करण्यात येणार आहे. कॉमन इंटिग्रेटेड पोलिस ऍप्लिकेशन ( सीपा) या प्रकल्पानुसार राज्यातील 10 पोलिस आयुक्तालये आणि 33 जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांना संगणकीकरणाने जोडण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. नंतर याच प्रकल्पात काही सुधारणा करून तो क्राईम ऍण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्किंग सिस्टिम ( सीसीटीएनएस) असा करण्यात आला. हा प्रकल्प केंद्र सरकार पाच वर्षांच्या कालावधीत राबविणार आहे. दोन हजार कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी राखून ठेवला आहे. येत्या काळात देशभरातील प्रत्येक पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याच्या तपासाची माहिती "ऑनलाइन' उपलब्ध होण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक पोलिस ठाणे एकमेकांशी संगणकाने जोडले जावे यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात किमान पाच संगणक व पाच प्रिंटर मिळण्याची मागणी महाराष्ट्र पोलिसांनी केंद्राला एका प्रस्तावाद्वारे केली आहे. सध्या पोलिस दलात ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून क्राईम ऍण्ड क्रिमिनल इन्फो सिस्टिम ( सीस
ीआयएस) व "फॅक्‍ट्‌स- फाइव्ह' हे दोन प्रकल्प सुरू आहेत. सीसीआयएस द्वारे गुन्ह्याचा एफआयआर ते चार्जशीट दाखल करण्यापर्यंतची माहिती उपलब्ध करून देण्यात येते तर फॅक्‍ट फाइव्ह द्वारे राज्यातील प्रत्येक गुन्हेगाराच्या बोटांच्या ठशांचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम सुरू आहे. हे काम पुण्यात सीआयडी क्राईम हा विभाग करीत आहे. सध्या राज्यातील प्रत्येक पोलिस आयुक्तालय आणि जिल्हा अधीक्षकांशी संगणकीकरणाद्वारे पत्रव्यवहार केला जातो. ई. गव्हर्नन्स प्रत्येक गावापर्यंत पोहण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या राज्य सरकारची ब्रॉडबॅन्ड कनेक्‍टिव्हिटी येत्या वर्षभरात प्रत्येक गावात पोचेल. त्यांच्याच मदतीने राज्यातील प्रत्येक पोलिस ठाणे एका क्‍लिकच्या अंतरावर येणार असल्याची माहिती तरतूद विभागाचे सहाय्यक पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी दिली. पोलिस खात्यासाठी आवश्‍यक साधनसामग्रीची मागणी करण्यासाठी "ई टेंडरींग' ची पद्धतही लवकरच सुरू करण्याचा मानस असल्याचे तरवडे म्हणाले.

( sakal- 2nd january 09 )
----------------------
पोलिस दलातील ई गव्हर्नन्सची सद्यःस्थिती
- मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या पोलिसांच्या स्वतंत्र वेबसाईट्‌स कार्यान्वित.
- महाराष्ट्र पोलिसांची www.mahapolice.gov.in ही वेबसाइट कार्यरत. सातत्याने अपडेट असलेल्या या वेबसाइटला अवघ्या काही महिन्यांतच वेबसाइटला 2 लाख जणांनी भेट दिली.
- मुंबई पोलिसांची www.mumbaipolice.com ही वेबसाइट सर्वांत अपडेट. या वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या 18 लाख 11 हजार 989
- मुंबईसह राज्यात संगणकीकरणाद्वारे पत्रव्यवहाराला अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद नाही.
- संगणकाद्वारे पत्रव्यवहारासाठी ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांत कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता.

Thursday, January 1, 2009

यापेक्षा दुर्दैव ते कसले?

उल्हास फाटक ः जलतरणपटू विनोद घाडगे यांच्या मृत्यूमुळे वरळीवर शोककळा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 30 ः "आजवर त्याने केलेल्या जलतरणातील सगळ्या विक्रमांना मी त्याच्या सोबत होतो. मी सोबत असल्यावर विक्रम यशस्वी होतो, असं त्याला नेहमी वाटायचं. काल रात्रीही मी नेहमीप्रमाणे त्याच्या सोबतच होतो. बोटीपासून अवघ्या दीड मीटर लांबून तो सपासप पाणी कापत गेटवेच्या दिशेने पुढे पुढे जात होता अन्‌ अचानक मासेमारीकरिता टाकलेल्या जाळ्यात तो अडकला. जाळे लावलेल्या कोळ्याने लांबून आरोळी ठोकली तेव्हा लक्षात आलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. बोट वळवून मागे येईपर्यंत बोटीत असलेल्या काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्यात उड्याही मारल्या; मात्र "त्या' पाच-सात मिनिटांत सारे काही संपले होते. माझ्या नजरेसमोर त्याला मृत्यू आला; मात्र त्याच्यापासून अवघ्या काही अंतरावर बोटीत असलेले आम्ही काहीच करू शकलो नाही. आजवर शेकडोंना पोहायला शिकविणाऱ्या विक्रमवीर जलतरणपटूचा अंतही पाण्यातच होणे यापेक्षा दुर्दैव ते कसले,' अशी भावना विक्रमवीर जलतरणपटू विनोद घाडगे यांचे जिवलग मित्र उल्हास फाटक यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जलतरणपटू विनोद घाडगे यांनी शिष्य धनंजय कांबरेकर यांच्यासह धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया असे 36 किलोमीटरचे अंतर पोहण्याचा संकल्प सोडला होता. या संकल्पपूर्तीसाठी ते मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन लहान बोटी, एका मोठ्या लॉंचवर मित्र, आप्तेष्ट, सहकारी असा तब्बल साठ जणांचा लवाजमा घेऊन काल धरमतर येथे गेले होते. यानंतर करंजा येथे प्रीतम या कोळी मित्राकडे त्यांनी जेवण केले. मध्यरात्री दोन वाजता घाडगे यांनी धरमतरच्या किनाऱ्यावरून धनंजय कोंबरेकर याला पाण्यात उडी मारायला लावली. वीस मिनिटांनी पाण्यात उडी मारून धनंजयला गाठता येईल असा त्यांचा विचार होता. त्यानुसार दोन बोटी आणि लॉंच धनंजयसोबतच पुढे पाठविण्यात आल्या.
विक्रीकर खात्यात अधिकारी असलेल्या विनोद घाडगे यांच्या बोटीत त्यांच्या खात्याचे अतिरिक्त आयुक्त आर.आर.पाटील, मित्र उल्हास फाटक आणि अन्य मित्रही होते. 2 वाजून 21 मिनिटांनी त्यांनी पोहण्यासाठी समुद्रात उडी मारली. दोन तास पोहून त्यांनी अंतरही पार केले. या काळात श्री. पाटील यांनी त्यांना दोन वेळा खायलाही दिले. तर फाटक त्यांना प्रोत्साहन देत होते. गडद काळोखात बोटीच्या मागे ते अवघ्या दीड ते दोन मीटर अंतरावरून पोहत होते. याच वेळी बोट अचानक मासेमारीसाठी जाळे टाकलेल्या ठिकाणावर शिरली. सर्वत्र गडद अंधार असल्याने समुद्रात मासेमारीसाठी टाकलेले जाळे कोणालाच दिसले नाही. साधारण शंभर मीटर अंतरावर असलेल्या एका कोळ्याने जोरात आरोळी ठोकून तेथे जाळे असल्याचे सांगितले. तोपर्यंत बोट हे जाळे पार करून पुढे गेली. मात्र बोटीवर असलेल्या फाटक यांच्या मनात पुढच्याच क्षणात विनोद घाडगे यांचा विचार आला. घाडगे यांना पाहण्यासाठी म्हणून बोटीतील सगळे मागे वळले तर ते समुद्रात कुठेच दिसत नव्हते. बोट मागे वळवून त्यांच्याकडे जाईपर्यंत जाळ्यात अडकून तो अंतिम श्‍वास घेत होता. हे सांगताना फाटक यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

---------

वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
जलतरणपटू घाडगे यांच्या मृत्यूची बातमी समजताच ते राहत असलेल्या वरळीच्या फ्लोरा परिसरातील गोदावरी इमारतीवर शोककळा पसरली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उरणच्या शासकीय रुग्णालयातून त्यांचे शव वरळी येथील निवासस्थानी आणण्यात आले. पत्नी उमा (39), मुलगा सिद्धांत (8 वर्षे ) व मुलगी निर्मिती (11 वर्षे ) यांच्यासह तीन बंधू आणि आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूच्या वृत्तानंतर त्यांचे शिष्य, सहकारी, मित्र व चाहत्या वर्गाने वरळी परिसरात एकच गर्दी केली होती. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

छंदासाठी नोकरी बदलली
मूळचे सातारा येथील राहणारे घाडगे यांनी दादरच्या रानडे रोडवर फुले विकून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर इंग्रजी विषयात एम.ए.ची पदवी मिळविली. याच वेळी त्यांनी आपला पोहण्याचा छंदही जोपासला. नंतर याच छंदाने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झाल्यानंतर त्यांनी काही काळ विशेष शाखेत नोकरीही केली. पोहण्याच्या छंद अधिकाधिक चांगल्या प्रकारे जोपासता यावा यासाठी त्यांनी विक्रीकर विभागात अधिकारी पदावर नोकरी स्वीकारली. त्यांचे मोठे बंधू बाळासाहेब पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. बाळासाहेब, विनोद आणि गणेश या तिन्ही भावंडांनी चार वर्षांपूर्वी जिब्राल्टरची खाडी विक्रमी वेळात पोहण्याचा विक्रम केला होता.