Thursday, July 30, 2009

पोलिस महासंचालक विर्क यांना मुदतवाढ

केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक आणि अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामांच्या जोरावर राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लावण्यावरून राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले काही दिवस सुरू असलेले मतभेद विर्क यांना मिळालेल्या मुदतवाढीनंतर शमले आहेत. येत्या 31 जुलै रोजी विर्क निवृत्त होणार होते.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने यंदा 13 मार्च रोजी विर्क यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली. नेमणुकीनंतर विर्क यांना अवघ्या चार महिन्यांचा कालावधी मिळाला. यापूर्वी पंजाबमध्ये पोलिस महासंचालक म्हणून काम केलेल्या विर्क यांनी तेथे मोडून काढलेला दहशतवाद तसेच आगामी काळात राबवायच्या नक्षलविरोधी अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांना मुदतवाढ मिळण्यास महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत काम करण्याची संधी मिळालेल्या विर्क यांच्या कार्यकाळातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालकपदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद झाले होते. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर ए. एन. रॉय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही होता. त्यानंतर मात्र निवृत्तीच्या दारात असलेल्या विर्क यांनी दिल्लीत असलेल्या आपल्या जुन्या संपर्काच्या जोरावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. यानंतरच त्यांना या पदावर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास हिरवा कंदील मिळाल्याचे अंतर्गत गोटातून सांगण्यात येते. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना नुकतीच सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मुख्य सचिवांना मुतदवाढ दिली जात असेल तर पोलिस महासंचालकांच्या बाबतीत दुजाभाव केला जाऊ नये, अशी भूमिका घेत सरकारने विर्क यांच्या मुदतवाढीला हिरवा कंदील दाखविला.
मूळचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या विर्क यांची बॅच 1970 ची आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर 23 वर्षे ते पंजाबमध्ये कार्यरत होते. पंजाबमध्ये त्यांना पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटकही झाली होती; मात्र कायदेशीर लढाई लढत या सर्व आरोपांतून ते निर्दोष मुक्त झाले. सध्या महाराष्ट्राचे तेहतीसावे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या विर्क यांनी मिळालेल्या मुदतवाढीबाबत समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गृहमंत्री जयंत पाटील यांनी मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचेही विर्क या वेळी म्हणाले.


काम करीत राहणार ः विर्क

आपल्या सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण काम करीत राहणार आहोत. मुदतवाढ मिळाल्यानंतर येत्या काळात दहशतवाद आणि नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जाणार असल्याची प्रतिक्रिया पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी व्यक्त केली. फोर्सवन, शीघ्र कृती दल आणि दहशतवादविरोधी पथकात सुधारणा घडवून आणण्यासाठी येत्या काळात पावले उचलली जाणार आहेत. ही तिन्ही दले अधिक सक्षम करीत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहोत. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम स्थापण्यात येणार असल्याचेही विर्क यांनी सांगितले.


(sakaal,29 th july)

आयपीएस आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य पोलिस दलातील आयपीएस आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह खात्याने केल्या आहेत. काल रात्री उशिरा जाहीर झालेल्या या बदल्यांमुळे अनेक महिने रिक्त असलेल्या पोलिस दलातील महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात आणखी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांचे संकेत गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.

बदल्या झालेल्या या अधिकाऱ्यांची नावे आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे. कंसात सध्याचे पद - एन. पी. म्हस्के ( मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधान मंडळ) - पोलिस अधीक्षक - नंदुरबार , डॉ. आर. ए. शिसवे (पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)- पोलिस अधीक्षक - बुलडाणा, ए. व्ही. देशभ्रतार (पोलिस अधीक्षक, बुलडाणा)- पोलिस अधीक्षक, धुळे, पी. एस. पाटणकर (पोलिस अधीक्षक, हिंगोली ) - पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग, के. जी. पाटील ( पोलिस अधीक्षक, नंदुरबार) - पोलिस अधीक्षक, हिंगोली, एस. व्ही. कोल्हे ( पोलिस अधीक्षक , धुळे) - पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, नागपूर , मधुकर वसावे (पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, नागपूर) - प्राचार्य पी. टी. एस. नाशिक, डॉ. जय जाधव ( पोलिस उपायुक्त , नाशिक )- पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा , पुणे , एस. आर. चव्हाण ( पोलिस अधीक्षक महामार्ग , पुणे)- पोलिस अधीक्षक , राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे , डॉ. सुरेश मेखला (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर ) - पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, डी. एम. फडतरे (पोलिस अधीक्षक , सोलापूर ग्रामीण )- पोलिस उपायुक्त, पुणे शहर , एम. के. भोसले (पोलिस उपायुक्त, अमरावती ) - पोलिस उपायुक्त ल - विभाग, मुंबई , ए. आर. मोराळे ( अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण )- पोलिस उपायुक्त परिमंडळ -5 , ठाणे शहर , बी. जी. शेखर ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, ठाणे , एस. डी. आवाड ( पोलिस अधीक्षक , महामार्ग सुरक्षा, ठाणे) - नियुक्तीच्या प्रतीक्षेत, सी. जी. दैठणकर ( पोलिस उपायुक्त, मुख्यालय , ठाणे शहर ) - पोलिस उपायुक्त , परिमंडळ -2 , भिवंडी , बी. एस. शिंदे (पोलिस उपायुक्त, परिमंडळ -5 , ठाणे ) - पोलिस उपायुक्त परिमडंळ - 3, ठाणे शहर , एस. टी. राठोड (पोलिस अधीक्षक, एसीबी, नांदेड )- पोलिस उपायुक्त , मुख्यालय, ठाणे शहर, आर. एल. पोकळे (महाराष्ट्र पोलिस अकादमी , नाशिक)- अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण , कैसर खलीद (समादे
शक, राज्य राखीव पोलिस बल , गट क्रमांक -4, नागपूर)- पोलिस उपायुक्त, रेल्वे, मुंबई, पी. सी. पाटील (अपर पोलिस अधीक्षक, बारामती) - प्राचार्य , पोलिस प्रशिक्षण विद्यालय, नानवीज, पुणे, आर. आर. ननावरे (पोलिस अधीक्षक, पीसीआर, औरंगाबाद ) - अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर , डॉ. प्रभाकर बुधवंत (पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर) - पोलिस उपायुक्त, अमरावती शहर, सी. के. कानडे (पोलिस उपायुक्त परिमंडळ-2, नागपूर ) - पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई , बी. एम. ग्वालबंसी ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्रं-3, जालना) - समादेशक , रा.रा.पो.बल. गट क्र-6, धुळे, सी. एस. जानराव ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र-6, धुळे ) - समादेशक, रा.रा.पो.बल. गट क्र.-5, दौंड , आर. एम. लाडके ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र.-5, दौंड, पुणे)- समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र.-3,
ेजालना., अमर जाधव (पोलिस उपायुक्त, अभियान, मुंबई )- पोलिस उपायुक्त, गुन्हे प्रकटीकरण-1, एस. आर. पारसकर (नियुक्तीच्या प्रतीक्षेत)- पोलिस उपायुक्त, अमली पदार्थविरोधी पथक, मुंबई , ब्रिजेश बहादूरसिंग (समादेशक, रा.रा.पो.बल. गट क्र-11. नवी मुंबई)- पोलिस उपायुक्त, परिमंडळ-8, पी. पी. मुत्याळ (नियुक्तीच्या प्रतीक्षेत)- पोलिस उपायुक्त, परिमंडळ-10, मुंबई, के. एम. एम. प्रसन्ना (पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-10, मुंबई)- नियुक्तीच्या प्रतीक्षेत, आर. के. मोरे (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक) - अपर पोलिस अधीक्षक, खामगाव, बुलडाणा, राजेश प्रधान (पोलिस अधीक्षक, गडचिरोली ) - पोलिस अधीक्षक, यवतमाळ, एम. एम. रानडे (पोलिस उपायुक्त, मुंबई )- पोलिस उपायुक्त, नागपूर शहर, यशस्वी यादव (पोलिस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर)- पोलिस अधीक्षक, कोल्हापूर , सी. जी. कुंभार ( पोलिस अधीक्षक, कोल्हापूर )- पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे , नवीनचंद्र रेड्डी (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ) - पोलिस उपायुक्त, मुख्यालय, औरंगाबाद शहर , एस. डी. वाघमारे (पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर) - अपर पोलिस अधीक्षक, बीड , पी. बी. सावंत ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस उपायुक्त, दहशतवादविरोधी पथक , मुंबई , एस. एस. तडवी (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अधीक्षक, नाशिक)- पोलिस उपायुक्त, मुंबई, एच. एन. पवार ( प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, अकोला) - पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, अमरावती , एन. एम. पारधे (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, जालना) - प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, नागपूर), एस. जे. सागर (पोलिस अधीक्षक, भंडारा) - पोलिस अधीक्षक, एसीबी, अमरावती, व्ही. के. परदेशी ( पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग , औरंगाबाद) - पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर , एम. बी. तांबडे (पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर)- समादेशक , भारत राखीव बटालियन, औरंगाबाद , निशिथ मिश्रा (पोलिस अधीक्षक, नक्षलवादविरोधी अभियान, नागपूर) - पोलिस अधीक्षक, भंडारा, एस. जयकुमार ( अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली) - पोलिस अधीक्षक, गडचिरोली, एस. ए. मोहेकर (अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगई, बीड) - अपर पोलिस अधीक्षक, जालना, एस. टी. बोडखे ( पोलिस अधीक्षक, यवतमाळ ) - मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधान मंडळ, मुंबई, के. ई. जाधव ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस उपायुक्त, नागपूर शहर , श्रीमती ए. एम. भित्रे ( पोलिस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा )- पोलिस उपायुक्त, वाहतूक, मुंबई , एस. व्ही. शिंत्रे ( पोलिस उपायुक्‍त, ठाणे शहर ) - पोलिस उपायुक्त, मुंबई, एम. जे. भोईर (पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई)- पोलिस उपायुक्त, अभियान , मुंबई, निसार तांबोळी ( पोलिस उपायुक्त , परिमंडळ -8) - पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा , मुंबई , एस. एच. महावरकर ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत )- पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई.

(sakaal, 28 th july)

आता पोलिस नियंत्रण कक्षांत कमांड सेंटर

दोन महिन्यांत आमूलाग्र बदल घडविणार : शिवानंदन

आपत्कालीन स्थितीत नागरिकांना पोलिस नियंत्रण कक्षांतून विनाविलंब प्रतिसाद मिळावा, याकरिता या कक्षांतच कमांड सेंटरही तयार करण्यात येणार आहेत. येत्या काळात नियंत्रण कक्षांत होणाऱ्या या व अन्य आमूलाग्र बदलांकरिता 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली.

तरुण पिढीसोबत सुसंवाद साधण्याकरिता मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या www.copconnect.in या वेबसाईटचे उद्‌घाटन आज चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी मुंबईच्या नगरपाल इंदू सहानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन तरुणाईत व्यसनाधीनता तसेच अमलीपदार्थांचे सेवन वाढत असल्याचे चित्र आहे. अशा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीकडे नेण्याकरिता काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या वेबसाईटच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार आहे. याशिवाय परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने प्रबोधन केले जाणार आहे.

एक कोटी 60 लाख लोकसंख्येच्या मुंबईत प्रत्येकाच्या कारवायांकडे मर्यादित पोलिस बळाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्‍य होत नाही. अशा वेळी तरुण पिढीने पोलिसांचे डोळे होऊन पोलिसांना मदत करावी, असे आवाहन या वेळी शिवानंदन यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना पोलिस नियंत्रण कक्षात येत्या दोन महिन्यांच्या काळात लक्षणीय सुधारणा घडविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांत संभाषण कौशल्य वाढावे याकरिता वांद्रे-कुर्ला संकुल येथे कार्यशाळा घेण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारख्या घटनेला चोख उत्तर देण्यासाठी पोलिस दलाला अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन सुसज्ज करण्यात येत आहे. आपत्कालीन स्थितीत बॉम्ब तसेच अत्याधुनिक स्फोटकांची ओळख व्हावी तसेच बॉम्बशोधक व विनाशक पथक येईपर्यंत ती हाताळता यावीत याकरिता तीनशे पोलिसांना नायगाव येथे विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दक्षतेचा इशाऱ्याने घबराट नको
मुंबई, दिल्ली यांसह जगभरातील प्रमुख शहरे नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असतात. या शहरांत घातपाती कारवायांची शक्‍यता कधीच नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून नेहमीच सतर्कता बाळगण्यात येते. पोलिसांनी दक्ष राहावे यासाठी गुप्तचर यंत्रणांकडून वेळोवेळी अहवाल पाठविण्यात येतात. याचा अर्थ त्या शहराला लगेचच अतिरेकी हल्ल्याचा धोका आहे असे म्हणणे चुकीचे आहे. प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या अशा बातम्यांनी नागरिकांत नाहक घबराट पसरत असल्याचेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले
.

(sakaal,25 th juyl)

रेल्वे आरक्षण मिळवून देणारे तीन दलाल "सीबीआय'च्या जाळ्यात


अधिकारी-कर्मचारी सामील असल्याचा संशय


रेल्वेने परगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून दलाली वसूल करून तिकिटांचे आरक्षण मिळवून देणाऱ्या तिघा दलालांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने छापा घालून ताब्यात घेतले. या दलालांकडून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांची सहाशे तिकिटे व दोन लाख रुपये जप्त केले आहेत. रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे रॅकेट सुरू असल्याची शक्‍यता सीबीआयचे अधीक्षक प्रवीण साळुंखे यांनी वर्तविली.
छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे या प्रमुख रेल्वेस्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटामागे दोनशे ते तीनशे जादा रुपये घेऊन "कन्फर्म' तिकिटे मिळवून देणारे रॅकेट सुरू असल्याची माहिती "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार या पथकाने आज दुपारी तिन्ही रेल्वेस्थानकांत छापे घातले. वांद्रे टर्मिनल येथे गुप्ता ट्रॅव्हल एजन्सी, मुंबई सेंट्रल येथील मुजावर ट्रॅव्हल एजन्सी आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील ए. के. ट्रॅव्हल्स ऍण्ड कन्सल्टंट या ठिकाणी या तिकिटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात असल्याचे आढळले. त्यानुसार "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी या एजन्सी चालविणाऱ्या दलालांना ताब्यात घेतले आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या वेळी प्रवाशांच्या तयार होणाऱ्या वेटिंग लिस्टमध्ये रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने बोगस नावे टाकून त्या जागी ऐनवेळी नवीन नावे टाकून प्रवाशांना नाडले जात असल्याचेही "सीबीआय'चे अधीक्षक साळुंखे यांनी सांगितले. या प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू असून, यात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांचीही भूमिका तपासण्यात येत आहे. ताब्यात घेतलेले दलाल सामान्य प्रवाशांना तत्काळ आरक्षणासाठी दोनशे रुपये, एसी कोचसाठी तीनशे; तर 90 दिवस आधी करावयाच्या आरक्षणासाठी शंभर रुपये उकळत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गरज भासल्यास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येईल, असेही साळुंखे यांनी सांगितले.


(sakaal,25 th july)

अपहरण आणि बलात्कार प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांना पोलिस कोठडी

अंधेरी येथील घटना; पीडित मुली अल्पवयीन

पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांसह नेपाळहून मुंबईत आलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचे अंधेरी-पूर्व येथून अपहरण करून त्यापैकी मोठ्या मुलीवर नजीकच्या महापालिका उद्यानात सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना अटक केली. या चारही आरोपींना न्यायालयाने येत्या 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अटकेतील चारही आरोपी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला गणेश गटकळ याला मनसेच्या जनहित कक्षाच्या शाखा संघटकपदावरून दोन महिन्यांपूर्वीच काढून टाकण्यात आले होते. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. उर्वरित तीन आरोपींविषयी त्यांनी कोणताही खुलासा केला नाही; मात्र ते याच परिसरातील मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येते. दोघा आरोपींची नावे या परिसरात ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्जवर असल्याचे समजते. गटकळ याने केलेल्या गुन्ह्याशी मनसेचा कोणताही संबंध नाही, तो दोषी आढळल्यास त्याला शिक्षा मिळावी, अशी भूमिकाही पारकर यांनी पत्रकारांपुढे मांडली. अटकेतील आरोपी मनसेचे कार्यकर्ते आहेत काय, याची खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.
या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींची नावे गणेश गटकळ (28), गणेश काळे (26), उमेश बोराडे (28) आणि नरेंद्र साळुंखे (26) अशी आहेत. यापैकी गणेश गटकळ आणि गणेश काळे यांनी बलात्कार केला, तर अन्य दोघे त्यांच्यासोबत होते, असे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अपहरण झालेल्या दोघी अल्पवयीन बहिणी 13 व 14 वर्षे वयाच्या असून, त्या घरकाम करतात. मरोळ मरोशी परिसरात त्या राहतात. या प्रकरणातील आरोपीसुद्धा याच परिसरातील आहेत. अंधेरी पूर्वेला डीएचएल कुरिअर कार्गो कंपनीच्या समोर असलेल्या महापालिका उद्यानातील सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये गत 19 जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बहिणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कामाहून सुटल्यानंतर मावशीच्या घरी जात होत्या. या वेळी त्यांच्या मागून इंडिका कारमधून आलेल्या वरील चार आरोपींनी त्यांना बळजबरीने कारमध्ये बसवून डीएचएल कंपनीसमोर असलेल्या लोकभारती उद्यानात नेले. दोघा जणांनी चौदा वर्षांच्या मुलीला तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या वेळी अन्य दोघे जण सुरक्षा रक्षकाच्या केबिनच्या बाहेर दुसऱ्या लहान मुलीसोबत उभे होते. या दोघा जणांची नजर चुकवून लहान मुलीने घटनास्थळावरून पळ काढून थेट आपल्या मावशीचे घर गाठले. बलात्कार झालेल्या मुलीला मात्र याबाबत कोठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही या चौघांनी दिल्याचा आरोप आहे.

वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
पीडित अल्पवयीन मुलीने स्वतःवर गुदरलेला हा प्रसंग काही दिवस लपविला, मात्र शुक्रवारी दुपारी धीर एकटवून तिने या प्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. या घटनेचा धक्का बसलेल्या तिच्या आईने तातडीने अंधेरीच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चौघांना अटक केली. या बलात्काराचा वैद्यकीय अहवाल येणे अद्याप बाकी असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.

इन्फोबॉक्‍स...

पीडित मुलीला मनसे मदत करणार
मनसेच्या महिला सेनेच्या पदाधिकारी या बलात्कार प्रकरणातील दुर्दैवी तरुणीच्या घरी जाऊन सर्वतोपरी मदत करतील, असे मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी गणेश गटकळ याच्याविरुद्ध तक्रारी आल्याने त्याला मनसेच्या जनहित कक्षाच्या शाखा संघटकपदावरून दोन महिन्यांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. महाराष्ट्रात पक्षाचे 14 लाख कार्यकर्ते आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे शक्‍य होत नाही, असेही पारकर यांनी सांगितले.


काळिमा फासला : उद्धव ठाकरे
मनसेच्या कार्यकर्त्यांचा बलात्कार प्रकरणात सहभाग असल्याची घटना घडल्याचे पत्रकारांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, "अशी घटना घडल्याची माहिती मला नुकतीच मिळाली. ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभत नाही.'


(sakaal,25 th july)

दूधभेसळ करणारे रॅकेट उद्‌ध्वस्त

सात जणांना अटक

नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांत भेसळ करून त्यांची खुल्या बाजारात विक्री करणारे रॅकेट चारकोप पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत काल शुक्रवारी उद्‌ध्वस्त केले. याप्रकरणी सात जणांच्या टोळीला चारकोप पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून दीड हजार लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत करण्यात आले आहे.
चारकोप येथील सह्याद्रीनगरातील सिद्धिविनायक सोसायटीच्या समोरील बाजूला असलेल्या एका घरात अनेक दिवसांपासून आरे, गोकुळ, महानंद आदी प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधाच्या पिशव्यांत भेसळ करून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार काल मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास चारकोप पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी असलेल्या एका घरात छापा टाकला. या वेळी त्या घरात सात जण दुधाच्या पिशवीतील दूध काढून त्यात पाणी मिसळून त्यांची नव्याने पॅकिंग करीत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी या सातही जणांना जागीच अटक केली. सत्या गोविंद मांढरा (22), सैदू राजू जाला (22), राजा जाला (36), लिंगय्या गोडसू (19), श्रीशैलम मल्लेश उकेडी (29), शंकर सतगोंडा (19) आणि मल्लेश मल्लेपुल्ला (19) अशी आरोपींची नावे आहेत. हे सगळे आरोपी कांदिवलीच्या लालजीपाडा झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती चारकोप पोलिसांनी दिली. एक लिटर पिशवीतून 250 ग्रॅम दूध काढून त्यात तेवढ्याच वजनाचे पाणी मिसळून; तर अर्धा लिटर दुधाच्या पिशवीत 200 ग्रॅम पाणी मिसळून पिशवी नव्याने सीलबंद केली जात असे. पोलिसांनी या छाप्यात भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही मोठ्या प्रमाणावर जप्त केले. पहाटे उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक गजानन बागडे यांनी दिली.

(sakaal,25 th july)

लाटांच्या तांडवात काही भिजले, तर काही थिजले...


मुंबईत किनाऱ्यांवर निर्बंध झुगारून गर्दीला उधाण!


गेल्या आठवडाभरापासून गाजत असलेले "मोसमा'तील सर्वात उंच लाटेचे भाकित "याचि डोळा' अनुभवण्यासाठी मुंबईकरांनी शुक्रवारी सगळेच किनारे, चौपाट्यांवर प्रचंड गर्दीचे उधाण आणले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सागराचे हे कौतुक पाहणारे हौशी मुंबईकर अवाढव्य-बेभान लाटांचे तुषार अंगावर घेत जल्लोषात बुडाले. काहीजण लाटांनी असे मजेत भिजले, तर किनारपट्टीवरील जी घरे या लाटांच्या तडाख्यांनी कोसळली तेथील रहिवासी दर्याचे हे रौद्र रूप पाहून थिजून गेले. मुंबईतील जनजीवनाच्या अशा दोन बाजू आज अनुभवास आल्या.

आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजून तीन मिनिटांनी तब्बल 5.5 मीटर उंचीची लाट उसळणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते. त्या वेळी समुद्रात महाकाय लाटा उसळल्याने समुद्रकिनारी जमलेल्या नागरिकांनी एकच जल्लोष केला. या वेळी लाटांची उंची खरोखरच साडेपाच मीटर होती काय, अशी विचारणा मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षात करण्यात आल्यावर, "आम्ही लाटांची उंची मोजत नाही' असे उत्तर मिळाले; मात्र हवामान खात्याच्या भाकितानुसार या लाटा तेवढ्या उंचीच्या असल्याचे मानायला हरकत नाही, असा निर्वाळाही तेथील कर्मचाऱ्यांनी दिला.

फेसाळलेल्या लाटांच्या तडाख्यांनी चिंब भिजणारी, बेधुंद झालेली तरुणाई दिसत होती. लाटांच्या तांडवामुळे होणारी हानी टाळण्यासाठी पोलिस, महापालिका यांच्यासह आपत्कालीन व्यवस्था पथकांनाही सतर्क करण्यात आले. आठवडाभरापासूनच याबाबत दक्षतेचा इशारा दिला जात होता; मात्र आज दिवसभर पावसाने उघडीप घेतल्याने समुद्रकिनाऱ्यावर लाटांचा रुद्रावतार पाहण्यासाठी हजारो मुंबईकरांनी गर्दी केली. गेट-वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, वरळी चौपाटी, वांद्रे बॅण्ड स्टॅंड, दादर चौपाटी येथील किनाऱ्यावर गोळा झालेली तरुणाई लाटांच्या तुषारांनी चिंब भिजत धम्माल उडविताना दिसत होती. गेट-वे ऑफ इंडिया आणि नरिमन पॉईंट येथील सुरक्षा भिंतींना थडकून उंचच उंच उडणाऱ्या लाटांवर स्वार होत पोहण्याची मौज काही धाडसी तरुण घेताना दिसत होते.

सातत्याने उसळत असलेल्या लाटांपासून नागरिकांना लांब ठेवण्याकरिता पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांपासून दहा मीटर अंतरावर दोरखंड लावून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र वरळी सीफेस, बॅण्ड स्टॅंडसह सर्वच ठिकाणी पोलिसांचे निर्बंध झुगारून नागरिक लाटांचे तुषार अंगावर उडवून घेण्यात दंग होते. महाविद्यालयीन विद्यार्थी अन्‌ प्रेमी युगुलांचाही यात समावेश होता.

किनाऱ्यावर कहर
कफ परेड, कुलाबा येथील समुद्रकिनाऱ्यांवर मात्र या लाटांनी अक्षरशः कहर केला. समुद्रालगत वर्षांनुवर्षे असलेल्या झोपडीवजा घरांना या लाटांनी तडाखे दिले. समुद्राचे उसळणारे पाणी बधवार पार्क येथे असलेल्या शिवसृष्टी मच्छीमारनगरातील घरांतही शिरले. येथील पन्नासहून अधिक घरांत हे पाणी शिरल्याने याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी आपली घरे रिकामी केली होती. घरात गुडघाभर साचलेले पाणी काढण्याकरिता येथील नागरिक दुपारी उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. असाच प्रकार कफ परेड येथील गीतानगर येथेही दिसत होता. लाटांच्या पाण्यामुळे येथील घरांत सहा फुटांहून अधिक पाणी साचले होते. हे पाणी काढण्याकरिता मुंबई महापालिकेने अवघे तीन पंप लावल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत होता. कुलाबा येथील भाई बांदल मच्छीमारनगर, शिवशक्तीनगर, सीतानगर या ठिकाणी लाटांच्या तडाख्यामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांच्या भोजन; तसेच निवाऱ्याची व्यवस्था शिवसेना दक्षिण- मुंबई विभागामार्फत नजीकच्या बालवाडी आणि शिवसेना शाखेत करण्यात आली होती.



(sakaal, 24 th july)

अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घ्या!

मुंबई हल्ल्याच्या वेळी पोलिस आणि एनएसजी कमांडोंनी कंठस्नान घातलेल्या लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानला पुन्हा एकदा पत्र पाठविले जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शेकडो निष्पापांचे प्राण घेणाऱ्या लष्कर ए तोयबाच्या दहापैकी नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह गेल्या आठ महिन्यांहून अधिक काळ जे जे रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला त्यांचा साथीदार अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबच्या चौकशीत हे सर्व अतिरेकी पाकिस्तानचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्याबाबत पाकिस्तानकडे विचारणा केली होती; मात्र पाकिस्तानने हात झटकून हे अतिरेकी पाकिस्तानी नसल्याचे म्हटले होते. मुंबई हल्ल्याचा खटला सुरू झाल्यानंतर या प्रकरणात पुन्हा आपली भूमिका बदलत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब हा पाकिस्तानचा रहिवासी असल्याचे कबूल केले होते. यानंतर पाकिस्तानने या हल्ल्यात पोलिस आणि एनएसजी कमांडोंच्या गोळीबारात ठार झालेले अबु आकाशा ऊर्फ बाबर इम्रान आणि अब्दुल रहमान बडा ऊर्फ शफीक अर्शद हे अतिरेकीदेखील पाकिस्तानच्या मुलतान प्रांतात राहणारे असल्याची कबुली दिली आहे. अबू आकाशा याला नरिमन हाऊसमध्ये; तर अब्दुल रहमान बडा याला हॉटेल ताजमध्ये एनएसजी कमांडोंनी गोळीबारात ठार मारले होते.
या अतिरेक्‍यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी पुन्हा नव्याने पत्रव्यवहार करण्याचे ठरविल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. जे.जे. रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलेल्या या अतिरेक्‍यांच्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्यासाठी यापूर्वी पोलिसांनी ब्लॅक कॉर्नर नोटीसही बजावली होती; मात्र पोलिसांच्या या पत्रव्यवहाराला यश आले नव्हते. या अतिरेक्‍यांना भारतात दफन करण्यास काही मुस्लिम संघटनांनीही विरोध दर्शविला होता. पाकिस्तान सरकारने कसाब आणि ठार झालेले अन्य दोन अतिरेकी पाकिस्तानी असल्याचे सांगितले असले, तरी अद्याप त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडे कोणीही दावा केलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.


(sakaal, 22nd july)

अबू जुंदलच्या अस्तित्वाबद्दल पोलिसांमध्ये साशंकता

मुंबईवरील अतिरेकी हल्लाप्रकरणी पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने गुन्ह्याची कबुली देताना त्याला हिंदी शिकविणाऱ्या अबू जुंदल नावाच्या भारतीयाचे नाव घेतले असले तरी अशी व्यक्तीच अस्तित्वात असण्याबाबत पोलिस साशंक आहेत. कसाबने आजवर दिलेल्या कबुलीजबाबात अशा कोणा व्यक्तीचा यापूर्वी कसलाच उल्लेख झालेला नाही. कसाबने आतापर्यंत न्यायालयात सगळेच सत्य सांगितलेले नाही. या प्रकरणात त्याच्याकडून आणखी बरेच सत्य बाहेर येणे बाकी असल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आपला गुन्हा कबूल करून शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. कसाबने न्यायालयात दिलेल्या कबुलीनाम्यात अबू जुंदल याचे नाव पहिल्यांदाच घेतले. यापूर्वी कसाबच्या झालेल्या चौकशीत त्याने अशा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नव्हते. याशिवाय न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुलीजबाबातही त्याने अशा कोणत्याही व्यक्तीने त्याला हिंदी शिकविल्याचे स्पष्ट केले नव्हते. कसाबने सांगितलेल्या अबू जुंदलबाबत पाकिस्तानकडे विचारणा करण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना मारिया यांनी लवकरच योग्य ती पावले उचलली जातील, असे सांगितले. कसाब याने केलेल्या गुन्ह्याची न्यायालयात कबुली दिली असली तरी त्याने बऱ्याच बाबी न्यायालयात स्पष्ट करणे बाकी आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली नसती तरी आमच्याकडे त्याच्याविरुद्ध असलेले सबळ आणि भक्कम पुरावे त्याला शिक्षा होण्यासाठी पुरेसे आहेत. त्याच्या कबुलीमुळे या खटल्याच्या निकालासाठी चांगलीच मदत होईल असेही ते म्हणाले. कसाबच्या कबुलीनंतर या प्रकरणी सरकारी पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि ज्येष्ठ विधीतज्ञांची मदत घेतली जाईल असेही मारिया यावेळी म्हणाले.


(sakal,21 st july)

बनावट नोटांसह चौघांना अटक

44 लाखांच्या नोटांचे केले वितरण

पाकिस्तानातून मुंबईत वितरणासाठी आणलेल्या एक लाख सत्तावीस हजारांच्या बनावट नोटांसह चौघांना पोलिसांनी सी.पी. टॅंक येथे अटक केली. या चौघांनी सहा महिन्यांत मुंबईत 44 लाखांच्या बनावट नोटांचे वितरण केल्याची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज येथे सांगितले.
बनावट नोटांचे वितरण करणारी टोळी सी. पी. टॅंक येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट- 2 च्या पथकाला मिळाली. त्यानुसार कोठारी रुग्णालयासमोर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सापळा लावून प्रमोदकुमार श्रीवास्तव ऊर्फ कुशवाह ऊर्फ महातो (37, रा. बिहार), नित्यानंद शेट्टी (37, रा. घाटकोपर), नरसाराम पुरोहित (32, रा. नागपाडा) आणि कुलदीप शर्मा (20, रा. मुसाफिरखाना) या चौघांना अटक केली. त्यांची तपासणी केली असता एक हजाराच्या 100; तर पाचशेच्या 55 नोटा पोलिसांना सापडल्या. नोटांची तपासणी केल्यानंतर त्या बनावट असल्याचे आढळल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. मुंबई आणि सभोवतालच्या परिसरातील व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांच्या मदतीने ते या नोटा वितरित करीत असल्याचे स्पष्ट झाले. या व्यापारी व घाऊक विक्रेत्यांना बनावट नोटांच्या वितरणाच्या मोबदल्यात चाळीस टक्के कमिशन दिले जात असे. आरोपींकडे सापडलेल्या नोटांची छपाई अतिशय चांगल्या दर्जाची असून त्यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांची स्वाक्षरी आहे.
यापूर्वी राज्य दहशतवादविरोधी पथकाने माझगाव येथून हस्तगत केलेल्या साडेतीन लाखांच्या बनावट नोटांवरसुद्धा रेड्डी यांचीच स्वाक्षरी होती. या बनावट नोटा पाकिस्तानच्या सरकारी छापखान्यात छापल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रमोदकुमार श्रीवास्तव याने या बनावट नोटा पाकिस्तानातून इस्माईल नावाचा व्यक्ती पुरवत असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याशिवाय आरोपींच्या चौकशीत राजेश पुरोहित या आणखी आरोपीचे नाव पुढे आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस इस्माईल आणि राजेश पुरोहित यांचा शोध घेत असल्याचे मारिया म्हणाले.

(sakal, 21st july)

कसाबला फासावर चढवा; दोषी अधिकाऱ्यांनाही शिक्षा द्या

शहीद विजय साळसकर यांच्या पत्नीची मागणी

"मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने आज न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली, ही काही आनंदोत्सव साजरा करण्यासारखी बाब नाही. कारण सबंध जगाला तो गुन्हेगार असल्याचे माहिती आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली जावी, तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा हल्ला घडला, त्या दोषी अधिकाऱ्यांनाही शिक्षा करण्यात यावी,' अशी प्रतिक्रिया अतिरेक्‍यांचा मुकाबला करताना शहीद झालेले खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली आहे.

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलिसांच्या हाती जिवंत सापडलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. आज खटल्याच्या सुनावणीच्या वेळी कसाब याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत प्रतिक्रिया देताना स्मिता साळसकर यांनी कसाबला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

स्मिता साळसकर म्हणाल्या की, "पाकिस्तान हे राष्ट्र समझोता करून सुधारणा होणाऱ्यातले नाही. या राष्ट्राचा आणि तेथील अतिरेक्‍यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. त्याशिवाय आम्हा शहिदांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. भारतावर वेळोवेळी पाकिस्तानकडूनच हल्ला झालेला आहे. त्यांच्याशी समझोत्याची भाषा करणे चुकीचेच आहे. अतिरेकी कसाबने नावे सांगितलेल्या पाकिस्तानमधील त्याच्या साथीदारांवरही कारवाई व्हायलाच हवी.' पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच हा प्रकार घडला आहे. त्यांच्या चुकांना पाठीशी घालता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणात जे अधिकारी दोषी आहेत त्यांनाही शिक्षा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

लवकर फाशी द्या : विनिता कामटे
अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबने दिलेल्या कबुलीनंतर आता खटल्यात विशेष काही राहिलेले नाही. त्यामुळे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मुंबई हल्ल्यात अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी केली. शेकडो निष्पापांना प्राण गमवावे लागलेल्या या हल्ल्याने झालेले नुकसान भरून येण्यासारखे नाही, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.


-----

कसाबच्या कबुलीने कायदेशीर अडचणच : वाय. पी. सिंग

आंतरराष्ट्रीय कट; अन्य सहआरोपींविरुद्ध खटला सुरूच राहणार

मुंबई हल्ल्यातील आरोपी अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी त्याचा खटल्यावर काही विशेष परिणाम होणार नाही. हा एक आंतरराष्ट्रीय कट असल्याने त्याच्या कबुलीनंतर उलट कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे. अन्य सहआरोपींकरिता हा खटला सुरूच राहील, असे मत माजी आयपीएस अधिकारी व विधीज्ञ वाय. पी. सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

अतिरेकी कसाब तसेच या हल्ल्याच्या मास्टर माइंडविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, त्यामुळे कसाबला फाशीची शिक्षा होणे निश्‍चित आहे; मात्र या प्रकरणातील आरोपींची संख्या मोठी असल्याने त्यांच्यावर या कबुलीचा फारसा प्रभाव पडणार नाही, असे वाय. पी. सिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "कसाबने दिलेली कबुली न्यायालय ग्राह्य धरेल; मात्र अन्य आरोपींकरिता हा खटला सुरू ठेवला जाईल. कसाबच्या कबुलीनंतर पाकिस्तानवरील दबावही वाढेल. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र असल्याने कसाबच्या कबुलीचा तेथे सुरू असलेल्या खटल्यावरही परिणाम होणार नाही. ते त्यांच्या पद्धतीने खटला चालवतील. भविष्यात पाकिस्तानने भारताला बाजू मांडण्याची संधी दिल्यावर मात्र या कबुलीचा परिणाम तेथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यावर होऊ शकेल.'

कोणत्याही खटल्यात उपलब्ध पुराव्यांनुसार आरोपीला शिक्षा होते. भारताकडे कसाब, त्याचे साथीदार अतिरेकी आणि पाकिस्तानातून त्यांना सूचना देणारे लष्कर ए तय्यबाचे कमांडर यांच्याविरुद्ध भक्‍कम पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे या खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात येईल, असे मत वाय. पी. सिंग यांनी व्यक्‍त केले.


(sakaal, 20 th july)

Saturday, July 18, 2009

मुलीला सांभाळणाऱ्याची केवळ संशयावरून हत्या


चौघांना अटक; खारमधील दुहेरी हत्येचे गूढ उकलले


अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करीत असल्याच्या केवळ संशयातून आठवडाभरापूर्वी खार येथे झालेल्या दोन तरुणांच्या हत्येप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चारही आरोपींना न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हत्येची ही घटना 9 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली होती.

खार पूर्वेला असलेल्या एका झोपडपट्टीत वकील बुद्धीराम चव्हाण (25) याच्या घरात एक आठ वर्षांची मुलगी झोपली होती. वकील तिच्या शेजारीच होता. तो या मुलीशी अतिप्रसंग करीत असल्याच्या केवळ संशयावरून जवळच राहणाऱ्या तरुणांच्या गटाने त्याच्यावर बांबू आणि सळईने हल्ला केला. वकील याला वाचविण्यासाठी त्याचा नातेवाईक अनिश चव्हाण (19) मध्ये पडला. त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. या हाणामारीत पोटावर गंभीर जखमा झाल्यामुळे वकील आणि अनिश या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मारेकरी तरुणांचा गट तेथून पळून गेला होता. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वकील याच्या शेजारी राहणारा एक सुरक्षा रक्षक क्षयरोगावरील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल असल्यामुळे त्याच्या आठ वर्षांच्या मुलीचा सांभाळ वकील करीत होता. या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा आठ महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. 9 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास वकील याच्या झोपडीत लहान मुलगी झोपल्याचे काही तरुणांनी पाहिले. वकीलही तिच्या शेजारीच असल्याने तो तिच्याशी अतिप्रसंग करीत असल्याचा संशय या तरुणांना आला. त्यांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्यात वकील आणि त्याचा नातेवाईक अनिश हे दोघेही मरण पावले.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेंद्र धिवार, सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा कपिले यांचे पथक करीत होते. चौकशीअंती हा प्रकार झोपडपट्टीसमोरील कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणांच्या गटानेच केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिस या तरुणांचा शोध घेत होते. या प्रकरणातील आरोपी मालाडच्या गणेशनगर परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यरात्री उशिरा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अल्ताफ ऊर्फ छोटू निजाम हुसैन (19), मोहम्मद हनिफ खान (19), उस्मान ऊर्फ विरू ऊर्फ मोहम्मद शेख (23) या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांच्या माहितीवरून वांद्रे टर्मिनल येथून गणेश किसन गवळी (22) याला अटक करण्यात आली. केवळ गैरसमजातून हल्ला केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.


(sakaal, 17th july)

मोक्का न्यायाधीश शिंदेंची सुरक्षाव्यवस्था कडक


पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांची माहिती


मालेगाव बॉम्बस्फोट मालिका आणि इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांचा खटला चालविणारे विशेष मोक्का न्यायाधीश वाय. डी. शिंदे यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांना आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. न्यायाधीश शिंदे यांनी यासंबंधीचे पत्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले असून आवश्‍यकता भासल्यास त्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांच्या सुरक्षिततेकरिता योग्य ती दक्षता घेण्यात आल्याचेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले.

मालेगाव येथे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि तिच्या साथीदारांविरुद्ध सुरू असलेला खटला न्यायमूर्ती शिंदे हाताळत आहेत. याशिवाय देशभरात 2005 सालापासून झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांत सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या 21 अतिरेक्‍यांविरुद्धचा खटलाही त्यांच्याच न्यायालयात सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांना दूरध्वनीवर एका अनोळखी व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी याबाबत मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन सातत्याने येत असलेल्या धमकीच्या दूरध्वनींची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या अर्जानंतर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ केल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी दिली. तपासाअंती हा दूरध्वनी एका लोकल पीसीओवरून येत असल्याचे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन उद्या (ता. 16) मुंबईत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणेला सज्ज ठेवण्यात आले आहे. यासंबंधी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकन कौन्सिलेटचे उच्चाधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत. क्‍लिंटन यांच्या मुंबईतील उद्या दिवसभरातील कार्यक्रमाचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झाले नसल्याचेही शिवानंदन या वेळी म्हणाले. क्‍लिंटन उद्या अतिरेक्‍यांचे लक्ष ठरलेल्या हॉटेल ताज आणि ओबेरॉयला भेट देण्याची दाट शक्‍यता असल्याने तेथेही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाणार आहे. मुंबईत दोन अतिरेकी घातपाताच्या इराद्याने फिरत असल्याच्या वृत्ताबद्दल प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते म्हणाले, अशा प्रकारची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. अफवा पसरवून सामान्य जनतेत घबराट पसरविणाऱ्या प्रसिद्धिमाध्यमांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही शिवानंदन यांनी या वेळी स्पष्ट केले.


इस्राईल अभ्यास दौरा

इस्राईल येथे अभ्यासदौऱ्याकरिता गेलेले पोलिसांचे पथक महाराष्ट्रात परतल्यानंतर या दौऱ्यात घेतलेल्या प्रशिक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. इस्राईलची सुरक्षाविषयक यंत्रणा भारतापेक्षा सक्षम आहे. या अभ्यासदौऱ्यानंतर राज्य पोलिस दलात करावयाच्या सुधारणा आणि घ्यायच्या सुरक्षाविषयक दक्षतेचा अहवाल सरकारला दिला जाणार असल्याचेही शिवानंदन यांनी सांगितले.


(sakaal, 16th july)

Thursday, July 16, 2009

किनाऱ्यावरील राज्यांविषयीचा गुप्तचरांचा अहवाल रुटीन

जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असल्याचे सिद्ध करण्याकरीता मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर सुरू असलेला खटला महत्त्वपूर्ण असल्याचे वक्तव्य गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या समुद्रकिनाऱ्यावरील राज्यांना अतिरेकी हल्ल्याचा आलेला गुप्तचर खात्याचा अहवाल "रुटीन' आहे. मात्र, यासंबंधी पोलिसांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

आझाद मैदान पोलिस क्‍लब येथे आयोजिलेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पश्‍चिमी सागरी किनाऱ्यावरील राज्यांना अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा अहवाल "आयबी'कडून प्राप्त झाला. पोलिस आणि अन्य गुप्तचर यंत्रणांनी दक्ष राहावे यासाठी अशाप्रकारचे "ऍलर्ट' नेहमीच येत असतात. मात्र, काही वेळेला या अहवालाची माहिती प्रसिद्धिमाध्यमांकडे पोचत असल्याने त्यातून सामान्य जनतेत घबराट पसरत असल्याचे पाटील म्हणाले. गुप्तचर खात्याकडून मिळणाऱ्या अहवालाची नेहमीच गंभीर दखल घेऊन त्याप्रमाणे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवत दक्षता बाळगली जाते, असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात अतिरेकी हल्ला कसा होईल याचा अंदाज बांधता येत नाही, हे 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याने सिद्ध झाल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानच्या जमिनीवर रचला गेला. हा हल्ला करणारे फिदायीनदेखील पाकिस्तानीच होते. पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र ठरविण्यासाठी ही नामी संधी आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर सुरू असलेला खटला महत्त्वाचा आहे, असेही गृहमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. या हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिसांनी दाखविलेले धाडस अतुलनीय असल्याचा उच्चारही त्यांनी केला. मुंबई पोलिस दलाचे एक पथक नुकतेच इस्त्रायल येथे गेले आहे. यापुढील काळात पोलिस अधिकाऱ्यांची अशीच पथके प्रशिक्षणासाठी अमेरिका, इंग्लंड आणि चीन येथेही पाठविली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
गुन्हेगारीचे विश्‍व गेल्या काही वर्षांपासून बदलत आहे. गुन्हेगारीचा प्रवास आता दहशतवादाकडेही होत असताना प्रसिद्धिमाध्यमांनी वाईट गोष्टींचे उदात्तीकरण करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी भाषणात दिला.


मुंबईत सुरक्षा वाढविली
जम्मू येथे एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तरुणाकडे सापडलेल्या लॅपटॉपमध्ये मुंबई, नवी मुंबईतील रेल्वे स्थानके आणि चेन्नई येथील महत्त्वपूर्ण ठिकाणांची छायाचित्रे तसेच महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुंबईत दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या इशाऱ्यानंतर शहरातील प्रमुख ठिकाणांवरील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.


(sakaal, 15 th july)

पैसा झाला खोटा




बनावट नोटांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर समित्या

भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी खोट्या पैशांचा मोठा पाऊस पाडण्याच्या पाकिस्तानच्या आएएसआय या गुप्तचर संघटनेच्या कारस्थानांना प्रतिबंध करण्यासाठी आता महाराष्ट्रात जिल्हास्तरावरही समित्या स्थापन करण्यात आल्याची माहिती राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुंवशी यांनी "सकाळ'ला दिली. पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवरून भारतात मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात येणाऱ्या बनावट चलनी नोटांच्या वितरणाला आळा घालण्याकरीता केंद्र सरकारच्या स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारच्या छापखान्यात छापल्या जाणाऱ्या या बनावट नोटांच्या वितरणाचा व्यापार दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बांगलादेश आणि नेपाळमार्गे या बनावट नोटा आजही मोठ्या प्रमाणात येतात. मुंबईत राहणारे फेरीवाले, मजूर अशा काही दुर्लक्षित घटकांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत या बनावट नोटांचे वितरण होते. एक लाख रुपयांच्या नोटांचे वितरण केल्यानंतर त्यातील 30 हजार रुपये या नोटांचे वितरण करणाऱ्या दलालाला दिले जातात. बनावट नोटांच्या या व्यापारातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांकरीता वापरला जात असल्याचे 11 जुलै 2006 रोजी रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीत स्पष्ट झाले. भारतीय अर्थव्यवस्थेला भगदाड पाडण्यासाठी बनावट नोटांचे हे जाळे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेमार्फत पसरविले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. 15 मे रोजी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने माझगाव येथून तीन लाख 45 हजार रुपयांच्या बनावट नोटांचे वितरण करणाऱ्या सहा जणांना अटक केली. आरोपींकडून मिळालेल्या या नोटांची छपाई अतिशय उच्च प्रतीची होती. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या स्वाक्षरीच्या या बनावट नोटांची छपाई पाकिस्तानच्या शासकीय छापखान्यातच झाल्याचा अंदाज तपासयंत्रणांनी व्यक्त केला आहे. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे नोटांच्या छपाईसाठी जर्मनीहून कागद आयात करतात. पाकिस्तानकडून मात्र त्यांना छपाईकरीता आवश्‍यक असलेल्या कागदापेक्षा 25 टक्के अधिक कागद मागविण्यात येतो. हाच अतिरिक्त कागद भारतीय चलनी नोटांची छपाईसाठी वापरला असल्याची माहिती भारतीय तपास यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) सोपविण्यात आल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सीमेपलीकडून भारतात बनावट चलनी नोटांच्या वाढत्या वितरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. याशिवाय राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्याही स्थापण्यात आल्या आहेत. बनावट नोटा बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाया करण्यापासून सामान्य जनतेत नोटांविषयी जागृतीचे काम या समित्यांद्वारे केले जात आहे. रिझर्व्ह बॅंकेनेही नोटांच्या छपाईच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यायला सुरवात केल्याची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी सांगितले.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी डोंगरी येथे छापा घालून साडेएकोणीस लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या होत्या. यावेळी पोलिसांनी "आयएसआय'शी असलेल्या कथित संबंधांवरून सुलेमान पटेल नावाच्या आरोपीला अटक केली होती. यापूर्वी पाकिस्तानात छपाई करण्यात आलेल्या नोटा दुबईमार्गे भारतात विमानाने पाठविल्या जात होत्या. पोलिसांनी हे रॅकेट उद्‌ध्वस्त केल्यानंतर हवाईमार्गाने बनावट चलनी नोटा आणणे थांबले. यानंतरच्या काळात भारतीय नोटांची छपाई बांगलादेशातही केली जात होती. या बनावट नोटांच्या वितरणाला आळा घालण्यासाठी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बॅंकेने सुरक्षिततेच्या उपाययोजना करून नवीन नोटांची छपाई केली होती. मात्र, या नोटांसारख्याच बनावट नोटांची पाकिस्तानच्या छापखान्यातून छपाई झाल्याचे दोन महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत उघड झाल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने "सकाळ'ला सांगितले.

(sakaal, 15 th july)

नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडणार!




पावसाळ्यानंतर केंद्र सरकार करणार धडक कारवाई


नक्षलग्रस्त भागात सातत्याने वाढत असलेल्या हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी केंद्र सरकारने खास प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यानंतर या नक्षलवाद्यांवर धडक कारवाई करण्याची पोलिसांची योजना आहे. ऑक्‍टोबरअखेर जोमाने सुरू होणाऱ्या या कारवाईसाठी केंद्राकडून महाराष्ट्रात केंद्रीय अर्धसैनिक सुरक्षा दलाचे तीन हजार जवान पाठविले जाणार आहेत. गडचिरोली आणि गोंदिया या भागांत हे जवान तैनात केले जाणार आहेत. ही माहिती राज्य पोलिस दलातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात गडचिरोली आणि गोंदिया येथील नक्षलवाद्यांच्या कारवायांत गेल्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगड हद्दीवर असलेल्या राजनांदगावच्या मानपूर या गावात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी 38 पोलिसांचे बळी घेतले. त्यापूर्वी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सोळा पोलिस धारातीर्थी पडले. या घटनेनंतर राज्य पोलिस दलाने गडचिरोली आणि गोंदिया या भागांत गस्त वाढविली आहे. गेल्या काही महिन्यांत नक्षलग्रस्त भागांत वाढलेल्या कारवायांची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या अंबुजमाड भागात प्रामुख्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांचे केंद्र आहे. तब्बल चार हजार चौरस किलोमीटरचा हा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने या ठिकाणी पोलिसांना थेट कारवाई करणे अवघड होते. नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्याकरिता नक्षलग्रस्त राज्यांत केंद्र सरकारने "स्पेशल कमांडो' पथक तयार केले असून केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे नक्षलवाद्यांविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व सोपविले आहे.
नक्षलवाद्यांच्या कारवायांचा कडवा मुकाबला करण्यासाठी ऑक्‍टोबरमध्ये पोलिसांची विशेष "ऑपरेशन' सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांनी "सकाळ'ला दिली. सध्या या भागात पोलिसांची विशेष पथके नेमलेली असून त्यांची नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या "दलम्‌'सोबत लढाई सुरूच आहे; मात्र केंद्र सरकारकडून ऑक्‍टोबरमध्ये मिळणाऱ्या तीन बटालियनच्या (तीन हजार जवान) मदतीने नक्षलवादी कारवायांना कायमस्वरूपी आळा घालण्यास मदत होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. रविवारी महाराष्ट्राच्या सीमेवर छत्तीसगडमधून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांची पद्धत गेल्या महिन्यात गडचिरोलीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याशी मिळतीजुळती असल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

(sakaal, 14 th july)

खंडणीसाठी बालकाची हत्या करणाऱ्या तिघांना अटक

तीन महिन्यांपूर्वी कराड येथे कृष्णा कोयना नदीच्या पात्रात सापडलेल्या अंधेरी येथील सात वर्षांच्या बालकाची पंधरा लाख रुपयांच्या खंडणीकरिता झालेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आरोपींमध्ये मृत बालकाच्या इमारतीतच राहणारा तरुण आणि त्याची आई तसेच त्यांचा कराड येथील मावसभाऊ या तिघांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

अंधेरीच्या न्यू म्हाडा कॉलनीतील साईधाम इमारतीत राहणाऱ्या साहिल दळवी या बालकाचा मृतदेह कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या पात्रात 23 फेब्रुवारीला आढळला होता. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांसह गुन्हे शाखेच्या युनिट- 10 चे पथकही तपास करीत होते. अंधेरीच्या सेंट झेवियर्स शाळेत दुसरीला शिकणारा साहिल 3 फेब्रुवारीपासूनच बेपत्ता होता. दररोज सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान साईधाम इमारतीतच पहिल्या मजल्यावर शिकवणीसाठी जाणारा साहिल 3 फेब्रुवारीला दुपारपर्यंत घरी न परतल्याने त्याचे आई-वडील आणि नातेवाईक त्याचा सर्वत्र शोध घेत होते; मात्र साहिलचा शोध न लागल्याने या प्रकरणी त्याच्या आई-वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.
साहिलचा शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साहिलचे वडील अंकुश दळवी यांना पंधरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी दूरध्वनीवरून धमकी आली होती. आपण धारावीतून बोलतोय, खंडणीची रक्कम न दिल्यास मुलाला मारण्याचीही धमकी या दूरध्वनीवरून देण्यात आली होती. एका खासगी कंस्ट्रक्‍शन कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला असलेले साहिलचे वडील अंकुश दळवी यांचे मूळ गाव कराड परिसरातच असल्याने या हत्येमागे त्यांच्या कुटुंबाशी संबंधित कोणी आहे का, याचाही शोध पोलिस घेत होते.
बरेच दिवस या प्रकरणाचा तपास न लागल्याने अंकुश दळवी यांनी 2 जुलै रोजी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. याप्रकरणी तपास करणाऱ्या युनिट -10 च्या पोलिसांनी साहिल राहत असलेल्या परिसरात तपास करायला सुरवात केली होती. तपासाअंती खंडणीसाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल फोनवरून एक कॉल साईधाम इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या उमेश जाधव (24) यांच्या भावालाही आला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी उमेश जाधव यांच्या कुटुंबीयांच्याही चौकशीला सुरवात केली होती. चौकशीअंती उमेश गणपत जाधव यानेच साहिलच्या हत्येचा कट रचल्याचे उघडकीस आले. या कटात त्याची आई छाया (54) आणि मावसभाऊ अतुल देसाई (20) यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले. घरची गरिबी घालविण्यासाठी खंडणीकरिता ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल उमेश जाधव याला अंधेरी येथून, तर अतुल देसाई याला कराड येथून अटक केली. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून एका बीपीओ कंपनीत काम करणाऱ्या उमेशने 3 फेब्रुवारीला दुपारी साहिलला कॉम्प्युटरवर गेम्स दाखवण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी नेले. यानंतर उमेश आणि त्याची आई या दोघांनी मिळून साहिलची हत्या केली. यानंतर उमेशने साहिलचा मृतदेह एका रेक्‍झीन बॅगेत भरून कराडला नेला. तेथे त्याने मावसभाऊ अतुल देसाई याच्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावली. जानेवारी महिन्यातच उमेश जाधव याने साहिलचा खंडणीसाठी हत्या करण्याचा कट आखला होता. हत्येनंतर त्याने अंकुश दळवी यांना खंडणीची मागणी करण्यासाठी वापरलेल्या मोबाईल फोनवरून एक फोन मुंबईतच त्याच्या लहान भावाला केल्याने हे प्रकरण उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

(sakaal, 13 th july)

पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबादेतील घरावर छापे

महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत

कॉंग्रेसनेते पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद येथील घरावर आणि तेरणा शिक्षण संस्थेच्या कार्यालयावर आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे घातले. या छाप्यांत सीबीआयच्या पथकाला पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याचा दावा सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना केला.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले खासदार पद्मसिंह पाटील यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सीबीआयने त्यांच्या उस्मानाबाद व तेर गावातील घरांवर जून महिन्याच्या अखेरीस छापे घातले; मात्र पाटील यांचे कुटुंबीय घरात नसल्यामुळे या घरांना "सीबीआय'ने सील ठोकले होते. आज सीबीआयच्या सहा सदस्यीय पथकाने खासदार पाटील यांचे चिरंजीव व महसूल राज्यमंत्री राणा जगजित सिंह यांना या घरांचे कुलूप उघडायला लावून तेथे झडती घ्यायला सुरुवात केली. उस्मानाबाद येथील घरावर टाकलेल्या छाप्यात सीबीआयला महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत; मात्र तेर येथील घरातून सीबीआयला विशेष असे काहीच सापडलेले नाही. याशिवाय उस्मानाबाद येथेच असलेल्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयावरही सीबीआयने छापा घातला. सकाळपासून सुरू असलेल्या या छाप्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईत पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण ठरू शकेल असा दस्तऐवजही सापडल्याचे सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी सांगितले.


(sakaal, 11 th july)

मुंबईच्या अंडरवर्ल्डवर नव्या टोळीचे राज्य?





दाऊद, छोटा राजनचे फुटीर एकत्र येण्याची शक्‍यता


कधी काळी मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज्य करणाऱ्या दाऊद आणि छोटा राजन या टोळ्यांना दुहीने ग्रासले आहे. अनेक वर्षे दोन्ही टोळ्यांकरिता काम केल्यानंतर कामाचा योग्य मोबदला न मिळाल्याने दाऊद आणि छोटा राजनचे प्रमुख साथीदार आता या टोळ्यांतून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत.
वेगवेगळ्या टोळ्यांसाठी काम करताना कधी काळी एकमेकांच्या जीवावर उठलेले हे कुख्यात गुंड आगामी काळात मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नवीन टोळीच्या रूपाने एकत्र येण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईच्या अंडरवर्ल्डचा कणा मोडल्याचा दावा पोलिस कितीही करीत असले तरी येथील गुन्हेगारी जगतावर दाऊद आणि छोटा राजन या टोळ्यांचे वर्चस्व अद्याप कायम आहे. रिअल इस्टेटपासून चित्रपट क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांत या दोन्ही टोळ्यांची आजही तेवढीच दहशत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या टोळ्यांत काहीही आलबेल नसल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली. बॅंकॉकमधून आपल्या टोळीची सूत्रे हलविणाऱ्या छोटा राजनला प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्याचे आपल्या टोळीकडे फारसे लक्ष नाही. त्याचे विश्‍वासू साथीदार भरत नेपाळी व विकी मल्होत्रा यांनी टोळीतून फुटलेल्या डी. के. राव याच्या पावलावर पाऊल ठेवत समांतर टोळी चालविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत बऱ्यापैकी बस्तान बसवीत असलेल्या हेमंत पुजारी आणि रवी पुजारी या टोळ्यांची त्यांना चांगलीच मदत मिळत आहे. डी. के. रावपाठोपाठ विकी मल्होत्रानेही छोटा राजनचे ऐकणे सोडून दिले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतही नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दाऊदचा विश्‍वासू साथीदार छोटा शकील आणि लहान भाऊ अनिस इब्राहिम यांच्यात टोळीची सूत्रे हातात घेण्यावरून चांगलाच वाद आहे. पाकिस्तानमधून भारत आणि मध्य आशियात कारवाया करणारा दाऊद या दोघांच्या भांडणाने चांगलाच हैराण झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनिस इब्राहिम आणि छोटा राजन या दोघांचे चांगले जमत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली आहे. याशिवाय गुरू साटम आणि छोटा शकील यांच्यातही "तह' झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. अंडरवर्ल्डवर वर्चस्व निर्माण करण्याकरिता टोळ्यांची होत असलेली ही फाटाफूट त्यांच्या म्होरक्‍यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असलेला पूर्वाश्रमीचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि अबू सालेम यांनीही एकमेकांशी जुळवून घेतल्याचे तुरुंगातील सूत्रांकडून समजते. गवळीचा छोटा राजनच्या डी. के. राव याच्याशीदेखील कोणताही सवतासुभा राहिलेला नाही. आर्थर रोड तुरुंगातच डी. के. राव आणि विकी मल्होत्रा यांच्या गुंडांत चांगलीच हाणामारी झाली होती. त्यामुळेच विकी मल्होत्राला कल्याण तुरुंगात ठेवण्यात आले. मुंबईतील तीन प्रमुख टोळ्यांतील या फुटीरांची लवकरच नवी टोळी गुन्हेगारी विश्‍वात उभी राहण्याची शक्‍यता गुन्हे शाखेतील या अधिकाऱ्याने वर्तविली.

(sakaal,10th july)

"दक्षता' कात टाकणार




हिंदी, इंग्रजी आवृत्त्याही लवकरच

सलग 35 वर्षे पोलिस आणि सर्वसामान्य जनतेतील सुसंवादाचा दुवा ठरणारे दक्षता हे मासिक कात टाकणार आहे. येत्या काही महिन्यांत हे मासिक अधिकाधिक वाचकाभिमुख करण्यासाठी पावले उचलण्यात येत असून, लवकरच त्याच्या हिंदी व इंग्रजी आवृत्त्याही प्रसिद्ध करण्याची योजना आखण्यात येत आहे. पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनीदेखील या मासिकाच्या विस्ताराकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले.
गुन्हेगारी, दहशतवाद, टोळीयुद्ध या विषयांसोबतच गुन्हेगारी जगतातील विविध विषयांवरील वाचकांना खिळवून ठेवणारे लिखाण गेली 35 वर्षे पोलिसांच्या दक्षता मासिकातून प्रसिद्ध होत आहे. पोलिस आणि सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून या दोन्ही घटकांशी संबंधित घडामोडींच्या विश्‍लेषणात्मक लिखाणाला या मासिकात स्थान दिले जाते. गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवरही डोळसपणे लक्ष ठेवून, त्याद्वारे सामान्य नागरिकांनी घ्यावयाची दक्षता आणि त्यांच्या प्रबोधनाला महत्त्व देणाऱ्या या मासिकाचा येत्या काळात चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. सध्या या मासिकाच्या 18 हजार प्रतींची छपाई होते. रंगीत छपाई असलेल्या या अंकाचे राज्य पोलिस दलातील सर्व विभागांसह सामान्य वर्गणीदारांनाही वितरण केले जाते. अनेकदा हा अंक सर्वच घटकांपर्यंत पोचत नसल्याने यापुढील काळात त्याचे वितरण वाढविण्यावर प्रामुख्याने लक्ष दिले जाणार आहे. अंकाच्या छपाईचा आकडाही येत्या काळात वाढविला जाणार आहे.
महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व लेखकांचे लिखाण असलेले हे मासिक लवकरच हिंदी व इंग्रजी भाषांमध्येही छापले जाणार आहे. हिंदी व इंग्रजी वाचकांत "दक्षता'च्या वाचनाची गोडी वाढावी यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी "सकाळ'ला सांगितले. लवकरच "दक्षता'चे हिंदी व इंग्रजी भाषेतील अंक वाचकांच्या हाती पडतील, असेही ते म्हणाले.
पोलिस आणि सामान्य जनतेत या मासिकाचे वितरण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. हे मासिक हिंदी व इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्याची योजनाही लवकरच अमलात येणार असल्याची माहिती या अंकाच्या सरसंपादक व सहायक पोलिस महानिरीक्षक सुप्रिया यादव यांनी दिली.



(sakaal,9 th july)

पश्‍चिम रेल्वेवरील स्थानकांवर घातपाताची शक्‍यता

केंद्रीय गुप्तचरांची माहिती; मुंबईत दक्षतेचा इशारा

पश्‍चिम रेल्वेमार्गावरील स्थानके दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून, या स्थानकांवर घातपात होण्याची शक्‍यता असल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याने मुंबईत दक्षतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी आज येथे दिली. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या सूचनेनंतर मुंबईतील सर्व रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली.

मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या घातपाती हल्ल्यासारखा हल्ला पुन्हा पश्‍चिम समुद्रकिनाऱ्यावर गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांत होण्याची शक्‍यता "आयबी'ने वर्तविली होती. यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने आज पुन्हा एकदा दिलेल्या खबरदारीच्या इशाऱ्यामुळे पोलिसांना दक्षतेचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार मुंबईतील रेल्वेस्थानकांवर दहशतवादी कारवायांची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या या माहितीची खातरजमा करण्यात आली असून, त्यात विशेष असे काहीही आढळले नसल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी सांगितले; मात्र नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने पश्‍चिम रेल्वेवरील चर्चगेट, वांद्रे, अंधेरीसह प्रमुख
रेल्वेस्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली असल्याचीही माहिती विर्क यांनी दिली.

आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने गुप्तचर खात्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनंतर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येतो. आठवडाभरापूर्वी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी अरबी समुद्राला लागून असलेल्या गुजरात, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. त्यातच आज प्राप्त झालेल्या माहितीनंतर पुरेपूर काळजी घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वेचे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी कालपासूनच ही सुरक्षाव्यवस्था वाढविल्याचे सांगितले. 11 जुलै 2006 रोजी झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेच्या घटनेला तीन वर्षे पूर्ण होत असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता स्थानकांच्या सुरक्षिततेत वाढ केल्याचेही शर्मा या वेळी म्हणाले. हा बंदोबस्त आणखी एक आठवडाभर तसाच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


(sakaal,9th july)

बेहरामपाड्यात दोन तास धुमश्‍चक्री

तुफान दगडफेक, दिवाण बिल्डर्स-नागरिकांमध्ये वाद

वांद्रे येथील बेहरामपाड्यात बांधकाम काढण्यावरून दिवाण बिल्डर्स आणि स्थानिक नागरिकांच्या गटांत झालेल्या दगडफेकीत दोन पोलिसांसह आठ जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या वेळी काही दगड जवळच असलेल्या एका मशिदीत नमाज पढणाऱ्या नागरिकांवर पडल्याने काही क्षणातच येथे वाद पेटला. दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेली ही धुमश्‍चक्री पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर थांबली. सायंकाळी उशिरापर्यंत या परिसरात तणावाचे वातावरण होते.

वांद्रे पूर्वेला बेहरामपाड्यात बेस्ट कंपाऊंडमध्ये अंबर हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या जागेवर रफिक कुरेशी यांनी बांधकाम केले आहे. या बांधकामावरून दिवाण बिल्डर्स आणि काही स्थानिक नागरिकांत वाद सुरू होता. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा वाद विकोपाला जाऊन या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी अनंत काणेकर मार्गावर असलेल्या दिवाण बिल्डर्सच्या दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या कार्यालयावर दगडफेक करायला सुरुवात केली. नागरिकांकडून होत असलेल्या या दगडफेकीला दिवाण बिल्डर्सच्या लोकांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत काही दगड जवळच असलेल्या एका मशिदीवर पडले. त्यामुळे या ठिकाणी प्रार्थना करणाऱ्या मुस्लिम बांधवांत गैरसमज झाला. यानंतर बाहेर पडलेल्या काही मुस्लिम बांधवांनीही नागरिकांवर दगडफेक करायला सुरुवात केली. पोलिसांनी वेळीच हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगताच हा प्रकार थांबल्याचे निर्मलनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत बागडे यांनी सांगितले; मात्र स्थानिक नागरिक आणि बिल्डरची माणसे यांच्यातील धुमश्‍चक्री दोन तासांहून अधिक काळ सुरू होती. दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. या दगडफेकीत राज्य राखीव पोलिस दलाचा उपनिरीक्षक व एक पोलिस कर्मचारी यांच्यासह आठ नागरिक जखमी झाले. त्यांना सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दगडफेकीत जखमी झालेल्यांवर उपचार करण्यात येत असून पोलिसांनी दोषींवर कारवाई करायला सुरुवात केल्याची माहिती परिमंडळ- 8 चे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली.


(sakaal,8th july)

रवी कामत यांच्या नोकरासह एकाला कोल्हापूरला अटक

95 लाखांपैकी 75 लाख जप्त

महसूलमंत्री नारायण राणे यांचे माजी खासगी सचिव रवी कामत यांच्या घरातून 95 लाख रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या नोकराला त्याच्या साथीदारासह चेंबूर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 75 लाख 37 हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
चेंबूरच्या अकरावा रस्ता येथील साईसिद्धी इमारतीत हा प्रकार घडला होता. सचिन भिडये (29) आणि मोहम्मद हनिफ युसूफ नाईक (40) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. मूळचा कणकवलीचा असलेला सचिन सध्या बांधकाम व्यवसायात असलेल्या रवी कामत यांच्याकडे नऊ वर्षांपासून काम करीत होता. कामत साईसिद्धी इमारतीतील घरात एकटेच राहतात. त्यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला आहे. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या आत्याने पुण्यात गुंतवणुकीसाठी 95 लाख रुपयांची रोकड आणून कामत यांना दिली होती. कामत यांनी घरात ठेवलेल्या या रकमेची माहिती असल्याने सचिन याने त्याचा मित्र युसूफच्या मदतीने मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोकड असलेली बॅग घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी कामत यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सचिनच्या शोधार्थ पोलिसांची पथके कोकण आणि मुंबई परिसरात पाठविण्यात आली होती. कोकणात गेलेल्या पोलिसांच्या एका पथकाला सचिन पन्हाळा येथील मृणाल हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी मध्यरात्री उशिरा या हॉटेलमध्ये छापा घातला. तेथे सचिन आणि युसूफ याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. पाचुंदकर यांनी दिली. पोलिसांना त्याच्या झडतीत फक्त 75 लाख 37 हजार रुपयांची रोकड मिळाली आहे. उर्वरित रक्कम त्याने कणकवली या गावी पाठविल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून तपासासाठी पोलिस कणकवली येथे गेल्याचेही पाचुंदकर यांनी सांगितले.


(sakaal,8 th july)

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित

26-11 हल्ल्यासंदर्भात पोलिस करणार मंथन



महासंचालकांची माहिती; प्रमाणित कार्यचलन पद्धतीची अंमलबजावणी


मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपत्कालीन स्थितीत सर्व पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा पोलिस अधीक्षक क्षेत्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित करणाऱ्या प्रमाणित कार्यचलन पद्धतीची (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी दिले आहेत. त्यानुसार संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करून त्यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आल्याची माहिती विर्क यांनी "सकाळ'ला दिली. दरम्यान, 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याच्या वेळी झालेल्या चुका शोधून काढण्याकरिता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

सागरीमार्गाने आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत घातपात घडविला. या घातपाती हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता पोलिस प्रयत्नशील आहेत. राज्यात कुठेही दहशती हल्ल्यासारखी आपत्कालीन स्थिती उद्‌भवल्यास संबंधित पोलिस आयुक्तालय अथवा जिल्हा अधीक्षक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ठराविक जबाबदाऱ्यांची निश्‍चिती करण्यात आली आहे. यापूर्वी ही पद्धत फक्त मुंबईत वापरण्यात येत होती. 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी मात्र या पद्धतीचा योग्य अवलंब करण्यात आला नाही. त्यामुळे मुंबई हल्ल्याची चौकशी करणाऱ्या प्रधान समितीने तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्या नेतृत्व क्षमतेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनीदेखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. यापुढील काळात आपत्कालीन स्थितीत स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. याकरिता संबंधित पोलिस आयुक्तालय आणि अधीक्षक क्षेत्रात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अतिरेकी हल्ल्यासारख्या घटनांच्या वेळी कोणती भूमिका पार पाडावी, याची जबाबदारी निश्‍चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील 10 पोलिस आयुक्तालये आणि 33 जिल्हा पोलिस अधीक्षक क्षेत्रांत कार्यरत असलेले पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांकडून त्यांच्या हद्दीत नियुक्त आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामांचा आराखडाच अहवालांच्या स्वरूपात मागवून घेतला आहे. स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्याची जबाबदारी निश्‍चित असल्याने एखाद्या जिल्ह्यात उद्‌भवलेल्या आणीबाणीच्या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यास वेळ लागणार नाही, असेह
ी विर्क यांनी या वेळी सांगितले.

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पोलिसांकडून झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हल्ल्याच्या वेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ पातळीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुका शोधण्यासाठी पोलिस खात्याअंतर्गत एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. हल्ल्याच्या वेळी झालेल्या चुकांबाबत कोणालाही दोषी न धरता फक्त या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही विर्क यांनी या वेळी सांगितले.


(sakaal, 8th july)

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

डॉक्‍टरला अटक; सेंट जॉर्जेस रुग्णालयातील प्रकार


सेंट जॉर्जेस रुग्णालयात "एमबीबीएस'चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर रुग्णालयातच निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉक्‍टरने लग्नाच्या आमिषाने आठ महिन्यांहून अधिक काळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. माता रमाबाई मार्ग पोलिसांनी सायंकाळी या डॉक्‍टरला अटक केल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिली. पोलिसांनी रुग्णालयाच्या वसतिगृहातील त्याच्या खोलीला सील ठोकले असून, त्याचा लॅपटॉप, पेनड्राइव्ह व मोबाईल फोन तपासणीसाठी जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल समरपाल सिंग देशवाल (वय 30) असे या डॉक्‍टरचे नाव आहे. मूळचा हरियाना येथील असलेला राहुल जेजे रुग्णालयातील ग्रॅंड मेडिकल कॉलेजमध्ये एम. एस. ऑर्थोपेडिक्‍स शाखेत शिक्षण घेत आहे; याशिवाय तो सेंट जॉर्जेस रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम करीत होता. याच रुग्णालयात "एमबीबीएस'चे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीशी त्याचा संपर्क आला. काही दिवस प्रेमाचे नाटक केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तब्बल आठ महिने ब्लॅकमेल करून, तो तिच्यावर बलात्कार करीत होता. महिनाभरापूर्वी राहुलच्या घरच्यांनी त्याचा साखरपुडा दुसऱ्याच मुलीसोबत केला. त्यानंतर काही दिवसांतच तो या तरुणीस भेटण्यास टाळाटाळ करू लागला. काही दिवसांपूर्वी राहुलने लग्नास नकार दिल्यानंतर या तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने काल या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केल्याचे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
पोलिसांनी राहुल राहत असलेल्या सेंट जॉर्जेस रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वसतिगृहातील खोली क्रमांक 40 येथे छापा घालून, त्याचा लॅपटॉप, पेनड्राइव्ह व मोबाईल फोन जप्त केला. आज सकाळी राहुलची परीक्षा असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही; मात्र सायंकाळी त्याला अटक करण्यात आली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव कोकीळ यांनी दिली.


(sakaal, 7th july)

नारायण राणेंच्या माजी सचिवाच्या घरात 95 लाखांची चोरी

नोकरावर चोरीचा संशय; जोरदार तपास सुरू


उद्योगमंत्री नारायण राणे यांचे माजी खासगी सचिव रवी कामत यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराने त्यांच्या घरातील तब्बल 95 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना राणेंकडे कामत हे खासगी सचिव म्हणून कार्यरत होते, अशी माहिती उघड झाली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

चेंबूरच्या अकराव्या रस्त्यावर असलेल्या साई सिद्धी अपार्टमेंटमधील कामत यांच्या घरात ही घटना घडली. कामत यांच्याकडे नऊ वर्षांपासून नोकराचे काम करणाऱ्या सचिन भिबिये (19) याने ही रोकड चोरून नेल्याचा संशय कामत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला. घरातील अत्यंत विश्‍वासू नोकरांपैकी एक असलेला सचिन हा कामत यांच्या घरात राहत होता. आज पहाटेच्या सुमारास कामत यांच्या घरातील मंडळी झोपलेली असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातील 95 लाख रुपयांची रोख असलेली बॅग घेऊन त्याने पोबारा केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सचिन घरातून बेपत्ता झाल्याचे कामत यांच्या लक्षात आले. या वेळी 95 लाख रुपयांची रोकड असलेली बॅगही त्याने पळवून नेल्याचेही उघडकीस आले. मूळचा कणकवलीचा असणाऱ्या सचिनच्या विरोधात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिसही या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
सचिनचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके मुंबई आणि कोकणात रवाना झाली. राणे यांचे खासगी सचिवपद सोडल्यानंतर कामत यांनी बांधकाम व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले होते, अशी माहितीही सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. कामत यांच्या घरात झालेल्या या चोरीच्या घटनेनंतर एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे कुठून आली याचाही पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी नोकराचा शोध घेण्यात येत असल्याचे चेंबूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. पाचुंदकर यांनी सांगितले. रवी कामत यांच्या घरातून नोकराने चोरलेली 95 लाख रुपयांची रोकड अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या त्यांच्या आत्याच्या मालकीची होती. पुण्यात गुंतवणुकीसाठी ही रोख त्या आपल्या पतीसोबत घेऊन आल्या होत्या. आज सकाळी ही रोकड कामत यांच्याकडे काम करणारा नोकर घेऊन पळून गेल्याचे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


(sakaal, 7th july)

कुंपणाची भिंत कोसळून दोन बहिणींचा अंत

मलबार हिल येथील घटना; चार जखमी

मलबार हिल येथे न्यायाधीशांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या "सर्व्हन्ट कॉर्टर्स'मधील घरावर कुंपणाची भिंत कोसळून एका कर्मचाऱ्याच्या दोन मुली मरण पावल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत चार जण जखमी झाले असून, सेंट एलिझाबेथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. आज पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मलबार येथील नारायण दाभोळकर मार्गावर असलेल्या "खटाव' व "रॉकी हिल' इमारतींमध्ये असलेली कुंपणाची 15 फूट उंचीची भिंत रॉकी हिल संकुलाच्या खोली क्रमांक 12 समोर असलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळली. या वेळी तात्याबा जाधव या कर्मचाऱ्याच्या रोहिणी (16) आणि पल्लवी (18) या दोन मुली मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्युमुखी पडल्या, तर तात्याबा, त्यांची पत्नी मंजुळा यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणारे रामधीन सजू कनोजिया (52) आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र (27) हे जखमी झाले. दोन्ही कुटुंबे झोपेत असताना घडलेल्या या दर्घटनेची माहिती याठिकाणी राहणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना दिली. याठिकाणी काही क्षणातच पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. काही क्षणातच त्यांनी रोहिणी आणि पल्लवी या दोघींना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एका न्यायाधीशांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारे तात्याबा नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. त्यांची पत्नीदेखील न्यायालयीन कर्मचारी आहे. रोहिणी नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती, तर मोठी मुलगी पल्लवी एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती, अशी माहिती परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या चौघांवर सेंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेला जबाबदार धरून मलबार हिल पोलिस ठाण्यात खटाव कंडोमिनिअम इमारतीच्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मलबार हिल पोलिसांनी दिली.

(sakaal, 6th july)

पोलिसाला लाच देणाऱ्या उद्योजक बंधूंना अटक

कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास आपल्या बाजूने करण्याकरिता माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा उद्योजकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. सुनील गोयंका आणि शशीमनोहर गोयंका अशी अटक करण्यात आलेल्या उद्योजक बंधूंची नावे आहेत. गोयंका यांच्याविरुद्ध त्यांचे मेव्हणे आणि सोन्याचे व्यापारी मुकेश झवेरी यांनी मे महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
सुनील गोयंका, त्यांची पत्नी शीला आणि भाऊ शशीमनोहर यांनी आपल्या वडिलांच्या खोट्या सह्या करून स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या फोर्ट शाखेच्या लॉकरमध्ये असलेले पाच कोटी रुपयांहून अधिक किमतीचे दागिने परस्पर काढून घेतल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयाने सुनील गोयंका आणि शीला यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास आपल्या बाजूने लावावा याकरिता सुनील आणि शशीमनोहर गोयंका यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव कोकीळ यांची मंगळवारी भेट घेतली. हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपये देण्याचा प्रस्ताव कोकीळ यांना दिला. गोयंका निघून गेल्यानंतर कोकीळ यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. गोयंका यांनी सायंकाळी कोकीळ यांना दूरध्वनी करून ऑपेरा हाऊस येथील हॉटेल कर्मा येथे बोलावले. सायंकाळी या हॉटेलमध्ये आलेल्या कोकीळ यांच्याकडे आरोपी सुनील आणि त्यांचे भाऊ शशीमनोहर गोयंका यांनी पाच लाख रुपयांची लाचेची रक्कम दिली. या ठिकाणी आधीच सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी या दोघा व्यापाऱ्यांना अटक केली. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात लाच देण्याचा प्रयत्न करणारे गोयंका यांचे रासायनिक कारखाने तसेच ज्वेलर्सचे उद्योग असल्याची माहिती कोकीळ यांनी दिली.

(sakaal,3rd july )

महाराष्ट्रात रेल्वेची 285 एकर मोकळी जमीन


विकासकामांना चालना; लोकोपयोगी प्रकल्प राबविणार


संसदेत आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रवाशांना सुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवून रेल्वेच्या मोकळ्या जागांवर विकासकामे करण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रेल्वेच्या मालकीच्या 285 एकर जागेवरील विकासकामांना चालना मिळणार आहे. या जमिनींवर लोकोपयोगी प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

देशभरात रेल्वेच्या मालकीची हजारो एकर जागा आहे. त्यापैकी मध्य रेल्वेच्या मालकीची 2487 हेक्‍टर, तर पश्‍चिम रेल्वेच्या 7383 हेक्‍टर जागेवर कोणत्याही प्रकारची विकासकामे झालेली नाहीत. अनेक वर्षे वापराविना पडून असलेल्या या जागांवर लवकरच रेल्वेच्या विविध प्रकल्पांसाठी विकासकामे केली जाणार आहेत. महाराष्ट्रात मध्य रेल्वेच्या मालकीची सुमारे 285.7 एकर जागा रिकामी आहे. या जमिनीचे नियमन लॅण्ड ऍण्ड ऍमिनिटीज डायरेक्‍टरेट यांच्याद्वारे केले जाते. महाराष्ट्रात पश्‍चिम रेल्वेचे मुख्यालय तसेच क्षेत्रीय कार्यालये असली तरी त्यांच्या मालकीची जमीन गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. महाराष्ट्रात पश्‍चिम रेल्वेची एक एकर जागाही विकासकामांकरिता उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रकल्प मध्य रेल्वेच्याच जमिनीवर राबविले जाणार आहेत. विकासकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनींपैकी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, भुसावळ, मुंबई, सोलापूर या प्रमुख पाच परिमंडळांतील सातारा-24 एकर, गोधानी -140 एकर, जळगाव - 24.7 एकर, आमला-25 एकर, लोणावळा- 23 एकर, इगतपुरी -25 आणि दौंड- 24 एकर येथे ही जमीन आहे. यापैकी सातारा, लोणावळा येथील जमिनी रेल्वेस्थानकालगत आहेत, तर गोधानी येथील जमीन रेल्वेस्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. जळगावच्या वालठाण येथील जमीन स्थानकापासून दहा किलोमीटर अंतरावर, तर नागपूरच्या आमला व नाशिकच्या इगतपुरी स्थानकाची जागा स्थानकापासून प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वेच्या मालकीच्या या जमिनींवर शाळा, महाविद्यालये तसेच रुग्णालयांची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. रेल्वेच्या जमिनींवर होणाऱ्या विकासकामांसाठी रेल लॅण्ड डेव्हलपमेंट ऍथॉरिटी ही संस्था नोडल एजन्सी म्हणून काम पाहणार आहे. मोकळ्या जमिनींच्या विकासासंबंधीचा सर्वस्वी निर्णय हेच प्राधिकरण घेईल. असे असले तरी प्रवाशांना सुविधा आणि व्यावसायिक नफा या बाबीही विचारात घेतल्या जाणार असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. संसदेत झालेल्या घोषणेनंतर महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या जागांवर राबविल्या जाणाऱ्या प्रकल्पांचा आराखडा लवकरच रेल्वेमार्फत तयार केला जाणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(sakaal,3rd july)

भरकटलेल्या बोटीवरील पोलिसांची सुटका


नौदल, सीमा सुरक्षा दलाची मदत


वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या उद्‌घाटनाच्या वेळी समुद्रात बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेली बोट आज पहाटे मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकल्याने खवळलेल्या समुद्रात भरकटली. सोसाट्याचा वारा आणि खवळलेल्या समुद्रात हेलकावे खाणाऱ्या या बोटीवर अडकलेले चार पोलिस व अन्य पाच जणांना नौदल आणि सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
वांद्रे-वरळी सागरी सेतूचे मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमासाठी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यलोगेट पोलिस ठाण्याच्या पोलिसांची "ज्ञानेश्‍वर माऊली' ही गस्ती बोट वांद्रे-वरळी येथील समुद्रात तैनात करण्यात आली होती. सागरी सेतूच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा या गस्ती बोटीला तेथून पुन्हा यलोगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाऊच्या धक्‍क्‍यावर येण्यास सांगण्यात आले; मात्र समुद्र खवळलेला असल्याने या बोटीला समुद्रातील बंदोबस्ताचे ठिकाण सोडणे अशक्‍य झाले. रात्रभर समुद्रात घालविल्यानंतर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही बोट पुन्हा भाऊच्या धक्‍क्‍याकडे जायला निघाली. या वेळी सागरी सेतूच्या वरळी येथील भागाजवळ मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात बोटीचा पंखा अडकला. पंखा फिरणे बंद झाल्याने बोटीचे इंजिन बंद पडले. बोटीवरील खलाशांनी समुद्रात उडी मारून पंख्यात अडकलेले जाळे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यातच पुन्हा सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने ही बोट वांद्रे येथील सीरॉक आणि हॉटेल ताज लॅण्ड एण्डच्या दिशेला भरकटू लागली. त्यामुळे पोलिस व खलाशांचा धीर सुटला. बोटीवरील सहायक पोलिस उपनिरीक्षक यलगोंडा पाटील (वय 49; रा. माहीम) यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बोट समुद्रात भरकटल्याची वर्दी देऊन तातडीने मदतीची विनंतीही केली. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी ही माहिती तातडीने यलोगेट पोलिसांना कळविली. समुद्रात मोठमोठ्या लाटा येत असल्याने नौदल आणि सीमा सुरक्षा दलालाही या घटनेची माहिती देण्यात आली. सीमा सुरक्षा दल आणि नौदलाने परस्परांशी समन्वय साधून तासाभरातच समुद्रात अडकलेल्या या बोटीवरील पोलिस आणि खलाशांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर पाठ
विले. काही वेळातच बोटीवर घरघरणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या हेलिकॉप्टरमुळे बोटीवर अडकलेल्या पोलिस आणि खलाशांच्या जीवात जीव आला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सुरू केलेले हे "रेस्क्‍यू ऑपरेशन' अवघ्या दोन तासांत संपले. हेलिकॉप्टरने पाच फेऱ्यांमध्ये बोटीवर अडकलेल्या नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले.
सहायक पोलिस निरीक्षक यलगोंडा पाटील, पोलिस नाईक उत्तम पाटील (वय 45; रा. ऐरोली), हवालदार सूर्यभान भुमरे (52; रा. ऐरोली), ज्ञानेश्‍वर पवार (46; रा. वाशी), तांडेल नरेश कोळी ( 49; रा. मोरागाव), अजय मंडल (20; रा. पश्‍चिम बंगाल), गणेश म्हात्रे (20; रा. मुरूड), भोरून मंडल (23; रा. पश्‍चिम बंगाल) व दीपू रॉय (18) अशी या संकटातून सुखरूप सुटका झालेल्यांची नावे आहेत. यानंतर समुद्रात खोलवर जात असलेली ही बोट बाहेर काढण्यासाठी हिंदुस्तान कन्स्ट्रक्‍शन कंपनीच्या जहाजाचा वापर करण्यात आला; मात्र बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटीचा दोरखंड तुटून ती पुन्हा जुहू येथील गोदरेज बंगल्यामागील समुद्रात भरकटली. दुपारपर्यंत ही बोट बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती यलोगेट पोलिसांनी दिली.


(sakaal, 1st july)

पोलिसांकडे लवकरच हेलिकॉप्टर ः चिदंबरम



मुंबईतील "एनएसजी तळा'चे उद्‌घाटन

मेगासिटी पोलिसिंग प्रकल्पाच्या पूर्णत्वासोबतच मुंबईसारख्या देशभरातील प्रमुख शहरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे हेलिकॉप्टर असतील, असे आश्‍वासक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज केले. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) मुंबई तळाचा शुभारंभ आज सायंकाळी त्यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी सागरी सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारमार्फत योजना राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
"एनएसजी'च्या मुंबई तळाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे गृहमंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक एन. पी. एस. अलख, पोलिस महासंचालक एस. एस. विर्क, गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशातील प्रमुख शहरांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई, चेन्नई, हैदराबाद व कोलकत्ता येथे "एनएसजी'चे चार तळ उभारण्याचे भारतवासीयांना दिलेले वचन आज पूर्ण केल्याचेही पी. चिदंबरम म्हणाले. उद्या (ता. 1) चेन्नई, हैदराबाद व कोलकत्ता येथील तळांचा शुभारंभ केला जाणार आहे. सध्या सांताक्रूझ-पूर्वेला असलेल्या पोलिसांच्या जागेवर हे केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, येत्या नोव्हेंबरअखेर "एनएसजी' मरोळ येथील 23 एकर जागेवर स्थलांतरित होणार आहे. बेंगळूरु, जोधपूर व गुवाहाटी येथेही अशा प्रकारचे तळ उभारण्यात येतील.
चार ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या तळांसाठी एक हजार 80 जवानांची भरती करण्यात आल्याचेही पी. चिदंबरम यांनी सांगितले.
गुजरात, महाराष्ट्र व गोव्याच्या किनारपट्टीहून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला समर्थपणे तोंड देता यावे यासाठी तेथील सागरी सुरक्षिततेच्या अभ्यासाकरिता गुप्तचर विभागाने खबरदारीचा अहवाल दिला आहे. सागरी मार्गाने हल्ल्याचे सध्या तरी ठराविक असे कोणतेही "इनपुट' अद्याप नसल्याचेही पी. चिदंबरम यांनी सांगितले. मुंबईत उभारण्यात आलेल्या "एनएसजी'च्या तळावर आपत्कालीन स्थितीत सबंध पश्‍चिम भारताच्या सुरक्षिततेची जबाबदारी राहणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला सामोरे जाण्यास राज्य पोलिस दल सक्षम होत आहे; मात्र अतिरेकी हल्ल्याच्या वेळी राज्य पोलिसांकडून मिळणाऱ्या आदेशाप्रमाणे एनएसजी त्या हल्ल्याला परतवून लावण्यासाठी सूत्रे हाती घेईल, असेही ते म्हणाले. "एनएसजी'चा तळ मुंबईत उभारण्यात आल्यामुळे मुंबईकरांत त्यांच्या सुरक्षिततेबाबत आत्मविश्‍वास वाढेल, असेही ते म्हणाले.


------------------

अर्ध्या तासाचा "रिस्पॉन्स टाइम'
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी "एनएसजी'चे कमांडो मुंबईत पोचण्यासाठी सहा तासांचा उशीर झाला होता. मणेसर येथून केवळ वेळेत विमान न मिळाल्याने हा हल्ला परतवून लावण्यासाठी एनएसजी कमांडोंना मुंबईत येण्यासाठी उशीर झाला. यापुढील काळात देशभरात उभारण्यात येणाऱ्या एनएसजी तळांमुळे आपत्कालीन स्थितीत घटनास्थळी एनएसजी कमांडो अवघ्या अर्ध्या तासात दाखल होतील, असे "एनएसजी'चे महासंचालक एन. पी. एस. अलख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



पोलिसांना सतर्कतेचा आदेश

अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर खात्याकडून मिळाल्यानंतर राज्यात दक्षतेचा आदेश देण्यात आल्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले. तीन दिवसांपूर्वी गुप्तचर खात्याकडून हे "इनपूट' मिळाले आहे. राज्यातील पोलिसांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले


(sakaal,30th june)

आता दूधवाले, पेपरवाल्यांचे पोलिसांकडून सीडी रेकॉर्ड!

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची योजना


घरातील एकाकी वयोवृद्ध नागरिकांवर हल्ले करून लूटमार करण्याच्या घटना वाढीस लागल्याने यापुढे अशा ज्येष्ठ नागरिकांच्या घरात दूध तसेच वृत्तपत्रे टाकणाऱ्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडून सीडी स्वरूपात तयार करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना आठवड्यातून एकदा त्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी दिली.

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात चोरीच्या उद्देशाने होणाऱ्या हत्या तसेच घरफोडीच्या घटनांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढले आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असलेल्या रहिवासी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यास सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सांगण्यात आले आहे. या सोसायट्यांत सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असलेल्या इमारतींच्या परिसरातील समाजकंटक, भुरट्या चोरांच्या कारवायांवर विशेषत्वाने लक्ष ठेवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांमार्फत त्यांच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरात वावर असणाऱ्या मोलकरणी, घरगडी यांचीही माहिती जमविली जात आहे. या सगळ्या माहितीची सीडी अंमलबजावणी विभागाच्या पोलिस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली तयार होणार आहे.

आपत्कालीन स्थितीत ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांची मदत पोचावी, यासाठी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांकही गोळा केले जाणार आहेत. परिसरातील "वॉण्टेड' आरोपींवर लक्ष केंद्रित करून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. या उपाययोजनांवर त्या त्या परिमंडळातील पोलिस उपायुक्त लक्ष ठेवतील. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बैठका घेतल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांनी "एल्डरलाइन'सारख्या वृद्धांकरिताच्या हेल्पलाइनचा वापर करावा, असेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले.


(sakaal,29 th june)