Wednesday, April 15, 2009

बलात्कारप्रकरणी तिघा विद्यार्थ्यांना पोलिस कोठडी

परदेशी विद्यार्थिनीचे प्रकरण : पोलिसांवर असहकार्याचा आरोप

"टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मध्ये शिकणाऱ्या अमेरिकन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तिघा विद्यार्थ्यांना येत्या 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कुर्ला न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी सहकार्य न केल्याने पहिल्या दिवशी आपल्याला याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविता आली नाही, असा आरोप या विद्यार्थिनीने केल्याचे समजते. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.

"टाटा इन्स्टिट्यूट'मध्ये शिकणाऱ्या या तेवीस वर्षीय विद्यार्थिनीवर 11 एप्रिलला तिच्या ओळखीच्याच सहा विद्यार्थ्यांनी अंधेरी येथील एका घरात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. बलात्काराच्या या घटनेनंतर संस्थेतील हॉस्टेलमध्ये गेलेल्या या विद्यार्थिनीने तिच्या शिक्षकांना घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तिची तपासणी करणाऱ्या डॉक्‍टरांनी या प्रकाराची माहिती त्या वेळी रुग्णालयात असलेल्या पोलिसांना देण्यास सांगितले. त्याप्रमाणे या विद्यार्थिनीने तेथील पोलिसांना घडलेला प्रकार सांगितलाही; मात्र बराच वेळ थांबल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणी आपल्याला काहीच मदत केली नाही, असा पीडित विद्यर्थिनीचा आरोप आहे. यानंतर मात्र आई आणि काही मित्रांशी बोलल्यानंतर धीर आल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे या विद्यार्थिनीने म्हटल्याचे समजते. ट्रॉम्बे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एन. आर.अम्बूपे यांनी हा आरोप फेटाळून लावत, तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा केला. टाटा इन्स्टिट्यूटमधील शिक्षकांनी दिलेल्या आधारानंतर या विद्यार्थिनीने मंगळवारी मध्यरात्री ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे अम्बूपे यांनी सांगितले. अमेरिकेतील इदाहो येथून गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात "जेण्डर ऍण्ड डेव्हलपमेंट' या विषयाच्या अभ्यासासाठी ही विद्यार्थिनी आली होती.

दरम्यान, या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी विनम्र सोनी, करन सिंग, हर्ष, अनिश, देवशी आणि कुंदन या मित्रांपैकी अटक केलेल्या तिघा जणांना कुर्ला न्यायालयाने 28 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अन्य तिघांच्या शोधार्थ परराज्यात पोलिस पथके पाठविण्यात आली आहेत. आतापर्यंत बलात्कारित विद्यार्थिनीचे नातेवाईक; तसेच आरोपी विद्यार्थ्यांचे निकटवर्तीय अशा कोणीच पोलिसांशी संपर्क साधला नसल्याची माहिती अम्बूपे यांनी दिली.


(sakal,17 april)

टाटा इन्स्टिट्यूट'च्या परदेशी विद्यार्थिनीवर बलात्कार

पोलिसांची माहिती : तीन विद्यार्थ्यांना अटक; तीन फरारी

देवनार येथील "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मध्ये शिकत असलेल्या एका परदेशी विद्यार्थिनीवर तिच्या ओळखीच्याच सहा विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ-6चे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली. फरारी असलेल्या विद्यार्थ्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके बिहार आणि झारखंड येथे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

देश-विदेशातील विद्यार्थ्यांना समाज विज्ञानाचे धडे देण्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या विद्यार्थ्याबाबत घडलेल्या या घृणास्पद प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातही एकच खळबळ उडाली आहे.

समाज विज्ञानाचे धडे घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेहून ही विद्यार्थिनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'मध्ये दाखल झाली होती. शनिवारी रात्री उशिरा आपल्या सहा मित्रांसोबत ती गोवंडी येथे गेली. तेथील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत तिने यथेच्छा मद्यप्राशन केले. यानंतर पबमध्ये जाण्याच्या बहाण्याने मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मित्रांनी तिला अंधेरी येथे नेले. अंधेरीच्या पबमध्ये रात्रभर मौज केल्यानंतर जवळच असलेल्या एका घरात ती मित्रांसोबत राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मित्रांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचे तिच्या लक्षात आले. बलात्काराच्या या घटनेनंतर ती पुन्हा "टाटा इन्स्टिट्यूट'मध्ये आली. काल सकाळी तिने इन्स्टिट्यूटच्या संचालकांची भेट घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराची इत्थंभूत माहिती दिली. संचालकांच्या सल्ल्यानुसार तिने मध्यरात्री उशिरा ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात बलात्कार करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तिघा जणांना अटक केली आहे. अटक केलेले तिघेही तिच्याच सोबत शिक्षण घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची अधिक चौकशी सुरू असून आणखी तिघा जणांचा शोध सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त अजित सावंत यांनी सांगितले.

याबाबत "टाटा इन्स्टिट्यूट'शी संपर्क साधला असता हा दुर्दैवी प्रकार 11 एप्रिलच्या रात्री संस्थेच्या आवाराबाहेर घडला असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची बळी ठरलेल्या त्या अमेरिकन विद्यार्थिनीला आवश्‍यक ती कायदेशीर मदत आणि समुपदेशन देणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालक कार्यालयातून देण्यात आली. टाटा इन्स्टिट्यूट नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि हित जपत आली आहे. पीडित विद्यार्थिनीचा आत्मसन्मान जपण्याकरिता तिची ओळख पटू नये यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनीही सहकार्य करण्याचे आवाहनही संस्थेच्या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आले आहे. विद्यार्थिनीवर बलात्कार करणारे सहा विद्यार्थी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सशी संबंधित असल्याबाबत संस्थेकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

(sakal,16 april)

गृहराज्यमंत्र्यांनी केली सुरक्षेची पाहणी

कसाब खटला ः ऑर्थर रोड परिसरात वाहतुकीवर निर्बंध

मुंबई हल्ल्याबाबत उद्यापासून सुरू होणाऱ्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑर्थर रोड कारागृहाबाहेर करण्यात आलेल्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची गृहराज्यमंत्री नसीम खान यांनी आज पाहणी केली. याप्रकरणी अटकेत असलेला एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑर्थर रोड कारागृहातच तयार करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात हा खटला चालणार आहे. शहर वाहतूक पोलिसांनीही खटल्याच्या वेळी परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत.
संपूर्ण प्रकरणाच्या संवेदनशीलतेचा विचार करता मुंबई हल्ल्याप्रकरणीचा खटला लवकरात लवकर निकालात काढून अतिरेकी कसाबला कठोर शिक्षा मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या खटल्यासाठी सरकार सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करीत असल्याचेही गृहराज्यमंत्री खान यांनी कारागृहाच्या पाहणीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. हा खटला चालविण्यासाठी सरकारने नियुक्त केलेले विशेष न्यायमूर्ती एम. एल. ताहिलियानी यांना आणि कसाबचे वकीलपत्र घेणाऱ्या ऍड. अंजली वाघमारे यांना "झेड' दर्जाची, तर सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांना "झेड प्लस' दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
मुंबई हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑर्थर रोड कारागृहात कडेकोट बंदोबस्त ठेवला जात असतानाच शहर वाहतूक पोलिसांनी या खटल्याच्या वेळी विशेष दक्षता म्हणून या परिसरातील वाहतुकीवर निर्बंध घातले आहेत. ऑर्थर रोड कारागृहाच्या परिसरात असलेला साने गुरुजी मार्ग, जे. आर. बोरीचा मार्ग, ना. म. जोशी मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग आणि सातरस्ता सर्कल (संत गाडगे महाराज चौक) या रस्त्यांवर न्यायालयीन कामकाज सुरू असेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शहाजी सोळुंके यांनी दिली.

24 तास "नो-पार्किंग'
- साने गुरुजी मार्गावर संत गाडगे महाराज चौक ते चिंचपोकळी जंक्‍शनदरम्यान उत्तर व दक्षिण वाहिन्यांवर वाहनांना प्रवेश बंद.
- ना. म. जोशी मार्ग-चिंचपोकळी जंक्‍शन ते घोडके चौक बी. जे. रोडपर्यंत
- केशवराव खाडे मार्ग-संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता सर्कल) ते एस. ब्रीज जंक्‍शन उत्तर व दक्षिण वाहिनी.

खालील मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी
- सानेगुरुजी मार्ग-चिंचपोकळी जंक्‍शन ते संत गाडगे महाराज चौक दक्षिण वाहिनी. (दक्षिण वाहिनीवरून संत गाडगे महाराज चौककडून उत्तर वाहिनीवरील वाहतूक दक्षिणेवरून सोडण्यात येणार आहे)
- जे. आर. बोरीचा मार्ग-साने गुरुजी मार्गावरील कस्तुरबा रुग्णालय जंक्‍शन ते गंगाराम सकपाळ मार्ग जंक्‍शनपर्यंतची उत्तर व दक्षिण वाहिनी.
- केशवराव खाड्ये मार्ग-संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता सर्कल) ते एस. ब्रीज जंक्‍शनपर्यंत.

(sakal,14 april)

वयोवृद्ध महिलेची घरात शिरून हत्या

पासष्ट हजारांचे दागिने लंपास

व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची घरात एकटीच असताना अनोळखी व्यक्तीने गळा चिरून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार काल (ता. 13) रात्री अंधेरीच्या यारी रोड येथे घडला. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ताराबेन मुलजी कोठारी (75) असे मृत महिलेचे नाव असून, चोरट्यांनी हत्येनंतर तिच्या अंगावरील 65 हजारांचे दागिने चोरून नेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यारी रोड येथील कविता अपार्टमेंटमध्ये घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. समाजातील भाजीवाले, रिक्षावाले आदी अल्प उत्पन्न घटकांतील व्यक्तींना व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करणाऱ्या ताराबेन त्यांच्या मुलीसोबत यारी रोड येथील घरात राहत होत्या. चार्टर्ड अकाऊंटंट असलेली त्यांची मुलगी दीप्ती (वय 40) वांद्रे-कुर्ला संकुलातील एका कंपनीत कामाला आहे. चार महिन्यांपासून त्यांच्या घरात दुरुस्तीचे काम सुरू आहे. काल सायंकाळी घरात पेंटिंगचे काम करणारा कामगार आणि घरकामाला असलेली महिला काम संपवून निघून गेले होते. त्यामुळे ताराबेन घरात एकट्याच होत्या. रात्री साडेआठच्या सुमारास दीप्ती घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे आढळले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. ताराबेन यांच्या मानेवर शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते. त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यापूर्वीच त्या मृत पावल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.
ताराबेन यांच्या व्याजाने पैसे देण्याच्या व्यवसायातूनच त्यांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या या व्यवसायाला आक्षेपही घेतला होता. शेजारी राहणाऱ्या विवेक पाटील या अपंग व्यक्तीनेही ताराबेनकडे येणाऱ्यांच्या वर्तनाबाबत भीती व्यक्त केली होती. याशिवाय इमारतीच्या सुरक्षा रक्षकासोबतही ताराबेन यांचा खटका उडाला होता. पोलिसांनी सुरक्षा रक्षकासह मोलकरीण व पेंटरचीही चौकशी केली आहे. याशिवाय मुलुंड व मालाड येथे राहणाऱ्या ताराबेन यांच्या दोन्ही मुलांकडेही या प्रकाराबाबत पोलिसांनी विचारणा केल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश नलावडे यांनी सांगितले.


(sakal,14 april)

शीव कोळीवाडा येथे गोळीबार

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयासमोर एका व्यापाऱ्याने आधीच्या भांडणाचा राग मनात धरून एका व्यक्तीवर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार शीव कोळीवाडा येथे घडला. ऐन निवडणूक काळात घडलेल्या या घटनेने या परिसरात काही काळ तणाव पसरला होता. या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी व्यापाऱ्याला अटक केली असून, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती परिमंडळ-4 चे पोलिस उपायुक्त सुनील बाविस्कर यांनी दिली. गोळीबार करणारा व्यावसायिक कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते.
शीव कोळीवाडा येथे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या ठिकाणी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांचे प्रचार कार्यालय आहे. कार्यालय असलेल्या इमारतीतच एअर केअर टेक्‍नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड नावाचे एसी विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानाचा मालक असलेला जॉन रिबेलो (वय 45) याचे याच परिसरात राहणाऱ्या रामचंद्र हसू पाटील (47) यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. दोघांमधील वाद वाढत गेल्याने रागाच्या भरात रिबेलो याने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. ऐन गर्दीच्या ठिकाणी केलेल्या या गोळीबारामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गोळीबार करणाऱ्या जॉन रिबेलो याला ताब्यात घेतले. त्यानंतर रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून रिबेलोविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त बाविस्कर यांनी दिली. रिबेलो कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे की नाही याची तपासणी सुरू आहे.

(sakal,13 april)

चुकून गोळी सुटल्याने पोलिस ठाण्यात शिवसैनिक जखमी

अंबोली : शस्त्र जमा करतानाची घटना

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अंबोली पोलिस ठाण्यात परवानाधारक पिस्तूल जमा करायला आलेला शिवसेना कार्यकर्ता पोलिस अधिकाऱ्याकडून त्याचे पिस्तूल हाताळले जात असताना अचानक गोळी सुटून जखमी झाल्याचा प्रकार अंबोली येथे घडला. पोलिस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, जखमी कार्यकर्त्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सायंकाळी त्याला घरी सोडण्यात आल्याचे समजते.
विकास जाधव (36) असे या जखमी झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकीय व्यक्ती व त्यांच्या कार्यकर्त्यांकडे असलेली शस्त्रे ते राहत असलेल्या परिसरातील पोलिस ठाण्यांत जमा करण्यात येत आहेत. त्यानुसार जाधव हेसुद्धा त्यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल अंबोली पोलिस ठाण्यात जमा करायला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गेले होते. या वेळी तेथे हजर असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्याकडील पिस्तुलाची तपासणी करायला सुरुवात केली. पिस्तुलाचे तोंड जमिनीकडे ठेवून सुरू असलेल्या तपासणीच्या वेळी अधिकाऱ्याकडून अचानक पिस्तुलाचा चाप ओढला गेला. यातून सुटलेली गोळी जमिनीवरील फरशीवर आदळून जाधव यांच्या छातीवर लागली. या घटनेत छातीला गोळी चाटून गेल्याने जाधव जखमी झाले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते. एका अधिकाऱ्याकडून अनवधानाने झालेल्या या प्रकाराची माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिस दडवत होते.


(sakal,13 april)

कसाबची आई असल्याचा माथेफिरू महिलेचा दावा

मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब हा आपला मुलगा असून आपण त्याला भेटायला आलो आहोत, असा दावा एका माथेफिरू महिलेने केला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या या महिलेला तेथे असलेल्या पोलिसांनी हुसकावून लावले; मात्र या महिलेने केलेल्या अनोख्या दाव्यामुळे पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात त्याचे आई-वडील राहतात; मात्र गेल्या आठवड्यात पोलिस मुख्यालयात आलेल्या एका चाळिशीतील महिलेने आपणच कसाबची आई असल्याचा दावा केला. पंजाबी भाषेत बोलणाऱ्या या महिलेने कसाब लहान असताना त्याचे अपहरण झाले होते, असे सांगितले. खात्री पटविण्यासाठी आपली डीएनए तपासणीही करावी, असे या महिलेने सांगितले. पोलिसांनी या महिलेचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने तिला मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरूनच हुसकावून लावले. मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त विजयसिंह जाधव यांनी कसाबला भेटण्याची इच्छा व्यक्त करणारी महिला मुख्यालयात आली होती, असे पीटीआयशी बोलताना सांगितले

(sakal,10 april)

बेस्टचालकाला मारहाण करून कारचालकाचा हवेत गोळीबार

चेंबूर हादरले ः ओव्हरटेक करण्याचा हव्यास

ओव्हरटेक करण्याच्या हव्यासापायी एका कारचालकाने बेस्ट बसचालकाला मारहाण करून भर रस्त्यावर हवेत गोळीबार केल्याची घटना आज सकाळी चेंबूरच्या आर. के. स्टुडिओजवळ घडली. या घटनेनंतर चेंबूर परिसरात काही काळ घबराट पसरली. गोळीबारानंतर पळून गेलेल्या कारचालकाला रात्री ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शीव-पनवेल महामार्गावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे चेंबूर परिसरात एकच खळबळ उडाली. कळंबोली ते राणी लक्ष्मीबाई चौकादरम्यान धावणाऱ्या 505 क्रमांकाच्या बेस्ट बसमागून हा कारचालक मारुती कार घेऊन जात होता. तो घाईत असल्याने बेस्टला ओव्हरटेक करण्यासाठी त्याने बराचवेळ हॉर्न वाजविला. परंतु बेस्ट बसचालकाने त्याला दाद दिली नाही. त्यामुळे चिडलेल्या कारचालकाने संधी मिळताच चेंबूरच्या आर. के. स्टुडिओजवळ बेस्ट बससमोर आपली कार उभी केली. यानंतर बसचालक शहाबुद्दीन दाऊद पठाण (41) याला बसमधून खाली खेचून बेदम मारहाण केली. पठाण याला मारहाण करताना कोणी मध्ये पडू नये तसेच स्वतःच्या निसटण्याचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी कारचालकाने त्याच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. या गोळीबारातून स्वतःचा जीव वाचविण्याकरिता भयभीत झालेल्या प्रवासी आणि नागरिकांनी पळापळ करायला सुरुवात केली. या गोंधळातच कारचालकाने पलायन केले. मात्र, आर. के. स्टुडिओसमोर बराच वेळ हा प्रकार सुरू असल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना कारचा क्रमांक टिपता आला. त्यांनी कारचालकाने केलेल्या गोळीबाराची माहिती व कारचा क्रमांक पोलिसांना कळविला. काही क्षणातच या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी पळून गेलेल्या कारचालकाला पकडण्यासाठी पथके पाठविली. कारच्याच क्रमांकावरून पोलिसांनी तिच्या मालकाचा पत्ता शोधून सायंकाळी उशिरा कारचालकाला ताब्यात घेतले. त्याला अटक करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

--------------

चेंबूर येथे गोळीबार करणाऱ्या कारचालकाचे नाव मयूर पियूषपाल सिंग (32, रा. वाशी) असे आहे. बॅलार्ड पिअर येथे शान मरिन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची शिपिंग कंपनी असलेला मयूर त्याचे वडील कॅप्टन पियूषपाल यांच्यासोबत ऑफिसला जात होता. या वेळी चेंबूरच्या आर. के. स्टुडिओसमोर त्याने हा गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना रात्री अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. डी. पाचुंदकर यांनी दिली.


(sakal,9 april)

एअर इंडियाला धमकीचे ई-मेल

पोलिस तपास सुरू ः विमानतळावरील सुरक्षा कडक

एअर इंडियाला गेल्या काही दिवसांत धमकीचे दोन ई-मेल आले असून अधिक तपासासाठी ते मुंबई पोलिसांकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती एअर इंडियाच्या प्रवक्‍त्यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना दिली.
नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाचे मुख्यालय बॉम्बस्फोटांनी उडवून देण्याबाबतचे वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरणही कंपनीच्या प्रवक्‍त्यांनी केले. दरम्यान, मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्‍यता असल्याची शक्‍यता गुप्तचर खात्याने वर्तविल्याने विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
देशातील प्रमुख एअरलाइन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एअर इंडियाची नरिमन पॉइंट येथील इमारत बॉम्बस्फोटांनी उडवून देण्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर आज एकच खळबळ उडाली. या वृत्ताची तातडीने दखल घेत एअर इंडियाच्या प्रवक्‍त्यांनी धमकीचे ई-मेल आल्याचे मान्य केले. कंपनीच्या अधिकृत पत्रव्यवहारांच्या ई-मेल ऍड्रेसवर हे ई-मेल आले आहेत. एअर इंडिया व्यवस्थापनाने या ई-मेलचे गांभीर्य लक्षात घेऊन ते मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे पाठविले आहेत. यापुढे पोलिस अधिक तपास करीत असल्याचे सांगून या ई-मेलमधील मजकूर स्पष्ट करण्यास कंपनीच्या प्रवक्‍त्यांनी मात्र नकार दिला.
याच वेळी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या विमानांवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. याशिवाय कफ परेडच्या मेकर चेंबरमध्ये असलेल्या अरेबियन कौन्सिलेटलाही अतिरेक्‍यांपासून धोका आहे. त्यामुळे या परिसरातील सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्याच्या सूचना गुप्तचर खात्याने पोलिसांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विमानतळाच्या सुरक्षिततेचा विचार करता या ठिकाणी नेहमीच कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. त्याचप्रमाणे आताही विमानतळावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विनय कारगावकर यांनी दिली.

(sakal,9 april)

Tuesday, April 7, 2009

रेल्वे प्रवासात चोरलेल्या 20 लाखांच्या वस्तू परत

पोलिसांची कारवाई ः 117 तक्रारदारांना सुखद धक्का

महिनाभरापूर्वी रेल्वे प्रवासात भांडुपला राहणाऱ्या स्वाती पाठारे यांच्या पर्समधून साडेदहा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. पवईला आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली; पण चोरी झालेली रोख परत मिळण्याची अपेक्षा त्यांना नव्हती. फेब्रुवारी महिन्यात कुर्ला रेल्वे पोलिसांकडून त्यांच्या मोबाईलवर फोन आला. "मॅडम, तुमचे चोरीला गेलेले पाकीट परत मिळाले आहे; मात्र त्यात फक्त सात हजार रुपयेच सापडलेत. उरलेली रक्कम चोरट्या महिलेने संपविली आहे.' महिनाभरापूर्वी चोरीला गेलेले पाकीट पुन्हा सापडल्याने पाठारे यांना आनंद झाला होता. रेल्वे पोलिसांनी आज घेतलेल्या एका विशेष कार्यक्रमात पाठारे यांच्यासारख्या तब्बल 117 तक्रारदारांच्या सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या चोरीला गेलेल्या मौल्यवान वस्तू समारंभपूर्वक परत करण्यात आल्या. चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल फोन अशा कित्येक मौल्यवान वस्तू परत मिळाल्यानंतर या प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.
मुंबईच्या उपनगरी लोकलमधून दिवसाला प्रवास करणाऱ्या 60 लाखांहून अधिक प्रवाशांना दैनंदिन प्रवासात त्यांच्या वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार नवीन नाहीत. रेल्वे स्थानकांतच असलेल्या पोलिस ठाण्यांत अथवा चौकीत चोरीला गेलेल्या या वस्तूंची माहिती द्यायची आणि त्या परत मिळण्याची अपेक्षा सोडून द्यायची, असा आजवरचा अनुभव; मात्र रेल्वे पोलिसांनी एका विशेष मोहिमेत प्रवाशांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आज झालेल्या एका कार्यक्रमात प्रवाशांच्या वस्तूंचे वितरण करण्यात आले. रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी, रेल्वे पोलिस आयुक्त अशोक शर्मा, उपायुक्त वसंत कोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आज वितरित करण्यात आलेल्या ऐवजाच्या वीसपट ऐवज रेल्वे पोलिसांकडे असून त्यांचे वितरणही कायदेशीर बाबींची पूर्तता करून लवकरच करण्यात येणार असल्याचे रेल्वे पोलिस आयुक्त अशोक शर्मा यांनी सांगितले. महिला प्रवाशांना होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्यांच्याकरिता स्वतंत्र तक्रारपेटी रेल्वे स्थानकांवर लावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

(sakal,7 april)

पगार रखडल्याने पोलिस नाराज

प्रशासकीय दिरंगाई ः पुढचा आठवडा उजाडणार

पोलिस दलातील अस्थायी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यासंबंधीचे आदेश गृहखात्याने अद्याप काढले नसल्याने मुंबईसह राज्यातील सर्वच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. या आठवड्यात असलेल्या सरकारी सुट्यांमुळे पोलिसांना त्यांचा मार्च महिन्याचा पगार मिळायला पुढचा आठवडा उजाडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ऐन निवडणूक बंदोबस्ताच्या काळात मासिक वेतनापासून वंचित राहावे लागणार असल्याने पोलिसांत नाराजीचा सूर आहे.

राज्य पोलिस दलात स्थायी आणि अस्थायी स्वरूपात सुमारे पावणेदोन लाख पोलिस कार्यरत आहेत. या अस्थायी पोलिसांना मुदतवाढ देण्यासंबंधीचे आदेश गृहखात्याकडून या महिन्यात निघणे अपेक्षित होते; मात्र गृहखात्याच्या प्रधान सचिव कार्यालयातील एक अतिवरिष्ठ अधिकारी 20 मार्चपासून आजारपणाच्या रजेवर गेला आहे. त्यामुळे अस्थायी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या आदेशावर अद्याप सह्याच झालेल्या नाहीत. स्थायी आणि अस्थायी पोलिसांचे मासिक वेतन एकत्रितच निघत असल्याने मुंबईसह राज्यातील सर्वच पोलिस पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यभरातील पोलिसांचे पगार महिनाअखेरीस निघतात. उशीर झालाच तर तो एका दिवसापुरता होत असतो. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने पगाराला दोन ते तीन दिवस उशीर होणे ग्राह्य धरले जाते; मात्र यंदा अस्थायी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या आदेशावर सह्या करणारा अधिकारीच उपलब्ध नसल्याने सर्वच पोलिसांना याचा फटका बसला आहे. महिन्याचा पहिला आठवडा उलटून जात असतानाही हातात पगार न पडल्याने अनेक पोलिसांच्या घरातील आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे.
अस्थायी कर्मचाऱ्यांच्या मुदतवाढीच्या आदेशावर सह्या करून पोलिसांचे पगार काढण्याची कार्यवाही पूर्ण होईल अशी तजवीज करण्यासाठी आज गृहखात्याने आजारपणाच्या रजेवर गेलेल्या अधिकाऱ्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविला; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या आदेशावर सहीच झाली नव्हती, असे खात्रीलायक वृत्त आहे. मुंबई पोलिसांच्या आस्थापना शाखेचे अधिकारी व कर्मचारी गृहमंत्रालयात या आदेशावर सही होण्यासाठी सकाळपासून तिष्ठत उभे होते. या आदेशावर उद्यापर्यंत सह्या होणे अपेक्षित आहे. या आठवड्यात 7,10,11 व 12 एप्रिल, तर पुढील आठवड्यात 14 एप्रिलला सरकारी सुट्या आहेत.त्यामुळे पोलिसांना मार्च महिन्याचा पगार मिळण्यासाठी किमान 15 एप्रिलचा दिवस उजाडेल. त्यामुळे कधी नव्हे तो सामान्य पोलिसांना पहिला पंधरवडा उसनवारीवरच घालवावा लागणार असल्याचे चित्र आहे. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने अनेकदा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पगारासंबंधी काहीच देणे-घेणे नसते. सामान्य पोलिसांना मात्र प्रशासकीय कामकाजातील उदासीनतेचा असा फटका बसतो, अशी प्रतिक्रिया एका पोलिस कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

(sakal,7 april)

राज्यातील 52.73 टक्के पोलिस घरांविना..!

सामान्य नागरीकांच्या जीवीत आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचा हक्काच्या निवासस्थानासाठीचा लढा अद्याप संपलेला नाही. राज्यातील तब्बल 52.73 टक्के पोलिसांना राहायला चांगल्या दर्जाची घरेच उपलब्ध नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. कमी क्षेत्रफळ आणि वर्षानुवर्षे नादूरूस्त अवस्थेत असलेल्या या घरांत राहण्यास पोलिसांतही अनुत्सुकता असल्याने मुंबईसारख्या शहरांत कित्येक घरे वापराविना तशीच पडून आहेत.
राज्य पोलिस दलात 1 लाख 59 हजार 431 पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 5 हजार 328 अधिकारी आणि 78 हजार 753 कर्मचारी त्यांच्या नेमणूकीच्या परीसरात असलेल्या सरकारी निवासस्थानांत वास्तव्याला आहेत. मात्र, राज्यातील अर्ध्याहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहायला अद्याप योग्य ती सरकारी निवासस्थानेच उपलब्ध नाहीत. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांना आपत्कालिन स्थितीत कर्तव्यावर वेळेत हजर राहता यावे याकरीता पोलिस आयुक्तालय अथवा जिल्हा अधिक्षक कार्यालयाच्या परीसरातच राहायला घरे देण्याचा अलिखित नियम आहे. मात्र, राहण्यासाठी चांगल्या दर्जाची तसेच नेमणूक असलेल्या ठिकाणांपासून जवळची घरे उपलब्ध नसल्याने प्रत्यक्षात हजारो पोलिस आजही नेमणूकीच्या ठिकाणांपासून कित्येक मैल अंतरावर राहायला आहेत. आवश्‍यक घराच्या अनुपलब्धतेमुळे राज्य पोलिस दलातील मोठा टक्का खासगी विकासकांनी बांधलेल्या घरांत राहण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.
मुंबईसारख्या "अ ' दर्जाच्या शहरांत नेमणूक असलेल्या पोलिसांना त्यांच्या वेनताच्या 30 टक्के रक्कम घरभाडे भत्ता दिला जातो. खात्याकडून मिळणारी घरे अनेकदा क्षेत्रफळाने लहान, नादुरूस्त अवस्थेत असल्याने पोलिसांचा खासगी ठिकाणी राहाण्यावरच पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रामुख्याने भर असतो. खासगी ठिकाणी राहताना अनेकदा मासिक हप्ते भरताना होणाऱ्या ओढाताणीमुळे अनेकदा पोलिसांना पर्यायी मिळकतीचा वापर करावा लागत असल्याचे गंभीर चित्र आहे. ग्रामीण भागातील काही पोलिस अधिक्षक कार्यालय क्षेत्रात हाच घरभाडे भत्ता 7 टक्के एवढा असल्याने तेथील पोलिसांचा त्यामानाने सरकारी निवासस्थानांत आपले संसार थाटण्यावर सर्वाधिक कल असल्याचे दिसते. पोलिसांना घरभाडे भत्ता देण्यापेक्षा त्यांची राहायची व्यवस्था सरकारी निवासस्थानांतच करता यावी अशी धारणा असल्याने गृहखाते पोलिसांना साजेशी घरे तयार करण्यावर प्रकर्षाने जोर देत आहे. खासगी विकासकांनी बांधलेल्या घरांत राहण्याच्या पोलिसांच्या झालेल्या मानसिकतेमुळे पोलिस वसाहती ओस पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.पोलिसांची ही मानसिकता बदलण्यासाठी राज्य सरकारने पोलिस गृहनिर्माण विभागाच्या मदतीने अत्याधुनिक सोयींनी युक्त अशी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. पोलिस गृहनिर्माण विभागाकडून राज्याच्या विविध भागांत बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी सरकारने 2001 पासून जानेवारी -2009 अखेर पर्यंत तब्बल 564 कोटी 52 लाख रूपयांचा निधी दिला आहे. 1995 पासून आजपर्यंत तब्बल 6 हजार 931 घरे बांधणाऱ्या पोलिस गृहनिर्माण विभागाने गेल्या पाच वर्षांत आपल्या कामाचा वेग वाढविला आहे. जळगाव,सोलापूर, धुळे, हिंगोली, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, नवी मुंबईत उरण, वर्धा, गोंदीया, नागपूर, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, हिंगोली, गडचिरोली ,नाशिक आणि य
वतमाळ येथे या विभागाने 2 हजार 296 घरे बांधली आहेत. यापुढील काळात पोलिसांना चांगली सरकारी निवासस्थाने मिळावीत याकरीता नागपूर, पुणे, वाशिम, नंदूरबार, बुलढाणा, शेगाव,चंद्रपुर, नागपूर, अमरावती, गढचिरोली, मुंबईत वाकोला आणि घाटकोपर येथे 271 कोटी 25 लाख रूपये खर्च करून 2845 घरे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.त्यामुळे येत्या काळात सरकारी निवासस्थानांत न राहण्याची पोलिसांच्या मानसिकतेत बदल होण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
-----------------------
सरकारी निवासस्थानांत राहणाऱ्या पोलिसांची संख्या पुढील प्रमाणे
---------------------------------------------------------------------

क्रमांक - परीक्षेत्र - मनुष्यबळ - उपलब्ध निवारा

- अधिकारी - कर्मचारी - अधिकारी - कर्मचारी

1) मुंबई - 4763 - 36151 - 2074 - 18530

2) पुणे, सोलापूर, कोल्हापूर विभाग - 1359 -17523 - 555 - 11080

3) औरंगाबाद शहर व ग्रामीण, नांदेड विभाग - 1043 -13850 - 407 - 8635

4) नागपूर शहर आणि ग्रामीण विभाग - 1224 -16308 - 510 - 6764

5) अमरावती शहर आणि ग्रामीण विभाग - 715 -10117 - 261 - 4730

6) ठाणे, नवी मुंबई आणि कोकण विभाग - 1421 - 16045 - 405 - 7327


(sakal,7 april)

राहुलराज एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांना क्‍लीन चीट

अंधेरीहून कुर्ल्याला जाणाऱ्या बेस्ट बसमध्ये बिहारी तरुण राहुलराज याच्या एन्काऊंटरप्रकरणी चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखेने पोलिसांना "क्‍लीन चीट' दिली आहे. गुन्हे शाखेने तसा अहवाल न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे.
बिहारहून आलेल्या राहुलराज कुंदप्रसाद सिंग या बावीसवर्षीय तरुणाने गेल्या वर्षी 22 ऑक्‍टोबर रोजी बेस्ट बसमधून प्रवास करताना रिव्हॉल्व्हरच्या धाकाने बसमधील प्रवाशांना ओलिस धरले होते. या वेळी त्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारायला आलो असल्याचे सांगत प्रवाशांवर गोळीबार केला होता. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. राहुलराजच्या मृत्यूनंतर देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून उत्तर भारतातील सर्वपक्षीय नेत्यांनी पंतप्रधानांचीही भेट घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या एन्काऊंटरप्रकरणी चौकशी करीत होती. या एन्काऊंटरच्या चौकशीसंबंधीचे गुन्हे शाखेचे काम संपले असून त्यासंबंधीचा अहवाल नुकताच मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात पोलिसांना क्‍लीन चीट देण्यात आली आहे. या अहवालात राहुलराजवर लांबून गोळ्या झाडण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(sakal,6 april)

सरकारी निवासस्थाने खासगी व्यक्‍तींकडे

पाच अधिकाऱ्यांवर कारवाई ः मालमत्तेचीही चौकशी सुरू


केंद्र सरकारच्या आस्थापनेत उच्च पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांची सरकारी निवासस्थाने खासगी व्यक्तींना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबईत कार्यरत केंद्र सरकारच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले असून त्यांच्या बेनामी मालमत्तेच्या चौकशीला सुरवात केली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने यापूर्वी सरकारी निवासस्थाने खासगी व्यक्तींना भाडेतत्त्वावर देणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर आज घाटकोपर पश्‍चिमेला केंद्र सरकारी कर्मचारी वसाहतीत स्वतःच्या नावे घरे घेऊन ते खासगी व्यक्तींना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागाने कारवाई केली. पेटंट विभागातील उपनियंत्रक एम. ए. हफीज, केंद्रीय मत्स्य मंत्रालयातील उपमहासंचालक जे. एस. चंद्रन, केंद्रीय वाणिज्य विभागाच्या लेखा खात्याचे उपनियंत्रक अरुण सिंघल, नेव्हल डॉकयार्डचे तांत्रिक अधिकारी एस. एम. त्रिपाठी आणि सहायक कृषी विपणन सल्लागार सी. एम. तांभाणे यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांची घरे मासिक तीन हजारांहून अधिक रकमेला खासगी व्यक्तींना राहायला दिली होती. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईनंतर या अधिकाऱ्यांकडे असलेल्या बेनामी मालमत्तेची चौकशी करायला सुरवात केली आहे. आतापर्यंत एम. ए. हफीज यांच्याकडे लाखो रुपयांची बेनामी मालमत्ता उघडकीस आली असून त्यांची तपासणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(sakal,6 april)

सुरेश गंभीर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आमदार सुरेश गंभीर यांनी आज दुपारी दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातील विद्यमान खासदारांनी केलेल्या कामांबाबत नागरिकांत असंतोष आहे. त्यामुळे आपल्याला विजयाची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश गंभीर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार गंभीर यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली. शिवसेना-भाजप युतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गंभीर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्यासमवेत पत्नी, मुलगी आणि शिवसेना-भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महापौर डॉ. शुभा राऊळ यादेखील त्यांच्यासोबत होत्या. आचारसंहितेमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारासोबत फक्त चार प्रतिनिधी पाठविले जातात. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या "अडवानी-उद्धव कमल निशाण, मांग रहा है हिंदुस्तान', "शिवसेना - भाजपा युतीचा विजय असो' यांसारख्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. निवडणुकीशी संबंधित कागदपत्र तसेच प्रतिज्ञापत्रांवर सह्या करून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजीला सुरवात केली.
या वेळी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवू असे सांगितले. या मतदारसंघातील विद्यमान खासदारांच्या अकार्यक्षमतेमुळे दलितवर्ग आणि युवाशक्तीही आपल्या पाठीशी आहे. याशिवाय शिवसेना व भारतीय जनता पक्षातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तळमळीने काम करीत असल्याने या निवडणुकीत आपला विजय पक्का असल्याचे आमदार गंभीर या वेळी म्हणाले.



(sakal,4 april)

38 हजार 442 परवानाधारक शस्त्रे जप्त

गैरवापर टाळण्यासाठी ः मुंबईतून 213 शस्त्रे जमा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विविध पक्षांच्या राजकीय व्यक्तींकडून 38 हजार 442 परवानाधारक शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. ऐन निवडणुकीत राजकीय व्यक्तींकडे असलेल्या शस्त्रांचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होऊ नये याची खबरदारी घेत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्यातील पोलिस आयुक्तालये आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांमार्फत ही शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. मुंबईतून या काळात 213 परवानाधारक शस्त्रे जमा करण्यात आल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या तसेच यापूर्वीच्या निवडणुकांच्या वेळी गुन्हे दाखल असलेल्या राजकीय व्यक्ती अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडील शस्त्रे गोळा केली जातात. 2 मार्चला निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात राजकीय व्यक्तींकडे असलेली परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुले अशी शस्त्रे जमा करण्याच्या कामाला वेग आला. राज्यातील 10 पोलिस आयुक्तालये आणि 33 जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतून त्यांच्या हद्दीत राहणाऱ्या व परवानाधारक शस्त्रे बाळगणाऱ्या राजकीय व्यक्तींना रितसर नोटिसा काढून त्यांची शस्त्रे जमा करण्यास सुरुवात झाली. त्यानुसार 4 एप्रिलपर्यंत राज्यभरात 38 हजार 442 परवानाधारक; तर 311 बेकायदा वापरण्यात येणारी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यभरात दिवसाला सरासरी एक हजारपेक्षा अधिक परवानाधारक शस्त्रे गोळा करण्यात येत असल्याची माहिती गृहखात्यातील अधिकाऱ्याने दिली. कोणत्याही प्रकारच्या परवान्याशिवाय वापरली जाणारी शस्त्रे जप्त करण्यावर पोलिसांचा भर आहे. मुंबईत 31 मार्चअखेर 186 परवानाधारक शस्त्र जमा करण्यात आली. हा आकडा आता 300 पेक्षा जास्त झाला आहे. मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदा वापरली जाणारी 16 रिव्हॉल्व्हर आणि पिस्तुले; तर 70 हून अधिक अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. निवडणूक उमेदवारीचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यापूर्वी ही परवानाधारक शस्त्रे पोलिसांकडे जमा करायला लागत असल्याने गेल्या काही दिवसांत शस्त्रे गोळा करण्याच्या कारवाईला वेग आल्याचेही हा अधिकारी म्हणाला. राज्यभरात 4 एप्रिलपर्यंत निवडणुकीशी संबंधित अनुचित प्रकार, राजकीय वैमनस्यातून घडणाऱ्या 39 घटनांची गृहखात्याकडे नोंद झाली आह
े. यात मुंबई, कोल्हापूर, परभणी, जळगाव, बीड, नाशिक, औरंगाबाद, पुणे शहर, वर्धा आणि नागपूर येथील घटनांचा समावेश आहे. या घटनांमध्ये 46 जण जखमी झाल्याची नोंद असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

(sakal,4 april)

खंडणी मागणाऱ्या तीन पोलिसांचा शोध सुरू

कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार आज जोगेश्‍वरी येथील आंबोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून एका इमिग्रेशन क्‍लिअरन्स एजन्सीच्या कार्यालयात 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन पोलिस शिपायांसह चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला आंबोली पोलिसांनी अटक केली असून फरार असलेल्या तिघा पोलिस शिपायांचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश घमंडे यांनी दिली.

जोगेश्‍वरी पश्‍चिमेला असलेल्या ऍक्‍सिस इमिग्रेशन ऍण्ड क्‍लिअरिंग कंपनीच्या कार्यालयात काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कार्यालयात शिरलेल्या चौघांनी तेथील अधिकाऱ्यांना आर्थिक गुन्हे शाखेतून आल्याचे सांगून एजन्सीच्या कागदपत्रांची मागणी केली. कागदपत्रे पडताळल्यानंतर एजन्सीच अनधिकृत असल्याचे सांगितले. हे प्रकरण मिटविण्याकरिता चौघांनी एजन्सीच्या अधिकाऱ्यांकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. या वेळी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानुसार आंबोली पोलिसांची गाडी काही क्षणांतच या ठिकाणी पोचली. पोलिस आल्याचे पाहून तेथे असलेले तीन पोलिस शिपाई तेथून पळून गेले; मात्र त्यांच्यासोबत असलेला राजू कृष्णा शेट्टी (34) याला पोलिसांनी जागेवरच पकडले. राजू शेट्टी याच्या चौकशीत त्याच्यासोबत स्थानिक शस्त्र शाखेत काम करणारे दोघे आणि बॉम्बशोधक व विनाशक पथकात काम करणारा एक असे तिघेही पोलिस होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. या तिघांपैकी दोघांची नावे शिंदे आणि इस्माइल पिरजादे अशी असल्याचे आंबोली पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून पोलिसांची नावे उघडकीस आली असून त्यांना पकडल्यानंतरच ते पोलिस असल्याबद्दलची सत्यता उघडकीस येऊ शकेल, असेही आंबोली पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत अधिक तपास सुरू असून पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक घमंडे यांनी दिली.

(sakal,4 april)

मलबारीला मुंबईत आणणार

तीन गुन्ह्यांप्रकरणी दोषी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर बॅंकॉकमध्ये हल्ला करणाऱ्या रशीद मलबारीला दिल्ली व कर्नाटक पोलिसांनी संयुक्त कारवाईत मंगळूर येथून अटक केल्यानंतर खुनाच्या तीन गुन्ह्यांच्या प्रकरणात त्याला पुढील आठवड्यात मुंबईत आणण्यात येणार आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज ही माहिती दिली.
छोटा शकील टोळीचा शार्प शूटर असलेल्या रशीद मलबारीला रविवारी मंगळूर येथून अटक करण्यात आली. मलबारीवर मुंबईत शिवाजीनगर, टिळकनगर आणि वांद्रे येथे खुनाचे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. 1997 मध्ये शिवाजीनगर येथे छोटा राजन टोळीचा गुंड कृष्णा राऊळ; तसेच टिळकनगर येथे शब्बीर खान मुरादखान पठाण या दोघांची गोळीबार करून रशीदने हत्या केली होती. याशिवाय 1998 मध्ये वांद्रे येथील हिल रोड परिसरात अल्ताफ फर्निचरवाला याची खंडणीच्या प्रकरणातून हत्या केली होती. या तिन्ही प्रकरणांनंतर रशीद मुंबईबाहेर गेला होता. 2000 मध्ये त्याने बॅंकॉकमध्ये छोटा राजनवर प्राणघातक हल्ला केला होता. याशिवाय बाळू ढोकरे याच्यावरही त्यानेच परदेशात हल्ला केला होता. रशीदचा मोठा भाऊ इस्माईल मलबारी याच्या विक्रोळी न्यायालयाबाहेर छोटा राजन टोळीच्या गुंडांनी केलेल्या हत्येनंतर रशीद मलबारीचे नाव गुन्हेगारी जगतात पुढे आले होते. काही वर्षे नेपाळमध्ये वास्तव्य केल्यानंतर तो भारतात आला होता. तो मंगळूरमध्ये लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याला मुंबईत दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी येथे आणले जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.
(sakal,2 april)

गोपनीय माहितीचे ब्रिफिंग थांबविण्याचे आदेश

निवडणूक बंदोबस्त ः पैसे, भेटवस्तूंच्या वाटपाला रोखण्यासाठी पथके

राज्यात तीन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून या काळात मतांसाठी पैसे आणि भेटवस्तूंच्या होणाऱ्या वाटपाला आळा घालण्यासाठी राज्यभरात विशेष पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी असलेले राज्याचे पोलिस महासंचालक सुप्रकाश चक्रवर्ती यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक काळात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य गुप्तचर विभागाकडून दैनंदिन गोपनीय माहितीचे केले जाणारे ब्रिफिंग थांबविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यापुढे गुप्तचर खात्यातील अधिकारी मुख्य सचिव आणि गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दैनंदिन गोपनीय माहिती पुरविणार असल्याचेही चक्रवर्ती या वेळी म्हणाले.

निवडणूक काळात सत्ताधारी पक्षांतील मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राजकीय तसेच अन्य क्षेत्रांतील दैनंदिन गोपनीय माहितीचे ब्रिफिंग केले जाते. निवडणूक काळात या ब्रिफिंगचा फायदा सत्ताधारी पक्षाकडून घेतला जाण्याची शक्‍यता अधिक असते. निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षाला सरकारी यंत्रणेचा गैरफायदा घेता येऊ नये, यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापुढे फक्त मुख्य सचिव आणि गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांना ही दैनंदिन गोपनीय माहिती कळवावी, असे आदेश आपण यापूर्वीच दिल्याचेही चक्रवर्ती यांनी या वेळी सांगितले.

राज्यात 16, 23 आणि 30 एप्रिल अशा तीन टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. तब्बल 82 हजार 300 मतदान केंद्रावर निर्भय आणि शांततेच्या वातावरणात निवडणुका व्हाव्यात, याकरिता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस शिपाई आणि एक गृहरक्षक दलाचा जवान ठेवण्यात येणार आहे. संवेदनशील भागातील केंद्रांवर दोन पोलिस शिपाई व एक गृहरक्षक दलाचा जवान ठेवला जाणार आहे. धार्मिक दंगली झालेल्या मालेगाव, औरंगाबाद, धुळे, अकोला यांसारख्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याव्यतिरिक्त मतदान केंद्राबाहेर कोणत्याही प्रकारचा जमाव जमू नये, यासाठी केंद्राबाहेरही राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत. निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी केंद्र सरकारने राज्याला केंद्रीय अर्धसैनिक सुरक्षा दलाच्या 30 कंपनी देण्याचे निश्‍चित केले आहे.

निवडणुकीच्या काळात एका जिल्ह्यातील पोलिस दुसऱ्या जिल्ह्यात निवडणुकांच्या कामकाजासाठी मोठ्या संख्येने हलविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भ, मराठवाडा या परिसरात होणाऱ्या निवडणुकांसाठी सहा हजार 700 अतिरिक्त पोलिस, दुसऱ्या टप्प्यात पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग, कोकण, पुणे अशा होणाऱ्या मतदानासाठी 15 हजार 900 पोलिस; तर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 1500 पोलिस सुरक्षा व्यवस्थेसाठी दिले जाणार असल्याचे चक्रवर्ती म्हणाले. याच तीन टप्प्यांत गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेतली जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 11 हजार 200 पुरुष आणि एक हजार 600 महिला, दुसऱ्या टप्प्यासाठी 15 हजार 850 पुरुष आणि 2300 महिला; तर तिसऱ्या टप्प्यासाठी चार हजार 100 पुरुष आणि 900 महिला गृहरक्षक दलाचे जवान ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान व्हावे, यासाठी उमेदवार अथवा त्यांचे कार्यकर्ते मतदारांना मोठी रक्कम आणि महागड्या भेटवस्तू देऊन भुलवत असतात. हे प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तसेच पोलिस आयुक्तालयात विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून असे गैरप्रकार करणाऱ्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्यात येईल, असेही चक्रवर्ती म्हणाले.
(sakal,2april)

राज्यातील 280 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबईतील 10 अधिकाऱ्यांचा समावेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ नेमणूक असलेल्या राज्यातील 280 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री उशिरा काढण्यात आले आहेत. बदल्या झालेल्या या पोलिस निरीक्षकांना त्यांच्या बदलीच्या नवीन ठिकाणी 24 तासांत हजर राहण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस महासंचालक अहमद जावेद यांनी दिले आहेत. बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांत पुण्यातील सर्वाधिक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. मुंबईतील अवघ्या 10 अधिकाऱ्यांची नावे या बदल्यांच्या यादीत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या बदल्यांना काल रात्री उशिरा हिरवा कंदील मिळाला. त्यानुसार या बदल्यांचे आदेश रात्री उशिरा काढण्यात आले.
बदली झालेले मुंबई परिसरातील पोलिस निरीक्षक (कंसात नेमणुकीचे नवीन ठिकाण) ः अजित खडके (पुणे शहर), माणिक बाखरे (नवी मुंबई), वसंत झुंजारे (नवी मुंबई), सुरेश सावंत (कोल्हापूर), रमेश खडतरे (पोलिस प्रशिक्षण विद्यालय - मरोळ), सदाशिव पाटील (लातूर), पाराजी रेपाळे (सोलापूर शहर), अविनाश धर्माधिकारी (नवी मुंबई), सय्यद दुलेमिया (गुन्हे अन्वेषण विभाग) व विलास सानप (ठाणे शहर).
नवी मुंबईतील पोलिस निरीक्षक ः रामकृष्ण कोठावळे (मुंबई), भरत शेळके (मुंबई), तानाजी पाटील (मुंबई) व नारायण येडके (मुंबई).
रायगडमधील पोलिस निरीक्षक ः बाळकृष्ण शिंदे (पुणे शहर), विष्णू मोरे (मुंबई शहर), अशोक गवस (रत्नागिरी), शिवाजी शेलार (लातूर), अशोक काळे (बुलढाणा), नामदेव कोहीनकर (सातारा), प्रमोद खाडे (ठाणे शहर) व अमरसिंह निंबाळकर (ठाणे ग्रामीण).
ठाणे शहरातील पोलिस निरीक्षक ः विनय पांढरपट्टे (नागपूर शहर), रामचंद्र आहेर (मुंबई), विठ्ठल राणे (पुणे शहर), विजय कदम (पुणे शहर), अनंत आरोसकर (पुणे शहर), गणपत माडगूळकर (पुणे शहर), बाजीराव भोसले (पुणे शहर), भीमराव गायकवाड (पोलिस प्रशिक्षण विद्यालय - मरोळ), श्रीमंत घुले (मुंबई शहर), आजिनाथ सातपुते (मुंबई शहर), शांताराम तायडे (मुंबई शहर), रमेश पाटील (मुंबई शहर), भीमराव जाधव (रायगड), अरुण सोंडे (रायगड), ज्ञानदेव गवारे (अकोला), केशवराव नाईक (नंदुरबार), मीरा बनसोडे (कोल्हापूर), पंढरीनाथ मांढरे (पुणे शहर), शरद उगले (पुणे शहर), एस. जे. घागरे (मुंबई शहर), शिवाजी शेलार (रत्नागिरी), नासीर पठाण (नगर), पांडुरंग दराडे (समाजकल्याण - नागपूर) व लक्ष्मण गायकवाड (गुन्हे अन्वेषण विभाग).
(sakal,2april)

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकाच ठिकाणी तीन वर्षांपासून अधिक काळ नेमणूक असलेल्या राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरही निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले असून या बदल्यांचे आदेश उद्यापर्यंत निघण्याची शक्‍यता गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. मुंबई हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांच्याजागी नीतेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असून ठाण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी विनोद लोखंडे यांची नेमणूक झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकाच ठिकाणी तीन वर्षांहून अधिक काळ नियुक्ती असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे अपेक्षित होते. आयपीएस अधिकाऱ्यांपासून सहाय्यक पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांपर्यंतच्या 470 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र आचारसंहिता लागल्याने या बदल्या राज्य निवडणूक आयोगाच्या कात्रीत अडकल्या होत्या. या बदल्यांना निवडणूक आयोगाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. नवीन बदल्यांनुसार श्रीकांत सावरकर यांची पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती झाली आहे. सुरिंदर कुमार यांची नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक, जवाहर सिंग यांची "म्हाडा'चे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. रघुनाथ खैरे यांची परभणीचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त शहाजी उमाप यांची नांदेड तर श्रीमती निकम यांची कोल्हापूरच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेत पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रवीण पवार यांची राज्य उत्पादन शुल्क खात्यात बदली करण्यात आल्याचे खात्रीलायक समजते. या बदल्यांचे आदेश उद्या निघणे अपेक्षित असल्याचे गृहखात्यातील सूत्रांनी सांगितले.
(sakal,2april)

पोलिसांच्या ताफ्यात स्फोटके शोधणारे वाहन दाखल

एक्‍सप्लोसिव्ह स्कॅनर व्हॅन ः 200 मीटरच्या परिघावर नजर

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दोनशे मीटर परिसरातील स्फोटकांचा शोध घेऊ शकणाऱ्या अत्याधुनिक अशा "एक्‍सप्लोसिव्ह स्कॅनर व्हॅन' या स्फोटकांचा आणि शस्त्रास्त्रांचा शोध घेणाऱ्या वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. सहा कोटी रुपये किंमत असलेले हे वाहन येत्या 6 एप्रिलपासून मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावरील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर उभे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मर्सिडीज कंपनीने बनविलेले हे वाहन अतिशय घातक अशी स्फोटके आणि शस्त्रास्त्रेच नव्हे तर दोनशे मीटरच्या परिसरात उभ्या असलेल्या व्यक्तिंच्या खिशातील नाण्यांची माहितीही उपलब्ध करून देणार आहे. या वाहनाला असलेल्या दोन्ही बाजूंच्या विशेष खिडक्‍यांना लावलेले कॅमेरे 360 अंशात फिरून सभोवतालची प्रत्येक हालचाल टिपतात. दोन दिवसांपूर्वी मुंबई बंदरात दाखल झालेल्या या वाहनातील स्फोटके आणि मेटल शोधणारी उपकरणे जर्मनी आणि अमेरिकेतून बसविण्यात आली आहेत. सौदी अरेबिया येथून जर्मनी नंतर अमेरिका आणि पुढे मुंबई असा या वाहनाचा आतापर्यंत प्रवास झाला आहे. दोनशे मीटरच्या परिघातील घातक स्फोटके आणि शस्त्रसाठा शोध घेण्याची क्षमता असलेल्या या वाहनाला अतिरेकी कसाबच्या सुरक्षिततेसाठीच प्रामुख्याने वापरले जाणार आहे. खटल्याच्या वेळी ऑर्थर रोड कारागृहाजवळ कोणत्याही प्रकारची घातपाती कारवाई होऊ नये, याकरिता सुनावणीच्या वेळी हे वाहन कारागृहाजवळच उभे करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली. दोनशे मीटर क्षेत्रात शस्त्रास्त्र शोधण्याची क्षमता असलेले हे देशातील पहिलेच वाहन ठरणार आहे.

(sakal,2april)
ऍड. वाघमारे यांना कडेकोट सुरक्षा
राकेश मारिया : "झेड दर्जा'बाबत मात्र दुजोरा नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 : मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याचे वकीलपत्र घेणाऱ्या ऍडव्होकेट अंजली वाघमारे आणि त्यांच्या सहायक वकिलाला मुंबई पोलिसांनी आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली, मात्र ही सुरक्षा झेड दर्जाची असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिलेला नाही.
मुंबई हल्ल्याचा खटला चालविण्यासाठी या हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी कसाब याला ऍड. अंजली वाघमारे यांच्या रूपात वकील मिळाला. कसाबचे वकीलपत्र घेतल्यानंतर वाघमारे राहत असलेल्या वरळी पोलिस कॅम्प येथील घरावर शिवसैनिकांनी सोमवारी मध्यरात्री निदर्शने करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर ऍड. वाघमारे यांनी या खटल्यातून माघार घेण्यावर विचार करण्यासंबंधी एक दिवसाची मुदत मागितली होती. राकेश मारिया आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर वाघमारे यांनी आज कसाबचे वकीलपत्र घेण्यावर ठाम असल्याची भूमिका स्पष्ट केली. वाघमारे यांच्या भूमिकेनंतर मुंबई पोलिसांनी त्यांना आणि या खटल्यासाठी त्यांची मदत करणारे वकील के. पी. पवार यांना आवश्‍यक ती सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. खटला संपेपर्यंत वाघमारे व पवार यांना ही सुरक्षा पुरविली जाणार असल्याचे मारिया यांनी सांगितले.

------

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाबचे वकीलपत्र घेतलेल्या ऍड्‌. अंजली वाघमारे यांच्या घरासमोर निदर्शने केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी शिवसेनेच्या आठ कार्यकर्त्यांना अटक केली. अटक केलेल्या या कार्यकर्त्यांत अतिरेकी कसाब याला जिवंत पकडताना धारातीर्थी पडलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक शहीद तुकाराम ओंबळे यांचा चुलत चुलतभाऊ एकनाथ ओंबळे यांचाही समावेश आहे. एकनाथ ओंबळे शिवसेनेचे उपशाखाप्रमुख आहेत.

"धूम' स्टाईल बाईक चालविणाऱ्यांना तुरुंगाची हवा

27 तरुणांना अटक ः सी लिंक परिसरात रात्रीच्या वेळी शर्यती

वांद्रे-वरळी सी लिंक परिसरात रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या रेस लावून "धूम' स्टाईलने गाड्या चालविणाऱ्या 27 बाइकर्सना तुरुंगाची हवा खावी लागली. वांद्रे पोलिसांनी काल मध्यरात्री अटक केलेल्या या दुचाकीस्वारांची आज न्यायालयाने प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.
वांद्रे-वरळी सी लिंक परिसरातील रस्त्यावर दर शनिवार, रविवारी मोटरसायकलींच्या शर्यती सुरू असतात. रात्री साडेनऊ ते मध्यरात्री उशिरापर्यंत 20 ते 30 वर्षे वयोगटातील गट या शर्यती लावून तुफान वेगात गाड्या चालवीत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी खेरवाडीकडून येणाऱ्या उड्डाणपुलाखालील रस्त्यावर नाकाबंदी लावली. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पल्सर, हिरो होंडासारख्या मोटरसायकल वाऱ्याच्या वेगाने चालवून शर्यती लावणारे हे 27 तरुण तेथे आले. या तरुणांना सुरुवातीला पोलिसांनी थांबवून गाड्या हळू चालविण्यास सांगितले; मात्र पोलिसांकडून सुटका होताच त्यांनी पुन्हा आपली शर्यत सुरू केली. यानंतर पोलिसांनी या तरुणांच्या मोटरसायकलींचा पाठलाग करून त्यांना पकडले. कुर्ला, अंधेरी, बोरिवली, धारावी परिसरात राहणाऱ्या या सर्वच तरुणांना पोलिसांनी अटक करून, त्यांच्या मोटरसायकलीही जप्त केल्या. रात्रीच्या वेळी मोकळ्या असणाऱ्या या मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून हा गट मोटरसायकलींच्या शर्यती लावत होता. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे अन्य वाहनचालक व पादचारी, तसेच या तरुणांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांच्यावर कारवाई केल्याची माहिती या प्रकरणाचे तपासाधिकारी पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांनी दिली. यापूर्वीही याच मार्गावर शर्यती लावणाऱ्या चार गटांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती.
काल अटक केलेल्या या दुचाकीस्वारांत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, खासगी कंपन्यांत चांगल्या पदावर कामाला असणाऱ्यांचा समावेश असल्याचेही वांद्रे पोलिसांनी सांगितले.

(sakal,31march)

राज्य सरकारकडून एनएसजीला 23 एकर जमीन

मरोळला तळ ः फक्त पायाभूत प्रशिक्षणाची व्यवस्था

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलाचा (एनएसजी) तळ उभारण्याकरिता मरोळ येथील 23 एकर जागा राज्य सरकारने एनएसजीला दिली आहे. या तळाची उभारणी करण्यासाठी एनएसजीने किमान दीडशे एकर जागेची मागणी केली होती. मात्र मुंबईत जागेच्या अनुपलब्धतेमुळे एनएसजीला पहिल्यांदाच एवढ्या कमी जागेत आपला तळ उभा करावा लागणार आहे.

26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आपत्कालीन स्थितीत दहशतवादाचा मुकाबला करण्याकरिता मुंबईत राष्ट्रीय सुरक्षा दलाचा तळ ठेवण्यावर केंद्रीय गृहखात्याने शिक्कामोर्तब केले. हा तळ उभारण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाने राज्य सरकारकडे दीडशे एकर जागेची मागणी केली होती. मुंबईत एवढी मोठी जागा उपलब्ध नसल्याने कल्याण, नवी मुंबई आणि डहाणू येथील जागांचा पर्यायही राज्य सरकारने ठेवला होता. मात्र, आपत्कालीन स्थितीत संपूर्ण पश्‍चिम विभागाच्या सुरक्षिततेसाठी या दलाची मदत घेणे शक्‍य व्हावे म्हणून त्यांचा तळ मुंबई विमानतळानजीकच ठेवण्याचे ठरले. अंधेरीत मरोळ येथे मुंबई पोलिसांच्या मालकीची शंभर एकर जागा आहे. ही जागा पोलिस प्रशिक्षण व कवायतींसाठी वापरली जाते. राष्ट्रीय सुरक्षा दलाला मुंबईबाहेर जागा दिल्यास आपत्कालीन स्थितीत या पथकाचे जवान हवाईमार्गे मुंबईत उतरण्यास उशीर होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळेच मुंबई पोलिसांकडील जागेपैकी संशोधन केंद्राची 23 एकर जागा राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या तळाला देण्यास सरकारने अनुमती दिली. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महासंचालक एनपीएस अलख यांनीदेखील या जागेला काही दिवसांपूर्वी भेट दिली. क्षेत्रफळाने लहान असली तरी ही जागा तळ उभारणीच्या दृष्टीने आदर्श ठरणार आहे. त्यामुळे या जागेला एनएसजीने पसंती दिली आहे. या ठिकाणी जवानांना पायाभूत प्रशिक्षण देता येणार आहे. अधिक प्रशिक्षणासाठी जवानांना आवश्‍यकतेनुसार मणेसर येथे पाठविले जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी या तळाच्या बांधणीचे काम पूर्ण करण्याचे राष्ट्रीय सुरक्षा दलाने ठरविले आहे. तळ उभारणीच्या कामावर लक्ष ठेवण्याकरिता या पथकाचे काही अधिकारी गेले काही दिवस मुंबईत मुक्कामाला आहेत.

(sakal,31march)

छोटा राजनवर हल्ला करणाऱ्या मलबारी याला अटक

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्यावर बॅंकॉकमध्ये हल्ला करणारा आरोपी रशीद मलबारी याला दिल्ली आणि कर्नाटक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बंगळूर येथे अटक करण्यात आली. मलबारी याला चौकशीसाठी लवकरच मुंबईला नेण्यात येणार असल्याची माहिती गुप्तचर खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मध्य बॅंकॉकमधून आपल्या टोळीची सूत्रे हलविणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर सप्टेंबर 2000 मध्ये छोटा शकीलच्या गुंडानी प्राणघातक हल्ला केला होता. यावेळी राजनचा विश्‍वासू साथीदार रोहित वर्मा मारला गेला होता. पोलिस तपासाअंती हा हल्ला इब्राहिम मलबारी आणि त्याचा लहान भाऊ रशीद मलबारी या दोघांनी केल्याचे स्पष्ट झाले होते. या हल्ल्यानंतर इब्राहिम मलबारी पोलिस चकमकीत मारला गेला होता. तर त्याचा लहान भाऊ रशीद मलबारी गेली अनेक वर्षे फरार होता. रशीद बंगळूर येथे लपल्याची माहिती आयबी या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला आज प्राप्त झाली. त्यानुसार आयबीच्या दिल्ली येथील पथकाने कर्नाटक पोलिसांच्या मदतीने रशीद याला अटक केली. छोटा शकील टोळीचा शूटर समजला जाणाऱ्या रशिदवर मुंबईतही गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्याला लवकरच मुंबईला नेण्यात येणार असल्याचे केंद्रीय गुप्तचर खात्यातील अधिकाऱ्याने "सकाळ' ला दिली.

(sakal,30 march)