Monday, June 29, 2009

राज्यातील साडेसहा हजार गावे तंटामुक्त घोषित



तंटे मिटविण्यात लातूर जिल्हा आघाडीवर


गावपातळीवर सौहार्दपूर्ण आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करून त्याद्वारे गावात आपापसांत असलेले तंटे सोडविण्यासाठी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त योजनेत सहभागी झालेल्या राज्यातील 27 हजार गावांपैकी यंदा साडेसहा हजार गावांना स्वयंमूल्यमापनानुसार तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. यंदा गावातील तंटे सामोपचाराने मिटविणाऱ्या जिल्ह्यांत लातूर आघाडीवर असल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
गावपातळीवर छोट्या छोट्या कारणांवरून उद्‌भवणाऱ्या वादांचे मोठ्या तंट्यात पर्यवसान होऊन आर्थिक आणि जीवितहानी होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अतिशय लहान लहान कारणांतून निर्माण होणाऱ्या या तंट्याबाबत गावातील जाणत्या मंडळींनी वेळीच हस्तक्षेप केल्यास होणारी संभाव्य हानी टळू शकते. एकमेकांविषयी असलेला राग आणि मत्सर सामंजस्याने सोडविल्यामुळे गावातील वातावरणही खेळीमेळीचे राहते. याच बाबींचा विचार करून दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेद्वारे गावातील जनतेत जातीय व धार्मिक सलोखा, सामाजिक सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवून तंटामुक्त होणाऱ्या गावांना सरकारद्वारे गौरविण्यात येते. तंटामुक्त होणाऱ्या गावांना एक ते दहा लाख रुपयांची पारितोषिके दिली जातात.
यंदा या मोहिमेच्या दुसऱ्या वर्षी राज्यातील बहुसंख्य गावांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. या वर्षी राज्यातील 27 हजार 390 गावांनी या मोहिमेत सहभाग घेतला असून जिल्हा मूल्यमापन समित्यांना 6500 गावांनी तंटामुक्त असल्याचे अहवाल सादर केले आहेत. या गावांचे जिल्हांतर्गत समित्यांकडून 10 ते 25 जूनदरम्यान मूल्यमापन झाले आहे. 20 जुलैपूर्वी या समित्या त्यांचे मूल्यमापन अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षकांना सादर करतील. याच गावांतून राज्य सरकार तंटामुक्त गावांची घोषणा करणार आहे. गेल्या वर्षी या मोहिमेत सहभागी झालेल्या 27 हजार 474 गावांपैकी 2328 गावांना सरकारने तंटामुक्त गाव म्हणून घोषित केले होते. महसुली, दिवाणी व फौजदारी अशा दोन लाख 64 हजार 697 तंट्यांचे गावपातळीवरच निराकरण करण्यात आले होते. त्यापैकी दोन लाख सात हजार 115 फक्त फौजदारी तंटे होते. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्याने सर्वाधिक तंटे या मोहिमेत मिटविले होते. यंदा अशा प्रकारचे तंटे मिटविण्यात लातूर जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती गृहखात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा बाह्यसमित्यांनी मूल्यमापन केलेले अहवाल जुलैच्या अखेर सरकारकडे सादर केले जाणार आहेत. त्यातून 9 ऑगस्ट रोजी तंटामुक्त गावांची घोषणा केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

पारितोषिक रकमेतही वाढ
गावात तंटे होऊ नयेत, दाखल झालेल्या व नवीन तंट्याचे निराकरण करून ते कमी करण्याच्या राज्यव्यापी मोहिमेत सहभागी होणाऱ्या गावांना त्यांच्या कामांचे मूल्यमापन करण्याकरिता 200 गुण ठेवले जातात. या मूल्यांकनात 190 पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गावांना पारितोषिकांच्या रकमेतही 25 टक्‍क्‍यांची भरीव वाढ करून मिळते.

(sakaal,27 th june)

अमलीपदार्थ व्यापाऱ्याविरोधात प्रसंगी कायद्यात बदल करू

मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

अमलीपदार्थांच्या व्यापारावर आळा घालण्यासाठी सरकार ध्येयनिष्ठ असून पोलिसांनी असा व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अमलीपदार्थांबाबत तरुणांत जागरूकता आणण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले. अमलीपदार्थविरोधी पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार असून आवश्‍यक तर यासाठी कायद्यातही बदल करू, असे सांगतानाच ही जागतिक समस्या असून त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतन होऊन तोडगा काढायला हवा, अशी शक्‍यता त्यांनी व्यक्त केली.
जागतिक अमलीपदार्थ दिनानिमित्त मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. या वेळी तरुण पिढीत अमलीपदार्थांच्या वाढत्या व्यसनाधिनतेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सामाजिक संस्थांनी समाजप्रबोधनाद्वारे व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन करण्यास हातभार लावण्यावर भर द्यावा, असेही ते म्हणाले.
पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी मुंबई महानगरातील अमलीपदार्थांच्या व्यापाराचे समूळ उच्चाटन करण्याचे व सामाजिक आरोग्य अबाधित राखण्याचे आश्‍वासन दिले.
"अमलीपदार्थांची नशा-दशा आणि दिशा' या विषयावर झालेल्या परिसंवादात गृहराज्यमंत्री नसीम खान, डी. शिवानंदन, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख के. पी. रघुवंशी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचे संचालक डॉ. एच. परशुरामन, अभिनेता नील मुकेश आदींनी सहभाग घेतला. या परिसंवादाचे सूत्रसंचालन अभिनेत्री कांचन धर्माधिकारी यांनी केले. के. पी. रघुवंशी यांनी अमलीपदार्थांचा व्यापार आणि दहशतवाद यांच्या आपसातील संबंधांवर प्रकाश टाकला. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अमलीपदार्थांचा आंतरराष्ट्रीय व्यापार व दहशतवाद तसेच भारतीय संस्कृती आणि युवा पिढी या विषयावर प्रबोधन केले.
अमलीपदार्थविरोधी पथकाचे प्रमुख पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.

(sakaal, 26 th june)

अनाथालयातून पळालेल्या "त्या' मुली सापडल्या

अंधेरी येथील सेंट कॅथरिन होस्टेल या अनाथालयातून पळून गेलेल्या चार अल्पवयीन मुली चिपळूण रेल्वेस्थानकात सापडल्या आहेत. या मुलींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना मुंबईत परत आणण्यासाठी रत्नागिरी येथे पोलिसांचे पथक पाठविण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली.
हीना तारासिंह (9), नंदिनी रविकुमार पाणीकर (9) , पूजा सुनील गोतपागर (13) आणि गीता रणजित कांडरे (10) अशी या पळून गेलेल्या मुलींची नावे आहेत. सेंट कॅथरिन होस्टेल या अनाथालयाच्या मानखुर्द येथील शाखेतून या मुलींना दोन आठवड्यांपूर्वी अंधेरी येथे पाठविण्यात आले होते. अंधेरीच्या अनाथालयात 500 पेक्षा अधिक अनाथ व गरजू मुली राहतात. या ठिकाणी संस्थेची दहावीपर्यंत शाळादेखील आहे. काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर शाळेच्या लहान प्रवेशद्वारातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागे या चार मुलीदेखील अनाथालयाबाहेर पडल्या. सायंकाळी अनाथालयात असलेल्या मुलांची मोजणी करताना तेथील वार्डनच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी काही मुलांसह या चारही मुलींचा शोध घ्यायला सुरवात केली. मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतरही त्या सापडल्या नाहीत. संस्थेतील अधिकाऱ्यांनी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बेपत्ता असलेल्या या चारही मुलींची वर्णने पोलिसांनी वायरलेसवरून राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना पाठविली होती. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वेस्थानकात या चारही मुली उतरल्या. या मुलींना रेल्वेस्थानकात फिरताना पाहून पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस सुरू केली. चौकशीनंतर त्यांनी मुंबईतील अनाथालयातून पळून आल्याचे कबूल केले. या मुलींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक चिपळूण येथे पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलाश घमंडे यांनी दिली. महिनाभरापूर्वीदेखील या अनाथालयात असाच प्रकार घडला होता. एका वीसवर्षीय अनाथ तरुणीने पळून जाऊन भाईंदर येथे एका तरुणाशी लग्न केल्याचेही घमंडे या वेळी म्हणाले.

(sakaal,27th june)

अन्याय निवारण समितीच्या कार्यालयात मद्यधुंदी पार्टी

सात कॉलगर्लसह 13 व्यापाऱ्यांना अटक

अन्याय निवारण व निर्मूलन समितीच्या कार्यालयात कॉलगर्लच्या सोबतीने मद्यधुंद अवस्थेत लोखंडवाला संकुलात सुरू असलेल्या पार्टीवर अंबोली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात गुजरातच्या सुरत व अहमदाबाद येथील पाच आणि मुंबईतील आठ व्यापाऱ्यांसह वीस जणांना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये सात कॉलगर्लचा आणि दोन तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी 65 लाख रुपयांच्या प्लास्टिककोटेड बनावट नोटा, मद्यसाठा आणि 41 हजार रुपयांची रोख हस्तगत केली आहे.
लोखंडवाला संकुलातील रविकिरण इमारतीत पहाटे तीनच्या सुमारास पोलिसांनी हा छापा घातला. या ठिकाणी असलेल्या गाळ्यात अन्याय निवारण व निर्मूलन समितीचे कार्यालय आहे. या समितीचा अध्यक्ष असलेला सलीम खान आणि त्याचा साथीदार गोपी यांच्यासह समितीच्या कार्यालयातच ही पार्टी सुरू होती. या पार्टीसाठी सुरत व अहमदाबाद येथील पाच; तर मुंबईतील आठ व्यापारी आले होते. पार्टीसाठी त्यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये भरले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या या पार्टीत वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या सात मुलींचादेखील समावेश होता. मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टीम लावून आणि मद्यधुंद होत हे व्यापारी कॉलगर्लसोबत नाचत असतानाच अंबोली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात त्यांनी मदमस्त झालेल्या या सर्व व्यापाऱ्यांना अटक केली. याच वेळी अश्‍लील हावभाव करीत असल्याच्या आरोपाखाली सात कॉलगर्ल आणि दोन तृतीयपंथीयांनाही अटक करण्यात आली. या सर्व आरोपींना पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधात्मक कायद्याखाली अटक केल्याची माहिती या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अशोक नाईक यांनी दिली. हे सर्व आरोपी व्यापाराच्या निमित्त मुंबईत आले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी मद्याचा साठा व मुलींवर उडविण्यासाठी आणलेली 41 हजार रुपयांची रोख हस्तगत केली आहे. आरोपींकडून एक हजार रुपये किमतीच्या 65 लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्याचेही नाईक यांनी सांगितले.


(sakaal,26 th june)

अतिताणामुळे महिन्याला तीन पोलिस बळी!

साडेतीन वर्षांत 118 अधिकारी व कर्मचारी हृदयविकाराने मृत

पोलिसांचे आरोग्य उत्तम राहण्याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होत असतानाच कामाच्या अनियमित वेळा आणि प्रचंड ताणामुळे दर महिन्याला मुंबई पोलिस दलातील सरासरी तीन पोलिस अधिकारी व कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्‍याने मरण पावत असल्याची धक्कादायक आकडेवारी "सकाळ'ला उपलब्ध झाली आहे. गेल्या साडेतीन वर्षांत विविध आजार, व्याधी व कर्तव्य बजावताना मरण पावलेल्या 516 पोलिसांपैकी तब्बल 118 पोलिस फक्त हृदयविकाराने मरण पावले आहेत.
कामाच्या अनियमित वेळा, सततचा बंदोबस्त व आवश्‍यकतेप्रमाणे रद्द होणाऱ्या रजा अशा वातावरणात मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी काम करताना दिसतात. अपूर्ण कर्मचारी संख्येमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या किमान 12 तासांच्या नोकरीमुळे पोलिसांना अनेकदा तणावाखाली काम करावे लागते. त्यातच धूम्रपान व मद्यपानासारख्या जडणाऱ्या व्यसनांमुळे या पोलिसांना आजारपणही कवटाळत असल्याचे दिसते. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात मुंबई पोलिस दलातील 516 पोलिस अधिकारी व कर्मचारी विविध आजार आणि व्याधींनी मरण पावले आहेत. त्याखालोखाल क्षयरोगाने मरण पावणाऱ्या पोलिसांची संख्याही लक्षणीय आहे. गेल्या साडेतीन वर्षांत क्षयरोगाने 61 पोलिस मृत्युमुखी पडले. एड्‌समुळे चार, कर्करोग- 19, किडनी- 27, कावीळ- 41, अपघाती मृत्यू- 59, अर्धांगवायू- सात व मधुमेह- 18 अशी इतर आकडेवारी आहे. तणावाखाली येऊन 14 पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. दीर्घकालीन आजाराने 21 पोलिस दगावले आहेत.
नियमित व्यायाम आणि कवायतींद्वारे आरोग्य चांगले राखण्याकडे पोलिसांचा कल असतो. "बॉडी मास्क इंडेक्‍स'प्रमाणे आरोग्य चांगले ठेवणाऱ्या पोलिसांना दरमहा 250 रुपये फिटनेस भत्ता दिला जातो. पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वतःचे आरोग्य चांगले ठेवण्याकडे प्रकर्षाने कल असल्याचे चित्र आहे; मात्र पोलिस दलात अनेक वर्षे सेवा झालेले अधिकारी व कर्मचारी नियमित कवायती आणि सर्वसाधारण व्यायामालाही काही वेळा दांडी मारताना दिसतात.

सर्व पोलिसांची वैद्यकीय चाचणी होणार
ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात नेमणुकीवर असलेले पोलिस हवालदार ज्योतिराम येडेकर यांचा संशयित आरोपींचा पाठलाग करताना बुधवारी (ता. 24) पहाटे हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनीदेखील पोलिसांच्या आरोग्यासंदर्भात गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात केली असून, येत्या 15 दिवसांच्या काळात मुंबई पोलिस दलातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वैद्यकीय चाचणीसाठी पोलिसांना केईएम रुग्णालय आणि लिंटास कंपनीचे सहकार्य मिळणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला असलेल्या आरोग्यविषयक समस्येचे प्राथमिक अवस्थेतच निदान झाल्यास त्याला चांगल्या वैद्यकीय सुविधा देऊन आजाराचे उच्चाटन करता येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


-------------



इन्फो...
वर्ष - मृत पोलिसांची संख्या
2006 - 158
2007 - 137
2008 - 167
2009 (मेअखेर) - 54



पोलिस रुग्णालयाचाही बदलणार चेहरामोहरा

नागपाडा येथील पोलिस रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवनियुक्त पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी पावले उचलली आहेत. ठाणे येथील पोलिस रुग्णालय "वोक्‍हार्ट' या खासगी रुग्णालयाला चालवायला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील नागपाडा येथील पोलिस रुग्णालयही खासगी रुग्णालयाला देण्याचे प्रस्तावित आहे. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने हे रुग्णालय खासगी रुग्णालयाला चालवायला दिले जाणार आहे. यासंबंधी लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे


(sakaal,25th june)

पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबादमधील घराला सील

लातूर आणि डोंबिवलीतही सीबीआयचे छापे

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अधिक पुरावे मिळविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीबीआय) आज उस्मानाबाद, लातूर आणि डोंबिवली येथे छापे घातले. उस्मानाबाद येथे खासदार पद्मसिंह पाटील यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्याच्या वेळी घरात कोणीच नसल्याने या घराला सीबीआयने सील ठोकले. या छाप्यांत महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्र; तसेच जिवंत काडतुसे सापडल्याची माहिती सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात पाटील यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पाटील यांच्या सहभागासंबंधी सबळ पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सीबीआय करीत आहे. याच प्रयत्नांतून आज सीबीआयने पाटील यांच्या उस्मानाबाद येथील घरावर छापा घातला. घर बंद असल्याने सीबीआयच्या पथकाने घराला सील ठोकले आहे. हे घर पद्मसिंह यांचे नातेवाईक; तसेच कुटुंबीयांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सतीश मंदाडे याच्या लातूर येथील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात मात्र या पथकाला महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्या घरातून सीबीआयला जिवंत काडतुसे आणि काही छायाचित्रे सापडली आहेत. सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग आणि पोलिस अधीक्षक अमिताभ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथके ही कारवाई करीत आहेत.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या सुपारीचे पैसे आरोपींना पुरविणारा आरोपी व भाजप नगरसेवक मोहन शुक्‍ल याच्या डोंबिवली येथील घरात टाकण्यात आलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधीक्षक अमिताभ ठाकूर यांनी सांगितले. सीबीआयचे पथक अद्याप लातूर आणि उस्मानाबाद येथे आहे. लवकरच हे पथक मुंबईत येणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तेरणा'च्या कार्यालयावरही छापा
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सीबीआयने खासदार पद्मसिंह पाटील यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावी असलेल्या दोन घरांवर छापा घातला. ही दोन्ही घरे सील करण्यात आली. याशिवाय तेरणा साखर कारखाना, तसेच नवी मुंबईत असलेल्या तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयावरही छापा घालण्यात आला. या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. पवनराजे यांच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी पारसमल जैन याच्या डोंबिवली येथील घरावरही छापा घालण्यात आल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी दिली.



(sakaal,25th june)

एनएसजीतळाचे उद्‌घाटन 30 जून रोजी

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या हल्ल्यांना समर्थपणे तोंड देण्याकरिता मुंबईत उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) तळाचे काम पूर्ण झाले असून या तळाचे उद्‌घाटन येत्या 30 जून रोजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वेळी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेतलेल्या अतिरेक्‍यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळविण्याकरिता दिल्ली येथून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या पथकाला पाचारण करावे लागले होते. अतिरेक्‍यांचा बिमोड करण्यासाठी या पथकाच्या कमांडोंसह मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भविष्यात अशा प्रकारचा हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचा एक तळ मुंबईत ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. आपत्कालीन स्थितीत संपूर्ण पश्‍चिम भारतासाठी या तळाचा वापर होणार असल्याने त्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाने मुंबईत दीडशे एकर जागेची मागणी केली होती; मात्र एवढी मोठी जागा मुंबईत उपलब्ध नसल्याने मुंबई पोलिसांच्या अंधेरीत मरोळ येथे असलेल्या शंभर एकर जागेपैकी अवघी 23 एकर जागा या तळासाठी देण्यात आली. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी या तळाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता या ठिकाणी अहोरात्र काम करण्यात येत होते. मरोळ येथील जागा मिळाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या काळात या ठिकाणी सुसज्ज असा तळ उभारण्यात आला असून या तळाचे उद्‌घाटन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कमांडोंना पायाभूत प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रसंगी पुढील प्रशिक्षणासाठी मनेसर येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रात पाठविले जाणार आहे. या तळाच्या उभारणीचे काम सुरू असताना या पथकाचे महासंचालक एनपीएस अलख यांनीही भेट दिली होती.
या तळाच्या उभारणीसाठी दीडशे एकर जागेची मागणी झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दलापुढे कल्याण, नवी मुंबई, डहाणू येथील जागांचे पर्याय ठेवण्यात आले होते; मात्र आपत्कालीन स्थितीत पश्‍चिम विभागाच्या संरक्षणाची जबाबदारी असल्याने हा तळ विमानतळाजवळच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही हा अधिकारी म्हणाला.

(sakaal,24th june)

बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच सॉफ्टवेअर

अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती इंटरनेटवर देणार

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपासून साध्या कर्मचाऱ्यांपर्यंतच्या बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणि समानता आणण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीने एका सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येत असून त्याद्वारे राज्यभरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती तसेच त्याचे सेवापुस्तकच इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात दिली.

वाकोला येथे मुंबई पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या 1496 प्रशिक्षणार्थींचे वसतिगृह आणि 324 पोलिस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा गृहमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी बोलताना कित्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या आवडीच्या तसेच सोयीच्या ठिकाणी बदल्या होण्यासाठी प्रयत्नशील असतात यावर त्यांनी लक्ष वेधले. गडचिरोली, गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या पोलिसांचे बदलीसंबंधीचे विनंती अर्ज अनेकदा कागदावरच राहतात; तर मुंबईसारख्या शहरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखीने त्यांच्या सोयीच्या ठिकाणी पोस्टिंग घेता येते. बदल्यांच्या कामात समानता नसल्यामुळे दुर्गम भागात काम करणाऱ्या पोलिसांचा आवाज दबला जातो. हे प्रकार टाळण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा निर्धारित कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या होणाऱ्या संभाव्य बदल्यांची ठिकाणे तसेच त्यांनी केलेल्या विनंतीची ठिकाणे असा "प्लेसमेंट चार्ट' इंटरनेटवर उपलब्ध केला जाणार आहे. या चार्टमध्ये या अधिकारी व कर्मचाऱ्यांची इत्थंभूत माहिती, आजवर त्यांनी बजावलेली विशेष कामगिरी आणि त्यांच्या कार्यपद्धतीची खडान्‌ खडा माहिती अवघ्या एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. बदल्यांच्या कामात सुसूत्रता आणताना लहानात लहान कर्मचाऱ्याची विनंतीही लक्षात घेतली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या मदतीने तयार केले जाणारे हे सॉफ्टवेअर येत्या चार महिन्यांत कार्यान्वित केले जाणार आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा डी. शिवानंदन यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला अधिक चांगल्या कामाची अपेक्षा आहे. आपल्याला मुंबई पोलिसांकडून "परफॉर्मन्स' हवा आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला पुन्हा झाल्यास तो हल्ला परतवून लावण्यासाठी पोलिस दल अधिक सक्षम असावे, असेही पाटील या वेळी म्हणाले.

राज्यात नक्षलवादाचा प्रश्‍न दिवसेंदिवस उग्र होत आहे. पश्‍चिम बंगालमध्ये माओवादी चळवळीवर कारवाया करण्यात आल्या आहेत. गडचिरोली, गोंदियासारखा भाग नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी विशेषत्वाने प्रयत्न करावे लागतील. येत्या काळात या प्रश्‍नावर दुर्लक्ष करून चालणार नाही. या ठिकाणी पोलिस दल अधिक सशक्तपणे काम करीत असल्याचेही गृहमंत्री या वेळी म्हणाले.

मुंबईसारख्या शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच आपत्कालीन स्थितीत आवश्‍यक अधिकारी, शस्त्रास्त्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्याकरिता हेलिकॉप्टरची आवश्‍यकता असून हे हेलिकॉप्टर नवी मुंबई आणि ठाण्यासाठीही वापरता येईल असेही ते म्हणाले.

पोलिस आयुक्तांसाठी बंगला
मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या अधिकाऱ्यासाठी 1873 पासून बंगला आहे; मात्र राज्याचे पोलिस महासंचालक तसेच मुंबईचे पोलिस आयुक्त या महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकरिता बंगले नाहीत. या अधिकाऱ्यांच्या पदाला असलेले महत्त्व आणि मान यांचा विचार करता त्यांच्यासाठीही मुंबईत चांगल्या ठिकाणी बंगले उभारण्याची व्यवस्था लवकरच केली जाईल, असेही गृहमंत्री पाटील या वेळी म्हणाले.



(sakaal,23rd june)

पोलिसांसाठी दीड लाख घरांची लॉटरी!

वाकोल्यात वसतिगृह, पोलिसांसाठी बांधलेल्या इमारतींचे गृहमंत्र्यांच्या हस्ते वितरण

राज्य पोलिस दलातील 80 टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना येत्या तीन वर्षांत चांगल्या दर्जाच्या घरांची लॉटरी लागणार आहे. पोलिसांसाठी येत्या काळात एक लाख 46 हजार घरे उपलब्ध होण्याची आवश्‍यकता असून, त्या दृष्टीने राज्याच्या पोलिस गृहनिर्माण विभागाकडून काम सुरू झाल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
पोलिस गृहनिर्माण विभागाने वाकोला येथील कोलेकल्याण येथे मुंबई पोलिस दलातील सुमारे 1500 पोलिस प्रशिक्षणार्थींना राहण्यासाठी तयार केलेले वसतिगृह तसेच 324 पोलिस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींचे वितरण आज गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आपल्या उद्‌घाटनपर भाषणात गृहमंत्री पाटील यांनी सांगितले, की राज्य पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या आणि आधुनिक सुविधांनी युक्त असलेल्या घरांची बांधणी करण्यात येत असल्याचे सांगितले. राज्य पोलिस दलात एक लाख 83 हजार 681 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या पोलिसांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या घरांची संख्या लक्षात घेता 80 टक्‍क्‍यांचे लक्ष्य गाठण्यासाठी नव्याने 60 हजार 162 घरे बांधावी लागणार आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागात वास्तव्याला असलेल्या पोलिसांनादेखील चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी काही ठिकाणी "बांधा वापरा व हस्तांतरण करा' या तत्त्वावर देखील घरे बांधली जाणार आहेत. पोलिस दलासाठी राज्यात ज्या ज्या ठिकाणी जागा आहे अशा ठिकाणी उभ्या राहणाऱ्या पोलिस वसाहतींसाठी चार वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलातील 38 कर्मचाऱ्यांना फक्त 20 हजार घरे उपलब्ध असून, त्यातील बाराशे घरे नादुरुस्त आहेत. येत्या 20 वर्षांच्या काळात मुंबई पोलिस दलात वाढणाऱ्या पोलिसांच्या संख्याबळाबरोबरच त्यांच्यासाठी असलेल्या घरांची संख्याही वाढविली जाणार असल्याचे गृहमंत्री पाटील यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमापूर्वी गृहमंत्री जयंत पाटील यांनी स्वतः पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी केली. तळमजला अधिक नऊ मजली इमारतींची घरे पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी, तर तळमजला अधिक चार मजल
्याची इमारत पोलिस प्रशिक्षणार्थींसाठी बांधण्यात आली आहे. 25 एकर जागेत उभारण्यात आलेल्या या इमारतीची पाहणी करीत असताना पोलिसांच्याच लेझीम पथकाने प्रात्यक्षिके दाखविली. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या सुमारे 1500 प्रशिक्षणार्थी पोलिसांना गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोलिस परेड मैदानावर उभे करण्यात आले होते. संततधार कोसळणाऱ्या पावसातही कित्येक तास हे पोलिस बसून होते. या वेळी गृहराज्यमंत्री आरिफ नसीम खान, कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार कृपाशंकर सिंग, पोलिस आयुक्त डी. शिवानंदन, प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, पोलिस गृहनिर्माण विभागाचे महाव्यवस्थापक टी. ए. भाल, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


(sakaal,23rd june)

प्रेयसीवर चाकूहल्ला करून प्रियकराची आत्महत्या

तरुणीची प्रकृती चिंताजनक

लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीवर चाकूचे वार करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाने नंतर स्वतःच्या पोटात चाकू भोसकून आत्महत्या केल्याचा प्रकार काल (ता. 21) रात्री उशिरा चारकोप येथे घडला. जखमी तरुणीवर भगवती रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची चारकोप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
चारकोप सेक्‍टर- 4 येथे असलेल्या विश्‍वशांती सोसायटीजवळ हा प्रकार घडला. या ठिकाणी राहणाऱ्या प्रतीक्षा यशवंत हातिम (वय 24) या तरुणीवर जवळच राहणाऱ्या भाविन गुलाबभाई हंसोरा (वय 24) याचे प्रेम होते. सहा महिन्यांपूर्वी या दोघांचे प्रेमप्रकरण त्यांच्या घरच्या मंडळींना समजले. दोघांनी लग्न करण्याचेही ठरविले होते; मात्र काही दिवसांतच भाविन व्यसनी आणि बेरोजगार असल्याने प्रतीक्षाने त्याला लग्नास नकार दिला. यानंतर ती भाविनला भेटण्यास टाळाटाळ करू लागली. प्रतीक्षा आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने भाविन एकदा तिच्या घरी जाऊन तिच्या आईलाही भेटला. तिच्या आईनेही भाविनला तू व्यसनी असल्याचे सांगत प्रतीक्षा आणि त्याच्या लग्नास नकार दिला होता. प्रेमभंग झाल्यामुळे संतापलेला भाविन काल रात्री पुन्हा प्रतीक्षा राहत असलेल्या सेक्‍टर- 4 येथे गेला. रात्री नऊच्या सुमारास त्याने तिच्यावर चाकूचे भीषण वार केले. प्रेयसीवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर जगण्यात काहीच अर्थ नसल्याचे समजून भाविनने स्वतःच्या पोटातही चाकूने भोसकून घेतले. दोघेही काही क्षणातच इमारतीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत रक्ताच्या थारोळ्यात पडले. इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांनी तातडीने रिक्षाचालक असलेल्या प्रतीक्षाच्या वडिलांना बोलावून घेतले. यानंतर या परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोघांना उपचाराकरिता भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा उपचार सुरू असतानाच भाविन मरण पावला. जखमी प्रतीक्षाची प्रकृती अद्याप चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली.

--------


भाच्याच्या साथीने पतीचा खूनआरोपी महिलेला तिघांसह अटक
भाच्याला दहा हजार रुपयांची सुपारी देऊन पतीचा काटा काढणाऱ्या महिलेसह तिघा जणांना आज गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पोलिसांनी विक्रोळीतून अटक केली. मावशीच्या सांगण्यावरून दहा हजार रुपयांसाठी भाच्याने तिच्या पतीची आपल्या दोन साथीदारांच्या साह्याने हत्या केली होती.
विक्रोळी लिंक रोड येथे 16 मार्च रोजी रामदास शिंदे (वय 45) या व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अन्सार पिरजादे यांच्या नेतृत्वाखालील पथकाद्वारे करण्यात येत होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मानखुर्द परिसरात रिक्षा चालविणाऱ्या राजू थोरात (32) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तीन महिन्यांपूर्वी दोघा साथीदारांच्या मदतीने रामदास शिंदेचा गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली. रामदासची पत्नी व सख्खी मावशी ताराबाई (35) हिने दहा हजार रुपयांची सुपारी देऊन हा खून करायला लावल्याचे त्याने सांगितले. 16 मार्च रोजी राजू याने त्याचे दोन मित्र राहुल सिंग आणि आरिफ रिक्षावाला यांना सोबत घेऊन रामदास शिंदेला विक्रोळी लिंक रोड येथे नेले. रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या रामदासच्या तोंडात कापडाचा बोळा टाकून नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून राहुलने त्याचा खून केला. रामदासच्या खुनानंतर मावशीकडून मिळालेल्या दहा हजार रुपयांतील पाचशे रुपये आरिफ रिक्षावालाला; तर अडीच हजार रुपये राहुलला राजूने दिले होते. उरलेली रक्कम राजूने स्वतःकडे ठेवली होती. राजूच्या माहितीवरून पोलिसांनी आज राहुल आणि त्याची मावशी ताराबाई या दोघांना अटक केली आहे. आरिफ रिक्षावाला अद्याप फरारी आहे. राजूने यापूर्वीही चेंबूरमध्ये दहा हजार रुपयांची सुपारी घेऊन एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

(sakaal,22 june)

पोलिसांना मिळणार हेलिकॉप्टर!

गृहमंत्री जयंत पाटील यांचे आश्‍वासन


पोलिस दलासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहनांचा पुरवठा केल्यानंतर शहरात उद्‌भवणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई पोलिस दलाला स्वतंत्र हेलिकॉप्टर मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
मुंबई पोलिस दलात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या तीन बुलेटप्रूफ रक्षक गाड्या, 20 जीप, 150 मोटरसायकल यांच्यासह 207 वाहनांच्या वितरणाचा कार्यक्रम गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांनी पोलिस दलासाठी हेलिकॉप्टर देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे सांगितले. मुंबईत रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यामुळे उडणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. पोलिसांकडे स्वतंत्र हेलिकॉप्टर असल्यास आपत्कालीन स्थितीतही शहरातील कायदा-सुव्यवस्था राखणे, तसेच शहराच्या रक्षणासाठी त्याचा उपयोग होईल; याशिवाय जमिनीवर गुन्हेगार अथवा अतिरेक्‍यांकडून होत असलेल्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांना लक्ष ठेवणे सहज शक्‍य होईल. हवाई मार्गाने होणाऱ्या संभाव्य हल्ल्यासंबंधीच्या गुप्तचर खात्याकडून विशिष्ट अशा कोणत्याही सूचना नसल्याचेही पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. परदेशात दहशतवाद, तसेच गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी तेथील पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना, तसेच अवलंबण्यात येणारे तंत्रज्ञान यांच्या अभ्यासासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे पथक इस्राईल, इंग्लंड व चीन येथे पाठविले जाणार आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर तेथील पोलिस दलात असलेल्या घोडदळाप्रमाणेच मुंबईतही पोलिसांचे असे घोडदळ तयार करण्याच्या सूचना आयुक्तांना करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या ताफ्यात 35 घोडेस्वार पोलिसांचे पथक ठेवले जाणार आहे. विविध आंदोलने आणि मोर्चासाठी आझाद मैदान आणि शहरातील काही ठिकाणी जमणाऱ्या आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे दल वापरले जाईल.
पोलिसांचे श्‍वान पथक सक्षम करण्यासाठी येत्या काळात आणखी 100 कुत्रे पोलिस दलात दाखल केले जाणार आहेत. या श्‍वानांना बॉम्ब शोधण्याचेही प्रशिक्षण दिले जाईल. पोलिसांना घरे देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वाढीव चटई क्षेत्र असलेल्या पोलिसांच्या इमारतींसाठी असलेल्या भूखंडांचा चार वाढीव चटई क्षेत्र दिले जाणार आहेत. येत्या तीन वर्षांत 50 हजार पोलिसांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून, सध्याच्या संख्येप्रमाणे ही घरे अतिरिक्त होतील, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले. आगामी काळात पोलिसांसाठी अत्याधुनिक सोई-सुविधांनी युक्त अशा पोलिस वसाहती बांधण्यात येणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले.


(sakaal,22nd june)

मुंबईवर पुन्हा हल्ल्याची शक्‍यता

आयुक्त डी. शिवानंदन यांचा इशारा; दहशतवाद्यांचा बीमोड करण्यास पोलिस दल सज्ज

मुंबईवर येत्या काळात हवाईमार्गे अथवा जमिनीवरून हल्ल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचे संभाव्य हल्ले थोपविण्यासाठी पोलिस दल सुसज्ज आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक आणि कठोर प्रशिक्षण देण्यात येत असून, अवघ्या तासाभरात दहशतवाद्यांचा बीमोड करू शकतील, अशी क्षमता आपल्या पोलिसांत असल्याचे वक्तव्य मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी केले.

मुंबई पोलिस दलासाठी 207 अत्याधुनिक वाहनांचे वितरण गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मरिन लाइन्स येथील पोलिस जिमखाना येथे करण्यात आले. या वाहनांत तीन बुलेटप्रूफ रक्षक वाहने, 150 मोटारसायकल, 20 जीप, नऊ व्हॅन, 21 टोविंग क्रेन्स आणि चार बसचा समावेश आहे. या वेळी पोलिस आयुक्त शिवानंद यांनी सांगितले, की 26 नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्यानंतर अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक परिमंडळात 100 पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक पोलिसाला अत्याधुनिक शस्त्रे चालविण्यासोबत घातपाती हल्ल्यांच्या मुकाबल्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या अद्ययावत युद्धतंत्रांचेही प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यापुढील काळात मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज असतील असेही ते म्हणाले.

गुन्हेगार अथवा अतिरेक्‍यांच्या हल्ल्याच्या वेळी पोलिस वाहनांत बसलेल्या पोलिसांच्या जीविताचे रक्षण होण्यासाठी येत्या काळात पोलिसांच्या गस्ती वाहनांना बुलेटप्रूफ काचा बसविण्यात येणार आहेत. सध्या पोलिस दलात आलेल्या गाड्यांसाठी चार कोटी रुपये खर्च आला आहे. त्यापैकी तीन कोटी रुपये तीन बुलेटप्रूफ रक्षक गाड्यांसाठी खर्च झाले आहेत. येत्या काळात आणखी दोन रक्षक गाड्या पोलिस दलात दाखल होतील. पाच नियंत्रण कक्षांसाठी या गाड्या दिल्या जातील. याशिवाय आणखी 12 बसचा ताफा पोलिस दलात लवकरच दाखल होईल, असेही शिवानंदन या वेळी म्हणाले. सागरी सुरक्षिततेसाठी पोलिस दलात दोन हायस्पीड बोटी आल्या आहेत. सध्या रायगड आणि ठाणे पोलिसांकडे असलेल्या हायस्पीड बोटींसारखीच बोट मुंबई पोलिसांच्या ताफ्यातही येणार आहे. याशिवाय गोवा शिपयार्डातून आणखी काही बोटी सप्टेंबरअखेर मुंबईत दाखल होतील असेही त्यांनी सांगितले.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पोलिस दलाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि वाहने पुरविण्यासाठी राज्य सरकारने 90 कोटी रुपयांचा निधी दिला. याच निधीतून मुंबई पोलिस दलाकरिता मागविण्यात आलेल्या वाहनांच्या वितरणाचा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू झाला होता. या वेळी गृहमंत्री जयंत पाटील यांनी झेंडा दाखविल्यानंतर पोलिस दलात दाखल झालेल्या वाहनांचे संचलनही करण्यात आले. गृहमंत्र्यांनी स्वतः सर्व वाहनांची पाहणी करून समाधानही व्यक्त केले. गृहराज्यमंत्री नसीम खान, पोलिस आयुक्त डी. शिवानंदन, प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.


(sakaal, 22nd june)

नोकरी गेल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

कंपनीतच केले विषप्राशन

"आयसीआयसीआय' बॅंकेचे आऊटसोर्सिंग करणाऱ्या कंपनीत कामाला असलेल्या एका तरुणाने आर्थिक मंदीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न काल (ता. 19) केला. चांदिवली येथे ही घटना घडली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चांदिवली येथे आयसीआयसीआय बॅंकेचे आऊटसोर्सिंग करणाऱ्या डेल्टा सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीत हा प्रकार घडला. आर्थिक मंदीमुळे या कंपनीत काम करणाऱ्या 40 कर्मचाऱ्यांना येत्या 13 जुलैपासून काम थांबविण्यास सांगण्यात आले होते. कंपनीच्या या निर्णयामुळे सुयोग देशमुख (28) हा तरुण निराश झाला. पदवीनंतर एमबीए करणारा सुयोग चांगली नोकरी हातची जात असल्याच्या विचाराने खचला. आज सकाळी नेहमीप्रमाणे दादरच्या नायगाव क्रॉस लेन येथील घरातून चांदिवलीला कंपनीत पोहोचलेल्या सुयोगने सोबत झुरळ मारण्याचे औषध नेले. कंपनीत गेल्यानंतर आलेल्या तणावातून सकाळी पावणेआठच्या सुमारास त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काम सुरू असताना सुयोगने केलेल्या या प्रकारानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने पॅरामाऊंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यंत या प्रकरणाची माहिती साकीनाका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या प्रकाराची नोंद करून त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती दिली. सुयोगचे आई-वडील आणि मित्रमंडळी तातडीने रुग्णालयात पोहोचले. दुपारी त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. या वेळी त्याच्या कंपनीतील अधिकाऱ्यांनाही जबाब देण्यासाठी पोलिसांनी बोलावले होते. सुयोगवर अद्याप अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती साकीनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमराव राठोड यांनी दिली.


(sakaal,20th june)

छाप्यात सापडलेली शस्त्रे परवानाधारक


पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांचे स्पष्टीकरण


पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणात खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या सहभागाचे पुरावे मिळविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) कुलाबा येथील त्यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सापडलेली शस्त्रे अधिकृत व परवानाधारक आहेत. याशिवाय छाप्यादरम्यान सापडलेल्या मालमत्तेच्या नोंदीदेखील आयकर विवरणात करण्यात आल्या असल्याचे स्पष्टीकरण पाटील यांच्या वकिलांनी आज एका पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, छाप्याच्या वेळी सापडलेले वॉकीटॉकी पाटील मंत्री असताना त्यांच्या सरकारी निवासस्थानातून अनवधानाने कुलाबा येथील खासगी घरात आणण्यात आल्याचेही या वेळी वकिलांनी स्पष्ट केले.
सीबीआयच्या पथकाने डॉ. पाटील यांच्या कुलाबा येथील कॅनॉट मॅन्शन या घरावर काल छापा घातला. या वेळी घरात सापडलेल्या वस्तू आणि मालमत्तेसंबंधी त्यांचे वकील ऍड्‌. भूषण महाडिक यांनी स्पष्टीकरण दिले.
""पाटील यांच्या घरात सापडलेले एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्तूल व दोन रायफली ही चारही शस्त्रे आणि त्यांची काडतुसे अधिकृत आहेत. या शस्त्रसाठ्यात दोन एअरगनही असून, त्यांच्या वापरासाठी कोणताही परवाना लागत नाही. याशिवाय सापडलेल्या तीन तलवारी पाटील यांना सार्वजनिक कार्यक्रमांत भेट म्हणून देण्यात आलेल्या आहेत. छाप्याच्या वेळी सापडलेली सात लाख 26 हजार रुपयांची रोख पाटील आणि त्यांच्या नातेवाइकांच्या वापरासाठीची आहे. या मालमत्तेची आयकर विवरणात नोंद करण्यात आलेली आहे. याशिवाय सापडलेल्या गुंतवणूक ठेवीदेखील पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या, तसेच "तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट'च्या मालकीच्या आहेत. त्यांचेदेखील आयकरात अधिकृत विवरण करण्यात आले आहे'', असे ऍड्‌. महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डॉ. पाटील मंत्री असताना ते रॉयल स्टोन या शासकीय निवासस्थानी राहत होते. त्या वेळी त्यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेत वायरलेस सेटदेखील तेथील घरात होते. या घरातून 2005 मध्ये आपले सामान "कॅनॉट मॅन्शन' येथील घरात हलविताना एका बॉक्‍समध्ये असलेले हे वायरलेस सेट अनवधानाने आणण्यात आले होते. या वायरलेस सेटचा कधी वापरही झाला नाही, असेही ऍड्‌. महाडिक म्हणाले.

न्यायव्यवस्थेवर विश्‍वास
छाप्यात न्यायमूर्ती पी. बी. सावंत आयोगासमोरील सापडलेली कागदपत्रे ही सार्वजनिक मालमत्ता आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी तानाजी पाटील याच्या नार्को चाचणीची सीडी व त्याचे ट्रान्स्क्रीप्ट अधिकृतरीत्या मिळविलेले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू असल्याने तपासासंबंधी काहीही बोलण्यास ऍड्‌. भूषण महाडिक यांनी नकार दिला. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्‍वास आहे. डॉ. पाटील या प्रकरणातून निर्दोष सुटतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.


(sakaal,19 th june)
-------------------

बेहरामपाड्यातील भीषण आगीत चारशे झोपड्या खाक

लहान मुलगा ठार; 22 रहिवासी जखमी

वांद्रे येथील बेहरामपाड्यात एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत सुमारे चारशे झोपड्या आणि लाकडाच्या वखारी जळून भस्मसात झाल्या. आज पहाटे घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सात महिन्यांचे बाळ ठार झाले, तर 22 जण जखमी झाले. गेल्या काही वर्षांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या अवैध बांधकामांमुळे अग्निशमन दलाच्या बंबांना घटनास्थळी पोचण्यास अडचणी येत होत्या. चोख पोलिस बंदोबस्तात सायंकाळी उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. आगीत जखमी झालेल्यांना भाभा व व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले.
वांद्रे पूर्वेला ए. के. मार्ग पोलिस चौकीसमोर असलेल्या बेहरामपाड्यात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एका झोपडीत असलेल्या चहाच्या टपरीतील एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली. मुस्लिमबहुल वस्ती असलेल्या या विभागात राजकीय वरदहस्तामुळे मोठ्या प्रमाणावर लाकडी वखारी आणि झोपड्यांचे अवैध बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिक रहिवासी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि हातात मिळतील त्या जीवनावश्‍यक वस्तू घेऊन झोपड्यांबाहेर पळाले. काही नागरिकांनी घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर अग्निशमन दलाचे 12 फायर इंजिन आणि 10 वॉटर टॅंकरनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र अरुंद आणि निमुळत्या रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या बंबांना आग विझविण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. आग विझविण्यासाठी एरियल लॅडर व्हेईकल व जम्बो टॅंकरचाही वापर करण्यात येत होता. आपला संसार नजरेसमोर भस्मसात होत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी अग्निशमन बंबांनाच अडथळा निर्माण करायला सुरुवात केली. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी आगीच्या ठिकाणापासून दूर करायला सुरुवात केली. तोच काही झोपड्यांत असलेल्या गॅस सिलिंडर्सचा पुन्हा स्फोट झाला. यानंतर मात्र जीव वाचविण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली.

14 गॅस सिलिंडरचा स्फोट
बेहरामपाड्यात एक व दोन मजल्यांच्या घरांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या घरांत मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग व खाणावळी चालविल्या जात होत्या. या आगीत एकूण 14 एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग विझविण्याकरिता पाण्याचा अपूर्ण पुरवठा होत असल्याने नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल येथील अग्निशमन दलांच्या बंबांनाही मदतीसाठी बोलाविण्यात आले. सकाळी साडेसहा वाजेपर्यंत 25 फायर इंजिन, 16 पाण्याचे टॅंकर आणि चार रुग्णवाहिकांच्या मदतीने अग्निशमन दलाचे काम सुरू होते. सकाळी या परिसरात बघ्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. या जमावावर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. तब्बल पंधरा तासांनंतरही ही आग विझविण्याचे काम सुरूच होते.

मृत मुलाची ओळख नाही
आगीत मरण पावलेल्या सात महिन्यांच्या बाळाची अद्याप ओळख पटलेली नाही. जखमी झालेल्या 22 जणांना भाभा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यापैकी 17 जणांवर प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. कलिम हैदर हुसेन (36), महम्मद सलीम शकील (14), अल्ताफ शेख (28), क्षमा अन्सारी (20) आणि महम्मद शकील दैहर हुसेन (32) हे जखमी भाभा व व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार घेत आहेत.
-------------
इन्फोबॉक्‍स...
तात्पुरत्या निवाऱ्याची सोय
"आगीत चारशेहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. झालेल्या वित्तहानीचा पंचनामा करण्यात येत असून, बेघर झालेल्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे,' अशी माहिती परिमंडळ-आठचे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली. "बेहरामपाड्यात असलेल्या एकूण झोपड्यांपैकी फक्त पन्नास ते साठ झोपड्याच अधिकृत आहेत,' अशी माहिती महापालिकेच्या एच-पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उमाशंकर मिस्त्री यांनी "सकाळ'ला दिली.

या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असलेल्या अवैध बांधकामांमुळे अग्निशमन दलाला आग विझविण्यास मोठ्या प्रमाणात अडथळे आल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झाली.



(sakaal,18th june)

... तर अधिकाऱ्यांनो खुर्ची सोडा!

पोलिस आयुक्तांचा इशारा

पोलिस अधिकाऱ्यांनो कामगिरी दाखवा आणि कामगिरी दाखविणे शक्‍य नसेल, तर खुर्ची सोडा, असा सणसणीत इशारा पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी दिला आहे. सामान्य नागरिकांत पोलिसांची प्रतिमा उंचावण्याकरिता पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला चांगली वागणूक देण्याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचाही सल्ला शिवानंदन यांनी दिल्याचे समजते.
मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार घेतल्यानंतर आज डी. शिवानंदन यांनी पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांना येत्या काळात अधिक चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ज्या अधिकाऱ्यांना चांगले काम करणे शक्‍य नसेल, त्यांनी तातडीने खुर्च्या सोडाव्यात, असेही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि प्रश्‍नांना अग्रक्रम देण्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे. तरुण पिढीला अमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयांबाहेर अमली पदार्थांचे वितरण करणारी रॅकेटस्‌ नेस्तनाबूत करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान येथील पोलिस क्‍लबमध्ये झालेल्या या गुन्हे आढावा बैठकीला कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


---------

पोलिस उपनिरीक्षकाचा रेल्वेतून पडून मृत्यू

विधिमंडळ अधिवेशनाचा बंदोबस्त उरकून घरी परतणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना अंधेरी आणि विलेपार्ले रेल्वेस्थानकादरम्यान मध्यरात्री उशिरा घडली. या घटनेची नोंद अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
दहिसर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले पोलिस उपनिरीक्षक अनिल सावंत (54) गेल्या आठवड्यापासून विधानसभा अधिवेशनाच्या बंदोबस्तावर होते. काल रात्री उशिरा बंदोबस्त उरकून ते त्यांच्या पेणकरपाडा, दहिसर येथील घरी जात होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले ते अंधेरी रेल्वेस्थानकादरम्यान असलेल्या रेल्वेरूळावर ते जखमी अवस्थेत पडल्याचे आढळले. काही प्रवाशांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी अवस्थेत पडलेल्या सावंत यांना कूपर रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्‍टरांनी घोषित केले. रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती दहिसर पोलिस; तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कळविली. सावंत यांच्या पश्‍चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसार उपनिरीक्षक सावंत यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेख यांनी दिली. सावंत यांच्या मृतदेहावर पेणकरपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले


(sakaal,17 th june)

Wednesday, June 17, 2009

हसन गफूर यांचे नेतृत्वगुण दिसलेच नाहीत!

राम प्रधान समितीच्या कृती अहवालातील निष्कर्ष

मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हाताळण्यात मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी पुरेसा पुढाकार घेतला नाही. संपूर्ण कारवाईदरम्यान ते ट्रायडन्ट हॉटेलनजीक एकाच ठिकाणी थांबून होते. या कालावधीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन केले नाही अथवा सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत साधी चौकशीही केली नाही. हा हल्ला हाताळताना गफूर यांच्याकडे दृश्‍य व प्रत्यक्ष नेतृत्वाचा अभाव होता, असा निष्कर्ष मुंबई हल्ल्याची चौकशी करणाऱ्या राम प्रधान समितीने काढला आहे. विधिमंडळ अधिवेशनात या अहवालावर तयार करण्यात आलेला कृती अहवाल (ऍक्‍शन टू बी टेकन रिपोर्ट) आज सादर करण्यात आला.
मुंबई हल्ल्याची चौकशी करणाऱ्या माजी केंद्रीय सनदी अधिकारी राम प्रधान यांच्या समितीने दिलेल्या अहवालामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने या अहवालावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती आज सभागृहासमोर ठेवण्यात आली. या अहवालानुसार 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलिस आयुक्त म्हणून हसन गफूर यांनी कोणतेही नेतृत्वगुण दाखविले नाहीत, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात एकत्रित व दृश्‍य नियंत्रणाचा अभाव राहिला. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अकार्यक्षमपणे हाताळले, असा समज निर्माण झाला आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यचालन पद्धतीकडे पोलिस आयुक्त किंवा महासंचालक यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करणे योग्य नव्हते. दुर्लक्षच करायचे असेल, तर अशी कार्यचालन पद्धत ठेवायचीच कशाला, असा प्रश्‍न प्रधान समितीने उपस्थित केला आहे. मुंबई हल्ल्याच्या वेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्याऐवजी गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया नियंत्रण कक्षाचे प्रभारी म्हणून काम पाहत होते, या बाबीवर आक्षेप घेण्यात आला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून विशिष्ट असा दक्षतेचा इशारा मिळाला नसला तरी कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त यांनी गुप्त वार्ता विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार हल्ल्याची शक्‍यता वर्तविली होती. त्यानुसार दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले होते, हेदेखील स्पष्ट झाले आहे. गुप्त वार्तांवर आधारित इशाऱ्यांच्या हाताळणीत गोंधळाचे वातावरण असल्याचे प्रधान समितीने निदर्शनास आणले आहे. त्यानुसार सरकारने या इशाऱ्यांवर कार्यवाही करण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल केला आहे. गृह खात्याचे प्रधान सचिव हे अहवाल प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करतील. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या गुप्त वार्ता थेट पोलिस महासंचालक किंवा मुख्य सचिवांकडे पाठविण्यास सुरुवात केली आहे. सागरी सुरक्षिततेच्या व्यवस्थेवर प्रधान समितीने नाराजी दाखविली असून, ही व्यवस्था दिखाऊ स्वरूपाची असल्याचे म्हटले आहे. दारूगोळ्याच्या कमतरतेमुळे पोलिसांना शस्त्रास्त्रांचा पुरेसा सरावच नव्हता. त्याचा गंभीर परिणाम पोलिसांच्या आक्रमण क्षमतेवर झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने या बाबीची गंभीर दखल घेत आधुनिकीकरण व शस्त्रास्त्रे यासंबंधातील सर्व सामग
्रीखरेदीवर नियंत्रण करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली उपसमिती स्थापन करण्यात आल्याचे म्हटले आहे.

राज्य सरकारचा आक्षेप
पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही हल्ल्याच्या वेळी हसन गफूर यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. राज्य सरकारने मात्र समितीच्या या निष्कर्षावर आक्षेप घेतला आहे. पोलिसांनी आपले कर्तव्य चांगले बजावल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर त्या दलाचा प्रमुख अपयशी कसा काय ठरू शकतो, असा सवाल करीत गफूर यांची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे.


(sakaal,17th june)

Tuesday, June 16, 2009

कारागृह झाले गुंड टोळ्यांचे अड्डे!

गुन्हेगारात सुधारणा आणि पुनर्वसन यासाठी राज्यात ठिकठिकाणी असलेली कारागृह म्हणजे गुन्हेगारी टोळ्यांचे किल्ले झाले आहेत. अंडरवर्ल्डमधील गुंड टोळ्यांमध्ये या कारागृहांची वाटणी झाली असून, त्यांच्या या अघोषित कब्जाने नामचिन गुंड या कारागृहातून आपल्या टोळ्या चालवत असल्याचे भितीदायक वास्तव समोर आले आहे.

कोकण परिक्षेत्रात मुंबई, ठाणे, कल्याण या मध्यवर्ती कारागृहांसह तळोजा, भायखळा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अलिबाग आणि सावंतवाडी या न्यायालयांत तब्बल सात हजार कैदी विविध गुन्ह्यांखाली बंदिवान आहेत. अंडरवर्ल्डमधील विविध टोळ्यांचे डॉन, शार्पशुटर आणि सराईत गुन्हेगारांचा त्यात समावेश आहे. प्रतीस्पर्धी टोळ्यांशी असलेल्या वैमनस्यातून दुसऱ्या टोळीचा गुंड कारागृहात एकटा सापडल्यास त्याला टोळीच्या "हंडी' त घेऊन सहकाऱ्यांच्या साथीने बेदम मारहाण करण्याचे तसेच त्याच्यावर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेल्या एका टोळीच्या सर्व गुंडांना एकाच कारागृहात ठेवण्याचा अलिखित नियम आहे. त्यामुळे अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांची राज्यातील विविध कारागृहात पद्धतशीरपणे विभागणी झाली आहे. राज्यातील प्रमुख कारागृहांपैकी ठाणे आणि आर्थर रोड कारागृहावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा तर अमरावती, औरंगाबाद आणि भायखळा कारागृहांवर गवळी टोळीचा वरचष्मा आहे. कोल्हापूर, येरवडा, कल्याण आणि गेल्या काही महिन्यांपासून आर्थर रोड कारागृहात छोटा राजन टोळीचे प्रस्थ वाढले आहे. पूर्वी पुणे मध्यवर्ती कारागृहातून अमर नाईक टोळी आपल्या गुन्हेगारी कारवाया चालवत होती. एखाद्या ठराविक टोळीचे गुंड एकाच कारागृहात असल्यामुळे प्रमुख टोळ्यांनी कारागृहाच्या परिसरातच घरे घेऊन आपली जनसंपर्क कार्यालये थाटल्याचे धक्कादायक चित्र आहे. याच घरांतून टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवायांटे प्लॅन ठरतात.
तुरुंगाबाहेरच्या गुन्हेगारी घडामोडींची माहिती होण्याकरता कारागृहातील गुंडांकडून बाहेरच्या जेवणाचे निमित्त केले जाते. जेवणाच्या डब्यांतून चिठ्ठ्या व निरोप कारागृहाबाहेरील साथीदारांना पाठवून त्याद्वारे खंडण्या तसेच खुनाच्या "सुपारी' देण्याचे प्रकारही सर्रास चालतात. मुंबईत डोंगरी येथून दाऊद टोळीच्या गुंडांसाठी तर भायखळ्याच्या दगडी चाळीतून टोळीचा म्होरक्‍या आमदार अरुण गवळीसह त्याच्या टोळीच्या कित्येक गुंडांना घरचे जेवण जाते. हाच प्रकार छोटा राजन टोळीच्या गुंडांबाबतही आहे. शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत मुलाखतीद्वारे भेटता येते. कैद्यामार्फत त्यांची नावे आधीच कारागृह व्यवस्थापनाला कळविण्याचा शिरस्ता आहे. मात्र, कुटुंबीयांच्या नावावर अनेकदा या गुन्हेगाराचे साथीदारच "मुलाखतीच्या निमित्ताने' त्यांची भेट घेत असल्याचे चित्र आहे. राज्याच्या उर्वरित भागात असलेल्या कारागृहातही हेच प्रकार बिनबोभाट सुरू आहेत.

गुंड टोळ्यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना तितक्‍या परिणामकारक नसल्याने या टोळ्यांचे चांगलेच फावले आहे. मुंबई, ठाणे, कल्याणसारख्या प्रमुख कारागृहात कैद्यांमार्फत मोबाईल फोनचा वापर होऊ नये याकरिता बसविलेले मोबाईल जॅमर गेल्या काही दिवसांपूर्वीच काढून टाकले गेले. कारागृहातील पोलिस कर्मचारी आणि अधिकारीही या गुंड टोळ्यांकडून मिळणाऱ्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना अमली पदार्थ, शस्त्र तसेच कारागृहाबाहेरच्या टोळीतील सदस्यांबरोबर बोलण्यासाठी मोबाईल फोन पुरवतात. भायखळा कारागृहात कैद्यांना अशा प्रकारे मदत करणाऱ्या तुरुंग अधिक्षकासह नऊ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई नुकतीच झाली. या घटनेनंतरच गुंड टोळ्यांचे कारागृहांवर असलेले वर्चस्व प्रकर्षाने उघडकीस आले.

राज्यातील प्रमुख कारागृहांत क्षमतेच्या तीनपट अधिक कैदी ठेवल्याचे वास्तव असताना कारागृहातून सुरू असलेल्या अंडरवर्ल्डच्या कारवायांबाबत वरिष्ठ पोलिस अधिकारीही चिंता व्यक्त करत आहेत. कैद्यांना अमली पदार्थ, शस्त्र आणि मोबाईल फोनच्या पुरवठ्याच्या तुरुंगात घडलेल्या घटनांनंतर सर्व कारागृह अधीक्षकांकडून कैद्यांची तसेच त्यांना ठेवलेल्या बराकींची नियमितपणे झडती होत असल्याची माहिती दक्षिण विभागीय तुरुंग उपमहानिरीक्षक रजनीश सेठ यांनी "सकाळ' ला दिली. तुरुंगात एका टोळीचे गुंड एकत्र राहत असले तरी त्यांना मुद्दाम एकत्र आणले जाते असे म्हणता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. कैद्यांच्या वाढत्या संख्येवर तोडगा काढण्याकरिता लवकरच ओरोस आणि पालघर येथे दोन अद्ययावत कारागृहे उभारण्यात येणार आहेत. दोन हजार कैद्यांची क्षमता असलेल्या तळोजा कारागृहात सध्या 700 कैदी आहेत. येत्या काळात इतर ठिकाणचे कैदी तेथे हलविण्यात येतील. केंद्र सरकारकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून तुरुंगांत अत्याधुनिक सुरक्षा उपकरणे बसविली जाणार असल्याचेही सेठ यांनी सांगितले.

------------


मध्यवर्ती कारागृहांसह राज्यात एकूण 41 कारागृहे आहेत. त्यात प्रमुख कारागृहांच्या उपविभागांचाही समावेश आहेत. मात्र, त्यातील प्रमुख कारागृहांत शिक्षा झालेल्या व कच्च्या कैद्यांची संख्या वाढत आहे. तुलनेत कारागृहांचा विस्तार न झाल्यामुळे साठ जणांसाठी असलेल्या बराकीत दीडशे बंदी ठेवण्याची वेळ काही ठिकाणी प्रशासनावर आली आहे. पुण्यातील येरवडा, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या प्रमुख कारागृहांत सध्या गर्दी झाली आहे. त्या शिवाय चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, अलीबाग, बीड, नांदेड, जळगाव, सातार, नगर आदी कारागृहांतही क्षमतेपेक्षा अधिक बंद्यांचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सर्व कारागृहांत मिळून 21 हजार बंदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात तेथे 25 हजारहून अधिक बंदी आहेत. कच्च्या कैद्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. महिला कैद्यांच्याही बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. 983 महिला कैद्यांना कारागृहात ठेवता येऊ शकेल, अशी व्यवस्था असताना, प्रत्यक्षात तेथे दीड हजारपेक्षा जास्त महिला कैदी आहेत. कारागृहाच्या विस्तारीकरणासाठी तसेच नव्या कारागृहांसाठी प्रशासाने पाठविलेल्या प्रस्तावांकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष झाल्यामुळे अशी वेळ उद्‌भवली आहे.


(sakaal, 16 th june)

Saturday, June 13, 2009

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी डी. शिवानंदन

हसन गफूर यांची उचलबांगडी; 26/11 ची हाताळणी भोवली

मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला योग्य प्रकारे हाताळता न आल्याचा ठपका ठेवत हसन गफूर यांची आज मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. प्रधान समितीच्या अहवालावरून विधिमंडळात विरोधकांकडून होत असलेल्या हल्ल्याची धार बोथट करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. गफूर यांच्या जागी नवे पोलिस आयुक्त म्हणून राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

देशाला हादरवून टाकणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा दलातील अधिकारी- कर्मचारी यांच्यासह तब्बल 173 सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला. हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलिस दलाचे प्रमुख म्हणून आयुक्त गफूर यांना परिस्थिती योग्य प्रकारे हाताळता आली नसल्याचा ठपका हल्ल्याची चौकशी करणाऱ्या आर. डी. प्रधान समितीने ठेवल्याचे समजते. प्रधान समितीचा हा अहवाल याच अधिवेशनात सभागृहापुढे मांडण्यात येणार आहे. या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षाकडून होणाऱ्या संभाव्य टीकेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने गफूर यांना पोलिस आयुक्तपदावरून दूर केल्याचे सांगण्यात येते.

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून हटविलेल्या गफूर यांना पदोन्नती देऊन त्यांची नियुक्ती पोलिस गृहनिर्माण विभागाच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. 1974 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या हसन गफूर यांची 1 मार्च 2008 रोजी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी निवड झाली होती. पोलिस महासंचालक पदाएवढ्याच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या पदावर दीड वर्ष काम केलेल्या गफूर यांना यापुढे गृहनिर्माण विभागासारख्या दुय्यम दर्जाच्या विभागाचा प्रमुख म्हणून काम पाहावे लागणार आहे. गफूर यांची पदोन्नती होणार होती, त्यामुळेच त्यांना पदोन्नतीवर या पदावर नियुक्त केल्याचे गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी "सकाळ'ला सांगितले.

कणखर शिवानंदन
हसन गफूर यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर डी. शिवानंदन यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री जयंत पाटील यांनी केली. 1974 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवानंदन यापूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. 90 च्या दशकात मुंबईत गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तपदावर काम करीत असताना त्यांनी अंडरवर्ल्डचा कणा मोडून काढला. शिवानंदन यांच्याच कार्यकाळात मुंबईतील गॅंगवारवर नियंत्रण आणण्यात पोलिस दलाला यश आले. दीड वर्षापूर्वी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागेवर शिवानंदन यांच्या नावाची चर्चा होती; मात्र राज्य सरकारने त्यांची नेमणूक गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी केली होती. शिवानंदन यांनी त्यापूर्वी ठाण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम केले आहे. शिवानंदन यांच्या कार्यकाळात ठाण्यात पोलिस स्कूल उभारणीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आला. पोलिसांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी या योजनेचा चांगलाच फायदा झाला. यापूर्वी शिवानंदन यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागातही काम केले आहे.



" माझी बदली नाही तर पदोन्नती झाली आहे. ही पदोन्नती बरेच दिवस प्रलंबित होती. मुंबईचा पोलिस आयुक्त म्हणून केलेले काम आव्हानात्मकच होते. पोलिस गृहनिर्माण विभागाच्या महासंचालक पदावर झालेल्या नियुक्तीने आपण आनंदी आहोत." - हसन गफूर

-------



नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी विनोद लोखंडे


नाशिकचे पोलिस आयुक्त व्ही. डी. मिश्रा यांना केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले असून, त्यांच्या जागी ठाण्याचे सह पोलिस आयुक्त विनोद लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आणखी 17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेतला जात आहे. दरम्यान, मिश्रा यांच्या बदलीविरुद्ध शिवसेना तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता मिश्रा यांच्या बदलीनंतर याठिकाणी तातडीने नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करणे आवश्‍यक होते. राज्यातील अन्य 17 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांत तेलगी प्रकरणात नाहक गुंतविण्यात आल्याने निलंबन पत्करावे लागलेले गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्त प्रदीप सावंत यांच्याही नावाचा समावेश आहे.


(sakaal,13 th june)

बॅंका लुटणाऱ्या टोळीतील दोघे जण पोलिस चकमकीत ठार

नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाचीही केली होती हत्या

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे येथील बड्या बॅंका आणि सराफांच्या दुकानांवर दरोडे घालणाऱ्या टोळीचा म्होरक्‍या अशोक जीवनी आणि त्याचा साथीदार गिरधारी पोटे या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडाळा येथे चकमकीत ठार मारले. ऐरोलीच्या पंजाब महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेवरील दरोड्याच्या वेळी याच टोळीने बाबासाहेब आढाव या पोलिस उपनिरीक्षकाची हत्या केली होती. या टोळीने राज्यभरात पस्तीसहून अधिक दरोडे घातल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.

वडाळा पूर्वेला असलेल्या अभ्युदय बॅंकेसमोर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. दरोड्याच्या सहा गंभीर गुन्ह्यांत मुंबई पोलिसांना हवा असलेला अशोक जीवनी आणि त्याचा साथीदार गिरधारी पोटे अभ्युदय बॅंकेवर दरोडा घालण्यासाठी बॅंकेची पाहणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून जीवनी आणि पोटे या दोघांना शरण येण्यास सांगितले; मात्र दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले.

मुंबई आणि परिसरातील बॅंका व सराफांच्या दुकानांवर दरोडे घालण्यात तरबेज असलेली जीवनी याची टोळी 1992 पासून कार्यरत होती. याच टोळीने तीन वर्षांपूर्वी ऐरोलीच्या पंजाब महाराष्ट्र बॅंकेवर दरोडा घालताना बाबासाहेब आढाव नावाच्या पोलिस उपनिरीक्षकाला ठार मारले होते. या टोळीने मुंबई, नवी मुंबई, पुण्यासारख्या प्रमुख शहरांत घातलेल्या उच्छादामुळे पोलिस दलही हैराण झाले होते. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या टोळीच्या शिवा गौडा, घिसू मारवाडी आणि बाबू पुजारी या तिघा दरोडेखोरांना सीबीडी येथे चकमकीत ठार मारले होते; तर या टोळीचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्‍या रमेश उपाध्याय आणि त्याचा साथीदार चंद्रा शेट्टी या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चकमकीत ठार मारले होते. 1995 मध्ये याच टोळीचा सदस्य असलेल्या कट्टा शेखर याला मुंबई पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या साथीदारांनी माझगाव न्यायालयात भरदिवसा गोळीबार करून त्याला पळवून नेले होते. यानंतर या टोळीच्या या परिसरातील कारवाया थंडावल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने आपल्या कारवाया पुन्हा सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी टोळीचा म्होरक्‍या अशोक जीवनीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. आज पहाटे तो साथीदारांसोबत वडाळा येथे येताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला चकमकीत ठार मारले. या टोळीच्या कारवाया गुजरात व कर्नाटक या राज्यांतही सुरू होत्या, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.


(sakaal, 13 th june)

पद्मसिंह यांच्या कुलाब्यातील घराला सीबीआयचे सील

"कॅनॉट मॅन्शन'च्या छाप्यात पुराव्यांचा शोध

कॉंग्रेसनेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घरावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने छापा घातला. पाटील यांच्या घराला टाळे असल्याने या घराला सील ठोकण्यात आल्याचे सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी सांगितले.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह पाच आरोपींना सीबीआयने अटक केली आहे. आरोपी पारसमल जैन याच्या जबाबात हत्येमागे खासदार पाटील यांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सीबीआयच्या पथकाने त्यांना 6 जून रोजी ताब्यात घेऊन अटक केली. सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या पाटील यांची कोठडी उद्या (ता. 14 जून) संपत आहे. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्या सहभागाबाबत अधिक सबळ पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सीबीआयमार्फत करण्यात येत आहे. पुरावे मिळविण्यासाठीच आज सीबीआयच्या पथकाने पद्मसिंह राहत असलेल्या कुलाबा पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूला असलेल्या "कॅनॉट मॅन्शन' या घरावर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापा घातला; मात्र या घरात कोणीच नसल्याने सीबीआयच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. घराला टाळे असल्याने सीबीआयच्या पथकाने या घराला सील ठोकल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक सिंग यांनी दिली.

फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी
दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीतून आलेल्या फॉरेन्सिक सायन्स एक्‍सपर्टस्‌च्या पथकाने आज पवनराजे हत्या प्रकरणात मारेकऱ्यांनी वापरलेली इंडिका गाडी ताब्यात घेतली आहे. या गाडीत असलेल्या फॉरेन्सिक पुराव्यांचा अभ्यास हे पथक करणार आहे. नवी मुंबईत अर्धवट जळालेल्या अवस्थेत टाकून देण्यात आलेल्या या इंडिका गाडीचा चेसी क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न या पथकाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी या पथकाने गाडीचा पत्रा कापून तो फॉरेन्सिक लॅबमध्ये नेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(sakaal,13th june)

नक्षलवादविरोधी मोहिमेच्या महासंचालकपदी जयंत उमराणीकर

गृहमंत्री जयंत पाटील यांची विधानसभेत घोषणा

नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नक्षलवादविरोधी पथकाच्या विशेष मोहिमेच्या महासंचालकपदावर जयंत उमराणीकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. उमराणीकर यांना पदोन्नती देऊन त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. उमराणीकर यांच्या नियुक्तीनंतर नक्षलवादविरोधी पथकाला पहिल्यांदाच पोलिस महासंचालकपदाचा अधिकारी प्राप्त झाला आहे.

राज्यातील गडचिरोली, चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या कारवायांना गेल्या काही दिवसांत वेग आला आहे. गेल्या महिन्यात गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पंधरा पोलिस शहीद झाले. अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत असल्याने त्यांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याच आठवड्यात गृहमंत्री जयंत पाटील व पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक या नक्षलग्रस्त राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेचे नेतृत्व पूर्णवेळ पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असावे यासाठीच राज्य सरकारने आज या पदावर जयंत उमराणीकर यांची नेमणूक केली. उमराणीकर यापूर्वी पोलिस प्रशिक्षण विभागाच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदावर कार्यरत होते. पदोन्नती देऊन त्यांची
नक्षलवादविरोधी पथकाच्या विशेष मोहिमेच्या महासंचालकपदावर नेमण्यात आले आहे.

"फोर्स वन'चे विकेंद्रीकरण
विधानसभेत अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली. गडचिरोली भागात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत त्यावर विस्तृत चर्चा झाली. नक्षलवादविरोधी पथकाचे सध्या नागपूरला असलेले कार्यालय गडचिरोली येथे स्थलांतरित करण्यासह सरकारतर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहितीही देण्यात आली. आजच्या चर्चेत पाटील यांनी उमराणीकर यांच्या नावाची घोषणा करून पोलिसांच्या "फोर्स वन' विभागाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णयही जाहीर केला. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी अव्याहतपणे काम करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्राकडून पोलिसांसाठी येणारा निधी खर्च करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आश्‍वासनही पाटील यांनी दिले.

वादग्रस्त उमराणीकर
भारतीय पोलिस सेवेच्या 1973 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या जयंत उमराणीकर यांची कारकीर्द गेल्या काही वर्षांत वादग्रस्त ठरली. यापूर्वी पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलेल्या उमराणीकर यांच्यावर पोलिसांच्या सिक्रेट सर्विस फडांतील पैशांचा अपहार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने उमराणीकर यांची पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पावसाळी अधिवेशनात नामुष्की टाळण्यासाठी राज्य सरकारने 16 जुलै 2008 रोजी त्यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदावरून तडकाफडकी बदली केली होती. उमराणीकर यांनी यापूर्वी औरंगाबाद, नागपूर, जळगाव, ठाणे आणि सातारा येथेही काम केले आहे.



(sakaal,12 th june)

इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील कंत्राट ठराविक कंपनीला देऊन त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने इंडियन ऑईलच्या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
विक्री करातून सूट मिळविण्याच्या नावाखाली हे अधिकारी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करीत होते, असा आरोप सीबीआयने केला आहे. कंपनीचे पश्‍चिम विभागीय उपव्यवस्थापक जतीन पारेख, मुख्य वित्त अधिकारी महेश वाघ अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. तसेच जेएलएन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक नागोरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या पथकांनी या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करायला सुरुवात केली असून त्यासाठी मुंबईत सहा ठिकाणी, तर वडोदरा येथे तीन ठिकाणी छापे घातले आहेत. कंपनीचे उपव्यवस्थापक पारेख यांच्या बॅंकेतील लॉकरमध्ये सीबीआयला 73 लाख 32 हजार रुपये सापडले आहेत; तर वाघ यांच्या नावावर एक कोटी रुपयांची मालमत्ता सापडली .

(sakaal,12 th june)

सीमाशुल्क अधीक्षकाच्या मालमत्तेची सीबीआयकडून झाडाझडती

न्हावा-शेवा येथील जवाहरलाल नेहरू बंदरातील (जेएनपीटी) सीमाशुल्क विभागाच्या विशेष मूल्यनिश्‍चिती शाखेच्या अधीक्षकाने त्याच्या कार्यकाळात उत्पन्नापेक्षा अधिक प्रमाणात संपत्ती गोळा केल्याच्या आरोपावरून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अधिकाऱ्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली असून, सीबीआयच्या पथकाने मुंबईत 11 ठिकाणी छापे घातले आहेत.
ओमप्रकाश पांडे असे या सीमाशुल्क अधीक्षकाचे नाव आहे. पांडे याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तसेच हवाई गुप्त वार्ता विभागात नेमणुकीवर असताना मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाने मालमत्ता गोळा केली. यासंबंधी मिळालेल्या माहितीनंतर सीबीआयच्या पथकाने पांडे याच्या घरावर छापा घातला. तपासणीअंती पांडे याची अंधेरीच्या ओबेरॉय मॉलमध्ये तीन दुकाने, हिरानंदानी गॅलेरीया पार्क येथे एक दुकान, खार येथे तीन घरे; तर चेंबूर येथील ऑर्किड रेसिडेन्सी येथे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेले घर असल्याचे उघडकीस आले. पांडे याची विविध बॅंकांत 20 खाती असून, सीबीआयच्या पथकाने त्याच्या घरातून साडेतीन लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.


(sakaal,12 th june)

पवनराजेप्रकरणी फॉरेन्सिक पथक मुंबईत

प्रत्येक घटनेचे नाट्यरूपांतरण होणार


पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) फॉरेन्सिक सायन्सचे पथक मुंबईत दाखल झाल्याची माहिती सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. हत्येच्या दिवशी झालेल्या प्रत्येक घटनेचे नाट्यरूपांतरण या पथकाद्वारे केले जाणार आहे. खासदार पद्मसिंह पाटील यांची नार्को चाचणी तसेच ब्रेन मॅपिंगसंबंधी अद्याप निर्णय झालेला नसल्याचेही सिंग या वेळी म्हणाले.

नवी मुंबईत कळंबोली येथे 3 जून 2006 रोजी कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह पाच जणांना अटक केली. या प्रकरणातील आणखी काही आरोपींना पकडण्यासाठी सीबीआयच्या एका पथकाची उत्तर प्रदेश येथे शोध मोहीम सुरू आहे. खासदार पाटील यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अधिक ठोस पुरावे गोळा करण्यास सुरवात केली आहे. पुरावे गोळा करण्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या पथकाला पाचारण केले आहे. या हत्या प्रकरणात आणखी महत्त्वाचे पुरावे मिळविण्याकरिता हे पथक उपलब्ध असलेल्या सर्व पुराव्यांची नव्याने पाहणी करणार आहे. पवनराजे यांची हत्या करण्यात आलेले कळंबोलीच्या स्टील मार्केटजवळच्या ठिकाणीदेखील हे पथक जाणार आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांचा सकाळपासूनचा दिनक्रम नव्याने पडताळून पाहिला जाणार आहे. हत्येच्या दिवशी झालेल्या प्रत्येक घटनाक्रमाचे नाट्यरूपांतरण या पथकाद्वारे केले जाणार असल्याचेही सिंग यांनी या वेळी सांगितले. या नाट्यरूपांतरणात मुंब्रा येथे असताना या प्रकरणातील आरोपी पारसमल जैन याने जमिनीच्या सौद्यासंबंधी केलेल्या दूरध्वनीच्या वेळेपासून प्रत्यक्ष कळंबोली स्टील मार्केटजवळ इंडिका गाडीतून आल्यानंतर निंबाळकर यांच्या गाडीच्या काचा खाली करून त्यांना ठार मारेपर्यंतच्या घटनांचा समावेश राहणार आहे.

नार्को, ब्रेन मॅपिंगचा निर्णय नाही
सीबीआयच्या तपासाला सहकार्य करीत नसल्याचा आरोप असलेल्या खासदार पद्मसिंह पाटील यांची नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंग करण्यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी दिली.


(sakaal,11 th june)

एटीएस'च्या प्रमुखपदी रघुवंशी यांची नियुक्ती

करकरे यांच्या निधनानंतर सात महिने पद रिक्तच

उच्च न्यायालयाने मारलेल्या ताशेऱ्यांनंतर खडबडून जाग्या झालेल्या राज्य सरकारने दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांची नेमणूक केली. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या निधनानंतर गेले सात महिने हे पद रिक्त होते. गृहमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना या नेमणुकीसंबंधीची माहिती दिली. रघुवंशी यांच्या नियुक्तीनंतर हे पद अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाचे करण्यात आले आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे यांचे निधन झाल्यामुळे हे पद रिक्त होते. रेल्वे पोलिस दलाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांच्याकडे या पथकाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला. दहशतवादाचा कणा मोडून काढण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या या पथकासाठी पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात न आल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने येत्या चार आठवड्यांत हे पद भरण्याचे निर्देश दिले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर आज गृहमंत्री जयंत पाटील यांनी या पदावर के. पी. रघुवंशी यांची नेमणूक केल्याचे जाहीर केले. या पदावरील नेमणुकीस राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांत अनुत्सुकता असल्याची चर्चाही सुरू झाली होती. मालेगाव येथे गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासात उघडकीस आले होते. या प्रकरणाच्या तपासात हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती. करकरे यांच्या निधनानंतर या प्रकरणासह अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांचा तपास खोळंबला होता. करकरे यांच्या पश्‍चात हे पद रिक्त राहू नये याकरिता राज्य सरकारने रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांच्याकडेच या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. करकरे यांच्यापूर्वीही रघुवंशी यांनी या पदाचे सह पोलिस आयुक्त म्हणून काम केलेले आहे.


-------------------
चौकट

राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी झालेल्या निवडीनंतर के. पी. रघुवंशी यांनी, आपण सध्या रजेवर असल्याने अद्याप आपल्याला यासंबंधी अधिकृत असे काहीही कळविण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया दिली.


(sakaal,11th june)

डंपरच्या धडकेत दोन जण ठार

गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरणासाठी बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या डंपरने हॉटेल ताजमहालजवळ फुटपाथवर झोपलेल्या सात जणांना चिरडले. या अपघातात दोन जण जागीच ठार; तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. कुलाबा पोलिसांनी या डंपरचालकाला अटक केली आहे.
हॉटेल ताजच्या मागील बाजूला असलेल्या वाहतूक चौकीजवळ मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास हा प्रकार घडला. गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभीकरणाचे अंतिम टप्प्यातील काम सध्या जोरात सुरू आहे. सुशोभीकरणाच्या या कामासाठी बांधकाम साहित्य पुरविणारा डंपर रिकामा करून चालक सुरेंद्र सहानी (23) हा भरधाव वेगात घरी जायला निघाला. या वेळी त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि डंपर रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर चढला. फुटपाथवर झोपलेल्या सात जणांच्या अंगावर हा डंपर गेला. या भीषण अपघातात राजेश्री मायकल डिसोझा (20) आणि निर्जला दत्तू काळे (5 महिने) हे दोघे जागीच ठार झाले; तर लक्ष्मण पवार (50), सोनी काळे (20), कविता पवार (14), मायकल डिसोझा (24) आणि रियाज अब्बास शेख (9 महिने) असे पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांत एकच हलकल्लोळ झाला. अपघातानंतर पळून जात असलेल्या डंपरचालक सहानी याला या ठिकाणी असलेल्या अन्य नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लगेचच या डंपरचालकाला ताब्यात घेतले. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुलाबा पोलिसांनी डंपरचालक सहानी याला अटक केली आहे. अपघातग्रस्तांमध्ये रस्त्यावर भीक मागणारे तसेच फेरीवाल्याचा व्यवसाय करणाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुलाबा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. पी. विश्‍वासराव यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


(sakaal,11th june)

मुलीच्या लग्नसोहळ्यासाठी पोलिस कोठडीतून पळ...

मुंबईतील व्ही. पी. रोड पोलिसांना धक्का

मुलीच्या लग्नाला उपस्थिती लावण्यासाठी एखादा पिता काय करू शकतो, याचे प्रत्यंतर आज व्ही. पी. रोड पोलिसांना आले. उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी हाणामारीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका पित्याने पोलिसांच्या लॉकअपमधून पळ काढल्याचा प्रकार आज पहाटे घडला. या घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकाराची सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती परिमंडळ -2 चे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी दिली.

शेरमोहम्मद मणियार (45) असे पोलिसांच्या लॉकअपमधून पळून गेलेल्या या आरोपीचे नाव आहे. व्ही. पी. रोडच्या परिसरात मजुरी करणारा मणियार याची मे महिन्यात त्याच्या एका मित्रासोबत हाणामारी झाली. त्या वेळी मणियार याने त्याच्या मित्राच्या डोक्‍यात लोखंडी सळईने मारहाण केली होती. याप्रकरणी मणियारविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली होती. पोलिस कोठडीत असलेल्या मणियारला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार होते. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास लॉकअपमध्ये असलेला मणियार प्रसाधनाला जाण्याच्या बहाण्याने बाथरूममध्ये शिरला. यानंतर त्याने प्रसाधनगृहाच्या खिडकीला असलेली जाळी उचकटत तेथील लोखंडी सळई काढली. या ठिकाणचे पोलिस बेसावध असल्याचे पाहून त्याने प्रसाधनगृहाच्या खिडकीतून बाहेर उडी मारून पळ काढला. बराच वेळ प्रसाधनगृहाबाहेर न आल्याने लॉकअप बाहेर असलेला एक पोलिस शिपाई मणियारचा शोध घेण्यासाठी लॉकअपमध्ये आला. या वेळी प्रसाधनगृहाची खिडकी तोडून तो फरारी झाल्याचे पाहून त्याचीही भंबेरी उडाली. त्याने ही माहिती लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. पुढच्या काही क्षणातच पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना फैलावर घेतले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा मणियार गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या लग्नासाठी गावी जायचे असल्याची विनंती पोलिसांना करीत होता. त्यातूनच हा प्रकार घडला असावा, अशी शक्‍यता या विभागाचे पोलिस उपायुक्त संजय मोहिते यांनी वर्तविली. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून सहायक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचेही मोहिते यांनी या वेळी सांगितले.


(sakaal,11th june)

पवनराजेप्रकरणी उत्तर प्रदेशात आणखी दोघांना अटक?

सीबीआय अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही


पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा शोध घेण्याकरिता उत्तर प्रदेशात रवाना झालेल्या सीबीआयच्या (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने दोघा आरोपींना ताब्यात घेतल्याचे समजते; मात्र सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या आरोपावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह पाच जणांना सीबीआयने अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी पारसमल जैन याने दिलेल्या जबानीवरून खासदार पाटील यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत पोचल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सीबीआयचे एक पथक नुकतेच उत्तर प्रदेशला पाठविण्यात आले. या हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील एका खासदाराचा चालक छोटे पांडे आणि विकास यादव यांचा समावेश असल्याचे पारसमल जैन आणि दिनेश तिवारी यांच्या चौकशीत समोर आले होते. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांच्यावर दिनेश तिवारी आणि छोटे पांडे यानेच गोळ्या झाडल्या होत्या. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांसोबत घेतलेल्या संयुक्त मोहिमेत दोघा आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येते. सीबीआयच्या जाळ्यात सापडलेले आरोपी छोटे पांडे आणि विकास यादव असल्याच्या वृत्ताला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. या दोघा आरोपींची पवनराजे हत्या प्रकरणात तेथेच प्राथमिक चौकशी करून त्यांना मुंबईत आणले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

3 जून 2006 रोजी कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर यांची हत्या करून त्यांचे मारेकरी सुपारीचे तीस लाख रुपये घेऊन उत्तर प्रदेशला पळून गेले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शस्त्रांच्या खरेदी-विक्री आणि दरोड्याप्रकरणी अटक केलेला आरोपी पारसमल जैन याच्या जबानीत या हत्येमागे उत्तर प्रदेशातील मारेकरी गुंतल्याची माहिती मिळाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

(sakaal,10th june)

दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ विश्‍लेषण

कौल लोकसभेचा






नागरिकांच्या समस्या सोडविणाऱ्या पक्षाकडे विजयश्री


एकीकडे आशियातली सर्वांत बकाल वस्ती समजली जाणारी धारावी आणि दुसरीकडे सुसंस्कृत आणि उच्चविद्याभूषितांचे वास्तव्य असलेला दादर, माहीमसारखा परिसर अशा विकासाच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या उपनगरांचा अंतर्भाव असलेला मतदारसंघ म्हणून दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाकडे पाहिले जाते. कोणे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघावर गेल्या दोन टर्म कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे वर्चस्व आहे.

लोकसभेचे माजी सभापती शिवसेने मनोहर जोशी यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला कॉंग्रेस आघाडीच्या एकनाथ गायकवाड यांनी 2004 च्या निवडणुकीत पराभवाची धूळ चारल्यानंतर कॉंग्रेसच्या ताब्यात गेलेला हा मतदारसंघ यंदा एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत सगळी ताकद पणाला लावल्यानंतरही स्वतःकडे राखणे शिवसेनेला जमले नाही. गेली अनेक वर्षे विकासापासून दूर राहिलेल्या धारावीसारख्या झोपडीतील मतदारांनीही शिवसेनेला साथ न देता कॉंग्रेससोबत राहणे पसंत केल्याचे चित्र या लोकसभा निवडणुकीत दिसले. या लोकसभा मतदारसंघात माहीम, वडाळा, सायन-कोळीवाडा, धारावी, चेंबूर आणि अणुशक्तीनगर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. 15 लाख 15 हजार 644 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात अवघ्या 5 लाख 99 हजार 628 मतदारांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघातील एकूण परिस्थिती लक्षात घेता कॉंग्रेस आघाडीला हा मतदारसंघ भविष्यात अधिक "सेफ' करण्यासाठी येत्या काळात जनतेच्या प्रश्‍नांचा सातत्याने निपटारा करावा लागेल. त्यानंतरच हा मतदारसंघ कॉंग्रेसआघाडीकरिता "सेफहोम' समजला जाईल.

अणुशक्तीनगर
विधानसभेच्या 2004 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी कॉंग्रेसच्या ताब्यात गेलेल्या या मतदारसंघात युसूफ महम्मद हुसेन अब्राहमी आमदार आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळे या उमेदवाराचा पराभव केला होता. भाभा अणुसंशोधन केंद्रासह या परिसराला लागून असलेला; झोपडपट्टी तसेच मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा असलेल्या या मतदारसंघात 2 लाख 24 हजार 19 एवढे मतदार आहेत. प्रत्यक्षात या मतदारसंघात फक्त 87 हजार 685 एवढेच मतदान झाले. या मतदारसंघातील एकूण मतदानाची आकडेवारी 39.14 टक्के एवढी आहे. या मतदारसंघात राहणाऱ्या डॉ. शैलेंद्रकुमार घोष यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढविली; मात्र त्यांना येथील मतदारांनीही स्पष्टपणे नाकारले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डॉ. घोष यांनी कोणत्याही पूर्तयारीशिवाय निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना स्वतःच्या होमटाऊनमध्येही चांगला स्कोअर करता आलेला नाही. या मतदारसंघातून कॉंग्रेस आघाडीच्या एकनाथ गायकवाड यांना पहिल्या फेरीपासूनच पहिल्या पसंतीची मते मिळत होती. यापाठोपाठ शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आमदार सुरेश गंभीर यांचा, तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या श्‍वेता परुळकर या राहिल्या.

चेंबूर
बौद्ध धर्मीयांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असलेला हा मतदारसंघ. कॉंग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आलेले आमदार चंद्रकांत हंडोरे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रमोद शिरवळकर यांचा पराभव केला होता. राज्याच्या सामाजिक न्यायमंत्रिपदावर असलेल्या हंडोरे यांच्या या मतदारसंघावर असलेल्या वर्चस्वामुळे या ठिकाणी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला चांगलाच फायदा झाला. या मतदारसंघात एकूण 2 लाख 45 हजार 934 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 5 हजार 961 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्यासाठी घराबाहेर काढले. नेमकी हीच बाब शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांना जमली नाही, असे म्हणता येईल. या मतदारसंघातही अगदी पहिल्या फेरीतच कॉंग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना 3692 मते पडली होती. उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या मतमोजणीच्या फेऱ्यांत गायकवाड यांना चांगली मते मिळाली. या मतदारसंघात राहणारे भारत उदय मिशन पक्षाच्या डॉ. अकल्पिता परांजपे, रिपब्लिकन पक्षाच्या कमल वाघधरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी) या पक्षाचे मिलिंद गरुड या स्थानिक उमेदवारांनाही गायकवाड यांना विजयापासून रोखता आले नाही. या उमेदवारांना प्रत्येक फेरीत मिळालेल्या मतदानाचा एकदाही तिहेरी आकडा गाठता आला नाही.

धारावी
धारावी डेव्हलपमेंट प्लॅनच्या माध्यमातून झोपडीवासीयांना किमान साडेतीनशे चौरस फुटांची घरे तसेच दुकाने मिळवून देण्याचे जाहीरनाम्यात सांगून मतदारांना शिवसेना-भाजप युतीने भुलविले; मात्र या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने धारावी विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी असफल ठरविला. याचा अर्थ कॉंग्रेस आघाडीनेदेखील या मतदारसंघावर पुरेसे लक्ष दिले आहे असे नाही. या विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले एकनाथ गायकवाड यांना येथील मतदारांना दुसऱ्यांदा लोकसभेवर पाठविले आहे; मात्र त्यांनाही या मतदारसंघाच्या विकासाच्या कामाला न्याय देणे म्हणावे तेवढे जमले नाही. एकनाथ गायकवाड खासदार झाल्यानंतर धारावी विधानसभेची जागा त्यांची कन्या वर्षा यांच्याकडे गेली. येथील मतदारांनी विधानसभेसाठी वर्षा गायकवाड यांना 2004 मध्ये मताधिक्‍य दिले. त्यांनी शिवसेनेच्या स्नेहल जाधव यांचा पराभव केला होता; मात्र गेल्या काही वर्षांत या मतदारसंघातील स्थिती बदलली आहे. धारावीच्या विकासासाठी केंद्राकडून कोट्यवधी रुपयांचे पॅकेज आणले असले तरी येथील मतदारांनी गायकवाड यांच्यासह सर्वच पक्षांबद्दलची नाराजी मतपेटीतून उघडपणे दाखवून दिली. या ठिकाणी 2 लाख 65 हजार 112 मतदार आहेत. त्यापैकी फक्त 88 हजार 469 एवढ्याच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी गायकवाड यांच्यासह शिवसेना युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांच्याबाबतही तेवढीच उदासीनता दर्शविल्याचे चित्र या मतदारसंघात आहे. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात लोकसंख्येच्या मानाने सर्वांत मोठ्या समजल्या धारावी मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत फक्त 33.37 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार पद भूषविलेले एकनाथ गायकवाड यंदा या मतदारसंघातून दलित, मागासवर्गीय तसेच कष्टकरी जनतेची
म्हणावी तेवढी मते मिळवू शकले नाहीत. त्यामानाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार श्‍वेता परुळकर यांना ही मते मिळविण्यात चांगले यश मिळविले, असेही म्हणता येईल.

सायन-कोळीवाडा
मतदार पुनर्रचनेत सायन-कोळीवाडा या नव्या मतदारसंघाची निर्मिती झाली. यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकांना हा स्वतंत्र मतदारसंघ सामोरा गेला. दक्षिण-मध्य मुंबईतील सर्वांत मोठा मतदारसंघ अशी या विधानसभा मतदारसंघाची ओळख सांगता येईल. या मतदारसंघात 2 लाख 87 हजार 876 मतदार आहेत. प्रामुख्याने कॉंग्रेसचेच प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात पिढ्यान्‌पिढ्या राहणाऱ्या कोळीबांधवांची भूमिका येथील पहिलावहिला आमदार ठरविणार आहे. यापूर्वी या विभागातील बराचसा भाग माटुंगा विधानसभा मतदारसंघात होता. या विभागातून कॉंग्रेसचे जगन्नाथ शेट्टी हे विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबूभाई भवानजी यांचा पराभव केला होता. शेट्टी यांना शीव कोळीवाड्यातील मतदारांच्या मिळालेल्या मतांमुळेच शेट्टीकरिता विधानसभेची दारे उघडी झाल्याचे बोलले जाते. मतदार पुनर्रचनेत शेट्टी यांचा माटुंगा मतदारसंघ रद्द झाला आहे. यापुढील काळातही जगन्नाथ शेट्टीच या परिसरातून आपले नशीब अजमावतील असा अंदाज आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर यंदा पहिल्यांदाच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही येथील मतदारांनी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनाच हात दिला. या निवडणुकीत 98 हजार 738 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येत्या काळात या मतदारसंघावर आपला दबदबा वाढविण्यासाठी शिवसेना-भाजप युतीला या मतदारसंघाची नव्याने बांधणी करावी लागेल. तसेच या ठिकाणी असलेल्या स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्यास या मतदारसंघात करिष्मा होण्याची शक्‍यताही जाणकार वर्तवितात.

वडाळा
मतदारसंघ पुनर्रचनेत नव्याने तयार झालेला हा मतदारसंघ आहे. 2 लाख 40 हजार 201 मतदारसंख्या असलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 41.76 टक्के मतदान झाले. या ठिकाणी राहणाऱ्या 1 लाख 318 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नायगाव, माटुंगा आणि शिवडी असे तीन विधानसभा मतदारसंघ फोडून तयार केलेल्या या मतदारसंघात कोणे एकेकाळी शिवसेनेचे अधिराज्य होते; मात्र नतंरच्या काळात या संबंध परिसरावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. नायगाव येथून 2004 मध्ये शिसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर नारायण राणे यंच्यासोबत कॉंग्रेसमध्ये गेले. त्यानंतर या परिसरावर असलेले शिवसेनेचे वर्चस्व कमी कमी होत गेले. प्रभादेवी येथील काही भागही या मतदारसंघात जोडला गेला आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघाचाही अंतर्भाव या मतदारसंघात असल्याने शिवडीचे आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार सचिन अहिर हेदेखील या मतदारसंघात येत्या काळात मोर्चेबांधणी करीत असल्यास वावगे वाटू नये. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र या संपूर्ण मतदारसंघावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार श्‍वेता परुळकर यांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवला. या मतदारसंघातील बहुसंख्य मराठी मतदारांनी परुळकर यांच्या पारड्यात आपली मते टाकली. त्यामुळे येत्या काळात हा मतदारसंघ मराठी मतदारांबाबत महत्त्वाची भूमिका बजाविण्याची चिन्हे आहेत.

माहीम
शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार आमदार सुरेश गंभीर यांचे हे "होमपिच'. या मतदारसंघावर गंभीर यांनी गेल्या चार वर्षांच्या काळात निर्माण केलेली पकड तशी उल्लेखनीय म्हणावी लागेल. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत गंभीर यांनी कॉंग्रेसच्या अजित सावंत यांचा अवघ्या 2004 मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर गंभीर यांनी या मतदारसंघात केलेली कामे लोकसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्‍य वाढविण्यास काही अंशी महत्त्वाची ठरली. प्रभादेवी, वरळी आणि दादरचा काही भाग असा बहुतांश मराठी मतदार असलेला हा मतदारसंघ शिवसेनेची पाळेमुळे नव्याने रोवण्यासाठी उपयोगी ठरू शकेल; मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभे राहिलेले कडवे आव्हान या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांपुढे राहणार आहे. 2 लाख 62 हजार 402 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात 1 लाख 18 हजार 337 एवढे मतदान झाले. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातील सर्वाधिक म्हणजे 46.90 टक्के मतदान या मतदारसंघात झाले आहे. या ठिकाणी शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानासाठी बाहेर काढल्याचे चित्र असले तरी येथील मतदारांनी आपल्या मतांचा कौल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार परुळकर यांच्या बाजूने दिल्याचे आकडे सांगतात. मितभाषी असलेल्या शिवसेना आमदार गंभीर यांच्यासमोर या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभ्या केलेल्या आव्हानामुळेच त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय या मतदारसंघावर चांगली पकड असलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनीही गंभीर यांच्यासाठी काम करण्यात तेवढा रस न दाखविल्यामुळेच गंभीरांना पराभवाचा सामना करावा लागला.


(sakaal, 9th june)

पद्मसिंह पाटलांसारख्या व्यक्ती अतिरेक्‍यांपेक्षाही धोकादायक - हजारे

तेरणा सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार बाहेर काढल्यामुळेच खासदार पद्मसिंह पाटील यांनी आपल्या हत्येची सुपारी दिली असावी, असा संशय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पद्मसिंह पाटील यांच्यासारख्या व्यक्ती पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक असतात. त्यांना कायम तुरुंगात ठेवले पाहिजे, असेही हजारे या वेळी म्हणाले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने हजारे यांना पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी बोलावल्यानंतर ते प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते.
तेरणा सहकारी साखर कारखान्यात सुरू असलेला गैरव्यवहार बाहेर काढल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला पद्मसिंह पाटील यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले; याशिवाय उस्मानाबाद जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारही आपण बाहेर काढला होता. याच रागातून त्यांनी आपल्या हत्येची सुपारी पारसमल जैन याला दिली असावी, असेही अण्णा हजारे या वेळी म्हणाले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तेरणा सहकारी साखर कारखाना व जिल्हा बॅंकेतील गैरव्यवहारासंबंधी माहिती देण्यासाठी आपण आलो होतो. आपल्या हत्येची सुपारी देणाऱ्यांविरुद्ध वेगळा गुन्हा दाखल करण्याची विनंतीही "सीबीआय'कडे केली आहे. सीबीआय कोणत्याही दबावाशिवाय काम करीत आहे, असे सांगत हजारे यांनी "सीबीआय'ला जे जमले, ते राज्य पोलिसांना का नाही जमले, असा सवालही हजारे यांनी या वेळी केला. "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांकडून कुलाबा येथील तन्ना हाऊसमधील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत त्यांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, निंबाळकर हत्येच्या तपासाला विलंब लावल्याप्रकरणी; तसेच उपलब्ध पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि तपासासंबंधी त्यांच्या असलेल्या भूमिकेच्या चौकशीची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. "सीबीआय'चे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने आताच काहीही सांगणे उचित नसल्याचे सांगितले.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पारसमल जैन याच्या चौकशीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट उघडकीस आला. अण्णा हजारे यांनी तेरणा सहकारी साखर कारखान्यात झालेला गैरव्यवहार उघडकीस आणला होता. त्यामुळेच आरोपी सतीश मंदाडे आणि नगरसेवक मोहन शुक्‍ला यांनी हजारे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची शक्‍यता वर्तवीत "सीबीआय'ने त्यांना त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी तन्ना हाऊसमधील कार्यालयात आज सायंकाळी पाचच्या सुमारास बोलावले. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत अण्णांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना आज किताबमहल येथील कार्यालयात ठेवण्यात आले असून त्यांची आजही "सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.


तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी
निंबाळकर हत्या प्रकरणाच्या तपासात ढिलाई करणाऱ्या नवी मुंबई पोलिस दलातील तत्कालीन अधिकाऱ्यांचीही चौकशी "सीबीआय'मार्फत केली जाणार आहे. 3 जून 2006 रोजी कळंबोली येथे झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या घटनेच्या वेळी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर विजय कांबळे होते. गुन्हे शाखेचे तत्कालीन उपायुक्त शशिकांत महावरकर, परिमंडळ-2 चे पोलिस उपायुक्त प्रवीण पवार, पनवेल विभागाचे सहायक पोलिस आयुक्त विजय सूर्या, कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. वाय. गलधर आणि बी. आर. पाटील हे अधिकारी नवी मुंबईत कार्यरत होते. या अधिकाऱ्यांपैकी विजय सूर्या सेवानिवृत्त झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी निंबाळकर हत्येप्रकरणी केलेल्या तपासाची आणि त्यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्‍यताही "सीबीआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली. मात्र, "सीबीआय'चे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला. योग्य वेळी यासंबंधी संपूर्ण माहिती प्रसिद्धिमाध्यमांपुढे सांगण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


(sakaal,9th june)

नक्षलवादविरोधी कारवायांत समन्वय आवश्‍यक : गृहमंत्री

नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी नक्षलग्रस्त राज्यांमध्ये माहितीचे जाळे; तसेच या राज्यांच्या नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये समन्वय असणे आवश्‍यक असल्याचे मत गृहमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
नक्षलग्रस्त राज्यांचे गृहमंत्री, वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना गृहमंत्री पाटील यांनी समन्वयाबरोबरच संयुक्त कारवाई होणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. यासंबंधीची गुप्तचर विभागाकडून येणारी माहितीही परस्परांना मिळावी; तसेच केंद्राकडे केल्या जाणाऱ्या मागणीत सुसूत्रताही आवश्‍यक असल्याचे पाटील या वेळी म्हणाले. नक्षलवादी हल्ले हे केवळ राज्यांची समस्या नसून ती देशाची समस्या आहे. या राज्यांनी गुप्तचर यंत्रणा बळकट करायला पाहिजे, असा आग्रह छत्तीसगडचे गृहमंत्री ए. कनवार यांनी बैठकीत धरला. नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी समन्वयाने नियोजन करायला हवे, असेही ते या वेळी म्हणाले. या बैठकीला गृहराज्यमंत्री नसीम खान, डॉ. नितीन राऊत , गृहखात्याच्या अपर मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार, पोलिस महासंचालक एस. एस. विर्क, आंध्र प्रदेशचे पोलिस महासंचालक एस. यादव; तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा येथील वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.


(sakaal,8th june)

राज्य लोकसेवा परीक्षांचे अंतिम निकाल घोषित

पहिल्या तीनही क्रमांकांवर महिलांनी बाजी मारली.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार या पदांसाठी 2006 मध्ये घेतलेल्या परीक्षांचे अंतिम निकाल घोषित करण्यात आले असून, या निकालांत पहिल्या तीनही क्रमांकांवर महिलांनी बाजी मारली. पुण्याच्या शमा ढोक यांनी या परीक्षेत 1190 असे सर्वाधिक गुण मिळवीत प्रथम येण्याचा मान पटकावला.
उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, जिल्हा उपनिबंधक या शासनाच्या विविध सेवांतील एकूण 398 राजपत्रित अधिकाऱ्यांची भरतीसाठी ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. 2 सप्टेंबर 2007 रोजी झालेल्या पूर्वपरीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल एक लाख 38 हजार 174 उमेदवार बसले होते. त्यापैकी 9,289 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. या उमेदवारांपैकी "अ' वर्गासाठी 119; तर "ब' वर्गासाठी 279 उमेदवार पात्र ठरले. या परीक्षेत उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांत पुण्याच्या शमा ढोक यांनी 1190 गुण मिळवीत पहिला क्रमांक पटकावला. साताऱ्याच्या कोडोली येथील प्रशाली जाधव यांनी 1180 गुण मिळवून दुसरा, तर कोल्हापूरच्या गारगोटी येथील पूर्णिमा चौगुले यांनी 1157 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. पोलिस उप जिल्हाअधीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत पुण्याच्याच तळेगाव येथे राहणाऱ्या मारुती नारायण जगताप यांनी 1128 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. दादरच्या सागर पाटील यांनी 1124 गुण मिळवून दुसरा, तर उस्मानाबादच्या कळंब तालुक्‍यातील बापू बनगार यांनी 1122 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. निवड झालेल्या या उमेदवारांच्या शिफारशी राज्य सरकारकडे पाठविण्यात येत असल्याचे राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालात म्हटले आहे. निरनिराळ्या सामाजिक प्रवर्गांत पुरुष व महिलांमध्ये प्रथम आलेले उमेदवारांची नावे व गुण पुढीलप्रमाणे ः कंसात वर्गवारी
महिंद्रकुमार श्रीरंगराव कांबळे- 1066, सोनल सोनकवडे- 1050 (अनुसूचित जाती), प्रमोद हिले- 1066, प्रतिमा पुलदवाड- 920 (अनुसूचित जमाती), दयाळसिंग ठाकूर- 1023, उज्ज्वला जाधव- 921 (विमुक्त जाती), श्‍याम पवार- 1123, प्रियांका कांबळे- 1081 (भटक्‍या जाती), सचिन पांडकर- 1084, शरयू आढे- 1075 (विशेष सामाजिक प्रवर्ग), श्रीमंत हारकर- 1134, अर्चना शिंदे- 987 (भटक्‍या जमाती -क), बापू बनगर- 1122, उज्ज्वला पालवे- 986 (भटक्‍या जमाती- ड) , नितीन व्यवहारे- 1133, हेमांगी पाटील- 1115 (इतर मागास प्रवर्ग), संतोष हराळे- 1001 (अपंग) व शारदा पाटील- 979 (खेळाडू).


(sakaal,7 th june)

शीतल मफतलाल यांना विमानतळावर अटक

परदेशातून बेहिशेबी हिरे आणल्याचा आरोप


प्रसिद्ध उद्योजक आणि मफतलाल लक्‍झरी लिमिटेडच्या अध्यक्षा शीतल मफतलाल यांना मुंबई विमानतळावर परदेशातून बेहिशेबी हिरे आणल्याप्रकरणी केंद्रीय सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. भारतातील फॅशन रिटेलर पायोनिअर म्हणून जगविख्यात "टाइम' मॅगझीनने गौरविलेल्या शीतल मफतलाल उद्योगसमूहाचे दिवंगत अध्यक्ष योगींद्र मफतलाल यांची सून; तर अतुल्य मफतलाल यांच्या पत्नी आहेत.
आज सायंकाळी ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने मुंबईत परतलेल्या शीतल मफतलाल यांनी परदेशातून येताना हिऱ्यांचे दागिने आणले. सीमा शुल्क चुकविण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपये किमत असलेल्या या दागिन्यांची किंमत अवघी तीस लाख रुपये असल्याचे नमूद केले. विमानतळावर उतरल्यानंतर सीमा शुल्क विभागाने त्यांच्याकडील सामानाची पाहणी केली, तेव्हा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी दागिने असल्याचे आढळले. यानंतर शीतल मफतलाल यांना सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत एअर इंटेलिजन्स विभागाकडून त्यांची चौकशी सुरू होती, अशी माहिती सीमा शुल्क विभागातील सूत्रांनी दिली.
स्टाइल आयकॉन समजल्या जाणाऱ्या शीतल मफतलाल यांच्या घरातून काही वर्षांपूर्वी 10 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने गहाळ झाल्याची तक्रार दिली होती. मालमत्तेच्या वादातून मफतलाल कुटुंबात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू असल्याचेही या वेळी सूत्रांनी सांगितले.

(sakaal,7th june)

Sunday, June 7, 2009

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक...!

निंबाळकर हत्या प्रकरण : १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडी


पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपावरून सीबीआयने शनिवारी रात्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना अटक केली. त्यांना आज पनवेल न्यायालयात हजर केले असता १४ जूनपर्यंत त्यांना सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कडेकोट पोलिस बंदोबस्तात आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास डॉ. पाटील यांना पनवेल न्यायालयात आणण्यात आले. पनवेल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. डॉ. पाटील यांच्या वतीने ऍड. सुभाष झा व ऍड. प्रफुल्ल म्हात्रे यांनी काम पाहिले. डॉ. पाटील यांना रक्तदाबाचा त्रास असून त्यांची तब्येत ठीक नसल्याने जामीन मिळावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. त्यावर सीबीआयचे वकील इजाज खान यांनी गरज पडल्यास आम्ही डॉ. पाटील यांच्यावर उपचार करू, असे सांगून पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायाधीश जोशी यांनी डॉ. पाटील यांना १४ जूनपर्यंत सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असल्याच्या आरोपावरून पारसमल जैन व दिनेश तिवारी या दोघांना प्रथम सीबीआयने अटक केली. तपासात त्यांनी दिलेल्या माहितीवरून डोंबिवलीतील भाजप नगरसेवक मोहन शुक्‍ल व उद्योजक सतीश मंदाडे यांना अटक केली. या चौघांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या जबानीत हत्येप्रकरणात डॉ. पाटील यांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे सामूहिक आखणी करून किंवा कट करून (१२० ब) दुहेरी हत्या (३०२ प्रमाणे) केल्याच्या आरोपावरून सीबीआयने शनिवारी रात्री डॉ. पाटील यांना अटक केल्याचे सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग व ऍड. खान यांनी सांगितले. डॉ. पाटील लोकसभा सदस्य असल्याने त्यांच्या अटकेची माहिती लोकसभा अध्यक्षांना कळविण्यात आल्याचे ऋषिराज सिंग यांनी सांगितले. दरम्यान, या हत्याप्रकरणात प्रत्यक्ष सहभाग असलेले पारसमल जैन व दिनेश तिवारी यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे त्यांना पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली, अशी माहिती ऍड. खान यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

कडोकोट पोलिस बंदोबस्त - डॉ. पाटील यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्यामुळे शहर पोलिसांच्या वतीने न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. कुणालाही या रस्त्यावरून पोलिस सोडत नव्हते. छायाचित्रकार व पत्रकारांना न्यायालयाच्या इमारतीपासून २०० फूट अलीकडे रोखून धरले होते. सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठोवण्यात आला होता. यात एक पोलिस उपायुक्त, एक सहायक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षक, १०० पोलिस शिपाई तैनात केले होते. याशिवाय राज्या राखीव दलाची एक तुकडी, दंगल नियंत्रक पथक, कमांडो पथक सज्ज ठेवण्यात आले होते.

प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींची झुंबड - या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांचे प्रतिनिधी सकाळपासूनच न्यायालयाबाहेर उपस्थित होते. डॉ. पाटील यांना न्यायालयात जसजसा वेळ लागत होता तसतसे पत्रकारांची गर्दी वाढत होती. डॉ. पाटील यांची छायाचित्रे काढण्यासाठी सरसावलेल्या छायाचित्रकारांना पोलिस रोखत होते, त्यामुळे त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमकही झाली. सव्वाबाराच्या सुमारास पाटील यांना न्यायालयात आणले असता त्यांचे छायाचित्र टिपण्यासाठी छायाचित्रकारांची एकच झुंबड उडाली.

राष्ट्रवादी नेत्यांची रीघ - न्यायालयाच्या आवारात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची रीघ लागलेली होती. खासदार संजय पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा अध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, प्रदेश चिटणीस अशोक जानोरकर, जीवनराव गोरे, पनवेलचे उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, नगरसेवक सुनील रावते, सुनील मोहोड, नगरसेविका शशिकला सिंह, सिराज सैफद, विजय लोखंडे, विभाकर नाईक, अनंता पाटील, शिवदास कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------------
पद्मसिंहांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरील नागरिकांचा विश्‍वास दृढ झाला आहे.

- अण्णा हजारे


--------------------------------------------
तपासाचा घटनाक्रम

- ३ जून २००६ - कळंबोली येथे अज्ञात हल्लेखोरांकडून पवनराजे यांची गोळ्या घालून हत्या.

- ४ फेब्रुवारी २००८ - हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची पत्नी आनंदीबाई यांची याचिका.

- २३ ऑक्‍टोबर २००८ - पवनराजे हत्येप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने चालविलेला तपास योग्य नसल्याचे उच्च न्यायालयाचे मत; सीबीआय तपासाचा आदेश

२७ मे २००९ - पवनराजेंच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी दिल्याचे उघड; पारसमल ताराचंद भंडाला ऊर्फ पारस जैन व कुख्यात गुंड दिनेश तिवारी यांना अटक

३१ जून २००९ - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवक मोहन शुक्‍ला आणि लातूरचा व्यापारी सतीश मंदाडे यांना कल्याणमधून अटक.

--------------------------------------------
कोण पवनराजे?

१९९० - डॉ. पद्मसिंह यांचे चुलत बंधू म्हणून पवनराजे निंबाळकर यांची राजकीय कारकीर्द सुरू.

१९९५ - 'तेरणा' कारखान्याच्या संचालकपदी निवड

२००० - उस्मानाबाद जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावर झेप

२००२ - बॅंकेतील ३० कोटींचा रोखे गैरव्यवहार उघडकीस. अध्यक्षपदावरून बडतर्फ.

२००४ - डॉ. पद्मसिंहांपासून फारकत आणि त्यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढविली. केवळ ४८४ मतांनी पराभव

२००५ - कॉंग्रेसमध्ये प्रवेश


(sakaal, 7th june)

खासदार पद्मसिंह पाटील "सीबीआय'च्या ताब्यात...

कॉंग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने आज संध्याकाळी खासदार पद्मसिंह पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले, की या प्रकरणी यापूर्वी केलेल्या चौकशीद्वारे उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील यांचीही चौकशी होणे गरजेचे होते; त्यासाठी महसूल व पुनर्वसन राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरातून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पवनराजे निंबाळकर व त्यांचा वाहनचालक समद काझी यांची तीन जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पारसमल जैन व दिनेश तिवारी यांना व त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपचा नगरसेवक मोहन शुक्‍ल व लातूर येथील व्यापारी सतीश मंदाडे यांना अटक करण्यात आली होती. पारसमल जैन व दिनेश तिवारी यांच्यावर खुनाचा तर मंदाडे व शुक्‍ल यांच्यावर पवनराजे निंबाळकर यांना मारण्याची सुपारी दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हे चारही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणात पद्मसिंह पाटील यांच्यावरही संशयाची सुई वळविण्यात येत होती.


(sakaal,6th june)

पवनराजे हत्येप्रकरण - आरोपींना अण्णा हजारे यांच्याही हत्येची सुपारी

कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजप नगरसेवक मोहन शुक्‍ला आणि लातूर येथील व्यापारी सतीश मंदाडे या दोघांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याही हत्येची सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाली आहे. अटकेतील आरोपींच्या चौकशीसाठी पोलिस कोठडी मिळण्याकरिता सीबीआयने पनवेल न्यायालयात दिलेल्या अर्जात अण्णा हजारे यांच्या हत्येच्या कटाचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन्ही आरोपींना ९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नवी मुंबईत कळंबोली येथे ३ जून २००६ रोजी कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी यांची हत्या झाली होती. सीबीआयने या हत्येप्रकरणी रविवारी कल्याण येथील नगरसेवक मोहन आनंद शुक्‍ला आणि लातूर येथील व्यापारी सतीश मंदाडे यांना अटक केली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेले आरोपी पारसमल जैन व दिनेश तिवारी यांच्या मदतीने या दोघांनी पवनराजे यांच्या हत्येचा कट आखला होता. शुक्‍ला व मंदाडे यांनीच दोघांना सुपारीचे ३० लाख रुपये दिले होते. आज शुक्‍ला व मंदाडे या दोघांना पनवेल येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी या संपूर्ण प्रकरणात आरोपींच्या असलेल्या सहभागावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा शोध सुरू असून, त्याबाबत सविस्तर माहिती सीबीआयचे अधिकारीच देऊ शकतील, असे सांगत ऍड. खान यांनी अधिक बोलणे टाळले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी शुक्‍ला व मंदाडे या दोघांना ९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती जे. के. जोशी यांनी दिले. दोन्ही आरोपींचे वय आणि आजारपण लक्षात घेता, त्यांना घरचे जेवण व औषधे देण्याची परवानगीही न्यायालयाने दिली. दिनेश तिवारी व पारसमल जैन यांना न्यायालयाने यापूर्वीच ८ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.


(sakaal,2nd june)

दाऊदचा भाऊ अनिस म्हणतो, मी जिवंत आहे!

हत्येची अफवा; पोलिसांकडून अद्याप प्रतिक्रिया नाही


मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्यावर कराची येथे बुलूची मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केल्याच्या पसरलेल्या अफवेने आज एकच खळबळ उडाली होती. त्याचा मोठा भाऊ दाऊदचा कराची आणि दुबईतील रिअल इस्टेटचा धंदा, हवालामार्गे होणारी पैशांची उलाढाल आणि अमली पदार्थांचा व्यापार सांभाळणाऱ्या अनिसनेच एका वृत्तवाहिनीला स्वतः दूरध्वनी करून आपल्यावरील हल्ला ही अफवा असल्याचे सांगितले. या हल्ल्यासंबंधी मुंबई पोलिसांनी सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही अधिकृत दुजोरा दिला नव्हता.

कराची येथे अल हबीब बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये जाण्याकरिता कारमधून उतरत असताना अनिसवर बुलूची मारेकऱ्यांनी अगदी जवळून गोळ्या झाडल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली. अनिसच्या हत्येच्या घटनेची मुंबई पोलिस तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सकाळपासून खातरजमा करीत होते. याच वेळी दाऊद इब्राहिमचा दबदबा असलेल्या नागपाडा, भेंडीबाजार, डोंगरी, मिरा रोड या परिसरांत राहणाऱ्या हस्तकांनीही या हल्ल्याची सत्यता पडताळण्यास सुरुवात केली. दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याकडून माहिती मिळविण्यासाठीही काहींचे प्रयत्न सुरू होते; मात्र अनिसवर झालेल्या हल्ल्याला कोणताही दुजोरा मिळत नव्हता. अखेर सायंकाळी एका वृत्तवाहिनीला सॅटेलाईट फोनवरून स्वतः संपर्क साधून अनिसने आपण जिवंत असल्याचे सांगितल्यानंतर हल्ल्याच्या या वृत्ताबाबत साशंकता व्यक्त करण्यात येऊ लागली.
मार्च 1993 मध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा भाऊ अनिस आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) इंटरपोलच्या मदतीने रेड कॉर्नर नोटीसही बजावली होती. दुबईतील वास्तव्याच्या सुरुवातीच्या काळात तो दाऊद टोळीसाठी अमली पदार्थ, कॉन्ट्रॅक्‍ट किलिंग आणि हवालामार्गे पैशांची ने-आण करण्याच्या व्यापारात होता. सीबीआयकडे असलेल्या नोंदीनुसार अनिसवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, खंडणीसाठी अपहरण अशा तब्बल सत्तरहून अधिक गुन्ह्यांत तो पोलिसांना हवा आहे. काही वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रिअल इस्टेटसह मोठमोठ्या शॉपिंग मॉल्सचा व्यवसाय अनिस सांभाळत आहे. 1996 मध्ये त्याला अमली पदार्थांचा साठा बाळगल्याप्रकरणी, तर 1997 मध्ये इरफान गोगा नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी दुबई पोलिसांनी अटक केली होती. संयुक्त अरब अमिरातीशी भारताच्या असलेल्या गुन्हेगार हस्तांतर कायद्यांतर्गत सीबीआयने त्याचा ताबा मागितला; मात्र दोन्ही वेळा पुराव्यांच्या अभावी त्याची सुटका करण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानसोबत असलेल्या चांगल्या संबंधांमुळे अनिस या प्रकरणांतून सहिसलामत सुटल्याचे बोलले जाते. त्यानंतर त्याने आपले बस्तान मोठा भाऊ आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत कराचीत बसविले आहे.
मार्चमध्येच दाऊदचा लहान भाऊ नूरा (50) याचे कराचीत दीर्घ आजाराने निधन झाले होते. कराचीत पत्नी आणि दोन मुलांसोबत अनिस राहतो. त्याची मोठी मुलगी लग्नानंतर मस्कत येथे स्थायिक झाली आहे, तर मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येते.


(sakaal, 5th june )