Tuesday, October 28, 2008

मी राज ठाकरेला मारायला आलोय..!

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 ः बस कुर्ल्याच्या बैलबाजारात आली आणि वरच्या डेकमध्ये बसलेले प्रवासी उतरायला उठले. एवढा वेळ मागच्या सीटवर बसलेला "तो' विनातिकीट प्रवास करणारादेखील उठला. इतर प्रवाशांसारखाच तो खाली उतरतोय असे वाटले; मात्र काही कळायच्या आतच त्याने लोखंडी साखळी माझ्या गळ्यावर जोरकसपणे आवळली. गळ्याभोवती अचानक बसलेल्या फासाने घाबरून मी सुटकेचा प्रयत्न केला. त्याने सोबत आणलेले रिव्हॉल्व्हर माझ्या डोक्‍याला लावले, तशी माझी धडपड थांबली. "गडबड करू नको, मी तुला नाही, राज ठाकरेला मारायला आलोय.!' असे म्हणत त्याने माझे हात बांधले. यानंतर वरच्या डेकमध्ये असलेल्या मोजक्‍या प्रवाशांकडे रिव्हॉल्व्हर रोखून त्यांच्याकडून मोबाईल मागायला सुरुवात केली. दहा मिनिटे हे नाट्य सुरू असतानाच कोणीतरी पोलिसांना बोलावले. ते आले तशी त्याने दरवाजाच्या दिशेने एक गोळी झाडली. त्याच्या तावडीतून सुटून जीव वाचविण्याकरिता इतर प्रवाशांसोबत मी सुद्धा खाली पळालो. नंतर काही मिनिटांतच गोळीबार झाल्याचा आवाज आला. पोलिसांच्या गोळीबारात "तो' गंभीर जखमी झाल्याचं कळलं. अंधेरीहून कुर्ल्याला जाणाऱ्या 332 क्रमांकाच्या बेस्ट बसमध्ये झालेला थरार प्रत्यक्ष अनुभवणारे आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी स्वतःवर गुदरलेल्या प्राणघातक प्रसंगातून सहीसलामत सुटलेले वाहक महेंद्र घुळे "सकाळ'शी बोलत होते.

पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे स्वतःचा आणि अन्य प्रवाशांचा जीव वाचल्याची भावना त्यांच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत होती. अंधेरी येथून सहवाहक शिवाजी बोऱ्हाडे आणि चालक ऐनुलहसन खान यांच्यासोबत घुळे डेकवरील वाहकाचे काम करीत होते.

पोलिस चकमकीत मारला गेलेला राहुल राज कुंदप्रसाद सिंग साकीनाका येथे बसमध्ये चढला. डेकवर दरवाजाला लागून असलेल्या लेडीज सीटवर तो बसला. त्याच्या पुढच्याच सीटवर आपण बसलो होतो. राहुलकडे तिकीट मागितल्यानंतर त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही. त्याच्याकडे पास असावा असे वाटल्याने पुन्हा त्याच्याकडे तिकिटाबाबत विचारणा केली नाही. दिवाळीची सुट्टी असल्याने बसमध्ये त्या मानाने आज प्रवाशांची तशी गर्दी नव्हती. बैलबाजारात बस आली तेव्हा वर बसलेल्या अवघ्या बारा प्रवाशांपैकी बरेचसे प्रवासी उतरले; मात्र त्यानंतर झालेला थरार कधीही विसरता येणार नाही, असे धुळे यांनी सांगितले. डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावल्यानंतर त्याने आपल्याला मारहाणही केली. "मला अन्य कोणालाच मारायचे नाही, मी फक्त राज ठाकरेला मारायला आलो आहे,' असे तो ओरडून सांगत होता. त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर पाहून बसमधील प्रवासी आणि आपल्याही अंगाचा थरकाप उडाल्याचे घुळे यांनी सांगितले.

--------------

"अंधेरीहून निघालेली बस कुर्ला बैलबाजार परिसरात आली, तशी डेकवर आरडाओरड सुरू झाली. क्षणभर काय घडतंय तेच कळेना. नेहमीसारखी तिकिटावरून भानगड झाली असावी, असे वाटल्याने थोडे दुर्लक्ष केले. कुर्ला बसस्थानकाकडे धावणाऱ्या या डबलडेकर बसमध्ये खाली बसलेल्या प्रवाशांच्या तिकिटांचे बुकिंग करीत असताना वरचा आवाज आणखीनच वाढला. वर काय चाललंय याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला तोच एक रिव्हॉल्व्हरधारी तरुण नजरेस पडला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा प्रकार लगेचच बसचालकाच्या कानावर घातला. बैलबाजारात वळणावरच विनोबा भावेनगर पोलिस ठाण्याची पोलिस बीट चौकी असल्याने तेथेच गाडी थांबवून थेट पोलिसांकडे धाव घ्यायची, असा निर्णय झाला. डेकवर आरडाओरड सुरूच होती. डेकवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अशी प्रार्थना मनोमन देवाला करीत होतो. महापालिकेच्या बाजार वॉर्ड या रुग्णालयाजवळ बसचालकाने बस थांबविली, तसे दोघेही रस्ता ओलांडून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर असलेल्या पोलिस चौकीकडे धावत गेलो आणि रिव्हॉल्व्हरने सहवाहक आणि प्रवाशांना धमकावणाऱ्या "त्या' माथेफिरू तरुणाची माहिती पोलिसांना दिली.'

-शिवाजी बोऱ्हाडे (बेस्ट बसवाहक)

-----------
चकमकीची चौकशी

कुर्ला येथे झालेली पोलिस चकमक त्या वेळच्या परिस्थितीनुसार योग्यच होती, मात्र या चकमकीची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सदानंद दाते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलिस चकमकीत ठार झालेल्या राहुलकडून पोलिसांनी देशी कट्टा हस्तगत केला आहे. पोलिसांवर राहुलने चार; तर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्यावर तेरा गोळ्या झाडल्या. काल सकाळी अंधेरीच्या इम्पिरिअल हॉटेलमध्ये उतरलेल्या राहुलकडे सापडलेल्या देशी कट्ट्याचादेखील तपास केला जाणार आहे. तो थांबलेल्या हॉटेलमध्ये काही शैक्षणिक कागदपत्रे सापडल्याचेही दाते या वेळी म्हणाले.

-------------


बेस्टवाहकांना बक्षीस

बैलबाजार येथे झालेल्या चकमकीपूर्वी प्रसंगावधान राखून काम करणाऱ्या बेस्टच्या शिवाजी बोऱ्हाडे व महेंद्र धुळे या दोघा बसवाहकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती "बेस्ट'चे महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांनी दिली. याशिवाय चकमकीत जखमी झालेल्या मनोज भगत या प्रवाशालाही बेस्टच्या विमा नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे खोब्रागडे यांनी या वेळी सांगितले. बसचालक ए. एच. खान यांना बेस्टकडून शौर्य पुरस्कार देण्याची मागणी बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण छेडा यांनी केली आहे.

माथेफिरू ठार , बेस्टमध्ये थरारनाट्य : राज ठाकरे टार्गेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 : रिव्हॉल्व्हरच्या धाकाने कंडक्‍टरला धमकावून बेस्टमधील प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या एका उत्तर भारतीय माथेफिरू तरुणाचा पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाईत आज सकाळी कुर्ला बैलबाजार येथे मृत्यू झाला. या माथेफिरू तरुणाने केलेल्या गोळीबारात एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा तरुण पाटण्याहून मुंबईत आला होता आणि आपण राज ठाकरे यांची हत्या करण्यासाठी आल्याचे ओरडून सांगत होता, असे पोलिसांनी सांगितले. राहुल राज कुंदप्रसाद सिंग (23) असे त्याचे नाव आहे. एखाद्या चित्रपटात शोभावे असे हे थरारनाट्य अंधेरी ते कुर्ला दरम्यान धावणाऱ्या बेस्टच्या 332 क्रमांकाच्या डबलडेकर बसमध्ये आज सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी घडले.

पाटण्याच्या करमकोन येथील अरविंद लेडीज कॉलेज परिसरात राहणारा राहुल दोनच दिवसांपूर्वी पाटणा येथून मुंबईत आला होता. आज सकाळी 332 क्रमांकाच्या बसच्या वरच्या डेकमध्ये साकीनाका येथे तो बसला. सकाळची वेळ असली तरी या बसच्या वरील डेकमध्ये अवघे बारा प्रवासी होते. यानंतर अचानक राहुलने बसमधील कंडक्‍टरच्या डोक्‍याला त्याच्याकडे असलेले रिव्हॉल्व्हर लावून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. डोक्‍याला रिव्हॉल्व्हर लावलेल्या कंडक्‍टरला बसच्या वरील भागात फिरवून प्रवाशांकडून त्याने मोबाईलची मागणी करायला सुरुवात केली. डेकवर अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे खाली असलेल्या कंडक्‍टरने बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार आणला. चालकाने महापालिकेच्या रुग्णालयाजवळ बस थांबवून जवळच असलेल्या विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या बैलबाजार बीट पोलिस चौकीत धाव घेतली. या विभागाचे सहायक पोलिस आयुक्त महम्मद जावेद यांनी तातडीने हवालदार संपत साठे यांना घडलेला प्रकार पाहण्यासाठी बेस्ट बसकडे पाठविले. तोच राहुलने साठे यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने साठे बचावले. तत्पूर्वी वरच्या डेकमध्ये बसलेला प्रवासी व कंडक्‍टर यांनी बसमधून खाली पळ काढला. तोपर्यंत या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहम्मद जावेद व त्यांच्या पथकाने रुग्णालयाच्या बाजूने बसमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी त्याला शस्त्र खाली टाकून पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितले, मात्र त्याने पोलिसांवरच गोळीबार करायला सुरुवात केली. त्याने झाडलेली एक गोळी मनोज महेंद्र भगत (25, रा. मोहिली गाव, साकीनाका) या प्रवाशाच्या मांडीत घुसली. यानंतर पोलिसांनी राहुलवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गोळीबारात जखमी झालेल्या मनो
ज या प्रवाशावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सहायक पोलिस आयुक्त मोहम्मद जावेद यांनी सांगितले.

Sunday, October 26, 2008

फटाके महागले; तरीही खरेदीसाठी झुंबड

शोभेच्या फटाक्‍यांना सर्वाधिक मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 23 ः अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असतानाच "चंदेरी तेजाची न्यारी दुनिया' दाखविणाऱ्या फटाक्‍यांच्या बाजारपेठेतील उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. दरवर्षीपेक्षा फटाक्‍यांच्या दरांत यंदा वीस टक्‍क्‍यांनी वाढ झालेली असली, तरी फटाक्‍यांच्या दुकानांवर खरेदीदारांची मोठी झुंबड उडत असल्याचे चित्र सध्या बाजारात आहे. मोठा आवाज करणाऱ्या फटाक्‍यांपेक्षा शोभेचे फटाके घेण्याकडे ग्राहकांचा विशेष कल असल्याचे फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दीपोत्सवाचे कुतूहल आबालवृद्धांपासून साऱ्यांनाच आहे. या सणाच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभरापूर्वीपासूनच मुंबापुरीतील बाजारांत जय्यत तयारी सुरू झाली. फुले, मिठाई, सुका मेवा, कंदील, पणत्या, सोने-चांदी व हिरे मोत्यांच्या बाजारपेठांपासून कपड्यांच्या बाजारापर्यंत सगळ्याच बाजारपेठांनी ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक मोडला आहे. दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असलेला फटाक्‍यांचा बाजारदेखील या गर्दीपासून तसूभरही मागे नाही. प्रकाशाचा सण असा गौरव होणाऱ्या या सणानिमित्त गेल्या काही दिवसांत फटाक्‍यांच्या खरेदीला चांगलेच उधाण आले आहे. मुंबईत फटाके विक्रीचा अधिकृत परवाना असलेली पाचशेहून अधिक दुकाने आहेत. मुंबईत येणाऱ्या फटाक्‍यांत 90 टक्के फटाके शिवकाशी, तर 10 टक्के फटाके जळगाव, सोलापूर व कोल्हापूर येथून येतात. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या फटाक्‍यांमध्ये फुलबाज्या, भुईनळे, पाऊस, रॉकेट, फटाक्‍यांच्या माळा, लवंगी फटाके, तडतडी, विविध रंगांची उधळ करणाऱ्या शोभेच्या फटाक्‍यांचा समावेश आहे. लक्ष्मी बॉम्ब, डबलबार, कलर शॉट्‌ससारख्या दमदार व चांगल्या दर्जाच्या फटाक्‍यांकरिता ग्राहक दक्षिणेतील शिवकाशीच्या फटाक्‍यांना पसंती दाखवीत असल्याचे चित्र आहे. दिवाळीला अवघे तीन दिवस उरले असताना भेंडीबाजारातील मोहम्मद अली रोड, दादर, कुर्ला, अंधेरी, वांद्रे, बोरिवली या ठिकाणी असलेल्या फटाक्‍यांच्या बाजारांत ग्राहकांची तुफान गर्दी होत आहे. मुंबईतील सर्वाधिक मोठी फटाक्‍यांची बाजारपेठ असलेल्या महम्मद अली रोड येथे खरेदीला येणाऱ्या महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करता काही फटाके विक्रेत्यांनी त्यांच्याकरिता विशेष काऊंटर उघडले आहेत. यंदा बाजारात नवे फटाके आले नसले, तरी परंपरागत फटाके घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. विशेषतः लहान मुलांना आनंद होईल, अशा प्रकारच
े फटाके घेण्यात ग्राहक आघाडीवर असल्याचे "इसाभाई फायर वर्क्‍स' या कंपनीचे मालक अब्दुल्ला घिया यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघांना अटक

मालेगाव बॉम्बस्फोट ः अन्य आरोपींचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 24 ः मालेगाव येथे 29 सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पाच जणांचे बळी घेणाऱ्या या बॉम्बस्फोटांसाठी आरडीएक्‍सचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध सुरू असून, मालेगावमध्येच 2006 मध्ये झालेल्या स्फोटांत त्यांचा कोणताही संबंध अद्याप उघडकीस आला नसल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे सह आयुक्त हेमंत करकरे यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना दिली.
रमझानच्या पवित्र महिन्यात मालेगाव आणि गुजरातच्या मोडासा येथे मशिदींबाहेर बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये सहा मुस्लिम तरुणांचा बळी गेला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबईतून प्रज्ञासिंग चंदपालसिंग ठाकूर ऊर्फ पूर्णचेतनानंद गिरी (वय 38) या साध्वीसह शिवनारायण गोपाल सिंग कलासांगरा (36) आणि श्‍याम भवरलाल साहू (42) यांना अटक केली. मालेगाव स्फोटांत वापरण्यात आलेली एलएमएल फ्रिडम ही मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंग हिच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील लहेर गावची राहणारी प्रज्ञासिंग 2001 मध्ये सुरतला कुटुंबासह स्थालांतरित झाली. 2002 मध्ये तिने जय वंदेमातरम जन कल्याण समिती नावाची संस्था सुरू केली. यानंतर जानेवारी- 2007 मध्ये संन्यास घेऊन ती भारत भ्रमण करीत असतानाच शिवनारायण कलासांगरा व श्‍याम साहू यांच्यासोबतीने तिने मालेगाव स्फोटांचा कट रचला. शिवनारायण इलेक्‍ट्रीक कॉन्ट्रॅक्‍टरचा व्यवसाय करतो; तर श्‍याम साहू याचे मोबाईलचे दुकान आहे. या तिघांचा संबंध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी असल्याची कबुली त्यांनी जबाबात दिली आहे. मात्र पोलिस ही बाब तपासून पाहत असल्याची माहिती करकरे यांनी दिली. या स्फोटांसंबंधी फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आला असून, बॉम्बमध्ये बॉलबेअरिंग, खिळे, अमोनिअम नायट्रेट यांच्यासह आरडीएक्‍सचा वापर झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. या तिघांचा संबंध इंदूर येथील राष्ट्रीय जागरण मंच या हिंदुत्ववादी संघटनेशीदेखील आहे. आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल फोन, हॅन्डबिल्स तसेच साहित्य जप्त केले असून, त्यांना आज नाशिक येथील न्यायालयाने 3 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याचे करकरे यांनी या वेळी सांगितले.

मालेगाव बॉम्बस्फोटांमागे हिंदू संघटना?

खुलासा लवकरच : पोलिस अधिकाऱ्यांचा दुजोरा नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 23 ः सहा निष्पाप मुस्लिम तरुणांचे बळी घेणाऱ्या मालेगाव व गुजरातच्या मोडासा येथील बॉम्बस्फोटांमागे हिंदू संघटनांचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यासंबंधी काहीही बोलण्यास नकार दिला. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असून सगळ्या शक्‍यतांचा अभ्यास करण्यात येत असल्याचे "सकाळ'शी बोलताना सांगितले.
रमझानच्या पवित्र महिन्यात 29 सप्टेंबर रोजी मालेगाव व गुजरातच्या मोडासा येथे मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाले. मालेगाव येथील स्फोटांत पाच; तर मोडासा येथे एकाचा मृत्यू झाला. मालेगाव येथील स्फोटांचा तपास नाशिक पोलिसांच्या मदतीने दहशतवाद विरोधी पथकाकडून करण्यात येत आहे. तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून या दोन्ही स्फोटांमागे इंदूर येथील हिंदू जनजागरण मंच व भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हात असल्याचा दावा करण्यात आला. मालेगाव येथे मशिदीबाहेर एलएमएल फ्रीडम मोटारसायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. जवळच सिमीचे कार्यालयदेखील असल्याने या स्फोटांमागे सिमी अथवा इंडियन मुजाहिदीनचा हात असण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत होती; मात्र या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना या स्फोटांमागे हिंदू संघटनाच असल्याचे धागेदोरे सापडल्याचा दावा केला जात आहे. स्फोटांत हिंदू संघटनांचा हात असल्याचे पहिल्यांदाच स्पष्ट झाल्यामुळे संसदेतही प्रचंड गदारोळ झाला.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने मात्र याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. याबाबत प्रसिद्धिमाध्यमांना योग्य वेळी माहिती देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुखविंदर सिंग यांनी दिली. मालेगाव व मोडासा येथील अतिरेकी कारवायांत हिंदू संघटनांच्या असलेल्या सहभागाबाबत राज्याचे पोलिस महासंचालक यांच्याकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भेट नाकारली; मात्र राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यांनी याबाबत तपास सुरू असून लगेचच काहीही वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे म्हटले. तपासात सर्वच शक्‍यता गृहीत धरण्यात आल्याचेही ते या वेळी म्हणाले. याबाबत लवकरच योग्य तो खुलासा होण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

चौकट

स्फोटांमागे हिंदू संघटना
-------------------------------
मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांसोबत केलेल्या कारवाईत तिघा संशयितांना अटक केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. श्‍याम दयाल, दिलीप नाहर आणि धर्मेंद्र बैरागी अशी या आरोपींची नावे आहेत. 19 ऑक्‍टोबरला या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून आज त्यांना मुंबईत आणण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

राज्यभरात एसटीच्या 305 बसेसची तोडफोड

मनसेचा उद्रेक : 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 22 ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनात संतप्त जमावाने राज्य परिवहन उपक्रमाच्या 305 बसेसची तोडफोड केली; तर चार बसेस जाळल्या. हिंसाचाराच्या या घटनांत परिवहन उपक्रमाचे 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उपक्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
कोकण दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना चेतना महाविद्यालयात परप्रांतीयांना झालेल्या मारहाणप्रकरणी मुंबई पोलिसांनी 21 ऑक्‍टोबरला पहाटे अटक केली. या अटकेचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रात उमटले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि जाळपोळ झाली. यात सर्वप्रथम "लक्ष्य' नेहमीप्रमाणेच राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेसना करण्यात आले. समाजकंटकांनी राज्यात सर्वत्र केलेल्या या तोडफोडीत तब्बल 305 बसेसची तोडफोड झाली. याशिवाय कल्याण, बार्शी, जालना व औरंगाबाद या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या राज्य परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवाशांना खाली उतरवून संतप्त जमावाने त्या पेटवून दिल्या. तोडफोडीच्या घटनांत आंदोलकांनी बसेसच्या पुढच्या, मागच्या; तसेच खिडक्‍यांच्या काचा फोडण्याच्या घटना सर्वाधिक आहेत. हिंसाचाराच्या या घटनांत राज्य परिवहन उपक्रमाचे तब्बल 32 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जाळपोळ आणि तोडफोडीच्या या प्रकारांत सामान्य प्रवाशांना कोणतीही गंभीर इजा झालेली नसल्याचेही राज्य परिवहन उपक्रमाचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.
-----------------------
राजकीय पक्षांना आवाहन
राज्यभरात उसळणाऱ्या दंगली; तसेच अनुचित प्रकारांचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन उपक्रमाला बसतो. सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या परिवहन उपक्रमाला पुरेशी सेवा देता येत नाही. उपक्रमाला होणारे हे नुकसान टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांच्या आंदोलनांत बसेसची तोडफोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचे पत्र उपक्रमाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी सर्व पक्षांना काही दिवसांपूर्वी दिल्याची माहितीही जनसंपर्क अधिकारी धस यांनी या वेळी दिली.

असेल मुंबई प्यारी तर हाकला बिहारी...

तरुणाईची प्रतिक्रिया : राज्यभर एसएमएसचा धडाका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 22 ः "वाजली तुतारी, करा तयारी... असेल मुंबई प्यारी तर हाकला बिहारी... मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र मराठ्यांचा... जागे व्हा आता तरी खूप झाली दादागिरी... पाठवा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला... मराठी माणसाला...!' मराठी मनामनात चैतन्य निर्माण करणारे असे कितीतरी एसएमएस मराठी तरुण-तरुणींच्या मोबाईलवर धडकत होते. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील मराठी तरुणाईत उसळलेल्या नाराजीचे. थोरामोठ्यांत मराठी अस्मितेची जाणीव करून देणाऱ्या या एसएमएसमुळे मोबाईल कंपन्यांच्या एसएमएस सेवेचाही गेले दोन दिवस पुरता बोजवारा उडाला.
रत्नागिरी दौऱ्यावर असताना 21 तारखेला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाली. मराठीचा मुद्दा घेऊन राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या अटकेनंतर साहजिकच सर्वसामान्य मनसे कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळून, त्याचे पर्यवसान ठिकठिकाणी तोडफोडीत झाले. राज यांच्यावरील कारवाईचे तीव्र पडसाद संसदेसह सर्वत्र उमटत असतानाच मराठी तरुणाईनेही या सगळ्या प्रक्रियेचा ठाव घेतला. मराठी माणसाच्या हितासाठीच हे "राज'कारण असल्याचे सांगणारे असंख्य एसएमएस मराठी तरुणांच्या मोबाईलवर गेले दोन दिवस सातत्याने येत होते. "ना शाप आहे, ना पाप आहे, महाराष्ट्राला यूपी-बिहारींचा ताप आहे. काळजी करू नको मराठी माणसा, राज ठाकरे त्यांचा बाप आहे.', "इंडिया मे एक ताज है, महाराष्ट्र में आये भय्या को बहुत माज है, मराठों के लिए एक राज है, जिसपर हम मराठीओंको बडा नाज है, जय महाराष्ट्र..!' असे एक ना अनेक एसएमएस मोबाईलवरून ओळखीच्या लोकांना तसेच मित्रांना "फॉरवर्ड' करण्यात मराठी तरुणाई आघाडीवर होती. सरकारी कचेऱ्यांत काम करणाऱ्या मराठमोळ्या कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या एसएमएसची चांगलीच चलती होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर राज्यभर विविध ठिकाणी रस्त्यांवर उतरलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी भले ट्रॅफिक जॅम केले; मात्र मराठी माणसाला त्याच्या न्यायिक हक्कांकरिता पेटून उठण्याचा संदेश देणाऱ्या अशा एसएमएसनी राज्यभरात मोबाईल कंपन्यांच्या एसएमएस सुविधांचे ट्रॅफिकही गेले दोन दिवस जॅम केल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.

राज ठाकरे अटक

20 october arrest of mns chief raj thakre.
घटनाक्रम
- पहाटे 2.30 वा. - राज ठाकरे यांना अटक.
- सकाळी 9.00 वा. - वांद्रे न्यायालयाच्या आवारात राजसमर्थक जमायला सुरुवात.
- सकाळी 11.30 वा. - वैद्यकीय चाचणीसाठी राज ठाकरे यांना बीकेसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
- दुपारी 1.15 वा. - न्यायालयाबाहेर मनसे व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने. पोलिसांनी जमाव हटविला.
- दुपारी 1.35 वा. - विशेष सरकारी वकील माजिद मेमन व रोहिणी सालियन न्यायालयात दाखल.
- दुपारी 1.54 वा. - राज्य राखीव पोलिस दल तैनात.
- दुपारी 2.23 वा. - दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल. पोलिसांवर तुफान दगडफेक, जमावावर लाठीचार्ज.
- दुपारी 2.30 वा. - पश्‍चिम द्रुतगती महामार्ग अडविणाऱ्या जमावावर अश्रूधुराचा मारा.
- दुपारी 2.35 वा. - शीघ्र कृती दलाचे जवान पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर तैनात. जमाव हटविण्याकरिता बळाच्या प्रयोगाचे आदेश.
- दुपारी 2.39 वा. - मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोलिसांच्या गाडीतून न्यायालयात दाखल, तत्पूर्वी न्यायालय परिसर रिकामा केला.
- दुपारी 3.40 वा. - राज यांच्याबाबत वांद्रे न्यायालयाची सुनावणी.
- दुपारी 4.25 वा. - ठाणे पोलिसांनी ताबा घेतलेल्या राज यांना घेऊन पोलिस डोंबिवलीकडे रवाना.



राज यांच्यावर 20 डिसेंबरपर्यंत भाषणबंदी
पोलिसांचे आदेश : पत्रकार परिषदही घेता येणार नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 21 ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर येत्या 20 डिसेंबरपर्यंत भाषणबंदी आणणारा आदेश पोलिसांनी दिला आहे. राज यांनी मोर्चे, धरणे, निदर्शने तसेच पत्रकार परिषदांत सहभाग घेऊ नये, जातीय तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक विधाने करू नयेत अथवा त्याकरिता त्यांनी मुंबईत फिरूही नये, असे या आदेशात म्हटले आहे.
रत्नागिरी दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात परप्रांतीयांना केलेल्या मारहाणप्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भाषणबंदीचे आदेश काढले. या आदेशानुसार 20 डिसेंबरपर्यंत राज यांना पक्षाध्यक्ष म्हणून कोणत्याही वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांना मुलाखती अथवा निवेदने देता येणार नाहीत. तसेच सार्वजनिक मालमत्तेला नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करण्यावर बंदी घालण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त (अभियान) अमर जाधव यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या अटकेनंतर शहरात लहान-मोठे असे 60 अनुचित प्रकार घडले. याप्रकरणी 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून एक हजार जणांना अटक करण्यात आली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये याकरिता राज्य राखीव पोलिस दलाच्या 25 प्लाटून, 2 कंपनी, 1 रॅपिड ऍक्‍शन फोर्सची कंपनी तसेच उपलब्ध असलेले संपूर्ण पोलिस बळ ठिकठिकाणी बंदोबस्ताकरिता ठेवण्यात आले होते. वांद्रे वगळता शहरात कुठेच गटागटाने हिंसाचाराच्या घटना घडल्या नसल्याचेही जाधव यांनी या वेळी सांगितले.

Saturday, October 18, 2008

दहशतवाद्यांच्या कार्यशैलीची पोलिसांना ओळख

नवी योजना : अटकेतील अतिरेक्‍यांशी होणार संवाद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 17 ः अतिरेक्‍यांची मानसिकता, त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, कार्यपद्धती; तसेच तपासकामात पोलिसांना फसविण्याची पद्धत या बाबींची माहिती तळागाळातील पोलिसांना होऊन दहशतवादी कारवायांना जरब बसावी यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या "इंडियन मुजाहिदीन'च्या अतिरेक्‍यांशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पुणे येथील सर्व पोलिस उपायुक्तांना संवाद साधता येणार आहे. अतिरेकी कारवाया व त्यांच्या योजनांचा अभ्यास करून त्याबाबतची माहिती हे अधिकारी त्यांच्या खालोखाल असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी गुन्हे शाखेच्या या प्रस्तावाला होकार दर्शविला असून येत्या काही दिवसांतच या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याचे मारिया यांनी सांगितले. यापुढील कालावधीत या उपक्रमात ठाणे, नवी मुंबई व पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सहभागी करून घेतले जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांत देशभरात घातपाती कारवाया करणाऱ्या "इंडियन मुजाहिदीन'च्या वीस अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देशभर छापे घालून अटक केली. या अतिरेक्‍यांत नऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर, एक मेकॅनिकल इंजिनिअर अशा उच्चशिक्षित तरुणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या अतिरेक्‍यांचा सूत्रधार रियाज भटकळ स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे. या अतिरेक्‍यांनी देशभर स्फोट घडविण्यासाठी दरवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. सुरतसारख्या ठिकाणी स्फोटांकरिता डिजिटल टायमरदेखील वापरण्यात आले. गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त असणाऱ्या राकेश मारिया यांनीच 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा छडा लावला होता.

दहशतवाद्यांच्या बदलत्या कार्यशैलीची माहिती सर्वसाधारण पोलिसांना व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दहशतवादाविरुद्ध लढण्याचे काम फक्त दहशतवाद विरोधी पथकाचेच नाही; तर सर्वसामान्य पोलिस व नागरिकांचा देखील या लढाईत सहभाग अपेक्षित आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईतील सर्व पोलिस उपायुक्तांना अटक केलेल्या या अतिरेक्‍यांशी संवाद साधता येणार आहे. या अधिकाऱ्यांना अतिरेक्‍यांच्या कार्यपद्धतीची इत्थंभूत माहिती व्हावी याकरिता तपासादरम्यान त्यांना अतिरेक्‍यांची चौकशी करता येईल. अतिरेक्‍यांकडून मिळालेली ही माहिती अभ्यासून सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पुढे शेवटच्या थरात असलेल्या साध्या पोलिस शिपायाला देखील या अतिरेकी कारवायांबाबत प्रशिक्षित करण्याची योजना आहे.

इन्फोबॉक्‍स....

दहशतवादाचा बदलता चेहरा
गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत अतिरेकी आणि त्यांच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांत अशिक्षित अथवा कमी शिकलेल्या अतिरेक्‍यांचा सहभाग जास्त होता. 2006 मध्ये झालेल्या उपनगरी रेल्वेतील बॉम्बस्फोट मालिकांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वापर झाला. इंडियन मुजाहिदीनच्या अटक केलेल्या वीस अतिरेक्‍यांनंतर गेल्या तीन वर्षांत दहशतवादी व त्यांच्या कारवायांचा बदलता चेहरा समोर आला आहे.

Friday, October 17, 2008

दहशतवादी देत होते पगारातील 10 टक्के रक्कम

राकेश मारिया ः धार्मिक काम करीत असल्याचा समज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 16 ः बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगारावर काम करणारे इंडियन मुजाहिदीनचे दशहतवादी ते करीत असलेले काम धार्मिक असल्याचे समजत आहेत. संघटनेचा थिंक टॅंक तसेच देशभरातील बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाज भटकळ त्यासाठी मासिक पगारातील दहा टक्के रक्कम देत होते, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांना सांगितले.
तीन वर्षांत देशभरात घातपात घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या 20 कडव्या दहशतवाद्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देशभर छापे घालून अटक केली. या दशहतवाद्यांमध्ये इंडियन मुजाहिदीनच्या मीडिया विंगमध्ये काम करणाऱ्या तीन संगणकतज्ज्ञांसह नऊ कॉम्प्युटर इंजिनिअर व एका मेकॅनिकल इंजिनिअरचा समावेश आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांत उच्चपदस्थ असलेल्या या दहशतवाद्यांना वार्षिक लाखो रुपयांच्या पगाराचे पॅकेज होते. याहू इंडियासारख्या कंपनीत प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या पुण्यातील मोहम्मद मन्सूर असगर पिरबॉय या संगणकतज्ज्ञाला वार्षिक 19 लाख रुपये पगार मिळत होता. महिन्याअखेरीस अतिशय चांगला पगार घेणाऱ्या या दहशतवाद्यांना बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाज भटकळ ऊर्फ रोशन खान याने धर्माच्या नावाने चांगलेच बनविल्याचे अटक केलेल्यांच्या चौकशीत उघडकीस येत आहे. आपण करीत असलेले काम धार्मिक असल्याने त्याकरिता मासिक दहा टक्के रक्कम बाजूला काढून ठेवण्यास रियाजने त्यांना सुचविले होते. गरिबी असल्याने धार्मिक कार्यासाठी आपण प्रसंगी फूटपाथ व मशिदीत राहत असल्याचेही रियाजने त्यांना सांगितले होते. रियाजच्या सांगण्यावरून हे उच्चपदस्थ महिन्याच्या शेवटी त्याला एकूण पगारातील दहा टक्के रक्कम देत असत. त्यांच्याकडून आलेल्या पैशांचा वापर रियाज स्वतःसाठी करीत असे. याच पैशांच्या मदतीने त्याने मंगळूर येथील सुभाषनगर परिसरात बांधकाम व्यवसाय सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुभाषनगर येथील त्याच्या घरात छापा घातला तेव्हा त्याचे आलिशान घर पाहून पोलिसही चाट पडले होते. धर्माच्या नावे रियाजने आपल्याला फसविल्याची भावनादेखील या अतिरेक्‍यांमध्ये येत असल्याचे सह पोलिस आयुक्त मारिया यांनी या वेळी पत्रकारांना सांगितले. पुण्याच्या कोंढवा ख
ुर्द येथील अशोका म्युज इमारतीतून पोलिसांना सापडलेल्या औषधसाठ्याचा वापर अतिरेकी बिल्डर व ज्वेलर्सच्या अपहरणासाठी करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दोघांचे अपहरण करून दोन ते पाच कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा अतिरेक्‍यांचा डाव होता, अशी माहितीही पुढे आली आहे. पुण्यातून अटक केलेल्या अतिरेक्‍यांपैकी मोहम्मद अतिक इक्‍बाल याने भूल देणाऱ्या या औषधांची चाचणी मोहम्मद अकबर चौधरी आणि माजीद शेख यांच्यावर केली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या चाचणीमुळे दोघेही तीन तासांहून अधिक काळ बेशुद्ध झाले होते. बिल्डर व ज्वेलरच्या अपहरणासाठी स्कॉर्पिओ गाडी वापरण्यात येणार होती; मात्र त्यापूर्वीच त्यांना अटक झाल्याचे मारिया यांनी सांगितले.

Tuesday, October 14, 2008

अतिरेकी करणार होते पुण्यातील बिल्डर्स, ज्वेलर्सचे अपहरण

खंडणीची पूर्वतयारी : भूल आणणाऱ्या औषधांमागचे गमक उघडकीस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 13 ः गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्‍यांकडून जप्त केलेल्या भूल आणणाऱ्या औषधांच्या साठ्यामागचे गमक उघडकीस आले आहे. या औषधसाठ्याचा उपयोग पुण्यातील प्रतिष्ठित बिल्डर आणि ज्वेलर्सचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागण्यासाठी करण्यात येणार होता, अशी माहिती या अतिरेक्‍यांच्या चौकशीत स्पष्ट झाल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. खंडणीतून येणारा पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरण्यात येणार होता, असेही ते या वेळी म्हणाले.

सिमीपासून वेगळे होऊन गेल्या तीन वर्षांत देशभर घातपात घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. इंडियन मुजाहिदीनची मीडिया विंग संभाळणाऱ्या तीन संगणकतज्ज्ञांसह पाच अतिरेक्‍यांना पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील अशोका म्युज इमारतीतून अटक करण्यात आली. या वेळी पोलिसांना कॅटामाईनसारख्या भूल येणाऱ्या औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा सापडला होता. या औषधसाठ्यासंबंधी अतिरक्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी या औषधसाठ्याच्या मदतीने पुण्यातील प्रतिष्ठित बिल्डर व ज्वेलर्सच्या अपहरणाची कबुली दिली. अपहृतांना अशोका म्युजमधील कंट्रोल रूममध्ये ठेवण्यात येणार होते. तेथे त्यांना या औषधांची भूल देऊन त्यांच्या नातेवाईकांकडून खंडणी उकळण्यात येणार होती. त्यासाठी या अतिरेक्‍यांनी जानेवारीमध्येच काही बिल्डर्सच्या कार्यालयांची तसेच ज्वेलर्सच्या दुकानांची टेहळणीदेखील केली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे.

गेल्या तीन वर्षांत देशभरात झालेल्या स्फोटांचा सूत्रधार रियाज भटकळ याने इंडियन मुजाहिदीनला अतिरेकी कारवायांकरिता पैसा उभा करण्यासाठी ही शक्कल लढविल्याचे सह पोलिस आयुक्त मारिया यांनी सांगितले. इंडियन मुजाहिदीनचा मुख्य नियंत्रक आमीर रझा याच्या संपर्कात असलेला अफताब अन्सारी याने पश्‍चिम बंगालमध्ये अशी पद्धत राबविली होती. इंडियन मुजाहिदीनचे आर्थिक स्रोत तपासण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक काम करीत असल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.

------------

अतिरेक्‍यांचा "राजधानी'तून प्रवास
अहमदाबादला 26 जुलै रोजी बॉम्बस्फोट घडविण्यासाठी इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांनी राजधानी एक्‍स्प्रेसमध्ये आरक्षण केले होते. आठ प्रवाशांसाठीचे हे आरक्षण निजामुद्दीन रेल्वेस्थानकातून 24 जुलैला करण्यात आले. दिल्ली ते अहमदाबाद 24 जुलै रोजी गेलेले हे अतिरेकी स्फोट घडविल्यानंतर 26 जुलैला आधीच आरक्षित असलेल्या राजधानी एक्‍स्प्रेसच्या डब्यांत बसून अहमदाबाद ते दिल्ली असे परतले होते. यात दिल्लीच्या जामियानगर येथे पोलिसांसोबत झालेल्या एन्काऊंटरमधील अतिरेक्‍यांचाही समावेश होता, अशी माहिती आज गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Monday, October 13, 2008

... त्यामुळे दिल्ली स्फोटांच्या ई-मेलला झाला विलंब

राकेश मारिया ः गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे "ते' पोचू शकले नाहीत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः बॉम्बस्फोटांच्या धमकीचे ई-मेल पाठविण्याकरिता पुण्याहून निघणारे "इंडियन मुजाहिदीन'च्या मीडिया विंग मधील अतिरेकी त्यांना दिलेल्या वेळेत ई-मेल पाठविण्यात कसलीच अडचण येऊ नये, यासाठी सोबत दोन लॅपटॉप घेऊन येत. मात्र, दिल्ली बॉम्बस्फोटांच्या धमकीचा मजकूर असलेला ई-मेल पाठविताना या अतिरेक्‍यांना गणेशोत्सवात भाविकांच्या झालेल्या गर्दीमुळे उशीर झाला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया आज पत्रकारांना दिली.
"इंडियन मुजाहिदीन'च्या अटक केलेल्या अतिरेक्‍यांपैकी मीडिया विंगमध्ये असलेला संगणकतज्ज्ञ मोहम्मद मन्सूर पीरभॉय व त्याचे तिघे साथीदार बॉम्बस्फोटांपूर्वी धमकीचे ई-मेल पाठवीत. इंटरनेट राऊटरच्या मदतीने वायफाय कनेक्‍शनवरून हे धमकीचे ई-मेल पाठविले जात. 26 जुलै रोजी अहमदाबाद बॉम्बस्फोटांचा ई-मेल सानपाड्याच्या गुनानी इमारतीखाली उभे राहून पाठविणारा पीरभॉय दिल्ली बॉम्बस्फोट मालिकांच्या वेळी ई-मेल पाठविण्याकरिता त्याच्या तीन साथीदारांसोबत पुण्याहून निघाला होता. चेंबूरच्या "कमानी इंडस्ट्रीज'च्या कॉम्प्युटरवरून हा ई-मेल इंटरनेट राऊटरच्या मदतीने वायफाय जोडणीद्वारे पाठविला जाणार होता. सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी हा ई-मेल पाठविण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती; मात्र त्या दिवशी चेंबूर परिसरात गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने कमानी इंडस्ट्रीजच्या कार्यालयाजवळ जायला त्यांना बराच वेळ लागला. परिणामी दिल्लीत बॉम्बस्फोट सुरू असताना हे ई-मेल पाठविले गेल्याचे राकेश मारिया यांनी सांगितले.
बॉम्बस्फोट घडविण्यासाठी लागणारी स्फोटके रियाज भटकळचा विश्‍वासू साथीदार सय्यद नौशाद अतिरेक्‍यांना पुरवीत असे. हैदराबाद वगळता अहमदाबाद, सुरत व दिल्ली येथे झालेल्या स्फोटांसाठी लागणारी स्फोटके घेण्यासाठी अतिरेकी मंगळूर येथे गेले होते, अशी माहितीही मारिया यांनी या वेळी दिली.
---------------------

चौकट
------
पुण्याचा निष्णात संगणकतज्ज्ञ मोहम्मद मन्सूर पीरभॉय याला जेहादी प्रशिक्षण देण्याचे काम 2004 मध्ये सुरू झाले. एका अरेबिक क्‍लासमध्ये कुराणचा अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या पीरभॉयला अतिरेकी कारवाया करण्यास प्रवृत्त करण्याकरिता आसिफ बशीर शेख प्रयत्नात होता. 2006 मध्ये पीरभॉयने या कारवायांत सहभाग घेण्यात रस दाखविल्यानंतरच त्याला रियाज भटकळकडे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले.

इंडियन मुजाहिदीन'च्या अतिरेक्‍यांना "आयएसआय'कडून अर्थपुरवठा

घातपाती कारवाया : "लष्कर-ए-तैय्यबा'कडून प्रशिक्षण

ज्ञानेश चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या अतिरेक्‍यांना देशभरात घातपाती कारवाया घडविण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना "आयएसआय'कडून अर्थपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्‍यांच्या चौकशीत ही खळबळजनक बाब उघडकीस आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
दरम्यान, या अतिरेक्‍यांनी गेल्या तीन वर्षांत देशभरात केलेल्या बॉम्बस्फोटांसाठी "आयएसआय'कडून अर्थपुरवठा; तर 'लष्कर ए तैय्यबा'कडून अतिरेक्‍यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
देशभरात 2005 पासून बॉम्बस्फोट घडविणाऱ्या "इंडियन मुजाहिदीन'च्या 20 अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई, आझमगड, दिल्ली, मंगळूरसह देशभर छापे घालून अटक केल्यानंतर या शाखेच्या पोलिसांनी या संघटनेच्या आर्थिक नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. "इंडियन मुजाहिदीन'ला घातपात घडविण्याकरिता आखाती देशातून आर्थिक रसद पुरविली जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्‍यांच्या चौकशीत हा पैसा "आयएसआय'कडूनच येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईसह "इंडियन मुजाहिदीन', तसेच "सिमी' कार्यकर्त्यांचे छुपे जाळे असलेल्या परिसरातील राष्ट्रीयीकृत बॅंकांत हे पैसे नियमित गोळा केले जातात. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशी काही बचत खाती नुकतीच गोठविली आहेत. हवालामार्गे पाकिस्तान ते इराण व पुढे भारत असा हा अर्थपुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच मार्गाने या अतिरेक्‍यांना भारतातून प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येते. दिल्लीच्या जामियानगर येथील पोलिस कारवाईत मारल्या गेलेल्या आतिकच्या खात्यावर काही महिन्यांतच तीन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे उघडकीस आले आहे.
घातपाती कारवायांकरिता येणाऱ्या या पैशांचे वितरण इंडियन मुजाहिदीनचा "थिंकटॅंक' रियाज भटकळ याच्याकडे आहे. इंडियन मुजाहिदीनचे कंट्रोल रूम बनविण्यासाठी पुण्यातील कोंढवा खुर्द येथील अशोका म्युझ या इमारतीतील घर भाड्याने घेण्यात आले होते. त्यासाठी लागणारी 12 हजार रुपयांची अनामत रक्कम व चार हजार रुपयांचे मासिक भाडेही रियाजच देत होता. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या "मीडिया विंग'ला कॉम्प्युटर, लॅपटॉप अशा साधनसामग्रीसह बॉम्ब बनविणे, तसेच स्फोट घडविण्यासाठी आवश्‍यक त्या सर्व साधनांकरिता लागणारा खर्च आदी बाबी रियाज किंवा त्याचा भाऊ इक्‍बाल पाहत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

Friday, October 10, 2008

रेव्ह पार्टीप्रकरणी "बॉम्बे 72 डिग्री'ला थर्ड?

नोटीस बजावणार ः परवाना रद्द होण्याची दाट शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः बार आणि रेस्टॉरंटचा परवाना असलेल्या जुहूच्या "बॉम्बे 72 डिग्री' हॉटेलमध्ये सुरू असलेली रेव्ह पार्टी अमली पदार्थविरोधी पथकाने उधळल्यानंतर या बारच्या मालकाला परवाना रद्द करण्यासंबंधी "कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात येणार आहे. बारमालकाकडून याबाबत योग्य स्पष्टीकरण न आल्यास हा परवाना रद्द होईल. अमली पदार्थविरोधी पथकाच्या अहवालानंतर ही कारवाई होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमली पदार्थविरोधी पथकाने 4 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्री जुहूच्या बॉम्बे 72 डिग्री पबवर छापा घालून तेथे सुरू असलेली रेव्ह पार्टी उधळली. या वेळी पोलिसांनी राजकीय व सिनेसृष्टीतील बड्या धेंडांच्या 231 मुलांना ताब्यात घेतले, तर अमली पदार्थांची विक्री करणारे आठ जण व सहा आयोजकांना अटक केली.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. तपासाअंती "बॉम्बे 72' हा पब नसून, त्याला फक्त बार आणि रेस्टॉरंट चालविण्याचाच परवाना पोलिसांनी दिल्याचे स्पष्ट झाले; मात्र सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून तेथे रेव्ह पार्टी झाली. या हॉटेलच्या परवान्याचे 2005 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवल्यामुळे या ठिकाणी स्थानिक पोलिसांनी एकदा कारवाई केली होती. नंतर याच बारवर अमली पदार्थविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात तेथे होणाऱ्या रेव्ह पार्टीत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याचेही स्पष्ट झाल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या बारवर अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईनंतर पुढील कारवाईसाठीचा अहवाल पोलिस आयुक्तांकडे जाईल. या बारने त्यांना दिलेल्या परवान्यानुसार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई का केली जाऊ नये, याबाबत "कारणे दाखवा' नोटीस दिली जाईल. या नोटिशीला योग्य ते उत्तर न मिळाल्यास या बारचा परवाना रद्द होईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त (मुख्यालय) विजयसिंह जाधव यांनी दिली. अमली पदार्थविरोधी पथकाच्या अहवालानंतर ही नोटीस पाठविण्यात येणार असल्याचेही जाधव या वेळी म्हणाले.
....

अभिनेता बनण्यासाठी घरफोड्या

पवईत अटक ः वृत्तपत्रातून घेतली चोरीची प्रेरणा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 ः तो तसा मूळचा नेपाळी कुटुंबातला. लहानपण मुंबईतलेच. दिसायला स्मार्ट; इंग्रजी, मराठी व हिंदी या भाषांवरील प्रभुत्वामुळे चित्रपटांत अभिनेता होण्याची त्याची लहानपणापासूनची महत्त्वाकांक्षा. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने खास ऍक्‍टिंग ट्रेनिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला. घरच्या गरिबीमुळे अभिनेता बनण्यासाठी लागणारा खर्च परवडेनासा झाला. एक दिवस मराठी वृत्तपत्रात वाचलेल्या घरफोडीच्या एका बातमीवरून प्रेरणा घेऊन त्याने घरफोड्या करायला सुरुवात केली. पवई येथील एका घरातून चोरी केलेल्या एका क्रेडिट कार्डमुळे तो शेवटी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पवई परिसरात गेल्या दीड वर्षात 31 हून अधिक घरे फोडलेल्या या चोरट्याने केलेल्या तब्बल 15 मोठ्या घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून साडेअकरा लाखांची रोख रक्कम व एक लॅपटॉप असा ऐवज हस्तगत केला.
दादर येथे राहणाऱ्या या 32 वर्षीय चोरट्याचे नाव राहुल थापा असून, तो लहानपणापासूनच चंदेरी दुनियेत करिअर करण्यासाठी धडपडत होता; मात्र अभिनेता होण्यासाठी लागणारा खर्च त्याच्यासारख्या गरीब तरुणाला न परवडणारा. यातून मार्ग काढण्यासाठी त्याने तरुणाईला आपल्या तालावर थिरकवणारे "डीजे' वाजवायला सुरुवात केली. अभिनेता व्हायचे असेल, तर पहिले त्याचे सगळे गुण अंगी बाळगायला हवेत, या विचाराने तो कधी कधी दिल्ली ते मुंबई हा प्रवास विमानानेही करायचा; मात्र थोड्याच दिवसांत त्याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले. त्याच्याकडे असलेल्या क्रेडिट कार्डचे पैसेही थकले. अशाच पैशातून त्याने एक महागडी मोटरसायकलही खरेदी केली. अशातच पवईतील एका हॉटेलमध्ये मराठी वृत्तपत्र वाचत असताना त्याला घरफोड्या करण्याची क्‍लृप्ती सुचली. या क्‍लृप्तीतूनच त्याने एकट्यानेच पवई परिसरात तब्बल 31 घरे फोडली. सोने व रोख रक्कम चोरणारा राहुल दादर येथील काही ज्वेलर्सच्या दुकानांत चोरी केलेले सोने विकत होता. पवईत असलेल्या कॅनरा बॅंक सोसायटीत ऑगस्टमध्ये झालेल्या एका घरफोडीत त्याने क्रेडिट कार्ड चोरले होते. याच क्रेडिट कार्डाचा वापर करून, त्याने ऑर्बिट मॉलमध्ये हजारो रुपयांची शॉपिंग केली. याच क्रेडिट कार्डाच्या मदतीने पोलिस त्याच्यापर्यंत पोचले. त्याला पोलिसांनी 22 सप्टेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून आणखी पाच गुन्ह्यांत चोरलेली मालमत्ता हस्तगत करणे बाकी असल्याचे पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आर. एन. रूपवते यांनी सांगितले.
------------------------------

Thursday, October 9, 2008

इंडियन मुजाहिदिनची बॅंक खाती गोठविली

राकेश मारिया ः राष्ट्रीयीकृत बॅंकांत बचत खाती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 ः इंडियन मुजाहिदिनच्या घातपाती कारवायांसाठी मुंबईतील काही राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या बचत खात्यांवर नियमितपणे पैसे जमा होत होते. पोलिसांनी ही सर्व खाती आज गोठविल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या खात्यांवर गेली अनेक वर्षे लहान- मोठ्या रकमांच्या स्वरूपात पैसे जमा केले जात होते, असेही मारिया यावेळी म्हणाले.

गेल्या तीन वर्षांत देशभरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदिनच्या वीस अतिरेक्‍यांच्या अटकेनंतर गुन्हे शाखेचे पोलिस या अतिरेकी कारवायांसाठी वापरण्यात येणाऱ्या आर्थिक स्त्रोतांचा शोध घेत आहेत. अतिरेकी कारवायांना मूर्त स्वरूप देण्यासाठी या अतिरेक्‍यांना हवाला आणि वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरने नियमित पैसे येत असत. या व्यतिरिक्त मुंबईतील काही राष्ट्रीयीकृत बॅंकामध्ये इंडियन मुजाहिदिनच्या सदस्यांची बचत खाती आहेत. आखाती देशांतून येणारा पैसा या खात्यांवर नियमितपणे भरणा केला जात होता. मात्र या खात्यांतून फारच कमी प्रमाणावर पैसे काढले जात होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील बॅंकांमध्ये असलेली ही सर्व खाती गोठविली आहेत. या खात्यांवर गेल्या दोन वर्षांत 26 लाख रुपये गोळा झाले होते. या प्रकरणी संबंधित बॅंकांकडून संबंधित खातेदारांचे नाव व पत्ते पोलिसांनी मिळविल्याचेही मारिया यावेळी म्हणाले. मात्र खातेदार व बॅंकांची नावे सांगण्यास त्यांनी यावेळी नकार दिला.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केलेला मोहम्मद अकबर चौधरी व आनिक शफीक सय्यद या दोघांचा हैदराबाद बॉम्बस्फोटांतही सहभाग स्पष्ट झाला आहे. स्फोट घडविण्याच्या महिनाभरापूर्वी दोघांनी हैदराबादमध्ये मोठे घर भाड्याने घेतले होते. स्फोटांच्या दोन दिवसांअगोदर याच घरात बॉम्ब बनविण्यात आले. रियाज भटकळदेखील यावेळी त्या घरात उपस्थित होता, अशी माहिती मारिया यांनी यावेळी दिली.
--------
(चौकट)
पुण्याच्या नगरसेवकाची चौकशी
इंडियन मुजाहिदिनच्या अतिरेक्‍यांशी असेलल्या कथित संबंधांवरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक जावेद शेख याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
....

रियाजच्या चिथावणीमुळे बुद्धिमान तरुण दहशतवादाकडे

मुंबईतही बैठका ः इंडियन मुजाहिदीनमध्ये दहा इंजिनिअर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 7 ः मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित तरुण पिढीला इंडियन मुजाहिदीन संघटनेत सहभागी करून घेण्याकरिता तिचा संस्थापक सदस्य रियाज भटकळ मुंबईत कुर्ला व ट्रॉम्बे परिसरात बैठका घेत होता. देश-विदेशात मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारांचे प्रवचनाद्वारे कथन करणाऱ्या रियाजच्या चिथावणीखोर भाषणांनी कितीतरी तरुण या संघटनेत सहभागी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

रियाज भटकळने दिलेल्या जिहादी शिकवणीवरून सुरुवातीला महम्मद सादीक शेख व अन्सार अहमद बादशाह शेख त्याच्या कारवायांकडे आकृष्ट झाले. यानंतर दोघांनी आझमगढ येथील मोहम्मद आरीफ शेखला जेहादी प्रशिक्षण दिले. यानंतर आरीफने मोहम्मद आतिकला प्रशिक्षण दिले व पुढे आरीफकडूनच आझमगढच्या संजरपूर येथील अतिरेक्‍यांच्या गटाला जेहादाची शिकवण देण्यात आली.
रियाजकडून मिळालेल्या शिकवणुकीतून पुण्यातील गटातही धार्मिक कट्टरतेची बीजे पेरली गेली. कुशाग्र बुद्धिमत्तेचे तरुण या शिकवणुकीला भुलून इंडियन मुजाहिदीनच्या देशविघातक कारवायांत अडकल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. रियाज भटकळने सुरुवातीला पुण्यात अकबर चौधरी या तरुणाला प्रशिक्षण दिले. त्याच्या माध्यमातून पुढे निष्णात संगणकतज्ज्ञ असलेला मोहम्मद मन्सूर असगर पिरबॉय व त्याचे साथीदार या संघटनेशी जोडले गेल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

दहा इंजिनिअर
इंडियन मुजाहिदीनच्या वीस कडव्या अतिरेक्‍यांत 9 सॉफ्टवेअर इंजिनिअर व एका मेकॅनिकल इंजिनिअरचा समावेश आहे. 25 ते 35 वयोगटातील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या या तरुणांचा अतिरेकी कारवायांसाठी वापर करून घेताना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. या अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण देत असताना इंडियन मुजाहिदीनने यातील काहींना लॅपटॉपही पुरविले होते. त्यातूनच डिजिटल टायमर बॉम्बची संकल्पना पुढे आल्याचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

आयएसआयचे ट्रेनिंग
इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठविण्यात येत असे. तेथे आयएसआयचा अधिकारी मेजर आतिक भाई या अतिरेक्‍यांना स्फोटांसंबंधीचे; तसेच बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देतो. आतापर्यंत मोहम्मद सादीक शेख, मोहम्मद आरीफ शेख, अन्सार अहमद शेख, मोहम्मद झाकिर शेख व अफजल उस्मानी यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले

पुण्यातील "घर' सोडण्यापूर्वीच अतिरेक्‍यांना मुसक्‍या

पोलिसांची तत्परता ः हैदराबाद बॉम्बस्फोटांपूर्वी याच घरात बैठका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 7 ः बॉम्बस्फोटांनंतर धमकीचे "ई-मेल' पाठविणाऱ्या "इंडियन मुजाहिदीन'च्या मीडिया विंगमध्ये काम करणाऱ्या तीन संगणक तज्ज्ञांसह पाच जणांना पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील ज्या घरातून अटक झाली, ते घर पोलिसांच्या भीतीमुळे ते सोडण्याच्या तयारीत होते. घर सोडायला अवघे दोन दिवस उरले असतानाच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या घरावर छापा घालून पाचही अतिरेक्‍यांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हैदराबाद बॉम्बस्फोटांपूर्वी याच घरात अतिरेक्‍यांच्या बैठका झाल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतर अटक केलेल्या "इंडियन मुजाहिदीन'च्या 20 अतिरेक्‍यांच्या चौकशीतून दररोज नवीन माहिती पोलिसांसमोर येत आहे. "इंडियन मुजाहिदीन'ची मीडिया विंग सांभाळणाऱ्या मोहम्मद मन्सूर असगर पीरबॉय (वय 31), आसिफ बशीर शेख (22), मोबिन ऊर्फ सलमान शेख (24) या संगणकतज्ज्ञांसह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील एच-302, अशोका मिव्हज्‌ या इमारतीतून अटक केली. बाराशे चौरस फुटांच्या या घराला "इंडियन मुजाहिदीन'ने हेडक्वॉर्टर बनविले होते. गुन्हे शाखेने अटक केलेला "इंडियन मुजाहिदीन'चा थिंकटॅंक मोहम्मद सादिक शेख याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी या घरावर छापा घातला. यापूर्वी पाच साथीदार 24 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यानंतर कोंडवा खुर्द येथे राहणारे हे अतिरेकी आपले घर बदलणार होते. त्यासाठी त्यांनी पुणे शहरात घरही शोधले. घर सोडायला अवघे दोन दिवस असतानाच पोलिसांनी तेथे छापा घातल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अहमदाबाद बॉम्बस्फोटांसाठी मंगळूरु येथून आलेला स्फोटकांचा साठा पुण्यात व पुढे सुरत आणि अहमदाबाद येथे नेण्यात आला होता. देशभरात स्फोटांचा कट रचणारा "इंडियन मुजाहिदीन'चा थिंकटॅंक रियाज भटकळ ऊर्फ रोशन खान याचा या घरात नेहमी राबता असायचा. स्फोटांपूर्वी या घरात झालेल्या बैठकांनादेखील तो हजर होता.
अटक केलेल्या अतिरेक्‍यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुंगी आणणाऱ्या इंजेक्‍शनच्या कुप्या व गोळ्यांचा साठा हस्तगत केला. ही औषधे लहान मुले व तरुणांना देऊन त्यांचे अपहरण करून, त्यातून खंडणी उकळण्याचा प्रयत्न या अतिरेक्‍यांकडून होत असावा, असा अंदाज आहे. काही वर्षांपूर्वी "सिमी' कार्यकर्ता आफताब अन्सारी याने अशाच प्रकारे अपहरण केले होते. "इंडियन मुजाहिदीन'चा संस्थापक आमीर रझा याच्याशी त्याच्या असलेल्या संबंधांमुळे पोलिस ही शक्‍यता पडताळून पाहत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांना दिली. पोलिसांनी अटक केलेल्या 20 अतिरेक्‍यांना "इंडियन मुजाहिदीन'कडून गेल्या दोन वर्षांत 26 लाख रुपये हवाला व बॅंकेच्या माध्यमातून आल्याची माहितीही मारिया यांनी या वेळी दिली. बॅंकांमध्ये आलेले पैसे कोणाच्या खात्यांवर आले होते, याचीही माहिती पोलिस गोळा करीत असल्याचे ते म्हणाले.

Tuesday, October 7, 2008

इंडियन मुजाहिदीनच्या 15 अतिरेक्‍यांना अटक

मुंबई पोलिसांचे छापे ः पुणे, परभणी, मंगळूर येथे कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः देशभरात घातपात घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या आणखी पंधरा अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे, परभणी व मंगळूर येथून अटक केली. अहमदाबाद, सुरत, बंगळूरु, हैदराबाद व नवी दिल्ली येथे बॉम्बस्फोट घडविण्यात या अतिरेक्‍यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून आरोपींमध्ये इंडियन मुजाहिदीनची "मीडिया विंग' चालविणाऱ्या पुण्यातील तिघा संगणकतज्ज्ञांचा समावेश असल्याचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या आरोपींकडून पोलिसांनी दोन पिस्तुले, 45 जिवंत काडतुसे, बुलेटप्रुफ जॅकेट, लाईफ जॅकेट, सहा लॅपटॉप, वायफाय राऊटर तसेच साडेअकरा लाख रुपयांची रोख जप्त केल्याचेही गफूर यांनी सांगितले. हैदराबाद बॉम्बस्फोटाची योजना मुंबईत चिता कॅम्प येथे आखण्यात आली होती. या संपूर्ण कारवाईत इंडियन मुजाहिदीनचा "थिंक टॅंक' समजल्या जाणाऱ्या कुख्यात अतिरेकी रियाज भटकळ व त्याचा भाऊ इक्‍बाल यांना पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही, त्यांचा शोध सुरू असल्याचेही आयुक्त गफूर या वेळी म्हणाले.

देशभरात घातपात घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच कडव्या अतिरेक्‍यांना मुंबईत अटक झाल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक, विशेष शाखा यांच्यासह आयबी व रॉच्या अधिकाऱ्यांनी देशभरात शोधमोहीम हाती घेतली. त्या अनुषंगाने मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे, सोलापूर, परभणीसह कर्नाटक व आझमगढ येथे छापे घातले. त्यानुसार पोलिसांना इंडियन मुजाहिदीनची "मीडिया विंग' संभाळणाऱ्या महम्मद मन्सुर असगर पिरबॉय (31), मोबीन कादर शेख ऊर्फ सलमान (24), आसिफ बशीर शेख (22) या तिघांसह त्यांचा साथीदार मोहम्मद अकबर इस्माईल चौधरी (28) यांना पुण्यातून अटक केली. महम्मद मन्सुर पिरबॉय पुण्यातील एका मल्टिनॅशनल कंपनीत प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो. वार्षिक 19 लाख रुपयांच्या पगाराचे पॅकेज असलेला पिरबॉय इंडियन मुजाहिदीनचा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्याचा साथीदार मोबीन शेख हा एका आयटी कंपनीत सिनिअर टेक्‍निकल ऍडवायजर; तर आसिफ बशीर शेख हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. या तिघांनी मोहम्मद चौधरीसोबत सानापाड्याच्या गुनानी इमारतीतून केनेथ हेवूड या अमेरिकन नागरिकाच्या वायफाय कनेक्‍शनच्या मदतीने अहमदाबाद स्फोटांच्या धमकीचा ई-मेल पाठविला होता. त्यापूर्वी या आरोपींनी सानापाडा, चेंबूर, सायन व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून हे ई-मेल पाठविता येतात का, याची पाहणी केली होती. या वेळी वापरलेली निळ्या रंगाची मारुती एस्टीम गाडी त्यांनी खालसा महाविद्यालयातून धमकीचा ई-मेल पाठवितानाही वापरली होती. दिल्ली स्फोटांचा ई-मेल पाठविण्यासाठी त्यांनी चेंबूरच्या कमानी पॉवर कंपनीच्या राऊटरचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. धमकीच्या ई-मेलमधील मजकूर, कुख्यात अतिरेकी रियाज भटकळ ऊर्फ रोशन खान याच्या सांगण्यावरून हेच तिघे तयार करीत असत. मोह
म्मद चौधरीचा अहमदाबाद व सुरत स्फोटांत सहभाग आहे. स्फोटांच्या काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये याकुब नावाने घर भाड्याने घेऊन या घरात अतिरेक्‍यांना आश्रय देण्यात आला होता. याच घरात त्यांनी स्फोटांत वापरलेले बॉम्ब बनविल्याचेही उघड झाले आहे. हैदराबादमध्ये 25 ऑगस्टला झालेल्या बॉम्बस्फोटांचा कट मुंबईत चिता कॅम्प येथे रचण्यात आला. त्या कटासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला रियाज भटकळ, इंडियन मुजाहिदीनचा थिंक टॅंक महम्मद सादीक इसरार अमहद शेख व नुकताच अटक केलेला मोहम्मद अन्सार अहमद शेख (35) हे तिघे उपस्थित होते. अटक केलेल्या अतिरेक्‍यांपैकी अनिस शकील सय्यद (26) याने लुंबीनी पार्क येथे बॉम्ब ठेवल्याची कबुली दिली; तर रियाज भटकळने स्वतः गोकुळनगर चाट भंडार येथे बॉम्ब पेरले होते, अशी माहिती पोलिस आयुक्त गफूर यांनी या वेळी दिली.

अतिरेकी व त्यांचा सहभाग स्पष्ट करणारा तक्ता

पकडलेला अतिरेकी वय शिक्षण व्यवसाय अतिरेकी संघटना

- मोहम्मद आतिक मोहम्मद (25) - कॉम्प्युटर सायन्स पदवीधर - इंडियन मुजाहिदीचा सक्रिय सदस्य
- दस्तगीर फिरोज मुजावर (25) - वाणिज्य शाखा पदवीधर - जिहादींना अतिरेकी प्रशिक्षण देण्यात सहभागी
- माजिद अकबर शेख (26) - मोबाईल रिपेअरिंगचे दुकान - सुरत व अहमदाबाद स्फोटांचा कट रचण्यात सहभाग
- यासिर अनिस सय्यद (20) - मोबाईल रिपेअरिंगचे दुकान - इंडियन मुजाहिदीनचा सक्रिय कार्यकर्ता,
कट रचण्यात सहभाग
- फारूख शफरूद्दीन टरकश (25) - वाणिज्य पदवीधर - इंडियन मुजाहिदीनचा कार्यकर्ता, कट रचण्यात सहभाग
- फजल ए रहमान दुरानी (23) - रेकॉर्डवरील दरोडेखोर - सुरत व अहमदाबाद स्फोटांत सहभाग
- अहमद बावा अबुबकर (33) - व्यवसाय - सुरत व अहमदाबाद स्फोटांत सहभाग
- मोहम्मद अली अहमद (44) - सिव्हिल कॉन्ट्रॅक्‍टर - इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांना लपण्यासाठी घर
उपलब्ध करून देणे
- जावेद अली (19) - अरेबिक शाळेतील विद्यार्थी - इंडियन मुजाहिदीनचा सक्रिय सदस्य, कटात सहभाग
- सय्यद मोहम्मद नौशाद (25) - सिव्हिल कॉन्ट्रॅक्‍टर - सुरत बॉम्बस्फोटांत सहभाग.
...

26 ऑक्‍टोबरला मुंबईत घातपात

दिल्लीच्या जामियानगरमध्ये झालेल्या एन्काऊंटरमध्ये पोलिसांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या दोघा अतिरेक्‍यांच्या चौकशीत मुंबईत येत्या 26 ऑक्‍टोबर रोजी घातपात घडविण्यात येणार असल्याची माहिती उघडकीस आल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी यावेळी दिली. पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्‍यांनी नवरात्रौत्सवाच्या काळातही मुंबईत स्फोट घडविण्याची तयारी केली होती, अशी माहितीही पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी दिली.
-----------------------------

रियाज भटकळकडून मिळाले प्रशिक्षण

अटक केलेल्या अतिरेक्‍यांपैकी सहा अतिरेक्‍यांना पाकिस्तान व बांगलादेशात प्रशिक्षण देण्यात आले. तर उर्वरितांना रियाज भटकळ याने प्रशिक्षण दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. पोलिसांना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर जिहादी साहित्य व व्हीसीडी मिळाल्या आहेत. या व्हीसीडींमध्ये परदेशात तसेच भारतातील घटनांचे छायाचित्रण आहे. या आधारे मुस्लिम तरुणांच्या मनात तेढ निर्माण करून त्यांना देशविघातक कृत्य करण्यास चिथावले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
--------------------


पोलिस शोधतायत "आयएम'ची इकोनॉमिक पाईपलाईन...

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या "इंडियन मुजाहिदीन'च्या अतिरेक्‍यांकडून साडेअकरा लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. या अतिरेक्‍यांना स्फोट घडविण्यासाठी हवाला मार्गाने लाखो रुपये; तर स्फोटकांचा साठा बेंगळूरु व दक्षिण भारतातून येतो. पोलिस "इंडियन मुजाहिदीन'ला पतपुरवठा करणाऱ्यांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी दिली.
--------------------------------------

"कॉम्प्युटर हॅकिंग'साठी "आयएम'ला दिले प्रत्येकी 70 हजार

कॉम्प्युटर हॅकिंगचा कोर्स करण्यासाठी "आयएम'ला दिले प्रत्येकी 70हजार रुपये
"इंडियन मुजाहिदीन'च्या मीडिया विंगमध्ये काम करण्यासाठी कॉम्प्युटर हॅक करता येणे आवश्‍यक असल्याने संघटनेने मोहम्मद मन्सूर पीरबॉय व मोबीन सलमान शेख या कॉम्प्युटर एक्‍सपर्टस्‌ना हॅकिंगचा कोर्स करायला लावला. एका वेळी आठ ते दहा जणांच्या गटाला प्रशिक्षण देणाऱ्या एका खासगी कॉम्प्युटर प्रशिक्षण संस्थेकडून हा कोर्स शिकविण्यात येत होता. त्यासाठी प्रत्येकी 70 हजार रुपये देण्यात आले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे.
-----

जुहूतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

अमली पदार्थ जप्त ः झिंगून बेधुंद नृत्य करणारे 231 तरुण-तरुणी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः जुहूच्या "बॉम्बे 72 डिग्री' पबमध्ये सुरू असलेल्या "रेव्ह पार्टी'वर अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांनी आज पहाटे छापा टाकून अठरा ते पंचवीस वयोगटातील 231 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. यात राजकीय, सिनेसृष्टी व व्यावसायिक क्षेत्रातील बड्या धेंडांच्या मुलांचा समावेश आहे. अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत याचाही त्यात समावेश आहे. त्याचबरोबर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या आठ जणांना या वेळी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 850 एलएसडी गोळ्या, 104 एक्‍सटसी ड्रॉप्स या महागड्या अमली पदार्थांसह 250 ग्रॅम चरस, अफू व गांजा या अमली पदार्थांचा साठा आणि एक लाख 56 हजार रुपयांची रोकड हस्तगत केल्याची माहिती या पथकाचे उपायुक्त विश्‍वास नांगरेपाटील यांनी दिली; मात्र या पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींविषयी तपशीलवार माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

पबमध्ये उच्चभ्रू समाजातील तरुण-तरुणींना अमली पदार्थांचे वितरण करण्यासाठी आठ जण येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाच्या पोलिसांना एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळाली. सतत तीन दिवस सापळा रचल्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी या पबवर छापा घातला. या कारवाईच्या वेळी पबमध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातील "हायप्रोफाईल' तरुण-तरुणी मादक पदार्थांच्या अमलाखाली तसेच डीजेच्या तालावर बेधुंद नाचताना आढळली. पोलिसांनी या मुलांसह पबमध्ये पार्टीसाठी आलेल्या एकूण 231 जणांना ताब्यात घेतले. त्यात 38

तरुणींचा समावेश आहे. याशिवाय अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेले आठ जण तसेच ही पार्टी आयोजित करणाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या या मुलांमध्ये चित्रपटसृष्टी व राजकीय क्षेत्रासह शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मुलांचा समावेश आहे. अभिनेता शक्ती कपूर याचा मुलगा सिद्धांत यालादेखील या वेळी पोलिसांनी ताब्यात घेतले; मात्र तो कसल्याही प्रकारचे व्यसन करीत नसल्याचे शक्ती कपूर यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ताब्यात घेतलेल्या या तरुण-तरुणींची कूपर, सेंट जॉर्ज व जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर त्यांना आझाद मैदान येथील पोलिस क्‍लबमध्ये ओळख पटविण्यासाठी नेण्यात आले. ओळख पटवून झाल्यानंतर बड्या धेंडांची ही मुले आपले तोंड लपवत बाहेर पडताना दिसत होती. या मुलांचे पालकही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. ताब्यात घेतलेल्या या तरुण-तरुणींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या मुलांची ओळख पटवून त्यांना सोडून देण्यात येत आहे. त्यांच्या रक्त व लघवीचे नमुने पोलिसांनी घेतले असून ते तपासणीकरिता फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल येत्या दीड महिन्यात आल्यानंतर त्यात दोषी आढळणाऱ्यांवर अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाचे उपायुक्त नांगरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कारवाईत अटक केलेल्या आठ जणांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------
ते निर्दोष आहेत...
माझा मुलगा त्याच्या मित्रांसह वाढदिवसाच्या पार्टीसाठी या पबमध्ये गेला. बारा जणांच्या त्याच्या ग्रुपमध्ये सिनेअभिनेता व राजकीय नेत्याच्या मुलाचाही समावेश होता. पबच्या टेरेसवर जेवत असताना पोलिसांनी छापा घातला आणि सर्वांना ताब्यात घेतले. या पबमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याचे त्यांनाही नंतर कळाले. या संपूर्ण प्रकारात आपला मुलगा दोषी आढळल्यास त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा द्या. मात्र कशात काही नसताना प्रसिद्धिमाध्यमे व पोलिस या मुलांना आरोपींप्रमाणे वागवत असल्याची खंत एका पालकाने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. मुलांवर झालेल्या अशा प्रकारच्या कारवाईमुळे मुलांसोबत आमचीही इभ्रत वेशीवर टांगली आहे. सुक्‍यासोबत ओले जळण्याचाच हा प्रकार असल्याचे या पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
-----------------------------------

आठ संशयित अतिरेक्‍यांना अटक

कर्नाटकमध्ये छापे ः सर्व जण "इंडियन मुजाहिदीन'चे

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 5 ः देशभरातील बॉम्बस्फोटांना जबाबदार असणाऱ्या इंडियन मुजाहिदीन संघटनेशी संबंधित आठ संशयित अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेंगळूरु येथून अटक केली. रात्री उशिरा मुंबईत आणलेल्या या अतिरेक्‍यांना आज दुपारी किल्ला न्यायालयासमोर उभे करण्यात आले.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या या अतिरेक्‍यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी उपनगरी गाड्यांत झालेल्या बॉम्बस्फोटांतील संशयित आरोपी मोहम्मद अली (वय 44) त्याचा मुलगा जावेद अली (20), अहमद बावा (33), सय्यद मोहम्मद नौशाद (25) व अन्य चार जणांचा समावेश आहे. मोहम्मद अलीचा अतिरेक्‍यांना प्रशिक्षण देण्यातील सहभाग स्पष्ट झाला आहे. अहमद बावा सुरतमध्ये बॉम्ब ठेवल्याप्रकरणी दोषी आढळला असून, सय्यदकडे अतिरेकी कारवायांसाठी स्फोटके पुरविण्याची जबाबदारी होती, अशी माहिती पुढे आली आहे.
जयपूर, बेंगळूरु, अहमदाबाद व दिल्लीसह गेल्या तीन वर्षांमध्ये देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 सप्टेंबर रोजी पाच कुख्यात अतिरेक्‍यांना अटक केली. या अतिरेक्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांची सात पथके मुंबई, पुणे, बेंगळूरु व आझमगढ येथे स्थानिक पोलिसांसोबत छापे घालत होती. "इंडियन मुजाहिदीन'च्या पहिल्या फळीतील अतिरेकी रोशन खान ऊर्फ रियाज भटकळ याचे या अतिरेकी कारवायांवर नियंत्रण असते. मूळचा बेंगळूरुचा असलेला रियाज या स्फोटांसाठी स्फोटके व हवालाचा पैसा पुरवितो. रियाज त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती अटक केलेल्या अतिरेक्‍यांच्या चौकशीतून मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या बेंगळूरु येथील घरावर छापा घातला. पोलिस मागावर असल्याचे कळल्यानंतर तो तेथून निसटला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती स्वतः या छाप्याच्या वेळी कर्नाटक येथे होते. पोलिसांनी कर्नाटक येथील कारवाई काल रात्री संपविली. या कारवाईनंतर अटक केलेल्या आठही अतिरेक्‍यांना पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा मुंबईत आणले. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या आरोपींना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. याच वेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या आझमगढ व अन्य ठिकाणीही कारवाया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
---------------

Thursday, October 2, 2008

ते होणार पोलिसांचे नाक, कान, डोळे...

संशयास्पद हालचाली ः निराश्रित, भटके, भिकारी यांची मदत

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः दिल्लीनंतर मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याच्या पूर्ण तयारीत असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांच्या अटकेनंतर त्यांचे काही साथीदार मुंबईत फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अतिरेक्‍यांच्या कारवायांना आळा घालण्याकरिता त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी पोलिस रस्त्यावर फिरणारे निराश्रित, भटके, भिकारी व कचरावेचक मुलांची मदत घेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी "सकाळ'ला दिली. त्या अनुषंगाने पोलिस या मुलांकडे विचारणाही करीत असल्याचे मारिया या वेळी म्हणाले.

दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असणाऱ्या मुंबईत निराश्रित, भटके, भिकारी तसेच कचरावेचकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. शहरातील धार्मिक स्थळे, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, चौपाट्या, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंना दहशतवाद्यांनी नेहमीच लक्ष्य केले आहे. प्रचंड गर्दीच्या या ठिकाणांवर भटके, भिकारी, कचरावेचक मुलांचा मुख्यतः वावर असतो. शहरात होणाऱ्या प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस अनेकदा सामान्य नागरिक तसेच त्यांच्या खबऱ्यांची मदत घेतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून पोलिसांच्या खबऱ्यांचे जाळे कमकुवत होत असल्याने पोलिसांनी रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या, फिरणाऱ्या मुलांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रमुख रस्ते, चौक तसेच मोहल्ल्यात बऱ्यापैकी अस्तित्व असलेल्या मात्र त्यामानाने दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या कचरावेचक, भिकारी व बेवारस मुलांचा उपयोग संशयास्पद हालचालींची माहिती मिळण्यासाठी पोलिस करून घेणार आहेत. रात्री-अपरात्रीच्या सुमारास रस्त्यावर असणाऱ्या या मुलांच्या निदर्शनास येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती ते पोलिसांना देणार आहेत. स्थानिक व गुन्हे शाखेचे पोलिस अशा मुलांकडून मिळणाऱ्या माहितीतील तथ्य तपासून त्यावर काम करीत असल्याचे मारिया यांनी सांगितले.
दिल्लीत 13 सप्टेंबर रोजी भीषण बॉम्बस्फोट मालिका घडविल्यानंतर रस्त्यावर कचरा वेचणाऱ्या अशाच एका चौदा वर्षांच्या मुलाने बॉम्ब ठेवणाऱ्या दहशतवाद्यांची माहिती पोलिसांना दिली होती. याच मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे अतिरेक्‍यांनी कचराकुंड्यांत ठेवलेले नऊ बॉम्ब पोलिसांनी निकामी केले. या मुलाच्या जागरुकतेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानीही टळली. त्यामुळे त्याला दिल्ली पोलिसांकडून बक्षीसही देण्यात आले.
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पाच अतिरेक्‍यांच्या चौकशीत तीस प्रशिक्षित अतिरेक्‍यांचा गट मुंबईत फिरत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिक, निराश्रित व भटकी मुले यांच्याकडून संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यास पोलिसांना अतिरेक्‍यांचे मनसुबे उद्‌ध्वस्त करणे सोपे होणार आहे. गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी या मुलांचा वापर करून घेण्याबरोबरच राज्य सरकार व काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पुनर्वसनाचे कामही पोलिस करीत असल्याचे राकेश मारिया यांनी या वेळी सांगितले.
-------------------
पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत ताब्यात घेऊन पुनर्वसन केलेल्या मुलांची आकडेवारी
वर्ष - मुले - मुली
2006 - 427 - 157
2007 - 598 - 233
2008 - 297 - 103
--------------------------------

महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूचा उपायुक्तांमार्फत तपास

हसन गफूर : घटनास्थळावरील पोलिसांचीही चौकशी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 1 ः मंत्रालयातील महिला कॉन्स्टेबलने विषारी पाणी प्यायल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा तपास पोलिस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. याप्रकरणी महिला अभ्यागतावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरील पोलिसांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ- 1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी दिली. दरम्यान, महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नाशिक येथील मूळ गावी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजेश्री बोटे या महिलेकडील पाण्याची बाटली सुरक्षिततेच्या कारणावरून पुकळे या महिला कॉन्स्टेबलने काढून घेतली. ही बाटली पोलिसांकडे देताना राजेश्री बोटे यांनी त्यात झुरळाचे औषध असल्याचे सांगितले होते; मात्र बंदोबस्तावर असलेल्या अलका गायकवाड यांना बाटलीतील विषारी द्रव्याबाबत कसलीच माहिती नव्हती. तहान लागल्यानंतर बाटलीतील विषारी पाणी प्यायल्याने अलका गायकवाड यांना चक्कर व उलट्या होऊ लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंत्रालयातील काम उरकून बाटली घेण्यासाठी आलेल्या बोटे यांचा पोलिसांसोबत वादही झाला. सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गायकवाड काल सकाळी मरण पावल्या.
पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश परिमंडळ- 1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांना दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी राजेश्री बोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2004 मध्ये पोलिस दलात दाखल झालेल्या गायकवाड यांचा मृतदेह त्यांच्या मोठ्या भावाच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्यावर नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Wednesday, October 1, 2008

सुरक्षिततेच्या कारणावरून घेतलेली पाण्याची बाटलीच जीवावर बेतली

मंत्रालयातील घटना : महिला कॉन्स्टेबलचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 30 ः मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागत महिलेकडील पाण्याची बाटली सुरक्षिततेच्या कारणावरून महिला कॉन्स्टेबलने काढून घेतली. त्याच बाटलीतील पाणी महिला कॉन्स्टेबल प्यायली. या पाण्यामुळे विषबाधा होऊन तिचा आज सकाळी सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणाची मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंद झाली. महिला कॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतरही मरीन ड्राईव्ह पोलिस रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते.
अलका तानाजी गायकवाड असे महिला पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. विषबाधेनंतर चार दिवस सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गायकवाड यांनी आज सकाळी आपले प्राण सोडले. 26 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा बंदोबस्ताला त्या उभ्या होत्या. या वेळी त्यांच्या सहकारी कॉन्स्टेबल पुकळे यांनी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या तपासणीनंतर सुरक्षिततेच्या कारणावरून राजेश्री बोटे या महिलेच्या पिशवीतील पाण्याची बाटली काढून घेतली. बराच वेळ बंदोबस्ताच्या ठिकाणी उभ्या असलेल्या अलका गायकवाड या वेळी तेथे आल्या. प्रचंड तहान लागल्याने बाटलीतील पाणी त्या प्यायल्या. कीटकनाशक मिश्रित पाण्यामुळे गायकवाड यांना चक्कर व उलट्या होऊ लागल्या. काही क्षणातच काळ्या-निळ्या पडलेल्या कॉन्स्टेबल गायकवाड यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात हलविण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर चार दिवस उपचार सुरू होते; मात्र पाण्यात मिसळलेल्या कीटकनाशकातील विष जहाल असल्याने आज सकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणाची मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पाण्याची बाटली घेऊन येणाऱ्या राजेश्री बोटे या महिलेचा पोलिस शोध घेत आहेत.

एटीएसचे पथक मालेगावमध्ये दाखल

मुंबई, ता. 30 ः मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे देण्यात आला असून सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली एक तुकडी मालेगाव येथे गेल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
मालेगावच्या अंजुमन चौकात काल रात्री झालेल्या बॉम्बस्फोटात चार जण ठार; तर शंभरहून अधिक जखमी झाले. सुरुवातीला हा स्फोट सिलिंडरचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात हा बॉम्बस्फोट असल्याचे स्पष्ट झाले. या स्फोटानंतर घटनास्थळावर स्थानिक पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकाची तुकडीही रवाना झाली होती. आज सकाळी या पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे मालेगाव येथे दाखल झाले आहेत. सकाळी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी मालेगावला भेट देऊन या स्फोटाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या स्फोटाची अतिशय प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.