Monday, January 25, 2016

इसिसची वाढती विषवल्ली उखडून फेकण्यासाठी तपासयंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा 


मुंबई,ता.23 ः प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर इसिस या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्‍यासह चौदा जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) सोबतीने अटक केल्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) राज्यात इसिसची पाळेमुळे खणायला सुरवात केली आहे.आज सकाळी औरंगाबादमधून इसिसशी संबंधित आणखी एकाला एटीएसने अटक केली.गेल्या चोवीस तासात एटीएसने केलेल्या धडक कारवाईतील ही चौथी तर,देशभरातली पंधरावी अटक आहे.याशिवाय संशयितांच्या चौकशीला सुद्धा सुरवात झाली आहे. 

इंडियन मुजाहिदीनच्या पाडावानंतर इसिसची वाढती विषवल्ली उखडून फेकण्यासाठी तपासयंत्रणांनी देशभरात धाडसी मोहिम हाती घेतली आहे.मुंब्रा येथून अटक केलेला या मोड्युलचा म्होरक्‍या तसेच स्वयंघोषित "आमिर' मुदब्बीर मुश्‍ताक शेख व त्याच्या साथीदारांचा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात सात ठिकाणी घातपात घडविण्याचा कट उघडकीला आला आहे.पॅरीस स्टाईल दहशतवादी हल्ला घडवित असताना धार्मिक तसेच पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याचा कट होता. 

इसिसशी संबंधित असलेल्यांविरूद्ध भारतीय सुरक्षायंत्रणांनी आपल्या कारवाईचा वेग वाढविला आहे. सिमी आणि इंडियन मुजाहिदीनसाठी काम करणाऱ्या स्लिपर सेल सुरक्षायंत्रणांच्या रडारवर आहेत.या देशव्यापी कारवाईत महत्वाची भूमिका बजालेल्या एटीएसने आज औरंगाबादच्या वैजापूर येथे कारवाई करून मोअझ्झम खान पठाण याला अटक केली.हा या मोड्युलचा तिसऱ्या क्रमांकाचा कमांडर समजला जातो.काल सायंकाळी उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथे रिझवान अहमद अली नवाजुद्दीन तर, रात्री उशिरा माझगाव येथे हुसैन खान ऊर्फ जमिल यांना अटक केली होती.माझगाव सर्कल येथील हार्बर बिल्डींगमध्ये राहणाऱ्या हुसैन खानच्या अटकेने या परीसरातील रहिवाशांना सुद्धा धक्का बसला आहे.रिझवान वगळता अन्य तिन्ही आरोपींना एनआयएच्या ताब्यात देण्यात आले आहे.गेल्या चोवीस तासांत झालेल्या या प्रमुख कारवायांनंतर एटीएसने इसिसशी संबंधित आणखी काही संशयितांच्या चौकशीला सुरवात केली आहे.येत्या काही दिवसांत आणखी काहींच्या अटकेची शक्‍यता तपासयंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. 

- मुदब्बीर शेख सिरीयात शफी अरमारच्या होता संपर्कात. 
इसिससाठी भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी स्थापन झालेल्या "जनुद उल खलिफा ए हिंद' या मोड्युलचा "आमिर' असलेला मुदब्बीर सिरीयात शफी अरमार या इसिसच्या म्होरक्‍याच्या संपर्कात होता. मुळचा कर्नाटक मधील भटकळ येथील राहणारा शफी अरमार पूर्वी इंडियन मुजाहिदीनसाठी काम करत होता.त्याचा भाऊ सुलताना अरमार याला इसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी याने भारतातील कारवायांचा प्रमुख बनवले होते.इसिसचाच भाग असलेल्या अन्सार अल त्वाहिद या संघटनेचा तो प्रमुख होता.मात्र, मार्च-2015 मध्ये सिरीयात झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर शफी अरमार इसिससाठी काम करू लागल्याचे वृत्त सकाळ ने सर्वप्रथम दिले होते. हाच शफी सोशल नेटवर्कींग साईट्‌सवर युसुफ नावाने सक्रीय आहे.मुदब्बीरसोबत फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप, स्काईप आणि अन्य नेटवर्कींग साईटवरून संपर्कात होता. मुदब्बीर शिवाय शफी देशाच्या प्रमुख शहरांत सोशल नेटवर्कींग साईटवर सक्रीय असलेले तरूण तसेच जुन्या आयएम व सिमीच्या मोड्युलच्या संपर्कात होता, हे सुद्धा स्पष्ट झाल्याचे तपासयंत्रणांतील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 

- हवालाने आलेल्या पैशांचा शोध सुरू 
दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडणाऱ्या मुदब्बीरच्या खात्यात गेल्या काही महिन्यात सहा लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. ही सगळी रक्कम परदेशातून हवाला मार्गे त्याच्या खात्यात टाकली होती. एटीएसने आता हे पैसे पाठविणाऱ्याचा शोध सुरू केला आहे.मुदब्बीरने इसिसच्या म्होरक्‍यांच्या मदतीने संघटनेत सामिल करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.नवे सदस्य मिळवित असतानाच त्यांना घातपात घडविण्यासाठी पैसे पुरविण्याचे तसेच प्रशिक्षणाला पाठविण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. 

- मालवणीच्या युवकांना रिझवानची फुस 
एटीएसच्या पथकाने उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथून अटक केलेल्या रिझवान नवाजुद्दीनला मुंबईत आणण्यात आले आहे.मालवणी येथून बेपत्ता झालेल्या युवकांना देशाबाहेर पळून जाण्यासाठी रिझवाननेच मदत केल्याचा संशय एटीएसला आहे.त्या अनुषंगाने एटीएसने आपल्या तपासाला सुरवात केली आहे.या प्रकरणाचा सखोल तपास करणे बाकी असल्याने एटीएसने रिझवानचा ताबा आपल्याकडेच ठेवल्याचे या तपासाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.