Thursday, January 15, 2015

इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी अल्लाह मदत करो..


वांद्रे - कुर्ला संकूल येथील अमेरीकेसह वेगवेगळ्या देशांच्या ऍम्बेसीतील उच्चपदस्थांच्या मुलांच्या शाळेवर हल्ला घडविण्याचा कट आखण्यासंबंधीचा कट आखल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या अनीस अन्सारीने उसारीम लोगन या नावाने ओमर इल्हाज या व्यक्तीसोबत केलेल्या चॅटींगचा हा सारांश. 

ओमर इल्हाज ः कधी काय आणि कसं करायचं याची तु मला हिंट दे. 

उसारीम लोगन ः येत्या दोन महिन्यांत जगाला त्याचा अनुभव येईल. हे जर यशस्वी झालं, तर मला काय म्हणायचंय ते तुला फार शोधावं लागणार नाही. 

ओमर ः अल्लाह हू अकबर..मी तुला काय मदत करू शकतो अखी (मित्रा) ? मला एक नमुना तरी दाखव. 

ओमर ः मित्रा, तु आहेस ना ? सर्व ठिक आहे ना ? 

उसारिम ः होय. मी यापूर्वीच बरंचसं बोललोय. मी एवढं बोलणं बरं नाही. ठरवलेल्या ऑपरेशनसाठी हे हानिकारक आहे. मला वाटतंय तुला ते कळत असेल. 
ओमर ः मी समजतोय मित्रा. तु मला तुझ्या कामाचा एखादा तरी नमुना दाखवू शकशील अशी आशा आहे. माझ्या इमेलवर लक्ष ठेव फक्त. हवं तर मला टेस्ट मेल पाठव.म्हणजे दुसऱ्या लाईनवरून सुद्धा मी तुझ्या संपर्कात असेन.पण, मला तुझ्यासोबत राहू दे. 

उसारीम ः दुर्दैवाने ही अमेरीकन जमिन नाही. पण, त्यांच्याशी मित्रत्वाचे नाते असणारा हा देश आहे.त्यामुळेच इथे फार मोठ्या प्रमाणावर अमेरीकन ऍम्बेसी आणि शाळा आहेत. 

ओमर ः अमेरीकन असलं काय अन नसलं काय, काफीर सर्वत्र आहेत. ते सर्व सांडपाण्यातील उंदरं आहेत.इच्छा असेल तेथे मार्ग सापडतो.आपले प्रियजन सुद्धा मदत करतील.त्यामुळे मला बाहेर ठेवू नकोस मित्रा.मी तुझी मदत करीन 

उसारीम ः तु कुठला आहेस ? 

ओमर ः लबनॉन. पण, सध्या दार अल हर्ब येथे राहतो. 

उसारीम लोगन ः सौदी ? 

ओमर ः जर मी तुला सांगितलं तर तु मला अडचणीत तर आणणार नाहीस ना ? मी इथं माझ्या मर्जीने आलेलो नाही. 

उसारीम ः प्लीज.. तुझ्यासारखे खूप आहेत. तुम्हा सगळ्यांना इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी अल्लाह मदत करो.आता बोलत जा. 

ओमर ः मी क्रुर अशा युनायटेट स्नेक्‍स ( स्टेट्‌स) ऑफ अमेरीकेत आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या मर्जीनुसार नाही. आपण सर्व रयत-अल- उकाब या बॅनर खाली एकत्र राहू शकू. 

उसारीम ः सुभानअल्लाह.. तिथं तुला तुझं भवितव्य माहितीये ? 

ओमर ः तु माझी थट्टा करतोयस ? ज्या ठिकाणी राहणं मला पसंत नाही तिथं राहणं माझ्यासाठी कसं सुदैवी असेल ? 
मित्रा, तु माझ्यासोबत असावास असं मला वाटतं. 

उसारीम ः येमेन, सोमालिया ते अफगाणिस्तानमधील सर्व मुजाहिदीनांना आज अमेरीकेत असावं असं वाटतंय. तेथे ते स्वतःसोबत हौतात्म्याचे पट्टे घेऊन फिरतायत. आजच्या तारखेला या प्रत्येकाला अमेरीकेत असावं असंच वाटतंय. शत्रुला त्याच्या स्वतःच्या घरात शिरून मारावं, असं प्रत्येकाला वाटतंय. तुला लोन "वुल्फ ऍटॅक्‍स" बद्दल माहितीये ? असा हल्ला अमेरीकेत करण्याचं प्रत्येकच मुजाहिदचं स्वप्न आहे. आपण खूप लांब आहोत.फार कही करू शकत नाही. नईम इब्ने मसूद सारखं. आठवलं ? प्रेशितानं म्हटलंय, आमच्यासह तुम्ही "वन मॅन आर्मी' आहात. आता तुमच्याकडच्या लोकांपर्यंत जा आणि त्यांना आतून कमकुवत करा. या युद्‌धात हाच निर्णायक मुद्दा ठरला. 

ओमर ः त्यामुळेच तु मला तुझ्यासोबत ठेवावंस असं वाटतंय मित्रा. मला काही तरी करायचंय.तुलाही जर असंच वाटत असेल तर मी योग्य ठिकाणी आहे. 
उसारीम ः कोणाच्याही मदतीशिवाय तु स्वतःच खूप काही करू शकतोस. तु काय नियतकालिकं वाचून प्रभावित झालासं ? 

ओमर ः नजिकच्या काळात नाही. पण, मी याबाबत काही लिंक्‍स शोधल्या. मला त्या सापडल्या नाहीत. 

उसारीम ः शोध सुरू ठेव मित्रा. काही मार्ग असेही आहेत. ज्याने तु ओबामाच्या पायाखालची जमिन सरकवू शकशील. तेही केवळ शंभर डॉलरमध्ये. त्यासाठी फक्त धैर्य असायला हवं. तुला वाहनातील बॉम्ब, आयईडी किंवा प्रेशर कुकर किंवा थर्माईड बॉम्ब वगैरे माहित आहे ? 

ओमर ः होय नक्कीच. गरम रक्त असलेल्या कोणत्या मुजाहिदला या गोष्टी कशा माहित नाहीत ? 

उसारीम - मग, कशाची वाट पाहतोयस ? तुझ्या अवतीभोवती पुष्कळ टार्गेट्‌स आहेत. 

ओमर ः हो. तुला मला मदत करायची इच्छा आहे ? 

उसारीम ः मी कशी करू शकेन? मी अमेरीकेपासून खूप लांब आहे. 
ओमर ः तु कुठे आहेस ? 
उसारीम ः हिंद..भारत. 
ओमर ः ओहो..ओके.. माशाअल्लाह माशाअल्लाह.. काश्‍मिरवरून भारतीय भावंडांची स्वतःचीच लढाई सुरू आहे. 

उसारीम ः या युद्धात आता काश्‍मिरपासून श्रीलंकेपर्यंत अशा संपूर्ण भारतीय उपखंडावर कब्जा करण्याची आपली तयारी सुरू आहे. 

ओमर ः अल्लाह अकबर. आणि हे लवकरच शक्‍य होईल. 
उसारीम ः इन्शाअल्लाह 
ओमर ः पण, मला तुझा प्लॅन आवडला मित्रा. तु जन्मजात लीडर आहेस आणि प्रेरणा देणारा आहेस.मी तुझा सल्ला घेत राहिन.मी तशी तयारी करतो.पण, मला थोडी मदत लागेल. 

उसारीम ः अल्ला तुझ्या सोबत आहे. तु हवा तेव्हा माझा सल्ला घेऊ शकतोस. 

ओमर ः पण, तु तुझ्या नियोजित प्लॅन्सबद्दल पुन्हा एकदा विचार करावंस असं मला वाटतं.कृपया कृपया कृपया काळजी घे. आणि तु शाळांना टार्गेट का करू इच्छीतोस ? तिथं निष्पाप लहान मुले असतात.त्यांची काहीही चूक नसते.तुझ्या या कटाबद्दल तु खरंच विचार करावास. 
उसारिम ः अमेरीकन शाळा. या शाळांत अमेरीकेशी मित्रत्व असलेल्या फ्रान्स आणि इटलीसह दहा देशांची मुले असतात. शत्रुला यापेक्षा जास्त कुठे लागेल ? आणि निष्पाप मुलं..त्यांच्यापैकी कुणालाच निष्पाप म्हणता येणार नाही. इस्लामिक शरीयाप्रमाणे जी 13 वर्षाखालील आहेत अशा मुलांव्यतिरीक्त. 
ओमर ः मित्रा, मला काय म्हणायचंय ते तु समजत नाहीयेस. तुझ्या प्लॅन्सचा तु पुन्हा एकदा विचार कर. शाळेची मुलं किंवा शाळेला टार्गेट करण्याबाबत तुझ्या आमिर किंवा शेखचा सल्ला घे. 

उसारिम ः इथं आम्हीच आमचे आमिर आहोत. गुप्तपणे किंवा खुलेआम जिहादी कारवाया करू शकेल अशी कश्‍मिर शिवाय जिहादी संघटना इथं नाही. इथल्या काफीरांनी गेल्या सत्तर वर्षांपासून आपल्या महिला व बालकांवर अत्याचार केल्याचा इतिहास आहे.अमेरीका आणि युरोपचा विचार केलास तर, 1920 पासून आजपर्यंत तब्बल दहा लाख जणांचा हिशेब आपल्याला चुकता करायचाय. 

उसारीम ः शत्रुला जिथे जास्त लागेल तिथे मारायचं असतं. ते म्हणजे त्या देशाचे सामान्य नागरीक. सैनिक तर असेही मारले जातात.ते त्याचसाठी असतात. 
ओमर ः मला माहितीये मित्रा. तुझं म्हणणं पटतंय सुद्धा.पण, तुला भारतात असे टार्गेट्‌स कुठे सापडतील ? 

उरासिम ः मुंबईत. खूप आहेत. 

ओमर ः अल्लाह अकबर, तु किती वर्षे भारतात राहतोय ? 

उरासिम ः माझा जन्मच इथला आहे. 

ओमर ः माशाअल्लाह, मित्रा, तुझा कट आणि सूचना मला खूप आनंद देतोय. 

उसारिम ः जेव्हा, तुम्ही त्याची अंमलबजावणी कराल तेव्हाच ते आनंददायी असते. कदाचित तुला हे माहित नसेल की तुझे हे लहानसे कृत्य इस्लामिक राष्ट्र निर्मितीसाठी लढणाऱ्या मुजाहिदापेक्षा किती तरी जास्त परीणामकारक आहे. अमेरीकेने मध्य पूर्वेत सुरू केलेले युद्धा त्यांच्याच घरात पोचल्याचं लक्षात आल्यास जगभरात इस्लामिक राष्ट्रासाठी लढणाऱ्या मुजाहिदीनांचा हा विजय असेल. 
ओमर ः आमिन मित्रा. तुझ्याकडून किंवा आणखी कोणाकडून थोडीशी मदत मिळाली तर बरं होईल. तु तुझ्या ऑपरेशनसाठी फंडींगचा उल्लेख केलास. 

उसारीम ः त्यासाठी वाघाच्या काळजाचे आणि पर्वतासारखे पाठीशी उभे राहणारे मुस्लीम हवेत.होय. या कामासाठी फंड कमी पडतोय. 

ओमर ः मित्रा, मी तुला पुन्हा एकदा विनंती करतो, शाळांना टार्गेट करण्याबाबत तु पुन्हा एकदा विचार करावास. सिरीया, लेबनॉन, जॉर्डन, तुर्कस्थान आणि तुर्कस्थानमधून निघालेले रेफ्युजी कुठ राहत असतील ? काही माहिती आहे ? अशाच रिकाम्या शाळांत ते राहतात. 

उरासिम ः माझ्या हिटलिस्टवर असलेली ही कोणतीही साधीसुधी शाळा नाही.अमेरीका आणि युरोपच्या वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची मुले शिकत असलेली ही व्हीआयपी शाळा आहे.शिवाय इथला स्टाफ, शिक्षक वगैर सगळेच हायप्रोफाईल आहेत.हे काही साधंसुध काम नाही.या शाळेला भारतीय सुरक्षायंत्रणांची अहोरात्र सुरक्षा असते. 

ओमर ः शाळांना टार्गेट करण्याचे हे चांगलं कारण आहे. 

उरासिम ः जसं मी आधीच म्हटलं, हे काही खायचं काम नाही.इथं सुरक्षायंत्रणांचा चोवीस तास सुरक्षेचा गराडा असतो. 

ओमर ः मित्रा, मी तुझ्या सोबत आहे. "डवला अल इस्लामिया' प्रमाणे तुझं धैय्य साध्य न झाल्यास मला खेद वाटेल. 

ओमर ः तुला जावंच लागेल मित्रा. अल्लाह आपल्यासोबत राहो आणि आपल्याला योग्य गोष्टी करण्यासाठी तो मार्गदाता होवो. 

ओबामा यांच्या पायाखालची जमिन आपल्याला सरकवता येईल

 "अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पायाखालची जमिन आपल्याला सरकवता येईल.ती सुद्धा अवघ्या शंभर डॉलर खर्चात.पण, त्यासाठी आपल्याकडे धैर्य असायला हवं,' हे फेसबुक चॅटींग आहे वांद्रे- कुर्ला संकुल येथील अमेरीकन ऍम्बेसीतील उच्चपदस्थांची मुले शिकत असलेल्या शाळेत स्फोट घडविण्याचा कट आखल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या अनीस अन्सारीचे. सध्या तुरूंगात असलेल्या अन्सारीने "उरासिम लोगन' या नावाने एका समविचारी तरूणासोबत केलेल्या या चॅटींगचा संपूर्ण सारांश "सकाळ' चया हाती लागला आहे. 

अंधेरीच्या एका बहूराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असलेल्या अनीस (24) ला एटीएसने ऑक्‍टोबर महिन्यात अटक केली. इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरीया (आयसीस) च्या कारवायांना समर्थन करणाऱ्या अनीसने बीकेसीतील शाळेवर पेशावर सारख्या हल्ल्याचा कट आखल्याचे फेसबुकवरील त्याच्या चॅटींगमधून स्पष्ट होते.स्वतःला अमेरीकेत राहत असल्याचे सांगणाऱ्या ओमर इल्हाज नावाच्या व्यक्तीसोबत त्याचे हे चॅटींग चालत होते.अवघ्या दोन महिन्यांत पूर्णत्वाला येणाऱ्या या कटामुळे जगाला हादरा देण्याचे वक्तव्य करणारा अनीस त्याच्या साथीदाराला बॉम्ब तयार करण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा सांगतो. व्हेईकल बॉम्ब, आयईडी, प्रेशर कुकर आणि थर्माईड बॉम्बबद्दल सुद्धा त्याची ओमर सोबत चर्चा झाली होती. अनिसने ओमर सोबत केलेले हे चॅटींग एटीएसने पकडले होते. वेळेत केलेल्या या कारवाईमुळे एटीएसने घातपाती कारवाईचा मोठा कट उधळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अनीसने ओमरला अमेरीकेत घातपाती कारवाई करण्याचा सुद्धा सल्ला दिला होता. 
आयसीसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी, लंडनमधील मौलाना नोमन अली खान आणि दक्षिण आफ्रीकेतील मौलाना अहमद बदक यांच्या जहाल वक्तव्याचे व्हीडीओ सुद्धा अनीसच्या फेसबुक अकाऊंटवर होते. 
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसने काल (ता.14) अनीसविरूद्ध शिवडी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 778 पानांच्या च्या आरोपपत्रात फॉरेन्सिक सायन्स तज्ञांसह पन्नास साक्षीदार आहेत.याशिवाय एटीएसने सहा कॉम्प्युटर हार्ड डीस्क, व एका मोबाईल फोनचा चाळीस पानी फॉरेन्सिक सायन्सचा अहवाल जोडला आहे.या प्रकरणात एटीएस ओमर या आरोपीचा शोध घेत आहेत.

Sunday, January 11, 2015

ये करप्शन खतम हो सकता हेै..!





मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात भ्रष्टाचारी आणि लाचखोरांची खैर नाही, असेच म्हणावे लागेल. वर्षानुवर्षे भ्रष्ट लोकप्रतिनिधी, सरकारी बाबूंवर कारवायांची परवानगी मागणारी कितीतरी प्रकरणे शासन स्तरावर वेगवेगळ्या कारणांनी रखडली होती. या सगळ्या प्रकरणांचा कोणतीही दयामाया न दाखवता तितक्‍याच तत्परतेने निपटारा करायला सुरवात केली आहे. राज्य सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून लाचलुचपत विरोधी पथकाने (एसीबी) लाचखोर आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांविरूद्ध चालविलेल्या धडाकेबाज मोहिमेला नवी धार आली आहे.पदाचा गैरवापर करून कोट्यवधींची माया गोळा करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मालमत्ता गोठवण्याच्या फाईलवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली परवानगी हे राज्य भ्रष्टाचारमुक्तीकडे नेण्याच्या दिशेने उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे. 

सजामाच्या सर्वच क्षेत्रांत बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनतेची कामे सहज होतील अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे भाबडेपणाचे ठरावे, अशी स्थिती गेल्या काही वर्षांत निर्माण झाली आहे. साध्या ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत कोणत्याही सरकारी कार्यालयात वैयक्तिक कामासाठी जाणाऱ्याने घरातून निघण्यापूर्वी कामाच्या किंमतीवरून ते तडीस नेणाऱ्याला किती पैसे मोजावे लागतील हे ठरवूनच निघावे लागते.कोणतीही लालसा न बाळगता सहज काम करून देणारे हाताच्या बोटावर मोजता येतील असे अधिकारी व कर्मचारी सुद्धा आहेत.पण, आभाळ खायला दिले तरीही ते पुरणार नाही अशी हाव असलेल्यांच्या गर्दीत हा आकडा खूपच थोडा आहे.कार्यालयात सगळेच भ्रष्ट मार्गाने पैसे मिळवत असताना त्यात भाग न घेणारा निव्वळ बावळट किंवा भित्रा म्हणून गणला जातो. आजच्या पैशांच्या या दुनियेत नोकरी करून मिळणाऱ्या पगाराने एखाद्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागतील. पण, त्या पैशातून इतरांप्रमाणे छानछोकी करता येणार नाही. झटपट श्रीमंत होत बंगला, महागड्या कार, मोठ्या बॅंक बॅलन्सचे असलेले स्वप्न पूर्ण करता येणार नाही, असा विचार करणारे भ्रष्टाचाराच्या या मार्गाला लागल्याचे एसीबीने गेल्या काही दिवसांत केलेल्या कारवायांतून सहज स्पष्ट होते.आदीवासी, वंचित, अपंगांसह अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना मंजूर करण्यासाठीही त्यांच्याकडून पैसे उकळणारे आहेत. ज्यांच्याकडे अंगावरच्या फाटक्‍या कपड्यांशिवाय काही नाही, अशांकडून अनुदान मंजूर झाल्यावर त्या कामाचा मोबदला म्हणून लाचेचे पैसे उकळल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर बलात्कारामुळे कुटुंब उध्वस्त झालेल्या मुली व तरूणींना निर्भया योजनेतून साडेतीन लाख रूपये देण्याची योजना सरकारने सुरू केली.या पिडीत मुलींकडून ही मदत मिळवून देण्यासाठी पैसे मागणारे सुद्धा येथील कार्यालयांत जागोजागी फिरताना दिसतात. त्यामुळेच राज्याच्या सरकारी कचेऱ्यांत वाढलेला हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारकडून केले जाणारे प्रयत्न आश्‍वासक वाटतात. गेल्या काही महिन्यांत सरकारकडे मालमत्ता गोठविण्याची परवानगी मागणारी 45 प्रकरणे प्रलंबित पाठविली आहेत.या सगळ्या प्रकरणांत सरकारी बाबूंनी भ्रष्ट मार्गाने मिळवलेली 191 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची मालमत्ता गुंतली आहे.यातील सर्वात मोठी मालमत्ता उपजिल्हाधिकारी नितिश ठाकूर याची आहे.एसीबीच्या लेखी ठाकूरने त्याच्या पदाचा गैरवापर करून मिळवलेली मालमत्ता तब्बल 143 कोटी रूपये एवढी आहे.प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी मोठा आहे. म्हाडात वरीष्ठ पदावर काम केलेल्या नितीश ठाकूरने गोळा केलेली मालमत्ता शेकडो कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते.रायगडच्या पेण व अलिबाग पट्ट्यात शापूरजी पालोनजी या कंपनीला शेकडो एकर जमिन मिळवून देण्यासाठी नितेश ठाकूर व त्याच्या भावाने तब्बल 258 कोटी रूपये घेतले होते.तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी याविषयी विधीमंडळाच्या सभागृहात आर्थिक व्यवहाराचा हा मुद्दा उपस्थित करीत याबाबत चौकशी सुरू असल्याचे म्हटले होते. मालमत्ता गोठविण्यासाठी सरकारकडे गलेल्या यादीतील सर्वात कमी मालमत्ता 35 हजारांची आहे. गडचिरोलीच्या चिरमुर येथे ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचा सचिव तसेच मुख्याध्यापक असेलला राजकुमार शेंडे याने गोळा केलेली ही मालमत्ता आहे. सरकारकडे प्रलंबित असलेल्या 45 पैकी आठ प्रकरणांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.मुख्यमंत्र्यांच्या कामाचा उरक लक्षात घेता येत्या काही दिवसांतच उर्वरीत प्रकरणांची सुद्धा मंजूरी मिळेल अशी चिन्हे आहेत. 


मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे गृह विभाग ठेवून घेतल्यामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. अनेकदा एखाद्या विषयावर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात एकमत होत नसल्याने प्रकरणे वर्षानुवर्षे पडून राहत. भ्रष्ट अधिकारी व लोकसेवकांवर कारवायांची परवानगी मागणाऱ्या फायलींचेही अनेकदा असेच व्हायचे.कारवाईला परवानगीच मिळत नसल्यामुळे अधिकारी व लोकप्रतिनिधी सुद्धा चांगलेच सोकावले होते. सरकारला एसीबीकडून वारंवार पत्र धाडली जायची.पण, या पत्रांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जायचे नाही.फडणवीस यांनी गृह विभाग स्वतःकडे ठेवल्यामुळे कुणाच्या नाराजीचा प्रश्‍नच येत्या काळात येणार नाही. भ्रष्ट व्यक्तीवर कारवाईची परवानगी मागणारा प्रस्ताव गृहविभागाने पाठविल्यानंतर या प्रस्तावाच्या फायलींचा होणारा गृहमंत्री ते मुख्यमंत्री या प्रवास आता थांबला आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे म्हटले होते.भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोकप्रतिनिधी अथवा सरकारी बाबू अशा कोणालाही आपले सरकार सोडणार नाही, असे ते म्हटले होते. त्याचीच प्रचिती सध्या दिसत आहे.निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर लाचलुचपत विरोधी पथकाला माहिती अधिकार कायद्यातून वगळण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. याला कारणे काहीही असली तरी हा प्रकार पुढे येताच हा निर्णय मागे घेण्यात आला. यावरूनच फडणवीस सरकारची भ्रष्ट व्यक्तींवर कारवाई करण्याची लाचलुचपत विरोधी पथकाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गेल्या दोन वर्षांच्या काळात केलेल्या कारवायांचा उल्लेख येथे प्रकर्षाने करावा लागेल. त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे एसीबीत जणू नवचैतन्य आले आहे. लाच मागणाऱ्यांविरूद्ध कारवायांत शेकडो पटींनी वाढ झाल्यामुळे कोणता व्यक्ती लाच देण्याच्या बहाण्याने आपल्याला अडकवणार तर नाही ना, अशी भिती सरकारी बाबूंमध्ये निर्माण होऊ लागली आहे.लाचखोरीसंबंधी कोणत्याही तक्रारीसाठी त्यांनी राज्यभरात 1064 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. एसीबीची वेबसाईट, फेसबुकवरून ऑनलाईन तक्रारी करण्याची सोय आहे.एखाद्या भ्रष्ट व्यक्तीविरूद्ध तक्रार केली तर, आपले काम होणार नाही अशी भीती अनेकांच्या मनात असते. अशा व्यक्तींसंबंधीची माहिती द्या. तातडीने कारवाई केली जाईल, अशी हमी देत दीक्षित यांनी सर्वसामान्यांच्या मनात असलेली ही भीतीच काढून टाकली आहे.त्यामुळे लाचखोर आणि भ्रष्ट व्यक्तींविरुद्धच्या तक्रारी वाढल्या.लोकांनी निर्भीड होऊन पुढे यावे. तुमचे काम रखडणार नाही याची दक्षता एसीबी घेईल असे ठोस आश्‍वासनच दीक्षित यांनी दिले आहे. लाचखोरी आणि भ्रष्ट व्यक्तींसंबंधी न्यायालयात प्रलंबित असलेल्या 3081 खटल्यांचा निपटारा होऊन दोषसिद्धीसाठी त्यांनी प्रयत्नांना सुरवात केली आहे.एसीबीच्या खटल्यांत सध्या राज्याचे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण 30 टक्के आहे. गेल्या अनेक वर्षांतील कारवायांचा विचार करता हे प्रमाण सर्वाधिक आहे. काही वर्षांपूर्वी "ये करप्शन कुछ ले देके खतम नही हो सकता', असे गमतीने म्हटले जायचे.पण, राज्य सरकारची प्रबळ इच्छाशक्ती आणि एसीबीत प्रवीण दीक्षित यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची टीम त्यांच्या सोबत असेल तर, "कुछ ले दिये बगैरही करप्शन खतम हो सकता है', असे म्हणता येईल. 

ज्ञानेश चव्हाण 
dnyaneshchavan@rediffmail.com