Wednesday, March 31, 2010

बेस्टच्या धडकेने तरुणाचा मृत्यू


देवनारमध्ये संतप्त जमावाकडून चार बसची तोडफोड



घाटकोपरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बेस्ट बसने वीस वर्षीय तरुणाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी देवनार येथे घडली. या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने अपघातग्रस्त बेस्टच्या चालकाला बेदम मारहाण करून चार बेस्ट बसची तोडफोड केली. अपघाताच्या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने याठिकाणी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अपघात घडविणाऱ्या बेस्टचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
देवनार कत्तलखान्याजवळ टाटा कॉलनी झोपडपट्टीत सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. याठिकाणी एका चप्पलच्या दुकानात काम करणारा बिलाल जुल्फीकार खान (20) हा तरुण डोक्‍यावर चप्पलच्या बॉक्‍सने भरलेली गोणी घेऊन जात होता. या वेळी मागून आलेल्या बेस्टच्या 380 क्रमांकाच्या भरधाव बसने त्याला जोरदार धडक दिली. बसच्या मागील बाजूला असलेल्या चाकाखाली आल्याने बिलाल जागीच मरण पावला. या घटनेला बेस्ट बसचालक जबाबदार असल्याचे पाहून या परिसरातील काही रहिवाशांनी चालक भरत जानू नराळे (45) यांना खाली उतरवून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या प्रकाराची माहिती काही वेळेत बिलालच्या नातेवाईक व मित्रमंडळींसह सर्वच रहिवाशांना झाली. बिलालच्या मृत्यूचा राग अनावर झाल्यामुळे या नागरिकांनी या परिसरात येणाऱ्या बेस्टच्या गाड्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. अर्ध्या तासाच्या काळात या मार्गाने जाणाऱ्या चार बेस्ट बसमधील नागरिकांना खाली उतरवून येथील संतप्त जमावाने त्यांची तोडफोड केली. तोडफोड झालेल्या बेस्ट बसमध्ये माहीमला जाणाऱ्या दोन, तर मुंबई सेंट्रल व घाटकोपरच्या अमृतनगरला जाणाऱ्या प्रत्येकी एका बसचा समावेश आहे. गाड्यांची तोडफोड करीत असतानाच तरुणांच्या एका जमावाने गोवंडी
रेल्वेस्थानकापासून टाटानगर व देवनार कत्तलखान्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडविला. त्यामुळे या परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती. स्थानिक पोलिसांना तोडफोड करणाऱ्या जमावावर नियंत्रण आणणे अवघड झाल्याने या भागात राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांची तुकडी पाठविण्यात आली. पोलिस आल्याचे पाहून गाड्यांची तोडफोड करणारा जमाव तेथून काही क्षणातच पळून गेला. पोलिसांनी अपघातात मरण पावलेल्या बिलाल खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला, तर रहिवाशांच्या मारहाणीत जबर जखमी झालेला बसचालक भरत नराळे याला उपचारासाठी शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या बसचालक नराळे याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. एस. भालेराव यांनी सांगितले. बेस्ट बसच्या नुकसानीप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचेही ते म्हणाले.


(sakal,17 th january)

चौदा वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्याला अटक

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली


चौदा वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी तिच्या इमारतीतच राहणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हत्येपूर्वी या मुलीवर बलात्कार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हत्येनंतर मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या गोणीवरून मारेकऱ्याचा सुगावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाशीनाक्‍याच्या म्हाडा वसाहतीत असलेल्या पंचरत्न सोसायटीत 8 जानेवारीला हा प्रकार उघडकीस आला. आरसीएफ पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता. ज्या गोणीत या मुलीचा मृतदेह बांधून टाकला, ती गोणी याच परिसरात राहणाऱ्या एका भाजीविक्रेत्या महिलेची असल्याचे स्पष्ट झाले. या भाजीविक्रेत्या महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता पंचरत्न सोसायटीत तळमजल्यावर राहणाऱ्या नागेश घोलप (24) या तरुणाच्या आईने एक गोणी नेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या हत्येमागे नागेश घोलप असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी नागेशच्या हालचालीवर लक्ष ठेवले. नागेशविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून पोलिसांनी त्याला अटक केली.

7 जानेवारीला शॅम्पू आणण्यासाठी जात असलेल्या या मुलीला त्याने घरात बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले. शुद्धीवर आल्यानंतर ही मुलगी झालेल्या प्रकाराची बाहेर वाच्यता करेल, या भीतीने त्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर घराला कुलूप लावून तो बाहेर निघून गेला. त्याच रात्री उशिरापर्यंत या मुलीचा तिच्या नातेवाईकांकडून शोध सुरू होता. अखेर तिच्या नातेवाईकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली. दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्याने या मुलीचा मृतदेह गोणीत कोंबून शेजारीच असलेल्या एका रिकाम्या घरात ठेवून दिल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिस निरीक्षक शैलेश पासलवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बापकर यांच्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावला.


(sakal,15 th january)

शीव येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

पाचव्या मजल्यावरून मारली उडी

शीव येथील साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात एफ.वाय. बी.कॉम.ला असलेल्या अठरा वर्षांच्या मुलीने आज सायंकाळी ती राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नसले, तरी अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार घडला असावा काय, याचा पोलिस शोध घेत आहेत.
या घटनेची माटुंगा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ब्राह्मणवाडी येथील के. सुब्रमण्यम मार्गावर असलेल्या "अमर व्हिला' इमारतीमध्ये हा प्रकार घडला. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या शिबानी आशीष सेठ या विद्यार्थिनीने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या खाली उडी मारली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शिबानीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील देशमुख यांनी दिली. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी झालेल्या या घटनेनंतर माटुंगा परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.


बेरोजगार तरुणाची आत्महत्या

बेरोजगारीने ग्रासलेल्या एका 30 वर्षीय मद्यपी तरुणाने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज दुपारी ना. म. जोशी मार्ग परिसरात घडला.
किशोर कालिदास सोळंकी असे या आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ना. म. जोशी मार्ग येथील मरिअम्मा चाळीत राहणाऱ्या किशोरला दारूचे व्यसन होते. 10 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या किशोरची पत्नी त्याच्या व्यसनामुळे त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घरात एकटाच असलेल्या किशोरने नायलॉनच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.


(sakal,15 th january)

मुंबई पोलिसांवर राजस्थानात गावकऱ्यांकडून हल्ला

एक ठार; दोन पोलिस जखमी


एका गंभीर गुन्ह्यात हव्या असलेल्या दोघा गुन्हेगारांना पकडण्यासाठी राजस्थानला गेलेल्या जुहू
पोलिसांच्या पथकावर स्थानिक गावकऱ्यांनी आज हल्ला केला. या वेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गावकऱ्यांच्या दिशेने केलेल्या गोळीबारात एक ग्रामस्थ ठार झाला. गावकऱ्यांच्या हल्ल्यात एक अधिकारी आणि एक शिपाई जबर जखमी झाले आहेत. राजस्थान पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने याबाबत माहिती देण्यास अतिरिक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नकार दिला. जखमी झालेल्या पोलिसांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जुहू येथील एका महिला डॉक्‍टरच्या घरात झालेल्या 40 लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी जुहू पोलिसांचे पथक राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यात दाखल झाले. स्थानिक पोलिसांना आपल्या कारवाईची कोणतीही कल्पना न देता जुहू पोलिसांनी जयंतीलाल या आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिस डुंगरपूरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बंबारा गावात गेले. याठिकाणी जयंतीलालचा साथीदार असलेल्या दिनेश नावाच्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिस गेले. या वेळी दिनेशच्या नातेवाईकांनी आरडाओरड करायला सुरुवात केल्याने त्याचे अपहरण केले जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना वाटले. त्यामुळे मुंबईतून आलेल्या या पथकावर ग्रामस्थ धावून गेले. गावातील तरुण आणि वृद्ध अंगावर धावून आल्याचे पाहून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गावकऱ्यांच्या दिशेने गोळीबार करायला सुरुवात केली. यात मगन हा ग्रामस्थ ठार झाला. या वेळी ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने पोलिसांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत एक पोलिस उपनिरीक्षक व एक पोलिस शिपाई जबर जखमी झाले आहेत. जखमींवर उदयपूर येथे उपचार सुरू आहेत. एका गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जुहू पोलिसांचे पथक राजस्थानला गेले होते. याबाबत राजस्थान पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नसल्याने कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.


(sakal,15 th january)

पोलिस महासंचालक पदासाठी रॉय, श्रीवास्तव, गफूर यांची नावे


निवड समितीच्या बैठकीत शिवानंदन यांचे नाव पिछाडीवर




तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्तीचा तिढा अखेर सुटला आहे. महासंचालकांच्या नियुक्तीसंबंधी राज्य सरकारने गठित केलेल्या निवड समितीच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या पदाकरिता अनामी रॉय, पी. पी. श्रीवास्तव व हसन गफूर या तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांवर प्रामुख्याने चर्चा झाली. या अधिकाऱ्यांच्या नावांची अंतिम यादी उद्या (ता. 14) गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पाठविली जाणार आहे. सेवाज्येष्ठतेत कमी पडत असल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडल्याचे गृह खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
राज्य पोलिस दलात अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे राज्याचे पोलिस महासंचालक पद एस. एस. विर्क यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होते. ऑक्‍टोबरअखेर विर्क यांच्या झालेल्या सेवानिवृत्तीनंतर सरकारने या पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक अनामी रॉय यांच्याकडे सोपविला. याच काळात पोलिस दलात असलेले अंतर्गत वाद व गटबाजीने उचल खाल्ल्याने गेले तीन महिने हे पद भरण्यासंबंधी अंतिम निर्णय सरकारने घेतला नव्हता. या पदावर योग्य अधिकाऱ्याची निवड व्हावी यासाठी राज्याचे मुख्य सचिव, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव व महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा त्रिसदस्यीय समितीचे सरकारने गठण केले होते.
सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या दोन महत्त्वाच्या निकषांचा विचार करता, या पदासाठी अनामी रॉय, पी. पी. श्रीवास्तव, हसन गफूर व डी. शिवानंदन या चार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनेलमधून ही नियुक्ती करण्यात येणार होती. याबाबत गठित करण्यात आलेल्या समितीची आज मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तब्बल दीड तास झालेल्या या बैठकीत सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या निकषांवर अनामी रॉय, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव आणि गृहनिर्माण विभागाचे महासंचालक हसन गफूर यांच्याच नावावर विशेषत्वाने खल झाल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. सेवाज्येष्ठतेत कमी पडत असल्याने पोलिस महासंचालक पदाच्या स्पर्धेत मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन मागे पडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी उद्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पाठविली जाणार असून, यापैकी एका अधिकाऱ्याच्या नावावर येत्या आठवडाभरात शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती गृह खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.


(sakal, 14 th january)

सरबज्योतसिंगवर पाच दिवसांत आरोपपत्र

एक कोटीच्या लाचप्रकरणी सीबीआयची माहिती


नाशिक येथील कंत्राटदाराकडून एक कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेला केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांचा मुलगा सरबज्योतसिंग ऊर्फ स्वीटीबाबा याच्याविरुद्ध येत्या पाच दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात सीबीआयने बुटासिंग यांचाही जबाब नोंदविला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी केंद्राने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा 25 टक्के जास्त काम करणाऱ्या मुंबई विभागाने यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांत पोचण्याचे लक्ष्य ठरविल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी दिली.

सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2009 मध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा आज झालेल्या पत्रकार परिषदेत घेण्यात आला. जुलै 2009 मध्ये सीबीआयने एक कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केलेला केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष बुटासिंग यांचा मुलगा सरबज्योत सिंग याला अटक केली होती. नाशिक येथील कंत्राटदार रामराव पाटील यांची अनुसूचित जाती-जमाती आयोगापुढे सुनावणी होणार होती. या प्रकरणातून मुक्तता करून देतो असे सांगून सरबज्योत सिंगने त्याच्याकडून तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. यानंतर या प्रकरणात एक कोटी रुपयांची तडजोड झाली होती. ही रक्कम घेताना सरबज्योतचा साथीदार अनुप बेगी याला सीबीआयने अटक केली होती. ही रक्कम सरबज्योतसाठी घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर सीबीआयने त्यालाही अटक केली. सीबीआयने केलेल्या तपासानंतर या प्रकरणाचे आरोपपत्र तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या पाच दिवसांत सबरज्योतवर आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी सांगितले.
आयकर खात्यातील सहायक आयुक्त राजकुमार भाटिया, अतिरिक्त आयुक्त केशकामत, वायरलेस विभागातील विभागीय परवाना अधिकारी लीलाधर हुमणे यांच्यावर सापळा रचून कारवाया करण्यात आल्या. कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकातून गेली काही वर्षे सुरू असलेले रेल्वे पोलिस बिलातील जवानांचे रॅकेटही सीबीआयने नुकतेच उद्‌ध्वस्त केले. परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी तयार होणाऱ्या औषधांच्या गैरव्यवहाराचा प्रकारही सीबीआयने उघड केल्याची माहितीही सिंग यांनी दिली. गेल्या वर्षभरात सीबीआयला संतोषकुमार झा आणि धनंजयकुमार या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या प्रकरणात कारवाई करण्याची परवानगी केंद्राकडून मिळालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी सीबीआयच्या युनिटने पुण्यात सुरू केलेल्या चौकशीत सात प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात सैन्यदलासाठी केल्या जाणाऱ्या खरेदीत निकृष्ट दर्जाच्या वस्तू पुरविल्याचे उघड झाले आहे. बर्फाच्छादित प्रदेशात ट्रक घसरू नयेत यासाठी वापरण्यात येणाऱ्या नॉन स्कीड चेनच्या खरेदीत 156 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण तपासाधिन आहे. डिसेंबर 2007 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले होते. याशिवाय जुलै 2008 मध्ये दाखल करण्यात आलेले बीएमटी गाड्यांच्या मडगार्ड खरेदीतील 5 कोटी 49 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणातील तपासाचे कामही अंतिम टप्प्यात आहे.



सीबीआय (मुंबई) ची कामगिरी 2009
दाखल गुन्हे- 52
गैरव्यवहार उघडकीस आणण्याचे प्रकार- 62
न्यायालयात ट्रायल सुरू असलेले गुन्हे- 38
लाचखोर अधिकाऱ्यांवर लावलेले सापळे- 48



(sakal,6 th january)

पोलिसांच्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी बिल्डरांचा निधी

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतून दीड कोटीचे धनादेश


मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिसांच्या आधुनिकीकरणाला वेग येत असतानाच महाराष्ट्र चेंबर्स ऑफ हाउसिंग इंडस्ट्री (एमसीएचआय) या संघटनेशी संबंधित असलेल्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील बिल्डर्सनी मुंबई पोलिसांना दीड कोटी रुपयांचा निधी बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीसाठी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पोलिस दलावर टीकेची झोड सुरू झाली आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठमोठे गृहनिर्माणाचे प्रकल्प उभारणाऱ्या बिल्डर्सनी मुंबई पोलिस दलाकरिता मदत म्हणून दीड कोटी रुपयांचे धनादेश दिले. सहा महिन्यांपूर्वी पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांच्या कार्यालयात या बिल्डर्सनी भेट घेतली होती. या वेळी नव्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीकरिता प्रत्येक बिल्डरने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धनादेश पोलिस आयुक्तांच्या उपस्थितीत बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणाऱ्या कंपन्यांना दिले. हे सर्व धनादेश राज्य सरकारच्या यादीत अधिकृत पुरवठादार म्हणून नोंद असलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटच्या पुरवठादारांना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. यापूर्वीही शहरातील पोलिस चौक्‍या खासगी बिल्डर्सकडून बांधून देण्याचे प्रकार समोर आल्यामुळे पोलिस खात्यावर टीका करण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर या चौक्‍या पाडण्यात आल्या. मुंबईकर म्हणून पोलिस दलासाठी काही तरी करता यावे या हेतूने मुंबई पोलिस दलासाठी मागविण्यात येणाऱ्या तीस बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीसाठी ही मदत दिल्याचे काही बिल्डर्सकडून प्रसिद्धिमाध्यमांना सांगण्यात येत आहे.

समाजासाठी काही तरी देणे लागतो या भावनेतून एमसीएचआयच्या बिल्डर्सनी पुढाकार घेऊन मुंबई पोलिस दलासाठी बुलेटप्रुफ जॅकेटच्या खरेदीसाठी निधी दिला आहे. त्यात गैर काहीच नसल्याचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी "सकाळ'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

(sakal, 13th january)

बारावीची विद्यार्थिनी व युवकाची आत्महत्या

मुलीच्या आत्महत्येचे गूढ; जीवनाला कंटाळल्याचे युवकाचे पत्र


मुंबईत वर्षारंभी सुरू झालेले आत्महत्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. पोईसर (कांदिवली-पूर्व) येथे बारावीच्या एका विद्यार्थिनीने; तर विलेपार्ले येथे एका सव्वीस वर्षीय युवकाने गळफास घेतला. या दोन्ही घटनांपैकी विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी युवकाने आपण जीवनाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे पत्र लिहून ठेवले आहे.
पोईसर येथे काल (ता. 11) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवानी वीरेंद्र सिंग (17) या विद्यार्थिनीने घरात ओढणीने गळफास घेतला. ती मालाडच्या एसएनडीटी महाविद्यालयात बारावी कॉमर्सला शिकत होती. तिचे वडील रिक्षा चालवतात. काल सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिची आई शेजारच्या मावशीसोबत बाजारात जाऊन आली. त्यानंतर दोघी शेजारच्या घरी गप्पागोष्टी करीत असतानाच घरात एकट्याच असलेल्या शिवानीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. घरी परतल्यावर तिच्या आईच्या लक्षात हा प्रकार आला. समतानगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची काल रात्री उशिरा नोंद झाली आहे. घरात शिवानीला कोणताही त्रास नव्हता, असे तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना सांगितले. शिवानीला दोन लहान भाऊ आहेत. ती अभ्यासातही हुशार असल्याने या घटनेमागे अभ्यासाचा तणाव कारणीभूत असल्याची शक्‍यताही त्यांनी नाकारली. या प्रकरणामागे प्रेमप्रकरण असावे का, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. एस. केंजाडे यांनी सांगितले.
विलेपार्ले येथे आज सकाळी मंगेश महादेव गुमक (26) या तरुणाने त्याच्या मावशीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाजीनगर येथील रामभवन चाळीत ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली असलेल्या मंगेशची आई आणि बहीण गावाकडे राहतात. विलेपार्ले येथे तो मावशी सेजल बाईंग यांच्याकडे राहत होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या रुग्णालयात गेल्या होत्या. घरात कोण नसल्याचे पाहून मंगेशने पंख्याला गळफास घेतला. मावशी घरी परतल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार लक्षात आला. या घटनेची विलेपार्ले पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांना त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. त्यात त्याने जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगून कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये, असे नमूद केले आहे.

(sakal,13 th january)

कुर्ल्यात मुलीची आत्महत्या

गेल्या आठवडाभरापासून मुंबईत सुरू असलेले आत्महत्यांचे सत्र अद्याप थांबलेले नाही. वडिलांच्या मृत्यूनंतर आईला आलेले वैफल्य सहन न करू शकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थिनीने आज तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरात घडला. या घटनेनंतर आठवडाभरात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सात झाली आहे. आत्महत्येपूर्वी तिने वहीत लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. अभ्यासाच्या तणावातून तिने हा प्रकार केल्याचे तपासात कुठेही निष्पन्न झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुर्ला पूर्वेला असलेल्या नेहरूनगर परिसरात श्रमजीवीनगर येथे ही घटना घडली. मेरी जसमन नाडर (17) असे या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चेंबूरच्या आचार्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या मेरीच्या वडिलांचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर ती आईसोबत श्रमजीवीनगर येथील घरात राहत होती. पतीच्या मृत्यूला आठ वर्षे झाली तरीही तिची आई रात्री-अपरात्री त्यांची आठवण काढून रडायची. आईचे हे नैराश्‍य मेरीला सहन होत नव्हते. तिची आई जवळच असलेल्या एका गार्मेंट कंपनीत काम करून स्वतःचा तसेच मेरीचा उदरनिर्वाह करीत होती. आज सकाळी आई नेहमीप्रमाणे कमाला गेली असताना मेरी तिच्या चाळ क्रमांक- 155 च्या खोली क्रमांक 85 येथील घरात एकटीच होती. घरात कोणी नसल्याचे पाहून तिने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला; तेव्हा मेरीचा मृतदेह पंख्याला लोंबकळत असल्याचे त्यांना आढळले. या प्रकाराची माहिती त्यांनी नेहरूनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठविला. मेरीने मृत्यूपूर्वी अभ्यासाच्या वहीच्या शेवटच्या पानावर इंग्रजी आणि तमीळ भाषेत लिहिलेले पत्र पोलिसांना सापडले आहे. "वडिलांच्या आठवणींनी आईचे रडणे मला सहन होत नाही. त्यामुळेच मी वडिलांना भेटायला जात आहे. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये,' असा या पत्रातील मजकूर आहे. या पत्रात तिने महाविद्यालयातील काही मित्र-मैत्रिणींची नावेही लिहिली आहेत. तिच्या पश्‍चात तिच्या आईला मदत करण्याचे आवाहनही तिने मित्रमंडळींना केले असल्याची माहिती नेहरूनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश काळे यांनी दिली. आतापर्यंतच्या तपास
ात अभ्यासाच्या तणावातून हा प्रकार झाल्याची शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी तिच्या मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविले जाणार असल्याचेही काळे या वेळी म्हणाले.

दरम्यान, मेरी नाडरच्या मृत्यूनंतर मुंबईत आठवडाभरात आत्महत्या करणाऱ्यांची संख्या सात झाली आहे. दादरच्या शारदाश्रम शाळेतील सातवीचा विद्यार्थी सुशांत पाटील, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर, चेंबूर येथील बारावीचा विद्यार्थी विनीत मोरे, भांडुप येथील आयआयटीचा अभियंता ज्ञानेश्‍वर नायक आणि मुलुंडच्या रेश्‍मा धोत्रे यांचा यात समावेश आहे.

(sakal,10th january)

भांडुपमध्ये अभियंत्याची गळफास लावून आत्महत्या

जीवनाला कंटाळलेल्या एका इंजिनिअरने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री भांडुप येथे उघडकीस आली.

या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाकळे यांनी दिली. भांडुप पूर्वेला रिमापार्क टॉवरमधील इमारत क्रमांक पाचच्या तेराव्या मजल्यावर हा प्रकार घडला. ज्ञानेश्‍वर सुधाकर नायक (34) असे आत्महत्या करणाऱ्या इंजिनिअरचे नाव आहे.

वांद्रे-कुर्ला संकुल येथील एका बड्या कंपनीत कामाला असलेला ज्ञानेश्‍वर काही दिवसांपासून तणावात होता. रजा असल्याने काल दिवसभर तो घरी होता. इंजिनिअर असलेली त्याची पत्नी आशा (31) काल सायंकाळी कामावरून परतली. यावेळी घराचा दरवाजा उघडण्यासाठी तिने पतीला हाक मारली. मात्र, तिला आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिने हा प्रकार नातेवाईक आणि पोलिसांना कळविला. घराचा लॅच तोडला तेव्हा हॉलमध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

ज्ञानेश्‍वर आणि वर्षा यांना तीन वर्षांचा एक मुलगा आहे. तपासात ज्ञानेश्‍वर काही दिवसांपासून तणावाखाली होता, अशी माहिती उघडकीस येत आहे. मात्र, घरात आत्महत्येबाबत कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरा त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिस त्याच्या कंपनीतील मित्रांचे जबाब नोंदविणार असल्याचे कांजूरमार्गचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाकळे यांनी सांगितले.

(sakal,8 th january)

मुंबई विद्यापीठाच्या कालिना वसतिगृहात तरुणाचा मृत्यू

रॅगिंगच्या प्रकारामुळे मृत्यूबाबत संशय


मुंबई विद्यापीठातून कन्नड विषयात पीएचडी करणारा पंचवीस वर्षीय तरुणाचा आज सकाळी विद्यापीठाच्या कालिना येथील वसतिगृहात मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने झाल्याचे पोलिस आणि विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थ्यासोबत विद्यापीठात रॅगिंगचा प्रकार झाला असल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची वांद्रे-कुर्ला संकुल पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
विजयकुमार रामापुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक -39 मध्ये गेल्या दोन वर्षांपासून तो राहत होता. पीएचडीच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या विजयकुमारने आज सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी त्याच्या मित्राकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली. वसतिगृहाचे वॉर्डन माधव पंडित विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅम्पसमध्ये शिकविण्यासाठी गेले असल्याने वर्गिस नावाच्या मित्राने त्याला जवळच असलेल्या दुर्गा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. यावेळी त्याने त्याच्या कर्नाटक येथे असलेल्या आई-वडिलांसोबत दूरध्वनीवरून बोलणेही केले. मात्र, उपचार सुरू असतानाच तो सकाळी साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या झटक्‍याने मरण पावला. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला.
गेली दोन वर्षे कालिना कॅम्पसमध्ये वास्तव्याला असलेल्या विजयकुमारवर जुलै महिन्यात रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली होती. यासंबंधीची लेखी तक्रार त्याने त्याच्या विभागप्रमुखांकडे दिली होती. यानंतर हा प्रकार सामोपचाराने मिटविण्यात आला होता, अशी माहिती वसतिगृहाचे वॉर्डन माधव पंडित यांनी दिली. विजयकुमार याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार व्यंकटरमणी यांनी सांगितले.

(sakal,8 th january)

मुलुंडमध्ये तरुणीची आत्महत्या

जीवनाला कंटाळलेल्या एका अठरा वर्षांच्या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी मुलुंड येथे घडली. दरम्यान, ठाणे येथे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे व या तरुणीच्या कुटुंबाचे नातेसंबंध असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पी. बी. लांडगे यांनी दिली.
मुलुंड पश्‍चिमेला जे. एन. रोड येथे असलेल्या विजयनगर रहिवासी सेवा संघाच्या वसाहतीत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रेश्‍मा कांतिलाल धोत्रे असे या तरुणीचे नाव आहे. घरकाम करणारी रेश्‍मा आज दुपारी तिच्या लहान बहिणीसोबत घरात होती. लहान बहिणीला कामानिमित्त घराबाहेर पाठवून तिने दरवाजा बंद केला. थोड्या वेळानंतर परतलेल्या लहान बहिणीने अनेकदा दार वाजवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर आत रेश्‍माने गळफास घेतल्याचे आढळले. या प्रकरणाची मुलुंड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

(sakal,7th january)

सुशांतला पालक-शिक्षकांचा जाच होता का?

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

भजनप्रीतच्या मित्र-मैत्रिणींचेही जबाब


दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिर शाळेत आत्महत्या करणाऱ्या सुशांत पाटीलने एवढे टोकाचे पाऊल उचललेच कसे, याचा पोलिस शोध घेत आहेत. अभ्यासाच्या तणावातून त्याने स्वतःचे जीवन संपविले असले, तरी त्याला शिक्षक किंवा पालकांचा जाच होता का, हे तपासून पाहिले जात आहे. दरम्यान, पवई येथे आत्महत्या करणारी महाविद्यालयीन विद्यार्थिनी भजनप्रीत कौरच्या मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी आज दिली.

दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिर शाळेत सातवीत शिकणाऱ्या सुशांतने काल सकाळी शाळेच्या प्रसाधनगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्यामुळेच सुशांतने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासानंतर सांगण्यात येत आहे. तो अभ्यासाच्या तणावाखाली होता हे स्पष्ट झाले असल्याचे सहायक पोलिस आयुक्त मधुकर संख्ये यांनी सांगितले. बारा वर्षांचा सुशांत प्रसाधनगृहात जातो, स्टुलवर उभा राहून नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतो हे सारे त्याच्या वयाच्या मानाने कोड्यात टाकणारे आहे. याबाबत वारकरी संप्रदायात असलेले त्याचे वडील एकनाथ पाटील यांचा जबाब पोलिसांनी लिहून घेतला आहे. त्यांच्या चौकशीत सुशांतने दोन वेळा आमीर खानचा नव्याने प्रदर्शित झालेला "थ्री इडियटस्‌' हा चित्रपट पाहिल्याचे सांगितले आहे. या घटनेमागील सामाजिक पैलूही पोलिसांकडून तपासले जात आहेत. तो अभ्यासात जेमतेम असल्याचे त्याच्या शिक्षक व पालकांकडून सांगण्यात येत असले, तरी यापूर्वीची त्याची अभ्यासातील प्रगतीही तपासून पाहिली जाणार आहे. त्याच्या मनात अभ्यासाची भीती होती का, ही बाबदेखील तपासाधीन आहे. त्याच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात आक्षेपार्ह असे काहीच आढळलेले नाही, अशी माहिती संख्ये यांनी दिली. दरम्यान, त्याच्या पार्थिवावर कोल्हापूरच्या आजरा तालुक्‍यातील एरंडोल येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
पवईतील चैतन्यनगर येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या करणारी डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर हिच्या आत्महत्येनंतर तिच्या वर्गातील मित्र-मैत्रिणींचे जबाब नोंदविण्यास पोलिसांनी सुरुवात केल्याची माहिती पवईचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली. चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्यानेच तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असले, तरी यावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी पोलिसांनी आज तिच्या अनुज नावाच्या मित्राला चौकशीसाठी बोलावल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

-------

(चौकट)

सुशांतने साकारला होता "संत ज्ञानेश्‍वर'
सुशांत पाटील हा विद्यार्थी शालेय अभ्यासात जरा कमी असला, तरी तो राहत असलेल्या डिलाइल रोड परिसरात सगळ्यांत मिळूनमिसळून राहणारा मुलगा म्हणून त्याची ओळख होती. तो राहत असलेल्या बावला मशीद चाळीच्या परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात त्याने संत ज्ञानेश्‍वरांची वेशभूषा केली होती, अशी आठवण त्याचे मामा रामचंद्र करंबळकर यांनी सांगितली. आत्महत्येच्या दोनच दिवस आधी त्याने चाळीतील काही मुलांना एकत्र करून गच्चीवर छोटेखाली "फन फेअर'ही ठेवला होता, असे चाळीत राहणारे जयंतीभाई सावला यांनी सांगितले.

(sakal,6th january)

शिक्षण क्षेत्रात ऑल इज नॉट वेल

गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रे..
गिव्ह मी अनादर चान्स, आय वान्ना ग्रोन अप वन्स अगेन..!


आमीर खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या "थ्री इडियटस्‌' या चित्रपटातलं हे गाणं. पालक, शिक्षक आणि समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडन्टच्या तोंडून येणारे हे गाणे आजच्या शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेवर अतिशय उत्तमरीत्या भाष्य करणारे आहे. शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या मार्कांच्या स्पर्धेला कंटाळून दादरच्या शारदाश्रम विद्या मंदिरात सातवीत शिकणारा सुशांत पाटील हा विद्यार्थी आणि नेरूळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी भजनप्रीतकौर बुलेर यांनी आत्महत्या करून त्यांचे आयुष्य संपविल्याच्या घडलेल्या प्रकारानंतर शिक्षण क्षेत्रातली ही स्पर्धा दिवसेंदिवस प्राणघातक ठरत असल्याचे अधोरेखित होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या बेसुमार स्पर्धेमुळे विद्यार्थी हा घटक मार्क मिळविण्याचे मशीन झाला आहे. त्यातूनच शाळा व महाविद्यालयात विद्यार्थी असलेल्या आपल्या पाल्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवण्याचा प्रकार पालकांत गेल्या काही वर्षांत वाढीला लागला आहे. अनेकदा विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता लक्षात न घेता त्याच्याकडून 90 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविण्याचा पालकांचा हव्यास मुलांसाठी प्राणघातक ठरू पाहत आहे; तर काही वेळा गुणवत्ता असूनही पालक, शाळा आणि महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना फक्त मार्कांच्या दबावाखाली ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांकडून स्वतःला संपविण्याचे प्रकार घडत आहेत.
"थ्री - इडियटस्‌' या चित्रपटात इम्पीरिअल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणारा "जय' नावाचा विद्यार्थी त्याचा फायनल इयरचा प्रोजेक्‍ट पूर्ण करण्यासाठी प्राचार्यांकडून काही दिवसांची मुदत वाढवून मागतो. हेलिकॉप्टरमध्ये क्‍लोज सर्किट कॅमेरा बसविण्याचा जयचा प्रोजेक्‍ट पूर्ण झाल्यानंतर त्याचे इंजिनिअरिंग पूर्ण होणार असते. मात्र, प्राचार्य त्याच्या प्रोजेक्‍टची मुदत वाढवून देत नसल्याने नापास होण्याच्या चिंतेत जय दडपणाखाली येतो. दडपण सहन न झाल्याने तो कॉलेजच्या होस्टेलमध्येच आत्महत्या करतो. हा प्रकार त्यानेच तयार केलेल्या क्‍लोज सर्किट कॅमेरा बसविलेल्या हेलिकॉप्टरमधून आमीर खान आणि त्याच्या मित्रांना दिसतो. हुशार असूनही एका उदयोन्मुख अभियंत्याने अशा प्रकारे आयुष्य संपविल्याचा हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. दादर आणि पवई येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या चित्रपटातील याच प्रसंगातून प्रेरणा घेऊन केल्याचे सांगण्यात येत आहे. नेरूळच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये फिजिओथेरपीच्या फर्स्ट ईयरला असलेल्या भजनप्रीतकौर बुलेर या विद्यार्थिनीने अनुत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या खोलीत आत्महत्या केली. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात तिच्या खोलीच्या भिंतीवर "मला 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवायचेच आहेत'; तसेच "मला परीक्षेत चांगले गुण मिळवायचेच आहेत' असे लिहून ठेवले होते. दहावीला 48 टक्के आणि बारावीला जेमतेम 56 टक्के गुण मिळविणाऱ्या भजनप्रीतकौरला तिच्या वडिलांनी डी. वाय. पाटील महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. मात्र, पहिल्या टर्ममध्ये चार आणि दुसऱ्या टर्ममध्ये तीन विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने ती मानसिकदृष्ट्या खचली होती. तिचा मोठा भाऊ इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे; तर तिच्या मोठ्या बहिणीने स्वित्झर्ल
ंड येथे पायलट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. क्षमता नसतानाही केवळ आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी म्हणून फिजिओथेरपी करणारी बुलेर अनुत्तीर्ण झाली. पाल्यावर अपेक्षांचे ओझे न टाकता त्याला त्याच्या क्षमतेला साजेसे; मात्र तितकेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची पद्धत सुरू होणे, ही सध्या काळाची गरज होत चालली आहे. हसत खेळत चांगल्या दर्जाचे, दबावविरहित शिक्षण मिळालेली भावी पिढी अधिक चांगली घडू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोणत्याही पाल्यावर त्याच्या पालक व शिक्षकांचा धाक असावा. मात्र, तो जीवघेणा ठरण्याइतपत कधीही नसावा, असा मतप्रवाह वाढू लागला आहे. विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न ठेवणे हेच खऱ्या अर्थाने "ऑल इज वेल'चे लक्षण ठरणार आहे.


(sakal,5th january)

24 तासांत दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

मुंबई हादरली; तीव्र स्पर्धेत मागे पडल्याने संपविले आयुष्य

पालकांच्या अपेक्षांचे वाढते ओझे व शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेचा ताण असह्य झाल्याने आज सातवीतील एका विद्यार्थ्याने आणि फिजिओथेरपीच्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन स्वतःला संपविले. या हृदयद्रावक घटनेने शिक्षण क्षेत्रालाही जबरदस्त हादरा बसला असून आपल्या अपेक्षा मुलांवर बिनदिक्कत लादणाऱ्या पालकांवर अंतर्मुख होण्याची वेळ आणली आहे.

दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत सातवीत शिकणाऱ्या सुशांत पाटील याने चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने; तर नेरूळच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैजंतीकौर बुलेर हिने 80 टक्‍क्‍यांपेक्षा कमी मार्क मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने शाळेच्या स्वच्छतागृहात; तर वैजंतीकौर हिने आपल्या पवई येथील घरी स्वतःला संपविले.

डिलाईल रोड येथील बावला मशीद चाळीत राहणारा सुशांत आज सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत गेला. वर्गात दप्तर ठेवून प्रसाधनगृहात गेलेला सुशांत बराच वेळ परतला नाही. शिक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन शिकवायला सुरुवात केली. सुशांतच्या शेजारी बसणाऱ्या विद्यार्थ्याने तो शाळेत आल्याचे यावेळी शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर शाळेचे शिक्षक आणि शिपायांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली; तेव्हा शाळेच्या एका प्रसाधनगृहाचे दार बराच वेळ बंद असल्याचे एका विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितले. यानंतर काही शिक्षक प्रसाधनगृहात गेले असता सुशांतने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांना आढळले. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली. शाळा-व्यवस्थापनाने या प्रकाराची माहिती सुशांतचे वडील एकनाथ पाटील आणि दादर पोलिसांना दिली. काही वेळाने पोलिसांनी सुशांतच्या वडिलांच्या उपस्थितीत शौचालयात लोंबकळत असलेला त्याचा मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनाकरिता शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठविला. या घटनेची माहिती प्रसिद्धिमाध्यमांत वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शारदाश्रम विद्यामंदिरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेसमोर गोळा झाले. शाळेत पहिल्यांदाच घडलेल्या अशा प्रकारामुळे पालक आणि शिक्षकांत घबराट पसरली. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात शाळेत नुकत्याच झालेल्या परीक्षेत तो चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने गेले काही दिवस तो तणावाखाली होता, अशी माहिती दादरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उंडे यांनी दिली. अनुत्तीर्ण झाल्यामुळे शिक्षकांनी सुशांतला त्याच्या पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते; मात्र बावला मशीद चाळीतच मेडिकलचे दुकान चालविणा
रे त्याचे वडील एकनाथ पाटील शाळेत गेले नव्हते. या प्रकारामुळे निर्माण झालेल्या तणावामुळेच सुशांतने त्याचे आयुष्य संपविल्याचे सांगण्यात येते.

पवई येथील घटनेत वैजंतीकौर भूपेंद्रसिंह बुलेर (वय 20) या विद्यार्थिनीने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पवई येथील चैतन्यनगर परिसरात साई सोसायटी इमारतीत राहणारी वैजंतीकौर नेरूळच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. नुकत्याच झालेल्या परीक्षेत तिला 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली. त्यामुळे गेले काही दिवस ती तणावाखाली होती. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ती जेवून तिच्या खोलीत झोपण्यासाठी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत ती खोलीच्या बाहेर न आल्याने तिचे आई-वडील तिच्या खोलीकडे गेले. बराच वेळ हाक मारल्यानंतरही आतून प्रतिसाद मिळत नसल्याने तिच्या वडिलांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने निर्माण झालेल्या तणावामुळे तिने हा प्रकार केल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. तिच्या खोलीत एका भिंतीवर "यापुढे आपण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवू', असे लिहिल्याचे पोलिसांना आढळले आहे.


तो तणावग्रस्त होता
सुशांत पाटील हा विद्यार्थी नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षेत चार विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने तणावाखाली होता. अनुत्तीर्ण झाल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्याच्या पालकांना भेटायला बोलावले होते. मात्र, ते अनेक दिवस शाळेत शिक्षकांना भेटायला आले नाहीत. आज सकाळी शाळेत आला तेव्हाही तो नेहमीप्रमाणे तणावाखाली होता. त्यातूनच त्याने हा प्रकार केल्याची माहिती शारदाश्रम संस्थेचे सचिव श्रीनिवास नेरुरकर यांनी पत्रकारांना दिली.

(sakal,5th january)

Monday, January 4, 2010

विश्‍वास साळवे, प्रकाश वाणींना डी.के.ची पार्टी भोवणार


निलंबनाचा प्रस्ताव; आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही गंडांतर



मुंबई, ता. 2 ः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार डी. के. राव याच्यासोबत ख्रिसमसच्या पार्टीला उपस्थित असल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आज गृह खात्याकडे पाठविला. आयपीएस अधिकारी असलेला एक उपायुक्त आणि एका सहायक आयुक्तासह चार अधिकारी; तर एका पोलिस शिपायाचा समावेश आहे.

चेंबूरच्या एका खासगी क्‍लबमध्ये ख्रिसमसनिमित्त झालेल्या पार्टीत डी. के. राव याच्यासोबत राजन टोळीचे सराईत गुंडही उपस्थित होते. छोटा राजन टोळीचा खास हस्तक तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला मुंबई पोलिस दलात विशेष शाखेत उपायुक्त म्हणून काम करणारे विश्‍वास साळवे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रकाश वाणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुळशीदास काकड, ठाणे येथील एक पोलिस निरीक्षक खळतकर आणि एक पोलिस शिपाई साळुंखे अशा पाच पोलिसांची उपस्थिती होती, असे सांगितले जाते. गेली तेरा वर्षे खून आणि खंडणीच्या गुन्ह्यांखाली शिक्षा भोगल्यानंतर तब्बल 30 गुन्ह्यांतून मुक्त झालेल्या डी. के. राव याच्यासोबत पार्टीला राजन टोळीचा सराईत गुंड फरीद तनाशा, सुनील पोतदार यांनीही हजेरी लावली होती. गुंडांसोबत झालेल्या या पार्टीला पोलिसांची उपस्थिती क्‍लबमध्ये बसविण्यात आलेल्या क्‍लोज सर्किट कॅमेऱ्याने टिपली. पहाटेपर्यंत गुंडांच्या हजेरीत पाहुणचार घेणाऱ्या या पोलिसांच्या चौकशीचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काल दिले होते. या पार्टीचे व्हिडीओ क्‍लिप्स, छायाचित्रे व्यक्तिशः पाहिल्यानंतर या पाचही जणांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठविल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली. या पोलिसांची चौकशी होईपर्यंत या पोलिसांना निलंबित ठेवण्यात यावे, असेही या प्रस्तावात सांगण्यात आले आहे. या सर्व पोलिसांविरुद्ध सबळ पुरावे असल्यानेच शिवानंदन यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या पार्टीला उपस्थित असलेल्या अन्य उपस्थितांचे जबाब पोलिसांकडून नोंदवून घेण्यात येणार असून त्यांना साक्षीदार बनविले जाणार असल्याचेही पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, चेंबूरच्या जिमखान्यात झालेल्या त्या पार्टीला मी उपस्थितच नव्हतो. माझा त्या पार्टीशी आणि त्यातील लोकांशी कसलाच संबंध नाही. मला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. यासंबंधी आपण न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त विश्‍वास साळवे यांनी सांगितले. तर, आपण त्या जिमखान्याचे सदस्य आहोत. तेथे आपण पत्नीसोबत जेवण घेण्यास गेलो होतो. प्रसिद्धिमाध्यमांनी दिलेले वृत्त हे आपल्याविरुद्धचे षड्‌यंत्र असल्याचा दावा सहायक पोलिस आयुक्त प्रकाश वाणी यांनी केला आहे.

(sakal,3rd january)

नववर्षाच्या स्वागतात थिरकली मुंबई!

"थर्टी फर्स्ट'चे जमके सेलिब्रेशन

ंमुंबई ः नववर्षाचे स्वागत अवघ्या मुंबईने मोठ्या जल्लोषात केले. "मद्य'रात्रीच्या नशेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सरकारनेही पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यशाला सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने तळीरामांची चांगलीच सोय झाली. छोटीमोठी हॉटेल्स, बार आणि ढाबेही खचाखच भरून गेले होते. घड्याळाचा काटा प्रत्येक सेकंदागणिक मध्यरात्रीकडे जसा सरकरत होता तशी तरुणाई बेभान होत होती. डीजे-म्युझिक सिस्टीम्सच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होती. पर्यटकांच्या फेव्हरीट गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट, गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा या परिसरांत अवघ्या मुंबापुरीचा आनंद ओसंडून वाहत होता. पंचतारांकित हॉटेलांतील "हाय प्रोफाईल' सेलिब्रेशनही चांगलेच रंगले होते. दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या "न्यू ईयर सेलिब्रेशन'वर दुःखाची किनार होती. यंदा मात्र मुंबईकरांनी जमके सेलिब्रेशन केले. मुंबई पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवल्याने गुलाबी थंडीतला "थर्टी फर्स्ट' सोहळा जल्लोष, रोषणाई, आतषबाजी आणि पार्ट्यांच्या माहोलात निर्विघ्नपणे पार पडला.
मोठमोठ्या हॉटेलांपासून रस्त्यावरील गल्लोगल्ल्यांमध्ये जल्लोषाची धुंदी होती. रंगीबेरंगी कपड्यांतील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष काही औरच होता. घड्याळाचा काटा बाराच्या जवळ येत होता तस तसे उत्साहाला उधाण येत होते. बारा वाजायला अवघे एक मिनीट शिल्लक असताना तरुणाईने आनंदाने काऊंटडाऊनला सुरुवात केली. चार... तीन... दोन आणि "हॅप्पी न्यू इअर' असे म्हणताच सगळ्यांनीच "चिअर्स' केले. प्रत्येकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आकाशात फटांक्‍यांची आतषबाजी झाली. "बाय बाय 2009' असा संदेश असलेले असंख्य फुगे सोडण्यात आले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना आलिंगन देत असतानाच, फटाक्‍यांचा कडकडाट, टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजराने पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या नववर्ष स्वागताने अवघी मुंबापुरी सुखावली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या वर्षी नववर्ष स्वागताचे कार्यक्रमच रद्द झाले होते. यंदा आनंदाची बेसुमार उधळण करीत गेल्या वर्षीची कसरही मुंबईकरांनी पुरती भरून काढली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर यंदा मोठ्या संख्येने बाहेर पडणार याची कल्पना असल्याने मोठमोठे हॉटेल्स, बार, रिसॉर्ट आणि पब्समध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. "थर्टी फर्स्ट' पार्ट्यांत ग्रुपसोबत सामील व्हायचे असल्याने खासगी कंपन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी आपापली कामे उरकून सायंकाळपासूनच पार्ट्यांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
मोठमोठी हॉटेल्स आणि पब्समध्ये डिक्‍सथेकच्या तालावर तरुणाईने अक्षरशः बेधुंद होत नववर्षाचे स्वागत केले. गेल्या वर्षी अतिरेकी हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या कुलाब्याच्या "लिओपोल्ड कॅफे'तही हा उत्साह ओसंडून वाहत होता.
पूर्व उपनगरांतही थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांची कसलीच वानवा नव्हती. काही ठिकाणी सोसायट्या आणि वसाहतींतच नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत धमाल केली जात होत होती. "थर्टी फर्स्ट'ला गुरुवार आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत नववर्षाचे साधेपणाने जंगी स्वागत केले. बार वा हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा अनेकांनी घरीच नववर्ष स्वागताचा बेत केला होता. मित्रमंडळींसह घरीच पार्टी साजरी करीत शहराच्या रस्त्यांवर उशिरापर्यंत मनमोकळे फिरत अनेकांनी "2010'चे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. आगामी वर्ष सुखसमृद्धीचे असेल, अशी आशा मनात ठेवत पहाटेपर्यंत हे सेलिब्रेशन सुरूच होते.


"थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'
वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीचे अतिशय चांगल्या प्रकारे नियमन केल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होती. अतिशय कडाक्‍याच्या थंडीत "थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'ची आठवण असलेला सामान्य पोलिस सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवार सायंकाळपासूनच ठिकठिकाणी तैनात होता. नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत यापूर्वी मुलींच्या छेडखानीच्या घडलेल्या प्रकारांमुळे मुंबईला शरमेने मान खाली घालावी लागल्याचे प्रकार घडले होते. यंदा असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पाइंट आणि मरीन ड्राईव्हपासून गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू व अक्‍सा अशा सर्वच चौपाट्यांवर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठीही पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी दिसणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांचा वचक गर्दीत वावरणाऱ्या काही मद्यधुंद तरुणांत होता. गर्दीत संशयास्पद वावरणाऱ्यांना ताब्यात घेणे तसेच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची पोलिसांची मोहीम बुधवार रात्रीपासूनच सुरू झाली होती. महिला वाहनचालकांचीही कसून तपासणी केली जात होती. "ब्रेथ ऍनालायजर'च्या साहाय्याने मद्यधुंद वाहनचालकांचा वाहतूक पोलिस शोध घेत होते. प्रसंगी नुसत्या वासानेच "तळीरामां'ना गाडीबाहेर काढले जात होते.


(sakal,2nd january)

720 तळीराम वाहनचालकांवर कारवाई

पाच हजार जणांनी मोडले वाहतुकीचे नियम

मुंबई, ता. 1 ः नववर्ष स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर मद्याचे प्याले रिचवून वाहने चालविणाऱ्या 720 तळीरामांवर; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आजवर अवघ्या एका रात्रीत वाहनचालकांवर झालेल्या कारवाईचा हा उच्चांक असल्याचे सांगण्यात येते. गेल्यावर्षी नववर्ष स्वागताच्या रात्री 544 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

नववर्ष स्वागताच्या वेळी दारू पिऊन गाड्या चालविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काल रात्री शहरात ठिकठिकाणी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविली. प्रमुख रस्ते, चौक आणि नाक्‍यांसह आडवाटांवरूनही मद्यपी वाहनचालक हातून सुटून जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिस तयारीत होते. रात्री आठ वाजल्यापासून मद्यपींविरुद्ध सुरू झालेल्या या मोहिमेत 720 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा धाक राहावा यासाठी काही ठिकाणी "स्पीड चेकगन' हातात घेऊन कारवाईसाठी सज्ज असलेल्या पोलिसांचे कटआऊट लावण्यात आले होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांखाली कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी असलेल्या उपस्थितीमुळे यावर्षी नववर्ष स्वागताच्या दिवशी शहरात अपघाताची कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याचेही बर्वे यांनी सांगितले.

कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी 170 वाहनचालकांच्या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला. त्यापैकी 141 वाहनचालकांना एक ते दहा दिवसांपर्यंत साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली, तर एका वाहनचालकाला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुनावणीला अनुपस्थित असलेल्या 28 जणांवर न्यायालयाने वॉरंट बजावले. कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांपैकी दोघांना पोलिसांनी दुसऱ्यांदा पकडले. त्यातील एकाला दोन दिवसांची साधी कैद आणि सहा महिन्यांकरिता वाहतूक परवाना निलंबित करण्याची, तर दुसऱ्याला तीन हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने परवाना निलंबित करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. आज सुनावणी झालेल्या वाहनचालकांपैकी 157 जणांचा परवाना सहा महिन्यांकरिता, तर तीन जणांचा परवाना दोन वर्षांकरिता निलंबित करण्यात आला आहे.

यंदा गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, दादर, गिरगाव, जुहू, वर्सोवा येतील समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी मुंबईकरांची उसळणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. पहाटे उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांची वाहनचालकांविरुद्धची ही मोहीम सुरू होती. यावर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवरही पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या नसल्या तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सह पोलिस आयुक्त बर्वे यांनी सांगितले.

(sakal, 1st january)

बुलेटप्रूफ जॅकेटच्या गहाळ फाईलचे भूत घालणार धुमाकूळ


आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस


मुंबई, ता. 31 ः पोलिस आयुक्त कार्यालयातून गहाळ झालेल्या बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीच्या फाईलचे भूत नव्या वर्षातही पोलिस दलातील आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसणार आहे. या जॅकेट खरेदीचा व्यवहार झाल्याच्या 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त, तसेच मुख्यालयाचे उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ अधिकाऱ्यांना ही फाईल जपून न ठेवल्याप्रकरणी गृह खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक, तसेच सहपोलिस आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढताना शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या अंगावरील बुलेटप्रूफ जॅकेट गहाळ झाले होते. पोलिसांना देण्यात आलेले हे जॅकेट निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ते गहाळ करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांना पुरविण्यात आलेल्या या बुलेटप्रूफ जॅकेटचा दर्जा तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारात या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी व्यवहाराच्या फाईलची मागणी करण्यात आली होती; मात्र ही फाईल गहाळ झाल्याचे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले होते. त्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या संशयाला बळकटी आली होती. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या प्रशासन विभागातून गहाळ झालेली ही फाईल गेल्या आठवड्यात आश्‍चर्यकारकरीत्या सापडली. अर्धवट व अस्ताव्यस्त अवस्थेत सापडलेल्या या फाईलमधील अनेक महत्त्वपूर्ण पाने बेपत्ता असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयातून 2008 मध्ये ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताब्यात ही फाईल असणे अपेक्षित होते, त्या तिघांची चौकशी करून, त्यासंबंधीचा अहवाल गृह खात्याला पाठविण्यात आला. गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी या अहवालावर कारवाई करीत असतानाच 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त व मुख्यालय-1 चे पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे. 2002 मध्ये या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने तेव्हापासून आजपर्यंत या पदांवर काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडून गहाळ झालेल्या या फाईलबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या या नोटिशीबाबत 2 जानेवारीपर्यंत या अध
िकाऱ्यांनी आपली उत्तरे द्यायची आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीची फाईल हाताळण्याबाबत केलेल्या हलगर्जीपणाबाबत आपल्यावर कारवाई का केली जाऊ नये, अशा आशयाची ही नोटीस असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी दिली. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव व 2003-05 या काळात सहपोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहणारे प्रेमकृष्ण जैन, अतिरिक्त पोलिस महासंचालक सुभाष आवटे (2005-07), विद्यमान सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांचा समावेश आहे. मुख्यालयाचे विद्यमान पोलिस उपायुक्त विजयसिंह जाधव यांच्यासह पाच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांतून सहपोलिस आयुक्तपदी असलेले व पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेले माजी आयपीएस अधिकारी धनंजय जाधव (2001-02), कायदा व सुव्यवस्था विभागाचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व सध्या दीर्घ रजेवर असलेले संजीव दयाळ (2002-03) यांना आश्‍चर्यकारकपणे वगळण्यात आले आहे. जाधव निवृत्त झाल्यामुळे; तर दयाळ प्रदीर्घ रजेवर असल्याने त्यांना ही नोटीस देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण अय्यंगार यांनी दिले.


(sakal,1st january)