Friday, February 27, 2009

साडेचार लाखांची लाच घेताना आयकर अधिकाऱ्याला अटक

आयकर विभागात प्रलंबित असलेले प्रकरण मिटविण्यासाठी एका रिअल इस्टेट एजन्टकडून साडेबारा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला साडेचार लाख रुपये घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी अटक केली. या अधिकाऱ्याने ही लाच आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसाठी मागितल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टी. व्ही. मोहन असे या लाचखोर आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका रिअल इस्टेट एजन्टचे गेल्या वर्षीचे थकलेले आयकराचे प्रकरण मिटविण्यासाठी मोहन यांनी ही लाच मागितली. या विभागाच्या अतिरिक्त आयुक्ताकडे काम करणाऱ्या मोहन यांनी ही लाच त्यांच्यासाठी मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. साडेबारा लाख रुपयांपैकी आठ लाख रुपये मोहन यांनी यापूर्वीच घेतले होते. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्याच्या वेळी रिअल इस्टेट एजन्टने लाचेची रक्कम घेऊन या अतिरिक्त आयुक्ताची भेट घेतली. यानंतर या अतिरिक्त आयुक्‍ताच्या निर्देशावरून त्याने ही रक्‍कम मोहन यांच्याकडे दिली. या प्रकरणात बोरिवली येथील एका चार्टर्ड अकाउंटंटने मध्यस्थी केली. या प्रकरणात गुंतलेल्या अन्य अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 ः आयकर विभागात प्रलंबित असलेले प्रकरण मिटविण्यासाठी एका रिअल इस्टेट एजन्टकडून साडेबारा लाख रुपयांची लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला साडेचार लाख रुपये घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी अटक केली. या अधिकाऱ्याने ही लाच आयकर विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसाठी मागितल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टी. व्ही. मोहन असे या लाचखोर आयकर अधिकाऱ्याचे नाव आहे. एका रिअल इस्टेट एजन्टचे गेल्या वर्षीचे थकलेले आयकराचे प्रकरण मिटविण्यासाठी मोहन यांनी ही लाच मागितली. या विभागाच्या अतिरिक्त आयुक्ताकडे काम करणाऱ्या मोहन यांनी ही लाच त्यांच्यासाठी मागितल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. साडेबारा लाख रुपयांपैकी आठ लाख रुपये मोहन यांनी यापूर्वीच घेतले होते. आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्याच्या वेळी रिअल इस्टेट एजन्टने लाचेची रक्कम घेऊन या अतिरिक्त आयुक्ताची भेट घेतली. यानंतर या अतिरिक्त आयुक्‍ताच्या निर्देशावरून त्याने ही रक्‍कम मोहन यांच्याकडे दिली. या प्रकरणात बोरिवली येथील एका चार्टर्ड अकाउंटंटने मध्यस्थी केली. या प्रकरणात गुंतलेल्या अन्य अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असून त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

(sakal,28 feb)

असे आहे अतिरेकी कसाबविरुद्धचे आरोपपत्र..!

- 35 पाकिस्तानी अतिरेकी फरारी
- मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या नऊ अतिरेक्‍यांसह एकूण 47 अतिरेक्‍यांचा कटात सहभाग
- 11280 पानां आयुक्त आरोपपत्र
- 2202 साक्षीदार तपासले
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव नाही
- लष्कर ए तैयबाच्या मरीन विंगचा मुंबई हल्ल्याशी थेट संबंध
- अतिरेक्‍यांच्या मृतदेहांची ओळख परेड घेण्याचा जगातील पहिलाच प्रकार
- अतिरेक्‍यांनी कोणत्याही मागण्या केल्या नाहीत
- अतिरेकी अजमल कसाबला दीड लाख रुपये देण्याचे ठरले होते.


---------------


फरारी आरोपी
लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईद
झाकी उर रहमान लक्वी जरार शहा, अबू काफा
अबू हमजा, लष्करी प्रशिक्षक अब्दुल रहमान
सादिक तसेच दोन सैन्य अधिकाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश

--------------

कसाबवर दाखल 12 गुन्हे

1) मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे गोळीबार करून पोलिस निरीक्षक शशांक शिंदे यांच्यासह सुमारे साठ प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत.
2) कामा रुग्णालय आणि आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या आवारात गोळीबार. या गोळीबारात सात जण ठार; तर सहा जखमी.
3) सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांचा खून, पोलिसांच्या गाडीची चोरी.
5) स्कोडा गाडीची चोरी.
6) सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांची हत्या व पोलिसांवर गोळीबार.
7) नरिमन हाऊस येथे गोळीबार
8) हॉटेल ताजमध्ये गोळीबार
9) हॉटेल ट्रायडन्ट ओबेरॉयमध्ये गोळीबार
10) विलेपार्ले येथे टॅक्‍सीत बॉम्बस्फोट
11) माझगाव येथे टॅक्‍सीत बॉम्बस्फोट
12) कुबेर बोटीच्या खलाशांची हत्या.


-----------------------------


न्यायालयापुढील पुरावे

- फॉरेन्सिक सायन्स एक्‍सपर्टकडून मिळालेले निष्कर्ष
- एफबीआयकडून सॅटफोन, व्हीओआयपी फोन, जीपीएससंबंधीच्या तांत्रिक बाबी
- ठसेतज्ज्ञांचा अहवाल
- प्रत्यक्षदर्शी, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे कबुलीजबाब

-------------------------------


अतिरेक्‍यांविरुद्धची कलमे

- खून, खुनाचा प्रयत्न
- भारतीय स्फोटके कायदा
- हत्यार आणि स्फोटके कायदे
- एक्‍सप्लोसिव्ह सबस्टन्सेस ऍक्‍ट
- सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान
- हत्यार प्रतिबंधक कायदा
- भारतात अवैध घुसखोरीचा कायदा
- सागरी हद्दीत घुसखोरीचा कायदा
- रेल्वे कायद्यासह दंड विधानातील कलमे

50 रुपयांत करा मनमुराद वायुप्रदूषण!

पीयूसी प्रमाणपत्र : "सकाळ'ने केलेल्या पाहणीचा धक्कादायक निष्कर्ष

वाहनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी राज्य परिवहन विभागाचे सक्तीचे असलेले "पीयूसी' प्रमाणपत्र अवघ्या काही रुपयांसाठी कोणत्याही प्रकारची तपासणी न करता सर्रास दिली जात आहेत. हा धक्कादायक प्रकार "सकाळ'ने केलेल्या एका पाहणीत उघडकीस आला. 15 वर्षांहून अधिक काळ झालेल्या आणि मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण करणाऱ्या जुनाट वाहनांनाही हे प्रमाणपत्र सहज मिळत असल्याने हा प्रकार पर्यावरणाच्या हानीसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरत आहे. याबाबत राज्य परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली.

सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसाला दीड लाखांहून अधिक वाहने धावतात. वाहनांच्या धुरातून निघणाऱ्या कार्बन मोनोक्‍साईड, नायट्रोजन ऑक्‍साईड, सल्फर डायऑक्‍साईड यांसारख्या घटकांमुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होते. पर्यावरणात असमतोल निर्माण करणारे हे घटक मानवी आरोग्यालाही मोठा धोका निर्माण करीत असतात. वाहनांच्या धुरातून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार, तसेच राज्य परिवहन विभागानेही कठोर नियम केले आहेत. रस्त्यावरून धावणारे वाहन "प्रदूषण नियंत्रित' असल्याचे प्रमाणपत्र (पीयूसी) वाहनचालकाने सोबत बाळगणे कायद्याने बंधनकारक आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांत पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पीयूसी वितरित करणारी फिरती केंद्रे उभी करण्यात आली आहेत. वाहनांना देण्यात येणाऱ्या या प्रमाणपत्रांसाठी दुचाकी वाहनांना प्रत्येकी 30 रुपये; तर चारचाकी वाहनांना 50 रुपये आकारले जातात. पीयूसी नसल्यास वाहनचालकाला राज्य परिवहन विभागाकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या धुरातील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे प्रमाण नीट तपासून वाहनचालकाला त्यासंबंधीचे प्रमाणपत्र देणे अपेक्षित आहे, मात्र "सकाळ'ने केलेल्या पाहणीत वाहनांच्या धुराची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता केवळ अंदाजे ही प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे निदर्शनास आले. पीयूसी केंद्रांवर सुरू असलेला हा अनागोंदी कारभार उघडकीस आणण्यासाठी एका जुनाट बजाज स्कूटीची एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या ठिकाणी पीयूसी प्रमाणपत्रे काढण्यात आली. पाचही ठिकाणी या स्कूटीला देण्यात आलेल्या प्रमाणपत्रावर धुरातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण वेगवेगळे नमूद करण्यात आले. तीन ठिकाणी तर स्कूटीच्या धुरातील प्रदूषकांची कोणत्याही प्रकारची तपासणी झाली नाही. पीयूसी केंद्रांवर सुरू असलेल्या या प्रकाराने वाहनचालकांना अवघ्या 50 रुपयांत सहा महिने मनमुराद वायुप्रदूषण करण्याचा जणू परवानाच उपलब्ध होतो. त्यामुळे अनेकदा वाहतूक पोलिसांना या वाहनचालकांवर कोणतीच कारवाई करता येत नाही.
याबाबत राज्य परिवहन खात्याचे आयुक्त दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधला असता, कलकत्ता येथे सरकारी कामानिमित्त आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत अंमलबजावणी विभागाचे उपायुक्त अरुण भालचंद्र यांच्याशी कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते बैठकीत व्यग्र असल्याचे सांगण्यात आले.
...............


अशी झाली पीयूसी केंद्रांविरुद्धची मोहीम

आम्ही रस्त्यावर चालविण्यास अयोग्य आणि धुरावाटे प्रचंड प्रदूषण करणारी 15 वर्षांपूर्वीची एक जुनाट कायनेटिक स्कूटी घेतली. या स्कूटीची गावदेवी येथील केंद्रात पीयूसी काढायला गेलो. त्या वेळी तेथील कर्मचाऱ्याने ही गाडी चालविण्यायोग्य नसल्याने सांगून त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडत असल्याचे सांगितले, मात्र जराशी घासाघीस केल्यानंतर त्याने या गाडीची खरी पीयूसी दिली. त्यानुसार ही गाडी पर्यावरणाच्या दृष्टीने रस्त्यावर चालविण्यास अयोग्य असल्याचे प्रमाणपत्रच आम्हाला मिळाले.
यानंतर आमची पीयूसी केंद्रांवर सुरू असलेला अनागोंदी कारभार उघडकीस आणणारी मोहीम सुरू झाली. आम्ही ही प्रदूषणकारी गाडी घेऊन परळ येथे गेलो. तेथील फिरत्या पीयूसी केंद्रावर या गाडीची पीयूसी काढली. त्या वेळी आम्हाला ही गाडी प्रदूषण नियंत्रित असल्याची पीयूसी देण्यात आली. या पीयूसीवर कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 0.03 असे दाखविण्यात आले.
यापुढे आम्ही शीव येथे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर गेलो. तेथील पीयूसी केंद्रावर कोणत्याही प्रकारची तपासणी न करता पीयूसी देण्यात आली. त्यात कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 1.08 असे नमूद करण्यात आले. पुढे आम्ही आमचा मोर्चा वांद्रे येथील पीयूसी केंद्रावर वळविला. तेथील कर्मचारी गाडीची तपासणी न करताच पीयूसी देत होता, मात्र या कर्मचाऱ्याला समजावून सांगितल्यानंतर त्याने गाडीची तपासणी करून पीयूसी दिली. यात कार्बन मोनॉक्‍साईडचे प्रमाण 1.07 आढळले. पुढे आम्ही माहीम रेल्वेस्थानकालगत असलेल्या पीयूसी केंद्रात गेलो. तेथील कर्मचाऱ्याने कोणतीही तपासणी न करता पीयूसी दिली. त्यात कार्बनचे प्रमाण 1.04 असे आढळले. एकंदरीतच पाच ठिकाणी आम्ही केलेल्या पाहणीत प्रत्यक्ष तपासणीपेक्षा अंदाजे प्रमाण ठरवून पीयूसी देण्यावरच भर देण्यात आल्याचे दिसले.


(sakal, 24 feb)

मुंबईवरील हल्ल्यात पाकमधील माजी लष्करी अधिकाऱ्याचा सहभाग

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानमधील एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. अतिरेक्‍यांच्या चौकशीत या अधिकाऱ्याचे नाव पुढे आले असून, अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्यावर उद्या (ता. 25) दाखल होणाऱ्या आरोपपत्रात ही बाब नमूद करण्यात आली आहे. कर्नल कियानी अहमद नावाने असणारा हा अधिकारी म्हणजे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल अश्‍फाक परवेज कियानी आहेत का, हे सांगण्यास गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नकार दिला.
देशाला हादरवून टाकणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचा दावा पाकिस्तानने वेळोवेळी केला; मात्र अतिरेक्‍यांचा कबुलीजबाब, तसेच त्यांचे पाकिस्तानमधील "लष्कर'च्या कमांडरशी सॅटफोन,

व्हीओआयपी

फोनवरून झालेले संभाषण, तसेच जीपीएस यामुळे पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट होत आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या "एफबीआय'नेदेखील या हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहेत. अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्यासोबत अटकेत असलेले फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्या चौकशीत त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांत कर्नल कियानी यांचे नाव पुढे आले.
अतिरेकी हल्ल्याच्या वेळीसुद्धा "लष्कर'चे कमांडर या अधिकाऱ्याच्या संपर्कात होते, असेही पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. वॉशिंग्टन येथे "एफबीआय'च्या मुख्यालयात गेलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना हे पुरावे उपलब्ध झाल्याचे समजते. अतिरेक्‍यांना लष्करी प्रशिक्षण देणाऱ्या कर्नल कियानी याने मुंबई हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला अतिरेकी सबाउद्दीन अहमद याला "आयएसआय'मध्ये दाखल होण्यास सांगितले होते. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल अशफाक कियानी पाकिस्तानी गुप्तचर संघटना "आयएसआय'चे माजी प्रमुख आहेत. त्यामुळे मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांना माहिती असलेला कर्नल कियानी हा पाकिस्तानचा माजी लष्करप्रमुख तर नाही ना, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


(sakal, 24 feb)

Monday, February 23, 2009

कसाबवर उद्या आरोपपत्र

काम अंतिम टप्प्यात : मजकूर मराठी, हिंदी, इंग्रजीसह उर्दूतही

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी महम्मद अजमल कसाबवर बुधवारी (ता. 25) दुपारपर्यंत किल्ला न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आरोपपत्रातील मजकूर अतिरेकी कसाब याला समजावा यासाठी हे आरोपपत्र मराठी, इंग्रजी, हिन्दीसह उर्दू भाषेतही तयार करण्यात येत आहे. उर्दूतील आरोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई हल्ल्यातील अतिरेकी कसाब सध्या 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मुंबई हल्ला प्रकरणात कसाबवर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची 90 दिवसांची मुदत बुधवारी संपत आहे. या मुदतीपूर्वी गुन्हे शाखेचे पोलिस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या आरोपपत्रात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी कायदेतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आरोपपत्र बनविण्याचे काम सुरू आहे. आरोपपत्र तयार करण्याचे काम उद्या पूर्ण होईल. त्यानंतर केव्हाही ते किल्ला न्यायालयात सादर करता येईल. मात्र, ते येत्या बुधवारीच दाखल करण्यावर पोलिसांचा कल राहणार आहे. यासंबंधी गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज भेट घेतली.
या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी अटक केलेले लष्कर-ए तैयबाचे अतिरेकी फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन यांचादेखील या कसाबच्या आरोपपत्रात सहआरोपी म्हणून समावेश असेल. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कसाबचा कलम 164 अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर कबुली जबाब पूर्ण झाला आहे. त्यासाठी त्याला किल्ला न्यायालयात नेण्यात आले होते. याशिवाय कसाबला ओळखणाऱ्यांची ओळख परेडही घेण्यात आली. सध्या फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीनचा कबुली जबाब घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. या आरोपपत्रात पाकिस्तानमध्ये असलेल्या फरारी अतिरेक्‍यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई हल्ल्याच्या कटात लष्कर-ए-तैयबा आणि पाकिस्तानच्या कटातील सहभागासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती कसाबच्या कबुलीजबाबात उघडकीस आली आहे. कसाबच्या जिवाला धोका असल्याने त्याच्यासंबंधीचे आरोपपत्र दाखल करताना त्याला न्यायालयात हजर करणार अथवा नाही याबाबत काहीही सांगण्यास गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी नकार दिला. सध्या गुप्त ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कसाबवर मुदत पूर्ण होण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले जाईल. मुंबई हल्ला प्रकरणात अटक केलेले फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन या दोघांवर बारा गुन्हे दाखल करणार असल्याचेही मारिया या वेळी म्हणाले.

(sakal,23 feb)

Saturday, February 21, 2009

कसाब, पाकिस्तानविरुद्ध एफबीआयकडून सबळ पुरावे

देवेन भारती ः पुरावे आरोपपत्रात समाविष्ट करणार

मुंबई हल्ल्याच्या तपासाकरिता एफबीआयची मदत घेण्यासाठी गेलेले गुन्हे शाखेच्या पोलिसांचे पथक आज पहाटे मुंबईत परतले. अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब आणि पाकिस्तानविरुद्ध सबळ पुरावे एफबीआयकडून मिळाले असून हे पुरावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.
26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचल्याचे पुरावे हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानमध्ये असलेल्या लष्कर ए तैयबाच्या कमांडरसोबत अतिरेक्‍यांनी केलेल्या संभाषणाने सिद्ध होणार आहे. अतिरेक्‍यांनी वॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (वॉईप) फोन आणि सॅटेलाईट फोनद्वारे केलेले मिनिटागणिक संभाषण एफबीआयने गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले आहे. हल्ल्यानंतर 1 डिसेंबरपासून एफबीआयचे पथक मुंबईत हल्ल्यासंबंधी स्वतंत्र तपास करीत होते. एफबीआयच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबकडे असणारे पुरावेही तेथील अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिले. अतिरेकी मोहम्मद कसाबविरुद्धही हेच पुरावे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या तीन सदस्यीय पथकाने वॉशिंग्टन येथील एफबीआय मुख्यालयात तेथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती तसेच पुराव्यांची देवाणघेवाण केली. हे सर्व आरोपपत्रात समाविष्ट करून अजमल कसाबविरुद्ध न्यायालयात सादर केले जातील, असेही भारती या वेळी म्हणाले. अतिरेक्‍यांनी वापरलेल्या गोळ्यांचा एफबीआयच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबकडून अहवाल येण्यासाठी काही काळ लागणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


----------


न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर कसाबचा कबुलीजबाब

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याचा कबुलीजबाब न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. त्याकरिता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांशी बोलताना येथे दिली. या कबुलीजबाबानंतर कसाबची पुन्हा नव्याने ओळख परेड होणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले.
अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याला पोलिस कोठडीतून 26 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. या कोठडीत त्याच्याकडून न्याय दंडाधिकारी कलम 164 अन्वये कबुली जबाब नोंदवून घेतील. हल्ल्यात असलेला कसाबचा सहभाग सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर त्याची ओळख परेड घेण्यात येणार आहे. त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, न्यायालयीन कोठडी ठोठावल्यानंतर त्याला गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. कसाबची रवानगी आर्थर रोड कारागृहात झाल्याबाबत विचारणा केली असता, मारिया यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

(sakal,20 feb)

इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांचा ताबा एटीएस घेणार

रेल्वे बॉम्बस्फोट : संभाव्य सहभागाची चौकशी करणार

मुंबईच्या उपनगरी रेल्वेत जुलै 2006 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत असलेल्या संभाव्य सहभागाची चौकशी करण्याकरिता इंडियन मुजाहिदीनच्या सदस्यांचा ताबा दहशतवादविरोधी पथक घेणार आहे. यासंबंधीचा अर्ज लवकरच मोक्का न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी यांनी दिली.
जयपूर, अहमदाबाद, सुरत, बंगळूर आणि दिल्लीसह देशभरात 2005 पासून झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांत असलेल्या सहभागाप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या एकवीस अतिरेक्‍यांना अटक केली. या प्रकरणाचे आरोपपत्र काल मोक्का न्यायालयात गुन्हे शाखेने दाखल केले. या अतिरेक्‍यांविरुद्ध खटला सुरू होत असतानाच त्यांचा जुलै- 2005 मध्ये झालेल्या उपनगरी गाड्यांतील बॉम्बस्फोट मालिकांशी संबंध आहे का, ही बाब दहशतवादविरोधी पथक तपासणार आहे. 187 निष्पापांचे बळी घेणाऱ्या रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेसंबंधी इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य सादिक शेख याच्यासह काही अतिरेक्‍यांचा ताबा दहशतवादविरोधी पथक न्यायालयाकडे मागणार आहे. यासाठी लवकरच एक अर्ज मोक्का न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्राची प्रत आजच आपल्याकडे आली आहे. या अतिरेक्‍यांचा 2005 पासून देशात झालेल्या स्फोटांत काही ना काही सहभाग मिळाल्याचे गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात म्हटले आहे. तसे पुरावे गुन्हे शाखेकडे उपलब्ध आहेत. लवकरच या आरोपपत्राचा अभ्यास करून कायदेशीर सल्ला घेतला जाईल . तसेच गुन्हे शाखेकडे असलेल्या पुराव्यांची तपासणी केली जाईल. त्यानंतरच इंडियन मुजाहिदीनच्या या अतिरेक्‍यांची चौकशी केली जाईल, असेही रघुवंशी यांनी या वेळी सांगितले.

इंडियन मुजाहिदीनमध्येही होता फिदायिन गट

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या 21 अतिरेक्‍यांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत आहेत. इंडियन मुजाहिदीनमध्येही फिदायीन गट कार्यरत होता. हा गट देशात आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी जुलै आणि ऑगस्टमध्ये शस्त्रसाठाही पाठविण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती दिल्लीच्या बाटला हाऊस येथे झालेल्या ऑपरेशनमध्ये अटक झालेला आरोपी मोहम्मद सैद याच्या चौकशीत स्पष्ट झाले असून त्याने दिलेल्या कबुलीचा उल्लेख या आरोपपत्रात असल्याचे गुन्हे शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


(sakal,19 feb)

पुजारी टोळीचा भुजंग अण्णा चकमकीत ठार

मुंबई : हेमंत पुजारी टोळीचा शार्पशूटर सुभाष शेट्टी ऊर्फ भुजंग अण्णा याला गुन्हे शाखेच्या युनिट-11च्या पोलिसांनी बोरिवली येथे चकमकीत ठार केले. त्याच्यावर खंडणी, दरोडे, हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांची नोद आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून परदेशी बनावटीची दोन रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे हस्तगत केली आहेत.
बोरिवली पश्‍चिमेला चिकूवाडी येथील लिंक रोडवर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही चकमक झाली. हेमंत पुजारी टोळीचा शार्पशूटर असलेला सुभाष शेट्टी एका हॉटेल व्यावसायिकाचा खून करण्यासाठी येणार असल्याची माहिती या युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक फिरोज पटेल आणि त्यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुभाष त्याच्या साथीदारासोबत काळ्या रंगाच्या यामाहा मोटरसायकलवरून आला. आधीच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले; मात्र त्याने स्वतःकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर सहा गोळ्या झाडल्या. या वेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात सुभाष शेट्टी जखमी झाला. सुभाष खाली पडल्याचे पाहताच त्याचा साथीदार मोटरसायकलवरून पळून गेला. सुभाष शेट्टीला भगवती रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तो मरण पावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक फिरोज पटेल यांनी दिली.
मुंबईतील हॉटेलमालकांवर हेमंत पुजारी टोळीची जरब बसविण्यात यशस्वी झालेला सुभाष शेट्टी बॅंक दरोडे, खंडणी, खून, खुनाचे प्रयत्न या गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. मुंबईतील तिघा हॉटेल व्यावसायिकांवर त्याने खंडणीसाठी गोळीबार केला होता. गेल्या वर्षी मिरा रोड येथील नवरंग बारचा मालक सुदाम शेट्टी याच्यावर गोळीबार करताना त्याचा साथीदार सुनील शेट्टी याला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून शेट्टी फरार होता.


(sakal,19 feb )

Wednesday, February 18, 2009

कॉलेज तरुणाची खंडणीसाठी मित्रांकडूनच निर्घृण हत्या

दोघांना अटक ः झटपट पैसे मिळविण्यासाठी अघोरी कृत्य

दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणाचे त्याच्या दोन मित्रांनी अपहरण करून, नंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना खार येथे रात्री उशिरा उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी दिली. हत्येचे खरे कारण अद्याप कळले नसले तरी कमी वेळेत अधिक पैसे मिळविण्याच्या लालसेतून हा निर्घृण प्रकार झाल्याची शक्‍यता तांबोळी यांनी वर्तविली. दीड वर्षापूर्वी अंधेरी येथील अदनान पत्रावाला या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी केलेल्या हत्येची आठवण करून देणाऱ्या घटनेने पश्‍चिम उपनगरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुकीम अकबर खान (वय 17) असे या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे. वांद्रे येथील रिझवी महाविद्यालयात बारावीत शिकणारा मुकीम 13 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रांकडे गेला तो परतलाच नाही. सायंकाळी उशिरापर्यंत मुकीम घरी न आल्याने खार-पश्‍चिमेला जुना खार येथील निजामुद्दीन इमारतीत राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. टॅक्‍सी चालविणारे मुकीमचे वडील अकबर खान (55) यांना रात्री उशिरा अनोळखी तरुणांकडून धमकीचा फोन आला. या तरुणांनी दोन लाख रुपयांची मागणी मुकीमच्या वडिलांकडे केली. या प्रकाराने घाबरलेल्या मुकीमच्या वडिलांनी 14 फेब्रुवारी रोजी खार पोलिस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मुकीमचा शोध सर्वत्र सुरू असतानाच पोलिसांनी त्याच्या मित्रांचीही चौकशी करायला सुरुवात केली. खार-पूर्वेला इंदिरानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अमीर सिद्दीक शेख (वय 19) याची चौकशी केली असता, पोलिसांना त्याची उत्तरे संशयास्पद वाटू लागली. पोलिसांनी आमीरवर लक्ष केंद्रित करून, त्याची कसून चौकशी करायला सुरुवात करताच त्याने काल रात्री गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनी सांगितले. रिझवी महाविद्यालयात मुकीमसोबतच शिकणाऱ्या अमीर शेख व त्याचा आणखी एक मित्र यांनी हा कट रचला. मुकीमच्या दुसऱ्या मित्राची चौकशी सुरू असल्याचे तांबोळी यांनी सांगितले.
आमीरने रात्री उशिरा भारतीय कॉलेजच्या मागील बाजूला नाल्यात फेकून दिलेला मुकीमचा मृतदेह पोलिसांना दाखविला. दगड व हातोड्याने ठेचून ठार मारलेल्या मुकीमचा मृतदेह त्याने लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून टाकला होता. कुजलेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह ओळखणे पोलिसांना दुरापास्त झाले होते. महाविद्यालयाच्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी आज दुपारी सरफराज शेख (17) या आणखी एका बारावीच्या विद्यार्थ्याला अटक केल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक जयचंद्र काठे यांनी दिली. या प्रकरणातील पहिला आरोपी अमीर सिद्दीक शेख याला 2 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे श्री. काठे म्हणाले.


(sakal,18 feb)

लग्नाला नकार दिल्याने विवाहितेवर चाकूहल्ला

प्रेम प्रकरण ः नौदल अधिकाऱ्याला अटक

विवाहाला ऐनवेळी नकार देणाऱ्या नौदल अधिकाऱ्याच्या पत्नीवर चाकूने सपासप वार करणाऱ्या नौदलातील वायरलेस रेडिओ ऑफिसरला कफपरेड पोलिसांनी अटक केली असून, त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली नौदल अधिकाऱ्याची पत्नी आयएनएस अश्‍विनी रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर आहे.

कफ परेड येथील नौदल कॉलनीत राहणाऱ्या रवी चंद्रन (30) या नौदल अधिकाऱ्याचे नौदलातच अधिकारी असलेल्या धरमपाल सिंग (39) यांची पत्नी अनिता हिच्याशी प्रेम प्रकरण होते. या प्रेम प्रकरणातून धरमपाल सिंग यांच्या घरात वाद होत असत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अनिता रवी चंद्रन याच्यासोबत नवा संसार थाटणार होती. मात्र तिचा पती धरमपाल याने केलेल्या विनवणीनंतर तिने हा विचार बदलला होता. लग्नाला ऐनवेळी नकार दिल्याने संतापलेल्या रवी चंद्रन याने शनिवारी अनिताच्या घरी जाऊन पती घरात असतानाच तिच्यावर चाकूचे वार केले. यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नी अनिता आणि रवी चंद्रन यांच्या प्रेम प्रकरणाची माहिती असल्याने धरमपाल सिंग याने नौदल पोलिसांत तक्रार दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी रवी चंद्रन याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विलास भोळे यांनी दिली.

( sakal,16 feb)

कुबेर निघाली परतीच्या प्रवासाला

दहशतवादी हल्ला ः चार खलाशांच्या हत्येचे दुःख


""या सागरात गेली पंचवीस वर्षे मासेमारी करीत आहोत. या पंचवीस वर्षांत कधीच असा बाका प्रसंग आपल्यावर आला नाही. मुंबईवर घातपाती हल्ल्याकरिता वापर झालेली ही बोट पुन्हा पोरबंदरला नेणे आपल्या नशिबी आले आहे. अतिरेक्‍यांनी या बोटीवर काम करणाऱ्या चार खलाशांचे काय केले याचाही पत्ता नाही. झालं ते अतिशय वाईट झालं. मात्र, जुन्या आठवणींना कवटाळून एकाच ठिकाणी थांबता येत नाही. सरकारकडून काही कायदेशीर बाबींची पूर्तता होताच एक-दोन दिवसांत पोरबंदरला रवाना होऊ.'' अतिरेकी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली एम. व्ही. कुबेर बोट तपास यंत्रणांनी तिच्या मालकाकडे सोपविल्यानंतर ही बोट नेण्यासाठी खास पोरबंदरहून आलेले खलाशी कानजी मसाणी "सकाळ'शी बोलत होते.

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात वापरण्यात आलेल्या एम. व्ही. कुबेर या मासेमारी बोटीचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ही बोट तिचा मालक विनोदकुमार मसाणी याच्या ताब्यात दिली. मुंबई हल्ल्यातील महत्त्वाचा पुरावा असलेली ही बोट पुन्हा एकदा सागरात मासेमारी करण्यासाठी सज्ज झाली आहे. पोरबंदर येथून पाकिस्तानच्या सागरी हद्दीत गेलेल्या या बोटीला दहा अतिरेक्‍यांनी "हायजॅक' करून तिचा वापर मुंबईवर हल्ला करण्यासाठी केला. हल्ल्याच्या दिवसापासून मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर उभी असलेली ही बोट भाऊचा धक्का येथे उभी करण्यात आली. ही बोट घेऊन जाण्याकरिता पोरबंदर येथून पाच दिवसांपूर्वी चार खलाशी मुंबईत आले आहेत. त्यात कानजी मसाणी आणि त्यांचे सहकारी अरविंद खोडियार यांचा समावेश आहे. मुंबई हल्ल्यात कुबेरच्या झालेल्या वापराबाबत मसाणी यांनी काहीही बोलणे टाळले. मात्र त्या दिवशी बोटीवर असलेल्या पाच खलाशांचे हकनाक जीव गेल्याची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. गुजरातच्या समुद्रात शिरताना आता बोटींची कसून तपासणी होते. बोट ताब्यात मिळालेली असली तरी वाटेत नौदल, केंद्रीय सीमाशुल्क विभाग पुन्हा अडवणूक करतील. कोणतीही अडचण नको म्हणून एक-दोन दिवस कायदेशीर बाबी पूर्ण होण्याची आपण वाट पाहत आहोत. बोटीचे मालक विनोदकुमार मसाणी यांना ही माहिती मिळणार आहे. त्यांचा फोन येताच बोट रेवदंडा मार्गे पोरबंदरला निघेल, असे अरविंद खोडियार यांनी यावेळी सांगितले. हवामान चांगले असले तर पोरबंदरला जाण्याकरिता पासष्ट तास लागतात. हवामान खराब असल्यास किती दिवस लागतील याचाही नेम नसतो. सोबतीला पान-मावा आणि बिडी असल्यावर आपण सतत पस्तीस तास बोट चालवू शकतो, असेही मसाणी या वेळी म्हणाले.


(sakal,16 feb)

सरकारी घरे भाडेतत्त्वावर देणारे रॅकेट उघड

सीबीआयची कारवाई ः शेकडो घरे 30 हजारांत खासगी व्यक्तींना

केंद्रीय अधिकारी - कर्मचाऱ्यांकरिता बांधण्यात आलेली घरे मिळण्यास मोठ्या प्रतीक्षा यादीमुळे वर्षानुवर्षे लागत असली तरी अवघे 30 हजार रुपये घेऊन हीच घरे वर्षभरासाठी खासगी व्यक्तींना तत्काळ भाडेतत्त्वावर देणारे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबईत असलेल्या साडेआठ हजार घरांपैकी शेकडो घरे खासगी व्यक्तींना परस्पर देणाऱ्या केंद्र सरकारच्या वसाहत कार्यालयातील दोघा अधिकाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने अटक केली. या प्रकरणात आणखी दोघा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे महानिरीक्षक ऋषिकेश सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारच्या वसाहत विभागाचे मुंबईतील प्रमुख मदन मोहन बॅनर्जी आणि त्यांचा सहायक छगन प्रकाश रमण अशी सीबीआयने अटक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. ऍन्टॉप हिल, वडाळा, घाटकोपर व बेलापूर येथे केंद्र सरकारी आस्थापनांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता निवासी संकुले बांधण्यात आली आहेत. या घरांसाठी केंद्र सरकारी अधिकारी व कर्मचारी गेली तीन वर्षे वेटिंग लिस्टवर आहेत. वसाहत अधिकारी बॅनर्जी त्याचा सहायक रमण याच्या मदतीने घराची आवश्‍यकता असलेल्या अर्जदारांची बनावट यादी तयार करीत असे. या यादीत केंद्र सरकारच्या एकाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याचे नाव नसे. यानंतर रमण दलालांच्या मदतीने या अर्जदारांच्या नावे खासगी व्यक्तींना प्रत्येकी तीस हजार रुपये घेऊन वर्षभराकरिता घर भाड्याने देत असे. खासगी व्यक्तींना घरे दिल्यानंतर त्यांच्याकडे अन्य अधिकारी आणि पोलिसांना पाठवून तुम्ही या घरावर अनधिकृतरीत्या ताबा मिळविला असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्याचे प्रकारही बॅनर्जी आणि रमण करीत असत. त्यासाठी ते ऍन्टॉप हिल पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांची मदत घेत असत. अशा प्रकारे या दोघा अधिकाऱ्यांनी आतापर्यंत पाचशेहून अधिक घरे बोगस लोकांना दिल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. येत्या काही दिवसांत मुंबईतील सर्वच घरांचे वितरण तपासले जाणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
सरकारी निवासस्थानात राहणाऱ्या खासगी व्यक्तीला सध्याच्या घरापेक्षा मोठे घर मिळवून देण्यासाठी पंचवीस हजार रुपये मागितले जायचे. याशिवाय ऍन्टॉप हिल परिसरात केंद्र सरकारच्या मालकीच्या शॉपिंग सेंटरच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम करण्यासाठीही बॅनर्जी यांनी पैसे उकळल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

(sakal,16 feb)

विद्यार्थी होणार पोलिस ऍम्बेसिडर

आगळी योजना ः वाहतुकीचा संदेश देणार

"आमचे रक्षण कसे करायचे ते आम्ही तुम्हाला दाखवू' हा सुरक्षित वाहने चालविण्यासंबंधीचा संदेश आपले आई-वडील आणि पर्यायाने मुंबईकरांना देण्याकरिता वीस शाळांमधील शंभर विद्यार्थी येत्या काळात "पोलिस ऍम्बेसिडर' म्हणून काम करणार आहेत. ही आगळी योजना राबविली आहे शहर वाहतूक पोलिस आणि चिल्ड्रन मूव्हमेंट फॉर सिव्हिक अवेअरनेस (सीएमसीए) या स्वयंसेवी संस्थेने.
शहरातील वाहतूक व्यवस्थेला योग्य शिस्त लागण्याकरिता शहर वाहतूक पोलिसांकडून आजवर विविध प्रयत्न करण्यात आले. मद्यपी वाहनचालक, हेल्मेटसक्ती आणि वाहने चालविताना मोबाईल फोनचा वापर टाळण्यासारख्या घेतलेल्या मोहिमांमुळे रस्ते अपघातांच्या घटनांत कपात झाली आहे. विद्यार्थी उद्याचे नागरिक असल्याने शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना "पोलिस ऍम्बेसिडर' बनवून त्यांना रस्ता सुरक्षेसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलांनी त्यांच्या वडिलांना रस्ता सुरक्षिततेचे धडे देणे हा तसा कुतूहलाचा विषय ठरणार आहे. मुलांनी त्यांच्या वडिलांचे सीटबेल्ट लावणे, हेल्मेट घालणे, अनावश्‍यक ठिकाणी हॉर्न न वाजविणे अशा लहान-लहान बाबींत प्रबोधन केल्यास पोलिसांचे काम हलके होणार असल्याचे मत वाहतूक शाखेचे सह पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी या उपक्रमाची माहिती देताना व्यक्त केले. वरळी येथील वाहतूक पोलिस मुख्यालयात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी वाहतूक पोलिस उपायुक्त हरीश बैजल, सहायक पोलिस आयुक्त अमरजित सिंग आणि सीएमसीएच्या समन्वयक विनोदिनी लुल्ला यांच्यासोबत शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.

(sakal,15 feb)

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना अखेर बढत्या

सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बढत्यांना अखेर मुहूर्त सापडला. गृहखात्याने राज्यातील 92 पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्त व उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर बढत्या दिल्या आहेत. राज्यातील 173 पोलिस अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये 7 फेब्रुवारीला प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सरकारने तातडीने काल यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत.
राज्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाच्या बढत्या रखडल्यामुळे पोलिस उपनिरीक्षकांपासून निरीक्षकांपर्यंतच्या बढत्याही आपसूकच रखडल्या होत्या. बढत्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या 110 अधिकाऱ्यांपैकी 18 अधिकाऱ्यांना वेळेत बढत्यांचे आदेश न मिळाल्याने पोलिस निरीक्षक पदावरच सेवानिवृत्त व्हावे लागले होते. पोलिस दलातील या महत्त्वाच्या घटकांवर सरकारकडून होणाऱ्या दुर्लक्षाबाबत "सकाळ'ने आवाज उठविला होता. या वृत्ताची दखल घेत सरकारने विनाविलंब या अधिकाऱ्यांच्या बढत्यांना हिरवा कंदील दाखविला आहे. सहायक या अधिकाऱ्यांची 2007-08 मध्ये सरकारने पोलिस आयुक्त पदाकरिता निवडसूची तयार केली होती. सहायक पोलिस आयुक्त पदावर झालेल्या बढत्यांनंतर आता पोलिस उपायुक्त पदावरून पोलिस महानिरीक्षक पदाच्या बढत्यांची अधिकारी वाट पाहत आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून सहायक पोलिस आयुक्त पदावर बढती झालेल्या मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहे. कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण -
रमेश केणी (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), विनय करकरे (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), उदय काकडे (मुंबई), प्रफुल्ल जोशी (उपविभागीय पोलिस अधिकारी, धुळे शहर), प्रदीप शिंदे (मुंबई), श्रीकांत कलघटगी (मुंबई), अमर मटकर (मुंबई), प्रल्हाद सूर्यवंशी (मुंबई), विवेक हेमांडी (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), रामचंद्र आहेर (मुंबई), राजेश्‍वरी रेडकर (पोलिस उपअधीक्षक, मुख्यालय, ठाणे ग्रामीण), वनमाला पवार (मुंबई), पुष्पा देशमुख (पुणे शहर), बळिराम चिखले (उपप्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, दौंड), राजेंद्र शहा (पोलिस उपअधीक्षक, मुख्यालय, सांगली), प्रीती चौगुले (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), प्रदीप भोसले (उपविभागीय पोलिस अधिकारी, इचलकरंजी), मधुकर संख्ये (मुंबई), विजय मिस्त्री (महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक), चंद्रहास चव्हाण (उपविभागीय पोलिस अधिकारी, चिपळूण), रवींद्र खंडागळे (मुंबई), सुनील बाबर (पोलिस उपअधीक्षक, मुख्यालय, जळगाव), रमेश गायकवाड (नाशिक शहर), शिरीष तांदळेकर (सोलापूर शहर), अनिल बागलकोट (ठाणे), शंकर केंगार (उपविभागीय पोलिस अधिकारी, किनवट, नांदेड), यशवंत व्हटकर (पोलिस उपअधीक्षक, समाजकल्याण समिती, पुणे), प्रदीप सोनावणे (उपविभागीय पोलिस अधिकारी, चंद्रपूर), रविकांत रूपवते (उपविभागीय पोलिस अधिकारी, ब्रह्मपुरी विभाग, चंद्रपूर), दिलीप जगताप (राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), किशन आगरकर (पोलिस उपअधीक्षक, समाजकल्याण, अमरावती विभाग), रविकिरण ठाकूर (मुंबई), शिवाजी निम्हण (मुंबई), अभय येवले (ठाणे शहर), लक्ष्मण गोरे (मुंबई), अशोक पाटील (नाशिक शहर), सुनील मालुसरे (उपविभागीय पोलिस अधिकारी, जालना), शिवाजी शिंदे (सोलापूर शहर), जसपालसिंग राणी (मुंबई), अब्दुल रहमान अली बेग ( मुंबई), नारायण डुंबरे (मुंबई), मुजीब शेख (नवी मुंबई), किसनसिंह बहुरे (नागपूर शहर), नागेश लोहार (पोलिस उपअधीक्षक, वाहतूक, ठाणे ग्रामीण
), जगदीश तायडे (उपविभागीय पोलिस अधिकारी, परभणी ), रामकिसन आव्हाड (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), ज्ञानदेव गिते (पोलिस उपअधीक्षक, समाजकल्याण, औरंगाबाद विभाग), पंडित काळे (मुंबई)

(sakal,15 feb)

एमएमआरडीए कार्यालयात आत्महत्या

"एमएमआरडीए'च्या पुनर्वसन आणि पुनर्वसाहतप्रमुख वंदना सूर्यवंशी यांना लाखो रुपये देऊनही त्यांनी कामे न केल्याने तणावाखाली आलेल्या एका व्यक्तीने शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील "एमएमआरडीए' कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. संतोष प्रभाकर भोसले (43) असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असून या चिठ्ठीत सूर्यवंशी यांच्यावर आरोप करण्यात आले असल्याचे वांद्रे-कुर्ला संकुल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. पी. परेरा यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचेही परेरा या वेळी म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे राहणाऱ्या संतोषने एमएमआरडीए आणि म्हाडाची अडकलेली कामे करून देतो असे सांगून अनेकांकडून पैसे घेतले होते. काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पैसे घेतलेल्या लाभार्थींना कामे पूर्ण झाल्याचे सांगून त्याने एमएमआरडीए कार्यालयात बोलावले. भेटायला आलेल्या लोकांना घेऊन तो एमएमआरडीएच्या कॅन्टीनमध्ये गेला. त्यांच्याशी बोलत असतानाच तो चक्कर येऊन खाली पडला. या प्रकाराने एमएमआरडीए कॅन्टीनमध्ये एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला त्याला फिट आली असावी असे समजून नागरिकांनी त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली. प्रकृती अधिकच खालावत असल्याने त्याला भाभा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यापूर्वीच तो मरण पावला. पोलिसांना त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत लोकांची कामे करण्याकरिता एमएमआरडीएच्या पुनर्वसन आणि पुनर्वसाहतप्रमुख असलेल्या वंदना सूर्यवंशी यांना लाखो रुपये दिले; मात्र अनेकदा विचारणा करूनही त्यांनी कोणतीच कामे न केल्याने तणावाखाली येऊन आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने या पत्रात नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सूर्यवंशी यांची चौकशी करायला सुरुवात केली आहे. चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे भोसले याने वंदना सूर्यवंशी यांना लाखो रुपये दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक परेरा यांनी दिली. आज संतोष भोसले याचा मृतदेह त्याच्या डोंबिवली येथे राहणाऱ्या भावाच्या ताब्यात देण्यात आला.

(sakal, 14 feb)

शाहरूख खानच्या मन्नतवर केरोसिनच्या बाटल्या फेकल्या

"बिल्लू'चा वाद ः गॅलॅक्‍सी-गेईटी चित्रपटगृहातही तोडफोड

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान याच्या वांद्रे येथील "मन्नत' बंगल्यावर मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी हल्लेखोरांनी केरोसिनने भरलेल्या बाटल्या फेकल्याची घटना आज पहाटे घडली. सुदैवाने या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. या वेळी शाहरूख घरात नसल्याची माहिती परिमंडळ -9 चे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी दिली. दरम्यान, आज प्रदर्शित झालेल्या "बिल्लू' चित्रपटातील गाण्यावरून मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या गैरसमजामुळे काही तरुणांनी वांद्रे येथील गॅलॅक्‍सी-गेईटी चित्रपटगृहावर हल्ला करून तेथे तोडफोड केल्याचा प्रकार आज दुपारी घडला.

अभिनेता शाहरूख खान याचा आज प्रदर्शित झालेला "बिल्लू' हा चित्रपट त्याच्या शीर्षकामुळे सुरुवातीपासूनच वादात आहे. नाभिक समाजाच्या भावना दुखावत असल्याने या चित्रपटाचे "बिल्लू बार्बर' हे नाव बदलून ते "बिल्लू' असे ठेवण्यात आले. असे असतानाही आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अनोळखी हल्लेखोरांनी शाहरूखच्या "मन्नत' बंगल्यावर केरोसिनने भरलेल्या बाटल्या भिरकावल्या. या वेळी बंगल्याच्या बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोरांचा पाठलागही केला; मात्र हल्लेखोर पळून गेले. याप्रकरणी अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांनी सांगितले. एका चित्रपटाच्या शूटिंगकरिता शाहरूख खान परदेशात असल्याचेही कौशिक म्हणाले.

घरावर झालेल्या हल्ल्यानंतरही शाहरूखवर आलेले जनतेच्या नाराजीचे बालंट टळले नाही. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या "बिल्लू' चित्रपटातील "मर जानी मर जानी' या गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावत असल्याचा समज झालेल्या तरुणांच्या एका गटाने दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील गेईटी-गॅलॅक्‍सी चित्रपटगृहावर शीतपेयाच्या बाटल्या व दगड फेकले. या वेळी काहींनी चित्रपटविरोधी घोषणाही दिल्या. कारवाई करण्यापूर्वीच हल्लेखोर तरुण पळून गेले. यानंतर दुपारी मुस्लिम समाजातील काही नागरिक चित्रपटातील गाण्यावर आक्षेप घेत पुन्हा चित्रपटगृहाबाहेर मोठ्या संख्येने गोळा झाले. मात्र त्यांची समज काढून त्यांना परत पाठविण्यात आल्याची माहिती उपायुक्त कौशिक यांनी दिली. चित्रपटगृहाबाहेर केलेल्या तोडफोडप्रकरणी अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे कौशिक म्हणाले.

(sakal,13 feb)

Thursday, February 12, 2009

पाकिस्तानची कबुली हा भारताचा विजय

हसन गफूर ः 30 प्रश्‍नांची उत्तरेही मिळतील

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा कट आपल्याच जमिनीवर रचल्याची पाकिस्तानने दिलेली कबुली हा भारताचा विजय असून, त्यांनी विचारलेल्या 30 प्रश्‍नांना पोलिस लवकरच उत्तर देतील, अशी माहिती पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना दिली. या
हल्ल्याप्रकरणी 16 आरोपींची यादी पाकिस्तानकडे सोपविण्यात आली असून, त्यात हल्ल्यात मरण पावलेले अतिरेकी आणि पाकिस्तानमध्ये असलेले त्यांचे
हस्तक, तसेच कमांडर अशा सहा जणांचा समावेश आहे. अतिरेक्‍यांना मदत केल्याप्रकरणी दोन भारतीयांना यापूर्वीच अटक करण्यात आल्याचेही गफूर या वेळी म्हणाले.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तपास अंतिम टप्प्यात असून, येत्या 10 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर विदेशात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याचा ताबा परदेशी तपास यंत्रणांना देण्याबाबतचा न्यायालयाचा निर्णय आहे. या हल्ल्याचा एफबीआय, स्कॉटलंड यार्ड, फ्रान्स, जर्मनी येथील तपास यंत्रणांनीही प्रत्यक्ष भारतात येऊन तपास केला. स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबने या प्रकरणी गोळा केलेले काही पुरावे आवश्‍यकता भासल्यास न्यायालयात सादर करू, असेही पोलिस आयुक्त या वेळी म्हणाले. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला अतिरेकी कसाब याच्या जीवाला धोका असल्याने त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या हल्ल्यात पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा बल यांच्या कारवाईत ठार झालेल्या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह पाकिस्तानने मागितल्यास ते देण्यात येतील; अन्यथा पोलिस त्यांची विल्हेवाट लावतील, असेही ते म्हणाले.

(sakal,13 feb)

------


"कसाब' साकारणाऱ्या अभिनेत्याला मारहाण

मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर निघणाऱ्या "टोटल-10' या चित्रपटात मोहम्मद अजमल कसाबची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या राजन रामगोपाल वर्मा या अभिनेत्याला आज सकाळी अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याचा प्रकार मालाड येथे घडला. हल्लेखोराने वर्मा यांच्या गाडीवर दगडफेकही केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर वासरी हिलजवळ रुस्तुमजी टॉवर येथे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दिग्दर्शक आनंद मांडरे आणि हरीओम शर्मा यांच्या या चित्रपटात राजन रामगोपाल वर्मा (29) हा अभिनेता "शहाब' ही अतिरेक्‍याची व्यक्तिरेखा साकारत आहे. मुंबई हल्ला प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहम्मद अजमल कसाबच्या व्यक्तिरेखेला "शहाब' असे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही भूमिका करणारे वर्मा सकाळी चित्रीकरणासाठी जात असताना एक अनोळखी व्यक्ती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे आली. यानंतर या व्यक्तीने "फिल्म का चक्कर बंद कर' असे धमकावत वर्मा यांना मारहाण केली; मात्र पुढच्याच क्षणी वर्मा आपल्या गाडीतून तेथून निसटले. त्यांच्या गाडीच्या मागे लागलेल्या या हल्लेखोराने गाडीवर दगडफेकही केली. वर्मा यांनी या प्रकाराची माहिती मालाड पोलिसांना दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


(sakal,13 feb)

Wednesday, February 11, 2009

अपहृत मुलाची फिल्मी स्टाईलने सुटका

खंडणीसाठी अपहरण ः रेल्वेच्या आवाजावरून माग; अपहरणकर्त्यांना बेड्या

बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन याचा "आखरी रस्ता' चित्रपट आठवतोय? गुन्हेगार वडिलांचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला खिजविण्याकरिता वडिलांचा दूरध्वनी येतो. त्यांच्याशी बोलताना मागून जाणाऱ्या रेल्वेच्या शिटीचा आवाज हा चाणाक्ष अधिकारी हेरतो. अन्‌ वडिलांच्या शोधार्थ पोलिसांना रेल्वेस्थानक आणि रेल्वे रुळांच्या परिसरात शोध घ्यायला सांगतो. अगदी असाच प्रसंग नुकताच ऍण्टॉप हिल पोलिसांच्या बाबतीत नुकताच घडला. एका व्यापाऱ्याच्या सहा वर्षांच्या मुलाला 30 लाख रुपयांच्या खंडणीसाठी उचलून नेण्यात आले. अपहरणकर्त्यांशी दूरध्वनीवरून बोलणाऱ्या व्यापाऱ्याचा फोन टॅप करीत असताना मागून जाणाऱ्या रेल्वेच्या भोंग्याचा आवाज पोलिसांच्या तिखट कानांनी ऐकला. लगेचच अपहृत मुलाच्या शोधासाठी रेल्वेस्थानक व रेल्वे रुळांलगतच्या भागात पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू झाले. पोलिसांनी दोन दिवस केलेल्या परिश्रमानंतर शेवटी हा भाग मुंब्रा गाव येथे असल्याचे स्पष्ट झाले आणि या गावातील एका मंदिराजवळून अपहरण झालेल्या "त्या' चिमुरड्याची सुखरूप मुक्तता झाली. पोलिस मागावर असल्याचे पाहून रविवारी रात्री पळून जाण्यात यशस्वी ठरलेले ते दोघे अपहरणकर्ते काल रात्री उशिरा पोलिसांच्या तावडीत सापडले. हिंदी चित्रपटाला साजेशा या घटनेनंतर पोलिसांनी या दोघांच्या मुसक्‍या आवळल्याची माहिती परिमंडळ-4 चे पोलिस उपायुक्त एस. डी. बाविस्कर यांनी "सकाळ'ला दिली. आरोपींपैकी एक जण "त्या' व्यापाऱ्याचाच जुना नोकर असल्याचेही त्यांनी सांगितले.
शीव-कोळीवाडा येथील बीएमसी क्वॉर्टर्ससमोरून शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद गुप्ता या लहानग्याचे सोनू सिंग (वय 23; रा. दिवा) व सचिन सोनवणे (22, रा. डोंबिवली) दोघांनी अपहरण केले. सोन्याचे व्यापारी असलेले प्रल्हादचे वडील ओमप्रकाश गुप्ता यांना 30 लाखांच्या खंडणीसाठी दूरध्वनी यायला सुरुवात झाली. या प्रकाराने भेदरलेल्या ओमप्रकाश गुप्ता यांनी तत्काळ ऍन्टॉप हिल पोलिस ठाण्यात ही माहिती दिली. अतिशय संवेदनशील असलेल्या या घटनेच्या तपासासाठी परिमंडळ-5 चे पोलिस उपायुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. गुप्ता यांना वारंवार दूरध्वनी करून अपहरणकर्ते ठाणे, कुर्ला, वांद्रे, मुलुंड अशा सहा वेगवेगळ्या ठिकाणी बोलावत होते; मात्र मुंब्रा येथून अपहरणकर्त्यांनी केलेला दूरध्वनी पोलिसांच्या पथ्यावर पडला. रेल्वेस्थानक व रेल्वे रुळांच्या परिसरात शोधमोहीम हाती घेतल्यानंतर अपहरणकर्ते मुंब्रा परिसरात असल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी या परिसरात आधीच सापळा लावला होता. पोलिसांच्या निर्देशानुसार गुप्ता यांनी अपहरणकर्त्यांनी मागणी केलेली खंडणीची रक्कम मुंब्रा येथील मंदिराजवळ नेऊन ठेवली. अपहृत मुलगा व पैशांची बॅग यांच्यात अंतरही बरेच ठेवण्यात आले. बॅग घेण्याच्या प्रयत्नात अपहरणकर्ते मंदिराजवळ गेले; मात्र तोपर्यंत या बेवारस बॅगेभोवती बघ्यांची गर्दी झाली. अशातच पोलिस मागावरच असल्याचे लक्षात येताच दोन अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. रात्री साडेनऊ वाजता पोलिसांनी प्रल्हाद याची सुखरूप मुक्तता केली. त्यानंतर काल रात्री दिवा व डोंबिवली परिसरात घेतलेल्या शोधमोहिमेत पोलिसांनी दोघांना अटक केली. सोनू सिंग हा ओमप्रकाश गुप्ता यांच्याकडे वर्षभरापूर्वी कामाला होता. झटपट पैसे कमविण्यासाठी दोघांनी हा प्रकार केल्याची माहिती पोलिस उपायुक्त बाविस्कर यांनी दिली.

(sakal,12 feb)

मद्यपी चालकाच्या कारमधून प्रवास केल्यास कारावास!

पोलिसांची कारवाई ः पहिल्या गुन्ह्याची नोंद

दारू पिऊन कार चालविणाऱ्या मित्राच्या कारमध्ये बसणे धोकादायक असून यापुढे हा गंभीर गुन्हा ठरणार असून या गुन्ह्यापोटी कारावासाची शिक्षाही होऊ शकते. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी आता अशा वाहनचालकासोबत कारमध्ये बसलेल्या सहप्रवाशांवरही कारवाई करायला सुरुवात केली आहे. चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती असतानाही त्याच्यासोबत कारमध्ये बसलेल्या सहप्रवाशाला वाहनचालकाप्रमाणेच दोन हजार रुपये दंड आणि एक दिवसाच्या कारावासाची शिक्षा आज न्यायालयाने ठोठावली. सहप्रवाशाला शिक्षा होण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हरीश बैजल यांनी दिली.
मुलुंडमधील मॉडेला चेकनाका येथे मारुती स्विफ्ट गाडीतून जाणारा योगेश भोईर (21) आणि त्याचा सहप्रवासी लोकेश घोलप (22) या दोघांवर वाहतूक पोलिसांनी 4 फेब्रुवारी रोजी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत कारवाई केली. ठाण्यात घंटाळी नाका येथे राहणाऱ्या योगेश भोईर याने मद्यप्राशन केल्याची कल्पना असतानाही लोकेश तो चालवीत असलेल्या कारमध्ये बसला होता. या आरोपाखाली वाहतूक पोलिसांनी योगेशसोबत लोकेश यालाही सहआरोपी करून घेतले. या दोघांना आज सकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची साधी कैद आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मोटार वाहतूक कलम 188 प्रमाणे सहप्रवाशावर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. मोटरसायकल आणि चारचाकी वाहनांकरिता यापुढे असेच निकष लावण्यात येणार असल्याचे हरीश बैजल यांनी सांगितले.


(sakal,12 feb)
----

कसाबविरुद्ध पाच देशांमध्ये गुन्हे दाखल होणार

तपासासाठी ताबा मागण्याचीही शक्‍यता


अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्यावर फ्रान्स, अमेरिका, सिंगापूर, इटली आणि जपान या देशांत गुन्हे दाखल होणार आहेत. या गुन्ह्यांच्या तपासासाठी हे देश कसाबचा ताबा मागण्याचीही दाट शक्‍यता असल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुंबई हल्ल्यात मरण पावलेल्या 163 नागरिकांत 26 परदेशी नागरिकांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास सुरू झाल्यापासून हे नागरिक ज्या देशांचे आहेत त्या देशांनी आपली तपास पथके मुंबईत पाठविली. या देशांत अमेरिका, कॅनडा, जपान, फ्रान्स, जर्मनी, मलेशिया, इस्राईल, मेक्‍सिको, इटली, स्पेन, नेदरलॅण्ड, थायलंड, ब्रिटन, सिंगापूर आणि मॉरिशस या पंधरा देशांचा समावेश आहे. या देशांच्या तपास यंत्रणांनी मुंबई हल्ल्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या पोलिसांना आवश्‍यक असलेली महत्त्वपूर्ण माहिती वेळोवेळी दिली आहे. पंधरा देशांपैकी पाच देशांनी मोहम्मद अजमल कसाबवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई पोलिसांनी तयार केलेले आरोपपत्र हे देश त्यांच्या खटल्यासाठी वापरण्याची शक्‍यता आहे. तपासासाठी कदाचित कसाबला परदेशवाऱ्याही कराव्या लागतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई हल्ल्याकडे सर्व देश वेगळ्या पद्धतीने पाहत असून, त्याचा अभ्यासही करीत आहेत. अशा प्रकारची घटना आपल्या देशात होऊ नये यादृष्टीने काही देशांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करायलाही सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील तांत्रिक आणि फॉरेन्सिक बाबींची माहिती जाणून घेण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त देवेन भारती यांच्या नेतृत्वाखाली
चारसदस्यीय पथक काल रात्री अमेरिकेला रवाना झाले आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कसाबच्या सुरक्षिततेला मोठ्या प्रमाणावर धोका आहे; मात्र त्याला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती चुकीची असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

कसाबला दाऊद टोळीकडून धोका

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याच्या जीवाला दाऊद टोळीकडून धोका आहे. तशा स्वरूपाची माहिती गृह मंत्रालयाकडे आल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री प्रकाश जैसवाल यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. याबाबत सुरक्षा यंत्रणा आवश्‍यक ती दक्षता घेत आहेत. सुरक्षा यंत्रणा कसाबच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचेही जैसवाल यांनी सांगितले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने ही जबाबदारी त्याची भारतातील सूत्रे संभाळणाऱ्या छोटा शकील याच्यावर सोपविल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी गृहखात्याला दिल्याचे समजते.

(sakal,11 feb)

वांद्य्रात 250 झोपड्या भस्मसात

18 जखमी ः हृदयविकाराने एकाचा मृत्यू

वांद्रे पश्‍चिमेला असलेल्या ओल्ड स्लॉटर हाऊस कंपाउंड येथील महाराष्ट्र नगर क्रमांक -1 या झोपडपट्टीला आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे 700 झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीमुळे एका नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला; तर 18 जण जखमी झाले. आगीमुळे बेघर झालेल्या झोपडीवासीयांना जवळच असलेल्या शाळा आणि मैदानात तात्पुरता आश्रय देण्यात आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे काम करीत होते. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

वांद्रे रेल्वेस्थानकालगत महापालिकेच्या यानगृहाजवळ ही झोपडपट्टी आहे. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टीला आग लागली. झोपड्या बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर केला गेल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समजताच शेकडो रहिवाशांनी मुलांना घेऊन जीवाच्या आकांताने घराबाहेर धाव घेतली. त्यातच झोपड्यांत असलेल्या गॅस सिलिंडरचे एकामागोमाग एक असे पाच स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या स्फोटानंतर लगेचच आगीचे मोठे लोळ आकाशात झेपावताना दिसले. या सगळ्या धावपळ आणि गोंधळात अनेकांना किरकोळ जखमा झाल्या.

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नाची शिकस्त करीत होते. काही नागरिकही त्यांना आग विझविण्यासाठी मदत करीत होते; मात्र मोठ्या प्रमाणावर पसरलेला धूर आणि अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडचणी येत होत्या. मोठ्या कष्टाने गोळा केलेल्या संसारोपयोगी वस्तू आगीत भस्मसात होत असताना अनेकांचा जीव तुटत होता. तसेच आगीला आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाला अपेक्षित यश येत नसल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे तरुणांचा एक गट या घटनेचे छायाचित्रण करण्यापासून प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना विरोध करीत होता.
आगीमुळे या परिसरात राहणारा रेहान शेख (40) या नागरिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. ही आग विझविताना तब्बल अठरा जण जखमी झाले. त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश जॉर्ज यांनी दिली.

महाराष्ट्रनगर झोपडपट्टीत आग लागल्याचे कळताच शेजारीच असलेल्या शास्त्रीनगर तसेच रेल्वेस्थानक परिसरात बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. या जमावाला आवर घालण्यासाठी या संपूर्ण परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. आगीत भस्मसात झालेल्या झोपड्यांमुळे बेघर झालेल्या शेकडो महिला आणि लहान मुलांना जवळच असलेल्या आवामी हायस्कूल, वांद्रे हायस्कूल आणि वांद्रे येथील मैदानात तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम मोहम्मद यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. या झोपडपट्टीत झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. मात्र इमारत उभी राहायला बराच कालावधी लागणार असल्याने रहिवाशांना उघड्यावरच राहावे लागणार असल्याचे तेथील रहिवासी मोहम्मद आझाद खान यांनी सांगितले.

(sakal,10 feb)

Sunday, February 8, 2009

रॉय जाणार की सरकार त्यांना तारणार?

दिवसभर चर्चा ः गृहमंत्र्यांचे सबुरीचे धोरण

पोलिस महासंचालक अनामी रॉय यांची नियुक्ती उच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर या निर्णयाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल, की रॉय यांना पायउतार व्हावे लागेल, याविषयी आज पोलिस आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. दरम्यान, रॉय यांच्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत आजच आपल्याकडे आली आहे. याबाबत कायदेशीर सल्ला घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच यासंबंधी राज्य सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

सेवाज्येष्ठतेत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर ए. एन. रॉय यांची गेल्या वर्षी फेब्रुवारीत नेमणूक झाली होती. या प्रकरणी प्रथम "कॅट' आणि नंतर उच्च न्यायालयात रॉय यांच्याविरुद्ध निर्णय देण्यात आला. या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारला आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल किंवा रॉय यांच्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार नवीन महासंचालकाची नियुक्ती करावी लागेल. या प्रकरणी रॉय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. ते नवी दिल्ली येथे पूर्वनियोजित बैठकीसाठी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. रॉय आजपासून दीर्घ रजेवर गेल्याची चर्चाही आज पोलिस आणि मंत्रालयीन वर्तुळात होती. मात्र त्याला कसलाच दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, रॉय प्रकरणात राज्य सरकार पुढे काय भूमिका घेणार, यासंबंधी गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतीचा तपशीलवार अभ्यास करणार असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी कायदेशीर सल्लाही घेतला जाणार असल्याचे पाटील म्हणाले. रॉय यांच्या प्रकरणात यापूर्वी झालेले सर्व निर्णय सरकारने घेतले आहेत, यापुढचे निर्णयही सरकार योग्य वेळी घेईल, असे पाटील या वेळी म्हणाले.

(sakal,6 feb)

अतिरेकी हल्ल्यात पितृछत्र हरपलेल्या शीतलच्या शिक्षणासाठी चार लाख

मुंबईकरांचा गौरव ः आय लव्ह मुंबईचा मदतीचा हात

तीन महिन्यांच्या मुलीला बनारस येथे तिच्या आजी-आजोबांकडे पहिल्यांदाच घेऊन जाण्यासाठी उपेंद्र आणि सुनीता यादव हे दांपत्य 26 नोव्हेंबरच्या रात्री छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून जायला निघाले; मात्र अचानक झालेल्या अतिरेकी हल्ल्यात या लहानशा कुटुंबाच्या चेहऱ्यावरचे हास्य हरपले. अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात उपेंद्र यांचे निधन झाल्याने त्यांची पत्नी सुनीता आणि अवघ्या तीन महिन्यांची मुलगी शीतल यांचा आधारच निखळला. "त्या' दोघींना सरकारकडून मदत तर मिळालीच, पण सामाजिक जाणिवेतून "आय लव्ह मुंबई' या संस्थेने लहानग्या शीतलच्या शिक्षणाकरिता मदत निधी गोळा करायला सुरुवात केली. समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला अन्‌ तिच्या शिक्षणासाठी तब्बल चार लाख 65 हजार रुपयांचा निधी गोळा झाला. या निधीचे वितरण काल (ता. 4) आय लव्ह मुंबईने घेतलेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमात 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यातील शहीद पोलिस आणि नागरिक यांचे कुटुंबीय तसेच प्रसंगावधान दाखविणाऱ्या मुंबईकरांचा गौरवही करण्यात आला.

आझाद मैदान येथील पोलिस क्‍लबमध्ये आय लव्ह मुंबई, जायन्टस्‌ इंटरनॅशनल आणि बार्कलेज बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस दलातील सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय साळसकर, पोलिस निरीक्षक शशांक शिंदे, सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्यासह सर्व शहीद पोलिसांचे कुटुंबीय, प्रसंगावधान दाखवीत शेकडो लोकांचे जीव वाचविणारे सामान्य मुंबईकर यांचा गौरव करण्यात आला. यात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे अनेकांचे प्राण वाचविणारे मोहम्मद तौफिक शेख ऊर्फ छोटू चहावाला, कॅप्टन तमिलसेल्व्हम, रेल्वे कर्मचारी विष्णू झेंडे, सुरेश कुशवाह, विवेक शर्मा, यू. एम. पाटील, एस. डी. वाघ, जे. एस. झिंपरीकर, व्ही. वाघमारे, बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. पी. एल. तिवारी, जे. जे. रुग्णालयाचे डीन सबनीस यांनाही त्यांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत सन्मानित करण्यात आले.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुंबई हल्ल्यातील जखमी अफरोज अन्सारी या लहान मुलाने केलेल्या मागणीनुसार त्याला संगणक पुरविण्यात आल्याची माहिती आय लव्ह मुंबईच्या विश्‍वस्त शायना एन. सी. यांनी उपस्थितांना सांगितले. या वेळी आय लव्ह मुंबईचे संस्थापक नाना चुडासामा, सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, बार्कलेज बॅंकेचे समीर भाटिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

(sakal,5 feb)

सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय सरकारवर अवलंबून

चित्कला झुत्शी ः विर्क यांच्या नियुक्तीची दाट शक्‍यता

उच्च न्यायालयाने पोलिस महासंचालक अनामी राय यांनी नियुक्ती रद्द करण्याच्या दिलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी असून लवकरच त्याबाबतचा निर्णय सरकार घेईल, अशी माहिती गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चित्कला झुत्शी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचा निर्णय झाल्यास सेवाज्येष्ठतेनुसार महासंचालकपदी एस. एस. विर्क यांची नियुक्ती होण्याची दाट शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राय यांची नियुक्ती रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केल्यावर याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही झुत्शी यांनी या वेळी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आजच्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार किंवा स्वतः महासंचालक राय सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतात. याबाबत राय यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र अपील सादर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यास अथवा लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यास महासंचालकपदी नवीन नियुक्ती होण्याबाबत पोलिस वर्तुळात साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
फेब्रुवारी-2008 मध्ये राय यांना तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून महासंचालक पदावर नेमण्यात आले. राज्य सरकार व राय या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतल्यास पोलिस महासंचालक पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार सरकारला पुन्हा राबवावी लागेल. या पदासाठी एस. एस. विर्क, जीवन वीरकर आणि सुप्रकाश चक्रवर्ती या तिघा ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार करावा लागणार आहे.

(sakal,5 feb)

अतिरेकी हल्ल्याप्रसंगी कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई ?

शिशुपाल यांची बदली ः पोलिसांकडून प्रशासकीय बाब असल्याचे स्पष्ट

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्यावेळी प्राणपणाने लढून हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांचा सर्वत्र सन्मान होत असतानाच कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर आता कारवाईला सुरवात झाली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून की काय आझादमैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश शिशुपाल यांची स्थानिक शस्त्र (एलए) विभागात बदली करण्यात आली. हल्ल्याच्या वेळी दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांची बदली झाल्याचे बोलले जाते. मात्र, या बदलीमागे 26 नोव्हेंबरचा हल्ला हे कारण नाही. प्रशासकीय कामकाजाचा एक भाग म्हणून ही बदली करण्यात आल्याची माहिती प्रशासन विभागाचे सह पोलिस आयुक्त भगवंत मोरे यांनी दिली.

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या रात्री अतिरेक्‍यांनी आझादमैदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर घातपात घडविला. अशा आणीबाणीप्रसंगी आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश शिशुपाल मात्र कर्तव्यावर उपस्थित नव्हते. हल्ल्याच्या वेळी कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांच्या कामगिरीची चौकशी करण्याची मागणी "सकाळ'ने यापूर्वी एक शून्य शून्य सदरातून "नेभळटपणाची चौकशी व्हावी' या मथळ्याखाली केली होती. केवळ दुर्दैव म्हणून 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याची घटना समजण्यासाठी फार उशीर लागल्याची खंत शिशुपाल यांनी "सकाळ' कडे व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याने 26 नोव्हेंबरच्या रात्री 8.40 वाजल्यापासून आपण रजेवर गेलो. सकाळी लवकर निघायचे असल्याने त्या रात्री आपण लवकर झोपलो. त्या रात्री आपला मोबाईल फोन देखील दुसऱ्या खोलीत राहिल्याने पहाटेपर्यंत बाहेर घडत असलेला प्रकार लक्षातच आला नाही. पहाटे पावणेतीनच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच आपण पोलिस ठाण्यात पोचलो. तेव्हापासून या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आपण होतो असेही ते म्हणाले.
प्रशासकीय कामकाजातील उणिवांमुळे आपल्याला तीन महिन्यांपूर्वीच एक नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीच्या अनुषंगाने 2 फेब्रुवारीपासून आपली बदली झाली. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याचा आणि बदलीचा दुरान्वयेही संबंध नाही असे शिशुपाल यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणाला प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांनी दुजोरा दिला. स्थानिक शस्त्र (एलए) शाखेशी संलग्न झालेले शिशुपाल आजारपणाच्या रजेवर गेले आहेत.

(sakal,5 feb)

--------------



अमेरिकी तरुणीचा जुहू येथे विनयभंग


देश-विदेशातील कृष्णभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या जुहू येथील इस्कॉन मंदिराच्या निवासी संकुलात राहणाऱ्या अमेरिकन तरुणीचा अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. धार्मिक स्थळी झालेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक काथकाडे यांनी दिली.
महिनाभरापूर्वी भारतात आलेल्या या अमेरिकन युवतीने इस्कॉनच्या निवासी संकुलात राहत असताना रविवारी सकाळी जुहू पोलिस ठाण्यात विनयभंग झाल्याची तक्रार दिली. या वेळी बलात्काराची शक्‍यताही व्यक्त झाल्याने पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने वैद्यकीय तपासणी करायला नकार दिला. या प्रकरणी मंदिर व्यवस्थापनदेखील त्यांच्या पातळीवर चौकशी करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक काथकाडे यांनी दिली. ही तरुणी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या तिच्या मित्र-मंडळींना भेटायला आली होती, असेही ते म्हणाले.

(sakal,4 feb)

रशियन एअरलाईन्स कर्मचाऱ्याची "ओबेरॉय'मध्ये आत्महत्या

"एअरलाईन एरोफ्लोट' या रशियन एअरलाईन्सच्या एका कर्मचाऱ्याने हॉटेल ओबेरॉयच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री उशिरा घडली. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

अलेक्‍झांडर हेन्रीआनो ( 22) असे या आत्महत्या केलेल्या रशियन तरुणाचे नाव आहे. एअरलाईन एरोफ्लोटच्या विमानाने मुंबईत आलेला अलेक्‍झांडर काल रात्री त्याच्या चार सहकाऱ्यांसोबत हॉटेल ओबेरॉयमध्ये थांबला होता. रात्री उशिरापर्यंत सहकाऱ्यांसोबत मद्यपान केलेल्या अलेक्‍झांडरच्या मोबाईलवर एक वाजण्याच्या सुमारास फोन आला. फोनवर बराच वेळ बोलल्यानंतर आलेल्या मानसिक तणावामुळे तो खोलीबाहेर निघून गेला. यानंतर त्याने रागाच्या भरातच हॉटेल ओबेरॉयच्या सोळाव्या मजल्यावरील खिडकीतून स्वतःला खाली झोकून दिले. त्यात तो जागीच ठार झाला, असा जबाब त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिला आहे.

पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जे. जे. रुग्णालयात नेला असून या घटनेची रशियन दूतावासामार्फत त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. या प्रकरणाची मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे
-------------


थरारक पाठलागानंतर चोरट्यांना अटक
चेन खेचून पळून जाणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनाच धडक देऊन पळणाऱ्या दोन मोटरसायकलवरील चौघांना माहीम पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केल्याची घटना आज पहाटे घडली. या वेळी मोटरसायकलस्वाराच्या धडकेने एक पोलिस जखमी झाला असून, त्याला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार करून पाठविल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली.
मोटरसायकलवरून आलेल्या दोन चेनस्नॅचरनी शिवाजी पार्क येथील पादचाऱ्याचे सोन्याचे दागिने पळवून ते माहीमच्या दिशेने पळत असल्याची माहिती पोलिसांच्या गस्ती वाहनाने माहीम पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस माहिम जंक्‍शनजवळ पॅडल रोड येथे उभे राहिले. तोपर्यंत मोटरसायकलवरून भरधाव आलेल्या चौघांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे नाकाबंदीसाठी उभे असलेले पोलिस शिपाई जॉंबाज खान पठाण (32) यांना धडक देऊन या चोरट्यांनी धूम ठोकली; त्यात पठाण गंभीर जखमी झाले.
पठाण यांना जखमी करून पुढे निघालेल्या या चौघांचा माहीम पीटर-वनच्या गाडीने थरारक पाठलाग केला. एका मोटरसायकलने रस्त्यावर लावण्यात आलेले अडथळेही उडविले. त्यानंतर कुमार वैद्य मार्गावर या चौघांना सहायक पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. विजय परमार (19), महेश वाघेला (18), विवेक मोरे (18) व राजेश गोहिल (22) अशी या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांनी शिवाजी पार्क परिसरात चेन स्नॅचिंग केली आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहेत. सध्या त्यांच्यावर अपघाताचा, तसेच सरकारी कामात अडथळा अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती माहीम पोलिसांनी दिली. अटक केलेल्या चारही आरोपींची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी तपासून पाहिली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

--------


"सिनेमॅक्‍स'च्या व्यवस्थापकाची गळा चिरून हत्या

अंधेरी येथील सिनेमॅक्‍स चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मंदार जयराम पाटील (वय 33) यांची अनोळखी मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्यारांनी गळा चिरून हत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याबाबत वर्सोवा पोलिस ठाण्यात अनोळखी मोरकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरी-पश्‍चिमेला वर्सोवा गावात असलेल्या सर्वोदय सोसायटीच्या मैदानात मंदार यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने खोलवर जखमा केल्या गेल्याचे आढळले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली.


(sakal,3 feb)

प्रीतीच्या वाढदिवसाला शेजाऱ्यांचे "जागरण'

कर्णकर्कश संगीत : कायदा धाब्यावर बसविल्याचा आरोप


वाढदिवसाच्या "पर्वणी'वर पहाटे उशिरापर्यंत मोठ्या आवाजात "डीजे' वाजवून शेजाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा हिला स्थानिक नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री दहानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजविण्यास बंदी असताना प्रीतीने केलेल्या कायद्याच्या उल्लंघनाबाबत तिच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त "यूएनआय'ने दिले आहे.

पाली हिल येथे वास्तव्य असलेल्या प्रीतीने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील घरात वाढदिवसानिमित्त एक पार्टी ठेवली होती. या पार्टीत "डीजे'च्या तालावर प्रीतीचे मित्र-मैत्रिणी बेधुंद होऊन नाचले. पहाटे चार वाजल्यापर्यंत मोठ्या आवाजात वाजविण्यात येणाऱ्या या "म्युझिक'मुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या झोपेचे मात्र खोबरे झाल्याची तक्रार आहे. पहाटे उशिरापर्यंत चांगलेच जागरण झालेल्या नागरिकांनी या प्रकरणाची माहिती खार पोलिसांना दिली. त्यापूर्वी काही नागरिकांना ही बाब पोलिस नियंत्रण कक्षालाही कळविली होती.

पोलिसांची डोळेझाक?
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याने पोलिस या ठिकाणी आले; मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न करता तेथून काढता पाय घेतला, असा आरोप आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने प्रीतीने पहाटे उशिरापर्यंत हा गोंधळ घातला असला तरी स्थानिक पोलिसांनी याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगितले. नागरिकांच्या तक्रारीनंतरही या घटनेची खार पोलिस ठाण्यात नोंदच नसल्याचे समजते.
(sakal,2 feb)

Sunday, February 1, 2009

अतिरेकी हल्ल्यानंतर..!

देशावर आजवरचा झालेला सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला म्हणून 26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्याकडे पाहिले जाते. सागरी मार्गाने दक्षिण मुंबईत उतरलेल्या अवघ्या 10 अतिरेक्‍यांनी या देशातील सगळ्याच सुरक्षा यंत्रणांना हलवून सोडले. तब्बल 59 तास पोलिस, नौदल, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि अन्य सुरक्षायंत्रणांनी या अतिरेक्‍यांना यमसदनी पाठवून मुंबईला सुरक्षित ठेवले, मात्र त्यासाठी या देशाला फार मोठी किंमत मोजावी लागली. साध्या होमगार्डपासून सहपोलिस आयुक्तपदाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 164 निष्पापांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. यात राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या दोघा कमांडोंनी दिलेले बलिदानही तितकेच महत्त्वाचे. सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांतील त्रुटींमुळे हा अतिरेकी हल्ला अधिक जहरी वाटत असला तरी अशा प्रकारच्या घटना पचविण्याचा मोठा आत्मविश्‍वास सामान्य मुंबईकरांत या घटनेनंतर निर्माण झाला. दहशती हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा प्रकारच्या घटना पुन्हा भारतात घडू नयेत याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि आश्‍वासनांची खैरात केली. प्रत्यक्षात त्यातील कितींची नजीकच्या काळात पूर्तता होतेय याकडेच सामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लष्कर-ए-तैय्यबाच्या अतिरेक्‍यांनी 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबईत घडविलेल्या थराराने संबंध जगाचे लक्ष वेधून घेतले. 105 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेले हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन हाउस या दक्षिण मुंबईतील तीन महत्त्वाच्या ठिकाणांना अतिरेक्‍यांनी लक्ष्य केले. कालपरवापर्यंत नरिमन हाऊसबाबत दक्षिण मुंबईत राहणाऱ्या फारच कमी लोकांना माहिती होती, मात्र "ज्यू' धर्मीयांचे वास्तव्य असलेली ही इमारत अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर ठळकपणे होती हेच या हल्ल्यानंतर स्पष्ट झाले. केलेल्या हिंसाचाराचे पडसाद जगभरात पडतील याची काळजी घेत अतिरेक्‍यांनी तब्बल 22 परदेशी नागरिकांचे बळी घेतले. यात ज्यूंची संख्या सर्वाधिक. 164 जणांचे जीव घेणाऱ्या आणि तीनशेहून अधिक नागरिकांना जखमी करणाऱ्या या अतिरेक्‍यांच्या कृत्याचा जगभरातून निषेध झाला. हा निषेध भारतीयांच्या अंतर्मनावर झालेल्या जखमेवर मलमपट्टी लावणारा असला तरी प्रत्यक्षात भारतीय सुरक्षायंत्रणा व गुप्तचर खाते या प्रकरणात कमी पडले हे सूर्यप्रकाशाइतके ढळढळीत सत्य आहे. मुंबईवर हल्ल्यासाठी आलेल्या 10 अतिरेक्‍यांपैकी मोहम्मद अजमल कसाब याला डी.बी.मार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी प्राणाची आहुती देऊन पकडले. या हल्ल्यासंबंधी कसाबने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळेच अनेकदा विश्‍वासघातकी राजकारण करणाऱ्या पाकिस्तानच्या छत्रछायेखाली मोठ्या होणाऱ्या लष्कर-ए-तैय्यबाचा सहभाग या हल्ल्यात स्पष्ट झाला. सुरुवातीला कसाब आपल्या राष्ट्राचाच नसल्याची भूमिका पाकिस्तानने घेतली. कसाबच्या वडिलांनी त्याची ओळख पटविल्यानंतर कुठे तो पाकिस्तानी असल्याबाबतची कबुली पाकिस्तानने दिली. मुंबई पोलिसांनी दाखविलेले शौर्य वाखाणण्याजोगे आहेच, मात्र अतिरेक्‍यांच्या एमपी-5 सारख्या अत्याधुनिक शस
्त्रांचा सामना करण्यासाठी चांगल्या दर्जाचे शस्त्र, ते चालविण्याचे प्रशिक्षण पोलिसांना मिळाले असते; तर काही ठिकाणी पोलिसांनी कच खाल्ल्याच्या घटना घडल्या नसत्या. उलट हातात काठी असलेल्या पोलिसांनी निधड्या छातीने अतिरेकी हल्ल्याचा मुकाबला केला हे इथे नमूद करावे लागेल. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या सामान्य नागरिकांत नव्याने आत्मविश्‍वास निर्माण व्हावा यासाठी काही दिवसांतच शहरात ठिकठिकाणी संवेदनशील "पॉईन्ट्‌स'वर शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले. शहरात चारशे ठिकाणी खंदक बनवून तेथे एके-47 रायफलधारी पोलिस अहोरात्र ठेवण्यात आल्याने नागरिकांतील भीतीचे वातावरण कमी झाले. मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी या चारशे ठिकाणांवर कायमस्वरूपी शस्त्रधारी पोलिस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणावर आठ शस्त्रधारी पोलिस ठेवण्यात येणार असल्याने येत्या काही महिन्यांतच चार हजार पोलिसांची पदे भरण्याची शक्‍यता आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

तत्परता सरकारची.

अचानक झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर संबंध पोलिस यंत्रणा काही क्षणातच खडबडून जागी झाली. हॉटेल ताज, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय या ठिकाणांसह छत्रपती शिवाजी टर्मिनसवर 26 नोव्हेंबरला रात्री साडेनऊ नंतर सुरू झालेल्या थराराचे सुरुवातीचे काही तास अतिशय महत्त्वाचे होते. पोलिसांनी उपलब्ध कुमक घेऊन अतिरेक्‍यांच्या हल्ल्याला कडवा प्रतिकार केला. गर्दीच्या ठिकाणांवर संबंध पोलिस दल लगेचच "इन ऍक्‍शन' झाल्याने अतिरेक्‍यांना त्यांचे मनसुबे मोठ्या प्रमाणावर साध्य करता आले नाहीत. अन्यथा छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे मोठा घातपात करून तेथे किमान पाच हजार नागरिकांना मारण्याचा त्यांचा बेत होता. उपलब्ध शस्त्रसाठा आणि साधनसामग्रीच्या मदतीने अतिरेक्‍यांशी दोन हात करताना धारातीर्थी पडलेल्या सोळा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हौतात्म्यामुळे अधिक हानी टळली. या शहिदांच्या कुटुंबीयांची झालेली हानी भरून निघणे अशक्‍य असले तरी त्यांच्या कुटुंबीयांना स्थैर्य देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. प्रत्येकी पंचवीस लाख रुपये; तसेच म्हाडाचे घर असे पॅकेज या शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. सारस्वत बॅंकेने पाच शहिदांच्या वारसांना त्यांच्या बॅंकेत दिलेली नोकरीही बॅंक व्यवस्थापनाच्या सजगतेचे उत्तम उदाहरण ठरावे. या हल्ल्यात मरण पावलेल्या सामान्य नागरिकांनाही राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख; तर केंद्र सरकारने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली. राज्य सरकारने जखमींना प्रत्येकी 50 हजार; तर केंद्राने प्रत्येकी एक लाख रुपये दिले असून, त्यांच्या उपचाराचा सर्व खर्चही सरकारने केला. याशिवाय रेल्वेनेही मृतांना लाखो रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. हल्ल्यातील पीडितांना 31 डिसेंबरपर्यंत सर्व प्रकारची आर्थिक मदत देण्याच्या केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांची पूर्त
ताही झाली आहे. अतिरेकी हल्ल्यात जखमी झालेल्या 39 पोलिसांना त्यामानाने सरकारकडून कमी मदत मिळाली. 16 मार्च 2008 मध्ये झालेल्या एका सरकारी निर्णयानुसार अशा प्रकारच्या आपत्कालीन स्थितीत कर्तव्य बजावताना जखमी झालेल्या पोलिसांना प्रत्येकी तीन लाख रुपये देण्याची तरतूद आहे.

गरज सक्षम सागरी सुरक्षेची

कराचीच्या समुद्र किनाऱ्याहून 23 नोव्हेंबरला लष्कर-ए-तैय्यबाच्याच मालकीच्या अल-हुसैनी जहाजातून मुंबई हल्ल्यासाठी हे अतिरेकी निघाले. शेकडो मैलांच्या सागरी प्रवासानंतर 26 नोव्हेंबरला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर कुलाबा येथे असलेल्या मच्छीमार कॉलनीत उतरणाऱ्या या दहाही अतिरेक्‍यांना संपूर्ण प्रवासात भारतीय सुरक्षायंत्रणापैकी कोणीच हटकले नाही याचेच नवल अधिक आहे. 12 मार्च 1993 रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत आरडीएक्‍सचा साठा आणण्यासाठी अरबी समुद्रातील सागरी मार्गाचाच वापर करण्यात आला. बॉम्बस्फोटांचा अनुभव गाठीशी असतानाही भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सागरी सीमांवर म्हणावे तसे लक्ष दिलेच नसल्याचे नुकत्याच मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध झाले. अरबी समुद्रात नौदलाचा सराव सुरू असताना त्यांच्या नजरेखालून अतिरेक्‍यांना वाहून नेणारी बोट निसटणे हा हलगर्जीपणाचा कळसच. पाकिस्तानची सागरी हद्द ओलांडत असताना त्यांच्या हद्दीत गेलेल्या एमव्ही कुबेर या मासेमारी करणाऱ्या भारतीय बोटीला अतिरेक्‍यांनी हायजॅक केले. या बोटीतून मच्छीमारांसारखा वेश परिधान करून हे अतिरेकी मुंबईकडे निघाले. नौदल, तटरक्षक दलाच्या गस्तीनौकांना संशय येऊ नये यासाठी त्यांनी कुबेर बोटीच्या तांडेलला जिवंत ठेवले. याशिवाय दहाही अतिरेक्‍यांनी त्यांच्या कपाळावर लाल टिळा आणि हातात दोरे बांधले. त्यामुळे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांना ते मच्छीमार असावेत असेच वाटत होते. भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या या अतिरेक्‍यांच्या बोटीला नौदल, तटरक्षक दल अथवा सागरी पोलिसांनीही हटकले नाही. मुंबईपासून तीन नॉटीकल माईल्स अंतरावर बोटीचा तांडेल याला ठार मारून पुढील प्रवास एका लहानशा डिंगीतून करणाऱ्या या अतिरेक्‍यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे कोणीच नव्हते. 93 च्या बॉम्बस्फोटा
ंनंतर देशभरात 72 सागरी पोलिस ठाणी सुरू करण्यात आली. त्यापैकी एक सागरी पोलिस ठाणे मुंबईच्याही वाट्याला आले. 114 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा असलेल्या मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी अवघे एक पोलिस ठाणे मिळाले असले तरी आजपर्यंत ते कार्यान्वित झालेले नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या 14 सागरी पोलिस ठाण्यांपैकी 13 पोलिस ठाणी यापूर्वीच कार्यान्वित झाली आहेत. सागरी गस्त छोट्या बोटींशिवाय हायस्पीड बोटींतूनही व्हावी म्हणून कोट्यवधी खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात मुंबईसाठी देण्यात आलेल्या हायस्पीड बोटीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून गोवा शिपयार्डात सुरू आहे. यावरूनच सरकार मुंबईच्या सुरक्षिततेबाबत कितपत सजगपणे विचार करीत होते याचा प्रत्यय येऊ शकेल. मुंबईच्या या ढिसाळ सुरक्षायंत्रणांचा गैरफायदाच अतिरेकी संघटना किंबहुना पाकिस्तानने घेतला म्हटल्यास वावगे ठरू नये.

गुप्तचर खाते आणि सुरक्षायंत्रणांतील समन्वय महत्त्वाचा

मुंबई हल्ल्याच्या तीन महिन्यांपूर्वी गुप्तचर खात्याने अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्‍यता वर्तविली होती ही बाब हल्ल्यानंतर आत्मपरीक्षण करणाऱ्या सुरक्षायंत्रणांना जाणवली. गुप्तचर खात्याच्या या "इनपुट'वर वेळीच दखल घेतली गेली असती; तर हा हल्ला टळला असता असे आता जाहीरपणे बोलले जाऊ लागले आहे. गुप्तचर खात्याकडून आलेल्या एका "इनपुट'नंतर अतिरेकी हल्ल्यात क्षतीग्रस्त झालेल्या हॉटेल ताजच्या व्यवस्थापनाला अशा प्रकारच्या हल्ल्याच्या शक्‍यतेची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली होती, मात्र काही दिवसांतच या सूचनेवर म्हणावी तशी अंमलबजावणी झाली नाही. अतिरेकी हल्ल्याच्या शक्‍यतेच्या माहितीकडे डोळेझाक करण्याचा मोठा फटका सुरक्षायंत्रणा आणि गुप्तचर खात्याला या घटनेनंतर बसला. या दोन्ही विभागांत असलेल्या त्रुटी केंद्र सरकारनेही मान्य केल्या आहेत. शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर मुंबईत आलेले गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पहिल्याच मुंबई भेटीत त्यांनी या दोन्ही खात्यांना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. यानंतर गुप्तचर यंत्रणांतील कमतरतेची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने हल्ल्यानंतर सुरक्षायंत्रणा, गुप्तचर खाते आणि सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर अग्रक्रम देण्याचा सर्वप्रथम निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने केंद्र तसेच राज्य सरकारने तातडीने यासंबंधी पावले उचलायला सुरुवातही केली असून, राज्य सरकारने गुप्तचर खात्यात अधिकारीपदांच्या थेट भरतीला सुरुवातही केली आहे. केंद्राने तर आपत्कालीन स्थितीत दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी मुंबईसारख्या महानगरांत राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) चे कायमस्वरूपी तळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील एजीच्या तळाला जागा देण्यासाठी राज्य सरकार जागा देणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर "फोर्सवन' नावाचे स्वतंत्र कमांडो पथक स्थापन करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. साडेतीनशे कमांडोंच्या या पथकाचा तळ मुंबईतील विमानतळानजीक ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास हे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचू शकेल. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत तो कार्यान्वित करण्यावर सरकारचे लक्ष आहे. याशिवाय आणखी दीडशे पोलिसांना हॉंगकॉंग पोलिसांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यासाठी तसेच अत्याधुनिक शस्त्रसाठा, उपकरणे, वाहने, सागरी सुरक्षेसाठीच्या बोटींची खरेदी यांच्यासाठी 90 कोटी रुपयांहून अधिक निधी राज्य सरकार खर्च करीत आहे. जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याशिवाय काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकणे कठीण असल्याने सर्वप्रथम त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या विषयांवर सर्वाधिक लक्ष दोन्ही सरकारांनी द्यायला सुरुवात केली आहे.
एकंदरीतच मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर समान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. सुरक्षा यंत्रणांना अधिक सक्षम करण्याची चर्चा प्रामुख्याने होत असली तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत सरकार किती गंभीर आहे, याकडे सामान्यांचे लक्ष अधिक आहे. मुंबईच्या सुरक्षिततेसाठी 93 च्या बॉम्बस्फोटानंतरही योजना आखण्यात आल्या होत्या, मात्र त्यातील कित्येक योजना कागदावरच राहिल्याने मुंबईवर 26 नोव्हेंबरला हल्ला करणे अतिरेक्‍यांना शक्‍य झाले. या अनुभवांतून बऱ्यापैकी शहाणे झालेले सरकार सुरक्षिततेविषयीच्या सर्व योजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करेल, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांनी आता बाळगायला हरकत नाही.

दिलेली आश्‍वासने अन्‌ पाळलेले वायदे

अतिरेकी हल्ल्यानंतर राज्य सरकारने शहिदांच्या कुटुंबीयांसाठी दिलेली मदतीची आश्‍वासने व त्यांची झालेली पूर्तता
पुढीलप्रमाणे ः-

1) 25 लाख रुपयांची आर्थिक मदत - सर्व शहिदांना आर्थिक मदत दिल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा दावा.
2) कर्मचारी व अधिकारी यांच्या श्रेणीप्रमाणे 600 ते 1000 चौरस फुटांचे घर - घरे देण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू.
3) निवृत्तीपर्यंतचे पूर्ण वेतन - मासिक वेतन देण्याची प्रक्रिया सुरू. शहीद अधिकारी- कर्मचारी निवृत्त होण्याच्या तारखेपासून त्यांना निवृत्तिवेतन देण्याची प्रक्रिया सुरू होईल.
4) कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - अद्यापपर्यंत कोणत्याही शहिदाच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी दिलेली नाही; मात्र सारस्वत बॅंकेने पाच शहिदांच्या वारसांना नोकरी दिली.

सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधी सरकारने दिलेली आश्‍वासने पुढीलप्रमाणे ः-

1) पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर भर देणार.
(आजवरचा खर्च - 941 कोटी)
2) राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर राज्याच्या सुरक्षिततेसाठी "फोर्स वन' कमांडो पथकाची स्थापना करणार.
3) "फोर्स वन'साठी स्वतंत्र हेलिकॉप्टर, 36 अत्याधुनिक बोटींची खरेदी करणार. त्यापैकी 12 बोटी पोलिस दलात तातडीने रुजू होणार.
4) एमपी-5 एमपी-15 सारख्या अत्याधुनिक शस्त्रांची खरेदी करणार.
5) राज्य गुप्तचर विभागाच्या सक्षमीकरणासाठी 85 अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणार.
6) पुणे येथे इंटेलिजन्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करणार.
7) सागरी सुरक्षा सक्षम करण्यावर प्रामुख्याने भर.
8) दहशती कृत्यांचा प्रभावी व परिणामकारक तपास करण्यासाठी नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी (एनएसए) ची स्थापना करणार.
9) जखमींना सरकारकडून पुरेपूर आर्थिक सहकार्य. विमा कंपन्यांनी जखमी व मृतांच्या विम्याचे परतावे 31 डिसेंबरपर्यंत देण्याचे निर्देश.


आश्‍वासनानंतर सरकारने पाळलेले वायदे


1) पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 90 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता.
2) राज्य सुरक्षा दल (फोर्स वन) साठी अद्ययावत शस्त्रे, संदेशवहन यंत्रणा व साधनसामग्रीकरिता 16 कोटी 7 लाख रुपये (खरेदी प्रक्रिया सुरू)
3) 12 वेगवान बोटींसाठी 48 कोटी रुपयांचा निधी, हेलिकॉप्टरबाबत निर्णय नाही. बोटींची खरेदी प्रक्रिया सुरू होणार.
4) मुंबई पोलिस दलासाठी आवश्‍यक साधनसामग्री व सुरक्षिततेच्या उपकरणांसाठी 36 कोटी 63 लाख 30 हजार रुपयांचा निधी (खरेदी प्रक्रिया सुरू)
5) गुप्तवार्ता विभागात 85 पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात.
6) राज्य गुप्तवार्ता विभागात सायबर मॉनिटरिंग सेल व सायबर कनेक्‍टिविटी सेल सुरू होणार.
7) सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी 18 ट्रॉलर्स (प्रक्रिया सुरू), सागरी सीमा सुरक्षा दलाकरिता 24 वेगवान बोटी मागविण्यात आल्या. 2011 पर्यंत 109 बोटी मिळणार.
8) दहशतवादी कृत्यांचा तपास करण्यासाठी "एनआयए'ची स्थापना, केंद्राकडून विधेयकाला मान्यता.
9) जखमींना आर्थिक मदत व उपचार देण्याची प्रक्रिया सुरू. पोलिस खात्यातील जखमींना तीन लाखांपर्यंतची मदत देण्याची तरतूद असताना त्यांची 50 हजारांवर बोळवण.
------------------