Sunday, September 15, 2013

डॉन को पकडना मुश्‍किल नही...!

"डॉन को पकडना मुश्‍किलही नही, नामुमकिन है' हा डायलॉग कोणे एके काळी प्रचंड गाजला... परंतु "समय बडा बलवान' असतो, हेही लक्षात ठेवायला हवं. भारतानं प्रयत्नांची शिकस्त केल्यास, दांडगी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीनं पावलं उचलल्यास दाऊद इब्राहिम भारतातल्या तुरुंगात शिक्षा भोगत असल्याचं दिसलं तर आश्‍चर्य वाटायला नको. "दाऊदला खेचून आणू,' असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गेल्या आठवड्यात म्हटलंच आहे!
संघटित गुन्हेगारी व दहशतवादी कारवायांमुळे जगभरातल्या "मोस्ट वॉंटेड' दहशतवाद्यांच्या यादीत अग्रक्रमावर असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरला अटक करून भारतात आणण्याचे जोरदार प्रयत्न केंद्रीय तपासयंत्रणांनी सुरू केले आहेत. मुंबईच्या अंडरवर्ल्डवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या दाऊदला अटक करण्यासाठी "एफबीआय' या अमेरिकी गुप्तचर संघटनेशी बोलणी सुरू आहेत. दाऊदच्या मुसक्‍या आवळायला मदत करण्यासंबंधी अमेरिकेचे ऍटर्नी जनरल एरिक होल्डर यांनी सहमती दर्शवल्याचं वक्तव्यसुद्धा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आठवडाभरापूर्वीच केलं. प्रत्यक्षात गेली 20 वर्षं देशाबाहेर राहून मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आजही अबाधित वर्चस्व ठेवणारा दाऊद भारतीय सुरक्षायंत्रणांच्या हाती इतक्‍या सहजासहजी लागेल का, हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांचा मास्टरमाइंड असलेला दाऊद "आयएसआय' या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या संरक्षणात पाकिस्तानात ऐषारामात जगत आहे. इंटरपोलशी संबंधित असलेल्या जगभरातल्या प्रत्येक राष्ट्राच्या सुरक्षायंत्रणांना दाऊद पाकिस्तानात वास्तव्याला असल्याचं माहीत आहे; पण भारतीय सुरक्षायंत्रणांचा हा दावा पाकिस्तान सरकारनं दरवेळी फेटाळून लावला. "रॉ' आणि "आयबी' या भारतीय गुप्तहेर संघटनांनी पाकिस्तानातल्या दाऊदच्या वास्तव्याचे घराच्या क्रमांकासह ठोस पुरावे पाकिस्तानला कळवले. मात्र, दाऊद इब्राहिम नावाची अशी कोणतीही व्यक्ती आपल्याकडे राहत नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. भारत, पाकिस्तान, येमेन आणि दुबईतून मिळवलेले 11 पासपोर्ट; तसंच 16 नावं असलेला दाऊद हा पाकिस्तानातल्या बड्या उद्योजकांपैकी एक आहे. ज्याच्या गुंतवणुकीवर कराची स्टॉक एक्‍स्चेंज आजही उभं आहे, त्या दाऊदला संरक्षित ठेवण्यासाठी अल्‌ कायदा, लष्कर-ए-तैयबा, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर सदैव सज्ज असतं. गेली अनेक वर्षं दाऊद इब्राहिमच्या मागावर असलेल्या "रॉ'नं त्याच्या कराचीतल्या दोन आणि इस्लामाबाद इथल्या घरांचे पत्ते मिळवले. पाकिस्तानी नौदल, लष्कर व आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी; तसेच बडे उद्योजक व व्यावसायिक राहत असलेल्या कराचीतल्या "क्‍लिफ्टन' या पॉश वसाहतीत दाऊद, त्याची पत्नी मेहजबीन, विश्‍वासू साथीदार छोटा शकील, टायगर मेमन, आफताब बटकी, येडा याकूब, फहीम मचमच यांच्यासह अनेक वर्षं वास्तव्याला आहे; पण पाकिस्ताननं त्याचं अस्तित्वच नाकारल्यामुळे भारतीय सुरक्षायंत्रणांपुढे असलेला पेच अनेक वर्षं कायम होता. पाकिस्तानच्याच अबोटाबाद इथल्या एका घरात लपून बसलेला अल्‌ कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला 2 मे 2011 रोजी अमेरिकेच्या "नेव्ही सील'च्या कमांडोंनी एका कारवाईत ठार केलं. यावरून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तान आश्रय देत असल्याची वस्तुस्थिती जगापुढे आली. एरवी, "आम्हीच तालिबानी आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या कारवायांनी हैराण झालो आहोत,' असा बनाव करून कानाला हात लावणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा लादेनच्या हत्येनंतर समोर आला. पाकिस्तानच्या लष्करानंच लादेनसाठी अबोटाबाद इथल्या घराला सुरक्षा मिळेल, अशी व्यवस्था करून दिली होती. या घराला तारेचं मोठं कुंपण घालण्याचं कामही पाकिस्तानी लष्करानंच केल्याचंही स्पष्ट झालं होतं. अल्‌ कायदाच्या या प्रमुखाला आश्रय देणारा पाकिस्तान दाऊदसारख्या संघटित गुन्हेगारीकडून दहशतवादी कारवायांकडे वळलेल्या अंडरवर्ल्ड डॉनला सहज आश्रय देऊ शकतो, हे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे स्पष्ट झालं. असं असलं तरी पाकिस्तानवरचा दबाव वाढवून दाऊदला आपल्या ताब्यात घेण्यात त्या वेळीसुद्धा भारत कमी पडला. लादेनच्या हत्येनंतर बिंग फुटण्याच्या भीतीनं पाकिस्ताननं दबावाखाली येऊन दाऊदला त्याचा पुतण्या मोईन याच्या नैरोबीत होणाऱ्या लग्नालासुद्धा उपस्थित राहण्यास मनाई केली होती. एवढंच नव्हे, तर केवळ वास्तव्याचं ठिकाणी उघड होऊ शकेल, या भीतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नवदांपत्याला आशीर्वाद देणंही त्यानं टाळलं होतं. यानंतरच्या काळात स्वतःला लपण्यासाठी "सेफ हेवन'च्या शोधात दाऊदनं सोमालिया, झिंबाब्वे, कांगो आणि सुदानसारख्या ठिकाणांचा पर्यायदेखील नेहमी खुला ठेवला. मात्र, परिस्थिती निवळल्यानंतर दाऊदनं कराचीत क्‍लिफ्टन परिसरात राहायला पसंती दिली. या वेळी त्यानं फक्त घराचा पत्ता बदलला. त्यापूर्वी दाऊदसोबत दुबई आणि कराची इथं राहिलेल्या करीमुल्ला खान याला ऑगस्ट 2008 मध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली होती. त्याच्या चौकशीत दाऊद कराचीच्या क्‍लिफ्टन इथं आयएसआयच्या संरक्षणात राहत असल्याचं स्पष्ट झालं होतं. 1993 च्या साखळी बॉंबस्फोटांच्या वेळी शेखाडी बंदरात आरडीएक्‍स आणि शस्त्रांचा साठा उतरवण्यात करीमुल्लाचा महत्त्वाचा वाटा होता. स्फोटांनंतर तोसुद्धा दाऊदसोबत दुबईत आणि नंतर पाकिस्तानात वास्तव्याला होता. त्याच्या चौकशीतसुद्धा दाऊद पाकिस्तानातल्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी असल्याचं स्पष्ट झालं होतं. दाऊद पाकिस्तानात असल्याचं सगळ्या जगाला माहीत असलं, तरी "तो आपल्याकडे नाही', असा दावा पाकिस्तानकडून वारंवार केला जात आहे. यामागची कारणमीमांसा पूर्णतः वेगळी आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाच दाऊदच्या पैशावर आजही अवलंबून आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. काही वर्षांपूर्वी डबघाईला आलेल्या पाकिस्तानी रेल्वेला सावरण्यासाठी सरकारनं दाऊदची मदत घेतल्याचंही सांगण्यात येतं. विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असलेल्या भारतात घातपाती कारवाया घडवून इथल्या विकासाला खीळ बसवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. भारतात बनावट चलनी नोटा, अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांचे साठे वितरित करण्यासाठी आयएसआयच्या माध्यमातून अल्‌ कायदानंसुद्धा दाऊदचं संघटित गुन्हेगारी टोळीचं मोठे नेटवर्क वापरलं. भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशासह पश्‍चिम आशियाई देश; तसंच आखाती देशांत दाऊदची हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. नेपाळ स्टॉक एक्‍स्चेंज; तसंच तिथल्या काही बॅंकांतही त्याचे पैसे आहेत. नेपाळमधले कॅसिनो आणि डान्सबारमध्येही दाऊदचा पैसा आहे. भारताविरोधी कारवाया करण्यासाठी दाऊदनं नेपाळमधील माओवाद्यांशी संधान साधून त्यांच्या मदतीनं शस्त्रास्त्र, बनावट चलनी नोटांचं वितरण करायला सुरवात केली. त्यामुळं दाऊद हा पाकिस्तानसाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. दुबई पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केलेला दाऊद टोळीचा कुख्यात गॅंगस्टर मुन्ना झिंगाडा याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा प्रयत्न करत आहे. मात्र, मुन्ना पाकिस्तानी नागरिक असल्याचे पुरावे पाकिस्तानी प्रशासनानं सादर करून त्याचा ताबा मिळण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात केली आहे. यावरूनच दाऊदची पाकिस्तानी प्रशासनावर असलेली हुकमत सिद्ध होते. वयाच्या साठीकडे झुकलेला दाऊद आता पूर्वीसारखा कार्यरत नाही. हृदयाच्या आजारामुळे आशिया खंडात पसरलेल्या आपल्या अवैध धंद्यांची सर्व सूत्रं त्याचे भाऊ; तसंच अतिशय विश्‍वासू समजला जाणारा छोटा शकील यांच्याकडे सोपवली आहेत. दक्षिण मुंबईत असलेल्या रिअल इस्टेटच्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी त्यानं लहान भाऊ इक्‍बाल कासकरला भारतात धाडलं होतं. दुबईच्या "इंडियाना पब'मध्ये गोंधळ घातल्यानंतर तिथल्या सुरक्षायंत्रणांनी इक्‍बालला अटक केली. मग, इक्‍बाल कासकरसंबंधीची माहिती भारतीय यंत्रणांना कळवून त्याचं अधिकृतरीत्या प्रत्यार्पण घडवून आणण्यात आलं. नागपाड्याच्या पाकमोडिया स्ट्रीट इथं असलेल्या दाऊदच्या कुटुंबाच्या घरात इक्‍बालचं वास्तव्य आहे. दाऊदचा मुंबईतला रिअल इस्टेटचा व्यवसाय तो सांभाळत असल्याचं सांगण्यात येतं. गेल्या 20 वर्षांत परदेशात राहून आपली टोळी चालवणाऱ्या दाऊदच्या भारतातल्या नेटवर्कचा वापर आता आयएसआयनंसुद्धा घेणं बंद केलं आहे आणि आमिर रझा, रियाज आणि इक्‍बाल भटकळसारखे दहशतवादी तयार करायला सुरवात केली. या घडामोडींकडे डोळसपणे पाहिल्यास गेल्या काही वर्षांत आयएसआयनं दाऊदचं भारतातलं नेटवर्क वापरणं बंदच केल्याचं स्पष्ट जाणवतं. मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 ला (26-11) लष्करे तैयबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे हल्ला केला. त्या वेळीसुद्धा आयएसआय अथवा लष्करे तैयबानं दाऊदची मदत घेतली नाही, असं तपासात स्पष्ट झालं. भारतात वाढत असलेल्या इंडियन मुजाहिदीन, बांगलादेशमधील हरकत उल जिहाद इस्लामी (हुजी) व पाकिस्तानातली लष्करे तैयबासारख्या दहशतवादी संघटनांनी आपले स्लिपर सेल वाढवायला सुरवात केली आहे. 2005 नंतर झालेल्या घातपाती कारवाया इंडियन मुजाहिदीनच्या म्होरक्‍यांनी घडवल्या. त्यासाठी या दहशवाद्यांनी "सिमी'च्या जुन्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. यावरूनच आयएसआयला असलेली दाऊदची गरज आता संपुष्टात आली आहे, असं म्हणता येऊ शकेल. मात्र, सध्याच्या घडीला त्याचं पाकिस्तानातलं स्थान आणि महत्त्व यांचा विचार करता ते अनन्यसाधारण आहे, असं म्हणता येईल. त्यामुळे अमेरिकेच्या मदतीनं त्याचा ताबा भारताकडं सहजासहजी मिळेल, अशी सुतरामही शक्‍यता नाही. सध्या पाकिस्तान सीमेवर असलेल्या अफगाणिस्तानात अमेरिकेचं सैन्य आहे. 2013 अखेरपर्यंत हे सैन्य टप्प्याटप्प्यानं काढून घेतलं जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला थांबलेली तिथली तालिबानी चळवळ पुन्हा एकदा कार्यरत होऊ शकेल. परिणामी पाकिस्तानाला मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवायांना सामोरं जावं लागण्याची भीती आहे. पाकिस्तानला काही पातळ्यांवर अमेरिका आणि विशेषतः भारताकडून ठोस आश्‍वासनं आणि प्रत्यक्ष मदत मिळाल्यास दाऊद भारतीय सुरक्षायंत्रणांच्या ताब्यात यायला कसलीही हरकत नसावी.