Sunday, November 16, 2008

बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दयानंद पांडे?

एटीएसचे मौन ः पुरोहित यांची नार्को टेस्टमध्ये कबुली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 14 ः मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी दहशतवादविरोधी पथका (एटीएस) ने उत्तर प्रदेश येथून अटक केलेले दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देव यांना नाशिक न्यायालयाने 26 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले. दरम्यान, दयानंद पांडे अजमेर व मालेगाव बॉम्बस्फोटांचा "मास्टरमाईंड' आहे. त्यांच्याच निर्देशांवरून मालेगाव बॉम्बस्फोटासाठी स्फोटके पुरविल्याची धक्कादायक माहिती लेफ्टनंट पुरोहित यांच्या नार्को चाचणीत उघडकीस आल्याचे वृत्त आहे. दहशती कारवायांसाठी पाचशे जणांना प्रशिक्षण दिल्याची कबुलीही पुरोहित यांनी या चाचणीत दिल्याचे सांगण्यात येते. याबाबत एटीएसच्या अधिकाऱ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.
मालेगाव स्फोटातील सहभागाप्रकरणी कानपूर येथून अटक करण्यात आलेल्या दयानंद पांडे यांना आज दुपारी नाशिक येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांच्या चौकशीत पोलिसांना स्फोटासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. जम्मूच्या आश्रमाचा मठाधिपती असलेल्या पांडे चार वर्षांपासून फरिदाबाद येथील मंदिरात नेहमी जात असे. मुख्यतः रात्री उशिरा त्यांना भेटण्यासाठी "हायप्रोफाईल' भक्त येत. सामान्य भक्तांपासून लांब राहणारा हा कथित स्वामी नेहमी लॅपटॉपवर काम करताना दिसायचा. ते कानपूरमध्ये दयानंद पांडे, फरिदाबादमध्ये स्वामी अमृतानंद देव; तर जम्मूत पिठाधीश्‍वर या नावाने ओळखले जातात. पांडे यांनीच मालेगाव स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या लेफ्टनंट पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांची भेट घडवून दिल्याचे सांगितले जाते.
बेंगळूरुच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये लेफ्टनंट पुरोहित यांची नुकतीच नार्को चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालानुसार पुरोहित यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. 11 सप्टेंबर 2007 रोजी अजमेर व मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 ला झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड दयानंद पांडे आहे. सिमीच्या दहशती कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी हे कट आखण्यात आले. त्याकरिता सिमीच्याच कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला. आतापर्यंत पाचशे जणांना दहशती कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचेही पुरोहित यांनी या चाचणीत कबूल केल्याचे म्हटले आहे. या प्रशिक्षणार्थींना अहमदाबाद येथील आश्रमात आश्रय मिळत होता. मालेगाव स्फोटाचा कट साध्वी प्रज्ञासिंग, दयानंद पांडे व पुरोहित यांनी आखल्याचेही सांगण्यात येते. 12 एप्रिल 2008 मध्ये भोपाळ येथे झालेल्या बैठकीला हे तिघेही उपस्थित होते. मालेगाव स्फोटांपूर्वी पुण्यातील एका बैठकीला देखील हे तिघे हजर होते, असेही सांगितले जाते.

Thursday, November 13, 2008

प्रज्ञासिंग आणि पुरोहित यांच्या चौकशीसाठी हरियाना पोलिस मुंबईत

संभाव्य सहभाग ः "समझौता एक्‍स्प्रेस'मधील स्फोट प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 13 ः मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि लेफ्टनंट प्रसाद पुरोहित यांच्या गेल्या वर्षी समझौता एक्‍स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात असलेल्या संभाव्य सहभागाच्या चौकशीसाठी हरियाना पोलिसांचे पथक मुंबईत येणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आलेला दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देव भारतीय सैन्याच्या हवाई दलातून प्रशिक्षण सुरू असताना खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून निघून गेला होता, असेही वृत्त आहे. मात्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला नाही.
मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास करणाऱ्या एटीएसने या प्रकरणाची सूत्रधार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह 10 आरोपींना अटक केली. या प्रकरणी अटकेत असलेला लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याचा गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात समझौता एक्‍स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटांत सहभाग असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 68 लोकांचे प्राण घेणाऱ्या समझौता एक्‍स्प्रेसमधील स्फोटासाठी इंदौर येथून बॉम्ब तयार करण्यात आले होते. या स्फोटांत रेल्वेच्या दोन बोगी उद्‌ध्वस्त झाल्या होत्या. स्फोटांकरिता वापरण्यात आलेली सुटकेसदेखील इंदौर येथीलच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या स्फोटांप्रकरणी लेफ्टनंट पुरोहितवर संशय व्यक्‍त करण्यात येत आहे. दिल्ली ते लाहोर धावणाऱ्या या एक्‍स्प्रेसमध्ये झालेल्या स्फोटात असलेल्या संभाव्य सहभागाची चौकशी करण्यासाठी हरियाना पोलिसांचे पथक मुंबईत येत आहे. हे पथक साध्वी प्रज्ञासिंग व लेफ्टनंट पुरोहित यांची चौकशी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती दिली नाही.
उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेला आध्यात्मिक गुरू दयानंद पांडे ऊर्फ स्वामी अमृतानंद देव यालादेखील उद्या मुंबईत आणण्यात येणार आहे. सध्या त्याची कानपूर येथेच चौकशी सुरू असल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिली. जम्मू येथे कथित मठाधिपती असलेला पांडे भारतीय सैन्यात होता. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी आल्यानंतर जेमतेम सहा महिने प्रशिक्षण घेऊन तो निघून गेल्याचेही सूत्रांनी सांगितले. एटीएसच्या पथकाने उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने आज त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे मिळण्यासाठी फरिदाबाद येथील अनगपूरच्या चक्रधर मठावरही छापा घातला. पोलिसांना लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याचा गहाळ झालेला लॅपटॉप सापडला असून या लॅपटॉपमध्ये स्फोटाशी संबंधित आणखी महत्त्वपूर्ण माहिती पुढे येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

क्रॉफर्ड मार्केटमधील इमारतीचा भाग कोसळून एकाच कुटुंबातील सहा ठार

नातेवाईकांचा आक्रोश ः जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 12 ः क्रॉफर्ड मार्केट येथे ऐंशी वर्षे जुन्या असलेल्या "सय्यद हाऊस' या पाच मजली इमारतीचा मागील भाग कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा ढिगाऱ्याखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे घडली. या इमारतीला लागूनच एका बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळेच "सय्यद हाऊस' इमारत कोसळली असून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
येथील 250, नागदेवी रस्त्यावर पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. डॉ. सय्यद उमरान (40) यांच्या मालकीच्या या इमारतीत तळमजला आणि पहिल्या मजल्यावर वाणिज्य वापराची गोदामे व गाळे आहेत. इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर डॉ. सय्यद यांचे कुटुंब ऐंशी वर्षांपासून राहते. याशिवाय इमारतीच्या उर्वरित दोन मजल्यांवर बारा भाडेकरू राहतात. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास डॉ. सय्यद यांचे कुटुंबीय झोपलेल्या घरासह इमारतीचा मागील भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत डॉ. सय्यद यांच्यासह त्यांची पत्नी डॉ. रेहाना सय्यद (35), मुलगा उमार (12), मुलगी मरीअम (9), लहान भाऊ मोहम्मद सलमान (25) आणि चुलत मेव्हणा फहाद (25) हे मातीच्या ढिगाऱ्याखाली अक्षरशः चिरडले. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेतली. काही नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सय्यद कुटुंबांतील सदस्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने या कुटुंबातील कोणीही वाचू शकले नाही. इमारत कोसळल्याचे कळताच डॉ. सय्यद यांचे नातेवाईक व मित्र-मंडळींनी इमारतीजवळ जमायला सुरुवात केली. अग्निशमन दलाने ढिगारे उपसून मृतांचे शव काढायला सुरुवात केली, तेव्हा नातेवाईकांचा आक्रोश काळजाचा वेध घेत होता. डॉ. सय्यद यांचा लहान मुलगा उमार याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला डॉ. रेहाना यांचा मृतदेह सगळ्यात शेवटी बाहेर काढण्यात आला. सहाही मृतदेह जवळच असलेल्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
डॉ. सय्यद यांची दोन्ही मुले सेंट झेवियर्स शाळेत शिकत होती; तर या दुर्घटनेत ठार झालेला त्यांचा चुलत मेव्हणा फहाद काल रात्रीच डॉ. सय्यद यांच्याकडे राहायला आला होता. डॉ. सय्यद यांच्यासोबत त्यांची आई फौजिया (55) आणि बहीण समीरा राहतात. काही दिवसांपूर्वीच दोघीही लखनौ येथील घरी गेल्या. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेतून दोघीही बचावल्याची माहिती डॉ. सय्यद यांचे काका डॉ. ए. क्‍यू. सय्यद यांनी "सकाळ'ला दिली. या इमारतीला लागून अवघ्या दीड फुटावर पस्तीस फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. बहुमजली इमारत बांधण्यासाठी करण्यात आलेल्या या खोदकामामुळे सय्यद हाऊस इमारतीच्या बांधकामावर परिणाम होत होता. खोदकाम सुरू असताना इमारत हादरल्यासारखेच वाटायचे. हे काम रोखण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नाही. शेवटी आज ही दुर्घटना होऊन कुटुंबातील सहा जण ठार झाल्याचे दुःख असल्याचेही डॉ. ए. क्‍यू. सय्यद यांनी यावेळी सांगितले.

एटीएस पथक तपासासाठी उत्तर प्रदेशात

मालेगाव बॉम्बस्फोट ः संशयित आमदार अथवा खासदार नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उत्तर प्रदेश येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या बड्या नेत्याच्या चौकशीकरिता दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) तुकडी रवाना झाली आहे. हा नेता कोणत्याही पक्षाचा आमदार अथवा खासदार नसल्याचे या पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अटकेत असलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित याचे सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत असलेल्या संबंधांबाबत या अधिकाऱ्याने बोलण्यास नकार दिला.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने प्रमुख सूत्रधार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह नऊ जणांना अटक केली. अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या या आरोपींच्या आतापर्यंत केलेली चौकशीत; तसेच नार्को चाचण्यांमध्ये उत्तर प्रदेश येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या मोठ्या नेत्याचे नाव समोर आले. त्यानुसार दहशतवादविरोधी पथकाने या नेत्याच्या चौकशीकरिता उत्तर प्रदेश सरकारचे सहकार्य मिळण्यासाठी काल नाशिक येथील न्यायालयाकडे अर्ज दिला. नाशिक न्यायालयाने या नेत्याच्या चौकशीसाठी दिलेल्या परवानगीनंतर दहशतवादविरोधी पथकाने एक तुकडी आज रवाना केली. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील आमदार व खासदाराची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यातच गोरखपूर येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी हिंमत असल्यास एटीएसच्या पथकाने कारवाई करून दाखवावी, असे खुले आव्हान केंद्रीय गृहखात्याला दिले.
या संपूर्ण घटनाक्रमाबाबत बोलताना आज दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे तोंडावर बोट ठेवले. उत्तर प्रदेशमध्ये चौकशी होणारा नेता कोणत्याही पक्षाचा आमदार अथवा खासदार नसल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. मालेगाव स्फोटातील संशयित लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याचे ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये बॉम्बस्फोट घडविणाऱ्या डॉ. हेमंत चाळके याच्याशी संबंध असल्याचे बोलले जाते. मात्र याबाबत दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला.

Monday, November 10, 2008

अमेरिकन सेंटरबाहेरील गोळीबारात इंडियन मुजाहिदीनचा सहभाग

कोलकता येथील घटना ः संघटनेचे ओसामा बिन लादेनच्या अल कायदाशी संबंध?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः कोलकताच्या अमेरिकन सेंटरबाहेर जानेवारी-2002 मध्ये झालेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य मोहम्मद सादिक शेख याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. सादिक याने त्याच्या आणखी तिघा साथीदारांसह केलेल्या या गोळीबारात पाच पोलिस ठार; तर 19 जण जखमी झाले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीत त्यांचे ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या अतिरेकी संघटनेशी संबंध असण्याची शक्‍यता गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे.
देशभरात गेल्या तीन वर्षांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या 20 अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच अटक केली. या अतिरेक्‍यांपैकी 24 सप्टेंबरला आझमगढच्या संजरपूर येथून अटक करण्यात आलेला मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख याच्या चौकशीत कोलकताच्या अमेरिकन सेंटरवरील हल्ल्याचे रहस्य उघडकीस आले आहे. 22 जानेवारी 2002 ला कोलकताच्या अमेरिकन सेंटर या अमेरिकन सरकारच्या माहिती केंद्रावर भल्या पहाटे हा हल्ला झाला होता. दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी दोन एके-47 रायफलमधून केलेल्या या बेछूट गोळीबारात पाच पोलिस ठार; तर 19 जण जखमी झाले होते. मोहम्मद सादिक व झाहिद यांनी हा गोळीबार करताना दोन्ही रायफलमधील सगळ्याच मॅगझीन संपविल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा याचा भाऊ आसिफ रझा व आणखी एक आरोपी होता. या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफताब अन्सारी आणि अन्य नऊ जणांना कोलकता पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. या हल्ल्याच्या वेळी सादिक याने सदाकत, असे नाव धारण केले होते. हल्ल्यानंतर सादिक पाटण्याला गेला, तर झाहिद झारखंडच्या हजारीबाग येथे लपला. हजारीबाग येथे झाहीद पोलिस चकमकीत ठार झाल्यानंतर सादिक आझमगढ व पुढे दुबईला पळून गेला. अमेरिकन सेंटरवर केलेल्या हल्ल्यानंतर सादिक कुख्यात अतिरेकी आमीर रझा याच्या विश्‍वासू साथीदारांपैकी एक समजला जाऊ लागला. ऑक्‍टोबर- 2002 मध्ये त्याला दुबईला बोलविण्यात आले. तेथे तो बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाज भटकळ आणि आसिफ रझा यांच्यासोबत आठ महिने राहिला. त्यानंतरच सादिकने भारतातून बांगलादेश व पाकिस्तानात अतिरेकी प्रशिक्षणासाठी मुले पाठवायला सुरुवात केल्याची माहितीही सहपोलिस आयुक्त मारिया यांनी दिली. आरोपींच्या चौकशीत त्यांचे लष्कर ए तैय्यबा आणि बांगलादेशातील हुजी या अतिरेकी
संघटनांशी संबंध उघडकीस आले आहेत.
इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा याचा भाऊ आसिफ रझा याने अफताब अन्सारी सोबत कोलकता येथील अफताब अन्सारी एका बड्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून 3 कोटी 85 लाख रुपयांची खंडणी उकळली होती. खंडणीच्या रकमेतील काही पैसे अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तसेच अल कायदाचा कुख्यात अतिरेकी मोहम्मद आत्ता याच्या मलेशियातील खात्यात जमा झाले होते. त्यातच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांच्या चौकशीतही त्यांचा मुख्य सूत्रधार आमीर रझा हाच असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे अल कायदाशी संबंध असल्याची शक्‍यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली.

"अभिनव भारत' संघटनेच्या एकाला अटक

मुंबई, ता. 10 ः "अभिनव भारत' संघटनेशी असलेल्या कथित संबंधांवरून एका व्यक्तीला माटुंगा पोलिसांनी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर तसेच सैन्याच्या गणवेशात असलेले छायाचित्र हस्तगत केले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींशी त्याचा असलेला सहभाग तपासण्यासाठी त्याची नार्को चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या आरोपीचा अद्याप "अभिनव भारत' संघटनेशी कोणताही संबंध प्रस्थापित झाला नसल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली.
सुधाकर चतुर्वेदी (37) असे या आरोपीचे नाव आहे. 4 नोव्हेंबरला माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद फिरणाऱ्या चतुर्वेदीला पोलिसांनी अटक केली. मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असलेला चतुर्वेदी गेल्या चार वर्षांपासून नाशिक येथे राहत होता. पोलिस चौकशीत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने तसेच त्याच्या मुंबईतील वास्तव्याबाबत योग्य तो खुलासा होऊ न शकल्याने त्याची नार्को चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये असलेले त्याचे वास्तव्य संशय निर्माण करणारे असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील देशमुख यांनी सांगितले. त्याच्यावर कलिना अथवा बेंगळूरु येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये नार्को चाचणी होणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. चतुर्वेदी अभिनव भारत संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जात असले तरी त्याने अद्याप ही बाब कबूल केलेली नाही. न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
................

उत्तरप्रदेशच्या खासदाराची दहशतवाद विरोधी पथक करणार चौकशी..

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.10 ः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने उत्तर प्रदेश येथील बड्या राजकीय नेत्याच्या चौकशीकरिता न्यायालयात मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या चौकशीत या राजकीय नेत्याचे नाव पुढे आल्याने दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिसही हबकले आहेत.
बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाची मुख्य सूत्रधार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये सैन्यातून निवृत्त झालेल्या मेजरपासून विद्यमान लेफ्टनंट कर्नलचाही समावेश आहे. आरोपींच्या झालेल्या चौकशीत आता उत्तरभारतातील बड्या राजकीय नेत्याचे नाव पुढे आले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी घडविलेल्या या स्फोटांची आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर हिचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग व अन्य राजकीय नेत्यांसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती.दहशतवाद विरोधी पथकाने आता या प्रकरणात उत्तरप्रदेश मधील एका बड्या नेत्याच्या चौकशीचीच मागणी नाशिक न्यायालयाकडे केल्यामुळे राजकीय क्षेत्रातही तर्कवितर्क लावले जात आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर नजीकच्या परिसरात खासदारकी भूषविणार हा नेता हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जाते.
स्फोटातील पाच आरोपींना आज दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक न्यायालयात दाखल केले होते.न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने या नेत्याच्या चौकशीकरिता परवानगी मागणारा अर्ज न्यायाधीशांना सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या नेत्याविरुद्ध अटक वॉरंटही पोलिसांना दिल्याचे समजते. मालेगाव स्फोटातील आरोपींशी असलेले या नेत्याचे संबंध यावेळी तपासले जाणार आहेत.दहशतवाद विरोधी पथक लवकरच या नेत्याकडे याप्रकरणी विचारपूस करणार आहे.मालेगाव बॉम्बस्फोटांकरीता हवाला मार्गाने आलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.दरम्यान, आज लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याची बंगळूरू येथील फॉरन्सिक सायन्स लॅबमध्ये नार्को चाचणी करण्यात आली.

तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

गृह खात्याची घोषणा ः सुप्रकाश चक्रवर्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नव्याने बदल्या केल्याची घोषणा गृहखात्याने आज सायंकाळी केली. नवीन बदल्यांप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक जीवन वीरकर यांची गृहरक्षक दलाच्या महासमादेशक पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागेवर गृहरक्षक दलाचे विद्यमान महासमादेशक सुप्रकाश चक्रवर्ती यांची नियुक्ती झाली आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती होण्याची पात्रता असताना गृहरक्षक दलाच्या महासमादेशक पदावर झालेल्या नियुक्तीमुळे सुप्रकाश चक्रवर्ती नाराज होते. या नाराजीमुळेच त्यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठतेत कमी असलेल्या अनामी रॉय यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध कॅटमध्ये धाव घेतली. कॅटने चक्रवर्ती यांच्या बाजूने कौल देत पोलिस महासंचालक पदावर केलेल्या राय यांच्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. चक्रवर्ती यांची ही नाराजी दूर करण्यासाठीच त्यांची लाचलुचपत खात्याच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जाते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे विद्यमान महासंचालक जीवन वीरकर हे उद्यापासून चक्रवर्ती यांच्या जागी गृहरक्षक दलाचे महासमादेशक म्हणून काम पाहतील. याच वेळी केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीहून राज्यात परतलेले एस. जगन्नाथ यांची मुंबईत अप्पर पोलिस आयुक्त पदावर बदली करण्यात आल्याची माहिती गृह खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

एटीएसचा शबरीधाम आश्रमावर छापा

मालेगाव बॉम्बस्फोट ः स्वामी अशिमानंद भूमिगत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुजरातच्या डांग येथे असलेल्या शबरीधाम आश्रमावर छापा घालून तेथील सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या आश्रमाचे स्वामी अशिमानंद त्यांचा विश्‍वासू साथीदार रामजी ऊर्फ रामसू एटीएसच्या जाळ्यात सापडला आहे; मात्र या घटनेनंतर स्वामी अशिमानंद भूमिगत झाल्याचे वृत्त "पीटीआय'ने दिले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसच्या तुकड्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथे जाऊन तपासकार्य करीत आहेत. या स्फोटांची मुख्य सूत्रधार समजली जाणारी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि अटक केलेल्या अन्य आठ आरोपींच्या चौकशीत स्वामी अशिमानंद यांचा विश्‍वासू साथीदार रामजी ऊर्फ रामसू याचे नाव पुढे आले. 29 सप्टेंबरला मालेगाव येथील मशिदीबाहेर स्फोट घडविण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंग हिच्या मोटारसायकलमध्ये रामजीनेच बॉम्ब ठेवला होता, असे बोलले जाते. रामजी या प्रकरणातील महत्त्वपूर्ण दुवा समजला जात आहे.
एटीएसच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शबरीधाम आश्रमाचे स्वामी अशिमानंद भूमिगत झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. स्वामी अशिमानंद यांनी 2006 मध्ये शबरीकुंभ हा मोठा धार्मिक मेळावा घेतला. वापी येथून एटीएसने ताब्यात घेतलेल्या आणखी एक तरुण डांग येथील वाघाई तालुक्‍याचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. या तरुणाने देखील काही काळ स्वामी अशिदानंद यांच्या आश्रमात काम केले. पाच महिन्यांपूर्वी तो वापीत कामानिमित्त राहत होता.
-------------------

कांदिवलीत कामगारनेत्याची हत्या

युनियनचा वाद ः चॉपर आणि चाकूने भोसकले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत कामगार संघटनेच्या नेत्याची तो राहत असलेल्या सोसायटीच्या कार्यालयात शिरलेल्या पंधरा जणांच्या जमावाने चॉपर आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना कांदिवली पूर्वेला आज सकाळी घडली. ही हत्या युनियनच्या वादातून झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.
कांदिवली पूर्वेला असलेल्या ठाकूर व्हिलेजमधील एव्हरशाईन मिलेनियम रेसिडेन्सीमध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शांताराम गोपाळ कानडे (48) असे हत्या झालेल्या कामगारनेत्याचे नाव आहे. एव्हरशाईन सोसायटीच्या सरचिटणीसपदी कार्यरत असलेले कानडे पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या कार्यालयात येऊन बसले होते. या वेळी त्यांच्यासोबत कार्यालयीन व्यवस्थापक मनोज नायर आणि एक प्लंबर असे दोघे जण होते. सोसायटीचे कामकाज आटोपल्यानंतर कानडे पुन्हा घरी जायला निघाले तोच बाहेरून पंधरा जणांचा जमाव त्यांच्या दिशेने धावून आला. जमावाच्या हातात असलेले चॉपर आणि चाकू पाहून कानडे यांनी पुन्हा कार्यालयात जाऊन दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच आत शिरलेल्या या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. मारेकऱ्यांनी त्यांच्या पाठ, पोट आणि छातीवर सपासप वार केल्याने काही क्षणातच ते खाली कोसळले. कानडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यापूर्वी त्यांनी कार्यालयीन व्यवस्थापक मनोज नायर व प्लंबरलाही मारहाण केली. नायरच्या चेहऱ्यावर वार झाल्याने तोही या हल्ल्यात जखमी झाला. नायर आणि प्लंबरने केलेल्या आरडाओरडीनंतर इमारतीतील रहिवासी कार्यालयाजवळ जमले. त्यांनी कानडे यांना तातडीने उपचारासाठी भगवती रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वी रिलायन्स कंपनीत कामाला असताना कानडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत कामगार संघटनेसोबत काम करायला सुरवात केली होती. कामगार संघटनेच्या वादातून ही हत्या झाली असावी, अशी शक्‍यता समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. बी. शिंदे यांनी वर्तविली. कानडे यांचा सोसायटीत राहणाऱ्या विजय तांबट यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. कानडे यांच्या हत्येला तांबट यांच्यासोबतचा वाद कारणीभूत आहे का, हा पैलूदेखील पोलिस तपासात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कानडे यांची पत्नी तीन वर्षांपूर्वी कर्करोगाने मरण पावली आहे. त्यांचा एकुलता एक अकरा वर्षांचा मुलगा पाचगणी येथे पाचवी इयत्तेत शिकतो. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही शिंदे या वेळी म्हणाले.

Friday, November 7, 2008

घातपाती कारवायांसाठी "शादी डॉट कॉम'चा वापर!

उपवरांनो सावधान : सिमकार्डसाठी अतिरेक्‍यांनी वापरली माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः लग्नासाठी वधू किंवा वरसंशोधन सुरू असेल आणि आधुनिकतेचा वसा जोपासत त्यासाठी आपण आपली वैयक्तिक माहिती शादी डॉट कॉमसारख्या मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर टाकली असेल तर सावधान...! अशाच मॅट्रिमोनिअल साईट्‌सवर आलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवायांकरिता वापरलेल्या मोबाईल फोनचे सिमकार्ड खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी खुद्द ही कबुली दिली.

गेल्या तीन वर्षांत जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, बंगळूरु, दिल्लीसह देशभरात बॉम्बस्फोट मालिका घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या अतिरेक्‍यांच्या चौकशीत गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेली माहिती धक्कादायक आणि थक्क करणारी आहे. इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी देशात कोठेही बॉम्बस्फोट घडवायचे असल्यास एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी स्फोटांपूर्वी त्या त्या ठिकाणचे मोबाईल सिमकार्ड खरेदी करीत. अतिरेक्‍यांपैकी आनिक शफीक सय्यद याचे पुण्यात मोबाईलचे दुकान असल्याने सिमकार्डच्या खरेदीसाठी मोबाईल कंपन्यांना द्यावी लागणारी आवश्‍यक ती कागदपत्रे आणि छायाचित्रे देण्याची जबाबदारी त्याच्यावर असे. सिमकार्डकरिता आवश्‍यक असणारी ही कागदपत्रे व छायाचित्रे देण्यासाठी त्याने नामी शक्कल लढविली. लग्नगाठी जुळविण्याकरिता प्रसिद्ध असलेल्या शादी डॉट कॉम या वेबसाइटवर विवाहेच्छुकांनी टाकलेले स्वतःचे छायाचित्र आणि वैयक्तिक माहितीच्या आधारे बनावट कागदपत्रे बनवून सिमकार्ड खरेदी केली जात. पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील म्यूज अपार्टमेंट येथील इंडियन मुजाहिदीनच्या हेडक्वार्टरमधील कॉम्प्युटरवरून जेथे स्फोट घडवायचे आहेत त्या ठिकाणच्या विवाहेच्छुकांची छायाचित्रे व माहिती डाऊनलोड केली जात असे. अशा प्रकारच्या बोगस कागदपत्रांचा वापर करून या अतिरेक्‍यांनी तब्बल पन्नास सिमकार्ड घेतले. ज्यांच्या नावांनी मोबाईलचे सिमकार्ड खरेदी करण्यात आले अशा मुंबई व मंगळूर येथील दोघा विवाहेच्छुक तरुणांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी स्वतःची माहिती व छायाचित्र मॅट्रिमोनिअल साइटवर टाकल्याचे उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. हा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मॅट्रिमोनिअल साईटच्या व्यवस्थापनालाही कळविला असून याबाबत दक्षता घेण्यासही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

राहुल राजवर पोलिसांनी जवळून गोळ्या झाडल्या?

जे.जे.च्या अधिष्ठात्यांचा नकार : फॉरेन्सिक लॅबमध्ये होणार तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः बैलबाजार येथे बेस्ट बसमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला उत्तर भारतीय तरुण राहुल राज आणि पोलिसांमध्ये गोळ्या झाडताना असलेले अंतर तपासण्यासाठी त्याच्या त्वचेचा गोळ्या लागलेला भाग अभ्यासाकरिता कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज दिली. राहुल राजचे शवविच्छेदन करणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्याच्यावर पोलिसांनी अतिशय जवळून गोळ्या झाडल्याची शक्‍यता वर्तविल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र असे कोणतेही वक्तव्य शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांनी केले नसल्याचे सायंकाळी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी जाहीर केले.

अंधेरी ते कुर्लादरम्यान धावणाऱ्या 332 क्रमांकाच्या बेस्टमध्ये 27 ऑक्‍टोबर रोजी बैलबाजार पोलिस बीट चौकीजवळ ही चकमक झाली. त्यात पाटण्याच्या कदमकोन येथून नोकरीच्या निमित्ताने आलेल्या राहुल राज कुंदप्रसाद सिंग या तेवीस वर्षीय तरुणाच्या झालेल्या मृत्यूचा उत्तर भारतीय राजकारण्यांनी तीव्र निषेध केला होता. या प्रकरणी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन चकमकीची चौकशी करण्याची मागणी केली. केंद्राच्या निर्देशानंतर या प्रकरणाची राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे या चकमकीचा तपास सोपविण्यात आला.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच राहुल राजचे शवविच्छेदन करणारे डॉ. बी. जी. चिखलीकर यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्याची शक्‍यता वर्तविली. डॉ. चिखलीकर यांच्या या वक्तव्याने प्रसिद्धिमाध्यमांत खळबळ उडाल्यानंतर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. बी. एम. सबनीस यांनी डॉ. चिखलीकर यांनी शवविच्छेदनाबाबत असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी या संदर्भात बोलताना राहुल राजवर झाडलेल्या तेरा गोळ्यांपैकी पाच गोळ्यांनी त्याच्या शरीराचा वेध घेतल्याचे सांगितले. पाचपैकी दोन गोळ्या डोक्‍यात, एक कानात, एक छातीत आणि एक पोटात शिरली. जवळून झाडलेल्या गोळ्यांनी शरीरावर झालेल्या जखमेभोवतीची त्वचा काळी पडते. मात्र जे.जे. रुग्णालयाकडून आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार त्यात असा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती मारिया यांनी दिली. चकमकीच्या वेळी राहुल राज आणि पोलिस यांच्यातील अंतराचा अभ्यास करण्यासाठी गोळ्या लागलेल्या ठिकाणच्या शरीराची त्वचा फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविली असून तेथील तज्ज्ञांच्या अहवालानंतरच ही बाब स्पष्ट होऊ शकेल, असेही मारिया यावेळी म्हणाले. हा अहवाल लवकरच पोलिसांकडे येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 17 नागरिकांचे जबाब नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले.

Thursday, November 6, 2008

लेफ्टनंट कर्नल पुरोहितला 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडी

मालेगाव स्फोट : आरोपींशी सातत्याने संपर्क

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 5 ः मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असलेल्या श्रीकांत प्रसाद पुरोहित याला आज दहशतवादविरोधी पथकाने अटक केली.
मालेगाव स्फोटांपूर्वी मुख्य सूत्रधार साध्वी प्रज्ञासिंग हिने नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये घेतलेल्या बैठकीसाठी उपस्थित असलेला पुरोहित स्फोटाशी संबंधित आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. नाशिक न्यायालयाने त्याला 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मालेगाव येथे मशिदीबाहेर 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात पाच जणांचे बळी गेले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने "जय वंदे मातरम' व "अभिनव भारत' या संघटनांशी संबंधित असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह आठ जणांना यापूर्वी अटक केली आहे. या आरोपींमध्ये लष्करातील निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, शिवनारायण कलासांगरा यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या या आरोपींच्या चौकशीत स्फोट घडविण्यासाठी त्यांना लष्करातील अधिकाऱ्यांची मदत मिळाल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडून मिळालेल्या खळबळजनक माहितीनंतर पोलिसांनी सैन्यातील पंचमढी येथे नेमणुकीवर असलेल्या लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित याला ताब्यात घेतले. त्यासाठी पोलिसांना दिल्लीत भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागली.

नार्को चाचणीतून धागेदोरे
मालेगाव स्फोटांत पुरोहित याचा सहभाग स्पष्ट करण्याकरिता पोलिसांनी साध्वी प्रज्ञासिंग, सैन्यातील निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी या तिघांच्या ब्रेन मॅपिंग व पॉलिग्राफी चाचण्या केल्या. मंगळवारी सायंकाळी नागपाड्याच्या पोलिस रुग्णालयात तिघांच्या झालेल्या नार्को चाचण्यांत पुरोहित याचे नाव पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पुरोहित याने मालेगाव स्फोटासाठी स्फोटके पुरविल्याचा, तसेच पुण्यातून अटक केलेल्या राकेश धावडेला हत्यार पुरविल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. अभिनव भारत संघटनेचा सदस्य असलेल्या लेफ्टनंट पुरोहित याने साध्वी प्रज्ञासिंग हिच्या अटकेनंतर आरोपी समीर कुलकर्णी याला एसएमएस पाठविले. आपला मोबाईल दहशतवादविरोधी पथकाच्या रडारवर असल्याने पुरोहित याने समीरला मोबाईलचे सीम कार्ड बदलण्याचा सल्ला या एसएमएसद्वारे दिल्याचेदेखील तपासात उघडकीस आल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
...................


पुरोहित मूळचा पुण्याचा
मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेला लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित मूळचा पुण्याचा राहणारा आहे. 1994 ला त्याची पहिली नेमणूक आसाम येथे झाली. त्यानंतर सैन्यातील विविध पदांवर मणिपूर, नागालॅंड, राजस्थान ,पुणे, जम्मू-काश्‍मीर, देवळाली आणि नंतर मध्य प्रदेशातील पंचमढी येथे काम केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिनेश अग्रवाल यांनी आज रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बेरोजगाराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

अनर्थ टळला : सहाव्या मजल्यावरून उडी मारणार होता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः "कुठे नोकरी देता का नोकरी' असे म्हणत वयाच्या चाळीशीपर्यंत सेवा योजन कार्यालयात जोडे झिजविणाऱ्या बेरोजगार व्यक्तीने आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी त्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा सेवा योजन कार्यालयात सरकारी नोकरीकरिता पंधरा वर्षांपूर्वी नाव नोंदविल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
राजू गोदा अडांगळे (40) हा घाटकोपरच्या रमाबाईनगरात राहणारा तरुण वयाच्या चाळीशीपर्यंत सरकारी नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्हा सेवा योजन कार्यालयाच्या चकरा मारत होता. पंधरा वर्षांपूर्वी या कार्यालयात नाव नोंदविल्यानंतर इतरांसारखाच कधी ना कधी सरकारी नोकरीसाठीचा "कॉल' आपल्यालाही येईल या अपेक्षेत तो होता. वृत्तपत्रांत येणाऱ्या सरकारी नोकरीच्या जाहिराती पाहिल्यानंतर तो कित्येकदा त्या जागांकरिता आपल्याला कॉल निघतोय का हे पाहण्यासाठी सेवा योजन कार्यालयात जायचा. मात्र तेथे असलेले अधिकारी त्याला फक्त कॉल काढण्यासाठी दोन हजार रुपये; तर काही वेळा थेट नोकरीकरिता पन्नास हजार रुपये मागायचे.

बारावी उत्तीर्ण झालेल्या राजूची सरकारदप्तरी वारंवार उपेक्षा होत होती. लग्न झाल्यानंतर त्याला नोकरीची फारच गरज भासू लागली. त्यातच सरकारी नोकरी मिळण्यासाठीचे वय संपत असल्याने त्याची चिंता वाढत होती. अखेर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी मनोरमा (36) हिला सोबत घेऊन तो नोकरी मिळण्यासाठीचे निवेदन घेऊन मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांच्या दालनात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करीत होते. या वेळी त्यांच्या दालनाबाहेरही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रचंड समुदाय होता. मुख्यमंत्री "बिझी' असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी त्याला मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली. कार्यालयातील अभ्यागतांच्या भेटी संपवून मुख्यमंत्री दालनातून निघताच राजूने त्यांच्या मागे जात त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळीही त्याला मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. त्यावर "मला नाही तर किमान माझ्या पत्नीला तरी नोकरी द्या' असे म्हणत त्याने थेट मुख्यमंत्री दालनासमोर असलेल्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी तेथे असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला अडविल्याने पुढील अनर्थ टळला. राजूला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याची चौकशी करीत होते. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीतही शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्याकरिता त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
उपमुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्‍वासन
दरम्यान, राजू अडांगळे याला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हलगर्जीमुळे मृत्यूप्रकरणी डॉक्‍टर दाम्पत्यावर गुन्हा

उपनिरीक्षकावरील शस्त्रक्रिया : फोरेन्सिक अहवालानंतर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ः खार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजेश साळवी यांचा दोन वर्षांपूर्वी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना झालेला मृत्यू संबंधित डॉक्‍टरांची हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच झाल्याचा अहवाल राज्य सरकारच्या फोरेन्सिक मेडिसिन विभागाने दिला आहे. या अहवालावरून उपनिरीक्षक साळवी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रश्‍मी शहा व डॉ. हेमेंद्र शहा या दाम्पत्याविरुद्ध खार पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे; मात्र त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

खार पोलिस ठाण्यात तीन वर्षे सेवेत असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेश प्रभाकर साळवी (37) यांच्यावर 26 मार्च 2007 पासून खारच्या आर. जी. स्टोन रुग्णालयात पित्ताशयाच्या आजारावर उपचार करण्यात येत होते. तपासणीत पित्ताशयात खडे झाल्याचे तसेच पिशवीजवळ संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने उपनिरीक्षक साळवी या रुग्णालयात दाखल झाले. पित्ताशयातील खडे काढण्यासाठी त्यांच्यावर लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्‍टर रश्‍मी शहा यांनी घेतला. त्यानुसार साळवी यांच्यावर 30 मार्च रोजी शस्त्रक्रिया झाली. या वेळी साळवी यांच्या नातेवाइकांना डॉक्‍टरांनी अवघ्या तीन तासांची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले होते; मात्र या शस्त्रक्रियेला सात तासांहून अधिक वेळ लागला. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच उपनिरीक्षक साळवी यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेले राजेश साळवी यांचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर साळवी (76) आणि लहान भाऊ पोलिस शिपाई विकास (34) यांनी हा मृत्यू डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला. मुलाच्या झालेल्या अकाली मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही प्रभाकर साळवी यांनी केली होती. याबाबत खार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राज्य सरकारच्या फोरेन्सिक मेडिसिन विभागाच्या समितीमार्फत तपास करण्यात येत होता. या समितीचे अध्यक्ष डॉ. एस. डी. नणंदकर यांनी याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला. या अहवालानुसार 30 ऑक्‍टोबरला खार पोलिसांनी मृत उपनिरीक्षक साळवी यांच्यावर उपचार करणारे डॉ. रश्‍मी शहा व हेमेंद्र शहा यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक ए. एन. साठे यांनी दिली. या डॉक्‍टर दाम्पत्याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतल्याने त्यांना अटक झाली नसल्याचेही साठे यांनी या वेळी सांगितले.

इन्फोबॉक्‍स.....
कुटुंब उघड्यावर
उपनिरीक्षक राजेश साळवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा संसार पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यांची पत्नी रोहिणी, लहान मुलगी आदिती हिला घेऊन वृद्ध सासू-सासऱ्यांसोबत गेल्या दोन वर्षांपासून राहते. पतीचा अकाली मृत्यू आणि मुलीच्या भविष्याचा विचार करता अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याची विनंती त्यांनी पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे केली; मात्र त्यांची ही मागणी पोलिस नियमांत बसत नसल्याने फेटाळून लावली.
.........................................

साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह तिघांची नार्को चाचणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः मालेगाव बॉम्बस्फोटांतील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह तिघा जणांची आज नागपाडा येथील पोलिस रुग्णालयात नार्को चाचणी करण्यात आली. दोन टप्प्यांत झालेल्या या चाचणीनंतर त्यांना काळाचौकी येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आल्याचे या पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास अतिशय महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपला असताना आरोपींच्या चौकशीत त्यांना मदत करणारी आणखी काही नावे समोर येत आहेत. त्यानुसार संशयितांची चौकशी करण्यात येत असून काहींना ताब्यातही घेण्यात आले आहे. या स्फोटांची खरी सूत्रधार समजली जाणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, लष्कराचे निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आणि मध्य प्रदेश येथील अभिनव भारत संस्थेचे पदाधिकारी समीर कुलकर्णी यांच्याकडून पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे.

कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पॉलिग्राफी व ब्रेन मॅपिंग चाचण्या झाल्यानंतर या तिघांच्या नार्को चाचण्या करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार आज सकाळी या तिघा आरोपींना नार्को तपासणीपूर्वी करावयाच्या वैद्यकीय चाचणीकरिता नागपाड्याच्या पोलिस रुग्णालयात नेण्यात आले. शारिरिक क्षमता तपासणाऱ्या या चाचणीनंतर या तिघांची नागपाडा रुग्णालयात सायंकाळी उशिरा नार्को चाचणी पूर्ण झाल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याने दिली.
----------

"मालेगाव'प्रकरणी डोंबिवलीच्या एकासह पुण्याच्या दोघांना अटक

शस्त्रास्त्रे जप्त : अर्थपुरवठ्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 3 ः मालेगाव येथील बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादविरोधी पथका (एटीएस)ने स्फोट घडविणाऱ्या संघटनेचा आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्यासह तीन जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी सहा परदेशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि 190 काडतुसे जप्त केली आहेत. आरोपींपैकी दोघे पुण्याचे; तर एक डोंबिवलीचा राहणारा असून त्यांना नाशिक येथील न्यायालयाने 10 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी दिली.

अजय एकनाथ राहिलकर (39), राकेश दत्तात्रय धावडे (42, रा. पुणे) व जगदीश चिंतामण म्हात्रे (40) अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मालेगाव येथे 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी राहिलकर, धावडे आणि म्हात्रे यांना अटक केली. तपासात मिळालेल्या माहितीनुसार अजय या संघटनेला अर्थपुरवठा करायचा. त्याने यापूर्वी अटक झालेल्या समीर कुलकर्णी व रमेश उपाध्याय यांना शस्त्र खरेदीकरिता पैसे दिल्याचे स्पष्ट झाल्याचे करकरे यांनी या वेळी सांगितले. या स्फोटांप्रकरणी ताब्यात घेतलेले भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याबाबत सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. ज्या अभिनव भारत संघटनेचा समीर कुलकर्णी पदाधिकारी आहे, त्या नावाच्या दोन संघटना असल्याचे करकरे यांनी या वेळी स्पष्ट केले.
.......................................

साध्वी प्रज्ञासिंगची ब्रेन मॅपिंग, पॉलिग्राफी चाचणी

मालेगाव बॉम्बस्फोट : आणखी धागेदारे हाती येण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.31 ः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि तिच्या दोघा साथीदारांची आज सांताक्रूझ येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. दरम्यान, गुजरातच्या मोडासा येथे झालेल्या स्फोटांच्या तपासासाठी गुजरात पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले असून हे पथक साध्वी प्रज्ञासिंग व तिच्या साथीदारांची चौकशी करणार आहे.

पाच जणांचे बळी घेणाऱ्या 29 सप्टेंबरच्या मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने मध्य प्रदेश येथून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर व तिच्या दोघा साथीदारांना अटक केली होती. या तिघांच्या चौकशीत भारतीय सैन्याचा निवृत्त मेजर रमेश उपाध्याय व मध्य प्रदेशमधील अभिनव भारत संघटनेचा पदाधिकारी समीर कुलकर्णी यांचाही या स्फोटांतील कथित सहभाग आढळल्याने त्यांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आणखी महत्त्वाचे धागेदारे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला साध्वी प्रज्ञासिंग व तिच्या साथीदारांची ब्रेनमॅपिंग, पॉलिग्राफी व नार्को चाचणी करण्याची परवानगी नाशिक न्यायालयाने दिली होती. त्यानुसार आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रज्ञासिंग हिला या चाचण्यांसाठी सांताक्रूझ कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये नेण्यात आले. यानंतर दुपारी तिच्या अन्य दोन साथीदारांनाही तेथे आणण्यात आले.

फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये दिवसभर झालेल्या तपासणीनंतर सायंकाळी या तिघांना काळाचौकीच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात नेण्यात आले. या चाचण्यांद्वारे आरोपींकडून स्फोटांसंबंधी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, गुजरातच्या मोडासा येथे 29 सप्टेंबरला झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक आर. बी. ब्रह्मभट यांच्या नेतृत्वाखाली गुजरात पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. हे पथक प्रज्ञासिंग व तिच्या साथीदारांची चौकशी करणार आहे. मध्य प्रदेश पोलिसांचे पथकदेखील या ठिकाणी आल्याचे सूत्रांनी सांगितले.

इन्फोबॉक्‍स.....
अहवाल लवकरच
साध्वी प्रज्ञासिंग आणि तिच्या दोन साथीदारांच्या सायकोलॉजिकल चाचण्यांना आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आरोपींच्या प्रतिसादानुसार या चाचण्या घेण्यात येतात. त्यामुळे या तपासण्यांना बराच वेळ लागतो. या तपासण्यांचा अहवाल लवकरच पोलिसांना देण्यात येणार असल्याची माहिती कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या संचालिका रुक्‍मिणी कृष्णमूर्ती यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.
...................................