Tuesday, September 30, 2008

पस्तिस नवरात्रोत्सव मंडळांना बीडीडीएसचे सुरक्षा कवच

नवरात्रोत्सवासाठीही पोलिस सज्ज

कडेकोट सुरक्षा ः मंडळांच्या ठिकाणी बॉम्बशोधक, श्‍वान पथके

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांना अटक केल्यानंतरही मुंबईला असलेला दहशतवादी कारवायांचा धोका टळलेला नाही. अतिरेक्‍यांचा गट अद्याप शहरात फिरत असल्याने नवरात्रोत्सवात घातपात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या कालावधीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील प्रमुख पस्तीस नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी बॉम्बशोधक व विनाशक आणि श्‍वान पथके तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती कायदा व सुरक्षा विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी "सकाळ'ला दिली.

गेल्या तीन वर्षांत देशभरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांच्या अटकेनंतर मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट उघडकीस आला. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य असलेल्या मोहम्मद सादिक शेख याच्या चौकशीत त्याने प्रशिक्षण दिलेले 30 कडवे अतिरेकी मुंबईत फिरत असल्याचे उघडकीस आले. या अतिरेक्‍यांनी गणेशोत्सव काळात विध्वंसक कारवाया करण्यासाठी शहरातील प्रमुख मंडळांच्या मंडपांची पाहणी केल्याची कबुलीही त्याने दिली. उद्या (ता. 30) पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवावर दहशतवादाचे सावट असल्याने शहरात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शहरात 3300 सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे आहेत. त्यातील 2950 ठिकाणी दांडिया व गरबा रास खेळला जातो. या सर्व नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांची मंडपांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्‍टर, सीसीटीव्ही, हॅन्ड मेटल डिटेक्‍टरच्या साह्याने तपासणी करण्यात येणार आहे. भाविकांना मंडपात जाताना पिशव्या अथवा वस्तू सोबत नेण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिस तसेच खासगी महिला सुरक्षारक्षक ठेवण्यात येणार आहेत. भाविक व युवावर्गाची प्रचंड गर्दी असलेल्या शहरातील 35 प्रमुख सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या ठिकाणी पोलिसांचे बॉम्बशोधक व विनाशक तसेच श्‍वान पथक तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या विभागीय स्तरावर अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठकी घेण्यात आल्या असून त्यांनाही सुरक्षिततेसंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल, शीघ्र कृती दल, गृहरक्षक दल यांच्यासह राखीव पोलिसांची मोठी कुमक शहरातील सुरक्षाव्य
वस्थेसाठी सज्ज ठेवण्यात येणार असल्याचेही प्रसाद यांनी या वेळी सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवरच शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. हॉटेल, लॉजसह संवेदनशील ठिकाणे, महालक्ष्मीसारख्या धार्मिक स्थळांवरही पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस ठेवण्यात येणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
.....


गरब्याची वेळ
उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवात पहिले आठ दिवस रात्री दहा वाजेपर्यंत रास गरबा व दांडिया खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. 8 व 9 ऑक्‍टोबरला दांडिया व गरबा खेळण्याची ही वेळ रात्री बारा वाजेपर्यंत असल्याची माहितीही के. एल. प्रसाद यांनी दिली.

जगायचं असेल तर पंचवीस कोटी रुपये द्या, नाही तर...

अमिताभला धमकी ः राजस्थानातील चाहत्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः तुमच्याकडे फक्त तीन दिवस आहेत... जगायचं असेल तर पंचवीस कोटी रुपये द्या, नाही तर... बिग बी अमिताभ बच्चन यांना 26 सप्टेंबरच्या भल्या सकाळी आलेला हा एसएमएस. या एसएमएसने खरे तर ते सुरुवातीला उडालेच. एसएमएस पाठविणाऱ्याचा मोबाईल क्रमांक न्याहाळल्यानंतर त्यांनी तातडीने गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोबाईल कंपनीच्या मदतीने एसएमएस आलेल्या क्रमांकाच्या मोबाईलधारकाचा शोध लावला आणि राजस्थान येथे जाऊन तो पाठविणाऱ्या एका नवख्या कलाकाराच्या मुसक्‍या आवळल्या.
अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या "द्रोण' या चित्रपटात त्याच्यासाठी स्टंट सीन करणारा हा तरुण दिसायलाही हुबेहूब अभिषेकसारखाच आहे. अभिषेकच्या लग्नात प्रसिद्धिमाध्यमांचा ससेमिरा चुकविण्यासाठी याच तरुणाचा वापर करण्यात आला होता, अशी माहितीही समोर आली आहे.
देवीसिंग पद्मसिंग राजपुरोहित असे या तरुणाचे नाव आहे. राजस्थानी चित्रपटात काम करणारा हा पंचवीस वर्षीय कलाकार आणि अभिषेक बच्चन यांच्यात कमालीचे साम्य. त्यामुळेच दीड वर्षापूर्वी राजस्थानच्या जैसलमेर येथे झालेल्या "द्रोण' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी अभिषेकचे काही स्टंटसीन त्याला करायला मिळाले होते. जैसलमेर येथील चित्रीकरण संपल्यानंतर अभिषेक ऐश्‍वर्या रायसोबत लग्नाच्या बेडीत अडकला. या शाही लग्न सोहळ्याच्या वेळी अभिषेकच्या मागे प्रसिद्धिमाध्यमांचा ससेमिरा होता. प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना चुकविण्यासाठी देवीसिंगलाच लग्नाचा पोशाख घालून घोड्यावर बसवून बंगल्यातून बाहेर पाठविण्यात आले होते. परंतु चित्रपटांत भूमिका मिळविण्यासाठी मुंबईत आल्यानंतर देवीसिंगला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

भूमिका मिळविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बच्चन कुटुंबीयांतील सदस्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छापत्रे, पुष्पगुच्छ; तसेच मोबाईलवर एमएसमएस पाठवायला त्याने सुरुवात केली. अमिताभ यांच्या आईचे निधन झाल्यानंतरही त्याने एसएमएस पाठविला होता. अथक प्रयत्नांअंती कसलाच प्रतिसाद मिळत नाही हे पाहून त्याने थेट अमिताभ यांच्याकडेच खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. अमिताभला एसएमएस करून पंचवीस कोटींची खंडणी मागणाऱ्या देवीसिंगला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानच्या जालौर येथून अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. विवाहित असलेला देवीसिंग पाच मिठाईच्या दुकानांचा मालक आहे. अमिताभचा चांगला "फॅन' असलेला देवीसिंग एका एसएमएसमुळे चांगलाच अडचणीत आला आहे.

अतिरेक्‍यांच्या चौकशीसाठी अन्य राज्यांची पथके मुंबईत

राकेश मारिया ः बॉम्बस्फोटांपूर्वी ई-मेल पाठविण्याची कल्पना रोशनची
झाली आहेत. यात दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात पोलिसांच्या पथकांचा समावेश असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 26 ः गेल्या तीन वर्षांत देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांत सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांच्या चौकशीसाठी केंद्रीय गुप्तचर विभागासह यापूर्वी बॉम्बस्फोट झालेल्या राज्यांची पोलिस पथके मुंबईत दाखल आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. बॉम्बस्फोट घडविण्यापूर्वी त्यांच्या धमकीचे ई-मेल पाठविण्याची क्‍लृप्ती इंडियन मुजाहिदीनचा थिंकटॅंक असलेल्या रोशन खान ऊर्फ रियाज भटकळ याची होती. जयपूर, अहमदाबाद व दिल्ली स्फोटांचे ई-मेल पाठविण्याची जबाबदारी त्याचीच होती. चौकशीनंतर या अतिरेक्‍यांना राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे सोपविण्यात येईल, अशी माहिती मारिया यांनी दिली.

फेब्रुवारी 2005 मध्ये वाराणसी येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांपासून 13 सप्टेंबरला दिल्लीत झालेल्या सर्व बॉम्बस्फोट मालिकांना जबाबदार असलेल्या अफजल उस्मानी, मोहम्मद सादीक शेख, मोहम्मद आरीफ शेख , मोहम्मद जाकीर शेख आणि मोहम्मद अन्सार शेख या पाच अतिरेक्‍यांची गुन्हे शाखेचे पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्यांनी चौकशीत दिलेल्या माहितीनुसार जयपूर बॉम्बस्फोटांच्या काही दिवस आधी "सिमी'पासून वेगळे होऊन इंडियन मुजाहिदीन संघटनेची स्थापना करण्यात आली. देशभरात घडवीत असलेल्या स्फोटांची जबाबदारी घेण्यासाठी अतिरेक्‍यांनी या नावाने ई-मेल करायला सुरवात केली. ईमेल करून धमक्‍या देणे, चोरीच्या गाड्या मिळवणे व कट आखण्याचे काम रियाज भटकळकडे सोपविण्यात आले होते. या अतिरेक्‍यांकडून देशभरात घातपात करवून घेणारा आमीर रझा पाकिस्तानात असून रियाजच्या माध्यमातून तो या अतिरेक्‍यांवर नियंत्रण ठेवतो. आमीरचा लहान भाऊ आसिफ राजकोट येथे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता.
सुरतमध्ये भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या मोहम्मद जाकिरकडून तेथील बॉम्बस्फोटांची माहिती पोलिसांना मिळत आहे. 26 जुलैला अहमदाबादमध्ये स्फोटकांनी भरलेल्या गाड्या ठेवल्यानंतर राजधानी एक्‍स्प्रेसने दिल्लीला निघालेल्या अफजल उस्मानीसोबत आठ जण होते. त्यातील काही निझामुद्दीन येथे; तर काही दिल्लीत उतरले होते. देशभरात अकरा बॉम्बस्फोट घडविणाऱ्या या अतिरेक्‍यांनी स्फोट घडविण्यासाठी प्रेशर कुकर, ब्रीफकेस, पेट्या, सायकल व पुढे गाड्यांचा वापर केला. दिल्लीची जामा मशीद, हैदराबाद येथील मशीद, मालेगाव येथील मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांवर झालेल्या घातपाती कारवायांत या संघटनेच्या अतिरेक्‍यांचा सहभाग नसल्याचे मारिया यांनी या वेळी स्पष्ट केले.
---------------------------
(चौकट)

पोलिसांची दिशाभूल
देशात घातपाती कारवाया करण्यासाठी पाकिस्तान व बांगलादेशात प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या अतिरेक्‍यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून पोलिसांची तपासात दिशाभूल करणे असा आहे. पोलिसांच्या चौकशीची पद्धत व त्यांच्या तंत्रांचे या अतिरेक्‍यांना प्रशिक्षण दिले जाते. तपास सुरू असताना पोलिसांना खोटी माहिती देऊन तपासात त्यांना मुख्य तपासापासून भरकटवून टाकण्याची युक्ती शिकविली जाते. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या वेळेत या आरोपींची चौकशी पूर्ण होत नसल्याची माहिती मारिया यांनी "सकाळ'ला दिली.
.....

Friday, September 26, 2008

मृत्यूचा खेळ सुरु होईपर्यंत तो गुजरातच्या हद्दीतून बाहेर पडला होता...

ज्ञानेश चव्हाण /सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 25 ः इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्‍यांपर्यंत पोहचण्यास महत्वपुर्ण दुवा ठरलेला कुख्यात अतिरेकी अफजल उस्मानी याने त्याच्या दोन साथीदारांसोबत स्फोट घडविण्यासाठी नेलेल्या गाड्या अहमदाबाद येथील रुग्णालय व बाजारात उभ्या केल्या. 42 निष्पापांचे बळी घेण्यास तसेच 183 जणांना जखमी करण्यास "मृत्युदूत' ठरलेल्या या चारही गाड्या त्याने अवघ्या एक लाख साठ हजार रुपयांना अतिरेक्‍यांना विकल्याची माहिती उघडकीस आली आहे. अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाले त्यादिवशी सायंकाळी साडेचार वाजताच्या राजधानी एक्‍सप्रेसने गुजरातहून मुंबईला येण्यासाठी तो निघाला. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून अहमदबादमध्ये मृत्युचा खेळ सुरु होईपर्यंत तो गुजरातच्या हद्दीतून सहीसलामत बाहेर पडला होता.

मुळचा महू जिल्ह्यातील ढिलाई फिरोजपुर गावचा अफजल वयाच्या आठव्या वर्षांपासून मुंबईत वास्तव्याला आहे. त्याच्या वडिलांचा वांद्रे येथे हॉटेल व्यवसाय आहे. त्याच्या हॉटेलवर नेहमी येणारा रोशन खान "आरएन' या टोळीसाठी काम करीत होता. अफजलचा 2002 मध्ये रोशनशी संपर्क आल्यांनंतर त्याच्यासोबत अफजलने शहरात खंडण्या मागायला सुरवात केली. त्याच्यावर आतापर्यंत नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2005 मध्ये ओशिवरा येथे केलेल्या गोळीबारानंतर त्याला मोक्काखाली शिक्षा झाली. शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या अफजलने नंतर पुन्हा रोशन खान सोबत संधांन साधले होते. तोपर्यंत रोशन इंडियन मुजाहिदीनच्या "थिंक टॅंक'पैकी एक झाला होता. तर अफजलने देशभरात चोरीच्या गाड्यांची विक्री करायला सुरवात केली. रोशनच्याच सांगण्यावरून अफजलने अहमदाबाद स्फोटांसाठी नवी मुंबईतून सीएनजी किट असलेल्या गाड्या चोरल्या. 10 व 16 जुलै रोजी प्रत्येकी दोन अशा चार गाड्या मुंबई- अहमदाबाद राजमार्गाने त्याने गुजरात मध्ये पोहचविल्या. त्याच्याकडे दिलेल्या एका चिठ्ठीवर लिहिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तेथील व्यक्तीच्या ताब्यात या गाड्या त्याने दिल्या. मात्र नंतर स्फोटकांनी भरलेल्या या गाड्या रुग्णालय व बाजारात उभ्या करण्यासही त्यालाच सांगण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली. अफजलचा 11 जुलै 2006 मध्ये झालेल्या उपनगरी रेल्वे स्फोटांतील आरोपी महम्मद अली याच्याशीही देखील संपर्क असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

दिल्ली कनेक्‍शनचा शोध...
अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी अहमदाबाद व सुरतमधून सर्व दुरध्वनींचे रेकॉर्डस शोधले. स्फोटांच्या कालावधीत मोबाईलवरुन झालेल्या काही संशयास्पद मोबाईल क्रमांकांचा पोलिस शोध घेत होते. संभाषणानंतर त्यातील काही मोबाईलचे सिम कार्ड काढून टाकल्याचे पोलिसांना कळाले. या मोबाईल फोनचे शेवटचे ठिकाण पोलिस शोधत होते. त्यांतील एक मोबाईल दिल्लीच्या जामिया परीसरातून असल्याचे स्पष्ट झाले होते. त्या माहितीवरुनच पोलिसांना दिल्लीत जामिया परीसराचा ठावठिकाणा लागल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

अतिरेकी प्रशिक्षण
देशभरातील बॉम्बस्फोट मालिकांसाठी कारणीभूत ठरलेल्या पाचही अतिरेक्‍यांना पाकीस्तान व बांगलादेशात अतिरेकी कारवायांचे प्रशिक्षण पूर्ण मिळाले. पाकिस्तानात जाण्यासाठी ते दुबई ते इराण व पुढे पाकीस्तान येथे जात असल्याची माहिती अतिरीक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली.पाकीस्तानात असलेला आमिर रझाक त्यांच्यावर नियंत्रण ठेवत असल्याची माहितीही भारती यांनी दिली.
....

गणेशोत्सवात घातपाताचा कट होता; पण...

गणेशोत्सवात घातपाताचा कट होता; पण...
तपशील हाती ः प्रसिद्ध मंडळांची तिघा अतिरेक्‍यांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 25 ः गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत घातपात करण्याचा कट रचला होता, अशी महत्त्वपूर्ण माहिती उघडकीस आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यातील तिघा अतिरेक्‍यांनी शहरातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची पाहणी केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दिल्ली व अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात महत्त्वाचा सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या अफजल उस्मानी, मोहम्मद सादीक शेख, मोहम्मद आरिफ शेख, मोहम्मद जाकिर शेख आणि मोहम्मद अन्सार शेख या कडव्या अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या अतिरेक्‍यांच्या चौकशीत त्यांनी शहरात घातपात घडविण्यासाठी गणेशोत्सवाचा कालावधी निवडला होता अशी कबुली दिली आहे. गणेशोत्सव काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने शहरात अतिरेकी कारवाया करण्याचा त्यांचा इरादा होता; मात्र त्यांच्या या संभाव्य कारवाईची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागाला कळल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना याबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. अतिरेक्‍यांनी प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची पाहणी केल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली. पोलिसांनी शहरात ठेवलेल्या चोख सुरक्षाव्यवस्थेमुळेच मुंबईत कार्यरत असलेल्या अतिरेक्‍यांच्या या गटाला आपले मनसुबे पूर्णत्वास नेता आले नाहीत. मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी हे अतिरेकी मुंबईत घातपात घडविणार होते याची माहिती यापूर्वीच दिली आहे.
गणेशोत्सव कालावधीतच या पाचही अतिरेक्‍यांना पकडण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरलेला अफजल मुतालिब उस्मानी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या जाळ्यात सापडला. देशभरातील चोरीच्या गाड्यांचा डिलर असलेल्या अफजल याने अहमदाबाद बॉम्बस्फोटांसाठी वापरण्यात आलेल्या चार गाड्या नवी मुंबईतून चोरल्या. इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य असलेल्या रोशन खानसोबत सुरुवातीला फजलू रहमान टोळीसाठी खंडणी मागण्याचे काम करणारा अफजल जानेवारी- 2007 मध्ये "मोक्का'खाली शिक्षा भोगून सुटला. त्यानंतर त्याने चोरीच्या गाड्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. अहमदाबाद स्फोटात वापरलेल्या गाड्या नवी मुंबईतून चोरल्याचे उघडकीस आल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस गाड्या चोरणाऱ्या टोळ्यांच्या मागे लागले होते. त्यातच पोलिसांनी चोरीच्या गाड्या विकणाऱ्या राजू सोनी याला अटक केली. अहमदाबाद स्फोटांनंतर सव्वा महिन्याने सोनी याने अफजलने या गाड्या पुरविल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याचे सांगण्यात येते.

Thursday, September 25, 2008

पाच अतिरेक्‍यांना मुसक्‍या ः स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त; सर्व इंडियन मुजाहिद

मुंबई पुन्हा बचावली

पाच अतिरेक्‍यांना मुसक्‍या ः स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त; सर्व इंडियन मुजाहिद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 24 ः शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेणाऱ्या बॉम्बस्फोटांत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांच्या मुसक्‍या आज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या. या अतिरेक्‍यांमध्ये इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य असलेला आणि दिल्ली बॉम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार असलेला महम्मद सादिक शेख व अहमदाबाद येथे बॉम्बस्फोट घडविण्यासाठी नवी मुंबईतून गाड्या चोरणारा अफजल उस्मानी यांचा समावेश आहे. या अतिरेक्‍यांना लष्कर-ए-तोयबा व हुजी या अतिरेकी संघटनांकडून प्रशिक्षण मिळाले असून त्यांच्यावर पाकिस्तानातून नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अतिरेक्‍यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटके व शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. मुंबईतही घातपात घडविण्याचा या दहशतवाद्यांचा कट उधळल्याची माहितीही गफूर यांनी यावेळी दिली.

अफजल मुतालिब शेख (32, रा. आझमगढ), मोहम्मद सादिक शेख (31,रा. चिताकॅम्प), मोहम्मद अरिफ शेख (38,रा. मुंब्रा), मोहम्मद झाकिर शेख (28, रा. भिवंडी) व मोहम्मद अन्सार शेख (31, रा. चिताकॅम्प) अशी या अतिरेक्‍यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दहा किलो जिलेटिन, अमोनियम नायट्रेट, पंधरा डिटोनेटर, आठ किलो बॉल बेअरिंग, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे सर्किट, एक सबमशिन गन, दोन रिव्हॉल्व्हर, कार्बाईनची तीस काडतुसे, रिव्हॉलव्हरची आठ काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. हे पाचही जण मूळचे आझमगढचे असून त्यातील तिघे संजरपूर गावचे राहणारे आहेत. अटक केलेल्या आरोपींपैकी अफजल याने अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यासाठी नवी मुंबईतून चार गाड्या चोरल्या होत्या. सुरत येथील रुग्णालय व बाजारात स्फोट घडविण्यासाठी दोन गाड्यांत त्यानेच बॉम्ब ठेवले होते.

इंडियन मुजाहिदीन संघटनेच्या तिघा जणांच्या "थिंकटॅंक'पैकी एक असलेला मोहम्मद सादिक शेख मुंबईतील एका प्रसिद्ध इलेक्‍ट्रॉनिक कंपनीत प्रोग्राम इंजिनीयर म्हणून काम करीत होता. अतिरेकी प्रशिक्षणासाठी तो दोन वेळा देशाबाहेर गेला होता.
बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे इलेक्‍ट्रिक सर्किट बनविण्यात निष्णात असलेला महम्मद आरिफ शेख हा अतिरेकी इलेक्‍ट्रिशनचे काम करीत होता. इंडियन मुजाहिदीनने देशभरात घडविलेल्या बॉम्बस्फोटांसाठी त्यानेच सर्किट तयार केले होते. भिवंडीत स्थायिक झालेला मोहम्मद झाकिर शेख भंगार विक्रीचा व्यवसाय करीत होता. सुरतमधील अतिरेकी कारवायांतील त्याचा सहभाग उघडकीस आला आहे. महम्मद सादिकचा जवळचा साथीदार असलेला मोहम्मद अन्सार शेख सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. त्यानेही परदेशात जाऊन अतिरेकी प्रशिक्षण घेतले आहे. दिल्लीत 13 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर पोलिस चकमकीत मारला गेलेला आतिफ आज अटक केलेला मोहम्मद सादिकच्या इशाऱ्याबरहुकुम अतिरेकी कारवाया करीत होता. कटांसाठी गाड्या मिळवणे, कट आखणे तसेच अतिरेक्‍यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्याची जबाबदारी सादिकवर होती.
"सिमी' संघटनेशी संबंधित असलेल्या या अतिरेक्‍यांनी देशात घातपात घडविण्यासाठी इंडियन मुजाहिदीन नावाची संघटना सुरू केली आहे. या आरोपींचे "सिमी'चा सक्रिय कार्यकर्ता सफदर नागोरी याच्याशीही संबंध उघडकीस आले असून इंडियन मुजाहिदीनच्या "थिंक टॅंक'मधील आणखी एक प्रमुख रोशन खान याचा पोलिस शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत घातपात घडविण्याचा ई-मेल पोलिसांना आला होता. या अतिरेक्‍यांच्या अटकेनंतर मुंबईत होणारा संभाव्य घातपात टळल्याची कबुली गफूर यांनी यावेळी दिली.
या अतिरेक्‍यांची पाळेमुळे पाकिस्तानात असून आयएसआयशी त्यांचा संबंध आहे. मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेले बॉम्बस्फोट, जयपूर, बंगळूरू, अहमदाबाद, दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांसह वारणसीतील संकटमोचन मंदिर, काशीविश्‍वेश्‍वर मंदिर, वाराणसी रेल्वेस्थानक, फैजाबाद, गोरखपूर, हैदराबाद येथील स्फोटांतही या अतिरेक्‍यांचा सहभाग स्पष्ट झाल्याची माहिती गफूर यांनी दिली.

पोलिसांना पाच लाखांचे बक्षीस
गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या या कामगिरीबाबत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी या पथकाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या अतिरेक्‍यांना 7 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश देण्यात आले आहेत.

Tuesday, September 23, 2008

शाळांचा किलबिलाट बॉम्बच्या अफवेने थबकतो तेव्हा...

ज्ञानेश
-----



सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 22 ः दादरचे प्रसिद्ध शारदाश्रम विद्यालय... रविवारच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद घेऊन आज सकाळी नेहमीप्रमाणे वर्गात हजर झालेल्या विद्यार्थ्यांचा किलबिलाट या परिसराला तसा नेहमीचाच. मधल्या सुट्टीनंतर शाळेचे वर्ग भरून तासिका नेहमीप्रमाणे सुरू झाल्या, तोच मुंबई पोलिसांची गाडी शाळेच्या आवारात येऊन थांबली. गाडीतून उतरलेल्या अधिकाऱ्यांनी लगबगीने मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी आल्याची माहिती दिली. देशभरात होणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या या बातमीने शिक्षकांच्याही पोटात भीतीचा गोळा आला. पोलिसांच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना काही क्षणातच शाळेबाहेर नेण्यात आले. बॉम्बशोधक पथक व श्‍वानपथकाने केलेल्या तपासणीत ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले अन्‌ बराच वेळ तणावाखाली असलेले पोलिस, शिक्षक व मुलांना शाळेत सोडण्यासाठी आलेले पालक व विद्यार्थ्यांनीही सुटकेचा श्‍वास सोडला. असाच काहीसा प्रकार आज सांताक्रूझ व भोईवाडा येथील शाळांतही घडल्याने तेथील परिस्थितीही काही वेगळी नव्हती.
दादरचे शारदाश्रम विद्यालय बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा निनावी दूरध्वनी पोलिस नियंत्रण कक्षाला आज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी आला. अतिरेकी संघटनांचे स्लीपर सेल मुंबईत कार्यरत असण्याची शक्‍यता असल्याने या दूरध्वनीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने याबाबतची माहिती दादर पोलिसांना दिली. क्षणाचाही विलंब न लावता पोलिस बॉम्बशोधक व विनाशक तसेच श्‍वानपथकासोबत या शाळेत गेले. शिक्षकांच्या मदतीने त्यांनी तातडीने शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेपासून लांब नेले. वर्ग सुरू असताना अचानक शाळा सोडल्याने विद्यार्थ्यांत एकच गोंगाट सुरू झाला. शाळा मध्येच सोडल्याने सुरुवातीला आनंदी झालेल्या काही लहानग्या विद्यार्थ्यांचा हा आनंद शाळेत बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच कुठल्या कुठे मावळला. काहींनी तर चक्क रडायलाच सुरुवात केली. एव्हाना ही माहिती पालकांना समजली आणि त्यांनी शाळेकडे धाव घेतली. बघ्यांनीही प्रचंड गर्दी केली. एका तासाहून अधिक काळ केलेल्या तपासणीनंतर बॉम्बशोधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी ही अफवा असल्याचे सांगताच तणावाखाली असलेले शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांसह पोलिसांनीही सुटकेचा निश्‍वास सोडला.
यानंतर दुपारची शाळा नेहमीप्रमाणे भरल्याची माहिती दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर संख्ये यांनी दिली. असाच प्रकार दिवसभरात सांताक्रूझ पश्‍चिमेला असलेल्या सरस्वती हायस्कूल व भोईवाड्याच्या गुरुनानक हायस्कूलमध्येही घडला. या दोन्ही ठिकाणी गेलेल्या बॉम्बशोधक व श्‍वानपथकांना तेथे काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.

Tuesday, September 16, 2008

वृद्धेसह नातवाची निर्घृण हत्या

नोकराचे कृत्य ः साडेसोळा लाखांचा ऐवजासह पोबारा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 15 ः सहा दिवसांपूर्वी घरकामासाठी ठेवलेल्या नोकराने मालकीण घराबाहेर गेल्यानंतर तिच्या वृद्ध सासूची उशीने तोंड दाबून; तर बारा वर्षांच्या मुलाची पाण्याच्या टबमध्ये बुडवून निर्घृण हत्या केल्याची घटना सांताक्रूझ येथे घडली. यानंतर नोकराने कपाटात ठेवलेले बारा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व साडेचार लाखांची रोख असा साडेसोळा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. आज भरदुपारी घडलेल्या या घटनेने सांताक्रूझ परिसरात खळबळ उडाली.

सांताक्रूझ पश्‍चिमेला टिळक रोडवर असलेल्या शोभना इमारतीत हा प्रकार घडला. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या उदय पारेख यांनी त्यांच्या घरात घरकाम करण्यासाठी अवघ्या सहा दिवसांपूर्वी एक नेपाळी नोकर ठेवला होता. मुलगा हर्षवर्धन (12) याची प्रकृती बरी नसल्याने उदया यांच्या पत्नी राजूल मुलाच्या शाळेत गृहपाठाची विचारणा करायला गेल्या होत्या. यावेळी घरात त्यांची सासू उषाबेन ईश्‍वरलाल पारेख (74) व मुलगा असे दोघेच जण होते. घरात दोघेच असल्याचे पाहून या नोकराने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उषाबेन यांच्या तोंडात कापडी बोळा कोंबून उशीने त्यांचे तोंड दाबल्याने त्या जागीच मरण पावल्या. यानंतर हर्षवर्धनचे हातपाय बांधून त्याला बाथरूममधील पाण्याच्या टबमध्ये बुडवून मारले. या निर्घृण हत्येनंतर या नोकराने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख असा साडेसोळा लाख रुपयांचा ऐवज चोरून पळ काढला. दोन वाजण्याच्या सुमारास घरी परतलेल्या राजूल यांना घराचा दरवाजा उघडाच दिसला. घरात शिरताच आत सासू उषाबेन यांचा मृतदेह आढळला. पाण्याच्या टबमध्ये टाकलेल्या हर्षवर्धन याला त्यांनी उपचारासाठी तातडीने नानावटी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच तो मरण पावला. या प्रकरणी त्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात नोकराविरुद्ध तक्रार दिली असून अधिक तपास सुरू आहे.

रस्ता खचून ट्रक कलंडल्याने तिघे चिरडले

रस्ता खचून ट्रक कलंडल्याने तिघे चिरडले

एक जखमी ः कंत्राटदार, पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 15 ः पेव्हर ब्लॉकचा वापर करून बनविलेला रस्ता पाच फूट खचल्याने भरधाव ट्रकला झालेल्या अपघातात तीन पादचारी ठार, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. सातरस्ता येथील जेकब सर्कलजवळ धोबीघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकासह महापालिकेचे अधिकारी व कंत्राटदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. सी. खंडागळे यांनी सांगितले. लाकडी ओंडक्‍यांची वाहतूक करणारा ट्रक या रस्त्यावरून जात असताना रस्ता पाच फूट खचला. त्यात ट्रकचे मागील चाक अडकल्याने त्यातील ओंडके पादचाऱ्यांवर पडले. ओंडक्‍यांखाली चिरडून झिनल गणेश सावला (37), झेबुन्नीसा कासमभाई कामदार (35) आणि एक अनोळखी पुरुष असे तिघे ठार झाले. या अपघातात उज्ज्वला शैलेंद्र गायकवाड (22) ही तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला. अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा रस्ता खोदून त्याच्यावर महापालिकेने पेव्हर ब्लॉक बसविले होते. अपघातानंतर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या या कामात कंत्राटदार व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. यात वापरण्यात आलेल्या साहित्याबाबतही साशंकता व्यक्त होत असल्याने कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक खंडागळे यांनी दिली.
दरम्यान, अपघातानंतर या मार्गावर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. येथील वाहतूक चार तासांहून अधिक काळ एकाच मार्गावरून चालविण्यात येत होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी नागरिकांच्या मदतीने या मार्गावर पडलेले ओंडके बाजूला केले. दुपारी साडेतीन वाजता अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.
......................................

Monday, September 15, 2008

तौकिरच्या मागावर एटीएसचे अधिकारी

स्फोटांनंतरचा ई-मेल : चेंबूर, अंधेरीत छापे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 14 : दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेचा ई-मेल चेंबूरच्या कामरान पॉवर कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज सकाळपासून दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी चेंबूर व अंधेरीच्या मोगरापाडासह शहरात ठिकठिकाणी छापे घालून शोधमोहीम हाती घेतली. हा ई-मेल अब्दुल सुभान कुरेशी ऊर्फ तौकिर याने पाठविल्याचा संशय व्यक्त करून दहशतवाद विरोधी पथक त्याच्या मागावर असल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

गणेशमूर्तींच्या विसर्जन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नागरिकांनी संशयास्पद हालचाली व वस्तूंवर लक्ष ठेऊन, त्याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन दहशतवाद विरोधी पथकाने एसएमएसद्वारे मुंबईकरांना केले होते. दिल्ली बॉम्बस्फोटांच्या धमकीचा ई-मेल काल सायंकाळी काही वृत्तवाहिन्यांना पाठविण्यात आला. "इंडियन मुजाहिदीन' या अतिरेकी संघटनेच्या नावे पाठविण्यात आलेला हा ई-मेल चेंबूरच्या कामरान पॉवर कंट्रोल कंपनीच्या कॉम्प्युटरवरून पाठविण्यात आला. एमटीएनएलच्या वायफाय इंटरनेट सुविधेचा वापर असलेल्या या कंपनीतील इंटरनेट राऊटरच्या मदतीने हा मेल पाठविण्यात आला असावा, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

कंपनीमालकाची चौकशी
दहशतवाद विराधी पथकाने कामरान कंपनीचे मालक के. एम. कामत व एन. के. कामत यांची दिवसभर चौकशी केली. कंपनीत फक्त दोनच कॉम्प्युटर असल्याने कामत यांनी घेतलेल्या वायफाय जोडणीबाबतही पोलिस साशंक आहेत. पोलिसांनी हे कॉम्प्युटर फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविले आहेत. दहशतवाद विरोधी पथक सायबर क्राईम सेलचे पोलिस व खासगी कॉम्प्युटर एक्‍सपर्टची मदत घेत आहेत. कामत यांनी मात्र या प्रकरणात आपण निर्दोष असून, आपण तंत्रज्ञानाचे बळी ठरत असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्धिमाध्यमांना दिली. अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पाच मिनिटांपूर्वी असाच ई-मेल सानपाड्याच्या गुनानी इमारतीत राहणाऱ्या केनेथ हेवूड या अमेरिकन नागरिकाच्या कॉम्प्युटरवरून पाठविण्यात आला होता. गुजरात पोलिसांच्या अटकेत असलेला अहमदाबाद स्फोटांचा मास्टरमाईंड अबू बशीरच्या जबानीत हा ई-मेल तौकिरनेच पाठविल्याची माहिती पुढे आली. माटुंग्याच्या खालसा महाविद्यालयातून पाठविण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर तौकिरचे वास्तव्य मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले होते. दिल्ली स्फोटांचा ई-मेल मुंबईतूनच पाठविण्यात आल्याने त्याचे मुंबईतील वास्तव्य अधोरेखित होत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------------------------------------

गणरायांना जल्लोषात निरोप

गणरायांना जल्लोषात निरोप

जनसागर उसळला : दहशतवादाचे सावट झुगारले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 14 ः दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेल्या अतिदक्षतेच्या इशाऱ्यानंतरही लाखोंच्या जनसागराने आज आपल्या लाडक्‍या गणरायाला ढोल-ताशांचा गजर, गुलालाची मुक्त उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी; तसेच डीजेच्या तालावर नाचत अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप दिला. अकरा दिवसांच्या सळसळत्या उत्साहानंतर आज विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देताना दहशतवादाचे कोणतेही सावट या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर तसूमात्रही दिसत नव्हते.

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा ई-मेल चेंबूर येथून पाठविल्याचे उघडकीस आल्यानंतर मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याने मुंबईत गणेशोत्सवानिमित्त आधीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यातच दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेनंतर ही सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली होती. आज सकाळपासूनच लाखो भाविकांनी गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.

राजाला पाहण्यासाठी गर्दी
भाविकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या लालबागच्या राजाला पाहण्यासाठी सबंध मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. रस्त्याच्या कडेला, इमारतींच्या गच्चीवर; तसेच जागा मिळेल तेथे उभे राहून हे भाविक आपल्या लाडक्‍या गणपती बाप्पाची मिरवणूक याची देही याची डोळा पाहत होते. "गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या ' परंपरागत घोषणांपासून "ही प्रजा कोणाची... लालबागच्या राजाची' यासारख्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. याच मार्गांनी लालबाग गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रंगारी बदक चाळ , चिंचपोकळीचा चिंतामणी, बालयुवक उत्सव मंडळ अशा मोठ्या मंडळांच्या मानाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने भाविक तासन्‌ तास या मार्गावर उभे होते. लालबाग उड्डाणपुलाजवळच असलेल्या श्रॉफ इमारतीतून या मार्गाने येणाऱ्या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्याचा सोहळाही भाविक मनोभावे पाहत होते. नाशिक ढोल आणि डीजेच्या कानठळ्या बसविणाऱ्या म्युझिकवर थिरकणाऱ्या तरुणाईचा अलोट उत्साह डोळ्यांचे पारणे फेडत होता. अंगात पांढरा सदरा, डोक्‍यावर "लालबागचा राजा' लिहिलेली टोपी, गळ्यात ओळखपत्र घातलेले हजारो स्वयंसेवक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या गर्दीचा गैरफायदा घेऊन समाजकंटकांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, याकरिता साध्या वेशातील पोलिस गर्दीत फिरत होते. राज्य राखीव पोलिस दल, रॅपिड ऍक्‍शन फोर्सच्या तुकड्यांसह पोलिस डोळ्यात तेल घालून प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवून होते. गणेशभक्तांच्या सुविधेसाठी या परिसरात सामाजिक संस्था व राजकीय पक्षांनी पाणपोई; तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.

Sunday, September 14, 2008

स्फोटांनंतरचा ई-मेल चेंबूरमधून

स्फोटांनंतरचा ई-मेल चेंबूरमधून

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 13 ः दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेनंतर या स्फोटांची जबाबदारी स्वीकारत असल्याबद्दलचा ई- मेल मुंबईतील चेंबूर परिसरातून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे; पोलिसांनी मात्र या ई-मेलची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर आज तातडीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारी या प्रकरणी तपास करीत आहेत.

दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेची जबाबदारी इंडियन मजाहिदीन या अतिरेकी संघटनेने घेतली असल्याचे या ई-मेलवरून तरी आढळून आले आहे. या संघटनेने सायंकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी काही वृत्तवाहिन्यांना हा ई- मेल पाठवून स्फोटांची जबाबदारी घेतली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटांपूर्वी पाठविण्यात आलेला ई-मेलदेखील नवी मुंबईच्या सानपाडा येथील गुनानी इमारतीत राहणाऱ्या केनेथ हेवूड या अमेरिकन नागरिकाच्या संगणकावरून पाठविल्याचे स्पष्ट झाले होते. इंटरनेट सुविधेच्या "राऊटर'च्या मदतीने हा मेल पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले. आज दिल्लीत झालेल्या स्फोटांचा ईमेलदेखील मुंबईतून पाठविल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दहशतवादी मुंबईत बसून योजना आखतात काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलिसही सतर्क झाले आहेत. या प्रकरणी आताच कोणतेही वक्तव्य करणे धाडसाचे ठरेल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
चौकट
---------

दिल्ली स्फोटांचा ई-मेल चेंबुर परीसरातून पाठविल्याची माहिती मिळाली असून पोलिस शोध माहिमेद्वारे हा ई-मेल पाठविणाऱ्याचा कसून शोध घेत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी "सकाळ' ला दिली. ठोस माहिती हाती आल्याशिवाय या मेल बाबत आणखी काही सांगणे उचित ठरणार नाही असेही करकरे यावेळी म्हणाले

मुंबईसह राज्यात "हाय ऍलर्ट'

गणपती विसर्जन ः मिरवणुकीतील प्रत्येक वाहनाची कसून तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 13 ः दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबईसह राज्यात "हाय ऍलर्ट' चा इशारा देण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी दिली. तसेच उद्या (ता. 14) विसर्जनासाठी जाणारे मोठे गणपती ट्रकवर ठेवल्यानंतर संपूर्ण ट्रकची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी जे मार्ग आखण्यात आले आहेत, तेथे अन्य कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच विसर्जनासाठी जाणाऱ्या गणपतींवर भक्तांकडून हार व फुले भिरकावण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. उद्या अकरा दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी लाखो भाविक समुद्रकिनारी असलेल्या चौपाट्यांवर गर्दी करतात. त्या पार्श्‍वभूमीवरही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे गफूर या वेळी म्हणाले.
दिल्लीत आज सायंकाळी पाच ठिकाणी झालेल्या स्फोटांत 20 जण ठार; तर 92 जखमी झाले. त्या पार्श्‍वभूमीवर आज मुंबईसह राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. आजपासूनच शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी सुरू झाली असून, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणे तसेच महत्त्वाच्या इमारतींभोवतीही कडक पहारा ठेवण्यात आला आहे. हॉटेल, लॉज, झोपडपट्‌टी परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य राखीव पोलिस दलाचीही अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याची माहितीही गफूर यांनी या वेळी दिली.
पोलिसांनी गणेशोत्सव मंडळांच्या स्वयंसेवकांनाही खास प्रशिक्षण दिले आहे. गर्दीच्या ठिकाणी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील तसेच सीआयडीचे पोलिस तैनात केले आहेत. याशिवाय खबरदारी म्हणून बॉम्बशोधक आणि विनाशक पथकही विसर्जनाच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही पोलिस आयुक्तांनी केले आहे.

Friday, September 12, 2008

त्या "ई-मेल'प्रकरणी केनेथ निर्दोष

त्या "ई-मेल'प्रकरणी केनेथ निर्दोष
परमबीर सिंग ः अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याचा आरोप खोटा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेचा ई- मेल पाठविल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पळून गेलेला अमेरिकन नागरिक केनेथ हेवूड याने आज दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातून मुक्ततेकरिता एटीएसच्या अधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचा झालेला आरोप खोटा असून हा प्रसिद्धिमाध्यमांचा बनाव असल्याचे हेवूडने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. ई-मेल प्रकरणात हेवूडवर पोलिसांचा कसलाही संशय नाही, तो निर्दोष असल्याचा निर्वाळा या पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
अहमदाबाद येथे 26 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा ई-मेल सानपाडा येथे राहणाऱ्या केनेथ हेवूड याच्या कॉम्प्युटरवरून पाठविण्यात आला. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असतानाच तो दिल्ली विमानतळावरून अमेरिकेला पळून गेला.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतात परतलेला हेवूड आज एटीएसच्या कार्यालयात दाखल झाला. त्याच्या सुटकेसाठी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून लाच मागितल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र आज त्याने पोलिसांना दिलेल्या निवेदनात पोलिसांवर झालेला हा आरोप खोटा असल्याचे म्हटल्याचे अतिरिक्त आयुक्त सिंग यांनी सांगितले.
चौकशी सुरू असेपर्यंत हेवूडने देश सोडू नये यासाठी पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली. मात्र दिल्लीच्या विमानतळ सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फरारी झाला. त्याच्या पलायनाबाबत दुसऱ्या एजन्सी तपास करीत आहेत. हेवूड निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला त्याचे कॉम्प्युटर व लॅपटॉप घेऊन जाता येतील, असेही ते म्हणाले.

प्रसिद्धिमाध्यमांच्या हातावर तुरी देत हेवूड पुन्हा निसटला...
नागपाडा येथील एटीएसच्या मुख्यालयात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आलेला केनेथ हेवूड सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांपुढे आपला जबाब नोंदवीत होता. हेवूडची मुलाखत घेण्याकरिता प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही झुंबड उडाली. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन केनेथ मागच्या दरवाजाने पुन्हा पसार झाला. त्याच्या मागावर असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या काही पत्रकारांनी नागपाडा सिग्नलवर त्याची गाडी अक्षरशः अडवून त्याचा "बाईट' घेतला.

मराठीचा कधीच

मराठीचा कधीच
अवमान केला नाही
के. एल. प्रसाद ः महाराष्ट्र माझी कर्मभूमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः "मुंबई कोणाच्या बापाची नाही' या बेलगाम वक्तव्याने उपमुख्यमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांचे मराठीप्रेम जागे झाले आहे. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असून मराठी भाषेचा आपण कधीच अवमान केला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज दिली.
खासदार जया बच्चन यांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनानंतर शहरात मनसेच्या दोन हजारहून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर चेंबूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी "मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही, हे शहर सबंध देशवासीयांचे आहे,' असे वक्तव्य केले होते. मराठी माणसांचे मन दुखावणाऱ्या प्रसाद यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली. खुद्द उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रसाद यांच्याकडे याबाबत खुलासा मागितला.
चेंबूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण मराठी माणूस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अथवा अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुठेही नाव घेतले नाही. शहरात गुंडागर्दी करणारे, दंगल भडकवणारे तसेच सर्वसामान्य नागरिकाच्या मनात दहशत निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्यांबाबत आपण हे वक्तव्य केले. असे प्रकार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा आपल्या वक्तव्याचा रोख होता. मराठी भाषेबद्दल मला आदर आहे. दक्षिण भारतीय असताना आपण मराठी भाषा आत्मसात केल्याचेही प्रसाद या वेळी म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावर ते म्हणाले, राज ठाकरे हे राजकारणी आहेत. त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्याप्रमाणे भाष्य करणे अयोग्य असल्याचेही प्रसाद या वेळी म्हणाले. प्रसिद्धिमाध्यमातून प्रसारित झालेले मुंबई कोणाच्या बापाची मालमत्ता नाही, हे विधान आपण केलेल्या संपूर्ण विधानाचा अर्धा भाग आहे. त्यापूर्वीचे विधान न दाखविता वृत्त वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी अर्धवटच विधान दाखविल्याचेही त्यांनी सांगितले.

Wednesday, September 10, 2008

पीव्हीआर चित्रपटगृहावर "मनसे'ची दगडफेक

चौघांविरुद्ध गुन्हा ः "द लास्ट लियर'चा प्रीमियर रद्द

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांच्या महाराष्ट्रद्वेषी वक्तव्याबाबत बच्चन कुटुंबीय जोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा कोणताच चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जुहूच्या पीव्हीआर चित्रपटगृहावर दगडफेक केली. चित्रपटगृहाच्या काचा, तसेच जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या एलसीडी स्क्रीनचे या दगडफेकीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच चित्रपटगृहात होणारा अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या "द लास्ट लियर' या चित्रपटाचा प्रीमियर रद्द करण्यात आला.
"हम यूपीवाले है, हिंदीमेंही बात करेंगे; महाराष्ट्र के लोग हमे माफ करे' या खासदार जया बच्चन यांच्या मराठीद्वेषी विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलनाला सुरुवात केली. बच्चन कुटुंबीयांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा सज्जड इशारा दिल्यानंतरही जुहूच्या पीव्हीआर चित्रपटगृहात अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला "द लास्ट लियर' या चित्रपटाचा प्रीमियर होणार होता. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार तरुण या चित्रपटगृहाजवळ आले. त्यातील दोघे चित्रपटाचे तिकीट काढण्याच्या बहाण्याने तिकीट काऊंटरजवळ जाऊन उभे राहिले. दोघांनी सोबत आणलेले दगड चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात असलेल्या काचांवर, तसेच जाहिराती दर्शविणाऱ्या मोठ्या एलसीडी स्क्रीनवर भिरकावले. यानंतर तिकीट काऊंटरजवळ उभ्या असलेल्या अन्य दोघांनी सोबत आणलेल्या दांड्यांनी भिंतीवरील जाहिरातीच्या कार्टुनची तोडफोड करायला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या तोडफोडीनंतर चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली; मात्र हा प्रकार चित्रपटगृह व्यवस्थापनाच्या लक्षात येण्यापूर्वीच या चारही तरुणांनी तेथून पोबारा केला. या घटनेनंतर तेथे पोलिस दाखल झाले. दगडफेक करून चित्रपटगृहाचे नुकसान करणाऱ्या या चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती जुहूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक काथकाडे यांनी दिली. या दगडफेकीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या चित्रपटगृहाची पाहणी केली. दगडफेकीच्या घटनेनंतर या चित्रपटगृहात होणारा "द लास्ट लियर' चित्रपटाचा प्रीमियर रद्द झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
.......

नाही कोणाच्या बापाची

नाही कोणाच्या बापाची
मुंबई सर्व देशवासीयांची!

के. एल. प्रसाद ः कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही, हे शहर सर्व देशवासीयांचे आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी आवश्‍यक ते बळ वापरले जाईल, असे प्रतिपादन कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी चेंबूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
आरसीएफ पोलिस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देताना प्रसाद यांनी हे मत वक्तव्य केले. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा हातात घेणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रसाद यांनी या वेळी सांगितले. समाजवादी पक्षाच्या खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी केलेल्या मराठीविरोधी वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला. बच्चन कुटुंब महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत मनसेने आंदोलनाला सुरुवात केली. मनसेच्या आंदोलनामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये याकरिता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पोलिसांनी महिनाभरासाठी भाषणबंदी घातली आहे. आंदोलनाच्या काळात शहरातील वातावरण पुन्हा बिघडू नये यासाठी गेल्या तीन दिवसांत मनसेच्या दोन हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 26 ऑगस्टपासून तब्बल सहा हजार मनसे कार्यकर्त्यांवर अशा प्रकारची कारवाई झाल्याचेही ते या वेळी म्हणाले.
....

"होमगार्डस्‌'ना भत्तावाढीचा दिलासा

हेमंत गायकवाड : दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ः नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी पोलिसांसह अन्य संस्थांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात भाग घेणारे होमगार्डस्‌ तसे दुर्लक्षितच राहतात. पोलिसांएवढेच काम करूनही त्यांना दिवसाला नाममात्र 90 रुपये भत्त्यापोटी मिळत होते. आता मात्र त्यांच्या दैनिक भत्त्यात वाढ करण्यात आली असून, यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या महिन्यापासून ही वाढ लागू होत आहे. मुंबईसह आयुक्तालयांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या होमगार्डस्‌ना यापुढे दिवसाला 200 आणि ग्रामीण भागातील होमगार्डस्‌ना 175 रुपये भत्ता दिला जाणार आहे. भत्त्यात वाढ झाल्यामुळे पुन्हा या दलाकडे होमगार्डस्‌ आकर्षित होऊ लागतील, असा विश्‍वास बृहन्मुंबईचे समादेशक डॉ. हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
आपत्तीच्या वेळी पोलिस व अन्य संस्थांना मदतकार्य करणारी मानवसेवी संघटना म्हणून होमगार्डस्‌ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला ही संघटना वर्षातील 53 दिवस काम करीत असे. मात्र 2004 नंतर होमगार्डस्‌ वर्षभर पोलिसांच्या साथीने काम करू लागले. या संघटनेचे राज्यभरात 58 हजार आणि मुंबईत 3500 जवान आहेत. मुंबईवर नेहमीच दहशतवादाचे सावट असल्याने शहरातील प्रमुख ठिकाणांवरील सुरक्षा बंदोबस्तात होमगार्डस्‌ मोलाची भूमिका बजावताना दिसतात. दिवसाला दहा तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या या जवानांना अवघा 90 रुपये दैनिक भत्ता दिला जात होता. महागाई वाढत असूनही अनेक वर्षे जवानांच्या भत्त्यात वाढ झाली नव्हती. त्यामुळे कित्येक जवान दलाच्या कार्यक्रमांना फिरकत नसल्याचे चित्र होते. यंदाच्या गणेशोत्सव काळातही सुरक्षाव्यवस्था राखण्यासाठी आणि जनसमुदायावर नियंत्रण ठेवण्यासाठी होमगार्डस्‌चे कसेबसे 1650 जवान उपलब्ध झाले आहेत.
पोलिसांएवढेच काम करणाऱ्या या जवानांच्या भत्त्यात वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने यासंबंधीचा अध्यादेश 1 सप्टेंबरला काढला. दैनिक भत्त्यात झालेल्या वाढीनंतर या दलाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्‍वास डॉ. हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. या दलात केवळ राष्ट्रसेवेकरिता दाखल होणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. येत्या काळात या दलातील जवानांची संख्या 5,500 पर्यंत नेण्याचा मानसही गायकवाड यांनी व्यक्त केला.
-----------------------------
तीन महिन्यांनी मिळतो भत्ता...
होमगार्डस्‌च्या भत्त्यात वाढ झाली असली, तरी या जवानांना कामाचा मोबदला तीन महिन्यांनी मिळतो. राष्ट्रसेवा म्हणून या दलात जवान दाखल होत असले, तरी त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता हा भत्ता लवकर देण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील होमगार्डस्‌च्या भत्त्यासाठी यावर्षी दोन कोटी 83 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भत्त्यात झालेल्या वाढीनंतर हे अनुदान वाढविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-------------------------

बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी हे दहशतवादी कृत्य ठरणार

प्रस्ताव सादर ः फसव्या फोनमुळे सोळा हजार मनुष्यतास वाया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः "रेल्वेत बॉम्ब ठेवलाय वाचवू शकलात तर वाचवा' अथवा "अमुक एक स्थानक बॉम्बस्फोटांनी उडविले जाणार आहे'. मोबाईल किंवा पीसीओवरून अशा प्रकारच्या धमक्‍या देऊन सुरक्षा यंत्रणांची उडणारी त्रेधातिरपिट मूकपणे पाहणाऱ्या रिकामटेकड्यांमुळे गेल्या पन्नास दिवसांत पोलिस यंत्रणा आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या कामाचे तब्बल सोळा हजार तास वाया गेले आहेत. "टाइमपास' म्हणून केल्या जाणाऱ्या अशा फसव्या दूरध्वनींना आळा घालण्याकरिता यापुढे असे प्रकार दहशती कृत्याचा भाग म्हणून हाताळले जावेत, असा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बल केंद्रीय गृहखात्याला पाठविणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक बी. एस. सिद्धू यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर घातपात घडविण्यासंबंधी आलेल्या निनावी दूरध्वनीबाबत रेल्वे सुरक्षा बलाने 9 जुलै ते 28 ऑगस्टदरम्यान विशेष पाहणी केली. या पाहणीनुसार रेल्वे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षांना रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचे तेरा निनावी दूरध्वनी आले. या दूरध्वनींमुळे त्या त्या स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत तातडीने वाढ करण्यात आली. हे दूरध्वनी अफवांचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ते करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील बहुतांश दूरध्वनी मोबाईल फोनवरून करण्यात आले. मोबाईल कंपन्यांकडे मोबाईलधारकांच्या वास्तव्याचे खरे पत्ते उपलब्ध नसल्याने उरलेले आरोपी पोलिसांना पकडता आले नाहीत. फसवे दूरध्वनी करून पोलिस यंत्रणा व सामान्य नागरिकांत घबराट पसरविणारे हे आरोपी त्यांना अटक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटतात. निव्वळ वेळ वाया घालविण्यासाठी केले जाणारे अफवांचे दूरध्वनी यापुढे दहशतवादी कृत्याचा भाग म्हणून हाताळले जावेत व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी केंद्रीय गृहखात्याकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सिद्धू यांनी या वेळी सांगितले. या अफवांमुळे मुंबई, भुसावळ व नागपूर येथील 12 गाड्या रद्द करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
अफवांच्या या दूरध्वनींमुळे दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांच्या कार्यतत्परतेचा अभ्यास करता येतो. रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलांच्या सुरक्षिततेतील उणिवांच्या जोरावर घातपाताच्या योजना आखण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे संशयित हालचालींची तसेच रेल्वे स्थानकात ठेवलेल्या बेवारस वस्तूंची माहिती नागरिकांनी पोलिसांना तातडीने कळवावी; मात्र उगीचच दूरध्वनी करून संपूर्ण यंत्रणेची त्रेधा उडविण्यासाठी फसवे दूरध्वनी करणे बंद करावेत, असे आवाहनही सिद्धू यांनी या वेळी केले.

Friday, September 5, 2008

क्षुल्लक भांडणातून महिलेला
जिवंत जाळण्याचा प्रयत्न

महिलेचे कृत्य ः घाटकोपरच्या भरवस्तीत थरार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः बॉम्बस्फोटांसारख्या घटना किंवा नैसर्गिक आपत्तीत मुंबईकरांमधील माणूस एकमेकाच्या मदतीला धावून जातो, असे चित्र आपण नेहमीच पाहतो; पण भरवस्तीत 15-20 जणांच्या समोर कोणीतरी कुणाचा तरी जीव घेण्यासारखे निर्घृण कृत्य करीत असेल, तर हाच मुंबईकर कोषात शिरतो आणि "मौत का तमाशा' पाहतो. मुंबईकरांच्या याच "बघ्या'च्या वृत्तीमुळे आज घाटकोपर येथील अनिता शिवगण ही 35 वर्षीय महिला मृत्यूशी झुंज देत आहे. दुर्दैवाने अनितावर आधी चाकूचे वार करून नंतर तिला रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचे कृत्य करणारी महिलाच आहे.

घाटकोपर पश्‍चिमेकडील भटवाडीच्या पितामह रामजीनगर येथील त्रिमूर्ती गणेश चाळीत काल (ता. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिता दत्ताराम शिवगण ही चाळीसमोरील पायवाटेने जात असताना शेजारीच राहणाऱ्या आशा गायकवाड (वय 35) या महिलेला तिचा धक्का लागला. याचे पर्यवसान भांडणात झाले. या वेळी दोघींचे पती घरी नसल्याने हा वाद आणखी वाढला. काही क्षणातच दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर आशाने घरातून चाकू आणला आणि अनिताच्या डोक्‍यावर सपासप वार करायला सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता ती पुन्हा घरात गेली आणि रॉकेलचा डबा आणून अनिताच्या अंगावर रिकामा केला. हा सगळा प्रकार तिथे जमलेले 10-15 रहिवासी तटस्थपणे पाहत होते. नेहमीचेच भांडण असेल म्हणून कोणीही पुढे आले नाही. रागाने माथा फिरलेल्या आशाने कशाचाही विचार न करता कापडाचा पेटता बोळा अनिताच्या अंगावर टाकला. आशा भांडकुदळ असल्याने रहिवाशांनी सुरुवातीला या भांडणात हस्तक्षेप केला नाही; मात्र अनिताला आगीच्या ज्वाळांनी वेढल्यानंतर लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. काहींनी तातडीने घरातील ब्लॅंकेट आणून तिच्या अंगावर टाकून आग विझवायचा प्रयत्न केला. तोपर्यंत या आगीत अनिता पुरती होरपळून गेली. एका दक्ष नागरिकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आशा गायकवाडला ताब्यात घेतले आणि अनिताला रिक्षातून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तिच्या नवऱ्याला या घटनेची माहिती मिळताच तो तीन मुलांसह रुग्णालयात पोचला. अनिताला तीन मुले असून, आपल्या आईच्या काळजीने त्यांचा निरागस चेहरा कोमेजून गेला आहे. 95 टक्के भाजलेली अनिता राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
......................
(चौकट)

दहा वर्षांचे पूर्ववैमनस्य

शिवगण व गायकवाड कुटुंबीयांत गेल्या दहा वर्षांपासून वाद आहे. या वादातूनच या दोन्ही शेजाऱ्यांत अनेकदा हाणामाऱ्याही झाल्या आहेत. यापूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात असल्याने आशा गायकवाडने धक्का लागल्याचे खुसपट काढून नेहमीप्रमाणे अनितासोबत जोरजोरात भांडण करायला सुरुवात केली आणि निर्दयपणे अनितावर वार करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
.............................