Tuesday, December 30, 2008

वीस जिल्ह्यांतील पोलिसांच्या तुकड्या मुंबईत

थर्टी फर्स्ट ः कडेकोट बंदोबस्त; खासगी संस्थांचीही मदत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांच्या उसळणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेत समाजकंटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. थर्टी फर्स्टनिमित्त राज्य राखीव पोलिस दल, गृहरक्षक दल व खासगी संस्थांचे स्वयंसेवक यांच्यासह 20 जिल्ह्यांतील पोलिसांच्या तुकड्या मुंबई पोलिसांच्या मदतीकरिता येणार असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी दिली. हा पोलिस बंदोबस्त मोहरमपर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याने या कालावधीत मुंबईला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या घातपाती हल्ल्यांतून सावरलेला मुंबईकर थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला नववर्षाच्या स्वागतासाठी दर वर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याची शक्‍यता आहे. दर वर्षीचा अनुभव लक्षात घेता, यंदाही शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव, दादर, जुहू, मालाड, अक्‍सा बीच येथील समुद्रकिनारे, तसेच गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. 2006 आणि 2008 मध्ये नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला जमावाकडून तरुणींची छेडछाड करण्याच्या झालेल्या प्रकारानंतर गर्दीच्या ठिकाणी तरुणी, महिला व लहान मुलांकरिता विशेष व्यवस्था केली जाणार आहे. गर्दीचा गैरफायदा घेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी थेट गर्दीतच साध्या वेशातील पोलिस ठेवण्यात येणार आहेत. महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीमही या वेळी राबविण्यात येणार आहे.
समुद्रकिनारी फटाके फोडण्यासही बंदी घालण्यात आली असून, रात्री साडेबारा वाजेपर्यंतच सार्वजनिक ठिकाणी नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांना परवानगी देण्यात आल्याची माहिती प्रसाद यांनी यापुढे बोलताना दिली. पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस दल, कमांडो पथक व शीघ्र कृती दल, गृहरक्षक दल व खासगी संस्थांचे स्वयंसेवक तैनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांनी खास मुंबईच्या सुरक्षिततेसाठी 20 जिल्ह्यांतून पोलिस तुकड्या मागविल्याचेही त्यांनी सांगितले.
गेटवे ऑफ इंडियासारख्या ठिकाणी सायंकाळी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, सायंकाळनंतर खासगी बोटी, क्रूझ व जहाजाने समुद्रात पार्ट्यांसाठी जाणाऱ्यांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी क्‍लोजसर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. समुद्रकिनारे, तसेच गर्दीच्या ठिकाणी असलेला वीजपुरवठा रात्रभर सुरू ठेवण्यासंबंधी मुंबई महापालिकेला विनंती करण्यात आली आहे. नागरिकांनीदेखील गर्दीच्या ठिकाणी फिरताना आपले कान आणि डोळे उघडे ठेवून, प्रत्येक संशयास्पद व्यक्ती व हालचालींची माहिती पोलिसांना वेळीच द्यावी; जेणेकरून पोलिसांना तातडीने कारवाई करणे शक्‍य होईल, असे आवाहनही प्रसाद यांनी केले.

Monday, December 29, 2008

कसाबच्या ओळख परेडला 25 जणांची हजेरी

राकेश मारिया : सर्वसामान्य नागरिकांचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 28 ः मुंबई हल्लाप्रकरणी पोलिसांनी पकडलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याची आर्थर रोड तुरुंगात आज दुसऱ्या दिवशीही ओळख परेड घेण्यात आली. रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सामान्य मुंबईकरही या ओळख परेडमध्ये सहभागी झाले होते. कसाबच्या ओळख परेडची प्रक्रिया आज संपली. सुमारे 25 जण या ओळख परेडला हजर होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अतिरेकी महम्मद अजमल कसाब याची ओळख परेड घेण्यात आली. सध्या तीन गुन्ह्यांत अटकेत असलेल्या कसाबला हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर या तिघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्येप्रकरणी दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्थर रोड तुरुंगात कालपासून सुरू झालेल्या कसाबच्या ओळख परेडमध्ये 25 हून अधिक साक्षीदारांनी त्याची ओळख पटविली. 26 नोव्हेंबरला स्कोडा गाडीतून गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्या कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान यांच्याशी डी. बी. मार्ग पोलिसांची चकमक उडाली. या चकमकीत इस्माईल खान ठार झाला; तर कसाबला पोलिसांनी जिवंत पकडले. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्याचे कर्मचारीही काल या ओळख परेडला उपस्थित होते. याशिवाय स्कोडा गाडीचा मालक एस. आर. अरासा, पोलिस कॉन्स्टेबल अरुण जाधव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या गाडीचे चालक मारुती माधवराव फड यांनीदेखील कसाबला ओळखले.

आज सकाळी आर्थर रोड तुरुंगात रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळख परेडकरिता बोलावण्यात आले. आर्थर रोड तुरुंगात कसाबला कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. ओळख परेडमध्ये सहभागी होणाऱ्यांत मुंबई पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी, रेल्वे पोलिस, रेल्वे गार्ड, वृत्तपत्रांचे छायाचित्रकार व सामान्य नागरिक होते. कसाबची ओळख परेड आज सायंकाळी संपल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुन्हा ताब्यात घेतले.

Sunday, December 28, 2008

गुन्हे वार्षिकी - २००८

2008 मधील गुन्हेगारी जगतातील ठळक घडामोडी पुढील प्रमाणे -


- 6 जानेवारी 2008 -
देवनार येथे बौद्ध भिक्‍खू भदंत संघराज महाथेरो यांचा गूढ मृत्यू. एसआरए योजनेला केलेल्या विरोधामुळे त्यांची हत्या झाल्याची शंका व्यक्त झाल्याने या परिसरात दोन दिवस प्रचंड जनक्षोभ उसळला.या मृत्यूची सखोल चौकशीची मागणी करीत भदंत कश्‍यप या भिक्‍खुने 18 जानेवारीला गोवंडी येथे आत्महत्या केली.

-13 फेब्रुवारी 2008 -
विक्रोळी येथील एका कार्यक्रमात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक व जामिनावर सुटका. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनाही अटक व सुटका.

- 21 एप्रिल 2008 -
प्रभादेवी येथील विकसकाकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन आमदार अरुण गवळी याला गुन्हे शाखेकडून अटक. या प्रकरणात गवळी आणि त्याच्या सात गुंडांना मोक्का लावण्यात आला. मोक्काखाली अटक झालेला गवळी दुसरा आमदार आहे.

- 20 मे 2008 -
बालाजी टेलिफिल्म्सचा माजी क्रिएटिव्ह हेड नीरज ग्रोव्हर याच्या हत्येप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेत्री मारिआ सुसायराज आणि नौदलात लेफ्टनंट असलेला तिचा प्रियकर एमिल जेरॉम मॅथ्यू यांना अटक. 7 मे रोजी मालाड येथील घरात दोघांनी नीरजचा खून करून मृतदेह ठाणे ग्रामीण येथे नेऊन जाळून टाकला.

- 13 जून 2008 -
अलिबाग न्यायालयात सहा जणांसोबत तारखेला गेलेल्या मटकाकिंग सुरेश भगत याची अलिबाग-पेण मार्गावर अपघाती हत्या. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची पत्नी जया, मुलगा हितेश, गवळी टोळीचा सदस्य सुहास रोग्ये यांना अटक केली. या प्रकरणी जया व हितेश यांच्यावर मोक्‍का लावण्यात आला .

- 16 जून 2008 -
वाशीचे विष्णुदास भावे व ठाण्याच्या गडकरी रंगायतन ही नाट्यगृहे तसेच पनवेलच्या चित्रपटगृहात बॉम्ब ठेवण्याप्रकरणी सनातन संघटनेच्या चौघांना दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक .

- 20 ऑगस्ट 2008 -
मार्च-1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी करीमुल्ला खान याला अटक. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्‍वासू साथीदार असलेला करीमुल्लावर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस, तर सीबीआयचे पाच लाखांचे इनाम.

- 24 सप्टेंबर 2008 -
गेल्या तीन वर्षांपासून देशभरात झालेल्या बॉम्बस्फोटांत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक. या अतिरेक्‍यांच्या माहितीवरूनच 6 ऑक्‍टोबरला आणखी पंधरा अतिरेक्‍यांना पुणे,कर्नाटक, उत्तरप्रदेश येथून अटक. या अतिरेक्‍यांचा दिल्ली, बंगळुरु, अहमदाबाद, सुरत, हैदराबाद येथील बॉम्बस्फोटांतही सहभाग.

- 7 ऑक्‍टोबर 2008 -
जुहूच्या बॉम्बे 72 डिग्री पबमध्ये सुरू असलेल्या रेव्हपार्टीवर अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा. 231 तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालानुसार त्यातील 89 टक्के जणांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे उघडकीस. या प्रकरणी पंधरा जणांना अटक .

- 21 ऑक्‍टोबर 2008 -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परप्रांतीय व मराठी पाट्यांच्या मुद्‌द्‌यांवर छेडलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक. वांद्रे न्यायालयातून जामिनावर मुक्त झालेल्या ठाकरे यांना लगेचच कल्याण येथ रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तरभारतीय तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी अटक .

- 24 ऑक्‍टोबर 2008 -
मालेगाव येथे 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने सुरत आणि मध्यप्रदेश येथे छापे घालून अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित साध्वी प्रज्ञासिगं ठाकूर आणि तिच्या दोघा साथीदारांना अटक केली. तिच्या चौकशीनंतर या प्रकरणात एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली. यात लष्करात लेफ्टनंट कर्नलपदावर कार्यरत असलेला प्रसाद पुरोहित व कथित हिंदू धर्मगुरू दयानंद पांडे यांचाही समावेश आहे. या प्रकरणानंतर हिंदू दहशतवादाचा नवा चेहरा दहशतवाद विरोधी पथकाने उघडकीस आणला.

- 27 ऑक्‍टोबर 2008 -
अंधेरी ते कुर्ला दरम्यान धावणाऱ्या 332 क्रमांकाच्या बेस्ट बसमध्ये उत्तरप्रदेश येथून आलेला राहूलराज कुंदप्रसाद सिंग हा माथेफिरू तरुण पोलिस चकमकीत ठार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारायला आलेल्या या तरुणाच्या मृत्यूनंतर उत्तरप्रदेशातील सर्व पक्षीय नेत्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

- 26 नोव्हेंबर 2008 -
सागरी मार्गाने पाकिस्तानहून मुंबईत आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईत तब्बल तीन दिवस मृत्यूचे थैमान घातले. या हल्ल्यात अतिरेक्‍यांच्या या हल्ल्यात 173 मुंबईकरांचा बळी गेला. यात दहशतवाद विरोधी पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्यासह 16 पोलिस, एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन, हवालदार गजेंद्रसिंग व 22 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिस आणि एनएसजीच्या कमांडोनी 59 तास केलेल्या कारवाईत नऊ अतिरेक्‍यांचा खातमा केला, तर महम्मद अजमल आमीर कसाब या अतिरेक्‍याला पोलिसांनी जिवंत पकडले

मी, गेट वे ऑफ इंडिया!

- ज्ञानेश चव्हाण

मी गेट वे ऑफ इंडिया... भारताचं प्रवेशद्वार...! किती वर्षं झाली त्याला? पाऊणशे तर नक्कीच. तेव्हापासून या अरबी समुद्राचा खारा वारा पीत मी येथे स्तब्धस्थिर उभा आहे. नेमकं सांगायचं, तर 1911 च्या डिसेंबरमध्ये माझ्या उभारणीला सुरुवात झाली. निमित्त होतं इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या मुंबई भेटीचं. तेव्हापासून आजतागायत किती तरी गोष्टी माझ्या नजरेसमोर घडल्या. ज्यांनी माझी उभारणी केली, त्या ब्रिटिशांचं साम्राज्य लयाला गेलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी आपले अखेरचे भाषण माझ्या याच वास्तूत उभं राहून केलं होतं. आजही आठवते आहे, की भारत स्वतंत्र झाला आहे, या घोषणेने माझ्या दगडी भिंतीही आनंदाने शिरशिरल्या होत्या. आज याच स्वतंत्र सार्वभौम भारतातील मुंबापुरीच्या अस्मितेचं मी प्रतीक बनलो आहे. मुंबई. सतत धडधडणारी उद्यमनगरी, अर्थनगरी, मायानगरी मुंबई. येथील कितीतरी घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. माझ्या नजरेसमोरच तर ही नगरी आकाराला आली, मोठी झाली.
आणि म्हणूनच 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याने मी कधी नव्हे तो घायाळ झालो आहे, व्यथित झालो आहे. माझ्या डोळ्यांसमोर उभ्या असलेल्या हॉटेल ताजमध्ये त्या रात्री जे काही झाले ते न भूतो असेच होते. हॉटेलमध्ये शिरलेल्या अतिरेक्‍यांनी शेकडो नागरिकांना ओलीस धरून तब्बल तीन दिवस मृत्यूचे तांडव केले. खरे तर त्या रात्री त्या भ्याड हल्ल्याची सुरुवात येथूनच तर झाली. आताही त्याची याद मन सुन्न करून टाकते. ती रात्र तर मी कधीही विसरू शकणार नाही. एके 47 रायफलींचे, शक्तिशाली हातगोळ्यांचे आवाज
आजही कानात गुंजत आहेत. मी येथे असहाय उभा होतो आणि कानावर ते आवाज येत होते. अतिरेकी कारवायांच्या क्रूर बातम्या येत होत्या. पण त्याचबरोबर सीएसटी, कामा हॉस्पिटल, हॉटेल ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे, नरिमन हाऊस येथे भारतीय वीरांनी दाखविलेल्या बहादुुरीचे किस्सेही मला क्षणाक्षणाला कळत होते. याच ठिकाणी सामान्य नागरिकांसह पोलिस, नौदल आणि एनएसजीचे कमांडो धारातीर्थी पडल्याच्या बातम्या आल्यानंतर काही क्षण माझाही जीव कासावीस झाला होता. ताज हॉटेलमध्ये एनएसजीचा कमांडो मेजर उन्नीकृष्णन, राज्य राखीव पोलिस दलाचा जवान राहुल शिंदे यांनी दिलेले बलिदान तर माझ्या अगदी डोळ्यांसमोरचे. ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमध्ये अतिरेक्‍यांशी सुरू असलेले युद्ध 28 नोव्हेंबरच्या रात्री संपले. मात्र मी साक्षीदार असलेल्या हॉटेल ताजचा अतिरेक्‍यांसोबतचा लढा संपायला 29 नोव्हेंबरची सकाळ उजाडली. 59 तासांच्या थरारक लढ्याचा प्रत्येक क्षण न क्षण माझ्या पहाडी काळजावर कोरला गेला आहे. या संपूर्ण कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी जगभरातील प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी माझ्याच समोर असलेल्या मोकळ्या जागेचा ताबा घेतला होता. प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात साठवून ठेवण्याकरिता या प्रतिनिधींची चाललेली धडपड दिसत होतीच. भारताकडे वक्रदृष्टी दाखविणाऱ्या अतिरेक्‍यांना नेस्तनाबूत केल्याची घोषणा राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्ता यांनी केल्यानंतर मला जरासे हायसे वाटले, अगदी तसाच सुटकेचा श्‍वास या वृत्तप्रतिनिधींनी त्यावेळी सोडला होता. माझा परिसर या ठिकाणी सदैव वास्तव्य असलेल्या कबुतरांमुळेदेखील तितकाच प्रसिद्ध. अतिरेकींविरोधी कारवाई सुरू असताना शांतीचे दूत समजली जाणारी ही कबुतरे दिसली ती अगदी शेवटच्याच दिवशी. यावरून या कबुतरांची सजगता मला अधिक भावली. या संपूर्ण
अतिरेकी कारवाईत झालेले नुकसान कधी भरून न येणारे असेच होते. 178 हून अधिक मुंबईकरांच्या प्राणाच्या आहुतीने मुंबईवरचा आजवरचा सर्वांत मोठा हल्ला संपुष्टात आला.
अतिरेकी हल्ल्यानंतर मुंबईसह सबंध देशात जनसामान्यांचा उसळलेला जनक्षोभ महिनाभरानंतर आजही आठवतो. माझ्यासमोर असलेल्या विस्तीर्ण मोकळ्या जागेत 3 डिसेंबरला जमलेल्या हजारोंच्या उत्स्फूर्त जनसमुदायाने केलेल्या सरकारविरोधी घोषणा, बलिदान करणाऱ्यांच्या स्मृती जागविण्यासाठी त्यांनी लावलेल्या मेणबत्त्या पाहिल्यानंतर कृतकृत्य झालो. मुंबईकरांनी त्यांच्या भावनांना अशा प्रकारे वाट मोकळी करून दिली होती. अतिरेक्‍यांनी टार्गेट केलेले हॉटेल ताज आणि ट्रायडन्ट नव्याने 21 डिसेंबरला सुरू झाल्यानंतर मला झालेला आनंद गगनात मावत नव्हता. अतिरेकी कारवायांना माझ्या भारतीयांनी दिलेले हेच खरे चोख उत्तर होते. दुर्दम्य आत्मविश्‍वास आणि पराकोटीची जिद्द असलेल्यांचा हा प्रांत. इथले लोक मूठभर अतिरेक्‍यांच्या आक्रमणाने घाबरले तरच नवल. हा मुंबईच्या मराठी मातीचा गुणधर्म म्हटल्यास वावगे ठरू नये. हा सबंध परिसर तसा परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण. आता या ठिकाणी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्याही नेहमीप्रमाणेच वाढू लागली आहे. आज हॉटेल ट्रायडन्ट आणि हॉटेल ताजचा परिसर मला जणू येथे कधी काही झालेच नाही, असा नेहमीसारखाच दिसतोय. ही दोन्ही हॉटेल आता दिमाखात सुरू आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या हॉटेल ताजच्या अंतर्भागात दहशतवाद्यांनी केलेल्या घातपाताच्या खाणाखुणा आहेतही. मात्र त्या पुसण्याचे आणि पुन्हा अशा खाणाखुणा मुंबईच्या कोणत्याही वास्तूवर पडणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सुरू असलेला मुंबईकरांचा प्रयत्न पाहून मन सुखावते. मुंबई, बाई, हॅट्‌स ऑफ टु यू ऍण्ड युवर स्पिरिट!

Thursday, December 25, 2008

मुंबईकरांच्या स्पिरिटला सलाम..!

हसन गफूर : अतिरेकी हल्ल्याला महिना पूर्ण


ज्ञानेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.25 ः मुंबईवरील अतिरेकी हल्ला हे पाकिस्तानने देशावर केलेले आक्रमणच होते. अतिरेक्‍यांशी झुंज देताना साध्या पोलिस शिपायापासून सहपोलिस आयुक्तांपर्यंतच्या अधिकाऱ्यांनी बलिदान देऊन मुंबईला अतिरेक्‍यांपासून वाचविले. यात एनएसजी, नौदल, होमगार्ड, अग्निशमन दलाच्या जवानांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे. या हल्ल्यानंतर सामान्य मुंबईकरांत आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र मुंबईकरांमध्ये असलेल्या स्पिरिटमुळे हे शहर पुन्हा रुळावर यायला फार वेळ लागला नाही. मुंबईकरांच्या याच स्पिरिटला आपला सलाम..! या भावना व्यक्त केल्या आहेत मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याला उद्या (ता.26) एक महिना पूर्ण होत आहे. यानिमित्त शहरातील सुरक्षा व्यवस्थेच्या घेतलेल्या आढाव्याबाबत माहिती देताना पोलिस आयुक्त गफूर "सकाळ'शी बोलत होते. सामान्य मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव तत्पर असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पोलिस दलात करण्यात येत असलेल्या सुधारणांबाबत बोलताना गफूर यांनी, आधुनिकीकरणांतर्गत पोलिसांना एमपी-5, एमपी-15 सारखा अत्याधुनिक शस्त्रसाठा, बुलेटप्रूफ जॅकेट्‌ससह अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्याचे प्रशिक्षण देण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसांना निधी उपलब्ध होत आहे. शीघ्र कृती दल (क्‍यूआरटी) व कमांडो पथकांची क्षमता वाढविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. तब्बल तीन दिवस सबंध जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या या अतिरेकी हल्ल्यात अनेक सामान्य मुंबईकरांचे नाहक बळी गेले. मुंबईकरांत सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी ठिकठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील चारशेहून अधिक संवेदनशील ठिकाणांवर शस्त्रधारी पोलिस तैनात आहेत. महत्त्वाचे रस्ते, इमारती, चौक आदी ठिकाणी बनविलेल्या बंकर्समधून हे पोलिस सातत्याने पहारा ठेवून आहेत. शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून प्रमुख हॉटेल्स, लॉज या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. याशिवाय यापूर्वीच्या कटातील संशयितांना बोलावून त्यांच्या सध्याच्या कारवायांबाबत पोलिस त्यांची चौकशी करीत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

फोर्स-वन
राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी)च्या धर्तीवर मुंबई पोलिस दलाचे "फोर्स-वन' हे अतिरेकी कारवायांचा मुकाबला करण्यासाठी स्वतंत्र पथक सुरू होत आहे. मुंबई अथवा पुण्यात विमानतळानजीक या पथकाचा तळ ठेवला जाणार आहे. याशिवाय केंद्र सरकारने एनएसजीची एक तुकडीच मुंबईत ठेवण्याचे ठरविल्याने हे शहर येत्या काळात अशा प्रकारच्या कृत्यांना तोंड देण्यासाठी समर्थ असेल, असेही गफूर यांनी या वेळी सांगितले. सागरी मार्गाने आलेल्या अतिरेक्‍यांनी मुंबईत केलेल्या या घातपाती कारवायांनंतर सागरी सुरक्षिततेबाबत पोलिस अधिक दक्ष झाले आहेत. कमकुवत असलेली सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर पोलिसांचे प्राधान्य आहे. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ज्या ठिकाणी होड्या; तसेच लहान बोटी लागण्याकरिता जागा उपलब्ध आहे ती ठिकाणे पोलिसांनी शोधून काढली आहेत. पोलिस बोटींसह भाडेतत्त्वावर घेतलेल्या बोटींतून या समुद्रकिनाऱ्यावर गस्त सुरू आहे. या सर्व ठिकाणांवर 24 तास सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पोलिसांकडे वायरलेस सेटही दिले आहेत. समुद्रात होणाऱ्या संशयास्पद हालचाली पोलिस नियंत्रण कक्षासह नौदल आणि तटरक्षक दलालाही कळविण्याचे काम हे पोलिस करणार असल्याचे गफूर यांनी या वेळी सांगितले.

मुंबई पोलिसांना हॉंगकॉंग पोलिसांकडून धडे!

लढा दहशतवादाशी : अतिरेक्‍यांशी लढण्याचे प्रशिक्षण
ज्ञानेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 24 : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण; तसेच दहशतवाद्यांशी लढण्याचे अद्ययावत तंत्र अवगत नसल्याने मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीशी मुकाबला करता यावा याकरिता पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र चालविण्यासोबत अतिरेक्‍यांशी लढाई करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हॉंगकॉंग पोलिस दलातील काही निवृत्त अधिकारी; तसेच प्रशिक्षक मुंबई पोलिसांना मदत करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

मुंबईवर 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. अत्याधुनिक शस्त्रांच्या हाताळणीसह अत्युच्च दर्जाचे सैन्य प्रशिक्षण घेतलेल्या दहापैकी नऊ अतिरेक्‍यांना पोलिस, नौदल आणि राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) कमांडोंनी तब्बल 59 तास केलेल्या कारवाईनंतर यमसदनी धाडले, तर एका अतिरेक्‍याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईच्या वेळी मुंबई पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रे चालविण्याचे; तसेच अतिरेकी हल्ल्यामुळे निर्माण होणारी स्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण नसल्याने त्यांची तारांबळ उडाली. मुंबई नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर असल्याने भविष्यात अशी स्थिती उद्‌भवल्यास तेवढ्याच सक्षमतेने तोंड देण्यासाठी पोलिसांना सुसज्ज ठेवले जाणार आहे. अद्ययावत शस्त्रांसह युद्धस्थिती हाताळता यावी, अतिरेक्‍यांशी तेवढ्याच ताकदीने लढा देता यावा; तसेच अतिरेक्‍यांनी सामान्य नागरिकांना ओलिस ठेवल्यानंतर कोणते युद्धतंत्र वापरावे याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुंबईतील पोलिसांना हॉंगकॉंग पोलिसांची मदत मिळणार आहे. अतिरेक्‍यांशी लढण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले हॉंगकॉंग पोलिस दलातील निवृत्त अधिकारी व प्रशिक्षक येथील पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत येत आहेत. सुरुवातीच्या काळात 70 पोलिसांना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त गफूर यांनी दिली. सैन्य प्रशिक्षणासारख्याच असलेल्या या प्रशिक्षणामुळे सामान्य पोलिसांत दहशतवाद्यांशी तितक्‍याच ताकदीने मुकाबला करण्याची उमेद वाढणार आहे. यापूर्वी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांनी पोलिसांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला होता, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

दहशतवाद्यांचा मुंबई विमानतळावर हल्ला करण्याचाही कट

पाकिस्तानात आखणी ः फहीम अन्सारीची कबुली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 21 ः मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा मुंबई विमानतळावर हल्ला करण्याचाही कट होता; मात्र हा कट अंमलात आणणे अत्यंत जिकिरीचे असल्याने तो मागे पडल्याची धक्कादायक माहिती उत्तर प्रदेश टास्क फोर्सच्या कस्टडीतून मुंबईत आणलेल्या लष्कर-ए-तैयबाचा अतिरेकी फहीम अन्सारी याने त्याच्या चौकशीत दहशतवादविरोधी पथकाला दिली. मुंबईवरील हल्ल्यासंबंधीचा कट वर्षभरापूर्वीच पाकिस्तानमध्ये शिजल्याची कबुलीही त्याने दिल्याचे समजते.

26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील सहभागासंबंधी चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कस्टडीत असलेले अतिरेकी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांना पोलिसांनी मुंबईत आणले. मुंबई हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर चौकशी सुरू असताना फहीमने हा कट मार्च- 2007 मध्ये आखण्यात आल्याचे सांगितले. या वेळी तो पहिल्यांदा लष्कर-ए-तैयबाचा कमांडर आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकी उर रहमान लक्वी व युसूफ मुझम्मील यांना पहिल्यांदा भेटला होता. 26 नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या हिटलिस्टवर हॉटेल ताज आणि ओबेरॉय यांच्याशिवाय मुंबई विमानतळदेखील होते. विमानतळाचा रनवे तसेच परदेशी जाणाऱ्या विमानांना प्रामुख्याने लक्ष्य केले जाणार होते. त्यासाठी फहीमने पाहणीदेखील केली होती. मात्र विमानतळावरील हल्ल्याचा कट जिकिरीचा असल्याने तो फसल्याचेही फहीमने त्याच्या चौकशीत सांगितल्याचे समजते.
फेब्रुवारी महिन्यात रामपूरच्या सीआरपीएफच्या तळावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या फहीम अन्सारीकडून पोलिसांना मुंबईतील प्रमुख ठिकाणे, त्यांची छायाचित्रे व व्हिडीओ क्‍लिप्स; तसेच नकाशे मिळाले होते. यावेळी त्याच्या चौकशीत मुंबईवर हल्ल्याचा कट उघडकीस आला होता. लष्कर-ए-तैयबाचा कडवा अतिरेकी असलेल्या फहीमने लष्करच्या कमांडरना मुंबईसंबंधी पुरविलेल्या इथ्यंभूत माहितीमुळेच 26 नोव्हेंबरला हल्ला करताना अतिरेक्‍यांना कसलीच अडचण आली नाही. फहीम याने त्याच्याकडे असलेल्या महत्त्वपूर्ण माहितीची सीडी बनवून त्याचा साथीदार सबाऊद्दीन यांच्याकरवी ती लष्कर-ए-तैयबाला पुरविल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

कसाबकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यात एफबीआयला यश

नऊ तास चौकशी ः झाकी उर रहमानसह अन्य कमांडरची नावे उघड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 21 ः मुंबई हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याची अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) च्या पथकाने नऊ तास चौकशी केली. या चौकशीत मुंबई हल्ल्याच्या कटासंबंधी तसेच त्याला लष्कर ए तैयबाकडून मिळालेल्या प्रशिक्षणासंबंधीची माहिती एफबीआयच्या पथकाने मिळविल्याचे सांगण्यात येते.

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्‍यांच्या गोळीबारात ठार झालेल्यांत सहा अमेरिकी नागरिकांचा समावेश आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर या घटनेच्या चौकशीसाठी 1 डिसेंबरला एफबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. तीन आठवड्यांच्या तपासकार्यानंतर पहिल्यांदाच या पथकाला मोहम्मद अजमल कसाब याची चौकशी करण्याची संधी देण्यात आली. त्यानुसार एफबीआयच्या पथकाने त्याची तब्बल नऊ तास सतत चौकशी केली. पाकिस्तानातील उकारा येथे राहणाऱ्या कसाबसंबंधीची इत्यंभूत माहिती या पथकाने मिळविली. त्याच्या चौकशीच्या वेळी एफबीआयच्या पथकासोबत गुन्हे शाखेचे पोलिसदेखील उपस्थित होते. जिहादी प्रशिक्षण देणाऱ्या लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफीज महम्मद सईद, हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकी उर रहमान याच्यासह अन्य कमांडरची नावे कसाबने या पथकाला सांगितली. काश्‍मीर आणि भारताच्या अन्य भागात मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या सीडी दाखवून तसेच प्रक्षोभक भाषणे देऊन अतिरेकी कारवायांकरिता "लष्कर'च्या कमांडरनी त्याला कशा प्रकारे उद्युक्त केले याचीही माहिती त्याने दिली. या वेळी प्रशिक्षणाची ठिकाणे, प्रशिक्षण देणारे कमांडर तसेच त्यांच्या शरीरयष्टीचे वर्णन एफबीआयने नोंदवून घेतले. उपलब्ध माहितीवरून या पथकाने त्याला प्रशिक्षण देणाऱ्यांचे स्केचेसही काढल्याचे सांगण्यात येते.
मुंबई हल्ल्यासंबंधी अमेरिकी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अतिरेक्‍यांनी अमेरिकन नागरिकांचा छळ करून हत्या केली का, याचा एफबीआयचे पथक शोध घेत आहे. यापूर्वीच एफबीआयच्या पथकाने मृत अतिरेक्‍यांचे डीएनए नमुने तपासणीसाठी काढून घेतले आहेत. या हल्ल्यात वापरलेले हॅन्ड ग्रेनेड अफगाणिस्तान येथील अतिरेकी कारवाईत वापरलेल्या हॅन्ड ग्रेनेडशी मिळतेजुळते असल्याने त्याचा पुरवठा करणाऱ्याचाही शोध हे पथक घेत आहे.

फहीमकडून महत्त्वाची माहिती मिळणार

गुन्हे शाखा ः मुंबई अतिरेकी हल्ला प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 18 ः मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांना मुंबईची माहिती पुरविल्याच्या संशयावरून अटक केलेला अतिरेकी फहीम अन्सारी याच्याकडून या कटातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्‍यता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्तविली आहे. मूळचा मुंबईतील गोरेगाव येथील राहणारा फहीम अन्सारी लष्कर-ए-तैय्यबाचा कडवा अतिरेकी म्हणून ओळखला जातो. रामपूर येथे सीआरपीएफ कॅम्पवर गोळीबार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती लागलेल्या फहीमने त्यावेळी मुंबईवर अतिरेकी हल्ल्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या कस्टडीतून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या फहीम अन्सारी आणि सबाऊद्दीन अहमद यांना आज किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. 26 नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या लष्कर-ए- तैय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांना मुंबईची इथ्यंभूत माहिती फहीम अन्सारीने करून दिल्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांचा कयास आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने 10 फेब्रुवारी रोजी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून मुंबईतील प्रमुख ठिकाणांचे नकाशे, फोटो आणि व्हीडिओ क्‍लिप्स मिळाल्या होत्या. यात प्रमुख रस्ते, इमारती, हाजीअली, रेसकोर्स, महालक्ष्मी रेल्वेस्थानक, ब्रीचकॅन्डी, महालक्ष्मी मंदिर, अमेरिकन कौन्सुलेट, मुख्य न्यायाधीशांचे घर, राजभवन, जसलोक रुग्णालय, मंत्रालय, हॉटेल ताज, विधान भवन इमारत, गेटवे ऑफ इंडिया, सीएसटी रेल्वेस्थानक, पोलिस महासंचालक व आयुक्त कार्यालयाच्या इमारती, स्टॉक एक्‍स्चेंज यांचा समावेश होता. लष्कर-ए- तैय्यबासाठी काम करणाऱ्या फहीमने मुंबईशी संबंधित सर्व माहिती पाकिस्तानमध्ये बसणाऱ्या लष्करच्या कमांडरना पुरविल्याची शक्‍यता आहे. त्याच्या माहितीमुळेच मुंबईवर घातपाती हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांना मुंबईत घातपात करणे सोपे झाल्याचा अंदाज आहे.
लष्कर-ए-तैय्यबाच्या दहा अतिरेक्‍यांनी कराची, मुरीदके, लाहोर येथील ज्या ठिकाणी जिहादी प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी फहीम अन्सारी व त्याचा साथीदार सबाउद्दीन अहमद याचेही प्रशिक्षण झाले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात असतानाच फहीमने मुंबईवर अतिरेकी हल्ल्याचा कट रचल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी त्याच्याकडून मुंबईसंबंधी असलेली महत्त्वपूर्ण माहितीही हस्तगत केली होती. मुंबई हल्ल्यासाठी त्याला लष्कर-ए-तैय्यबाच्या कमांडोंनी सबाऊद्दीनच्या संपर्कात राहण्यास सांगितले होते. तोच मुंबईवरील हल्ल्यासाठी शस्त्र आणि माणसांची जमवाजमव करणार होता, अशी माहिती फहीमच्या चौकशीत उघड झाल्याचे गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली.

अजमल कसाबच्या प्रकृतीत बिघाड

पोलिसांची तारांबळ ः रक्तातील हिमोग्लोबिन कमी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 18 ः मुंबई हल्लाप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यात असलेला दहशतवादी मोहम्मद अमजल कसाब याची प्रकृती बिघडल्याचे वृत्त आहे. कसाबच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्‍टर पोलिस कोठडीत जात असल्याचे गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली. त्याच्या आजारपणामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांत मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
मुंबईवर 26 नोव्हेंबरला अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहा दहशतवाद्यांपैकी मोहम्मद अजमल कसाब हा एकमेव अतिरेकी पोलिसांच्या हाती आला आहे. पोलिसांच्या अटकेत असलेला कसाब सध्या पोलिस आयुक्त कार्यालयातच असलेल्या गुन्हे शाखेच्या कोठडीत आहे. पोलिसांना कसाबकडून 26 नोव्हेंबरचा कट आणि लष्कर-ए-तैयबाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. पाकिस्तानविरुद्ध आजवरचा सगळ्यात प्रबळ पुरावा म्हणून कसाबकडे पाहिले जात असल्याने त्याच्या सुरक्षिततेबाबत पोलिस कमालीचे दक्ष आहेत. कोठडीत त्याने आत्महत्येसारखा कोणताही अनुचित प्रकार करू नये, यासाठी त्याला उघडेच ठेवण्यात येते. गुन्हे शाखेचे पोलिस डोळ्यात तेल घालून चोवीस तास त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. अशातच कसाबच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्याने त्याची प्रकृती बिघडली; त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हिमोग्लोबिन कमी होण्यासोबतच त्याला रक्ताच्या उलट्या झाल्याचेही सांगण्यात येते. डॉक्‍टरांच्या एका पथकाने कोठडीत जाऊन त्याची वैद्यकीय चाचणी केली असून त्याला पौष्टिक जेवण आणि विटामिन्सच्या गोळ्या देण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. चांगल्या आहाराने त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास त्याला वेळप्रसंगी रुग्णालयातही दाखल करावे लागण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेविषयी अडचण निर्माण होणार असल्याने डॉक्‍टरांनी कोठडीतच त्याच्यावर उपचार करावेत, असेही सांगण्यात आल्याचे समजते. पोलिस कोठडीत कसाबची दर 24 तासांनी वैद्यकीय तपासणी केली जात असल्याची माहितीही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली.

Thursday, December 18, 2008

मृत अतिरेक्‍यांविरुद्ध ब्लॅक कॉर्नर नोटीस

मुंबई, ता. 17 ः मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह घेण्यास पाकिस्तानने नकार दर्शविल्याने मुंबई पोलिस या अतिरेक्‍यांविरुद्ध सीबीआयच्या मदतीने ब्लॅक कॉर्नर नोटीस काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
26 नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहापैकी नऊ अतिरेक्‍यांना पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि नौदलाच्या जवानांनी ठार मारले; तर मोहम्मद अजमल कसाब हा एकमेव अतिरेकी पोलिसांच्या हाती लागला. कसाबच्या चौकशीत हे अतिरेकी मूळचे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असल्याचे उघडकीस आले. मात्र पाकिस्तानने या अतिरेक्‍यांचा ताबा घेण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह दोन आठवड्यांहूनही अधिक काळ जे.जे. रुग्णालयात पडून आहेत. पाकिस्तानकडून या मृतदेहांबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने गुन्हे शाखेचे पोलिस या मृतदेहाबाबत ब्लॅक कॉर्नर नोटीस काढण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय)च्या मदतीने इंटरपोलला ही नोटीस दिली जाणार आहे. या नोटिशीनंतर जगभरातील देशांना या मृतदेहांच्या वारसाबद्दल तसेच त्यांच्या वास्तव्याबाबत विचारणा करणारे आवाहन करण्यात येते. मृत अतिरेक्‍यांच्या डीएनए नमुन्यांद्वारे त्यांच्या नातेवाइकांचाही शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. याशिवाय जतन केलेले अतिरेक्‍यांच्या रक्ताचे नमुने तसेच छायाचित्रे ठिकठिकाणी तपासणीसाठी पाठविली जातात. ठराविक कालावधीत या मृतदेहांवर कोणी दावा न सांगितल्यास त्यांची कायद्यातील तरतुदीप्रमाणे विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Wednesday, December 17, 2008

राज्यात "फोर्स वन' कमांडो पथक स्थापणार

सुरक्षा योजना ः गृहखात्यातील अधिकाऱ्याची माहिती

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 16 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या घटना पुन्हा राज्यात घडू नयेत यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी) च्या धर्तीवर "फोर्स वन' नावाचे सुरक्षा पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहखात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली.
26 नोव्हेंबरला मुंबईवर सागरी मार्गाने झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर गृहखात्याने राज्याच्या सुरक्षिततेसंबंधी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. या आढाव्यानंतर राज्य सरकारने अतिरेकी हल्ल्याला तोंड देण्यासाठी "फोर्स वन' हे कमांडो पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही मुंबईच्या सुरक्षिततेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत एनएसजीच्या धर्तीवर कमांडो पथक सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. लवकरच स्थापन होणाऱ्या या पथकात सुरुवातीच्या काळात 350 कमांडोंची नेमणूक केली जाणार असल्याचे हा अधिकारी म्हणाला.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच अतिरेक्‍यांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वीही मुंबईत घातपाती कारवाया झाल्या आहेत. अतिरेक्‍यांच्या या घातपाती कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अनेकदा समर्थ ठरत नाहीत. त्यामुळेच मुंबईसह राज्याच्या सुरक्षिततेसाठी स्थापन होणाऱ्या या पथकात पोलिसांसह प्रामुख्याने लष्कर, नौदल, सीआरपीएफ, सीआयएसएफ; तसेच शॉर्ट सर्व्हिस कमिशननुसार लष्करात दाखल होणाऱ्या जवानांचा समावेश केला जाणार आहे. या पथकाला एनएसजीच्या कमांडोंना देण्यात येणाऱ्या ट्रेनिंगसारखेच ट्रेनिंग दिले जाणार आहे. यात अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करण्यापासून अतिरेक्‍यांना नेस्तनाबूत करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पथकाचा तळ मुंबईत सांताक्रूझ येथील विमानतळानजीक ठेवण्यात येणार आहे. राज्यातील संवेदनशील ठिकाणी होणाऱ्या घातपाती कारवायांच्या वेळी हे पथक काही तासांतच घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करणार असल्याचेही या अधिकाऱ्याने "सकाळ'ला सांगितले.
------------------------

Monday, December 15, 2008

घोड्यांचा कोट्यधीश व्यापारी हसनअलीला अटक

बनावट पासपोर्ट ः दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याचा संशय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 15 ः पुण्यातील कोट्यधीश व घोड्यांचा व्यापारी हसनअली खान याला वरळी पोलिसांनी मुंबई व पाटणा येथून बनावट पासपोर्ट मिळविल्याप्रकरणी आज दुपारी अटक केली. भोईवाडा न्यायालयाने त्याला 19 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बनावट पासपोर्टच्या साह्याने जगभर फिरलेल्या हसनअलीच्या चौकशीत तो पाकिस्तान व दुबई येथेही गेल्याचे उघडकीस आले आहे. हवाला रॅकेटद्वारे कोट्यवधींचे व्यवहार करण्याचा संशय असलेल्या हसनअलीने दहशतवादी कारवायांना अर्थपुरवठा केला आहे का, ही बाब प्रामुख्याने तपासली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अशोक देशभ्रतार यांनी दिली.
वरळीच्या पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हसनअली याच्याविरुद्ध 30 जानेवारी 2008 रोजी वरळी पोलिस ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळविल्याची तक्रार दिली. मूळचा हैदराबादचा राहणारा हसनअली गौसुद्दीन खान (वय 58) याने स्वतःच्या नावावर तीन पासपोर्ट घेतले आहेत. हैदराबाद येथून 1986 मध्ये खरे नाव व पत्त्यावर त्याने पासपोर्ट मिळविला. त्यानंतर त्याने पाटणा येथून 1997 मध्ये, तर मुंबईतून 1998 मध्ये बोगस पत्त्यांवर पासपोर्ट मिळविले. या पासपोर्टच्या आधारे तो लंडन, कॅनडा, स्वित्झर्लंड, पाकिस्तान व दुबई येथे प्रवास केला आहे. वरळीच्या पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हसनअलीने बोगस कागदपत्रे पासपोर्ट मिळविल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारही दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली; मात्र वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत फिरत होता.
पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील आलिशान बंगल्यात राहणारा हसनअली पोलिस त्याच्या मागावर असल्याचे कळताच एका खासगी फार्महाऊसमध्ये लपून बसला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या आदेशाने फरारी म्हणून घोषित केले. पोलिस त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्याच्याही तयारीत होते. न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी हसनअली तीन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात आला होता; मात्र न्यायालयाने त्याला भोईवाडा न्यायालयात जाण्यास सांगितले. आज तो भोईवाडा न्यायालयात येताच तेथे उपस्थित असलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर त्याला भोईवाडा न्यायालयात हजर केल्यानंतर 19 डिंसेबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याची पत्नी रिमा (वय 28) व मेव्हणा फैजल अब्बास (48) यांच्याविरुद्धही हसनअलीला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे; मात्र त्यांनी या प्रकरणी आधीच जामीन मिळविल्याने त्यांच्यावर कारवाई केली नसल्याचे पोलिस उपायुक्त अशोक देशभ्रतार यांनी सांगितले. यापूर्वी हसनअली याच्या घरावर केंद्र सरकारच्या अभियान महासंचालनालयाच्या (एन्फोर्समेंट डायरेक्‍टोरेट) पथकाने छापा घातला होता. पोलिसांनी त्याच्याकडून बनावट कागदपत्रांच्या साह्याने मिळविलेले पासपोर्ट मागितले आहेत; मात्र आपण मुंबई व पाटणा येथून कोणताही पासपोर्ट मिळविला नसल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

कोण हा हसनअली?मुंबई व पुण्यात घोड्यांच्या शर्यती लावून कोट्यवधींचा नफा कमविणारा हसनअली "डर्बी किंग' म्हणून ओळखला जातो. पुण्यातील बड्या असामींपैकी एक असणाऱ्या हसनअलीकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. इम्पोर्टेड कारचा शौकीन असलेल्या हसनअलीची हैदराबाद येथील बंजारा हिल्स येथेही कोट्यवधींची मालमत्ता आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून बंजारा हिल्स येथे असलेल्या त्याच्या बंगल्यावर दुसऱ्याचीच मालकी असल्याचे बोलले जाते. मुंबईत पेडर रोड येथे त्याची पत्नी आणि मेव्हण्याच्या नावावर घर असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
----------------------

फहीम अन्सारी पोलिसांच्या ताब्यात

दहशतवादी हल्ला ः आज मुंबईमध्ये आणणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 14 ः मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांचे "लष्कर- ए- तैयबा'शी असलेले संबंध तपासण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फहीम अन्सारी याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता.15) मुंबईत आणण्यात येणार आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईवर हल्लाप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याच्या चौकशीत "लष्कर- ए- तैयबा' च्या पाकिस्तानमधील प्रशिक्षण केंद्राचे पत्ते मिळाले आहेत. या दहशतवाद्यांना कराची, मुझफ्फराबाद, मुदरीके; तसेच पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. याच ठिकाणी फहीम अन्सारीनेही प्रशिक्षण घेतल्याचे यापूर्वीच तपासात स्पष्ट झाले आहे. फहीम आणि मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्करचा संस्थापक हाफिज सईद,अबू हामजा, काफा यांनी जिहादी प्रशिक्षण देण्यास मदत केली. फहीमकडून या कटासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्‍यता वर्तविली आहे.
फहीम अन्सारी याला रामपूर येथील सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने फेब्रुवारीमध्ये अटक केली. या वेळी पोलिसांना त्याच्याकडे मुंबईचा नकाशा, मुंबईतील प्रमुख ठिकाणांची छायाचित्रे आणि व्हिडीओ शूटिंग मिळाले होते. चौकशीअंती त्याने मुंबईतील प्रमुख ठिकाणांची पाहणीही केल्याचे उघड झाले होते.
मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना त्यानेच मुंबईची इथ्यंभूत माहिती दिल्याचा गुन्हे शाखेच्या पोलिसांचा संशय आहे. त्याचा या दहशतवाद्यांशी असलेला संबंध तपासण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याची कस्टडी मागितली होती. त्यानुसार आज रामपूर न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे त्याचा ताबा दिला आहे.

इन्फोबॉक्‍स
फहीम अन्सारी कोण आहे?
- फहीम अर्शद अन्सारी ऊर्फ साहील पावसकर ऊर्फ समीर शेख ऊर्फ अबू झरार (35)
- मूळचा गोरेगाव पश्‍चिमेला असलेल्या मोतीलाल नगरमध्ये राहणारा.
- गोरेगाव येथे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय.
- मालाडच्या महापालिका शाळेत दहावीपर्यंत शिक्षण.
- जून 2005 मध्ये अल बिलाद प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीनिमित्ताने पहिल्यांदा दुबईला गेला.
- अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन त्याचा आदर्श.
- अब्दुल्ला समीर अहमद नावाच्या "लष्कर- ए- तैयबा'च्या कमांडरसोबत ऑक्‍टोबर-2005 मध्ये पहिल्यांदा भेट.
- अब्दुल्लाच्याच चिथावणीवरून "लष्कर- ए- तैयबा'साठी कामाला सुरुवात.
- "लष्कर- ए- तैयबा'चा कडवा अतिरेकी म्हणून नंतरच्या काळात ओळख.त्याच्याच चौकशीत मुंबईवर अतिरेकी हल्ल्याचा कट उघडकीस आला होता.

Sunday, December 14, 2008

ठार झालेल्या अतिरेक्‍यांच्या डीएनए नमुन्यांचा अभ्यास

एफबीआयचा तपास ः अन्य कारवायांतील सहभागाचा शोध घेणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 14 ः मुंबईवर हल्ल्यात ठार झालेल्या नऊ अतिरेक्‍यांचा अफगाणिस्तान व अन्य ठिकाणच्या दहशतवादी कारवायांत सहभाग आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी एफबीआय आणि पाश्‍चिमात्य तपासयंत्रणांनी मृतदेहांचे डीएनएचे नमुने अभ्यासासाठी काढून घेतल्याचे वृत्त आहे. मुंबईवर हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली स्फोटके अफगाणिस्तान येथील हल्ल्यांत वापरलेल्या स्फोटकांशी मिळतीजुळती असल्याचे सांगण्यात येते. मात्र याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.

26 नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या दहा अतिरेक्‍यांपैकी नऊ जणांचा पोलिस आणि एनएसजी कमांडोंनी खातमा केला. या अतिरेक्‍यांच्या मृतदेहांवर पाकिस्तानने अद्याप दावा न केल्याने हे मृतदेह अद्याप जे.जे. रुग्णालयात पडून आहेत. या हल्ल्यात बावीस परदेशी नागरिक मारले गेल्याने या हल्ल्याच्या तपासासाठी एफबीआयसह परदेशातील तपास पथके मुंबईत आले आहेत. अफगाणिस्तान व अन्य देशातील घातपाती कारवायांत या अतिरेक्‍यांचा सहभाग नाकारता येत नाही. त्यामुळे एफबीआय आणि पश्‍चिमात्य देशांच्या तपासयंत्रणांनी या अतिरेक्‍यांच्या मृतदेहांचे डीएनए नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या तपासयंत्रणा त्यांच्याकडील डाटा बॅंकमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या डीएनए नमुन्यांशी मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्‍यांचे डीएनए जुळवून पाहणार आहेत. या हल्ल्यामागे असलेल्या लष्कर-ए-तैयबाने दक्षिण अफगाणिस्तानमध्ये तालिबानी अतिरेक्‍यांनी घडविलेल्या दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी देखील अतिरेकी पाठविले होते. त्या वेळी या अतिरेक्‍यांनी खोस्त येथे त्यांचे तळ उभारल्याचेही स्पष्ट झाले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत मारले गेलेले अतिरेकी अथवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या अन्य कोणी तालिबानी दहशतवादी संघटनेसाठी काम करीत आहे का याचीही चाचपणी तपासयंत्रणा करणार आहेत.

अमेरिकेतील एफबीआय, लंडन येथील स्कॉटलंड यार्ड पोलिस यांच्यासह पश्‍चिमात्य देशांतील तपासयंत्रणा आणि त्यांचे फॉरेन्सिक सायन्स तज्ज्ञही मुंबई पोलिसांना तपासासाठी सहकार्य करीत आहेत. मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेली स्फोटके अफगाणिस्तान येथे तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या अतिरेकी कारवायांत वापरलेल्या स्फोटकांशी मिळतीजुळती असल्याचे समजते.
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत तळ ठोकून असलेले एफबीआयचे पोलिस मुंबई हल्ल्यात अतिरेक्‍यांनी अमेरिकी नागरिकावर अत्याचार अथवा छळ करून त्यांचा खून केला आहे का, याचा देखील शोध घेत आहेत. अतिरेक्‍यांनी हल्ल्याच्या वेळी वापरलेल्या व्हीओआयपी फोनप्रकरणी एफबीआय अतिरेक्‍यांवर अमेरिकेतील कोड ऑफ इंटरनेट टेलिफोन या कायद्यानुसार गुन्हा दाखल करणार आहे. त्यासाठी त्यांनी पोलिसांनी पकडलेला एकमेव जिवंत अतिरेकी महम्मद अजमल कसाब याचा कबुलीजबाब मुंबई पोलिसांकडे मागितले आहे.

Thursday, December 11, 2008

मुंबई हल्ल्यातील हॅण्डग्रेनेड ऑस्ट्रियाच्या "अर्जेस' कंपनीचे

पोलिसांची विचारणा ः दाऊदच्या सहभागाची दाट शक्‍यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आलेले हॅण्डग्रेनेड ऑस्ट्रियाच्या कंपनीत तयार झाले असून याच कंपनीचे हॅण्डग्रेनेड मार्च 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या वेळीही वापरण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहभाग असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या हॅण्डग्रेनेडची निर्मिती करणाऱ्या या कंपनीने पाकिस्तानमध्ये कोणाला हॅण्डग्रेनेड पुरविला, अशी विचारणा करणारे पत्र मुंबई पोलिसांनी ऑस्ट्रियातील कंपनीला पाठविल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबईवर झालेल्या घातपाती हल्ल्यात हॅण्डग्रेनेडचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. अतिरेक्‍यांनी वापरलेले हे हॅण्डग्रेनेड ऑस्ट्रियाच्या अर्जेस कंपनीत तयार करण्यात आले होते. याच कंपनीचे हॅण्डग्रेनेड मार्च-1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या वेळीही वापरण्यात आले. या कंपनीची फ्रॅन्चायजी पाकिस्तानमध्ये असल्याने त्यांचा वारंवार वापर झाल्याची शक्‍यताही या अधिकाऱ्याने वर्तविली. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड समजला जाणारा झाकी उर रहमान लक्वी, काफा, लष्कर ए तैय्यबाचा संस्थापक हाफिज सईद आणि अबू हामजा यांचा या हल्ल्यात आतापर्यंत सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यांनीच या अतिरेक्‍यांना प्रशिक्षण दिल्याचे तसेच त्यांना भडकावण्याचे काम केले.

भारताने पाकिस्तानकडे मागणी केलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह वीस मोस्ट वॉन्टेड अतिरेक्‍यांच्या या हल्ल्यातील सहभागासंबंधी केंद्रीय स्तरावरील गुप्तचर यंत्रणा तपास करीत आहेत. मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांना पाकिस्तानमध्ये ज्या ट्रेनिंग कॅम्पवर प्रशिक्षण मिळाले त्याच ठिकाणी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने अटक केलेले अतिरेकी फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन शेख यांचेही प्रशिक्षण झाले होते. रामपूर येथे सीआरपीएफच्या तळावर हल्ला करणाऱ्या या अतिरेक्‍यांकडून हॉटेल ताज आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच मुंबईचा नकाशा मिळाला होता. फहीम याच्याकडून पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्‍यता असल्याने दोघांना उद्या मुंबई पोलिस रामपूर येथून कस्टडीत घेणार आहेत. मुंबईवरील हल्ल्याच्या तयारीत असलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत लष्कर ए तैय्यबाचे नाव पुढे आले होते. कसाब याच्या चौकशीतही लष्कर ए तैय्यबाचे नाव आल्यामुळे या दोन्ही संघटनांमध्ये असलेले संबंध तपासण्यात येत असल्याचेही हा अधिकारी म्हणाला

कसाबच्या पोलिस कोठडीत वाढ

कोठडीतच सुनावणी ः 12 गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः पोलिसांकडून आपल्याला कोठडीत मारहाण होत नाही. त्यांच्याविरुद्ध काहीही आरोप नाहीत. वेळोवेळी वैद्यकीय तपासणीही होते, असे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी महम्मद अजमल कसाब याने मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितले. कसाब याच्या पोलिस कोठडीत 24 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईवरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला महंमद अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी आहे. डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात त्याविरुद्ध नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्याला मिळालेली पोलिस कोठडी आज संपल्याने त्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे करण्यात आले. कसाब याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी न्यायाधीशांनाच गुन्हे शाखेच्या कार्यालयात येऊन कसाबची सुनावणी घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन न्यायाधीश एस. एम. श्रीमंगले यांनी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत असलेल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात कसाब याची सुनावणी घेतली. 40 मिनिटे चाललेल्या या सुनावणीनंतर न्यायाधीशांनी कसाब याला 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. कामा रुग्णालयाजवळ कसाब आणि त्याचा साथीदार अतिरेकी इस्माईल खान याने दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे व पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी कसाब याची पोलिस कोठडी मिळाल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अतिरेक्‍यांना स्थानिकांकडून मिळालेली संभाव्य मदत, तसेच त्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांचा शोध लावण्यासाठी कस्टडी वाढवून मिळावी, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली. कसाब याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, गाडीचोरी, देशविघातक कृत्ये, शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यासारखे 12 गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी लवकरच विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात येणार आहे. अतिरेकी कसाब याला घटनेनुसार कायदेविषयक सहाय्य देण्यासंबंधी येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल. आवश्‍यकता भासल्यास कसाबची नार्को चाचणी केली जाईल.

-------------------------------

26 नोव्हेंबरच्या हल्ल्यातील अतिरेक्‍यांची नावे जाहीर

बोगस ओळखपत्रे ः सीमकार्ड पुरविणाऱ्या शालविक्रेत्याचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांची छायाचित्रे आणि खरी नावे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज जाहीर केली. हॉटेल ताजमध्ये शिरलेल्या एका अतिरेक्‍याचा संपूर्ण चेहरा जळाल्याने त्याचे छायाचित्र उपलब्ध होऊ शकले नाही. पाकिस्तानमध्ये बसलेल्या "लष्कर ए तैय्यबा'च्या कमांडरसोबत संपर्क साधण्याकरिता अतिरेक्‍यांनी वापरलेले 9 मोबाईल, 4 जीपीएस सिस्टिम आणि 1 सॅटफोन पोलिसांनी हस्तगत केला असून मोबाईलसाठी सीमकार्ड पुरविणाऱ्या एका काश्‍मिरी शालविक्रेत्याचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

26 नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेल्या अतिरेक्‍यांनी ओळख लपविण्यासाठी स्वतःचे खरे छायाचित्र असलेली बोगस ओळखपत्रे बनविली. पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि नौदलाच्या कमांडोंनी केलेल्या कारवाईत मारल्या गेलेल्या या अतिरेक्‍यांची खरी नावे व छायाचित्रे आज सायंकाळी गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी जाहीर केली. जाहीर केलेल्या छायाचित्रांत हॉटेल ताजमध्ये मारला गेलेला अतिरेकी नझीर ऊर्फ अबू उमेर याचे छायाचित्र उपलब्ध झालेले नाही. लष्कर ए तैय्यबाच्या ट्रेनिंग कॅम्पवर या अतिरेक्‍यांना या हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकिर रहमान लक्वी याने नवीन नावे दिली होती. 20 ते 28 वयोगटाच्या या अतिरेक्‍यांना प्रशिक्षण काळात एकमेकांची खरी नावे माहीत नव्हती. 22 नोव्हेंबरला मुंबईवर हल्ला करण्यासाठी कराची येथून निघाल्यानंतर प्रवासात त्यांना एकमेकांची खरी नावे व हल्ल्याचे लक्ष्य सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी टर्मिनसलाच ओलिस ठेवून अनेक निष्पापांचे प्राण घेण्याच्या तयारीत असलेला महम्मद अजमल आणि त्याचा साथीदार इस्माईल खान यांच्या गोळीबाराला पोलिसांनी तेवढ्याच तत्परतेने प्रत्युत्तर दिल्याने त्यांनी तेथून पळ काढायला सुरुवात केली. या वेळी ते पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या कमांडरशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यासाठी सुरक्षित जागा शोधत होते, अशी माहितीही चौकशीत पुढे आली. या अतिरेक्‍यांना सीमकार्ड पुरविणाऱ्या काश्‍मिरी शालविक्रेत्याचा पोलिस शोध घेत असून त्याला हे सीमकार्ड कोलकत्ता येथील मुक्तार नावाच्या व्यक्तीने दिले होते. मुक्तारने हे सीमकार्ड तौसिफ रहमान नावाच्या व्यक्तीकडून मिळविले. अतिरेक्‍यांना उपलब्ध झालेल्या सीमकार्डच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पोलिस कोलकत्ता येथे गेल्याची माहिती सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या अतिरेक्‍यांपैकी अबू उमर, अबू उमेर आणि इस्माईल खान यांनी यापूर्वी लष्करच्या वेगवेगळ्या घातपाती कारवायांत सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

रामपूर येथील सीआरपीएफच्या तळावर गोळीबार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश टास्क फोर्सने अटक केलेल्या फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन या लष्कर ए तैय्यबाच्या दोघा अतिरेक्‍यांना मुंबई हल्ल्यातील अतिरेक्‍यांशी असलेल्या कथित संबंधाच्या चौकशीसाठी शुक्रवारी मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती मारिया यांनी दिली.

अतिरेक्‍यांची खरी नावे प्रशिक्षण काळातील बनावट नावे
हॉटेल ताज
1) हफिज अर्शद ( 23, रा.मुलतान, पंजाब ) - अब्दुल रहमान बडा
2) जावेद ( 22, ओकाडा ) - अबू अली
3) शोएब (20, रा. नारोवाल, सियालकोट) - सोहेब
4) नझिर (24, रा. फैसलाबाद ) - अबू उमेर

नरीमन हाऊस
1) नासिर ( 28, रा. फैसलाबाद ) - अबू उमर
2) बाबर इम्रान (25, रा. मुलतान) - अबू आकाशा

हॉटेल ओबेरॉय
1) अब्दुल रहमान (27, रा. अरफवाला, मुलतान रोड) - अब्दुल रहमान छोटा
2) फहादुल्ला (26, रा. दिपलपूर तालुका,ओकाडा) - अबू फहाद

छत्रपती शिवाजी टर्मिनस
1) महम्मद अमजल कसाब ( 21, रा.फरीदकोट ) - अबू मुजाहिद
2) इस्माईल खान (24, रा. डोरा इस्माईल खान) - अबू इस्माईल

Wednesday, December 10, 2008

महम्मद अजमल कसाबचा जबाब जसा च्या तसा ...!

मुंबई हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने पोलिसांपुढे दिलेला कबुली जबाब...!


" मी मोहम्मद अजमल अमिर कसाब (21), फरीदकोट, तालुका- दिपालपुर, जिल्हा- उकाडा ,सुबा पंजाब, पाकिस्तान येथे माझ्या जन्मापासून राहतो. सरकारी प्राथमिक विद्यालयात चौथीपर्यंत माझे शिक्षण झाले आहे. 2000 मध्ये शाळा सोडल्यानंतर मी लाहोर येथे राहणारा भाऊ अफजल याच्याकडे राहायला गेला. गल्ली क्रमांक-54,घर क्रमांक-12, मोहल्ला- तोहित आबाद, .यादगार मिनार जवळ ,लाहोर असा त्याच्या घराचा पत्ता आहे.2005 पर्यंत मी ठिकठिकाणी मजुरीचे काम केले.या काळात मी अनेकदा माझ्या मूळ गावी जात असे.2005 मध्ये वडिलांसोबत माझा वाद झाला. यामुळे मी घर सोडून लाहोरच्या अली हजवेरी दरबार या अन्नछत्रात दाखल झालो.याठिकाणी घर सोडून राहणारी बरीचशी मुले राहत होती.याठिकाणाहून मुलांना ठिकठिकाणी कामधंद्यासाठी पाठविण्यात येते. एके दिवशी साफीक नावाचा व्यक्ती याठिकाणी आला आणि तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला. मूळचा झेलमचा असणाऱ्या साफीकचा केटरिंगचा व्यवसाय होता.मी त्याच्याकडे रोजंदारीवर कामाला सुरवात केली.तो मला दिवसाला 120 रुपये द्यायचा.माझे काम पाहून त्याने काही दिवसांनी माझा पगार दिवसाला 200 रुपये केला.मी त्याच्याकडे 2007 पर्यंत काम केले. याच काळात मी मुझफ्फर लाल खान (22) या तरुणाच्या संपर्कात आलो. तो रोमिया गाव, तालुका व जिल्हा अटक, सरहद , पाकिस्तान येथील राहणारा आहे.आम्हाला चांगल्या प्रकारे पैसे मिळत नसल्याने आम्ही दोघांनी चोऱ्या आणि दरोडे टाकण्याचे ठरवून कॅटरींगचे काम सोडून दिले.
यानंतर आम्ही रावळपिंडी येथे गेलो.तेथील बंगश कॉलनीत आम्ही एक घर भाडेतत्त्वावर घेतले. याच परिसरात दरोडा घालण्यासाठी अफजलने एका श्रीमंत व्यक्तीचे घर शोधून ठेवले होते.आम्ही त्या घराचा संपूर्ण नकाशाही बनविला. दरोडा घालण्यासाठी आम्हाला रिव्हॉल्व्हरसारख्या शस्त्राची आवश्‍यकता होती. तेव्हा अफजलने त्याच्या गावी रिव्हॉल्व्हर मिळू शकेल असे सांगितले. मात्र या गावात नव्याने येणाऱ्यांची सातत्याने तपासणी केली जात असल्याने त्याच्या गावातून शस्त्र मिळविण्याचा नाद सोडून दिला. शस्त्राच्या शोधात असतानाच आम्ही बकरी ईदच्या दिवशी रावळपिंडीच्या रझाबाजारात गेलो. याठिकाणी लावण्यात आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या स्टॉलवर आम्ही शस्त्राबाबत विचारणा केली. स्टॉलवर असलेल्या माणसाने आम्हाला शस्त्र मिळण्याबाबत अनुकूलता दर्शविली. शस्त्र मिळाले तरी ते चालविता येणे आवश्‍यक होते.त्यामुळे आम्ही लष्कर ए तैय्यबा या संघटनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.स्टॉलवर केलेल्या चौकशीनंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी लष्कर ए तैय्यबाच्या कार्यालयात बोलावण्यात आले. याठिकाणी असलेल्या माणसाने आमची नावे पत्ते विचारली. कुटुंबीयांबाबतही विचारणा केली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्या कार्यालयात गेलो. यावेळी तेथे असलेल्या कालच्याच माणसाने आणखी एका माणसाची ओळख करून दिली. त्याने आम्हाला 200 रुपये आणि एक पावती दिली.यानंतर त्याने आम्हाला मुदरीके येथील मरकस तैय्यबा जवळ लष्कर ए तैय्यबाच्या सुरू असलेल्या ट्रेनिंग कॅम्पवर पाठविले. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही याठिकाणी बसने गेलो. गेटवर असलेल्या लोकांना आम्ही लष्करच्या माणसाने दिलेली पावती दाखविली. गेटवर असलेल्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या फॉर्मवर आमची पूर्ण माहिती लिहून घेतली आणि आम्हाला आत सोडण्यात आले. याठिकाणी आम्हाला सुरवातीला 21 दिवसांच्या ट्रेनिंग करिता निवडण्यात आले. या ट्रेनिंगचा " दौरा सफा ' असे म्हटले जाते. दुसऱ्या दिवसापासून आमचे ट्रेनिंग सुरू झाले. या काळातला आमचा दिनक्रम पुढील प्रमाणे होता-
सकाळी 4.10 वा.- उठणे आणि नमाज
8.00 वा.- नाश्‍ता
8.30 ते 10.00 वा.- मुफ्ती सय्यद नावाच्या व्यक्तीकडून हदीस आणि कुराणवर व्याख्यान
10.00 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 1.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा. - नमाज
2.00 ते 4.00 वा. - आराम
4.00 ते 6.00 - शारीरिक शिक्षण , खेळ ( प्रशिक्षक - फादुल्ला)
6.00 ते 8.00 वा.- नमाज आणि इतर कामे
8.00 ते 9.00 वा. - रात्रीचे जेवण
ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आमची निवड "दौरा आम' साठी करण्यात आली. ही ट्रेनिंग पण 21 दिवसांचीच होती. त्यासाठी आम्हाला एका गाडीत घालून बुट्टल गाव येथील मनसेरा येथे नेण्यात आले. याच ठिकाणी आम्हाला शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कालावधीतील आमचा दिनक्रम पुढील प्रमाणे.
4.15 ते 5.00 वा.- उठणे आणि नमाज
5.00 ते 6.00 वा.- शारीरिक शिक्षण ( प्रशिक्षक - अबू अनास)
8.00 वा- नाश्‍ता
8.30 ते 11.30 वा.- शस्त्र प्रशिक्षण ( प्रशिक्षक - अबू रहमान)
11.30 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 13.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा- नमाज
2.00 ते 4.00 वा.- आराम
4.00 ते 6.00 वा. - शारीरिक शिक्षण
6.00 ते 8.00 वा.- नमाज आणि अन्य कामे
8.00 ते 9.00 वा.- रात्रीचे जेवण


हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अत्याधुनिक शस्त्रांसबंधीचे ट्रेनिंग नंतर दिले जाईल असे सांगण्यात आले.त्यासाठी आम्हाला दोन महिने "खिदमत' करण्यास सांगण्यात आले. खिदमत म्हणजे ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले जाते तेथील लोकांची सेवा करणे होय. आम्ही तेथे दोन महिने खिदमत केली.
दोन महिन्यांनंतर मला माझ्या पालकांना भेटायला पाठविण्यात आले. एक म महिनाभर मी माझ्या पालकांसोबत राहिलो. यानंतर मी मुझ्झफ्फराबाद येथील शैवैनाला येथे असलेल्या लष्कर च्या कॅम्पमध्ये आधुनिक शस्त्रांच्या ट्रेनिंगसाठी दाखल झालो.याठिकाणी त्यांनी माझे फोटो काढून घेतले.आणि काही कागदपत्रे भरून घेतली.यानंतर आम्हाला चहलबंदी पहाडी येथे दौरा खास साठी नेण्यात आले. हे ट्रेनिंग तीन महिन्यांचे होते.या ट्रेनिंगमध्ये शारीरिक व्यायाम, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण, हातबॉम्ब टाकणे, रॉकेट लॉंचर आणि मॉर्टर चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण काळातला दिनक्रम पुढील प्रमाणे
सकाळी 4.15 ते 5.00 वा.- उठणे आणि नमाज
5.00 ते 6.00 वा.- शारीरिक शिक्षण ( प्रशिक्षक- अबू मविया)
8.00 वा- नाश्‍ता
8.30 ते 11.30 वा- शस्त्र प्रशिक्षण , फायरिंग प्रॅक्‍टिस, हातबॉम्ब, रॉकेट लॉंचर, मॉर्टर,ग्रीन- ओ, उझ्झी, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर चालविण्याचे प्रशिक्षण ( प्रशिक्षक- अबू माविया )
11.30 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 1.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा.- नमाज
2.00 ते 4.00 वा - शस्त्र प्रशिक्षण आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांसंबंधी व्याख्यान
4.00 ते 6.00 वा- शारीरिक शिक्षण
6.00 ते 8.00 वा. - नमाज आणि अन्य कामे
8.00 ते 9.00 वा- रात्रीचे जेवण

या प्रशिक्षणासाठी 32 जणांना निवडण्यात आले. यापैकी फक्त 16 जणांची निवड भारतावर समुद्र मार्गे हल्ला करण्याच्या एका गुप्त ऑपरेशनसाठी करण्यात आली. हे ऑपरेशन झाकी उर रहमान ऊर्फ चाचा करणार होता. गुप्त ऑपरेशन साठी निवडण्यात आलेल्या 16 पैकी 3 जण नंतर पळून गेले. उरलेल्या 13 जणांना चाचाने कापा नावाच्या व्यक्तीकडे पाठविले.त्याचा कॅम्प मुदरीके येथे ठेवण्यात आला याठिकाणी आम्हाला समुद्रात पोहणे आणि तेथील प्रतिकूल वातावरणात राहायला शिकविण्यात आले.त्यासाठी काही मच्छीमारांचा वापर करण्यात आला. अनुभव घेण्यासाठी आम्हाला लॉंचच्या साहाय्याने समुद्रात लांबच लांब फेरफटकाही मारण्यासाठी नेले जायचे.या प्रशिक्षण काळात आम्हाला भारतात मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या व्हिडिओ क्‍लिप्स सीडी दाखविल्या जात. हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावी सात दिवस जायला दिले.सात दिवस गावी राहिल्यानंतर मी पुन्हा मुझफ्फराबाद येथील लष्कर च्या कॅम्पमध्ये दाखल झालो. यावेळी सुरवातीपासून ट्रेनिंग घेतलेले 13 जण उपस्थित होते. झाकी उर रहमानच्या निर्देशांनुसार काफा याने आम्हाला पुन्हा मुदरीके येथे नेऊन समुद्रात पोहण्याचे तसेच तेथील वातावरणाशी एकरूप होण्यासंबंधीचे प्रशिक्षण पुन्हा एकवार दिले. हे प्रशिक्षण एक महिनाभर चालले. यावेळी आम्हाला भारतीय सुरक्षा यंत्रणांसह रॉ. बाबतही सांगण्यात आले. पोलिस अथवा सुरक्षा यंत्रणांना फसविण्याचेही प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. भारतात गेल्यानंतर पाकिस्तानमध्ये दूरध्वनी न करण्याचे सक्त निर्देशही आम्हाला देण्यात आले. या प्रशिक्षणाला उपस्थित असलेल्या लोकांची नावे पुढील प्रमाणे- मोहम्मद अजमल ऊर्फ अबू मुजाहिदीन , इस्माईल ऊर्फ अबू उमर, अबू अली, अबू आकाशा, अबू उमेर, अबू शोएब, अब्दुल रहमान (बडा),अब्दुल रहमान (छोटा) , अफादुल्ला आण
ि अबू उमर

सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर झाकी उर रहमान ऊर्फ चाचा याने आमच्यातील अंतिम दहा जणांची निवड मुंबईवरील हल्ल्यासाठी केली. 15 सप्टेंबर 2008 ला आमच्या प्रत्येकाच्या दोघा जणांच्या जोड्या बनविण्यात आल्या. मला इस्माईल खान जोडीदार देण्यात आला.माझ्या जोडीला देण्यात आलेल्या कोडवर्डचे नाव वीटीएस असे होते.यानंतर आम्हाला गुगलअर्थ वर मुंबईचा नकाशा दाखविण्यात आला. मुंबईतील काही प्रमुख ठिकाणे तसेच प्रवेश करण्याचे मार्गही सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सायंकाळच्या वेळी होणाऱ्या गर्दीचे व्हिडिओ क्‍लिपींगही यावेळी दाखविण्यात आले. आम्हाला सकाळी सात ते अकरा अथवा सायंकाळी सात ते अकरा यागर्दीच्या वेळांतच मुंबईवर हल्ला करण्याचे सांगण्यात आले. सीएसटीवर हल्ला केल्यानंतर तेथील प्रवाशांना ओलिस ठेवून त्यांना जवळच असलेल्या एखाद्या इमारतीत नेऊन सरकारकडून हव्या त्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या. त्यासाठी चाचा आम्हाला खासगी वृत्तवाहिनीचा दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक देणार होता. प्रसिद्धिमाध्यमांमार्फत सरकारपर्यंत चाचा सांगेल त्या मागण्या आम्ही पोचविणार असे सुरवातीला ठरले होते.हे ऑपरेशन 27 सप्टेंबरला होणार होते.मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे ऑपरेशन काही दिवस लांबविण्यात आले.आम्हाला कराचीलाच थांबविण्यात आले आणि आमचे स्पीड बोटीने समुद्रातून जाण्याचे प्रशिक्षण सुरू झाले. कराचीत आम्ही 23 नोव्हेंबर पर्यंत थांबलो. माझ्या जोडीशिवाय इतर चार जोड्या अबू अकाशा-अबू उमर, बडा अब्दुल रहमान-अबू अली,छोटा अब्दुल रहमान - अफादुल्ला आणि शोएब- अबू उमेर अशा होत्या.
23 नोव्हेंबरला आम्ही झाकी उर रहमान आणि कापा यांच्यासोबत कराचीचे अझीजाबाद सोडले. पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास समुद्रातून आमचा प्रवास एका लॉंच सुरू झाला. 22 ते 25 नॉटीकल माईल्स गेल्यानंतर आम्ही एका मोठ्या लॉंचमध्ये बसलो. एका तासाच्या सागरी प्रवासानंतर खोल समुद्रात आम्हाला अल हुसैनी या जहाजात बसविण्यात आले.यावेळी आम्हाला प्रत्येकाला 8 ग्रेनेड, 1 एके -47 रायफल, 200 काडतुसे, 2 मॅगझीन आणि संपर्क साधण्यासाठी प्रत्येकी 1 सेलफोन देण्यात आला. आम्ही सागरी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघालो. आम्ही भारताच्या सागरी हद्दीत शिरत असतानाच तेथे असलेली एक भारतीय बोट आम्ही हायजॅक केली. या बोटीतील खलाशांना अल हुसैनीत नेण्यात आले. तर एकाला बंदुकीचा धाक दाखवून मुंबईच्या दिशेने नेण्यास सांगितले. अल हुसैनीला मागे टाकत आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो.तीन दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही मुंबईच्या सागरी किनाऱ्याला लागलो.याठिकाणी इस्माईल आणि अफादुल्ला यांनी त्या भारतीय खलाशाला ( तांडेल) ठार मारून बोटीच्या इंजिन रूममध्ये टाकून दिले.यानंतर मिळालेल्या निर्देशांवरून आम्ही एका डिंगीतून बदवार पार्क जेट्टीवर पोचलो. बदवार पार्क येथे उतरल्यानंतर मी इस्माईल सोबत सीएसटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने टॅक्‍सीने निघालो. सीएसटीला पोचल्यानंतर मी आणि इस्माईल तेथील प्रसाधनगृहात गेलो आणि तेथे असलेल्या प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. अचानक एक गणवेशधारी पोलिस अधिकारी आमच्या समोर आला आणि त्याने आमच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरवात केली. आम्ही पण त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि हातबॉम्ब फेकला. यानंतर आम्ही रेल्वे स्थानकात गेलो आणि तेथे गोळीबार करायला सुरवात केली. गोळीबार करता करता आम्ही स्थानकाच्या बाहेर पडलो आणि टेरेस असलेली एखादी इमारत मिळतेय का ते शोधायला
सुरवात केली. मात्र आम्हाला तशी इमारत सापडत नव्हती. यानंतर आम्ही तेथून एका गल्लीत पळत गेलो.जवळच असलेल्या एका इमारतीत आम्ही शिरलो.इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आम्ही गेलो तेथे ओलिस ठेवण्यासाठी लोकांचा शोध घेऊ लागलो,नंतर ती इमारत एका रुग्णालयाची असल्याचे कळाले.आम्ही इमारतीतून खाली उतरू लागलो तोच तेथे आलेल्या पोलिसांनी आमच्यावर गोळीबार करायला सुरवात केली. आम्ही प्रत्युत्तरादाखल त्यांच्यावर गोळीबार केला तसेच हातबॉम्बही फेकले. कसेबसे रुग्णालयातून बाहेर पडलो तोच एक पोलिसांची गाडी आमच्या दिशेने येत असल्याचे आम्ही पाहिले.रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात आम्ही लपून बसलो. पोलिसांची गाडी पुढे निघून गेल्यानंतर मागून आलेली आणखी एक पोलिसांची गाडी आमच्या पुढ्यात येऊन थांबली. यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने आमच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी माझ्या हाताला लागली आणि माझी एके -47 रायफल खाली पडली.मी ती उचलण्यासाठी खाली वाकलो तोच दुसरी गोळी माझ्या हाताला लागली. यानंतर इस्माईलने पोलिसांच्या त्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. काही क्षणातच गाडीतून होणारा गोळीबार थांबला. आम्ही दोघेही या गाडीच्या दिशेने गेलो.तेथे पडलेले तीन मृतदेह आम्ही खाली टाकले आणि इस्माईलने गाडी सुरू केली. मी त्याच्या शेजारी बसलो होतो. आम्ही पुढे जात असताना काही पोलिस आम्हाला अडविण्याचा प्रयत्न करीत होते.यावेळी इस्माईलने त्यांच्यावर पुन्हा गोळ्या झाडल्या. आम्ही पुढे जात होतो अशातच रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या मैदानाजवळ आमच्या गाडीचा टायर पंचर झाला इस्माईल खाली उतरला आणि रस्त्याने येणारी एक कार त्याने थांबविली.बंदुकीच्या धाकाने कारमधील तीन महिलांना उतरविण्यात आले अन आम्ही या गाडीत बसलो.याचवेळी समुद्रकिनाऱ्याजवळ आमची गाडी पोलिसांकडून अडविण्यात आली. इ
स्माईलने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.त्यात काही पोलिस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबारात इस्माईल गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आम्हाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मी देखील जखमी होतो. शुद्धीवर आल्यावर इस्माईल पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे कळाले.तोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात असल्याची जाणीव मला झाली...'

महम्मद अजमल कसाबचा जबाब जसा च्या तसा ...!

मुंबई हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने पोलिसांपुढे दिलेला कबुली जबाब...!


" मी मोहम्मद अजमल अमिर कसाब (21), फरीदकोट, तालुका- दिपालपुर, जिल्हा- उकाडा ,सुबा पंजाब, पाकिस्तान येथे माझ्या जन्मापासून राहतो. सरकारी प्राथमिक विद्यालयात चौथीपर्यंत माझे शिक्षण झाले आहे. 2000 मध्ये शाळा सोडल्यानंतर मी लाहोर येथे राहणारा भाऊ अफजल याच्याकडे राहायला गेला. गल्ली क्रमांक-54,घर क्रमांक-12, मोहल्ला- तोहित आबाद, .यादगार मिनार जवळ ,लाहोर असा त्याच्या घराचा पत्ता आहे.2005 पर्यंत मी ठिकठिकाणी मजुरीचे काम केले.या काळात मी अनेकदा माझ्या मूळ गावी जात असे.2005 मध्ये वडिलांसोबत माझा वाद झाला. यामुळे मी घर सोडून लाहोरच्या अली हजवेरी दरबार या अन्नछत्रात दाखल झालो.याठिकाणी घर सोडून राहणारी बरीचशी मुले राहत होती.याठिकाणाहून मुलांना ठिकठिकाणी कामधंद्यासाठी पाठविण्यात येते. एके दिवशी साफीक नावाचा व्यक्ती याठिकाणी आला आणि तो मला त्याच्यासोबत घेऊन गेला. मूळचा झेलमचा असणाऱ्या साफीकचा केटरिंगचा व्यवसाय होता.मी त्याच्याकडे रोजंदारीवर कामाला सुरवात केली.तो मला दिवसाला 120 रुपये द्यायचा.माझे काम पाहून त्याने काही दिवसांनी माझा पगार दिवसाला 200 रुपये केला.मी त्याच्याकडे 2007 पर्यंत काम केले. याच काळात मी मुझफ्फर लाल खान (22) या तरुणाच्या संपर्कात आलो. तो रोमिया गाव, तालुका व जिल्हा अटक, सरहद , पाकिस्तान येथील राहणारा आहे.आम्हाला चांगल्या प्रकारे पैसे मिळत नसल्याने आम्ही दोघांनी चोऱ्या आणि दरोडे टाकण्याचे ठरवून कॅटरींगचे काम सोडून दिले.
यानंतर आम्ही रावळपिंडी येथे गेलो.तेथील बंगश कॉलनीत आम्ही एक घर भाडेतत्त्वावर घेतले. याच परिसरात दरोडा घालण्यासाठी अफजलने एका श्रीमंत व्यक्तीचे घर शोधून ठेवले होते.आम्ही त्या घराचा संपूर्ण नकाशाही बनविला. दरोडा घालण्यासाठी आम्हाला रिव्हॉल्व्हरसारख्या शस्त्राची आवश्‍यकता होती. तेव्हा अफजलने त्याच्या गावी रिव्हॉल्व्हर मिळू शकेल असे सांगितले. मात्र या गावात नव्याने येणाऱ्यांची सातत्याने तपासणी केली जात असल्याने त्याच्या गावातून शस्त्र मिळविण्याचा नाद सोडून दिला. शस्त्राच्या शोधात असतानाच आम्ही बकरी ईदच्या दिवशी रावळपिंडीच्या रझाबाजारात गेलो. याठिकाणी लावण्यात आलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या स्टॉलवर आम्ही शस्त्राबाबत विचारणा केली. स्टॉलवर असलेल्या माणसाने आम्हाला शस्त्र मिळण्याबाबत अनुकूलता दर्शविली. शस्त्र मिळाले तरी ते चालविता येणे आवश्‍यक होते.त्यामुळे आम्ही लष्कर ए तैय्यबा या संघटनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.स्टॉलवर केलेल्या चौकशीनंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी लष्कर ए तैय्यबाच्या कार्यालयात बोलावण्यात आले. याठिकाणी असलेल्या माणसाने आमची नावे पत्ते विचारली. कुटुंबीयांबाबतही विचारणा केली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा त्या कार्यालयात गेलो. यावेळी तेथे असलेल्या कालच्याच माणसाने आणखी एका माणसाची ओळख करून दिली. त्याने आम्हाला 200 रुपये आणि एक पावती दिली.यानंतर त्याने आम्हाला मुदरीके येथील मरकस तैय्यबा जवळ लष्कर ए तैय्यबाच्या सुरू असलेल्या ट्रेनिंग कॅम्पवर पाठविले. त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही याठिकाणी बसने गेलो. गेटवर असलेल्या लोकांना आम्ही लष्करच्या माणसाने दिलेली पावती दाखविली. गेटवर असलेल्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या फॉर्मवर आमची पूर्ण माहिती लिहून घेतली आणि आम्हाला आत सोडण्यात आले. याठिकाणी आम्हाला सुरवातीला 21 दिवसांच्या ट्रेनिंग करिता निवडण्यात आले. या ट्रेनिंगचा " दौरा सफा ' असे म्हटले जाते. दुसऱ्या दिवसापासून आमचे ट्रेनिंग सुरू झाले. या काळातला आमचा दिनक्रम पुढील प्रमाणे होता-
सकाळी 4.10 वा.- उठणे आणि नमाज
8.00 वा.- नाश्‍ता
8.30 ते 10.00 वा.- मुफ्ती सय्यद नावाच्या व्यक्तीकडून हदीस आणि कुराणवर व्याख्यान
10.00 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 1.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा. - नमाज
2.00 ते 4.00 वा. - आराम
4.00 ते 6.00 - शारीरिक शिक्षण , खेळ ( प्रशिक्षक - फादुल्ला)
6.00 ते 8.00 वा.- नमाज आणि इतर कामे
8.00 ते 9.00 वा. - रात्रीचे जेवण
ही ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आमची निवड "दौरा आम' साठी करण्यात आली. ही ट्रेनिंग पण 21 दिवसांचीच होती. त्यासाठी आम्हाला एका गाडीत घालून बुट्टल गाव येथील मनसेरा येथे नेण्यात आले. याच ठिकाणी आम्हाला शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कालावधीतील आमचा दिनक्रम पुढील प्रमाणे.
4.15 ते 5.00 वा.- उठणे आणि नमाज
5.00 ते 6.00 वा.- शारीरिक शिक्षण ( प्रशिक्षक - अबू अनास)
8.00 वा- नाश्‍ता
8.30 ते 11.30 वा.- शस्त्र प्रशिक्षण ( प्रशिक्षक - अबू रहमान)
11.30 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 13.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा- नमाज
2.00 ते 4.00 वा.- आराम
4.00 ते 6.00 वा. - शारीरिक शिक्षण
6.00 ते 8.00 वा.- नमाज आणि अन्य कामे
8.00 ते 9.00 वा.- रात्रीचे जेवण


हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अत्याधुनिक शस्त्रांसबंधीचे ट्रेनिंग नंतर दिले जाईल असे सांगण्यात आले.त्यासाठी आम्हाला दोन महिने "खिदमत' करण्यास सांगण्यात आले. खिदमत म्हणजे ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले जाते तेथील लोकांची सेवा करणे होय. आम्ही तेथे दोन महिने खिदमत केली.
दोन महिन्यांनंतर मला माझ्या पालकांना भेटायला पाठविण्यात आले. एक म महिनाभर मी माझ्या पालकांसोबत राहिलो. यानंतर मी मुझ्झफ्फराबाद येथील शैवैनाला येथे असलेल्या लष्कर च्या कॅम्पमध्ये आधुनिक शस्त्रांच्या ट्रेनिंगसाठी दाखल झालो.याठिकाणी त्यांनी माझे फोटो काढून घेतले.आणि काही कागदपत्रे भरून घेतली.यानंतर आम्हाला चहलबंदी पहाडी येथे दौरा खास साठी नेण्यात आले. हे ट्रेनिंग तीन महिन्यांचे होते.या ट्रेनिंगमध्ये शारीरिक व्यायाम, शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण, हातबॉम्ब टाकणे, रॉकेट लॉंचर आणि मॉर्टर चालविण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण काळातला दिनक्रम पुढील प्रमाणे
सकाळी 4.15 ते 5.00 वा.- उठणे आणि नमाज
5.00 ते 6.00 वा.- शारीरिक शिक्षण ( प्रशिक्षक- अबू मविया)
8.00 वा- नाश्‍ता
8.30 ते 11.30 वा- शस्त्र प्रशिक्षण , फायरिंग प्रॅक्‍टिस, हातबॉम्ब, रॉकेट लॉंचर, मॉर्टर,ग्रीन- ओ, उझ्झी, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर चालविण्याचे प्रशिक्षण ( प्रशिक्षक- अबू माविया )
11.30 ते 12.00 वा. - आराम
12.00 ते 1.00 वा.- जेवण
1.00 ते 2.00 वा.- नमाज
2.00 ते 4.00 वा - शस्त्र प्रशिक्षण आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांसंबंधी व्याख्यान
4.00 ते 6.00 वा- शारीरिक शिक्षण
6.00 ते 8.00 वा. - नमाज आणि अन्य कामे
8.00 ते 9.00 वा- रात्रीचे जेवण

या प्रशिक्षणासाठी 32 जणांना निवडण्यात आले. यापैकी फक्त 16 जणांची निवड भारतावर समुद्र मार्गे हल्ला करण्याच्या एका गुप्त ऑपरेशनसाठी करण्यात आली. हे ऑपरेशन झाकी उर रहमान ऊर्फ चाचा करणार होता. गुप्त ऑपरेशन साठी निवडण्यात आलेल्या 16 पैकी 3 जण नंतर पळून गेले. उरलेल्या 13 जणांना चाचाने कापा नावाच्या व्यक्तीकडे पाठविले.त्याचा कॅम्प मुदरीके येथे ठेवण्यात आला याठिकाणी आम्हाला समुद्रात पोहणे आणि तेथील प्रतिकूल वातावरणात राहायला शिकविण्यात आले.त्यासाठी काही मच्छीमारांचा वापर करण्यात आला. अनुभव घेण्यासाठी आम्हाला लॉंचच्या साहाय्याने समुद्रात लांबच लांब फेरफटकाही मारण्यासाठी नेले जायचे.या प्रशिक्षण काळात आम्हाला भारतात मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या व्हिडिओ क्‍लिप्स सीडी दाखविल्या जात. हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावी सात दिवस जायला दिले.सात दिवस गावी राहिल्यानंतर मी पुन्हा मुझफ्फराबाद येथील लष्कर च्या कॅम्पमध्ये दाखल झालो. यावेळी सुरवातीपासून ट्रेनिंग घेतलेले 13 जण उपस्थित होते. झाकी उर रहमानच्या निर्देशांनुसार काफा याने आम्हाला पुन्हा मुदरीके येथे नेऊन समुद्रात पोहण्याचे तसेच तेथील वातावरणाशी एकरूप होण्यासंबंधीचे प्रशिक्षण पुन्हा एकवार दिले. हे प्रशिक्षण एक महिनाभर चालले. यावेळी आम्हाला भारतीय सुरक्षा यंत्रणांसह रॉ. बाबतही सांगण्यात आले. पोलिस अथवा सुरक्षा यंत्रणांना फसविण्याचेही प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले. भारतात गेल्यानंतर पाकिस्तानमध्ये दूरध्वनी न करण्याचे सक्त निर्देशही आम्हाला देण्यात आले. या प्रशिक्षणाला उपस्थित असलेल्या लोकांची नावे पुढील प्रमाणे- मोहम्मद अजमल ऊर्फ अबू मुजाहिदीन , इस्माईल ऊर्फ अबू उमर, अबू अली, अबू आकाशा, अबू उमेर, अबू शोएब, अब्दुल रहमान (बडा),अब्दुल रहमान (छोटा) , अफादुल्ला आण
ि अबू उमर

सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर झाकी उर रहमान ऊर्फ चाचा याने आमच्यातील अंतिम दहा जणांची निवड मुंबईवरील हल्ल्यासाठी केली. 15 सप्टेंबर 2008 ला आमच्या प्रत्येकाच्या दोघा जणांच्या जोड्या बनविण्यात आल्या. मला इस्माईल खान जोडीदार देण्यात आला.माझ्या जोडीला देण्यात आलेल्या कोडवर्डचे नाव वीटीएस असे होते.यानंतर आम्हाला गुगलअर्थ वर मुंबईचा नकाशा दाखविण्यात आला. मुंबईतील काही प्रमुख ठिकाणे तसेच प्रवेश करण्याचे मार्गही सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सायंकाळच्या वेळी होणाऱ्या गर्दीचे व्हिडिओ क्‍लिपींगही यावेळी दाखविण्यात आले. आम्हाला सकाळी सात ते अकरा अथवा सायंकाळी सात ते अकरा यागर्दीच्या वेळांतच मुंबईवर हल्ला करण्याचे सांगण्यात आले. सीएसटीवर हल्ला केल्यानंतर तेथील प्रवाशांना ओलिस ठेवून त्यांना जवळच असलेल्या एखाद्या इमारतीत नेऊन सरकारकडून हव्या त्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या. त्यासाठी चाचा आम्हाला खासगी वृत्तवाहिनीचा दूरध्वनी अथवा मोबाईल क्रमांक देणार होता. प्रसिद्धिमाध्यमांमार्फत सरकारपर्यंत चाचा सांगेल त्या मागण्या आम्ही पोचविणार असे सुरवातीला ठरले होते.हे ऑपरेशन 27 सप्टेंबरला होणार होते.मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हे ऑपरेशन काही दिवस लांबविण्यात आले.आम्हाला कराचीलाच थांबविण्यात आले आणि आमचे स्पीड बोटीने समुद्रातून जाण्याचे प्रशिक्षण सुरू झाले. कराचीत आम्ही 23 नोव्हेंबर पर्यंत थांबलो. माझ्या जोडीशिवाय इतर चार जोड्या अबू अकाशा-अबू उमर, बडा अब्दुल रहमान-अबू अली,छोटा अब्दुल रहमान - अफादुल्ला आणि शोएब- अबू उमेर अशा होत्या.
23 नोव्हेंबरला आम्ही झाकी उर रहमान आणि कापा यांच्यासोबत कराचीचे अझीजाबाद सोडले. पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास समुद्रातून आमचा प्रवास एका लॉंच सुरू झाला. 22 ते 25 नॉटीकल माईल्स गेल्यानंतर आम्ही एका मोठ्या लॉंचमध्ये बसलो. एका तासाच्या सागरी प्रवासानंतर खोल समुद्रात आम्हाला अल हुसैनी या जहाजात बसविण्यात आले.यावेळी आम्हाला प्रत्येकाला 8 ग्रेनेड, 1 एके -47 रायफल, 200 काडतुसे, 2 मॅगझीन आणि संपर्क साधण्यासाठी प्रत्येकी 1 सेलफोन देण्यात आला. आम्ही सागरी मार्गाने मुंबईच्या दिशेने निघालो. आम्ही भारताच्या सागरी हद्दीत शिरत असतानाच तेथे असलेली एक भारतीय बोट आम्ही हायजॅक केली. या बोटीतील खलाशांना अल हुसैनीत नेण्यात आले. तर एकाला बंदुकीचा धाक दाखवून मुंबईच्या दिशेने नेण्यास सांगितले. अल हुसैनीला मागे टाकत आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो.तीन दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही मुंबईच्या सागरी किनाऱ्याला लागलो.याठिकाणी इस्माईल आणि अफादुल्ला यांनी त्या भारतीय खलाशाला ( तांडेल) ठार मारून बोटीच्या इंजिन रूममध्ये टाकून दिले.यानंतर मिळालेल्या निर्देशांवरून आम्ही एका डिंगीतून बदवार पार्क जेट्टीवर पोचलो. बदवार पार्क येथे उतरल्यानंतर मी इस्माईल सोबत सीएसटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने टॅक्‍सीने निघालो. सीएसटीला पोचल्यानंतर मी आणि इस्माईल तेथील प्रसाधनगृहात गेलो आणि तेथे असलेल्या प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. अचानक एक गणवेशधारी पोलिस अधिकारी आमच्या समोर आला आणि त्याने आमच्या दिशेने गोळ्या झाडायला सुरवात केली. आम्ही पण त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि हातबॉम्ब फेकला. यानंतर आम्ही रेल्वे स्थानकात गेलो आणि तेथे गोळीबार करायला सुरवात केली. गोळीबार करता करता आम्ही स्थानकाच्या बाहेर पडलो आणि टेरेस असलेली एखादी इमारत मिळतेय का ते शोधायला
सुरवात केली. मात्र आम्हाला तशी इमारत सापडत नव्हती. यानंतर आम्ही तेथून एका गल्लीत पळत गेलो.जवळच असलेल्या एका इमारतीत आम्ही शिरलो.इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आम्ही गेलो तेथे ओलिस ठेवण्यासाठी लोकांचा शोध घेऊ लागलो,नंतर ती इमारत एका रुग्णालयाची असल्याचे कळाले.आम्ही इमारतीतून खाली उतरू लागलो तोच तेथे आलेल्या पोलिसांनी आमच्यावर गोळीबार करायला सुरवात केली. आम्ही प्रत्युत्तरादाखल त्यांच्यावर गोळीबार केला तसेच हातबॉम्बही फेकले. कसेबसे रुग्णालयातून बाहेर पडलो तोच एक पोलिसांची गाडी आमच्या दिशेने येत असल्याचे आम्ही पाहिले.रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात आम्ही लपून बसलो. पोलिसांची गाडी पुढे निघून गेल्यानंतर मागून आलेली आणखी एक पोलिसांची गाडी आमच्या पुढ्यात येऊन थांबली. यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने आमच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी माझ्या हाताला लागली आणि माझी एके -47 रायफल खाली पडली.मी ती उचलण्यासाठी खाली वाकलो तोच दुसरी गोळी माझ्या हाताला लागली. यानंतर इस्माईलने पोलिसांच्या त्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. काही क्षणातच गाडीतून होणारा गोळीबार थांबला. आम्ही दोघेही या गाडीच्या दिशेने गेलो.तेथे पडलेले तीन मृतदेह आम्ही खाली टाकले आणि इस्माईलने गाडी सुरू केली. मी त्याच्या शेजारी बसलो होतो. आम्ही पुढे जात असताना काही पोलिस आम्हाला अडविण्याचा प्रयत्न करीत होते.यावेळी इस्माईलने त्यांच्यावर पुन्हा गोळ्या झाडल्या. आम्ही पुढे जात होतो अशातच रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या मैदानाजवळ आमच्या गाडीचा टायर पंचर झाला इस्माईल खाली उतरला आणि रस्त्याने येणारी एक कार त्याने थांबविली.बंदुकीच्या धाकाने कारमधील तीन महिलांना उतरविण्यात आले अन आम्ही या गाडीत बसलो.याचवेळी समुद्रकिनाऱ्याजवळ आमची गाडी पोलिसांकडून अडविण्यात आली. इ
स्माईलने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.त्यात काही पोलिस जखमी झाले. पण पोलिसांच्या गोळीबारात इस्माईल गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आम्हाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मी देखील जखमी होतो. शुद्धीवर आल्यावर इस्माईल पोलिसांच्या गोळीबारात ठार झाल्याचे कळाले.तोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात असल्याची जाणीव मला झाली...'

Monday, December 8, 2008

कसाबला लिहायचेय माता-पित्याला पत्र!

पोलिसांना विनंती : द्यायचीय चुकांची कबुली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 ः कुटुंबीयांसोबत कोणतीही भावनिक गुंतागुंत नसल्याचे सांगत "इस्लाम'साठी काही तरी करण्याकरिता लष्कर-ए-तय्यबामध्ये दाखल होऊन मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहा जणांपैकी एकमेव जिवंत अतिरेकी महम्मद अजमल कसाब याला आता आपले माता-पिता आठवू लागले आहेत. आई-वडिलांना पत्र लिहून आपली चूक कबूल करण्याची संधी मिळावी, अशी इच्छा त्याने दिवस-रात्र चौकशी करणाऱ्या पोलिसांपुढे व्यक्त केली आहे.

कसाबच्या या भावनांशी पोलिसांना काहीच देणे-घेणे नाही. त्याने तशी इच्छा प्रदर्शित केली असली, तरी पोलिस ही बाब तपासून पाहत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.

26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल 183 निष्पाप मुंबईकरांचे प्राण गेले, तर तीनशेहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये 16 पोलिस अधिकारी-कर्मचारी, दोन एनएसजी कमांडो व 22 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या या 10 अतिरेक्‍यांपैकी नऊ जणांचा पोलिस आणि एनएसजी कमांडोंनी खातमा केला. पोलिसांच्या हाती लागलेला एकमेव जिवंत अतिरेकी महम्मद अजमल कसाब आता पोलिसांना तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती देत आहे.

आठवण कुटुंबीयांची
लष्कर-ए-तय्यबात वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सामील झालेला अजमल मूळचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या फरिदकोट या गावचा आहे. चौथीपर्यंत शिकलेला अजमल पोलिस कोठडीत आता आई-वडील आणि भावंडांची आठवण काढतो. आपण "लष्कर-ए-तय्यबा'च्या आहारी कशा प्रकारे गेलो, याची माहिती आई-वडिलांना करून देण्यासाठी तसेच केलेल्या चुकीची कबुली देण्यासाठी आई-वडिलांना पत्र लिहिण्याची इच्छा त्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली.

सर्व अतिरेकी पंजाब प्रांतातील
मुंबईवर हल्ला करणारे सगळेच अतिरेकी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील असून त्यांची मूळ नावे आणि वास्तव्याचे मूळ पत्ते पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी या संबंधीची सविस्तर माहिती केंद्रीय तपास यंत्रणांना दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या सगळ्या बाबी पडताळून पाहत आहेत. दहा अतिरेक्‍यांत ओखाडा व मुलतान येथील प्रत्येकी तिघे, फैसलाबाद येथील दोघे, तर सियालकोट व डेरा इस्माईल खान येथील प्रत्येकी एक यांचा समावेश आहे. या अतिरेक्‍यांचे नेतृत्व इस्माईल खान याने केले होते. इस्माईल खान याने यापूर्वीही "लष्कर-ए-तय्यबा'साठी काम केले होते. त्याला जीपीएस यंत्रणा आणि डिंगीच्या आऊटबोर्ड इंजिनची तांत्रिक माहिती होती. बोटीवर सापडलेल्या डायरीतील माहिती पोलिस तपासत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रसाठ्यापैकी 9 एमएमची पिस्तुले पेशावरच्या "डायमन्ड नेडी फ्रंटियर आर्म्स कंपनी'तून आल्याची माहिती सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

प्राण गेला तरी बेहत्तर, अतिरेक्‍यांना जिवंत सोडणार नाही

ताजवरील अतिरेकी हल्ला ः सीसीटीव्हीने टीपली पोलिसांची निकराची झुंज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 7 ः "मला फोर्स आणि शस्त्रसाठा पाठवून द्या. मी या अतिरेक्‍यांना हॉटेलच्या बाहेर जिवंत जाऊ देणार नाही. अतिरेक्‍यांसोबत दोन हात करताना स्वतःचा प्राण गमवावा लागला तरी बेहत्तर..!' पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील त्यांचे "किंग सर' अर्थात पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याशी वायरलेसवरून बोलत होते. 26 नाव्हेंबरला रात्री हॉटेल ताजमध्ये शिरलेल्या अतिरेक्‍यांसोबत विश्‍वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल आठ तास निकराचा लढा दिला. पोलिसांच्या कडव्या प्रत्त्युत्तरामुळेच अतिरेक्‍यांना पहाटे चार वाजेपर्यंत हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर थोपविता आले. पोलिस आणि अतिरेक्‍यांच्या या थरारक चकमकीचा प्रत्येक क्षण न्‌ क्षण तेथील क्‍लोज सर्किट टीव्हीने टिपला. रात्री अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत या संपूर्ण कारवाईची माहिती पोलिस आयुक्तांना देताना नांगरे पाटील यांच्या तोडून आलेली वाक्‍ये त्यांच्या पथकाने अतिरेक्‍यांशी एकहाती दिलेल्या झुंजीची कहाणी सांगतात. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध झाल्यानंतर "ऑपरेशन ताज'च्या कारवाईतील पोलिसांच्या धडाडीचे महत्त्वपूर्ण बारकावेही प्रसिद्धिमाध्यमांपुढे आले.
मुंबईवर घातपाती हल्ला करण्यासाठी आलेल्या दहा अतिरेक्‍यांपैकी चौघांनी हॉटेल ताजचा ताबा घेतल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडून कळताच आठ पोलिस आणि हॉटेल ताजचे मुख्य सुरक्षा अधिकारी सुनील कुडियादी यांना सोबत घेऊन उपायुक्त नांगरे पाटील ताजमध्ये शिरले. रात्री 9.55 वाजता हॉटेलमध्ये प्रवेश करताच दुसऱ्या मजल्यावर गेलेल्या नांगरे पाटील यांनी अतिरेक्‍यांवर त्यांच्याकडील ग्लॉक रिव्हॉल्व्हरमधून तीन गोळ्या झाडल्या. यानंतर अतिरेक्‍यांनीही पोलिसांच्या पथकावर एके-47 ने गोळीबार सुरू केला. या वेळी नांगरे पाटील यांच्या रिव्हॉल्व्हरमधून सुटलेल्या गोळीने अतिरेक्‍याच्या पायाचा वेध घेतल्याचेही या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये पाहायला मिळते. पोलिसांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करीत सहाव्या मजल्यावर गेलेल्या अतिरेक्‍यांना तेथेच थोपविण्याचे आव्हान असल्याने मोजक्‍याच पोलिसांसोबत सहाव्या मजल्यावर पोलिसांनी सतत गोळीबार सुरू ठेवला. अतिरेक्‍यांकडे असलेल्या आधुनिक शस्त्रांचा मुकाबला करताना येणाऱ्या अडचणी नांगरे पाटील वायरलेसवरून पोलिस आयुक्त आणि पोलिस नियंत्रण कक्षात बसून या ऑपरेशनला दिशा देणारे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना सांगत होते. विशेष शाखेचे उपायुक्त राजवर्धन त्यांच्यासोबत या कारवाईत आघाडीवर होते. अतिरेक्‍यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणारे पोलिस दुसऱ्या मजल्यावर असताना अतिरेक्‍यांनी त्यांच्यावर हातबॉम्ब फेकले आणि त्यापाठोपाठ गोळीबार सुरू ठेवला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल राहुल शिंदे जागीच गतप्राण झाले; तर दोन कॉन्स्टेबल गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले. हातबॉम्बच्या स्फोटांत दोन पोलिस अधिकारी जखमी झाले. अतिरेक्‍यांना नवीन इमारतीत शिरू न देण्यासाठी पोलिसांची सुरू असलेली धडपड सीसीटीव्हीने टिप
ली आहे. या इमारतीत अतिरेक्‍यांनी शिरकाव केला असता तर प्रचंड मनुष्यहानी झाली असती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नौदलाच्या कमांडोंनी हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र पोलिसांना मोकळा श्‍वास घेता आला; मात्र तोपर्यंत हॉटेलमध्ये अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुखरूप मुक्तता झाली होती.

Sunday, December 7, 2008

सुरक्षा यंत्रणा व गुप्तचर खात्यांतील त्रुटी दूर करणार

गृहमंत्री चिदंबरम ः एफबीआयप्रमाणे केंद्रात इंटलिजन्सची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 5 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर खात्यांत त्रुटी आणि समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. येत्या काळात या दोन्ही विभागांत कमालीच्या सुधारणा करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. हल्ल्यामागे असलेले अतिरेकी आणि त्यांच्या संघटनांविरुद्ध आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचेही चिदंबरम यांनी या वेळी स्पष्ट केले. या अतिरेकी हल्ल्यानंतर अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या धर्तीवर केंद्रीय स्तरावर इंटेलिजन्स एजन्सीची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
देश हादरविणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी अतिरेक्‍यांनी टार्गेट केलेल्या मुंबईतील ठिकाणांची पाहणी केली. या वेळी पोलिस महासंचालक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर खात्यातील उणिवांवर भाष्य केले. दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. याच वेळी सामान्य नागरिकांनीही सरकारमागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. देशाच्या अखंडतेसाठी सगळ्यांनीच सामूहिक प्रयत्न करावेत. मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय आणि लष्कर ए तय्यबा असल्याची विचारणा केली असता तपास यंत्रणेचा अहवाल आल्यानंतरच योग्य तो निष्कर्ष काढता येईल. हा हल्ला अनेकांची स्वप्ननगरी असलेल्या मुंबईवर नाही, तर देशाच्या आत्म्यावर झालेला आहे. अतिरेक्‍यांनी देशाच्या आत्म्यालाच आव्हान दिले आहे. तपास यंत्रणा या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन त्यांचा समूळ नायनाट करतील, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. हा हल्ला बाहेरून आलेल्या अतिरेक्‍यांनी घडविला आहे. हल्ल्यामागे असलेल्यांची नावे घेण्यापेक्षा त्यांच्याविरुद्ध असलेले पुरावे सादर केले जातील. त्यानंतरच हल्ल्याची खरी आणि पूर्ण कहाणी पुढे येईल, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हटले. हा हल्ला राज्य आणि केंद्र सरकारचा दहशतवादासोबत लढण्याबाबतचा दृष्टिकोन बदलण्यास कारणीभूत ठरेल, असेही ते या वेळी म्हणाले.
पोलिस, एनएसजी आणि मरीन कमांडोंनी सतत तीन दिवस अतिरेक्‍यांशी केलेल्या कडव्या प्रतिकाराची प्रशंसाही त्यांनी या वेळी केली. अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्यांना 31 डिसेंबरपूर्वी सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीचे वितरण करण्यासंबंधी गृहखात्याला सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना सरकारकडून पुरेपूर सहकार्य करण्यात येणार आहे. याशिवाय विमा कंपन्यांना जखमी व मृत व्यक्तींच्या विम्याचे परतावे तातडीने देण्याबाबत सांगण्यात आल्याचेही चिदंबरम या वेळी म्हणाले.
दरम्यान, सकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर चिदंबरम यांनी जे.जे. रुग्णालयात जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली. यानंतर अतिरेक्‍यांच्या हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय व छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनसचीही त्यांनी पाहणी केली. तत्पूर्वी अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना वीरमरण आलेले दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचीही चिदंबरम यांनी विचारपूस केली. त्यांच्यासोबत राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, गृहसचिव चित्कला झुत्शी, पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

----------------

सॉरी मुंबई..!

मुंबईने बरेच भोगले आहे. 26 नोव्हेंबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पापांचे बळी गेले. आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. या संपूर्ण घटनाक्रमांनंतर या शहराची माफी मागण्याव्यतिरिक्त आपल्याकडे पर्याय नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या शहराची "सॉरी मुंबई' असे म्हणत माफी मागितली.
----------

Friday, December 5, 2008

अतिरेक्‍यांकडे होते आठ किलो वजनाचे दहा बॉम्ब

राकेश मारिया : सात फुटले; तीन पोलिसांनी निकामी केले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः सागरी मार्गाने मुंबईत आलेल्या दहा अतिरेक्‍यांकडे शस्त्रसाठ्यासह प्रत्येकी आठ किलो वजनाचे दहा बॉम्ब होते. त्यातील सात ठिकाणी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला; तर तीन ठिकाणचे बॉम्ब पोलिसांनी निकामी केले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे काल सापडलेला बॉम्ब अजमलच्या साथीदाराने ठेवल्याचे उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. दरम्यान, पोरबंदरच्या समुद्रातून 21 नोव्हेंबरला कुबेर जहाज अचानक नाहीसे झाल्याचे त्याच्या मालकाने आज झालेल्या चौकशीत सांगितले .
मुंबईत 26 नोव्हेंबरला शिरलेल्या दहा अतिरेक्‍यांनी सतत तीन दिवस विध्वंस घडविला. अतिरेक्‍यांनी आणलेल्या दहापैकी दोन बॉम्ब टॅक्‍सींमध्ये ठेवण्यात आले होते, ज्यांचे स्फोट विलेपार्ले व वाडीबंदर येथे झाले. या स्फोटांनंतर महम्मद उमर अब्दुल खालीद आणि प्रेमचंद भीम या दोन्ही टॅक्‍सीचालकांचे मृतदेह टॅक्‍सीपासून शंभर ते दीडशे मीटरहून अधिक लांब उडाले, एवढी या बॉम्बची तीव्रता होती. अतिरेक्‍यांनी हॉटेल ताजचा ताबा घेतल्यानंतर ताजच्या घुमटात एका बॉम्बचा स्फोट घडविला. हॉटेल ओबेरॉयच्या आत व बाहेर ठेवलेल्या दोन्ही बॉम्बचे स्फोट झाले; तर नरिमन हाऊसचा तळमजला आणि चौथ्या मजल्यावर पोलिस तसेच एनएसजीच्या कमांडोंना रोखण्यासाठी ठेवलेले अन्य दोन बॉम्बही फुटले. हॉटेल ताजचे प्रवेशद्वार आणि लिओपोल्डच्या वळणावर असलेल्या गोकुळ हॉटेलजवळ सापडलेले प्रत्येकी आठ किलोचे दोन बॉम्ब निकामी करण्यात आले. आठवडाभरानंतर काल छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सापडलेला बॉम्ब महम्मद अजमल याचा साथीदार इस्माईल खान याने ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर अतिरेकी हल्ल्यासाठी आल्यानंतर महम्मद अजमल कसाब येथील प्रसाधनगृहात गेला होता. या वेळी त्याचा साथीदार इस्माईल खान याने रेल्वेस्थानकात बॉम्ब असलेली पिशवी ठेवल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या प्रत्येक बॉम्बला इलेक्‍ट्रॉनिक टायमर आणि डिटोनेटर लावलेले होते. फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आल्यानंतरच स्फोटकांच्या या साठ्यात झालेला आरडीएक्‍सचा वापर स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अतिरेक्‍यांनी पोरबंदर येथून अपहरण केलेल्या कुबेर या जहाजाचा मालक विनोद मसाणी याची चौकशी सुरू झाली आहे. 14 नोव्हेंबरला पोरबंदर येथून "एमव्ही- मॉं' आणि "कुबेर' ही जहाजे मासेमारीसाठी पाठविण्यात आली. 21 तारखेला पोरबंदरपासून 150 नॉटिकल मैलांवर असलेल्या जाखौर येथून कुबेरचे अपहरण झाल्याचेही मसाणी याने पोलिसांना सांगितले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी रामपूर येथून अटक केलेल्या फहीम अन्सारीने अतिरेक्‍यांना मुंबईची माहिती दिली का, याची चौकशी सुरू असल्याचेही मारिया यांनी सांगितले.
---------------------

अजमलने सांगितले लष्करच्या कमांडरचे नाव
गुन्हेगारी क्षेत्रात वळण्यासाठी महम्मद अजमल आणि त्याचे मित्र शस्त्र घेण्यासाठी फिरत होते. यानंतर ते लष्कर-ए-तैयबाच्या संपर्कात आले. लष्करचा कमांडर झाकिर उर रहमान नक्वी याने त्यांच्या धार्मिक भावना भडकावून चांगल्या प्रकारे ब्रेनवॉश करून त्यांना दहशती कृत्यांसाठी सज्ज केल्याची माहिती अजमलच्या चौकशीत पुढे आली आहे.

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अतिरेकी मुंबईत शिरले

भ्रष्टाचाराची कीड : दाऊदच्या हस्तकाच्या तस्करीकडे डोळेझाक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः अरबी समुद्रातून जाणाऱ्या परदेशी जहाजांतील भंगार आणि डिझेलच्या होणाऱ्या तस्करीला मोकळे रान मिळावे यासाठी मुंबईच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावर काही पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अतिरेकी मुंबईत शिरले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाच्या गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या या व्यवसायाकडे पोलिसांकडून होणारी डोळेझाक मुंबईवर हल्ल्यासाठी साह्यभूत ठरल्याचे बोलले जाते.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मालाची आयात-निर्यात करण्यासाठी जगभरातून मोठमोठी जहाजे येतात. खोल समुद्रात असलेल्या या जहाजांतील भंगार आणि डिझेलची चोरट्या मार्गाने विक्री करण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरू आहेत. परदेशातून मुंबईकडे येणाऱ्या व्यापारी जहाजाचा कॅप्टन आणि चिफ इंजिनीअर आवश्‍यकतेपेक्षा जास्त इंधनसाठा जहाजात भरून ठेवतो. मुंबई बंदरात हे जहाज लागत असतानाच समुद्रात लहान बोटींनी येणाऱ्या तस्करांना अतिरिक्त डिझेलसाठा बाजारभावापेक्षा कमी किंमतीत विक्री करतात. अरबी समुद्रात हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमचे फ्लोटिंग पेट्रोलपंप आहेत. या पंपांवर इंधन भरण्यासाठी लागणाऱ्या जहाजांतूनही अशाच प्रकारे हजारो लिटर डिझेलची चोरी केली जाते. जहाजावरील भंगार; तसेच काही वेळा मौल्यवान वस्तूंचीही विक्री केली जाते. मुंबई बंदरात जहाजांवर चालणाऱ्या या चोरट्या विक्रीच्या धंद्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दोन हस्तकांचा वरचष्मा आहे. वर्षाला शेकडो कोटी रुपयांची उलाढाल असलेला हा अवैध व्यवसाय रोखणे पोलिसांत असलेल्या काही अपप्रवृत्तींमुळे शक्‍य झालेले नाही.

मुंबई पोर्ट ट्रस्टलगत असलेल्या पूर्व सागरी किनारपट्टीवर पोलिसांची देखरेख नसल्याने या मार्गाने होणाऱ्या डिझेल आणि भंगाराच्या चोरट्या विक्रीला मोकळे रान मिळाले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या याच नेटवर्कच्या माध्यमातून 26 नोव्हेंबरला सागरी मार्गाने आलेले दहा अतिरेकी कुलाब्यात दाखल झाल्याचे सांगण्यात येते. बंदर विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या संपूर्ण परिसरात पोलिसांची पुरेशी सुरक्षा व्यवस्थाच ठेवली जात नसल्याचे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले.

-------------
अतिरेकी हल्ला - चौकट
--------------------
हद्दीचा वाद अतिरेक्‍यांच्या पथ्यावर
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीत यलोगेट, ट्रॉम्बे, आरसीएफ, शिवडी, कुलाबा, कफ परेड, मलबार हिल, मोरा ही पोलिस ठाणी येतात. समुद्रात 12 नॉटीकल मैलांपर्यंत या पोलिस ठाण्यांनी गस्त ठेवणे अपेक्षित आहे. मुंबईला लाभलेल्या 114 किलोमीटरच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेले वर्सोवा सागरी पोलिस ठाणे हद्द न ठरविल्यामुळे अद्याप कार्यरत झालेले नाही. यलोगेट आणि वर्सोवा सागरी पोलिस यांच्यात हद्दीवरून सुरू असलेला वादही अतिरेक्‍यांच्या पथ्यावर पडल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

सीएसटी येथे आरडीएक्‍स सापडल्याने खळबळ

मुंबईत खळबळ : मुख्यमंत्र्यांकडून स्थानकाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. 3 ः मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे बॉम्बस्फोट घडविण्यासाठी ठेवलेले सात किलो आरडीएक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक टायमर आज सायंकाळी पोलिसांना सापडल्याने एकच खळबळ उडाली; मात्र आरडीएक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक टायमरची योग्य जोडणी झाली नसल्याने या आरडीएक्‍सचा स्फोट झाला नाही आणि मोठा घातपात टळल्याची माहिती रेल्वेचे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली. बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाने हा बॉम्ब निकामी केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सायंकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला भेट देऊन स्थानकाची पाहणी केली.

मुंबईत दहा अतिरेक्‍यांनी 26 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणावर घातपात घडविला. अतिरेक्‍यांच्या एका गटाने छत्रपती शिवाजी टर्मिनसवर हल्ला चढविला होता. अतिरेक्‍यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी स्थानकावरील प्रवाशांनी सामान सोडून पळ काढला. रेल्वे पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे सगळे सामान गोळा करून रेल्वे पोलिसांच्या एका स्टोअर रूममध्ये ठेवले होते. आज दुपारी या सामानातील पिशव्यांची पोलिस तपासणी करीत होते. या वेळी एका पिशवीत पोलिसांना सात किलो वजनाच्या आरडीएक्‍सला इलेक्‍ट्रॉनिक्‍स टायमर जोडल्याचे आढळले. छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये शक्तिशाली स्फोट घडविण्याच्या उद्देशाने ठेवलेला हा साठा पाहून पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली. या कर्मचाऱ्यांनी तातडीने बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाला बोलावून हा साठा त्यांच्या ताब्यात दिला.
मुंबईत घातपात घडविण्यासाठी आलेल्या अतिरेक्‍यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये पोलिसांनी केलेल्या प्रतिकारानंतर रेल्वे स्थानकातून पळ काढला होता; मात्र पळून जाताना त्यांनी हा स्फोटक साठा रेल्वे स्थानकात ठेवला. या अतिरेक्‍यांनी विलेपार्ले आणि वाडीबंदर येथे टॅक्‍सीत ठेवलेल्या बॉम्बचे स्फोट होऊन मोठी हानी झाली होती. याशिवाय हॉटेल ताजबाहेर आठ किलो वजनाचे दोन व हॉटेल ओबेरॉयबाहेर एक असे तीन बॉम्ब ठेवले होते. पोलिसांनी स्फोटकाचा साठा निकामी केल्याचे रेल्वे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सायंकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसची पाहणी केली. या वेळी पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी, पोलिस आयुक्त ए. के. शर्मा हे घटनास्थळी उपस्थित होते.

Wednesday, December 3, 2008

मुंबईची "सुपारी' 15 लाखांची

महम्मद अजमल कसाबची माहिती; "कुबेर'च्या मालकाला मुंबईत आणणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 3 ः मुंबईवर दहशतवादी हल्ला घडविणाऱ्या अतिरेक्‍यांच्या कुटुंबीयांना कामगिरी पूर्ण झाल्यानंतर "लष्कर ए तैय्यबा'कडून प्रत्येकी दीड लाख रुपये दिले जाणार होते, अशी माहिती पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने त्याच्या चौकशीत दिली.
दरम्यान, अतिरेक्‍यांनी सागरी मार्गाने प्रवास करताना वापरलेल्या कुबेर जहाजाच्या मालकाला गुजरात येथून चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईवर हल्ला करणाऱ्या अतिरेक्‍यांपैकी अटक केलेल्या महम्मद अजमल कसाब (वय 21) याच्या सखोल चौकशीनंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली आहे. या संपूर्ण हल्ल्याचे नेतृत्व अजमलसोबत असलेला अतिरेकी इस्माईल खान करीत होता. या हल्ल्याच्या सुरुवातीला प्रत्येक दहशतवाद्याला पाच हजार चारशे रुपये देण्यात आले होते. अतिरेकी कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना किमान दीड लाख रुपये देण्याचे कबूल करण्यात आल्याचेही कसाब याने सांगितले आहे. पाकिस्तान येथील फरीदकोटचा राहणारा कसाब याचे वडील मोहम्मद आलम (48) फेरीवाल्याचा व्यवसाय करतात. आई नूर इलाही (32), दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासोबत राहणारा कसाब मजुरीचे काम करीत होता. यानंतर काही दिवसांनी तो लाहोर येथे राहणाऱ्या मोठ्या भावाकडे राहायला गेला. त्याचा मोठा भाऊ शेतात काम करीत असल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली आहे. लष्कर ए तैय्यबाच्या संपर्कात आल्यानंतर त्याला अतिरेकी प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवादी कारवाईसाठी मुंबईत उतरलेल्या कसाबला दिनेशकुमार नावाचे विद्यार्थ्याचे बनावट ओळखपत्र देण्यात आले होते. वाडीबंदर येथे जाणाऱ्या टॅक्‍सीतही कसाबनेच बॉम्ब ठेवला होता, असेही उघडकीस आले आहे.
अतिरेकी कारवाईत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व्हावी, यासाठी या अतिरेक्‍यांनी हॉटेल ताजबाहेर आरडीएक्‍स आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स टायमर असलेले प्रत्येकी आठ किलोचे दोन बॉम्ब ठेवले होते. या बॉम्बना चार तास 57 मिनिटांचा टायमर बसविण्यात आला. कारवाई सुरू असताना पोलिस आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी गोळा होतील, त्याच वेळी या बॉम्बचा स्फोट होईल, अशी या अतिरेक्‍यांची योजना होती; मात्र बॉम्बशोधक आणि विनाशक पथकाने हे दोन्ही बॉम्ब वेळीच निकामी केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या हल्ल्यासाठी स्थानिकांनी केलेल्या मदतीचादेखील पोलिस शोध घेत असल्याचे मारिया यांनी या वेळी सांगितले.

Tuesday, December 2, 2008

तीन महिन्यांपूर्वीच दिली होती "ताज'ला हल्ल्याची कल्पना

"ताज'ला हल्ल्याची कल्पना
पोलिसांची माहिती ः सुरक्षेसाठी 22 सूचना केल्या होत्या

ज्ञानेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 2 ः जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ऐतिहासिक हॉटेल ताजवर अतिरेकी हल्ला होण्याची आगाऊ कल्पना पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला तीन महिन्यांपूर्वीच दिली होती. हा हल्ला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंबंधीच्या 22 सूचना ताज व्यवस्थापनाला पोलिसांनी दिल्या होत्या; मात्र या सूचनांकडे ताज व्यवस्थापनाने पुरते दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या हॉटेल समूहाने सुरक्षिततेबाबत जागरूकता दाखविली असती, तर कदाचित हॉटेलवर 26 नोव्हेंबरला झालेला हल्ला टळला असता, अशी धक्कादायक माहिती पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली.
समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या 10 अतिरेक्‍यांनी 26 नोव्हेंबरपासून सतत तीन दिवस मृत्यूचे थैमान घातले. या हल्ल्यात 14 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह 183 जण ठार; तर 300 हून अधिक जण जखमी झाले. दक्षिण मुंबईत असलेले ऐतिहासिक हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन हाऊस या तीन इमारती अतिरेकी हल्ल्याचे प्रामुख्याने लक्ष्य ठरल्या. 59 तासांच्या थरारक चकमकीनंतर हॉटेल ताज अतिरेक्‍यांच्या ताब्यातून मुक्त करीत असताना दोन पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) एका कमांडोने प्राणांची आहुती दिली. अतिरेक्‍यांच्या या हल्ल्यात 105 वर्षांची परंपरा असलेल्या हॉटेल ताजचे 500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले; मात्र हॉटेल ताजवर होणाऱ्या या अतिरेकी हल्ल्याची कल्पना पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला 29 सप्टेंबरलाच दिली होती. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 30 सप्टेंबरला जगभरात प्रसिद्ध असलेल्या
ताज हॉटेल समूहाचे मुख्य सुरक्षा व्यवस्थापक महावीर सिंग कांग, तसेच व्यवस्थापक सुनील कडी, श्रीमती जेनेट यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर तब्बल सहा तास हॉटेलच्या सुरक्षेसंबंधी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनासोबत पाहणी केली. या वेळी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला स्पष्ट शब्दांत हॉटेलवर अतिरेकी हल्ला करणार असून, मोठ्या प्रमाणावर गोळीबार आणि बॉम्बहल्ला होण्याची शक्‍यताही वर्तविली. हा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापनाला तब्बल 22 लहान-मोठ्या सूचना केल्या. 26 नोव्हेंबरला ज्या प्रवेशद्वाराने अतिरेकी हॉटेलमध्ये शिरले, तो दरवाजा कायमस्वरूपी बंद करून, तेथे ग्रील लावण्याची सूचना पोलिसांनी केली. मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त हॉटेलमधील अन्य दरवाजे बंद केले जावेत. हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिकांना राहू दिले जाऊ नये, असे सांगण्यात आले असतानाही गेल्या आठवड्यात हॉटेलमध्ये पाच पाकिस्तानी नागरिक राहून गेल्याचे हा अधिकारी म्हणाला. हॉटेलमध्ये थांबणाऱ्या कोणत्याही नागरिकाला इंटरनेट सुविधा व वायफाय तंत्रज्ञानाचा पुरवठा करू नये; तसेच हॉटेलमध्ये शस्त्रधारी पोलिस, श्‍वानपथक ठेवावे, आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी हॉटेलचा "ले-आऊट मॅप' दिला जावा असेही पोलिसांनी या वेळी सुचविले; मात्र पोलिसांच्या कोणत्याच सूचनेकडे ताज हॉटेल व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. उलट तेथे ठेवलेले शस्त्रधारी पोलिस आणि श्‍वान पथक हॉटेल व्यवस्थापनाने काढून टाकले होते. परिणामी 26 नोव्हेंबरला अतिरेक्‍यांनी या हॉटेलचा ताबा घेऊन तीन दिवस प्रचंड नरसंहार घडविल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

एफबीआय, स्कॉटलंड यार्डची पथके मुंबईत दाखल

हल्ल्याचा तपास : अतिरेक्‍यांबाबतच्या माहितीची देवाण-घेवाण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 1 ः मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अमेरिकन गुप्तचर यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) व स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. दरम्यान, मुंबईत दहशतवादी हल्ल्यासाठी आलेले अतिरेकी कराची येथून "अल-हुसैनी' जहाजातून गुजरातच्या पोरबंदरपर्यंत आले. मृत्यूनंतरही मोठ्या प्रमाणावर प्राणहानी व्हावी यासाठी अतिरेक्‍यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉय येथे कत्तली केल्यानंतर मृतदेहांखाली हातबॉम्ब पेरल्याची माहिती उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.
26 नोव्हेंबर रोजी मुंबईत घडविलेल्या अतिरेकी हल्ल्यात 14 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह तब्बल 183 जणांनी प्राण गमावले; तर सुमारे 300 जण जखमी झाले. "लष्कर-ए-तैय्यबा'ने घडविलेल्या या मृत्यूच्या तांडवात 22 परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असल्याने आता जगभरातील पोलिस या हल्ल्याच्या चौकशीसाठी मुंबईत येत आहेत. त्यानुसार "एफबीआय'चे पथक रात्री उशिरा मुंबईत दाखल झाले. या पथकाने आज राज्याचे पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, पोलिस आयुक्त हसन गफूर, गुप्तचर विभागाचे आयुक्त डी. शिवानंदन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव दयाळ, दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्यासोबत एक बैठक घेतली. या बैठकीत पोलिस आणि एफबीआयच्या पथकांनी दहशतवाद्यांसंबंधी त्यांच्याकडे असलेल्या माहितीची देवाण-घेवाण केली. स्कॉटलंड यार्ड पोलिसांचे पथकही या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर या पथकांनी अतिरेक्‍यांच्या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य ठरलेल्या हॉटेल ताज, ओबेरॉय व नरिमन इमारतींना भेट दिली.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेला अतिरेकी अजमल कासाब याने कराची येथून "अल हुसैनी' जहाजातून अतिरेकी आल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पाकिस्तानी सागरी हद्द ओलांडल्यानंतर पोरबंदर येथून हे अतिरेकी "कुबेर' जहाजाने मुंबईच्या दिशेने आले. या जहाजात पोलिसांना मिळालेला सॅटेलाईट फोन आणि जीपीएस सिस्टीम तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली आहे. या अतिरेक्‍यांनी त्यांच्या मृत्यूनंतरही मोठ्या प्रमाणावर घातपात व्हावा यासाठी मृतदेहांखाली हातबॉम्ब पेरून ठेवले होते. हॉटेलमधील मृतदेह उचलताना ही बाब स्पष्ट झाल्याचे मारिया यांनी सांगितले. या हल्ल्याच्या वेळी अतिरेक्‍यांनी त्यांच्या मोबाईलवरून केलेल्या संभाषणाचीही चौकशी करण्यात येत आहे. अतिरेक्‍यांनी हॉटेल लिओपोल्ड आणि ताज या ठिकाणी आठ किलोचे दोन बॉम्ब ठेवले होते. या दोन्ही बॉम्बना डिटोनेटर्स बसविण्यात आले होते; मात्र पोलिसांनी हे बॉम्ब निकामी केल्याचे मारिया या वेळी म्हणाले.

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट "लष्कर ए तैय्यबा'चा

राकेश मारिया : लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या निवडक तरुणांचाच वापर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 30 ः संबंध देशाला हादरविणाऱ्या मुंबईवरील दहशती हल्ला हा लष्कर ए तैय्यबाचा मोठा कट होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या अतिरेक्‍यांच्या चौकशीत ही बाब उघडकीस आली आहे. या कटासाठी लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या काही निवडक तरुणांचाच वापर करण्यात आला. हा संपूर्ण कट उघडकीस आणण्यासाठी पोलिस केंद्रीय गुप्तचर यंत्रणांची मदत घेत आहेत. या पूर्वनियोजित हल्ल्याकरिता अतिरेक्‍यांना स्थानिकांची अथवा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कची मदत झाली का, याची तपासणी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

समुद्रमार्गे 26 नोव्हेंबरला आलेल्या दहा अतिरेक्‍यांनी मुंबईवर तब्बल तीन दिवस अतिरेकी हल्ला चढविला. या घातपाती हल्ल्यात 186 जणांचा बळी गेला, तर 300 हून अधिक जखमी झाले. हल्ल्याच्या वेळी पोलिसांनी गिरगाव येथे अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल कसाब याने त्याच्या चौकशीत तो लष्कर ए तैय्यबाचा सदस्य असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिली. दीड वर्षांपूर्वी लष्कर ए तैय्यबा संघटनेत दाखल झालेल्या कसाब याच्यासह निवडक दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांची निवड मुंबईवरील हल्ल्यासाठी केली. त्यासाठी त्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात आले. कसाब याने पाकिस्तानमध्ये झालेल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्याचीही कबुली दिल्याचे यावेळी मारिया यांनी सांगितले.

मुंबईत प्रवेश केल्यानंतर हॉटेल ताज, ओबेरॉय व छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शिरून तेथील लोकांना ठार मारायचे. पोलिसांच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी काहींना ओलिस ठेवायचे. या ओलिसांच्याच जोरावर जेवढे दिवस जगता येईल तेवढे दिवस जगायचे आणि पुढे मरायचे, अशी कार्यपद्धती या अतिरेक्‍यांकडून वापरण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील हल्ल्याचे सीसीटीव्हीत झालेले रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाले आहे. ज्या छोट्या नावेतून हे अतिरेकी कुलाब्याच्या मच्छीमार कॉलनीत उतरले, त्यात पोलिसांना सापडलेल्या सॅटेलाईट फोन आणि जीपीएस सिस्टीमवरून त्यांचा मुंबईत येण्याचा मार्ग पोलिस तपासत आहेत. या नावेच्या मालकाची पोलिसांनी चौकशी केली आहे. अतिरेक्‍यांनी ठार मारलेला नावेचा चालक अमरसिंग तांडेल दोन वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात होता. त्याच्या चौकशीसाठी पोलिसांचे एक पथक गुजरात येथेही गेले असल्याची माहिती मारिया यांनी यावेळी दिली. पोलिसांना या अतिरेक्‍यांची नावे मिळाली असून त्यांची पडताळणी सुरू आहे. हॉटेल ताज, ओबेरॉय आणि नरिमन इमारतीत शिरलेल्या सर्वच अतिरेक्‍यांचे एकमेकांशी मोबाईलवर सतत संपर्क सुरू असल्याची बाब पडताळून पाहिली जात आहे. शिवाय या अतिरेक्‍यांनी पाकिस्तानमधील अतिरेक्‍यांशी केलेल्या कथित संभाषणाचीही पडताळणी सुरू असल्याचे मारिया यांनी सांगितले.

हेमंत करकरेंना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

हजारोंची उपस्थिती ः सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
ंमुंबई, ता. 29 ः मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढताना धारातीर्थी कोसळलेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख व सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या पार्थिवावर आज सकाळी दादरच्या हिंदू स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह राजकीय नेते, ज्येष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच हजारो सामान्य नागरिकांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला.
मुंबईवर अतिरेकी हल्ला करणाऱ्या लष्कर ए तय्यबाच्या अतिरेक्‍यांशी प्राणपणाने लढताना 26 नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हेमंत करकरे यांना वीरमरण आले. आज सकाळी करकरे यांच्या पार्थिवावर दादरच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात जतन करण्यात आलेला करकरे यांचा मृतदेह दादर पूर्वेला हिंदू कॉलनीत असलेल्या त्यांच्या युरोपियन बंगलो या निवासस्थानी अंत्यदर्शनाकरिता आणण्यात आला. त्यांच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ पोलिस अधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी व पोलिस कर्मचारी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास राजशिष्टाचार विभागाच्या पोलिसांनी करकरे यांचा राष्ट्रध्वजात गुंडाळलेला मृतदेह अंत्ययात्रेसाठी उचलला. पुढे पोलिसांचे बॅण्ड पथक "धीरे चल' या दुखवटा धूनवर हळुवार पावले टाकत पुढे जात होते. अंत्यदर्शनासाठी आलेले पोलिस महासंचालक ए. एन. रॉय, मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्ययात्रेला खांदा दिला. फुलांची आकर्षक रचना केलेल्या मोठ्या ट्रकमध्ये त्यांचा मृतदेह अंत्ययात्रेसाठी ठेवण्यात आला. या मृतदेहावर करकरे यांचा पोलिसी गणवेष, कॅप व तलवार ठेवण्यात आली होती. दादरच्या हिंदू स्मशानभूमीच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकला बांधण्यात आलेल्या दोरखंडाला राज्य पोलिस दलातील सर्व वरिष्ठ व माजी पोलिस अधिकाऱ्यांनी हात लावल्याचे चित्र होते. दादर परिसरात करकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणारे मोठमोठे होर्डिंग्ज अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांचे लक्ष वेधत होते. दादर प्लाझा, शिवाजी नाट्य मंदिर, शिवसेना भवन, शिवाजी पार्क या मार्गे स्मशानभ
ूमीकडे जाणाऱ्या या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रस्त्याच्या कडेला मोठ्या संख्येने जमलेले लोक करकरे यांच्या पार्थिवावर फुलांची उधळण करीत होते. ट्रकवर पोलिसांच्या गणवेशात असलेली करकरे यांची मोठी तसबीरही लावण्यात आली होती. "हेमंत करकरे अमर रहे', "भारत माता की जय'सारख्या घोषणांत पुढे सरकणारी ही अंत्ययात्रा साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत पोचली. मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी करकरे यांच्या पत्नी कविता, सायली व जुई या दोन मुली तसेच मुलगा आकाश यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले होते. स्मशानभूमीत सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा, जलसंपदा मंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री नारायण राणे, शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार रामदास आठवले, खासदार एकनाथ गायकवाड, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार विनायक मेटे, आमदार जितेंद्र आव्हाड, कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त महासंचालक संजीव दयाळ, रेल्वेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. पी. रघुवंशी, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, वाहतूक शाखेचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करकरे यांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ पोलिस अधिकारी, साहित्य, सामाजिक क्षेत्रातही हळहळ व्यक्त करण्यात आली.

हल्लेखोर अतिरेकी पाकिस्तानातूनच आले

राकेश मारिया : महम्मद कासाबच्या चौकशीतून कट उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः अतिरेकी हल्ला करण्यासाठी कराचीहून समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांचा पाकिस्तानशी थेट संबंध आला आहे. प्रत्येकी दोन जण याप्रमाणे पाच गटांनी शहरात हा अतिरेकी हल्ला चढविला. पोलिसांनी गिरगाव येथून अटक केलेला अतिरेकी महम्मद अजमल महम्मद कासाब व त्याच्या साथीदारानेच दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि चकमकफेम पोलिस अधिकारी विजय साळसकर यांना गोळीबारात ठार मारल्याची कबुली कासाब याने चौकशीत दिल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
पाकिस्तानातून आलेल्या दहा अतिरेक्‍यांनी गेले तीन दिवस मुंबईत घातपाती कारवाया घडविल्या. 26 नोव्हेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुलाबा येथील मच्छीमारनगरमध्ये उतरलेल्या या अतिरेक्‍यांचे प्रत्येकी दोन अशा पाच गटात विभाजन झाले. हे पाचही गट लिआपोल्ड कॅफे, हॉटेल ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा पाच ठिकाणी टॅक्‍सीने गेले. लिओपोल्ड कॅफे येथे गोळीबार करण्यासाठी गेलेला गट नंतर हॉटेल ताजमध्ये गेलेल्या गटात सामील झाला. महम्मद अजमल कासाब (21) या पाकिस्तानच्या फरीदकोट जिल्ह्यातून आलेल्या अतिरेक्‍याने त्याच्या साथीदारासोबत मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये शिरून तेथे गोळीबार केला. मात्र पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केल्याचे कळताच ते कामा रुग्णालयात लपले. त्यानंतर काही क्षणातच तेथे पोहोचलेले सह पोलिस आयुक्त करकरे, अतिरिक्त आयुक्त कामटे आणि पोलिस निरीक्षक साळसकर असलेल्या गाडीवर त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात तिघा अधिकाऱ्यांसह आणखी दोघे पोलिस शिपाई मरण पावले. त्यानंतर अतिरेक्‍यांनी त्यांचे मृतदेह खाली फेकून गाडी घेऊन पलायन केले होते. त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी गिरगाव येथे त्यांना अडविले. त्यातील एकाला तेथेच चकमकीत ठार मारले, तर महम्मद अजमलला अटक केली. पोलिसांच्या अटकेत असलेल्या अजमलने पोलिसांना हल्ल्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती द्यायला सुरुवात केली आहे. कराचीहून समुद्र मार्गाने येत असताना पोरबंदर येथे एका बोटीतून हे अतिरेकी आले. त्यातील तिघा खलाशांना वाटेतच मारून फेकून दिले, तर दुसऱ्याला घेऊन हे अतिरेकी मुंबईत आल्याचे मारिया यांनी सांगितले. या संपूर्ण गटाला उच्च प्रतीचे लष्करी प्रशिक्षण देण्यात आल्याची कबुलीही अजमलने दिली आहे. या अतिरेक्‍यांकडून पोलिसांना 10 एके-56 रायफल्स, 1
0 पिस्तुले, हातबॉम्ब, दोन बॉक्‍समध्ये भरलेली 16 किलो स्फोटके जप्त केली आहेत. ही स्फोटके तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठविण्यात आली आहेत. वाडीबंदर आणि विलेपार्ले येथे झालेले स्फोट हे टॅक्‍सीत राहिलेल्या स्फोटक साठ्यामुळेच झाल्याची शक्‍यता आहे. या कृत्यात त्यांना कोणत्या स्थानिक लोकांचे सहकार्य मिळाले का, याचा पोलिस शोध घेत असल्याचेही मारिया यांनी सांगितले. या सर्व अतिरेकी 19 ते 28 वयोगटातील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांना बोगस ओळखपत्रेही सापडली आहेत.