Monday, July 14, 2014

आता आपण जन्नतमध्येच भेटू ...

कल्याणमधील सुन्नी तरुण दहशतवादी कारवायांसाठी गेले इराकला इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सीरिया (इसीस) या दहशतवादी संघटनेने सुरू केलेल्या युद्धात सामील होण्यासाठी ठाण्यातील चार तरुणांना चिथावणी देऊन एका व्यापाऱ्याने इराकला नेल्याचे तपासात उघड झाले आहे. तपास यंत्रणा या व्यापाऱ्याला शोधत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातून काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अनेक तरुणांना स्वतंत्र राष्ट्रस्थापनेच्या नावाखाली दहशतवादी कारवाया करण्यासाठी इराकला नेल्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. "आता आपण जन्नतमध्येच भेटू', असे एका तरुणाने कुटुंबीयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ठाण्यातून 24 मे रोजी अरीब एजाज मजीद, सहीम फारूख तानकी, फहद तनवीर शेख व अमन नईम तांडेल हे तरुण बेपत्ता झाले होते. त्यांच्या पालकांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारही नोंदवली होती. सहीम वगळता उर्वरित तिन्ही तरुण उच्च शिक्षित आहेत. दुर्गाडीच्या उर्दू हायस्कूलमधील बारावी अनुत्तीर्ण झालेला सहीम कॉम्प्युटर एक्‍स्पर्ट आहे. या चौघांकडील मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डनुसार ते मुंबई आणि ठाणे परिसरात ज्यांच्या संपर्कात होते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न सुरू आहे. एका व्यापाऱ्याने या चार तरुणांना मुंबईहून इराकमध्ये नेण्याचा सगळा खर्च केला, असे समजले आहे. त्यांना अफगाणिस्तानच्या सीमेवर प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात येते. घरात काहीही न सांगता निघून गेलेल्या या तरुणांपैकी अरीब याने वडील डॉक्‍टर एजाज माजिद यांना पत्र लिहून आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. कुटुंबीयांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात "आता आपण जन्नतमध्येच भेटू', असे त्याने म्हटले आहे. चांगल्या घरातील सुशिक्षित तरुणांना चिथावणी देऊन, त्यांना "जिहाद'च्या नावाखाली घातपाती कारवायांत सामील करून घेतले जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे. हे चारही तरुण सुन्नी राष्ट्रनिर्मितीच्या नावाखाली दहशतवादी कारवायांत सामील झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुन्नी पंथातील बेपत्ता झालेल्या तरुणांचा शोध पोलिस, दहशतवादविरोधी पथक, राज्य गुप्तचर विभाग व केंद्रीय गुप्तचर विभागाने सुरू केला आहे, असे उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हे तरुण 24 मे रोजी बेपत्ता झाल्याचे पोलिस ठाण्यातील तक्रारीत म्हटले असले तरी ते आधीपासूनच "इसीस'च्या संपर्कात होते, असे समजते. पालक म्हणतात, दहशतवाद्यांशी संबंध नाही या तरुणांपैकी फहाद याचे काका इफ्तेकार खान माजी नगरसेवक आहेत. आपल्या पुतण्याची कोणीतरी दिशाभूल केली असून, त्याला मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडे विनंती केली आहे, असे त्यांनी सांगितले. या तरुणांचा दहशतवादी संघटनांशी काहीही संबंध नाही. त्यांना नाहक या संघटनांशी जोडले जात आहे, असे त्यांच्या पालकांनी सांगितले. ---------




 कोण आहेत हे तरुण? - अरीब एजाज माजिद (वय 22) ः कल्याण-पश्‍चिमेला "सर्वोदय रेसिडेन्सी'तील सी विंगमध्ये राहणारा अरीब नवीन हा पनवेल येथील काळसेकर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्यापूर्वी त्याने वाशीच्या फादर ऍग्नेल पॉलिटेक्‍निकमधून डिप्लोमा केला आहे. तो फुटबॉलपटू आहे. कल्याण-पश्‍चिमेला अन्सार चौकात या कुटुंबाचे आणखी एक घर आहे. आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण यांच्यासोबत तो राहत होता. 24 मे रोजी घरातून नमाजाला जात असल्याचे सांगून तो निघून गेला.


 - सहीम फारूख तानकी (वय 26) ः कल्याण-पश्‍चिमेला दुर्गाडी येथील नॅशनल उर्दू हायस्कूलमधून बारावी अनुत्तीर्ण झालेल्या सहीम याला हिंदी, इंग्रजी, उर्दू व मराठी लिहिता-वाचता येते. नवी मुंबईत कोपरखैरणे येथे रिलायन्स फर्स्ट सोर्स कॉल सेंटरमध्ये तो नोकरीला होता. गफूर डॉन चौकातील एक चायनीज पदार्थांची गाडी, तसेच दुर्गाडी येथील चायनीज गाडीवर तो नेहमी मित्रांसोबत दिसत असे. बंदर रोड येथील दूध नाक्‍यावरील घरात दोन भावांसोबत तो राहत होता. त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. 24 मे रोजी कुणाला काहीही न सांगता तो घरातून निघून गेला.



 - फहद तनवीर शेख (वय 24) ः कल्याण-पश्‍चिमेला गोविंदवाडी येथे राहणाऱ्या फहदचे वडील डॉ. तन्वीर मकबूल शेख भिवंडी परिसरात नावाजलेले डॉक्‍टर आहेत. मूळचा आझमगढ येथील फहद पनवेलमधील काळसेकर महाविद्यालयातून बी.ई. मेकॅनिकलचा डिप्लोमा करीत होता. त्यापूर्वी तो आसनगावच्या शिवाजीराव जोंधळे महाविद्यालयात शिकत होता. सहीमप्रमाणेच गफूर डॉन चौकात तो दिसत असे. आई-वडील, चार बहिणी आणि भाऊ अशा कुटुंबात राहणारा फहद घरातून न सांगता 24 मे रोजी निघून गेला.



 - अमन नईम तांडेल (वय 20) ः कल्याण-पश्‍चिमेला गोविंदवाडीत आई-वडिलांसोबत राहणारा अमन कोपरखैरणे येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात बी.ई.च्या दुसऱ्या वर्षाला होता. उत्तम क्रिकेटपटू असलेल्या अमनचे वडील परळ येथे "युरेका फोर्ब्स'मध्ये नोकरीला आहेत. तोसुद्धा गफूर डॉन चौक, कोटबार मशीद येथे मित्रांसोबत दिसत असे. अमन आणि अरीब यांची शाळेत शिकत असल्यापासून मैत्री होती. ------------

No comments: