Monday, January 4, 2010

720 तळीराम वाहनचालकांवर कारवाई

पाच हजार जणांनी मोडले वाहतुकीचे नियम

मुंबई, ता. 1 ः नववर्ष स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर मद्याचे प्याले रिचवून वाहने चालविणाऱ्या 720 तळीरामांवर; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आजवर अवघ्या एका रात्रीत वाहनचालकांवर झालेल्या कारवाईचा हा उच्चांक असल्याचे सांगण्यात येते. गेल्यावर्षी नववर्ष स्वागताच्या रात्री 544 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

नववर्ष स्वागताच्या वेळी दारू पिऊन गाड्या चालविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काल रात्री शहरात ठिकठिकाणी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविली. प्रमुख रस्ते, चौक आणि नाक्‍यांसह आडवाटांवरूनही मद्यपी वाहनचालक हातून सुटून जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिस तयारीत होते. रात्री आठ वाजल्यापासून मद्यपींविरुद्ध सुरू झालेल्या या मोहिमेत 720 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा धाक राहावा यासाठी काही ठिकाणी "स्पीड चेकगन' हातात घेऊन कारवाईसाठी सज्ज असलेल्या पोलिसांचे कटआऊट लावण्यात आले होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांखाली कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी असलेल्या उपस्थितीमुळे यावर्षी नववर्ष स्वागताच्या दिवशी शहरात अपघाताची कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याचेही बर्वे यांनी सांगितले.

कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी 170 वाहनचालकांच्या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला. त्यापैकी 141 वाहनचालकांना एक ते दहा दिवसांपर्यंत साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली, तर एका वाहनचालकाला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुनावणीला अनुपस्थित असलेल्या 28 जणांवर न्यायालयाने वॉरंट बजावले. कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांपैकी दोघांना पोलिसांनी दुसऱ्यांदा पकडले. त्यातील एकाला दोन दिवसांची साधी कैद आणि सहा महिन्यांकरिता वाहतूक परवाना निलंबित करण्याची, तर दुसऱ्याला तीन हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने परवाना निलंबित करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. आज सुनावणी झालेल्या वाहनचालकांपैकी 157 जणांचा परवाना सहा महिन्यांकरिता, तर तीन जणांचा परवाना दोन वर्षांकरिता निलंबित करण्यात आला आहे.

यंदा गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, दादर, गिरगाव, जुहू, वर्सोवा येतील समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी मुंबईकरांची उसळणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. पहाटे उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांची वाहनचालकांविरुद्धची ही मोहीम सुरू होती. यावर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवरही पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या नसल्या तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सह पोलिस आयुक्त बर्वे यांनी सांगितले.

(sakal, 1st january)

No comments: