Monday, January 4, 2010

विश्‍वास साळवे, प्रकाश वाणींना डी.के.ची पार्टी भोवणार


निलंबनाचा प्रस्ताव; आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही गंडांतर



मुंबई, ता. 2 ः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार डी. के. राव याच्यासोबत ख्रिसमसच्या पार्टीला उपस्थित असल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आज गृह खात्याकडे पाठविला. आयपीएस अधिकारी असलेला एक उपायुक्त आणि एका सहायक आयुक्तासह चार अधिकारी; तर एका पोलिस शिपायाचा समावेश आहे.

चेंबूरच्या एका खासगी क्‍लबमध्ये ख्रिसमसनिमित्त झालेल्या पार्टीत डी. के. राव याच्यासोबत राजन टोळीचे सराईत गुंडही उपस्थित होते. छोटा राजन टोळीचा खास हस्तक तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला मुंबई पोलिस दलात विशेष शाखेत उपायुक्त म्हणून काम करणारे विश्‍वास साळवे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रकाश वाणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुळशीदास काकड, ठाणे येथील एक पोलिस निरीक्षक खळतकर आणि एक पोलिस शिपाई साळुंखे अशा पाच पोलिसांची उपस्थिती होती, असे सांगितले जाते. गेली तेरा वर्षे खून आणि खंडणीच्या गुन्ह्यांखाली शिक्षा भोगल्यानंतर तब्बल 30 गुन्ह्यांतून मुक्त झालेल्या डी. के. राव याच्यासोबत पार्टीला राजन टोळीचा सराईत गुंड फरीद तनाशा, सुनील पोतदार यांनीही हजेरी लावली होती. गुंडांसोबत झालेल्या या पार्टीला पोलिसांची उपस्थिती क्‍लबमध्ये बसविण्यात आलेल्या क्‍लोज सर्किट कॅमेऱ्याने टिपली. पहाटेपर्यंत गुंडांच्या हजेरीत पाहुणचार घेणाऱ्या या पोलिसांच्या चौकशीचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काल दिले होते. या पार्टीचे व्हिडीओ क्‍लिप्स, छायाचित्रे व्यक्तिशः पाहिल्यानंतर या पाचही जणांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठविल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली. या पोलिसांची चौकशी होईपर्यंत या पोलिसांना निलंबित ठेवण्यात यावे, असेही या प्रस्तावात सांगण्यात आले आहे. या सर्व पोलिसांविरुद्ध सबळ पुरावे असल्यानेच शिवानंदन यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या पार्टीला उपस्थित असलेल्या अन्य उपस्थितांचे जबाब पोलिसांकडून नोंदवून घेण्यात येणार असून त्यांना साक्षीदार बनविले जाणार असल्याचेही पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, चेंबूरच्या जिमखान्यात झालेल्या त्या पार्टीला मी उपस्थितच नव्हतो. माझा त्या पार्टीशी आणि त्यातील लोकांशी कसलाच संबंध नाही. मला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. यासंबंधी आपण न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त विश्‍वास साळवे यांनी सांगितले. तर, आपण त्या जिमखान्याचे सदस्य आहोत. तेथे आपण पत्नीसोबत जेवण घेण्यास गेलो होतो. प्रसिद्धिमाध्यमांनी दिलेले वृत्त हे आपल्याविरुद्धचे षड्‌यंत्र असल्याचा दावा सहायक पोलिस आयुक्त प्रकाश वाणी यांनी केला आहे.

(sakal,3rd january)

No comments: