Thursday, January 15, 2015

ओबामा यांच्या पायाखालची जमिन आपल्याला सरकवता येईल

 "अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पायाखालची जमिन आपल्याला सरकवता येईल.ती सुद्धा अवघ्या शंभर डॉलर खर्चात.पण, त्यासाठी आपल्याकडे धैर्य असायला हवं,' हे फेसबुक चॅटींग आहे वांद्रे- कुर्ला संकुल येथील अमेरीकन ऍम्बेसीतील उच्चपदस्थांची मुले शिकत असलेल्या शाळेत स्फोट घडविण्याचा कट आखल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या अनीस अन्सारीचे. सध्या तुरूंगात असलेल्या अन्सारीने "उरासिम लोगन' या नावाने एका समविचारी तरूणासोबत केलेल्या या चॅटींगचा संपूर्ण सारांश "सकाळ' चया हाती लागला आहे. 

अंधेरीच्या एका बहूराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला असलेल्या अनीस (24) ला एटीएसने ऑक्‍टोबर महिन्यात अटक केली. इस्लामिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरीया (आयसीस) च्या कारवायांना समर्थन करणाऱ्या अनीसने बीकेसीतील शाळेवर पेशावर सारख्या हल्ल्याचा कट आखल्याचे फेसबुकवरील त्याच्या चॅटींगमधून स्पष्ट होते.स्वतःला अमेरीकेत राहत असल्याचे सांगणाऱ्या ओमर इल्हाज नावाच्या व्यक्तीसोबत त्याचे हे चॅटींग चालत होते.अवघ्या दोन महिन्यांत पूर्णत्वाला येणाऱ्या या कटामुळे जगाला हादरा देण्याचे वक्तव्य करणारा अनीस त्याच्या साथीदाराला बॉम्ब तयार करण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा सांगतो. व्हेईकल बॉम्ब, आयईडी, प्रेशर कुकर आणि थर्माईड बॉम्बबद्दल सुद्धा त्याची ओमर सोबत चर्चा झाली होती. अनिसने ओमर सोबत केलेले हे चॅटींग एटीएसने पकडले होते. वेळेत केलेल्या या कारवाईमुळे एटीएसने घातपाती कारवाईचा मोठा कट उधळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अनीसने ओमरला अमेरीकेत घातपाती कारवाई करण्याचा सुद्धा सल्ला दिला होता. 
आयसीसचा प्रमुख अबू बकर अल बगदादी, लंडनमधील मौलाना नोमन अली खान आणि दक्षिण आफ्रीकेतील मौलाना अहमद बदक यांच्या जहाल वक्तव्याचे व्हीडीओ सुद्धा अनीसच्या फेसबुक अकाऊंटवर होते. 
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसने काल (ता.14) अनीसविरूद्ध शिवडी येथील सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 778 पानांच्या च्या आरोपपत्रात फॉरेन्सिक सायन्स तज्ञांसह पन्नास साक्षीदार आहेत.याशिवाय एटीएसने सहा कॉम्प्युटर हार्ड डीस्क, व एका मोबाईल फोनचा चाळीस पानी फॉरेन्सिक सायन्सचा अहवाल जोडला आहे.या प्रकरणात एटीएस ओमर या आरोपीचा शोध घेत आहेत.

No comments: