Friday, June 20, 2008

ज्ञानेश
-----
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 20 ः ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे झालेल्या बाम्बस्फोटप्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाने पेण आणि सातारा येथील तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा हस्तगत केला. पेण येथील छाप्यात दहशतवाद विरोधी पथकाने गावचा पोलिस पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याला मुंबईत आणण्यात येत असल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात "आम्ही पाचपुते' या नाटकाचा प्रयोग सुरु असताना 4 जून रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने सनातन संस्थेच्यारमेश हनुमंत गडकरी व (50) व मंगेश दिनकर निकम (37) यांना 14 जून रोजी अटक केली.यानंतर पोलिसांनी पनवेलच्या सनातन आश्रमात छापा घालून दिड हजारहून अधिक कार्यकर्त्यांची चौकशी केल्यानंतर संतोष सीताराम आंग्रे (26, रा. लांजा) आणि विनय भावे (26,रा. पेण) या दोघांना अटक केली. "आम्ही पाचपुते' या नाटकात हिंदू देवादिकांचे विडंबन होत असल्याच्या निषेधार्थ हा स्फोट घडविल्याची कबूली आरोपींनी दिली होती.या आरोपींचा पनवेल येथील सिनेराज चित्रपट गृहात झालेल्या स्फोटात तसेच वाशीच्या विष्णदास भावे नाट्यगृहात बॉम्ब पेरल्याच्या प्रकरणात सहभाग आढळला होता.
या तीन्ही घटनांचा सुत्रधार समजल्या जाणाऱ्या विनय भावे याला बॉम्ब बनविण्याची माहिती होती. गावात विहीर खोदण्यासाठी जिलेटिन व डिटोनेटरचा वापर करणाऱ्या विनयच्याच घरात ठाणे, वाशी व पनवेल येथील स्फोटांसाठी आवश्‍यक असणारे बॉम्ब बनविण्यात आल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यामुळे सतत दोन दिवस पनवेलच्या देवत येथील सनातन संस्थेत छापे घालून तेथील कार्यकर्त्यांची विचारपुस करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी रात्री विनय राहत असलेल्या पेणच्या वरसई गावात छापा घातला. विनयच्या चौकशीत उपलब्ध झालेल्या माहितीवरून पोलिसांनी बहिरीदेवी डोंगराजवळ असलेल्या त्याच्या शेतात एका ठिकाणी गाडण्यात आलेले 20 डिटोनेटर, 19 जिलेटीनच्या कांड्या, रिमोट सह 2 सर्कीट,2 टायमर,1 सर्कीट असा मोठा स्फोटक साठा हस्तगत केला.तसेच येथील बाणगंगा नदीच्या पात्रात टाकण्यात आलेला साठाही यावेळी जप्त करण्यात आला.या साठ्यात रिमोटसह 3 सर्कीट , 1 सर्कीट , 12 बॅटरी, 1 टायमर हा साठा सापडला.गावचा पोलिस पाटील असलेला हरीभाऊ दिवेकर याने विनयच्या सांगण्यावरून हा साठा नदीच्या पात्रात टाकला होता.पोलिसांनी दिवेकर याला ताब्यात घेतले असून चौकशीसाठी त्याला मुंबईत आणण्यात येत असल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.पेण येथील छाप्यांसोबत पोलिसांनी आरोपी मंगेश निकम याच्या चौकशीत उघडकीस आलेल्या माहितीवरून सातारा येथेही छापा घातला.या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर डिटोनेटर, बॅटरी व टायमर अशी स्फोटके सापडल्याचेही सिंग यांनी सांगितले.दहशतवाद विरोधी पथकातील अधिकारी अद्याप घटनास्थळावर असून पोलिस पाटील दिवेकर यांच्या चौकशीत आणखी काही महत्वपुर्ण माहिती मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

No comments: