Wednesday, June 25, 2008

ज्ञानेश चव्हाण/सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.25 ःउच्चभ्रु समाजातील तरूणाईला बसणारा अंमली पदार्थांच्या सेवनाचा विळखा सोडविण्याकरीता या समाजात कार्यरत असणारे "संघटीत रॅकेट्‌स' नष्ट करण्यासाठी खबऱ्यांचे जाळे तयार करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.येत्या काळात शहरातील डिस्को थेक, पब्ज, मोठ्या हॉटेल्समध्ये रंगणाऱ्या लेट नाईट पार्ट्या,तसेच रेव्ह पार्ट्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाची करडी नजर राहणार आहे.याशिवाय उच्चभ्रु समाजात अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाया करीत असतानाच त्यांच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास पोलिस करणार आहेत.
रात्री-अपरात्री होणारे जागरण,काम अथवा अभ्यासामुळे येणाऱ्या प्रचंड मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी तरूण पिढी ब्राऊन शुगर,कोकेन,चरस गांजा यांच्या सेवनाकडे वळली आहे.गेल्या काही वर्षांत ऍम्स्टामाईन,एलएसडी,एक्‍सटसी,एमएमडीए अशा अंमली पदार्थांच्या सेवनातही प्रचंड वाढ झाली आहे.यापुर्वी समाजातील उच्चभ्रु घटकातील व्यसनाधिनता आता सर्वसामान्य कुटुंबातील तरूण पिढीतही चांगचीच फोफावत आहे.
मुंबईसारख्या महानगरांतील युवावर्गात व्यसनाधिनता पसरविण्यासाठी संघटीत टोळ्या कार्यरत आहेत.देशात राजस्थान व मध्यप्रदेश येथून मुंबईत हेरॉईन,ब्राऊनशुगर तर काश्‍मिर,मनिला,नेपाळ येथून चरस सारखे अंमली पदार्थ चोरट्या मार्गाने मुंबईत येतात.दक्षिण अमेरिका,पेरू,बोलूविया येथे उत्पादन होणाऱ्या कोकेनच्या व्यसनाकडे उच्चभ्रु समाजात फॅशन म्हणून पाहिले जाते.या पदार्थांचा मुंबईसारख्या महानगरातील व्यापार कोट्यावधी रूपयांचा आहे.अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2007 साली 477 ठिकाणी केलेल्या कारवायांत 445 किलो 361 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत केला.यावेळी पोलिसांनी 2764 आरोपींना अटक केली असून या साठ्याची भारतीय बाजारातील किंमत 75 लाख 12 हजार रूपये एवढी आहे.यंदा 19 जूनपर्यंत पोलिसांनी केलेल्या 375 कारवायांत 1456 आरोपींना अटक झाली आहे.त्यांच्याकडून 136 किलो अंमली पदार्थ जप्त केले असून या साठ्याची किंमत सुमारे 71 लाख रूपये आहे.या कारवायांतर्गत अटक झालेल्या आरोपींत सेवनार्थींची संख्या लक्षणीय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरूण पिढीला त्यातून बाहेर काढण्यासाठी या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाया करणे तसेच उच्चभ्रु समाजात अंमली पदार्थ पुरविणाऱ्या संघटीत टोळ्या नेस्तनाबुत करण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक प्राधान्य देणार आहे.व्यसनाधिनतेत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी 125 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे या पथकाचे प्रमुख पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी "सकाळ' शी बोलताना दिली.लहान मुलांमध्ये व्यसनाधिनतेसाठी औषधांचा उपयोग करण्याचे प्रकार वाढत आहेत.या प्रकारांना आळा घालण्यासाठी अशा औषधांचा अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली अंतर्भाव करण्याकरीता वरीष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
------------------------------------------

2007 मध्ये अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर केलेल्या कारवाया

अंमली पदार्थ प्रकार - दाखल गुन्हे - अटक आरोपी - वजन - किंमत

1) ब्राऊन शुगर - 24 - 51 - 9 किलो 407 ग्रॅम- 26,65700 रूपये
2) चरस - 53- 121 - 102 किलो 995 ग्रॅम- 28,60,850
3) कोकेन - 11- 30 - 217 ग्रॅम- 7,11,000
4) गांजा - 21- 60 - 330 किलो 450 ग्रॅम- 4,59,000
5) अफु - 1 - 8 - 280 ग्रॅम - 5600
------------------------------
19 जून 2008 पर्यंतच्या कारवाया पुढीलप्रमाणे

अंमली पदार्थ प्रकार - दाखल गुन्हे - अटक आरोपी - वजन - किंमत
1) ब्राऊन शुगर - 15 -48- 17 किलो 222 ग्रॅम - 48,82,000
2) चरस - 19 - 37- 10 किलो 503 ग्रॅम - 2,84,600
3) कोकेन - 8 - 18 - 456 ग्रॅम - 18,13500
4) गांजा - 14- 48- 107 किलो 950 ग्रॅम - 1,12,450

No comments: