Thursday, June 26, 2008

ज्ञानेश
--------------------
प्रवेश घेताय; पण जरा जपून...!
आयुष्यभर कष्ट करून जमविलेला पैसा आणि पाल्याच्या शैक्षणिक जीवनातील मौल्यवान वर्षे वाया गेल्यावर होणाऱ्या दुहेरी नुकसानाचा किंचितसा विचार करून बघा. कल्पना करवत नाही ना..? चांगले करिअर आणि परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या देणारे अभ्यासक्रम शिकविण्याच्या नावाखाली मुंबईसारख्या महानगरांत एका रात्रीत उभ्या राहणाऱ्या काही खासगी शिक्षण संस्थांचे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू झाले आहे. आपल्या पाल्याची महत्त्वपूर्ण वर्षे आणि पै-पै करून गोळा केलेला पैसा वाया जाऊ नये असे वाटत असेल, तर पाल्याला खासगी शिक्षण संस्थांच्या विलोभनीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना त्या अभ्यासक्रम व संस्थेची इत्यंभूत माहिती मिळविणे अत्यावश्‍यक झाले आहे.
आयुष्याचा "टर्निंग पॉईंट' समजल्या जाणाऱ्या बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. कला व वाणिज्य शाखेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची मान्यता असणाऱ्या अभ्यासक्रमांना प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतले. मात्र गेल्या काही वर्षांपासून "सीईटी'च्या निकालांवर भवितव्य अवलंबून असणारे विज्ञान शाखेचे विद्यार्थी चांगले गुण मिळाल्यानंतर प्रगतीच्या नव्या वाटा चोखळण्याच्या प्रयत्नात असतात. मिळालेल्या डिक्‍स्टींग्शनच्या जोरावर मरीन इंजिनिअरिंग मर्चंट नेव्ही, एव्हिएशन, केबीन क्रू, एअरहोस्टेस, हॉटेल मॅनेजमेंटसारख्या आकर्षक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना दिसत आहेत. खासगी शिक्षण संस्थांनी सुरू केलेल्या या "डायसी' कोर्सेसना प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या उड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळेच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया दरवर्षीप्रमाणे लांबत असल्याचे चित्र यंदाही आहे. दहावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संख्या त्या मानाने कमी आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागण्याच्या सुमारास नव्याने सुरू झालेल्या शिक्षण संस्था वर्तमानपत्रांत मोठ्या जाहिराती देतात. लाखो रुपयांची वार्षिक फी भरून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जगभरात कुठेही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून देण्याचा दावा या खासगी शिक्षण संस्था करतात. काही शिक्षण संस्था, तर परदेशातील नामांकित विद्यापीठांशी संलग्न असल्याची खोटी माहिती विद्यार्थी व पालकांना बिनदिक्कतपणे देतात. अभ्यासक्रमाचे एक वर्ष अथवा सहा महिने परदेशात शिक्षणाची संधीही उपलब्ध करून देण्याच्या आश्‍वासन देणाऱ्या संस्थांचे पेव सध्या सर्वत्र आहे. शेकडो विद्यार्थ्यांकडून गोळा झालेली अभ्यासक्रमाची कोट्यवधी रुपयांची फी घेऊन एखाद्या दिवशी हे संस्थाचालक आपला गाशा गुंडाळतात. पालक आणि विद्यार्थ्यांनी पाहिलेले स्वप्न क्षणात धुळीला मिळाल्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या फसवणुकीमुळे पालकांनी त्यांच्या पाल्यांना प्रवेश देताना जपून पावले टाकणे आवश्‍यक झाले आहे. खासगी शिक्षण संस्थांमार्फत सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमांची चौकशी न करता फक्त चांगले परतावे मिळण्याच्या लालसेपोटी या विद्यार्थी आणि पालकांची घोर फसवणूक होते.
गेल्यावर्षी उरणच्या बॉम्बे सायन्स मरीन इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने शेकडो पालक आणि विद्यार्थ्यांना कोट्यवधींना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला. अमरावतीच्या शासकीय तंत्रशिक्षण केंद्रात एका खासगी संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंट आणि एअर होस्टेसच्या अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. शिक्षण क्षेत्रातील या बाजारूपणामुळे पालकांनी त्यांच्या पाल्याला ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे, त्या संस्थेची काळजीपूर्वक चौकशी करणे कधीही हितावहच.

No comments: