Friday, June 6, 2008

मारियानेच नीरजला आग्रह करून थांबविले

राकेश मारिया ः नीरज ग्रोव्हरची हत्या पूर्वनियोजित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज आणि नौदलात लेफ्टनंट असलेला तिचा प्रियकर एमिल मॅथ्यु यांनी सिनर्जी ऍडलॅब्जचा क्रिएटीव्ह हेड निरज ग्रोव्हर याची केलेली हत्या पुर्वनियोजीत होती. तीघांच्या मोबाईल फोनवर झालेल्या संभाषणातून हे उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश यांनी आज पत्रकारंशी बोलताना दिली.
मालिकांत काम मिळविण्यासाठी मुंबईत आलेली दक्षिणात्य अभिनेत्री मारिया सुसायराज हिने तिचा प्रियकर एमिल जेरॉम मॅथ्यु याच्या सोबतीने नीरज ग्रोव्हर याची 7 मे रोजी सकाळी अमानुषपणे हत्या केली. मालाडच्या धीरज सॉलिटर या इमारतीतील मारियाच्या घरात झालेल्या या खून प्रकरणामुळे शहरात खळबळ माजली होती. हत्येनंतर नीरजच्या मृतदेहाचे बारीक तुकडे केल्यावर ते तीन बॅगेत भरून मनोरच्या जंगलात नेऊन जाळले होते.या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 20 मे रोजी मारिया व तिचा प्रियकर मॅथ्यु याला अटक केली.

नीरजच्या हत्येनंतर गुन्हे शाखेचे पोलिस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. तत्पुर्वी गेल्या आठवड्यात मारियाने न्यायालयापुढे केलेल्या गुन्ह्याची मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर इन कॅमेरा कबुली दिली होती. पोलिसांना तीघांच्या मोबाईल फोनचे रेकॉर्डस नुकतेच मिळाले आहेत. या रेकॉर्डसनुसार 6 मेच्या रात्री साडेआठ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान दोन वेळा मारियाने नीरजला स्वतः फोन करून तीच्या घरी बोलावले होते. दुसऱ्या दिवशी काम असल्याने नीरज जाण्यास तयार नव्हता. मात्र मारियाच्या आग्रहामुळेच तो तीच्या घरी गेला होता. नीरज घरी आल्यानंतर तीने कोची येथे असलेला तिचा प्रियकर मॅथ्यु याला फोन केला. नीरज आपल्याशी लगट करीत असल्याचे तीने मॅथ्युला सांगितले होते. नीरज घरात असल्याचे कळल्यानंतर साडेअकरा वाजता मॅथ्युने दुसऱ्या मित्राच्या नावाने विमानाचे तिकिट ऑनलाईन काढले आणि सकाळी पावणेचार वाजता तो मुंबईत दाखल झाला. यानंतर त्याने मारियाच्या घरात असलेल्या नीरजचा मारियाच्या सोबतीने खून केला. या सगळ्या घटनाक्रमावरून नीरजची झालेली हत्या मारिया आणि मॅथ्यु यांनी रचलेला पुर्वनियोजीत कट होता हे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्यांच्या गुन्ह्याच्या कलमांत वाढ केली असून त्यात पुर्वनियोजनाची कलमेही टाकल्याचे सह पोलिस आयुक्त मारिया म्हणाले.
...
(चौकट)
हत्येमागे "कास्टिंग काऊच'चा वाद
मालिकेत रोल देण्याच्या निमित्ताने नीरजने आपल्याशी संबंध ठेवले. प्रत्यक्षात मात्र कोणतीच भूमिका न देता त्याने फक्त आपला वापर केला. म्हणूनच मॅथ्युच्या सोबतीने त्याचा खून केल्याची कबुली तीने पोलिसांना दिल्याचे समजते. या प्रकरणामुळे नीरज ग्रोव्हरची हत्या कास्टिंग काऊच प्रकरणातून झाली असावी का याचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली.

No comments: