Tuesday, July 1, 2008

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.1 ः शहरातील वाहतुक व्यवस्था नियंत्रित करण्यात वाहतुक शाखेच्या पोलिसांना सर्वसामान्य नागरीकांची मदत मिळावी यासाठी "वाहतुक रक्षक' नावाची अभिनव योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेत स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या नागरीकांना आठवड्यातून किमान चार तास रस्त्यावर उभे राहून पोलिसांच्या मदतीने वाहतूकीचे नियमन करता येणार आहे.
रस्त्यावर वाहने चालविताना होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या मुंबईकरांना नवीन नाही.बऱ्याचदा वाहतूक नियंत्रणात होणाऱ्या थोड्याश्‍या ढिलाईमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर " पिकअवर्स ' मध्ये होणाऱ्या खोळंब्यामुळे वाहनचालकांना तासनतास ताटकळत रहावे लागते.पावसाळ्याच्या दिवसांत वाहतुक कोंडीची तसेच विस्कळीत होण्याची समस्या आणखीनच गंभीर होते.दिवसेंदिवस वाढत असलेली वाहन संख्या आणि त्यामानाने अपुर्ण पडणाऱ्या रस्त्यावर उद्भवणाऱ्या या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतुक पोलिसांनी वाहतुक रक्षक योजनेच्या माध्यमातून चांगला तोडगा काढला आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 45 वर्षे वयोगटातील नागरीकाला स्वेच्छेने वाहतुक रक्षक होता येणार आहे.किमान तीन वर्षांपूर्वीचा वाहतुक परवाना असणाऱ्या नागरीकांना या योजनात सहभागी होता येणार आहे.या वाहतुक रक्षकांना दररोजच्या कामातून वेळ काढून आठवड्यातून किमान चार तास रस्त्यावर उतरून वाहतूक पोलिसांच्या सोबतीने प्रत्यक्ष वाहतुक नियमनाचे काम करावे लागणार आहे.या कामाच्या मोबदल्यात त्यांना वाहतुक पोलिस विभागाकडून मात्र कसलाही भत्ता अगर मानधन देण्यास नकार दिला आहे.तसेच रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही नाकारण्यात आले आहेत. योजनेत सहभागी होणाऱ्यांना आवश्‍यक असणारे आर्म बॅन्ड,शिटी देखील स्वतःच विकत घ्यावी लागणार असल्याची माहिती वाहतुक शाखेचे सह पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली.रस्ते वाहतुक नियमनात पोलिसांना सामाजिक जाणिव असणाऱ्या नागरीकांचा सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.या वाहतुक रक्षकांना नेमणुकीपूर्वी एक छोटेखानी अभ्यासक्रम
पुर्ण करावा लागणार असून ही निवड तीन वर्षांकरीता राहणार आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी नागरीकांना अर्जाचे वितरण ऑनलाईन करण्यात येत असून त्याला नागरीकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे बर्वे म्हणाले.

No comments: