Tuesday, August 19, 2008

ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.19 ः अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांना हवा असलेला प्रमुख गुन्हेगार तौकिर यानेच सानपाडा येथील अमेरिकन नागरीक केनेथ हेवूड याचा कॉम्प्युटर हॅक केल्याची शक्‍यता आहे.जयपुर, अहमदाबाद ,उत्तरप्रदेश व बंगळूरू येथे झालेल्या स्फोटांच्या धमकीचे ई-मेल पाठविले होते अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
अहमदाबाद येथे 26 जुलै रोजी झालेल्या सिरियल बॉम्बस्फोटांचा ई- मेल सानपाड्याच्या गुनीना इमारतीत राहणाऱ्या केनेथ हेवूड यांच्या कॉम्प्युटरवरून पाठविण्यात आला होता.तपासाअंती हेवूडचा कॉम्प्युटर हॅक झाल्याचे स्पष्ट झाले. वाय फाय तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या हेवूडचा कॉम्प्युटर तौकिर उर्फ अब्दुस सुभान कुरेशी यानेच हॅक केल्याची शक्‍यता आहे. सिमीचा सक्रीय सदस्य असलेला तौकिर मिरारोडच्या नयानगर येथील रहिवासी आहे. निष्णात संगणकतज्ञ असलेला तौकिर एम टेक करणाऱ्या कॉम्प्युटरपेक्षाही चांगला हॅकर आहे. देशभरात सिमीने घडविलेल्या बॉम्बस्फोटांचे मेलही त्यानेच पाठविले होते हे तपासात उघड होत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकारांना दिली. डोंगरीच्या अंजूमन इस्लाम शाळेत शिकलेल्या तौकिरने विप्रो,सिप्झ व फोर्ट येथे नोकरी केली आहे.2004 मध्ये सिमीच्या संपर्कात आल्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता.त्यावेळी त्याने धार्मिक कार्यात पुर्णवेळ वाहून घेण्यासाठी राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. अहमदाबाद स्फोटांप्रकरणातील महत्वाचा आरोपी असलेल्या तौकिरचा पोलिस कसून शोध घेत आहेत. दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी मिरारोड येथे राहणाऱ्या त्याच्या कुटूंबीयांची चौकशी केली, तेंव्हा गेल्या आठ वर्षांपासून त्याचा कसलाच संपर्क नसल्याचे त्याच्या कुटूंबीयांचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र तौकिरला अडीच वर्षांची मुलगी असल्याने त्याची घरी येजा असावी अशी शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.
--------------------

तर हेवूडला मुंबईत आणणार ...

अहमदाबाद स्फोटांचा ई- मेल पाठविल्याप्रकरणी संशयित असलेल्या केनेथ हेवूड याने दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांना कोणतीही सूचना न देता अमेरिकेला केलेल्या पलायनामुळे त्याच्यावर घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन झाले आहे.त्याच्या लाय डिटेक्‍टर व ब्रेन मॅपिंग चाचण्यांचे अहवाल निरंक आल्याने तो पोलिसांना नको असला तरी घातलेल्या अटींचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल .वेळ प्रसंगी त्याला मुंबईतही आणण्यात येईल अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली.

No comments: