Monday, August 18, 2008

समिशी संबंधित इम्तियाज शेखला अटक
एटीएस ः अहमदाबाद बॉम्बस्फोटांबाबात चौकशी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 18 ः ठाणे ग्रामीण पोलिसांनी माणिकपूर येथून सिमी संघटनेशी घनिष्ठ संबंध असलेल्या इम्तियाज बाबामिया शेख (30) या पुण्यातील युवकाला अटक केली. दरोड्याच्या प्रयत्नात अटक केलेल्या या आरोपीचा अहमदाबाद बॉम्बस्फोटांशी संबंध आहे का याची चौकशी सुरू असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी दिली. बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेल्या अन्य दोघांचेही सिमीशी संबंध स्पष्ट झाल्याने या शहरात अतिरेकी संघटनांचे स्लिपर सेल कार्यरत असण्याची शक्‍यताही करकरे यांनी वर्तविली आहे.
अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा गुजरात पोलिसांनी नुकताच छडा लावला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातून नदीम खान आणि फैय्याज शेख यांना बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी शनिवारी अटक केली. हे दोघेही सिमीचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले असतानाच ठाणे ग्रामीण पोलिसांनी माणिकपूर येथून इम्तियाज बाबामिया शेख (30) याला अटक केली. पुण्याच्या धीमपुरा येथील लष्कर कॅम्पमध्ये राहणाऱ्या इम्तियाजचा मटण विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचे सिमी संघटनेशी घनिष्ठ संबंध आहेत. ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्याला दरोड्याच्या तयारीत असताना अटक केली. दहशतवाद विरोधी पथक लवकरच त्याची कस्टडी घेणार आहे. अहमदाबाद येथे तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या तुकडीला या तिघांची माहिती देण्यात आली. तेथे अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून मुंबईत अटकेत असलेल्या या आरोपींचा अहमदाबाद स्फोटांशी संबंध आहे का हे पाहता येणार आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केलेल्या बिलाल कागजी याचे फैय्याज आणि नदीम याच्याशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे.
या कटाचा सूत्रधार अबू बशीर याच्यासह दहा जणांना गुजरात पोलिसांनी नुकतीच अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये तिघांची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाने दिली होती. मध्य प्रदेश येथून अटक केलेला "सिमी'चा सरचिटणीस सफदर नागोरी याच्या नार्को तपासणीत आलेल्या पंचवीस जणांची यादी गुजरात पोलिसांना दिली होती. त्यातील तिघांना या स्फोटांप्रकरणी अटक झाली असून अन्य संशयितांचा तपास सुरू आहे.

---------------
चौकट
---------
अहमदाबाद स्फोटांप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने आतापर्यंत पंधराशेहून अधिक संशयितांची चौकशी केली. त्यात अभियंते, शिक्षक, डॉक्‍टर, व्यावसायिक यांच्यासारख्या उच्चविद्याविभूषितांचा समावेश आहे. आतापर्यंत केलेल्या चौकशीत पाच जण डॉक्‍टर; तर बाराहून अधिक अभियंते तसेच संगणकतज्ज्ञ असल्याचे उघडकीस आल्याची माहिती या पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी या वेळी दिली. अठरा वर्षांत पोलिसांनी 579 दहशतवाद्यांना अटक केल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: