Monday, August 25, 2008

मुंबईत घातपात घडविण्याचा ई-मेल खालसा कॉलेजातून

मुंबईत घातपात घडविण्याचा ई-मेल खालसा कॉलेजातून

एटीएसचा निष्कर्ष ः निवासी वसाहतीत कोम्बिंग ऑपरेशन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 24 ः अहमदाबाद बॉम्बस्फोटानंतर मुंबईत घातपात घडविण्याबाबतच्या धमकीचा ई-मेल माटुंग्याच्या खालसा महाविद्यालयातून पाठविल्याचे उघडकीस आले आहे. या मेलसंबंधी दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी आज महाविद्यालयात चौकशी केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून महाविद्यालयातील कॉम्प्युटर कोणी तरी हॅक करून हा मेल पाठविल्याची शक्‍यता दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांनी "सकाळ'शी बोलताना वर्तविली. दरम्यान, या प्रकारानंतर दहशतवादविरोधी पथकातील पोलिसांनी खालसा महाविद्यालयाशेजारी असलेल्या निवासी वसाहतीत आज कोम्बिंग ऑपरेशन केले.

अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेनंतर मुंबईत घातपात घडविण्याची धमकी इंडियन मुजाहिदीन या संघटनेने दिली. "अल अरबी' ई-मेल ऍड्रेसवरून काल रात्री यासंबंधीचा ई-मेल काही वृत्तवाहिन्यांना पाठविण्यात आला. या ई-मेलमुळे पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने हा ई-मेल पाठविणाऱ्या कॉम्प्युटरचा शोध घेण्यास सुरवात केली. तपासाअंती हा ई-मेल खालसा महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर लॅबमधून पाठविण्यात आल्याचे आयपी ऍड्रेसवरून स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिस सकाळीच खालसा महाविद्यालयात चौकशीकरिता गेले. महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर लॅबमध्ये असलेल्या वीस कॉम्प्युटरपैकी एका काम्प्युटरवरून हा मेल पाठविण्यात आला; मात्र याबाबत अद्याप प्राथमिक चौकशी सुरू आहे. हा ई-मेल महाविद्यालयातील कॉम्प्युटर हॅक करून पाठविला असावा, अशी शक्‍यता दहशतवादविरोधी पथकाचे सह-आयुक्त करकरे यांनी दिली. चौकशीनंतर आवश्‍यकता भासल्यास महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर लॅबमधील कॉम्प्युटर फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासाकरिता पाठविण्यात येतील, असेही करकरे यांनी सांगितले.
दरम्यान, खालसा महाविद्यालयातून पाठविण्यात आलेल्या या धमकीच्या मेलनंतर या परिसरातील निवासी वसाहतींत आज दिवसभर दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. 26 जुलैला अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेपूर्वी काही मिनिटे स्फोटांच्या धमकीचा ई- मेल सानपाड्याच्या गुनानी इमारतीत राहणाऱ्या केनेथ हेवूड या अमेरिकन नागरिकाच्या कॉम्प्युटरवरून पाठविण्यात आला होता. तपासात हेवूडचा कॉम्प्युटर हॅक करून तो पाठविण्यात आल्याचेही उघड झाले होते. सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या दोन्ही संघटना वेगवेगळ्या आहेत. येत्या काही दिवसांत मुंबईतील प्रमुख ठिकाणी घातपाती स्फोट घडविले जातील, अशी धमकी देणारा असाच एक ई-मेल पंधरा दिवसांपूर्वी पंजाब येथून पाठविण्यात आला होता; मात्र तो बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. दरम्यान, बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत घातपाती कारवाया घडविण्याची धमकी देणारा हा पाचवा मेल असल्याची माहिती या पथकाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकारांना दिली.

No comments: