Thursday, August 28, 2008

"त्या' सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या केबिन्स रिकाम्या

कार्यालयात सामसूम ः अन्य अधिकाऱ्यांनी तोंड लपविले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 ः नेहमी वर्दळ असलेले सीमाशुल्क विभागाच्या अंधेरीतील कार्यालयात आज सामसूम होती. कार्यालयात एकही अधिकारी नव्हता, होती ती एकमेव स्वीय सहायक आणि दोन कामगार. लोणावळ्यात एका बंगल्यात "सेक्‍स रॅकेट'प्रकरणी 22 अधिकाऱ्यांना अटक केल्याचे वृत्त येथे येताच येथील अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. अटक केलेले सर्व अधिकारी याच कार्यालयातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे संपूर्ण कार्यालयच ओकेबोके दिसत होते.

लोणावळा शहर पोलिसांनी खंडाळ्याच्या ताज कॉटेज बंगल्यावर रात्री उशिरा हा छापा टाकला. सीमाशुल्क विभागातील 22 अधिकारी, त्यांचे सहा मित्र आणि 11 बारबाला असे 29 जण या बंगल्यात मद्यधुंद अवस्थेत पार्टी करताना आढळले. लॅपटॉपवर ब्ल्यू फिल्म पाहत बारबालांसह अश्‍लील नृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्यांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली. हे वृत्त येथे येताच अधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली, तर आपल्या सहकाऱ्यांच्या अशा कृत्यामुळे अनेकांनी तोंड लपविणेच पसंत केले.

सीमाशुल्क विभागाच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिमंडळाचे कार्यालय मरोळच्या मकवाना लेन येथील आवास कॉर्पोरेट पॉइंट इमारतीतील सहाव्या मजल्यावर आहे. या कार्यालयात आज सामसूमच होती. याच कार्यालयातील अधिकाऱ्यांना अटक झाल्याने येथील बहुसंख्य केबिन व टेबल रिकामेच होते. विमानतळ विभागाचे सीमाशुल्क आयुक्त तरुणकुमार गोविल यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नव्हते, तर ते फोर्ट येथील कार्यालयात गेल्याची माहिती गोविल यांच्या स्वीय सहायकांनी "सकाळ'ला दिली.
या प्रकरणी फोर्टच्या न्यू कस्टम्स हाऊस येथील मुख्यालयात माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तेथे यासंबंधीची माहिती अंधेरी कार्यालयातूनच मिळू शकेल, असे येथील अंमलबजावणी विभागातील एका अधिकाऱ्याने "सकाळ'ला दिली. सीमाशुल्क विभागाचे जनसंपर्क अधिकारीही गैरहजर असल्याचे येथील सुरक्षा रक्षकांनी सांगितले. एकूणच आज या खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांपासून दूरच राहणे पसंत केले.

No comments: