Wednesday, March 31, 2010

पोलिस महासंचालक पदासाठी रॉय, श्रीवास्तव, गफूर यांची नावे


निवड समितीच्या बैठकीत शिवानंदन यांचे नाव पिछाडीवर




तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नियुक्तीचा तिढा अखेर सुटला आहे. महासंचालकांच्या नियुक्तीसंबंधी राज्य सरकारने गठित केलेल्या निवड समितीच्या आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या पदाकरिता अनामी रॉय, पी. पी. श्रीवास्तव व हसन गफूर या तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांवर प्रामुख्याने चर्चा झाली. या अधिकाऱ्यांच्या नावांची अंतिम यादी उद्या (ता. 14) गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पाठविली जाणार आहे. सेवाज्येष्ठतेत कमी पडत असल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांचे नाव या स्पर्धेतून मागे पडल्याचे गृह खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
राज्य पोलिस दलात अतिशय महत्त्वाचे समजले जाणारे राज्याचे पोलिस महासंचालक पद एस. एस. विर्क यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होते. ऑक्‍टोबरअखेर विर्क यांच्या झालेल्या सेवानिवृत्तीनंतर सरकारने या पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक अनामी रॉय यांच्याकडे सोपविला. याच काळात पोलिस दलात असलेले अंतर्गत वाद व गटबाजीने उचल खाल्ल्याने गेले तीन महिने हे पद भरण्यासंबंधी अंतिम निर्णय सरकारने घेतला नव्हता. या पदावर योग्य अधिकाऱ्याची निवड व्हावी यासाठी राज्याचे मुख्य सचिव, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव व महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा त्रिसदस्यीय समितीचे सरकारने गठण केले होते.
सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या दोन महत्त्वाच्या निकषांचा विचार करता, या पदासाठी अनामी रॉय, पी. पी. श्रीवास्तव, हसन गफूर व डी. शिवानंदन या चार वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनेलमधून ही नियुक्ती करण्यात येणार होती. याबाबत गठित करण्यात आलेल्या समितीची आज मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तब्बल दीड तास झालेल्या या बैठकीत सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या निकषांवर अनामी रॉय, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव आणि गृहनिर्माण विभागाचे महासंचालक हसन गफूर यांच्याच नावावर विशेषत्वाने खल झाल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. सेवाज्येष्ठतेत कमी पडत असल्याने पोलिस महासंचालक पदाच्या स्पर्धेत मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन मागे पडल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी उद्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे पाठविली जाणार असून, यापैकी एका अधिकाऱ्याच्या नावावर येत्या आठवडाभरात शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती गृह खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.


(sakal, 14 th january)

No comments: