Thursday, July 24, 2008

पोलीस घरे

ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.24 ः पोलिस वसाहतींतील लहान आणि अपूर्ण खोल्यांत सेवाकाळातील अर्ध्याहून अधिक काळ घलविणाऱ्या 620 पोलिस कर्मचाऱ्यांना शीवच्या प्रतिक्षानगर येथे म्हाडाच्या माध्यमातून मालकी हक्कांची घरे देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांची अंतिम मंजूरी न मिळाल्याने दोन वर्षांपासून तसाच पडून आहे.साध्या पोलिस शिपायापासून सहाय्यक पोलिस आयुक्तपदाच्या अधिकाऱ्यांना घरे देण्याच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची अद्याप सही न झाल्याने घरे वापराशिवाय पडून आहेत.
मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी म्हाडाने शीव येथील प्रतिक्षानगर परीसरात बांधलेली घरे घेण्याचा निर्णय पोलिस गृहनिर्माण विभागाच्या 28 डिसेंबर 2005 रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.प्रत्येकी 475 चौरस फुट क्षेत्रफळांची ही घरे घेण्यासाठी पोलिसांना स्टेट बॅंक ऑफ इंडिया 7.25 टक्के दराने अर्थसहाय्य द्यायला तयार होती.पोलिसांना ही घरे देण्यासाठी म्हाडाच्या 31 जानेवारी 2006 रोजी झालेल्या बैठकीत 6145 क्रमांकाच्या ठरावाने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या घरांसाठी 1750 रूपये प्रति चौरस फुटांचा दर ठेवण्यात आला.ही घरे खरेदी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या एक हजार अर्जदारांपैकी 620 पोलिस कर्मचाऱ्यांच्या अर्जांची निवडही करण्यात आली.मात्र दोन वर्षांच्या कालावधीनंतरही ही घरे पोलिसांना देण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. ही घरे मिळण्यासाठी अर्ज केलेल्या पोलिसांपैकी काही सेवानिवृत्तही झाले आहेत.
पोलिस दलात काम करणाऱ्या 4783 अधिकाऱ्यांपैकी 2082 तर 36160 अंमलदारांपैकी 18530 अंमलदार वरळी, नायगाव, दादर , चुनाभट्टी, मरोळ येथील सरकारी निवासस्थानांत राहतात.यापैकी 1400 निवासस्थाने क्षेत्रफळाच्या मानाने लहान ,नादुरूस्त तसेच पुरेशा प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने अद्याप रिक्त आहेत.या घरांचे मासिक भाडे येथे राहणाऱ्या पोलिसांच्या पगारातून कपात करण्यात येते.
म्हाडाने प्रतिक्षानगर येथे बांधलेल्या या घरांची मालकी पोलिसांना मिळावी यासाठी वारंवार वरीष्ठ पातळीवरून पत्रव्यवहार करण्यात येत आहे.मात्र हा प्रस्ताव अंतिम मंजूरीकरीता मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याने या पत्रव्यवहाराला सरकार पातळीवरही फारसा प्रतिसाद मिळात नसल्याचे वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
----------------------------

पोलिस वसाहतींचे नव्याने बांधण्यात येणारे प्रकल्प
- घाटकोपर गुलीस्तान कंपाऊंड - 502 घरे
- वाकोला कोले कल्याण - 1742
- सांताक्रुझ - 324
- वाडीबंदर - 150
- वरळी - 400
- मलबार हिल - 30
- घाटकोपर कामराजनगर - 992

No comments: