Friday, September 5, 2008

क्षुल्लक भांडणातून महिलेला
जिवंत जाळण्याचा प्रयत्न

महिलेचे कृत्य ः घाटकोपरच्या भरवस्तीत थरार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः बॉम्बस्फोटांसारख्या घटना किंवा नैसर्गिक आपत्तीत मुंबईकरांमधील माणूस एकमेकाच्या मदतीला धावून जातो, असे चित्र आपण नेहमीच पाहतो; पण भरवस्तीत 15-20 जणांच्या समोर कोणीतरी कुणाचा तरी जीव घेण्यासारखे निर्घृण कृत्य करीत असेल, तर हाच मुंबईकर कोषात शिरतो आणि "मौत का तमाशा' पाहतो. मुंबईकरांच्या याच "बघ्या'च्या वृत्तीमुळे आज घाटकोपर येथील अनिता शिवगण ही 35 वर्षीय महिला मृत्यूशी झुंज देत आहे. दुर्दैवाने अनितावर आधी चाकूचे वार करून नंतर तिला रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचे कृत्य करणारी महिलाच आहे.

घाटकोपर पश्‍चिमेकडील भटवाडीच्या पितामह रामजीनगर येथील त्रिमूर्ती गणेश चाळीत काल (ता. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिता दत्ताराम शिवगण ही चाळीसमोरील पायवाटेने जात असताना शेजारीच राहणाऱ्या आशा गायकवाड (वय 35) या महिलेला तिचा धक्का लागला. याचे पर्यवसान भांडणात झाले. या वेळी दोघींचे पती घरी नसल्याने हा वाद आणखी वाढला. काही क्षणातच दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर आशाने घरातून चाकू आणला आणि अनिताच्या डोक्‍यावर सपासप वार करायला सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता ती पुन्हा घरात गेली आणि रॉकेलचा डबा आणून अनिताच्या अंगावर रिकामा केला. हा सगळा प्रकार तिथे जमलेले 10-15 रहिवासी तटस्थपणे पाहत होते. नेहमीचेच भांडण असेल म्हणून कोणीही पुढे आले नाही. रागाने माथा फिरलेल्या आशाने कशाचाही विचार न करता कापडाचा पेटता बोळा अनिताच्या अंगावर टाकला. आशा भांडकुदळ असल्याने रहिवाशांनी सुरुवातीला या भांडणात हस्तक्षेप केला नाही; मात्र अनिताला आगीच्या ज्वाळांनी वेढल्यानंतर लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. काहींनी तातडीने घरातील ब्लॅंकेट आणून तिच्या अंगावर टाकून आग विझवायचा प्रयत्न केला. तोपर्यंत या आगीत अनिता पुरती होरपळून गेली. एका दक्ष नागरिकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आशा गायकवाडला ताब्यात घेतले आणि अनिताला रिक्षातून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तिच्या नवऱ्याला या घटनेची माहिती मिळताच तो तीन मुलांसह रुग्णालयात पोचला. अनिताला तीन मुले असून, आपल्या आईच्या काळजीने त्यांचा निरागस चेहरा कोमेजून गेला आहे. 95 टक्के भाजलेली अनिता राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
......................
(चौकट)

दहा वर्षांचे पूर्ववैमनस्य

शिवगण व गायकवाड कुटुंबीयांत गेल्या दहा वर्षांपासून वाद आहे. या वादातूनच या दोन्ही शेजाऱ्यांत अनेकदा हाणामाऱ्याही झाल्या आहेत. यापूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात असल्याने आशा गायकवाडने धक्का लागल्याचे खुसपट काढून नेहमीप्रमाणे अनितासोबत जोरजोरात भांडण करायला सुरुवात केली आणि निर्दयपणे अनितावर वार करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
.............................

No comments: