Friday, July 4, 2008

ज्ञानेश

"नेट' वर तुमचा मुलगा करतोय काय...?
---------------------------

शाळा अथवा महाविद्यालयात जाणारा तुमचा मुलगा कॉम्प्युटर सॅव्ही असल्याचं तुम्हाला फार अप्रुप वाटत असेल. पण रात्री-अपरात्री नेट सर्फिंग करणारा तुमचा मुलगा नक्की करतो काय, याचा ढुंढाळा कधी पालक म्हणून घेतलायत? सध्या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी कळत नकळत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत.लहान मुलांमध्ये वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य पालक चिंतेत आहेतच शिवाय जगभरातून कुठूनही अशा प्रकारचे गुन्हे करणे शक्‍य असल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्याचे तसेच दोषींना शिक्षा देण्याचे पोलिस दलापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जगभरात सर्वाधिक इंटरनेट कनेक्‍टिवीटी असलेल्या देशांत भारत चौथ्या स्थानावर आहे.या देशातील पाच कोटी जनता कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या मदतीने एकमेकांशी जोडलेले आहेत.यात बारा ते पस्तीस वर्षे वयोगटातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे गेल्या काही वर्षांत नोंद झालेल्या तक्रारींपैकी बहूसंख्य तक्रारी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नावावर आहेत.सायबर गुन्हेगारीच्या विश्‍वात हॅकिंग , पोर्नोग्राफी व लहान मुलांची पोर्नोग्राफी,इमेलच्या माध्यमातून अश्‍लिल मजकूर प्रसारित करणे, पायरसी, सायबर स्टॉकिंग ऑनलाईन बॅंकींग फ्रॉड सारख्या गुन्ह्यांची प्रचंड चलती आहे. इंटरनेटवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या "ऑर्कुट' या कम्युनिटी वेबसाईटचा वापर विद्यार्थी वर्गात प्रचंड आहे. याच "ऑर्कुट'वर एकमेकांना स्क्रॅप करता करता झालेल्या ओळखीतूनच अंधेरी येथील एका व्यापाऱ्याचा मुलगा आदनान पत्रावाला याची त्याच्या "नेटफ्रेन्ड्‌स'नीच हत्या केल्याच्या प्रकाराने शहरात खळबळ माजली होती. वेबसाईटवर उपलब्ध असलेले आत्महत्येचे प्रयोग पाहून एका कॉन्व्हेन्ट शाळेत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकारही शिवाजी पार्क परिसरात काही महिन्यांपूर्वी उजेडात आला. सोबत शिकणारी मैत्रीण, शेजारी राहणाऱ्या तरूणी तसंच महिलांचे अश्‍लिल प्रोफाईल्स तयार करून ते इंटरनेटवर पोस्ट करण्याचे प्रकार आता नित्याचेच होवू पहात आहेत.विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आयुष्य उध्द्‌वस्त होण्याची भीती असल्याने अनेकदा पोलिस अल्पवयीन मुलांकडून झालेल्या सायबर गुन्ह्यांकडे सहानुभूतीने पहात असल्याचे चित्र आहे.गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे आलेल्या तक्रारींपैकी अवघ्या चारच प्रकर
णात लहान मुलांवर गुन्हे दाखल होवून त्यांना अटक झाली आहे.यात अंधेरी व वांद्रे रेल्वे स्थानके बॉम्बस्फोटांनी उडविण्याच्या धमकीचे मेल पाठविणाऱ्या कोल्हापुर येथील दोन विद्यार्थ्यांचा,डोंगरी परीसरातील एका महिलेचे अश्‍लिल प्रोफाईल बनविणाऱ्या मुलाचा तसेच मुलुंड येथे मैत्रिणीचेच अश्‍लिल प्रोफाईल तयार करणाऱ्या महाविद्यालयीन तरूणीचा समावेश आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून होत असलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांमुळे पालकांत खऱ्या अर्थाने आकृष्ठ झाले. ऑर्कुटसारख्या कम्युनिटी साईट चालविणाऱ्या कित्येक कंपन्यांनी त्यांच्या "युजर्स'ना सावधगिरी बाळगण्याचे सल्ले दिले आहेत.
विद्यार्थ्यांत इंटरनेटच्या वापराबाबत प्रबोधन व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी "गुगल' सोबत एक अभिनव उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे.येत्या काही दिवसांत शहरातील शाळांमध्ये सायबर गुन्हे शाखेचे पोलिस विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करताना घ्यायच्या दक्षतेची तसेच इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परीणामांची माहिती पटवून देणार आहेत.
माहितीचा अखंड स्त्रोत म्हणून ओळखला जाणाऱ्या कॉम्प्युटरचा अल्पवयीन मुले व महाविद्यालयीन तरूण,तरूणींकडून होत असलेल्या गैरवापरामुळे पालकात चिंतेचे वातावरण आहे. तासनतास कॉम्प्युटरसमोर बसणारा आपला पाल्य माहितीच्या या महाजालात "क्‍लिक' करून नक्की कसली माहिती मिळवतोय याकडे पालकांचे लक्ष असावे.तरूण पिढीत सर्वाधिक वेगात पसरत असलेल्या सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात आपल्याही घरातील लहान मुले,तरूण ओढले जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.



चौकट
-----------
मुलांनो, चॅटिंग करताना हे टाळा...

1) अनोळखी व्यक्तीशी चॅट करताना त्याला आपले खरे नाव, घर अथवा शाळेचा पत्ता तसेच दूरध्वनी क्रमांक देणे कटाक्षाने टाळा.
2) पालकांचा सल्ला घेतल्याशिवाय इंटरनेटवरून कोणालाही आपले छायाचित्र पाठवू नका.
3) अनोळखी व्यक्ती अथवा इ मेल ऍड्रेसवरून आलेल्या अश्‍लील तसेच धमकीच्या मेल्सनी घाबरून न जाता आपले पालक तसेच पोलिसांकडे तक्रार नोंदवा.
4)पालकांचा सल्ला घेतल्याशिवाय अथवा त्यांना कळविल्याशिवाय इंटरनेटवर ओळख झालेल्यांशी थेट भेट टाळा.
5)लक्षात ठेवा, ऑनलाईन असणारी व्यक्ती आपल्याला हवी असणारीच असेल असे नाही.
.........

No comments: