Friday, July 11, 2008

ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.11 ः मोलकरणीने दिलेल्या माहितीवरून चोरीच्या उद्देशाने ते तीघे महागड्या कारची आयात करणाऱ्या खार येथील व्यवसायिकाच्या घरात शिरले.घरात झोपलेला व्यवसायिक आणि त्याच्या नोकराला कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण करून दोघांचेही हातपाय बांधले.या व्यवसायिकाला चाकूचा धाक दाखवून उशीखाली ठेवलेली चावी घेऊन त्यांनी कपाट उघडले,तेंव्हा कपाट भरून असलेल्या एक हजार आणि पाचशे रूपयांच्या नोटांची बंडले पाहून त्यांचे डोळे अक्षरशः दिपले.घरातला बेडही पुर्णतः नोटांच्या बंडलांनीच भरलेला.आयुष्यात पहिल्यांदा एवढी " माया ' पाहिलेल्या या तीघा दराडेखोरांनी चोरी करून बाहेर पडताना कोणाला संशय येऊ नये यासाठी प्लॅस्टिकच्या सात पिशव्यांत मावतील एवढ्याच नोटा घेऊन तेथून पलायन केले.या दरोडेखोत्यांनी एक कोटी दहा लाख रूपयांच्या नोटा चोरल्या होत्या.व्यवसायिकाने मात्र अवघे पाच लाख रूपये चोरीला गेल्याची तक्रार दिली होती.
गुन्हे शाखेचे पोलिस या व्यवसायिकाकडे असलेल्या बेहिशेबी नोटांसंबंधी त्याची चौकशी करीत आहेत.
खार पश्‍चिमेला असलेल्या डायगो इमारतीत अजय बजाज (49) या व्यावसायिकाच्या घरात 27 ऑक्‍टोबरला हा दरोडा पडला.यावेळी दरोडेखोरांनी बजाज आणि त्याचा नोकर हरीलाल यादव यांना चाकूच्या धाकाने बेदम मारहाण करून घरातील एक कोटी दहा लाखांची रोख चोरून नेली.मात्र बजाज यांनी घरात असलेल्या कोट्यवधी रूपयांची माहिती पोलिसांना होऊ नये यासाठी फक्त पाच लाख रूपयेच चोरीला गेल्याची तक्रार खार पोलिसांना दिली.याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्या घरात काम करणारी मोलकरीण वर्षा कोडेकर हिच्यासह गोरेगावच्या "व्ही लाऊंज' हॉटेलमध्ये बारटेंडरचे काम करणाऱ्या ऍलन राजू मर्चंट (21), व्हॅलेंटाईन विन्सेन्ट जन्सीटो (20) आणि सूरज शशिकांत हडावले (20) या तिघांना अटक केली. चौकशीअंती या तीघांनी बजाज याची मोलकरीण वर्षा कोडेकर (29) हिने पुरविलेल्या माहितीवरून बजाज यांच्या घरावर दरोडा घातल्याचे स्पष्ट झाले.दरोड्याच्या दिवशी वर्षा इमारतीखाली उभी राहून आरोपींना मोबाईल फोनवरून चोरीसंबंधीचे निर्देश देत होती.
चोरी केलेल्या पैश्‍यांची सुरजची मैत्रिण सबिना हिच्या वांद्रे येथील घरात वाटणी झाली.त्याच रात्री वर्षाव्यतिरिक्त सगळे गोव्याला तीन महिने मौज करायला गेले.सबिना आणि तिच्या बहिणीने गोव्यात टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला.कपडे,तारांकित हॉटेलमध्ये राहणे, महागड्या गाड्यांतून फिरणे,वेश्‍यागमन अशात पैसे संपल्यानंतर राजू, सुरज आणि व्हॅलेंटाईन मुंबईत परतले.त्यांनी होंडा ऍकॉर्ड,ह्युंडई सॅन्ट्रो आणि ऍसेंट सारख्या महागड्या गाड्या खरेदी केल्या.घरात पालकांना सांगताना गोव्यात एका जमिनीच्या व्यवहारात मिळालेल्या पैश्‍यांतून या गाड्या खेरदी केल्याची माहिती त्यांनी दिली होती.घरात झालेल्या चोरीनंतर बजाज मुंबईतील त्याची सगळी मालमत्ता विकून पुण्याला राहायला गेला आहे.त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चाकैशीसाठी बोलविल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.

No comments: