Friday, July 4, 2008

ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.4 ः मटकाकिंग सुरेस भगत याच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज त्याची घटस्फोटीत पत्नी जया भगत हिला घाटकोपर येथून अटक केली.भगतच्या हत्येकरीता पंचेचाळीस लाख रूपयांच्या सुपारीचे पैसे तिनेच दिल्याचे उघडकीस आले. हत्येच्या कटासाठी एकदा ती कुख्यात डॉन आमदार अरूण गवळीलाही भेटल्याचे तिच्या चौकशीत उघड झाल्याचे गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले.न्यायालयाने तीला 10 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शेकडो कोटी रूपयांचा कल्याण मटका व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी जया हिने मुलगा हितेश व गवळी टोळीचा सदस्य सुहास रोग्येसोबत सुरेश भगतच्या हत्येचा कट रचला.13 जूनला झालेल्या या अपघाती हत्येचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुहास रोग्येसह सहा जणांना यापुर्वीच अटक केली आहे.त्यांच्या चौकशीत सहभाग स्पष्ट होताच पोलिसांनी जया व तिचा मुलगा हितेश यांचा शोध घ्यायला सुरवात केली.पोलिस मागावर असल्याचे ओळखून जयाने तिच्या पंतनगर येथील घरात राहणे बंद केले.शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये दरदिवशी हजारो रूपयांचे भाडे भरून ती राहत होती.पोलिसांना तिच्या हॉटेल्समधील वास्तव्याची माहिती मिळताच ती गुजरातला पळून गेली. तीच्या शोधार्थ पोलिस तिच्या पाठोपाठ गुजरात येथे गेले होते.जुने कपडे घेण्यासाठी ती घाटकोपर येथे आल्याचे समजताच आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीला तिच्या घरातून अटक केली.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी भगतच्या हत्येचा कट आखणाऱ्या जयाने गवळी टोळीचा सदस्य सुहास रोग्ये,हरीष मांडवकर व किरण पुजारी यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या.यातील पहिली बैठक तिच्याच घरात, दुसरी बैठक सुहास रोग्ये राहत असलेल्या हॅंगिंग गार्डन परीसरात तर तीसरी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथे कारमध्ये झाली.या प्रकरणी एकदा तीने कुख्यात डॉन आमदार अरूण गवळी याचीही भेट घेतल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती मारिया यांनी दिली. हत्येसाठी देण्यात येणारी सुपारीची पंचेचाळीस लाख रूपयांची रक्कमही तीनेच काही हिश्‍श्‍यांत दिली. भगत सह सहा जणांच्या खूनाच्या या प्रकरणात गुन्हे शाखेचे पोलिस तिचा मुलगा हितेश याचाही शोध घेत आहेत.या प्रकरणी "मोक्का' लावण्याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याचेही मारिया म्हणाले.

No comments: