Friday, July 11, 2008

कोट्यवधीची चोरी करणाऱ्या चौघांना अटक
गुन्हे शाखा ः व्यावसायिकाच्या मोलकरणीची करामत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः "तिजोरी दिखाके गलती कर दी ठाकूर..!' हा शोले चित्रपटातला गाजलेला डायलॉग आठवतोय? घरकाम करणाऱ्या मोलकरणीला नकळतपणे कपाटातली कोट्यवधींची रोकड दाखविणे खार येथील व्यावसायिकाला चांगलेच नडले. काम सोडून या मोलकरणीने व्यावसायिकाच्या घरात तीन साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दरोड्यात तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांची रोकड चोरणाऱ्या या मोलकरणीला तिच्या तीन साथीदारांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. व्यावसायिकाने मात्र या प्रकरणात अवघ्या पाच लाख रुपयांच्या चोरीची तक्रार दाखल केल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
अजय बजाज (49) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. तो राहत असलेल्या खार पश्‍चिमेच्या डायगो इमारतीत 27 ऑक्‍टोबरला हा दरोडा पडला. चाकूच्या धाकाने घरात शिरलेल्या तीन चोरट्यांनी बजाज व त्यांचा नोकर हरीलाल यादव यांना कुकरच्या झाकणाने बेदम मारहाण केली. यानंतर दोघांचे हातपाय बांधून घराच्या कपाटात ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली. या प्रकरणी बजाज यांनी खार पोलिस ठाण्यात पाच लाख रुपयांच्या चोरीची फिर्याद दिली होती. या घटनेचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खार परिसरात ह्युंदाई सॅन्ट्रो कारमधून फिरणाऱ्या ऍलन राजू मर्चंट (21), व्हॅलेंटाईन विन्सेन्ट जन्सीटो (20) आणि सूरज शशिकांत हडावले (20) या तिघांना अटक केली. चौकशीअंती बारटेंडरचे काम करणाऱ्या या तिघांकडेही होंडा ऍकॉर्ड व ह्युंदाई ऍसेंटसारख्या कार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गाड्या खार येथील व्यावसायिक बजाज यांच्या घरात केलेल्या चोरीच्या पैशांतून खरेदी केल्याचे उघडकीस आले. ही चोरी बजाज यांची मोलकरीण वर्षा कोडेकर (29) हिने दिलेल्या माहितीवरून केल्याचे त्यांनी सांगितले. दरोड्याच्या दिवशी वर्षा इमारतीखाली उभी राहून आरोपींना मोबाईल फोनवरून चोरीसंबंधीचे निर्देश देत होती.
बजाजकडे सहा महिने काम केलेल्या वर्षाकडे सबिना नावाच्या महिलेने व्याजाने पैशांची मागणी केली होती. या वेळी वर्षाने सबिनाचा मित्र सूरज याला बजाज यांच्याकडे आपले वीस लाख रुपये अडकले आहेत. ते काढण्याकरिता बजाज यांच्या घरात असलेले कोट्यवधी रुपये चोरण्याची योजना आखली. दरोडा घातल्यानंतर आरोपींनी कपाटातील रोकड प्लॅस्टिकच्या सात बॅगांमध्ये भरून नेली. ही रोख रक्कम एक कोटी दहा लाख रुपये एवढी होती. या पैशांचे सबिनाच्या घरात वाटप झाले. पैशांच्या वाटपानंतर वर्षाव्यतिरिक्त सगळे गोव्यात तीन महिने मौज करायला गेले. सबिना आणि तिच्या बहिणीने गोव्यात टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. याच वेळी अवघ्या पाच लाखांच्या चोरीची नोंद करणारा व्यावसायिक बजाज यालाही पोलिसांनी पुण्याहून चौकशीसाठी बोलावल्याचे मारिया यांनी सांगितले.

Archive Yes

No comments: