ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता.15 ः नरीमन पॉईंटच्या जनरल भोसले मार्गावरील समता बिल्डींग,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील बड्या व्यक्तींचा नेहमीच राबता असलेल्या या इमारतीचा नुर आज काही वेगळाच होता.या इमारतीतली वर्दळ तशी नेहमीपेक्षा जास्तच,मात्र सबंध इमारतीत शुकशुकाट.देशाचे निवृत्त सरन्यायाधिश यशवंत चंद्रचूड यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय,सामाजिक,न्यायपालिका क्षेत्रातील बड्या व्यक्ती अतिशय शोकाकूल अवस्थेत या इमारतीखाली जमल्या होत्या.
समता इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहणारे माजी सरन्यायाधिश चंद्रचुड यांच्या निधनामुळे सबंध इमारतीवर शोककळा पसरली होती.चंद्रचूड यांनी निवृत्तीनंतरही समाजिक,शैक्षणिक आणि वृत्तपत्रसृष्टीशी आपले नाते कायम ठेवले.त्यामुळेच ते राहत असलेल्या घरी नेहमी सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील बड्या व्यक्तींचा नेहमीच वावर असायचा.आजचा हा वावर त्यांना अखेरचे पहायला येणाऱ्यांचा होता.चंद्रचुड यांच्या पार्थिवाशेजारीच त्यांचे सुपुत्र डॉ.धनंजय उभे होते.अंत्यदर्शनानंतर त्यांच्या प्रति सहानुभुती व्यक्त करणाऱ्याचा हात धनंजय यांच्या हातात जात होता.तर कधी दुःखीत अवस्थेत अलिंगन दिले जात होते.देशाच्या सरन्यायाधिशपदी सर्वाधिक काळ राहून न्यायव्यवस्थेची सेवा करणारा तपस्वी चंद्रचुड यांच्या रूपाने आज निपचीत पडला होता.
सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे पार्थिव इमारतीखाली तयार केलेल्या एका चबुतऱ्यावर ठेवण्यात आले.तोपर्यंत इतस्ततः पसरलेला जनसमुदाय यशवंतरावांच्या पार्थिवाभोवती गोळा झाला.वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांचे फ्लॅशही क्षणात लकाकले.इमारतीखाली उपस्थित असलेल्या मंडळींनीही चंद्रचुड यांच्या पार्थिवावर आदरांजली वाहिली.शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने तेथे उपस्थित असलेल्या राजशिष्टाचार विभागातील पोलिसांच्या पथकाने त्यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळले.यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांच्या देहाला शस्त्रसमाली देत शोक व्यक्त केला.शोक व्यक्त करणारी धून पोलिस बॅन्डवर वाजविण्यात येत होती. पोलिसांच्या या पथकातील अधिकाऱ्यांनी चंद्रचुड यांचे पार्थिव उचलून शववाहिनीत ठेवले.पुत्र डॉ.धनंजय,नातवंडे,नातेवाईक आणि मित्रमंडळी या पार्थिवासोबत होते.गाड्यांच्या ताफ्यातून निघालेली सरन्यायाधिश चंद्रचुड यांची अंत्ययात्रा पहाण्यासाठी जनरल भोसले मार्गावर प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.ही अंत्ययात्रा पुढे चंदनवाडी स्मशानभूमीत नेण्यात आली.नुकतीच वयाची 88 वर्षे पुर्ण केलेल्या चंद्रचुड यांच्या वृद्धापकाळाने झालेल्या निधनाबद्दल प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता.
No comments:
Post a Comment