Thursday, November 6, 2008

बेरोजगाराचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

अनर्थ टळला : सहाव्या मजल्यावरून उडी मारणार होता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः "कुठे नोकरी देता का नोकरी' असे म्हणत वयाच्या चाळीशीपर्यंत सेवा योजन कार्यालयात जोडे झिजविणाऱ्या बेरोजगार व्यक्तीने आज मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी या व्यक्तीला वेळीच आवरल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी त्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा सेवा योजन कार्यालयात सरकारी नोकरीकरिता पंधरा वर्षांपूर्वी नाव नोंदविल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
राजू गोदा अडांगळे (40) हा घाटकोपरच्या रमाबाईनगरात राहणारा तरुण वयाच्या चाळीशीपर्यंत सरकारी नोकरी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्हा सेवा योजन कार्यालयाच्या चकरा मारत होता. पंधरा वर्षांपूर्वी या कार्यालयात नाव नोंदविल्यानंतर इतरांसारखाच कधी ना कधी सरकारी नोकरीसाठीचा "कॉल' आपल्यालाही येईल या अपेक्षेत तो होता. वृत्तपत्रांत येणाऱ्या सरकारी नोकरीच्या जाहिराती पाहिल्यानंतर तो कित्येकदा त्या जागांकरिता आपल्याला कॉल निघतोय का हे पाहण्यासाठी सेवा योजन कार्यालयात जायचा. मात्र तेथे असलेले अधिकारी त्याला फक्त कॉल काढण्यासाठी दोन हजार रुपये; तर काही वेळा थेट नोकरीकरिता पन्नास हजार रुपये मागायचे.

बारावी उत्तीर्ण झालेल्या राजूची सरकारदप्तरी वारंवार उपेक्षा होत होती. लग्न झाल्यानंतर त्याला नोकरीची फारच गरज भासू लागली. त्यातच सरकारी नोकरी मिळण्यासाठीचे वय संपत असल्याने त्याची चिंता वाढत होती. अखेर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्नी मनोरमा (36) हिला सोबत घेऊन तो नोकरी मिळण्यासाठीचे निवेदन घेऊन मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला आला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख त्यांच्या दालनात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करीत होते. या वेळी त्यांच्या दालनाबाहेरही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रचंड समुदाय होता. मुख्यमंत्री "बिझी' असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांनी त्याला मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली. कार्यालयातील अभ्यागतांच्या भेटी संपवून मुख्यमंत्री दालनातून निघताच राजूने त्यांच्या मागे जात त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळीही त्याला मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. त्यावर "मला नाही तर किमान माझ्या पत्नीला तरी नोकरी द्या' असे म्हणत त्याने थेट मुख्यमंत्री दालनासमोर असलेल्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी तेथे असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला अडविल्याने पुढील अनर्थ टळला. राजूला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याची चौकशी करीत होते. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीतही शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्याकरिता त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
उपमुख्यमंत्र्यांचे मदतीचे आश्‍वासन
दरम्यान, राजू अडांगळे याला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

No comments: