कोलकता येथील घटना ः संघटनेचे ओसामा बिन लादेनच्या अल कायदाशी संबंध?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः कोलकताच्या अमेरिकन सेंटरबाहेर जानेवारी-2002 मध्ये झालेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य मोहम्मद सादिक शेख याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. सादिक याने त्याच्या आणखी तिघा साथीदारांसह केलेल्या या गोळीबारात पाच पोलिस ठार; तर 19 जण जखमी झाले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीत त्यांचे ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या अतिरेकी संघटनेशी संबंध असण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे.
देशभरात गेल्या तीन वर्षांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या 20 अतिरेक्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच अटक केली. या अतिरेक्यांपैकी 24 सप्टेंबरला आझमगढच्या संजरपूर येथून अटक करण्यात आलेला मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख याच्या चौकशीत कोलकताच्या अमेरिकन सेंटरवरील हल्ल्याचे रहस्य उघडकीस आले आहे. 22 जानेवारी 2002 ला कोलकताच्या अमेरिकन सेंटर या अमेरिकन सरकारच्या माहिती केंद्रावर भल्या पहाटे हा हल्ला झाला होता. दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी दोन एके-47 रायफलमधून केलेल्या या बेछूट गोळीबारात पाच पोलिस ठार; तर 19 जण जखमी झाले होते. मोहम्मद सादिक व झाहिद यांनी हा गोळीबार करताना दोन्ही रायफलमधील सगळ्याच मॅगझीन संपविल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा याचा भाऊ आसिफ रझा व आणखी एक आरोपी होता. या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफताब अन्सारी आणि अन्य नऊ जणांना कोलकता पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. या हल्ल्याच्या वेळी सादिक याने सदाकत, असे नाव धारण केले होते. हल्ल्यानंतर सादिक पाटण्याला गेला, तर झाहिद झारखंडच्या हजारीबाग येथे लपला. हजारीबाग येथे झाहीद पोलिस चकमकीत ठार झाल्यानंतर सादिक आझमगढ व पुढे दुबईला पळून गेला. अमेरिकन सेंटरवर केलेल्या हल्ल्यानंतर सादिक कुख्यात अतिरेकी आमीर रझा याच्या विश्वासू साथीदारांपैकी एक समजला जाऊ लागला. ऑक्टोबर- 2002 मध्ये त्याला दुबईला बोलविण्यात आले. तेथे तो बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाज भटकळ आणि आसिफ रझा यांच्यासोबत आठ महिने राहिला. त्यानंतरच सादिकने भारतातून बांगलादेश व पाकिस्तानात अतिरेकी प्रशिक्षणासाठी मुले पाठवायला सुरुवात केल्याची माहितीही सहपोलिस आयुक्त मारिया यांनी दिली. आरोपींच्या चौकशीत त्यांचे लष्कर ए तैय्यबा आणि बांगलादेशातील हुजी या अतिरेकी
संघटनांशी संबंध उघडकीस आले आहेत.
इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा याचा भाऊ आसिफ रझा याने अफताब अन्सारी सोबत कोलकता येथील अफताब अन्सारी एका बड्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून 3 कोटी 85 लाख रुपयांची खंडणी उकळली होती. खंडणीच्या रकमेतील काही पैसे अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तसेच अल कायदाचा कुख्यात अतिरेकी मोहम्मद आत्ता याच्या मलेशियातील खात्यात जमा झाले होते. त्यातच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांच्या चौकशीतही त्यांचा मुख्य सूत्रधार आमीर रझा हाच असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे अल कायदाशी संबंध असल्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली.
No comments:
Post a Comment