Friday, November 7, 2008

राहुल राजवर पोलिसांनी जवळून गोळ्या झाडल्या?

जे.जे.च्या अधिष्ठात्यांचा नकार : फॉरेन्सिक लॅबमध्ये होणार तपासणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः बैलबाजार येथे बेस्ट बसमध्ये पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला उत्तर भारतीय तरुण राहुल राज आणि पोलिसांमध्ये गोळ्या झाडताना असलेले अंतर तपासण्यासाठी त्याच्या त्वचेचा गोळ्या लागलेला भाग अभ्यासाकरिता कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज दिली. राहुल राजचे शवविच्छेदन करणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्याच्यावर पोलिसांनी अतिशय जवळून गोळ्या झाडल्याची शक्‍यता वर्तविल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र असे कोणतेही वक्तव्य शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांनी केले नसल्याचे सायंकाळी जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी जाहीर केले.

अंधेरी ते कुर्लादरम्यान धावणाऱ्या 332 क्रमांकाच्या बेस्टमध्ये 27 ऑक्‍टोबर रोजी बैलबाजार पोलिस बीट चौकीजवळ ही चकमक झाली. त्यात पाटण्याच्या कदमकोन येथून नोकरीच्या निमित्ताने आलेल्या राहुल राज कुंदप्रसाद सिंग या तेवीस वर्षीय तरुणाच्या झालेल्या मृत्यूचा उत्तर भारतीय राजकारण्यांनी तीव्र निषेध केला होता. या प्रकरणी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन चकमकीची चौकशी करण्याची मागणी केली. केंद्राच्या निर्देशानंतर या प्रकरणाची राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे या चकमकीचा तपास सोपविण्यात आला.

या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच राहुल राजचे शवविच्छेदन करणारे डॉ. बी. जी. चिखलीकर यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्याची शक्‍यता वर्तविली. डॉ. चिखलीकर यांच्या या वक्तव्याने प्रसिद्धिमाध्यमांत खळबळ उडाल्यानंतर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. बी. एम. सबनीस यांनी डॉ. चिखलीकर यांनी शवविच्छेदनाबाबत असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे सांगितले.

गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी या संदर्भात बोलताना राहुल राजवर झाडलेल्या तेरा गोळ्यांपैकी पाच गोळ्यांनी त्याच्या शरीराचा वेध घेतल्याचे सांगितले. पाचपैकी दोन गोळ्या डोक्‍यात, एक कानात, एक छातीत आणि एक पोटात शिरली. जवळून झाडलेल्या गोळ्यांनी शरीरावर झालेल्या जखमेभोवतीची त्वचा काळी पडते. मात्र जे.जे. रुग्णालयाकडून आज दुपारी मिळालेल्या अहवालानुसार त्यात असा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती मारिया यांनी दिली. चकमकीच्या वेळी राहुल राज आणि पोलिस यांच्यातील अंतराचा अभ्यास करण्यासाठी गोळ्या लागलेल्या ठिकाणच्या शरीराची त्वचा फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठविली असून तेथील तज्ज्ञांच्या अहवालानंतरच ही बाब स्पष्ट होऊ शकेल, असेही मारिया यावेळी म्हणाले. हा अहवाल लवकरच पोलिसांकडे येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 17 नागरिकांचे जबाब नोंदविल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments: