Friday, November 7, 2008

घातपाती कारवायांसाठी "शादी डॉट कॉम'चा वापर!

उपवरांनो सावधान : सिमकार्डसाठी अतिरेक्‍यांनी वापरली माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः लग्नासाठी वधू किंवा वरसंशोधन सुरू असेल आणि आधुनिकतेचा वसा जोपासत त्यासाठी आपण आपली वैयक्तिक माहिती शादी डॉट कॉमसारख्या मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर टाकली असेल तर सावधान...! अशाच मॅट्रिमोनिअल साईट्‌सवर आलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवायांकरिता वापरलेल्या मोबाईल फोनचे सिमकार्ड खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी खुद्द ही कबुली दिली.

गेल्या तीन वर्षांत जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, बंगळूरु, दिल्लीसह देशभरात बॉम्बस्फोट मालिका घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्‍यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या अतिरेक्‍यांच्या चौकशीत गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेली माहिती धक्कादायक आणि थक्क करणारी आहे. इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी देशात कोठेही बॉम्बस्फोट घडवायचे असल्यास एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी स्फोटांपूर्वी त्या त्या ठिकाणचे मोबाईल सिमकार्ड खरेदी करीत. अतिरेक्‍यांपैकी आनिक शफीक सय्यद याचे पुण्यात मोबाईलचे दुकान असल्याने सिमकार्डच्या खरेदीसाठी मोबाईल कंपन्यांना द्यावी लागणारी आवश्‍यक ती कागदपत्रे आणि छायाचित्रे देण्याची जबाबदारी त्याच्यावर असे. सिमकार्डकरिता आवश्‍यक असणारी ही कागदपत्रे व छायाचित्रे देण्यासाठी त्याने नामी शक्कल लढविली. लग्नगाठी जुळविण्याकरिता प्रसिद्ध असलेल्या शादी डॉट कॉम या वेबसाइटवर विवाहेच्छुकांनी टाकलेले स्वतःचे छायाचित्र आणि वैयक्तिक माहितीच्या आधारे बनावट कागदपत्रे बनवून सिमकार्ड खरेदी केली जात. पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील म्यूज अपार्टमेंट येथील इंडियन मुजाहिदीनच्या हेडक्वार्टरमधील कॉम्प्युटरवरून जेथे स्फोट घडवायचे आहेत त्या ठिकाणच्या विवाहेच्छुकांची छायाचित्रे व माहिती डाऊनलोड केली जात असे. अशा प्रकारच्या बोगस कागदपत्रांचा वापर करून या अतिरेक्‍यांनी तब्बल पन्नास सिमकार्ड घेतले. ज्यांच्या नावांनी मोबाईलचे सिमकार्ड खरेदी करण्यात आले अशा मुंबई व मंगळूर येथील दोघा विवाहेच्छुक तरुणांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी स्वतःची माहिती व छायाचित्र मॅट्रिमोनिअल साइटवर टाकल्याचे उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. हा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मॅट्रिमोनिअल साईटच्या व्यवस्थापनालाही कळविला असून याबाबत दक्षता घेण्यासही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.