Monday, November 10, 2008

कांदिवलीत कामगारनेत्याची हत्या

युनियनचा वाद ः चॉपर आणि चाकूने भोसकले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत कामगार संघटनेच्या नेत्याची तो राहत असलेल्या सोसायटीच्या कार्यालयात शिरलेल्या पंधरा जणांच्या जमावाने चॉपर आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना कांदिवली पूर्वेला आज सकाळी घडली. ही हत्या युनियनच्या वादातून झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.
कांदिवली पूर्वेला असलेल्या ठाकूर व्हिलेजमधील एव्हरशाईन मिलेनियम रेसिडेन्सीमध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शांताराम गोपाळ कानडे (48) असे हत्या झालेल्या कामगारनेत्याचे नाव आहे. एव्हरशाईन सोसायटीच्या सरचिटणीसपदी कार्यरत असलेले कानडे पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या कार्यालयात येऊन बसले होते. या वेळी त्यांच्यासोबत कार्यालयीन व्यवस्थापक मनोज नायर आणि एक प्लंबर असे दोघे जण होते. सोसायटीचे कामकाज आटोपल्यानंतर कानडे पुन्हा घरी जायला निघाले तोच बाहेरून पंधरा जणांचा जमाव त्यांच्या दिशेने धावून आला. जमावाच्या हातात असलेले चॉपर आणि चाकू पाहून कानडे यांनी पुन्हा कार्यालयात जाऊन दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच आत शिरलेल्या या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. मारेकऱ्यांनी त्यांच्या पाठ, पोट आणि छातीवर सपासप वार केल्याने काही क्षणातच ते खाली कोसळले. कानडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यापूर्वी त्यांनी कार्यालयीन व्यवस्थापक मनोज नायर व प्लंबरलाही मारहाण केली. नायरच्या चेहऱ्यावर वार झाल्याने तोही या हल्ल्यात जखमी झाला. नायर आणि प्लंबरने केलेल्या आरडाओरडीनंतर इमारतीतील रहिवासी कार्यालयाजवळ जमले. त्यांनी कानडे यांना तातडीने उपचारासाठी भगवती रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वी रिलायन्स कंपनीत कामाला असताना कानडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत कामगार संघटनेसोबत काम करायला सुरवात केली होती. कामगार संघटनेच्या वादातून ही हत्या झाली असावी, अशी शक्‍यता समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. बी. शिंदे यांनी वर्तविली. कानडे यांचा सोसायटीत राहणाऱ्या विजय तांबट यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. कानडे यांच्या हत्येला तांबट यांच्यासोबतचा वाद कारणीभूत आहे का, हा पैलूदेखील पोलिस तपासात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कानडे यांची पत्नी तीन वर्षांपूर्वी कर्करोगाने मरण पावली आहे. त्यांचा एकुलता एक अकरा वर्षांचा मुलगा पाचगणी येथे पाचवी इयत्तेत शिकतो. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही शिंदे या वेळी म्हणाले.

No comments: