Thursday, November 13, 2008

क्रॉफर्ड मार्केटमधील इमारतीचा भाग कोसळून एकाच कुटुंबातील सहा ठार

नातेवाईकांचा आक्रोश ः जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 12 ः क्रॉफर्ड मार्केट येथे ऐंशी वर्षे जुन्या असलेल्या "सय्यद हाऊस' या पाच मजली इमारतीचा मागील भाग कोसळून एकाच कुटुंबातील सहा जणांचा ढिगाऱ्याखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे घडली. या इमारतीला लागूनच एका बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू आहे. या खोदकामामुळेच "सय्यद हाऊस' इमारत कोसळली असून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
येथील 250, नागदेवी रस्त्यावर पहाटे साडेपाच वाजता हा प्रकार घडला. डॉ. सय्यद उमरान (40) यांच्या मालकीच्या या इमारतीत तळमजला आणि पहिल्या मजल्यावर वाणिज्य वापराची गोदामे व गाळे आहेत. इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर डॉ. सय्यद यांचे कुटुंब ऐंशी वर्षांपासून राहते. याशिवाय इमारतीच्या उर्वरित दोन मजल्यांवर बारा भाडेकरू राहतात. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास डॉ. सय्यद यांचे कुटुंबीय झोपलेल्या घरासह इमारतीचा मागील भाग खाली कोसळला. या दुर्घटनेत डॉ. सय्यद यांच्यासह त्यांची पत्नी डॉ. रेहाना सय्यद (35), मुलगा उमार (12), मुलगी मरीअम (9), लहान भाऊ मोहम्मद सलमान (25) आणि चुलत मेव्हणा फहाद (25) हे मातीच्या ढिगाऱ्याखाली अक्षरशः चिरडले. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेतली. काही नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सय्यद कुटुंबांतील सदस्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र मातीच्या मोठ्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने या कुटुंबातील कोणीही वाचू शकले नाही. इमारत कोसळल्याचे कळताच डॉ. सय्यद यांचे नातेवाईक व मित्र-मंडळींनी इमारतीजवळ जमायला सुरुवात केली. अग्निशमन दलाने ढिगारे उपसून मृतांचे शव काढायला सुरुवात केली, तेव्हा नातेवाईकांचा आक्रोश काळजाचा वेध घेत होता. डॉ. सय्यद यांचा लहान मुलगा उमार याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या हाती लागला. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेला डॉ. रेहाना यांचा मृतदेह सगळ्यात शेवटी बाहेर काढण्यात आला. सहाही मृतदेह जवळच असलेल्या गोकुळदास तेजपाल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.
डॉ. सय्यद यांची दोन्ही मुले सेंट झेवियर्स शाळेत शिकत होती; तर या दुर्घटनेत ठार झालेला त्यांचा चुलत मेव्हणा फहाद काल रात्रीच डॉ. सय्यद यांच्याकडे राहायला आला होता. डॉ. सय्यद यांच्यासोबत त्यांची आई फौजिया (55) आणि बहीण समीरा राहतात. काही दिवसांपूर्वीच दोघीही लखनौ येथील घरी गेल्या. त्यामुळे सुदैवाने या दुर्घटनेतून दोघीही बचावल्याची माहिती डॉ. सय्यद यांचे काका डॉ. ए. क्‍यू. सय्यद यांनी "सकाळ'ला दिली. या इमारतीला लागून अवघ्या दीड फुटावर पस्तीस फूट खोल खोदकाम करण्यात आले आहे. बहुमजली इमारत बांधण्यासाठी करण्यात आलेल्या या खोदकामामुळे सय्यद हाऊस इमारतीच्या बांधकामावर परिणाम होत होता. खोदकाम सुरू असताना इमारत हादरल्यासारखेच वाटायचे. हे काम रोखण्यासाठी वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग झाला नाही. शेवटी आज ही दुर्घटना होऊन कुटुंबातील सहा जण ठार झाल्याचे दुःख असल्याचेही डॉ. ए. क्‍यू. सय्यद यांनी यावेळी सांगितले.

No comments: