Thursday, November 6, 2008

हलगर्जीमुळे मृत्यूप्रकरणी डॉक्‍टर दाम्पत्यावर गुन्हा

उपनिरीक्षकावरील शस्त्रक्रिया : फोरेन्सिक अहवालानंतर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई ः खार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राजेश साळवी यांचा दोन वर्षांपूर्वी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना झालेला मृत्यू संबंधित डॉक्‍टरांची हलगर्जी व निष्काळजीपणामुळेच झाल्याचा अहवाल राज्य सरकारच्या फोरेन्सिक मेडिसिन विभागाने दिला आहे. या अहवालावरून उपनिरीक्षक साळवी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. रश्‍मी शहा व डॉ. हेमेंद्र शहा या दाम्पत्याविरुद्ध खार पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल झाला आहे; मात्र त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

खार पोलिस ठाण्यात तीन वर्षे सेवेत असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेश प्रभाकर साळवी (37) यांच्यावर 26 मार्च 2007 पासून खारच्या आर. जी. स्टोन रुग्णालयात पित्ताशयाच्या आजारावर उपचार करण्यात येत होते. तपासणीत पित्ताशयात खडे झाल्याचे तसेच पिशवीजवळ संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने उपनिरीक्षक साळवी या रुग्णालयात दाखल झाले. पित्ताशयातील खडे काढण्यासाठी त्यांच्यावर लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्‍टर रश्‍मी शहा यांनी घेतला. त्यानुसार साळवी यांच्यावर 30 मार्च रोजी शस्त्रक्रिया झाली. या वेळी साळवी यांच्या नातेवाइकांना डॉक्‍टरांनी अवघ्या तीन तासांची शस्त्रक्रिया असल्याचे सांगितले होते; मात्र या शस्त्रक्रियेला सात तासांहून अधिक वेळ लागला. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच उपनिरीक्षक साळवी यांचा मृत्यू झाला.

रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेले राजेश साळवी यांचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी प्रभाकर साळवी (76) आणि लहान भाऊ पोलिस शिपाई विकास (34) यांनी हा मृत्यू डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला. मुलाच्या झालेल्या अकाली मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही प्रभाकर साळवी यांनी केली होती. याबाबत खार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राज्य सरकारच्या फोरेन्सिक मेडिसिन विभागाच्या समितीमार्फत तपास करण्यात येत होता. या समितीचे अध्यक्ष डॉ. एस. डी. नणंदकर यांनी याबाबतचा अहवाल पोलिसांना दिला. या अहवालानुसार 30 ऑक्‍टोबरला खार पोलिसांनी मृत उपनिरीक्षक साळवी यांच्यावर उपचार करणारे डॉ. रश्‍मी शहा व हेमेंद्र शहा यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे पोलिस निरीक्षक ए. एन. साठे यांनी दिली. या डॉक्‍टर दाम्पत्याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतल्याने त्यांना अटक झाली नसल्याचेही साठे यांनी या वेळी सांगितले.

इन्फोबॉक्‍स.....
कुटुंब उघड्यावर
उपनिरीक्षक राजेश साळवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा संसार पूर्णतः उद्‌ध्वस्त झाला आहे. त्यांची पत्नी रोहिणी, लहान मुलगी आदिती हिला घेऊन वृद्ध सासू-सासऱ्यांसोबत गेल्या दोन वर्षांपासून राहते. पतीचा अकाली मृत्यू आणि मुलीच्या भविष्याचा विचार करता अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेण्याची विनंती त्यांनी पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे केली; मात्र त्यांची ही मागणी पोलिस नियमांत बसत नसल्याने फेटाळून लावली.
.........................................

No comments: