Thursday, October 9, 2008

इंडियन मुजाहिदिनची बॅंक खाती गोठविली

राकेश मारिया ः राष्ट्रीयीकृत बॅंकांत बचत खाती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 8 ः इंडियन मुजाहिदिनच्या घातपाती कारवायांसाठी मुंबईतील काही राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या बचत खात्यांवर नियमितपणे पैसे जमा होत होते. पोलिसांनी ही सर्व खाती आज गोठविल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या खात्यांवर गेली अनेक वर्षे लहान- मोठ्या रकमांच्या स्वरूपात पैसे जमा केले जात होते, असेही मारिया यावेळी म्हणाले.

गेल्या तीन वर्षांत देशभरात बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदिनच्या वीस अतिरेक्‍यांच्या अटकेनंतर गुन्हे शाखेचे पोलिस या अतिरेकी कारवायांसाठी वापरण्यात येणाऱ्या आर्थिक स्त्रोतांचा शोध घेत आहेत. अतिरेकी कारवायांना मूर्त स्वरूप देण्यासाठी या अतिरेक्‍यांना हवाला आणि वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरने नियमित पैसे येत असत. या व्यतिरिक्त मुंबईतील काही राष्ट्रीयीकृत बॅंकामध्ये इंडियन मुजाहिदिनच्या सदस्यांची बचत खाती आहेत. आखाती देशांतून येणारा पैसा या खात्यांवर नियमितपणे भरणा केला जात होता. मात्र या खात्यांतून फारच कमी प्रमाणावर पैसे काढले जात होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहरातील बॅंकांमध्ये असलेली ही सर्व खाती गोठविली आहेत. या खात्यांवर गेल्या दोन वर्षांत 26 लाख रुपये गोळा झाले होते. या प्रकरणी संबंधित बॅंकांकडून संबंधित खातेदारांचे नाव व पत्ते पोलिसांनी मिळविल्याचेही मारिया यावेळी म्हणाले. मात्र खातेदार व बॅंकांची नावे सांगण्यास त्यांनी यावेळी नकार दिला.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केलेला मोहम्मद अकबर चौधरी व आनिक शफीक सय्यद या दोघांचा हैदराबाद बॉम्बस्फोटांतही सहभाग स्पष्ट झाला आहे. स्फोट घडविण्याच्या महिनाभरापूर्वी दोघांनी हैदराबादमध्ये मोठे घर भाड्याने घेतले होते. स्फोटांच्या दोन दिवसांअगोदर याच घरात बॉम्ब बनविण्यात आले. रियाज भटकळदेखील यावेळी त्या घरात उपस्थित होता, अशी माहिती मारिया यांनी यावेळी दिली.
--------
(चौकट)
पुण्याच्या नगरसेवकाची चौकशी
इंडियन मुजाहिदिनच्या अतिरेक्‍यांशी असेलल्या कथित संबंधांवरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक जावेद शेख याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
....

No comments: