Thursday, October 9, 2008

पुण्यातील "घर' सोडण्यापूर्वीच अतिरेक्‍यांना मुसक्‍या

पोलिसांची तत्परता ः हैदराबाद बॉम्बस्फोटांपूर्वी याच घरात बैठका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 7 ः बॉम्बस्फोटांनंतर धमकीचे "ई-मेल' पाठविणाऱ्या "इंडियन मुजाहिदीन'च्या मीडिया विंगमध्ये काम करणाऱ्या तीन संगणक तज्ज्ञांसह पाच जणांना पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील ज्या घरातून अटक झाली, ते घर पोलिसांच्या भीतीमुळे ते सोडण्याच्या तयारीत होते. घर सोडायला अवघे दोन दिवस उरले असतानाच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या घरावर छापा घालून पाचही अतिरेक्‍यांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हैदराबाद बॉम्बस्फोटांपूर्वी याच घरात अतिरेक्‍यांच्या बैठका झाल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतर अटक केलेल्या "इंडियन मुजाहिदीन'च्या 20 अतिरेक्‍यांच्या चौकशीतून दररोज नवीन माहिती पोलिसांसमोर येत आहे. "इंडियन मुजाहिदीन'ची मीडिया विंग सांभाळणाऱ्या मोहम्मद मन्सूर असगर पीरबॉय (वय 31), आसिफ बशीर शेख (22), मोबिन ऊर्फ सलमान शेख (24) या संगणकतज्ज्ञांसह पाच जणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील एच-302, अशोका मिव्हज्‌ या इमारतीतून अटक केली. बाराशे चौरस फुटांच्या या घराला "इंडियन मुजाहिदीन'ने हेडक्वॉर्टर बनविले होते. गुन्हे शाखेने अटक केलेला "इंडियन मुजाहिदीन'चा थिंकटॅंक मोहम्मद सादिक शेख याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी 28 सप्टेंबर रोजी या घरावर छापा घातला. यापूर्वी पाच साथीदार 24 सप्टेंबर रोजी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यानंतर कोंडवा खुर्द येथे राहणारे हे अतिरेकी आपले घर बदलणार होते. त्यासाठी त्यांनी पुणे शहरात घरही शोधले. घर सोडायला अवघे दोन दिवस असतानाच पोलिसांनी तेथे छापा घातल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. अहमदाबाद बॉम्बस्फोटांसाठी मंगळूरु येथून आलेला स्फोटकांचा साठा पुण्यात व पुढे सुरत आणि अहमदाबाद येथे नेण्यात आला होता. देशभरात स्फोटांचा कट रचणारा "इंडियन मुजाहिदीन'चा थिंकटॅंक रियाज भटकळ ऊर्फ रोशन खान याचा या घरात नेहमी राबता असायचा. स्फोटांपूर्वी या घरात झालेल्या बैठकांनादेखील तो हजर होता.
अटक केलेल्या अतिरेक्‍यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुंगी आणणाऱ्या इंजेक्‍शनच्या कुप्या व गोळ्यांचा साठा हस्तगत केला. ही औषधे लहान मुले व तरुणांना देऊन त्यांचे अपहरण करून, त्यातून खंडणी उकळण्याचा प्रयत्न या अतिरेक्‍यांकडून होत असावा, असा अंदाज आहे. काही वर्षांपूर्वी "सिमी' कार्यकर्ता आफताब अन्सारी याने अशाच प्रकारे अपहरण केले होते. "इंडियन मुजाहिदीन'चा संस्थापक आमीर रझा याच्याशी त्याच्या असलेल्या संबंधांमुळे पोलिस ही शक्‍यता पडताळून पाहत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी पत्रकारांना दिली. पोलिसांनी अटक केलेल्या 20 अतिरेक्‍यांना "इंडियन मुजाहिदीन'कडून गेल्या दोन वर्षांत 26 लाख रुपये हवाला व बॅंकेच्या माध्यमातून आल्याची माहितीही मारिया यांनी या वेळी दिली. बॅंकांमध्ये आलेले पैसे कोणाच्या खात्यांवर आले होते, याचीही माहिती पोलिस गोळा करीत असल्याचे ते म्हणाले.

No comments: