नवी योजना : अटकेतील अतिरेक्यांशी होणार संवाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 17 ः अतिरेक्यांची मानसिकता, त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, कार्यपद्धती; तसेच तपासकामात पोलिसांना फसविण्याची पद्धत या बाबींची माहिती तळागाळातील पोलिसांना होऊन दहशतवादी कारवायांना जरब बसावी यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या "इंडियन मुजाहिदीन'च्या अतिरेक्यांशी मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पुणे येथील सर्व पोलिस उपायुक्तांना संवाद साधता येणार आहे. अतिरेकी कारवाया व त्यांच्या योजनांचा अभ्यास करून त्याबाबतची माहिती हे अधिकारी त्यांच्या खालोखाल असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी गुन्हे शाखेच्या या प्रस्तावाला होकार दर्शविला असून येत्या काही दिवसांतच या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याचे मारिया यांनी सांगितले. यापुढील कालावधीत या उपक्रमात ठाणे, नवी मुंबई व पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील सहभागी करून घेतले जाणार आहे.
गेल्या तीन वर्षांत देशभरात घातपाती कारवाया करणाऱ्या "इंडियन मुजाहिदीन'च्या वीस अतिरेक्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देशभर छापे घालून अटक केली. या अतिरेक्यांत नऊ सॉफ्टवेअर इंजिनिअर, एक मेकॅनिकल इंजिनिअर अशा उच्चशिक्षित तरुणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या अतिरेक्यांचा सूत्रधार रियाज भटकळ स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे. या अतिरेक्यांनी देशभर स्फोट घडविण्यासाठी दरवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. सुरतसारख्या ठिकाणी स्फोटांकरिता डिजिटल टायमरदेखील वापरण्यात आले. गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त असणाऱ्या राकेश मारिया यांनीच 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा छडा लावला होता.
दहशतवाद्यांच्या बदलत्या कार्यशैलीची माहिती सर्वसाधारण पोलिसांना व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दहशतवादाविरुद्ध लढण्याचे काम फक्त दहशतवाद विरोधी पथकाचेच नाही; तर सर्वसामान्य पोलिस व नागरिकांचा देखील या लढाईत सहभाग अपेक्षित आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईतील सर्व पोलिस उपायुक्तांना अटक केलेल्या या अतिरेक्यांशी संवाद साधता येणार आहे. या अधिकाऱ्यांना अतिरेक्यांच्या कार्यपद्धतीची इत्थंभूत माहिती व्हावी याकरिता तपासादरम्यान त्यांना अतिरेक्यांची चौकशी करता येईल. अतिरेक्यांकडून मिळालेली ही माहिती अभ्यासून सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पुढे शेवटच्या थरात असलेल्या साध्या पोलिस शिपायाला देखील या अतिरेकी कारवायांबाबत प्रशिक्षित करण्याची योजना आहे.
इन्फोबॉक्स....
दहशतवादाचा बदलता चेहरा
गेल्या पंधरा वर्षांच्या कालावधीत अतिरेकी आणि त्यांच्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांत अशिक्षित अथवा कमी शिकलेल्या अतिरेक्यांचा सहभाग जास्त होता. 2006 मध्ये झालेल्या उपनगरी रेल्वेतील बॉम्बस्फोट मालिकांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वापर झाला. इंडियन मुजाहिदीनच्या अटक केलेल्या वीस अतिरेक्यांनंतर गेल्या तीन वर्षांत दहशतवादी व त्यांच्या कारवायांचा बदलता चेहरा समोर आला आहे.
No comments:
Post a Comment